Saturday 31 October 2015

आधुनिक भारताचे पोलादी पुरुष - "भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल"

आधुनिक भारताचे पोलादी पुरुष किंवा लोह पुरुष म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरदार वल्लभभाई पटेल ह्या खंबीर व्यक्तिमत्त्वाच्या कणखर नेतृत्त्वाची आज ३१ ऑक्टोबर रोजी १४० वी जयंती आहे त्या निमीत्ताने -    


धाडसी, कुशल, न्यायप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पोलादी पुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्त्व शब्दात मांडणे म्हणजे टिटवीने समुद्र उपसण्याचा अट्टाहास करण्यासारखेच आहे. अष्ट्पैलू असामान्य प्रतिभेचे वरदान लाभलेला हा भारतमातेचा सुपुत्र गुजरातमधील खेडा जिल्ह्यतील नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी लेवा पाटीदार ह्या समाजातील एका शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन भारतमातेची कूस खर्‍या अर्थाने उजविता झाला. लाडबा व झव्हेरीभाई पटेल ह्या माता-पित्यांच्या उदरी जन्मलेले हे चौथे अपत्य. वल्लभभाईंच्या वडिलांनी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला होता व या कुटुंबावर स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव होता. देशप्रेमाचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला व लहानपणी घरीच राजकीय संस्कारांचे बाळकडूही पाजले गेले होते. 

Wednesday 28 October 2015

भूकंप - निसर्गाचा प्रकोप वा रौद्ररूपी तांडव ?

नुकत्याच सोमवारी दिनांक २६ ऑक्टोबर २०१५ रोजी ईशान्य अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतराजीत केंद्र असलेल्या , अमेरिकेच्या "जिऑलॉजिकल सर्व्हे" ने ७.५ रिश्टर क्षमतेची तीव्रता नोंदविलेल्या भूकंपाच्या जोरदार झटक्यांनी दुपारी पावणेतीनच्या सुमारास उत्तर भारतासह, अफगाणिस्तान , पाकिस्तान येथील जनजीवन विस्कळीत झाले असल्याची बातमी वाचनात आली, ज्यात सुमारे २४८ हून अधिक लोक मूत्युमुखी पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याआधी २५ एप्रिल २०१५ मध्ये नेपाळ मध्ये ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप व लागोपाठ  त्याचा पडसाद म्हणून १२ मे २०१५ रोजी ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला ज्यात सुमारे ८००० हून अधिक लोकांचा बळी गेला असल्याची भीती व्यक्त केली जाते. म्हणजेच अवघ्या ६ महिन्यांमध्ये दक्षिण आशियाला भूकंपाचा मोठा धक्का बसण्याची ही दुसरी वेळ आहे. 

 नेपाळ भूकंप 
त्यामुळे सध्याच्या अफगाणिस्तान येथील भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा एकदा भूकंप आणि त्याची कारणं हा विषय चर्चेत आला आहे. भूकंप होणं ही एक नैसर्गिक आपत्ती वा निसर्गाचा प्रकोप दर्शवणारी घटना असूनही आज सुध्दा भूकंपाचे धक्के बसले की, आपल्याकडे लोकांमध्ये भीती निर्माण होऊन गोंधळ उडतो वा भूकंप कसा होतो ह्याबाबतची शास्त्रीय कारणे माहीत नसल्यामुळे अज्ञानापोटी तो लोकांकडून केला जातो. मुळातच आपल्या भारतात आपत्ती व्यवस्थापन , आपती निवारण अर्थातच डिझास्टर मॅनेजमेंट ह्या विषयाबाबत म्हणावी तेवढी जनजागृती झालेली नाही. मुळातच जनजागृती नसल्यामुळे लोकांना भूकंपाविषयी आणि तो झाल्यानंतर काय काळजी घ्यावी, याची पुरेशी कल्पना नाही. त्यामुळे ते मृत्युमुखी पडतात.

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog