उष्णतेची लहर (Heat wave) आणि उष्माघात - उन्हाळ्यातील आपत्ती - २९ मे २०१५
रोजच्या मृतांच्या वाढत जाणार्या आकडेवारीने वृत्तपत्रातील ह्या बातमीने अधिकच लक्ष वेधून घेतले.
यंदाचा उन्हाळा जीवघेणा ठरला असून देशात उष्म्याच्या लाटेने आतापर्यंत १७०० वर लोकांचा बळी घेतला आहे. सध्या हैदराबाद - तेलंगणा आणि आंध्रप्रदेशातील उष्णतेची लहर काही कमी होत नसल्याचेच दिसून येत आहे. या दोन्ही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसात उकाड्याने मृत्यू झाल्याची नोंदीत दिवसागणिक अधिकच वाढ होत चालल्याचे आढळून येते आहे. कालच्या गुरुवारपासून ( २८ मे २०१५) फक्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उष्माघाताने ४१४ वर जणांचा बळी घेतला आहे.
जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेची ही लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. देशात अनेक राज्यांत पारा ४७ अंशावर असून अनेक राज्यांत सरासरी तापमान ४१ ते ४५ अंश सेल्सिएसपर्यंत पोहोचले आहे. केंद्र सरकार उष्णतेच्या लाटेने तत्पर झाले असून डॉक्टरांच्या सुट्या रद्द केल्या आहेत.
आंध्र प्रदेश, तेलंगण या राज्यात उष्णतेच्या बळींची संख्या सर्वाधिक आहेत. या राज्यात तापमानाचा पारा ४५ अंशांपेक्षा अधिक आहे. दोन्ही राज्यांमध्ये उष्णतेची लाट आणखी किमान दोन दिवस कायम राहील असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ईशान्य भारतातून येत असलेल्या उष्ण वाऱ्यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच रात्रीचे तापमानही भारतात वाढू लागले आहे. सरकारने सर्व राज्यांना दक्षता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णालयांमध्ये अतिरिक्त वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश सर्व राज्यांना दिले आहेत.