Saturday 26 September 2015

टेलिपोर्टेशन - दूरप्रागट्य - अदृश्‍य करण्याचे तंत्र !!!

१८ सप्टेबर २०१५ ला सकाळ ह्या वृत्तपत्रात " वैज्ञानिकांना गवसले अदृश्‍य करण्याचे तंत्र! " ह्या मथळ्याखाली टेलिपोर्टेशन संबंधी एक बातमी नुकतीच वाचनात आली होती. त्यात असे सांगितले होते की -
  
वॉशिंटन डी सी - आतापर्यंत आपण केवळ कल्पनाविश्‍वात, जादूच्या प्रयोगांमध्ये किंवा हॅरी पॉटरसारख्या चित्रपटात पाहिलेली अदृश्‍य होण्याची कला आता विज्ञान तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्यक्षात साकारणार असल्याचे कळले. अमेरिकेतील वैज्ञानिकांनी अतिशय पातळ त्वचेसारखा अंगरखा तयार केला असून तो माणसाने अंगात घातल्यास क्षणार्धात अदृश्‍य होता येणार असल्याचा दावाही केला आहे. 

अमेरिकेतील बर्कले लॅब आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी सोन्याच्या वीटेच्या आकाराच्या अतिशय सूक्ष्म भागापासून अदृश्‍य करणारा अंगरखा तयार केला आहे. या अंगरख्याची जाडी केवळ 80 नॅनोमीटर आहे. या अंगरख्याच्याभोवती त्रिमितीय (थ्रीडी) पद्धतीने काही जीवनशास्त्रीय पेशी चढउतारांसह गुंडाळण्यात आल्या आहेत. हा अंगरखा परिधान करणाऱ्या व्यक्तीशी एकरूप होऊन प्रकाशातही संबंधित व्यक्तीला अदृश्‍य करतो. "कोणताही विशिष्ट आकार नसणारा तसेच प्रकाशातही न दिसणारा हा थ्रीडी अंगरखा प्रथमच निर्माण करण्यात आला आहे' अशी माहिती बर्कले लॅबच्या मटेरियल सायन्स विभागाचे संचालक माहिती झियांग झांग यांनी दिली आहे. असे वाचनात आले होते. 

त्यापाठोपाठ लगेच २३ सप्टेंबर २०१५ ला Washington Post ह्या वृत्तपत्रात Scientists just smashed the distance record for quantum teleportation ही बातमी वाचनात आली. 

Washington Post च्या बातमीनुसार National Institute of Standards and Technology (NIST) च्या भौतिकशास्त्रज्ञांनी माहिती पाठवताना एक फॉटॉन (PHOTON) द्वारे दुसर्‍या फॉटॉन मध्ये ६० मैलांच्या अंतरावर फायबर ऑप्टीक केबलच्याद्वारे यशस्वीरीत्या पाठवले असल्याचा दावा केला आहे, जे पूर्वीच्या पेक्षा ४ पट अधिक अंतर आहे. 

अधिक माहितीसाठी आपण खालील link वर भेट देऊन माहिती वाचू शकता.

https://www.washingtonpost.com/news/speaking-of-science/wp/2015/09/23/scientists-just-smashed-the-distance-record-for-quantum-teleportation/?wpmm=1&wpisrc=nl_most

लागोपाठच्या ह्या दोन्ही बातम्यांमुळे साहजिकच टेलिपोर्टेशन म्हणजे नक्की काय असते ह्या विषयी अपार कौतुक मनी दाटले आणि खरेच माणूस असा विज्ञान- तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अदृश्य होऊ शकतो , किंवा माणूस एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी असा अदृश्य होऊन प्रगटू शकतो का खरेच ? हे जाणण्याची जिज्ञासा मनात दाटली आणि संगणकावरच्या आंतरजाल(Internet) ह्या महान माहिती स्त्रोताचा वापर करण्याचे ठरविले आणि त्यातून हाती लागलेले हे ज्ञान !!!!

अमेरिकेतील एलॉन विद्यापीठ आणि प्यु इंटरनेट ह्या दोन संस्थांनी येत्या १५० वर्षांतील म्हणजे भविष्यकाळातील इंटरनेट कसे असेल याचा अंदाज घेणारे अहवाल तयार केले होते असे वाचनात आले. ह्या अहवालाची माहिती देताना मांडलेल्या लेखात २०१५ ते २०२४ ह्या दहा वर्षांचा काळ कसा असेल ह्यावर भाष्य केले आहे. त्यात २०१५ ते २०२० चा वेध घेताना एलॉन विद्यापीठ आणि प्युइंटरनेटचा अहवाल म्हणतो की नारदमुनींसारखे एका ठिकाणाहून दुसरीकडे क्षणार्धात प्रकट होणे माणसाला शक्य नाही हे लहान मुलालाही कळते. मात्र ह्या अशक्यप्राय चमत्काराला प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया इसवी सन २०१५ मध्ये सुरू झालेली असेल, ज्याला तंत्रज्ञानाच्या भाषेत याला 'टेलिपोर्टेशन' असे म्हणतात. 

टेलिपोर्टेशन म्हणजे आपण समजायला सोपे म्हणून त्याला दूरप्रागट्य असेही मराठीत म्हणू शकतो. आता टेलिपोर्टेशन म्हणजे काय? हा पहिला प्रश्न साहजिकच मनात उद्भवतो. आपण लहानपणी गोष्टींच्या पुस्तकातून वाचले आहे किंवा टी.व्ही. मालिकेत पाहिले आहे की काही पौराणिक कथांमध्ये देवर्षि नारद मुनी, देव किंवा अंगी मायावी शक्ती असणारे काही राक्षस हे डोळे मिटून ध्यान करताच क्षणार्धात कधी वसुंधरा पृथ्वीवर तर कधी पाताळलोकात तर कधी देवलोकात वावरताना दिसत आणि ते त्यांच्या इच्छेप्रमाणे काम होता क्षणी अंतर्धान पावून इच्छित स्थळी पोहचत असत. 


एवढेच नव्हे तर चक्क काही वर्षांपूर्वी टी.व्ही.वर प्रक्षेपित होणार्‍या "स्टार ट्रेक " ह्या मालिकेतही आपण असे पाहिले आहे की या मालिकेतील काही पात्रे (माणसे)  त्यांच्या अंतराळयानातून जवळच्या ग्रहावर किंवा इतर ठिकाणी कोणत्याही वाहनाशिवाय किंवा हवेतून न उडता आपोआप अवतरत असल्याचे दाखवले जायचे. त्यासाठी त्या व्यक्ती ह्या एका विशिष्ट कक्षात जाऊन विशिष्ट प्रकारच्या वैज्ञानिक आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या प्रणालीद्वारे त्यांचे स्थलांतर होत असल्याचे दृश्य तेव्हा आपल्या सर्वांनाच थक्क करून टाकत असे. त्या कक्षामध्ये तीन वर्तुळाकार जागांवर तीन व्यक्ती उभ्या राहत आणि ते यंत्र सुरू केले की त्या जागेवरील त्या व्यक्ती हळूहळू कणस्वरूपांमध्ये विरून जाताना दिसत व काही वेळाने त्या वर्तुळाकार जागेवर कोणीही उरत नसे. त्या ठिकाणाहून अदृश्य झालेल्या त्या व्यक्ती इतरत्र कुठे तरी (त्यांना हवे असलेल्या ठिकाणी ) तशाच प्रकारे प्रकट होताना दिसत होते. 



Saturday 5 September 2015

शिक्षक दिन - ०५ सप्टेंबर - राष्ट्रउभारणीचा पाया रचणार्‍या पाईक शिक्षकांना मानाचा मुजरा !!!

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरुरेव परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नम: ।।
गुरुची महती गाणारा हा श्लोक  सार्‍या आबालवृध्दांना ठाऊक असतोच.  

मानवाच्या जीवनात त्याचा प्रथम गुरु ही त्याची जन्मदात्री माताच असते, जी त्याला अगदी जन्मापासून बोलायचे, चालायचे , धावायचे कसे ह्याचे प्राथमिक धडे शिकविते. पाटीवर हाताला धरून धुळाक्षरे गिरवायला शिकविते. ओल्या मातीच्या गोळ्याला जसे कुंभार चाकावर फिरवून सुंदर , सुबक आकार देतो, तसेच बाळाच्या जीवनाला आकार देण्याचे , घडवण्याचे महत्त्वपूर्ण काम मुलाची आई/माता करते. त्यानंतर पिता ही गुरुची भूमिका पावलोपावली निभावतच राहतो. परंतु व्यावहारीक जगाचे शिक्षण घेण्यासाठी लहान मुलाला शाळेची पायरी चढावी लागते आणि तेथून पुढे त्याच्या बाल जगात त्याचे शिक्षक , त्याचे गुरुवर्य अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका पार पाडतात. म्हणूनच आपल्या भारतभूमीत वैदिक संस्कृतीने गुरुला वा आजच्या कालानुसार शिक्षकाला मानवाच्या जीवनात अत्यंत मानाचे , आदराचे असे अत्युच्च स्थान दिले आहे. आज जगात जी डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ, विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी अशी अनेकविध क्षेत्रातील नामवंत , कीर्तीवंत मान्यवर मंडळी आहेत , ती त्यांच्या यशाचे मानकरी बहुतांशाने त्यांच्या शालेय वा महाविद्यालयीन जीवनातील मार्गदर्शक शिक्षक/गुरुवर्य असल्याचे कौतुकाने आणि अभिमानाने सांगताना आढळतात.  
   
आपल्या भारतवर्षात फार प्राचीन काळापासून गुरूंची थोर परंपरा आहे. साक्षात भगवान शिव पार्वती मातेला गुरुगीतेमधील एका श्लोकात गुरुंचे अनन्यसाधारण महत्त्व समजावून सांगताना म्हणतात - 
                      न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोर्धिकं तप: ।
                   तत्त्वं ज्ञानात्परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नम: ।
                     ध्यानमूलं गुरोर्मूर्ति: पूजामूलं गुरो: पदम् ।। ७४ ।।
                   मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरो: कृपा ।। ७६ ।। 
                             ॐ दत्तगुरवे नम: ।।
सद्गुरु वा गुरुतत्त्वापेक्षा अधिक श्रेष्ठ असे कोणतेही अन्य तत्त्व नाही, गुरुसेवेपेक्षा अधिक श्रेष्ठ असे कोणतेही अन्य तप नाही. ह्या ज्ञानाहून श्रेष्ठ असे कोणतेही तत्त्व नाही. (ह्याचा अर्थ गुरुतत्व/सदगुरुतत्त्वच सर्वोच्च , परम श्रेष्ठ तत्त्व आहे, हेच सत्य आहे.) अशा श्रीसदगुरुंना नमस्कार असो. 
सदगुरुमूर्ति हेच ध्यानाचे मूळ आहे. सद्गुरुंचे चरण हेच सर्व पूजांचे मूळ आहे . सदगुरुंचे वाक्य हेच सर्व मंत्रांचे मूळ आहे व मोक्षाचे मूळ आहे, सदगुरुकृपा. 
पुढे एका श्लोकात शिव पार्वतीस म्हणतात ," हे देवी , गुरुभाव हेच सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. गुरुदत्तांचा चरणांगुष्ठ ( पायाचा आंगठा ) सर्व तीर्थांचे आश्रय स्थान आहे ब्रम्हाविष्णुमहेश्वरांना नमस्कार असो." 
                      गुरुभाव: परं तीर्थं अन्यतीर्थं निरर्थकम् ।
                      सर्व तीर्थाश्रयं देवि पादाङ्गुष्ठे च् वर्तते ।।
                          ॐ ब्रम्हाविष्णुमहेश्वरेभ्य: नम: ।। 

संत कबीर सुध्दा आपल्या एका दोह्यात गुरुंच्या ह्या महती गाताना अप्रतिम उदाहरण देतात -  
गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागुं पांय ।
बलिहारी गुरु आपने , गोविंद दियो बताय ।।
म्हणजे माझे गुरु आणि माझा परमेश्वर (गोविंद) एकाच वेळी माझ्या समोर उभे असतील तर माझ्या मनाला मी आधी कोणाच्या पाया पडू हा प्रश्नच पडता कामा नये , मला माझ्या गुरुंच्याच चरणांवर लोटांगण घालायला हवे आधी ज्यांनी मला माझा गोविंद , माझा देव , माझा परमेश्वर मला दाखविला. 

तर अशा ह्या आदरणीय गुरुंच्या ऋणांचे स्मरण करण्याचा, आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा पायंडा आपल्या भारतवर्षात सुरु केला ते महान व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन !


प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog