Wednesday 26 August 2015

माझे सदगुरु बापू - माझ्या जीवनातील एकमेव सांगाती !!!


जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हाती धरूनिया ॥१॥
चालो वाटे आम्ही तुझा चि आधार । चालविसी भार सवे माझा ॥धॄ॥
बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केलो देवा ॥२॥
अवघे जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥३॥
तुका म्हणे आता खेळतो कौतुके । जाले तुझे सुख अंतर्बाही ॥४॥

हा संत तुकाराम महाराजांचा अभंग मला सहज आणि सोप्या भाषेत मानवी जीवनात खराखुरा आणि एकमेव  सांगाती कोण असतो आणि कोण असू शकतो ह्याची स्पष्ट जाणीव करून देतात असे मला प्रामाणिकपणे वाटते  

माझ्या आयुष्यात माझा असा एकमेव सांगाती मला माझे सदगुरु डॉक्टर अनिरुद्धसिंह जोशी (बापू) ह्यांच्या रुपात मिळाला.





आपण नेहमी हे माझे , ते माझे म्हणून सतत नानाविध गोष्टींच्या मागे धावत राहतो आणि मग एखाद्या अचानक अशा घडलेल्या प्रसंगाने आपण दुखावले जातो वा खरे सत्य उघडकीस येते आणि कळून चुकते की ज्याला मी  आपले , माझे म्हणून कवटाळून बसतो ते  मुळात माझे कधी नव्हतेच वा नसतेच.

माझी पत्नी वा  माझा पती , माझी मुले , माझे आई -वडील , माझे घर , माझी गाडी , माझा बंगला , माझा  संसार हे जरी माझेच असले तरी देखील अगदी प्रत्येक पावलावर हे माझे सारे असतात का माझ्या सोबतीला असा प्रश्न विचारून पाहिल्यास आपल्याला खरे उत्तर मिळते. 

आपण साध्या दैनंदिन आयुष्यात नजर टाकू या , म्हणजे समजायला सोपे जाईल .

आता  समजा मला एखादा आजार झाला किंवा दुखापत झाली तर माझे कुटूंबीय नक्कीच मला डॉक्टरकडे नेतील , औषधे आणून देतील , माझ्या आरामाची सोय  बघतील , मला आयते जेवणाचे पान वाढून देतील , वेळप्रसंगी मला मायेने,प्रेमाने भरवतील, माझी सेवा करतील .. अगदी बरोबर.  मग आपल्याला  वाटेल की ह्या पुढे आणखी काय मदत करणार ना ?  
होय, तसे बघायला गेले तर ही सर्वतोपरीची मदत आहेच. पण बघा जेव्हा मला एखाद्या दुर्धर आजाराने ग्रासले आहे, जीवघेण्या, असह्य वेदना होतात, औषधे पचत नाही वा लागू पडत नाही आणि माझा जीव मेताकूटीला येतो , तेव्हा मला अशी कोणाच्या तरी भक्कम आधाराची गरज असते,मायेचा आधार हवा असतो जो माझ्या मनाला उभारी देणारा असेल , माझ्या भित्र्या दुबळ्या मनाला धीर देणारा असेल, मला माझे हरवलेले मन:सामर्थ्य देणारा असेल असा हा आश्वस्त करणारा शाश्वत आधार म्हणजे सदगुरू होय. 

पूर्वी कुष्ठरोग झाला, अंगावर कोड उठले की सारा समाज त्या रोगग्रस्त व्यक्तीला वाळीत टाकत , वस्तीत, गावात त्याला थारा मिळत नसे. अशाच भागोजी शिंदे नामक एका व्यक्तीला कुष्ठरोग झाला असता, सर्व लोकांनी पाठ फिरवली, घरदार सुटले, सगे संबंधी सोडून गेले होते तेव्हा खरा सांगाती असणारा "तो" एकमेव सदगुरुच त्याच्या मदतीला धावला होता. सदगुरु साईबाबांनी भागोजी शिंदेला स्वत:जवळ नुसते ठेवून घेतले नाही तर स्वत: बाबांचा हात भाजला असता बाबांच्या हाताला तूपाने मालिश करण्याचे , हातापायांचे स्नायू रगडण्याचे काम हाच रक्तपिष्टीने भरलेला भागोजी करीत होता. 

माझ्या बापूंनी अशाच समाजाने झिडकारलेल्या एका कुष्ठरोग्याला भर पावसात सुरक्षित स्थळी नेऊन, त्याला खायला-प्यायला देऊन त्याचे प्राण वाचविले होते. आम्हा श्रध्दावानांना समाजाने उपेक्षित केलेल्या अशाच रुग्णांची सेवा करायला ते सदैव प्रेरीत करतात. 

साईबाबांचा मेघा नावाचा भक्त निर्वाण पावला होता आणि त्याचे अंतिम संस्कार करायला कोणी त्याचे नातेवाईक नव्हते. तेव्हा स्वत: सदगुरु साईबाबा गावकर्‍यांबरोबर स्मशानात गेले, मेघाच्या शरीरावर त्यांनी फुले उधळली आणि त्याच्या मृत्युवर शोकही केला होता. 

"जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच वारसा आहे " ह्या गाण्याचा अर्थ लहानपणी कळत नव्हता , पण पुढे ह्या घटना पाहून तो उमगला आणि पुरेपूर पटला देखील. 

सदगुरु म्हणजेच साक्षात परब्रम्ह असे आपली भारतीय संस्कृत्ती उगाच नाही सांगत. 

सांगाती म्हणजे असा जो कधीच , कोणत्याही परिस्थितीत साथ सोडत नाही, दगा देत नाही. 
माझे सदगुरु बापूंच्या राहत्या घराच्या शेजारील घरातील व्यक्ती मृत झाल्यावर त्यांचे स्वत:चे कोणीच नातेवाईक नसल्याने अंत्यविधी कोण करणार असा गंभीर प्रसंग उभा ठाकला असता, बापूंनी स्वत: त्या शेजार्‍याचे सर्व अंतिम संस्कार केले असे वाचले होते.    


    
सांगाती म्हणजे असा जो माझ्या प्रत्येक पावलाला साथ देतो, माझी संगत करतो आणि नुसतीच संगत करत नाही तर वेळप्रसंगी माझ्या चुकांपासून मला परावृत्त करायला पाठीत धपाटा घालतो , माझी कानउघाडणी करतो, मला माझ्या चुका दाखवून देतो, वर्मी झोंबतील असे घणाघाती शब्दांचे प्रहार करतो आणि मला चुकांपासून सावरतो. अडी-अडचणीच्या वेळी , संकटाच्या वेळी सर्व जगाने तुझी साथ सोडली तरी मी तुझ्या पाठीशी भक्कम उभा आहे हे ठणकावून सांगतो, जो माझ्या सुखाने सुखावतो आणि दु:खाने दु:खी होतो... 

आता साहजिकच आपल्याला वाटते अरेच्या हे सारे तर माझा मित्र, सखा, माझी मैत्रिण , माझी सखी करतेच... पण आजच्या कलियुगात खरेच अशी निर्भेळ मैत्री करणारी माणसे मिळणे खूपच दुर्मिळ झाले आहे. मैत्री ही एका ठराविक मर्यादेपर्यंत साथ नक्कीच देते, पण ह्या स्वार्थाने भरलेल्या माया नगरीत आजच्या घडीला जेथे माणूसकी सुध्दा शोधावी लागते तेथे अगदी लाभेवीण प्रेम, निव्वळ प्रेमापोटी प्रेम वा नि:स्वार्थ, निरपेक्ष भावनेने केलेले प्रेम मिळणे खरेच दुरापास्त होवून बसले आहे असे म्हटल्यास फारसे चुकीचे ठरणार नाही, अर्थात अपवाद हे नेहमी असूच शकतात. 

संतशिरोमणी तुकाराम महाराज येथे सांगतात माझा विठ्ठल , माझी गुरुमाऊली अशी प्रेमळ आहे की ती कधीच माझी साथ सोडत नाही , मी जेथे जेथे जातो तेथे तेथे माझ्याबरोबर माझी ही गुरुमाय असतेच. एवढेच नव्हे तर तीच मला हाताला धरून चालविते, कोणत्याही क्षणी मला माझ्या विठूमाऊलीचाच आधार आहे, कारण तोच तर माझा भार ही वाहतो. 

गत जीवनाचा सारीपाट उलगडताना --
सातवीची माध्यमिक शाळेची शिष्य़वृत्ती असो वा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला शाळेतून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणे वा इंजिनीअरींगची परीक्षा विशेष प्रावीण्याने उत्तीर्ण होणे असो, 
श्रीसाईसच्चरीतावरील पंचशील परीक्षेतील माझ्या बापूंनी स्वत: परीक्षा घेताना लाभलेले सुवर्ण क्षण !!!  
पंचशील परीक्षेच्या निकालाच्या वेळीस  माझ्या  सदगुरुंच्या मुखातून आलेले नाव 
भकतीशीलसाठी झालेली निवड , आषाढी एकादशीला साक्षात माझ्या सदगुरु विठ्ठलाच्या चरणी वाहता आलेले जीवनाचे तुलसीपत्र , आणि सर्वाचा परमोत्कर्ष बिंदू म्हणजे माझ्या सदगुरुंचे पाद्यपूजन आणि रामनवमीला त्यांनी मस्तकावर लावलेला बुक्का ! 
दुथडी भरून वाहणार्‍या सार्‍या आनंदाचा सांगाती "तो" एकमेव माझा सदगुरुच!  
मुलीच्या बालवयातील गंभीर व्याधीतून तिला सहीसलामत सुखरूप बाहेर काढणारा - "तो" एकच माझा सदगुरु !  
पुढे आईला कॅन्सरच्या आजाराने ग्रासले तेव्हा तिच्या मस्तकी आपला कृपेचा वरदहस्त ठेवून भाग्यवंताचे क्षण बहाल करणारा आणि तिच्या अंतिम संस्कारांच्या वेळी मंत्राग्नी देववून घेतानाही तसूभरही न ढळू देणारा "तो" च माझा एकमेव सांगाती - माझा सदगुरु !
आक्स्मिक हृदयविकाराच्या धक्क्याने (Heart attack) मृत्युच्या कराल दाढेत अडकले असूनही खेचून बाहेर काढणारा आणि तेही एकवार नव्हे तर तीन वेळा जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर गेलेल्या  पतीचे प्राण परतवून सौभाग्य राखणारा - "तो" एकमेव माझा सदगुरु- माझा सांगातीच!  
मुलाच्या जीवनाच्या सर्व आशा मावळल्या असताना, डॉक्टरांनी त्याच्या जीवीताशेवर पाणी सोडले असतानाही झोळीत मुलाचे जीवनदान घालणारा - "तो" एकमेव माझा सदगुरु- माझा सांगातीच!  
अखंड जीवनाचा कायापालट करणारा - "तो" एकमेव माझा सदगुरु- माझा सांगातीच!  

येथे आठवते ते आसामला झालेली बदली. ऑफीसच्या कामानिमीत्त जाणे भागच होते , आता मुलांची शिक्षणे , नवर्‍याची नोकरी असा सर्व मांडलेला संसाराचा डाव विस्कटून सर्वांना आसामला घेऊन येणे शक्यच नव्हते. म्हणजे एकतर एकटीने जाणे भाग होते किंवा नोकरी सोडणे हा दुसरा उपाय होता. त्यात आसाम मध्ये सतत चालणार्‍या दहशतवादी कारवाया, आमच्याच काही ऑफीसर लोकांचे झालेले अपहरण, येण्याजाण्याच्या तुटपूंज्या सुविधा ह्या सार्‍या गोष्टींचा सारासार विचार करता एकटीने आसामला जाणे खूप कठीण वाटत होते, अशा वेळेला विचार करून आपली बुध्दी कुंठीत होते की आता काय करायचे? पण खरेच कसे बरे विसरले होते की एकटी नव्हतेच कधी ? आज ह्याची प्रचंड लाज वाटते की कोणत्या कुमतीने  ग्रासले होते ?  माझा सांगाती तेव्हा ही होताच , फक्त हसत होता शांतपणे . "त्या" शांत  नजरेने काळजाला घरे पडत होती … अशा अगतिक अवस्थेने किती यातना दिल्या होत्या माझ्या सद्गुरुंना ???    

असो . पण तरीही "तो " शरणागतवत्सल  सदगुरु आपले ब्रीद सांभाळतोच .  "तो" असतोच सांगाती त्याही क्षणांचा …  
अशा परिस्थीतीत एका सबळ आणि सक्षम अशा मानसिक आधाराची गरज होती आणि माझ्या मदतीला माझे सदगुरु बापू धावून आले. काही काळजी करू नका , मी आहे ना तुमच्या पाठीशी असे म्हणत मला मन:सामर्थ्य देणारे माझे बापू ! एका क्षणात सारे नैराश्याचे गडद धुके विराले आणि 
" तू आणि मी मिळून अशक्य असे ह्या जगात काहीच नाही " , 
" एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा " तसेच  
"आमचा बापू आमच्यासाठी हळूहळू सर्व काही नीट करत आहे "  
ह्या त्यांच्या वचनांनी आश्वस्त होऊन आणि सर्वस्वी त्यांच्या चरणी भार वाहून निर्धास्त मनाने आसामला निघून आले. 

पुढे आसामला गर्द झाडांनी वेढलेल्या परिसरातील घरात बरेच वेळा साप  निघत , भीतीने बोबडी वळायची आणि आसामी भाषा येत  नसल्याने मदतीला कोणाला बोलावत येत नसे , त्यात येथील स्त्री दाक्षिण्याच्या प्रथांमुळे एकट्या अपरिचित स्त्रीच्या राहत्या घरात आसामी  लोक सहसा शिरायला धजावत नसत. अशा माझ्या बिकट परीस्थितीतही माझी पाठराखण करणारा , माझे मनोधैर्य उंचावणारा , मला मन:सामर्थ्य अव्याहत पुरविणारा माझा एकमेव सांगाती होता माझा सदगुरु - माझे बापू !  पती , मुले सर्व मुंबई येथे आणि आसाममध्ये एकटी  (?????) - केवळ निर्भयतेने जगू शकले ते ह्या माझ्या एकमेव सांगाती - सदगुरुंच्या चरणीच्या विश्वासाने! माझे बापू  प्रत्येक पावलावर साथ देत होते, आहेत आणि सदैव राहतीलच १०८% सत्य कारण तेच माझे सच्चे सांगाती आहेत हा त्यांनीच जागाविलेला विश्वास !           

 तुकारामांच्या " चालो वाटे आम्ही तुझा चि आधार । चालविसी भार सवे माझा " ह्या ओवीची जिवंत प्रचिती "ह्याची देही ह्याची डोळा "अनुभवली.

सदगुरुंना कशाचीच उपमा देता येत नाही. कल्पतरू म्हणजे कल्पना केलेले देणारा वृक्ष , पण जर मी चुकीची कल्पना केली तर मला फळ मिळणार चुकीचेच. चिंतामणी म्हणजे चिंतीलेले देणारा मणी म्हणजे येथे ही मी चिंतन योग्य गोष्टीचे करायला हवे नाहीतर माझ्या चिंतनातून वाईट उद्भवले तर त्याला मीच जबाबदार. कामधेनू म्हणजे माझा इच्छीत काम पुरविणारी पण चांगल्या गोष्टींचाच काम ती पुरवेल असे नाही  
म्हणजेच थोडक्यात काय तर माझ्या मागण्या जरी पुरविल्या गेल्या तरी त्यातून निर्माण होणार्‍या सर्व परिणामांची मग ते चांगले असो वा वाईट , जबाबदारी ही पूर्णपणे माझ्याच डोक्यावर असते. 

जसे आपण म्हणतो "उचलली जीभ लावली टाळ्य़ाला" म्हणजे विचार न करता मी काही बरळलो तर मला इष्ट/अनिष्ट परिणामांना सामोरे जावे लागते. तर कधी ह्या उलट म्हणजे भीती पोटी, शरमे पोटी किंवा अवास्तव चुकीच्या समजापायी मी एखादी गोष्ट करायला धजावत नाही, तर अशा बिकट समयी पण माझ्यातील उणीवा दूर करून मला ताठ मानेने, निर्भयपणे जगायला शिकवितो तो सदगुरु.   

संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे त्यांच्या जन्माआधीच सांसारिक परिस्थितीला कंटाळून लग्न झाले असताना देखील पत्नी रखुमाबाईंना एकटे सोडून संसार त्यागून संन्यासाश्रम स्विकारतात. पुढे त्यांच्या आयुष्यात सदगुरुंचा प्रवेश झाल्यावर मात्र त्यांचे सदगुरु त्यांना गृहस्थाश्रमाची जबाबदारी पूर्णपणे पार पाडून मगच संन्यासाश्रमात प्रवेश करता येतो अशी कान उघाडणी करून परत संसार करायला भाग पाडतात. म्हणूनच ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडाना त्या काळच्या समाजाने "संन्याशाची मुले" म्हणून वाळीत टाकले होते.

बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केलो देवा - ह्या ओवीचे प्रत्यंतरच वाटावी अशी ही कथा , नाही का बरे?

वाल्या कोळ्याच्या आयुष्यात असेच बरळ /गरळ त्याने आयुष्यभर ओकले होते अज्ञानापायी. पण सदगुरु नारद मुनींचा परीस स्पर्श लाभताच "मरा मरा" असे उलटे नाम घेऊनही वाल्या कोळ्याचा "वाल्मिकी ऋषी" झाला.
आपण म्हणतो की माणसाची सावली त्याची कधीच साथ सोडत नाही , पण नीट विचार केला तर जाणवते की सूर्याच्या रणरणत्या उन्हात, तळपत्या सूर्यप्रकाशात दिवसा सावली पडू शकते , पण रात्रीच्या गडद अंधारात नेहमीच ही सावली साथ देते असे ही नाही. म्हणजे "संकट समय येता कोण कामी येते ? ही प्रत्येक मानवाच्या जीवनाची शोकांतिकाच असते.

तुमच्याकडे धन , संपत्ती , ऐश्वर्य, मान मरातब असताना सारे लोक तुमच्या दिमतीला सरसावतात, तुमची जी-हुजूरी करतात , परंतु हे सारे नसताना कोण साथ देणार ? हो सदगुरु हा मात्र कधीच व्यावहारिक वस्तूंची कामना धरीत नाही , "तो" एकमेव हा तुमचा सच्चा "सांगाती" असतोच , तेही ह्या एकाच जन्मात नव्हे तर जन्मोजन्मी "तो" एकमेव "सांगाती" असतो , जो कधीच दगा देत नाही, तुम्हाला फसवत नाही, तुमची प्रतारणा करीत नाही , तुमची कधीच उपेक्षा करीत नाही.

म्हणूनच संत कबीर म्हणतात " गुरु बिन कौन बतावे बाट  बडा बिकट यह यमघाट  "  गुरु शिवाय मला ह्या संसार रूपी यम घाटावरून कोण साथ देणार?

संत कबीर तर सदगुरुंची महती गाताना थकत नाहीत  - 
गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागुं पांय ।
बलिहारी गुरु आपने , गोविंद दियो बताय ।।
म्हणजे माझे गुरु (सदगुरु) आणि माझा परमेश्वर (गोविंद) एकाच वेळी माझ्या समोर उभे असतील तर माझ्या मनाला मी आधी कोणाच्या पाया पडू हा प्रश्नच पडता कामा नये , मला माझ्या सदगुरुंच्याच चरणांवर लोटांगण घालायला हवे आधे ज्यांनी मला माझा गोविंद , माझा देव , माझा परमेश्वर मला दाखविला.

सदगुरु हा केवळ एकाच जन्मीचा नव्हे तर अनंत जन्मांचा सांगाती असतो. म्हणूनच सदगुरुला तीन्ही काळांचा स्वामी, त्रिकालदर्शी म्हणून गौरवले जाते.

हेमाडपंत विरचित "श्रीसाईसच्चरित" ह्या महान अपौरुषेय ग्रंथात स्वत: साईबाबा त्यांचे एक परम भक्त शामराव देशपांडे ह्यांना गेल्या ७२ पिढ्यांमध्ये तुला कधी हात लावला का स्मर असे म्हणतात. ह्याचाच अर्थ शामा उर्फ माधवराव देशपांडे ह्यांच्या ७२ पिढ्या मध्ये साईनाथ हे त्यांचे सांगाती होते  होते ह्याची आठवण शामाला नसली तरी बाबांना आहे आणि बाबा स्वत: तसा उल्लेख करून शामालाही आठवण करून देतात.   .  

सदगुरु हा परमात्मा  आणि  आदिमाता चण्डिका ही जग्जननी , आणि आम्ही सारे त्यांची लेकरे !
       

माझ्या सदगुरु अनिरुध्द बापूंचे तसे आम्हा सर्व त्यांच्या लेकरांना वचनच आहे - 
 सांगाती आहे मी तुमचा खचित , 
तीनही काळी, तीनही लोकांत , 
                   विसरलात तुम्ही मज जरी क्वचित, 
                              मी  नाही विसरणार तुम्हांस निश्र्चित                      

अशा ह्या माझ्या अनंत जन्मांच्या सांगाती असणार्‍या माझ्या सदगुरुंच्या चरणीं वारंवार लोटांगण - 
मी तो केवळ पायांचा दास नका करू मजला उदास जोवरी ह्या देही श्वास निजकार्यासी साधूनि घ्या .... 

माझ्या जीवनयज्ञाची सांगता त्यांच्याच चरणी होवो, त्यांच्याच भक्ती-सेवेच्या कार्यात हा देह कारणी पडो, हीच आर्ती  !!!
अंबज्ञतेचे हेच शब्द येती ओठी - अनिरुध्दा तुझा मी किती ऋणी झालो , अनिरुध्दा तुझा मी किती ऋणी झालो, अनिरुध्दा तुझा मी किती ऋणी झालो.... अंबज्ञ बापूराया 
सुकले जरी रोप माझे समिधाच व्हाव्या रे 
तुझ्यासाठी सर्व माझे , माझ्यासाठी तूच रे. माझ्यासाठी तूच रे, माझ्यासाठी तूच रेssssssssss   




संदर्भ:  
१. श्रीमद्पुरुषार्थ: प्रथम: खण्ड: -  सत्यप्रवेश: 
२.  www.aniruddhakaladalan.blogspot.in

हरि ॐ. श्रीराम . अंबज्ञ


10 comments:

  1. ultimate.........toch majha sangati

    ReplyDelete
  2. हरी ॐ
    आपला बापू आपल्या सोबत प्रत्येक क्षणाला सोबत असतोच्

    ReplyDelete
  3. अत्यन्त भावपूर्ण अनुभव
    अम्बज्ञ

    ReplyDelete
  4. Sakhar Shabd Lihita Patiwaar Shabd Dyan Tevdhe Honar Goadi Nahi Kalnaar Anubhavaveen !!

    ha lekh mhanje ...

    Ya Sarva Goadiye Che Je Mool Tee Ek Nishtha Guru Padi Prabal Goad Nave Sharkara Gool Goad Tee Samool Shee Shrddha - SaiCharitra 38 Handi

    Faar Faar Sundar

    Ambadnya

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर आणि मनाला आल्हाद देणारा लेख..
    "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती". ... प्रत्येक संदर्भ, बापूंचे प्रत्येकाशी असलेले अतूट connection ह्या सगळ्याचा चित्रपट डोळ्यांसमोरून तरळवणारा.. लेख...

    अनिरुद्ध शुभेच्छा सुनितावीरा...

    ReplyDelete
  6. EK NA EK SHABD BHAKTINE BHARAEKELA AHE. ME AMBADNYA AAHE!!!.

    ReplyDelete
  7. अंबज्ञ श्रीराम
    अत्यंत भाउक अनुभव सुदंर लेख

    ReplyDelete
  8. अम्बज्ञ लेख सुनितवीरा
    खूप छान अगदी अंगावर काटा आला वाचून ….
    आणि बापूंची कृपा मनाला आल्हाद देऊन गेली ….

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog