Thursday 12 October 2017

एलफिन्स्टन येथील चेंगराचेंगरीनंतरचा स्वंयशिस्तीचा धडा !

पश्चिम रेल्वेच्या एलफिन्स्टन रोड स्टेशन आणि परळ स्टेशनला जोडणार्‍या फुटओव्हर ब्रिज म्हणजेच पुलावर गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत दुर्दैवाने २३ रेल्वे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर दुर्घटना घडल्याबद्दल कुणी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले तर कुणी अपुरी यंत्रणा कारणीभूत आहे तर कुणी ढिसाळ नियोजन जबाबदार आहे तर कुणी पायाभूत सुविधा न देणार्‍या सरकारला दोष दिला. दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ५ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात तर ’फूल गिर गया ’ च्या ऐवजी ’पूल ’ ऐकल्याने गोंधळ उडाल्याने ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या तरी दुर्घटना नेमक्या कोणत्या कारणामुळे घडलीहे निश्चित करणे तूर्तास तरी कठीण असल्याचे आढळत आहे.

ह्या दोषारोपांच्या ,प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच एक आश्चर्याची बाब सामोरी आली ज्यातून मुंबईच्या सुजाण नागरिकांनी आपला रेल्वे प्रवास सुरक्षित होण्याकरिता उचलेल्या एका अत्यंत सुंदर, स्तुत्य अशा पावलाची सुरुवात केली आहे आणि ते पाऊल म्हणजे स्वंयशिस्तीचे पालन , आचरण! परळ रेल्वे स्टेशनवर रविवारी सकाळी नऊ वाजता प्रवासी रांगेत उभे राहून शिस्तीने पुलावर चढताना काही कॅमेर्‍यांनी टिपले होते.



कोणत्याही समस्येला उत्तर शोधताना , ती समस्या उद्भवली का , कोणामुळे ह्या सारख्या प्रश्नांचा सारासार विचार करणे हे जेवढे गरजेचे असते त्याही पेक्षा भविष्यात पुन्हा नव्याने अशा समस्या येऊच नये म्हनून खबरदारी घेणे , त्यानुसार उपाय योजना आखणे व त्यांचा प्रत्यक्षात अवलंब करणे हे ही तितकेच किंवा त्याहून कैक पटीने अधिक महत्त्वाचे असते. आपण मराठीत एक म्हण म्हणतो की "पुढच्यास ठेच मागचा शहाणा ’ पण व्यवहारात बहुधा आपल्याला स्वत:ला ठेच लगल्याशिवाय आपण शहाणपणा शिकत नाही वा दुसर्‍याच्या अनुभवावरून सहजगत्या खबरदारी घेण्याची , काळजी घेण्याची जागरूकता सहजासहजी बाळगत नाही.

पण ह्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर नागरिकांनी रांगेतून शिस्तीने पुलावर चढण्याची जी स्वंय शिस्त अंगी बाणविण्याचे पहिले पाऊल उचलले हे खरोखरीच कौतुकास्पद आहेच आणि अत्यंत आवश्यकही आहे. आपली सुरक्षा आपणच घेण्याचा हा छोटासाही प्रयत्न गर्दीच्या नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका नक्कीच बजावेल.     

गर्दीचे व्यवस्थापन व नियंत्रण हा एक खूप सखोल अभ्यासाचा विषय आहे. क्राऊड मॅनेजमेंट म्हणजेच गर्दीचे व्यवथापन ! अनियंत्रित जमावाचे गर्दीत रूपांतरण व्हायला फारसा वेळ लागत नाही अशावेळी कोणत्याही कारणास्तव वाहत्या गर्दीला विरोध करणारा कोणताही अडथळा अचानक पणे समोर आला तर चेंगराचेंगरी सारखी गंभीर, धोकादायक परिस्थिती कधीही उद्भवू शकते.  गर्दी होणार्‍या जागी स्वयंशिस्तीचे पालन करून रांगेचा वापर केल्यास गर्दी होण्याची शक्यता कमी होते.

म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन करतानाही गर्दीचे व्यवस्थापन हा महत्त्वाचा पैलू ध्यानात ठेवावाच लागतो.  

आपण व्यवहारात अनुभवतो की  " दूधाने जर जीभ पोळली तर माणूस ताक सुध्दा फुंकर मारूनच पितो’ त्याप्रमाणेच नुकत्याच घडलेल्या चेंगराचेंगरीने रोज रेल्वेने प्रवास करणार्‍या मागरिकांची मनात भीतीने धडकी भरली आहे, जीभ पोळली आहेच त्यामुळे पुढची पाऊले उचलताना शक्यतोवर गर्दी होणाची कारणे टाळणे हाच सोपा उपाय आहे.   

गर्दीमध्ये धक्काबुक्की, चेंगराचेंगरी होऊ शकते आणि एलफिस्टन रोड येथील चेंगराचेंगरी अनियंत्रित गर्दीने , धक्काबुक्कीने झाली हे जाणून खबरदारी म्हणून अरूंद जागेत गर्दी करून घुसून , धक्काबुक्की करत राहण्यापेक्षा रांगेचे पालन केल्य्यास, नक्कीच गर्दीच्या नियंत्रणाला मोठा हातभार लागेलच, शेवटी स्वंयशिस्त     हा मर्यादा पालनाचा भाग आहे आणि मर्यादा पाळली की अपघात होतच नाहीत किंवा त्यांची व्याप्ती , प्रभाव कमी होतो. चला तर रांग लावून स्वंयशिस्तीचा कित्ता गिरवू याव गर्दी व्यवस्थापनाला सहकार्य करू या !

सूचना -  हा लेख प्रथम दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ९ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रथम प्रसिध्द्व झाला होता.

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog