Tuesday, 19 July 2016

गुरुपौर्णिमा -बापूवीण नाही कुणी रे,बापू नाम हाचि श्वास रे !

हरि ॐ
गुरुवीण नाही कुणी रे । दत्त नाम हाचि ध्यास रे ।।
गुरु माऊली तू साऊली जीवा़ची । 
तूच बंधू  पिता रे ।।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।। धृ ।।
गुरु धेनू होय मीच तान्हुले गे । चकोर मी होता देवा तू चांदणे ।।
गुरु हाच चारा । गुरु हा निवारा ।
गुरु हा माझा श्वास रे ।।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
गुरु नाम छाया । गुरु नाम माया ।
गुरु नाम घेता झाली शुध्द काया ।
गुरु हाच सूर । अमृताचा पूर ।।
गुरु हीच माझी नाव रे ।
गुरुवीण नाही कुणी रे ।  दत्त नाम हाचि ध्यास रे ।।
गुरु माऊली तू साऊली जीवा़ची ।
तूच बंधू तू पिता रे ।
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
गुरुवीण नाही कुणी रे। दत्त नाम हाचि ध्यास रे ।
गुरुवीण नाही कुणी रे । दत्त नाम हाचि ध्यास रे
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।


किती समर्पक शब्दांत गुरुरायाचे, सदगुरुमाऊलीचे गुणसंकीर्तन मांडले आहे ना? मनीची आर्त, सदगुरु चरणींची ओढ अधिकच दाटून , भावविव्हल करते ती कधीही न शमणारी अनन्य पिपासा ! सदगुरु चरणी सदैव अनन्य शरणागत होण्याची , गुरु हाच श्वास बनण्याची , जीवनयज्ञाची एममेव समिधा !

गुरुपौर्णिमा  म्हटले की आपोआप मनी उमटतो ते अचिंत्यदानी गुरुमाऊलीचे अनंत , अमाप , अगणित प्रेम , प्रेम आणि बस्स फक्त प्रेमच !
गुरुची कृपा हीच गुरुपौर्णिमा हो ।
प्रतिक्षणी आम्हा अनुभव लाहो ।।
गुरुच्या ऋणांचे अखंड स्मरण राहो ।
गुरुमाऊलीच्या ऋणी मी बुडालो।।33।।
अनिरुद्धा ,तुझा मी किती ऋणी झालो।।
अनिरुद्धा ,तुझा मी किती ऋणी झालो।।
सद्गुरु श्री अनिरुद्ध ऋणज्ञापक स्त्रोत -डॉ. योगीन्द्रसिंह  जोशी ह्यांचे शब्द काळजाला स्पर्शून जातात.

माणसाचे जीवन हे सुख दु:खाच्या धाग्यांनी विणलेले असते. परंतु "सुखाचिया काळी जमती आप्त सारे , वेदनेत माझ्या मी एकलाची राही " ही प्रत्येक माणसाची दुखरी , खुपरी बाजू असते. आणि मग अशा असहाय्य, बिकट , एकाकी परिस्थीतीत कुणाचा तरी नि:स्वार्थी प्रेमाचा , मायेचा हात लाभावा , कुणीतरी आपले भेटावे , कुणीतरी माझे दु:ख , माझी वेदना समजून घेणारे , फक्त माझे आणि माझे असावे अशी किमान अपेक्षा प्रत्येकाच्या मनी असतेच आणि अगदी तसाच कोणत्याही लाभेवीण प्रेम करणारा , मला कधीही एकटे न सोडणारा, माझ्या सुखाने आनंदीत होणारा, माझ्या दु:खाने माझ्यापेक्षा अधिक कळवळणारा, कोणत्याही परिस्थितीत मला सदैव साथ देणारा , माझा खराखुरा एकमेव आप्त म्हणजे माझा सदगुरु ! कारण "तो "फक्त माझा आणि माझा आणि माझाच असतो अनंत काळासाठी, अनंत जन्मांसाठी. म्हणूनच संत तुकोबा "त्या" चे वर्णन करताना सदगदीत होऊन म्हणतात - जेथे जातो तेथे तू माझा सांगाती , चालविशी हाती धरोनिया । बोलो जाता बरळ करीसी ते नीट मेली लाज धीट झालो देवा । 

गुरु माऊली तू साऊली जीवा़ची । तूच बंधू  पिता रे ।।

लहान बाळाचे लालन -पालन , प्रेमाने संगोपन त्याची आईच करते . लहान बाळाचे बोबडे बोल तीच प्रेमाने ऐकून घेते आणि त्याला नीट बोलायला शिकविते. तसे माझा गुरु माझी माऊली, माझी माय बनून मला प्रत्येक पावलावर सांभाळतोच , पण मी चुकीने जरी काही वेडेवाकडे बरळलो , चुकीचे काम केले, वागलो तरी माझ्या अनंत अपराधांना क्षमाच करून मला पोटाशी अत्यंत मायेने कवटाळतो, उरी मला घट्ट धरून ठेवतो. 
हेमाडपंत सदगुरु साईनाथांबद्दल हेच श्रीसाईसच्चरीतात आपल्याला दावतात -
नऊ महीने होताच आई आपल्या बाळाला जन्म देऊन आपली नाळ तोडते पण ही गुरुमाऊली मात्र आपल्या बालकास , आपल्या लेकरास सदैव आपल्या पोटातच म्हणजेच तिच्या गर्भगृहातच सांभाळून ठेवते आणि बाळाने कितीही हट्ट केला , वेडेपणा केला तरी देखिल आपली गर्भनाळ कधीही तुटून देतच नाही मुळी. म्हणूनच ती आणि फक्त तीच ग्वाही देऊ शकते "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " किंवा "मी तुला कधीच टाकणार नाही."  
आपला जन्मदाता , आपला पिता हा आपल्या देहाला जन्म देण्यास कारणीभूत असतो , परंतु  त्या नाशिवंत देहापाठी मरण हे लागलेलेच असते, जे कुणालाच चकवता वा टाळता येत नाही. 
परंतु सदगुरु हा एकमेव असा अद्वितीय पिता आहे की जो जन्म-मृत्युच्या फेर्‍यातून आपल्या लेकराला निर्दाळू शकतो, पैल तीरावर नेऊ शकतो सुखनैव ! 
हे सामर्थ्य "त्या " एकाचेच , कारण असे जगावेगळे कनवाळूपण "त्या"चे च असू शकते. 
संसाराच्या त्रिविध तापांनी तापलेल्या , दमलेल्या जीवाला सदगुरु माऊलीच सावली देते . आत्महत्येसारख्या अक्षम्य वातेवरून परत माघारी फिरविते मग ती कधी स्वामी समर्थ रूपाने वामनबुवा बडोदेकरांना बडोद्याच्या सुरसागरात जलसमाधी घेण्यासाठी भर रात्री धावून जाते, तर कधी विहीरीत जीव द्यायला तयार झालेल्या गोपाळ नारायणआंबडेकरांना वाचवायला सगुण खानावळवाल्याच्या रूपाने साईबाबा बनून धाव घेते. 
मग तो जीव मानवयोनीतच असायला पाहिजे असेही नाही , मागील जन्मातील ऋण-वैर-हत्या ह्या सूडाच्या दुष्टचक्रातून न सुटलेल्या आणि पुनश्च: शेळी बनून जन्मलेल्या क्लांत जीवाला दोन शेरभर डाळ चारण्यासाठी धाव घेणारी साईमाय बनते, तर कधी दुर्धर व्याधीनने पछाडलेल्या ,साखळदंडानी जोखडलेल्या , मृत्यूच्या अंतिम घटका मोजणार्‍या वाघाला संतदृष्टीपुढे मरण देऊन  मुक्ती देते. 

गुरु धेनू होय मीच तान्हुले गे । चकोर मी होता देवा तू चांदणे ।।
गुरु हाच चारा । गुरु हा निवारा ।
गुरु हा माझा श्वास रे ।।
कसायाच्या हातून आपल्या वासराला वाचविण्यासाठी जशी गाय त्या तान्हुल्यावर आपले स्वत:चे शरीर कवच बनवून पसरविते स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता, अगदी त्याही पेक्षा अधिक कनवळ्याने गुरू ही आपल्या लेकरांसाठी धाव घेते व प्राणांचे रक्षण करते. 
स्वामी समर्थ अक्कलकोटला निवास करत असताना त्यांचा एक भक्त लक्ष्मण कोळी हा समुद्रांत भीषण तुफान वारा, पाऊस ह्यांत फसला होता आणि स्वामींचा सतत धावा करीत असताना दयाघन स्वामी ओळंबले आणि लक्ष्मण कोळ्याला त्यांनी बुडत्या नांवेतून वाचविले आणि जीवनदान दिले अशी कथा स्वामींच्या बखरीत आढळते. 
हरीभाऊंना स्वामी समर्थांनी स्वमुखाने जेव्हा सांगितले "तू माझा सुत आहेस" व स्वत:च्या पादुका दिल्या तेव्हा स्वामीसुतांची भावना - चकोर मी होतां , देवा तू चांदणे अशीच झाली असावी. 
कारण साक्षात परब्रम्ह श्रीकृष्ण स्वमुखे ग्वाही देतात उध्दवाला की 
 "सदगुरु तोचि माझी मूर्ती " । कृष्ण बोले उध्दवाप्रती । 
ऐसा सदगुरु भजावा प्रीती । अनन्य  भक्ति या नाव ।। ५ ।। ( श्रीसाईसच्चरित , अध्याय २५ )     
शिरडीत अस्मानी पावसाचे संकट उभे ठाकले आणि सारा गाव आता वाहून जातो असी पूरसदृश्य परिस्थिती ओढावली तेव्हा सर्व गुरे-ढोरे, भणंग-भिकारी, शिरडीवासी ह्यांना साईनाथांच्या द्वारकामाईतच निवारा लाभला होता. सदगुरुचे चरण हाच अखिल जगतातील एकमेव शाश्वत निवारा आणि सदगुरुची कासवीची दृष्टी हीच पैलतीराहून राहूनही आपल्या बाळकाला चारा पुरविणारी , शांती ,तृप्ती, समाधान देणारी  करूणामयी दृष्टी - समस्त कृपेचा चारा !
गुरु हा माझा श्वास रे ।।
चोळाप्पाच्या मुलास कृष्णाप्पा महामारीचा उपद्रव होऊन अंत झाला आणि घरची सर्व मंडळी आक्रोश करू लागली असतां करूणार्णव , कृपासिंधु स्वामी समर्थांनी " अरे नीळकंठा , ऊठ, ऊठ ! आमच्याबरोबर दोन शब्द बोल.  " म्हणून हांक मारू लागतांच  , श्रींचे अमृततुल्य वचन ऐकतांच कृष्णाप्पा डोळे उघडून पाहू लागला व उठून बसला होता.
मुंबईच्या पितळे नावाच्या गृहस्थाच्या लहानग्या मुलास साईबाबांच्या दर्शनास शिरडीला नेले असतां तो कुमार साईंची दृष्टादृष्ट होतांच दोळे फिरवून अवचिता बेशुध्द होऊन पडला व त्याच्या तोंडातून भरपूर फेस जाऊन , सर्वांगास घाम फुटला आ णि त्याच्या जीविताची आंस सरली असतां, केवळ साईबाबांनी आश्वासन देतां - "मुलास घेऊनि जा बिर्‍हाडी । आणीक एक भरतां घडी  ।सजीव होईल तयाची कुडी । उगीच तांतडी करूं नका " ।। आणि मग त्या कुमार मुलास वाड्यांत नेतांच तो तात्काळ शुध्दीवर आला व माता-पित्यांचा घोर फिटला.
गुरु हा माझा श्वास रे ।। ह्याची जिवंत अनूभूती !         

गुरु नाम छाया । गुरु नाम माया ।
गुरु नाम घेता झाली शुध्द काया ।
गुरु हाच सूर । अमृताचा पूर ।।
गुरु हीच माझी नाव रे ।
थकल्या भागल्या पांथस्थांना, वाटकरूंना जसे रस्त्यावरील वृक्ष आपल्या शीतल छायेत निवारा देतात, त्यांच्या श्रमाचा परिहार करतात, तसेच सदगुरु आपल्या संसाररूपी भवसागरात गंटागळ्या खाणार्‍या जीवाला चैतन्य देतात, नव-संजीवनी देतात . 
बाळाप्पा हा स्वामींचे श्रीचरणी शरण जाण्याआधी व्यापार धंदा करीत असताना. तीन वर्षे आधी त्याच्या  व्यापारातील भरभराटीमुळे एका द्वेष्ट्याने त्याला कानवल्यातून विष खाऊ घातले होते. एकदा अचानक बाळप्पाच्या बेंबीतून रक्तस्त्राव होऊ लागला व तो फार आजारी झाला होता. तेव्हा स्वामी कृपेने एकदा फारच रक्त वाहू लागले आणि कांही वेळाने त्यातून एक कागदाची पुडी निघाली , ज्यात कांही काळा पदार्थ होता. त्यानंतर रक्तस्त्राव थांबून बाळाप्पास आराम झाला. " ही सारी स्वामी समर्थांच्या नावाचीच छाया होती असे आढळते. 
गुरुचें नाम मायेच्या पसार्‍यातून भक्ताला बाह्य जगतात तारून नेते. 
श्रीसदगुरु नाम पवित्र । हेंचि आमुचे वेद्शास्त्र । ’साईसमर्थ’ आमुचा मंत्र । यंत्रतंत्रही तें एक ।। ६२ ।। 
                                                                                                       - ( श्रीसाईसच्चरित , अध्याय १ )
गुरु नाम घेता , अनेक भागोजी शिंदे ( साईबाबांचा एक सेवेकरी भक्त ), ठाकूरदासबुवा (श्वेतकुष्ठ झाला असता स्वामी समर्थांछ्या कृपेने व्याधीमुक्त झाला)  सारख्या कुष्ठ्यांचे कोड दूर झाले ,महामारीसारख्या जीवघेण्या व्याधीतून मुक्तता लाभली , कोणाअंधाला नेत्रप्राप्ती झाली, तर कोणाचा पोटशूळ गेला. 
म्हणजेच सदगुरुचे नाम अत्यंत पुण्यप्रद, पावन असते जेणे भक्तांची काया शुध्द होते , हे १०८ % निर्विवाद सत्य !

जेव्हा माझ्या जीवनी मी सदगुरुंच्या चरणी शारण्यभाव ठेवतो आणि भक्ती करू लागतो तेव्हा माझ्या जीवनगाण्याला  सुमधुर सूर सदगुरुच प्रदान करतो आणि सुखाचा, आनंदाचा पूरच जणू माझ्या जीवन नदीला व्यापून टाकतो.   

म्हणूनच कोरड्या चरणें भव तरून जाण्यासाठी  मला सदगुरुलाच माझ्या जीवनाचा नाविक करायला हवे , आणि माझ्या जीवनाचे वल्हे त्याच्या हाती बिनधास्त सोपवायला हवे. 
आज माझ्या सदगुरु बापूंना एवढेच सांगावे वाटते - बापूवीण नाही कुणी रे, बापू नाम हाचि श्वास रे ... 
(हे सदगुरुराया  मी फक्त तुझाच आणि तू फक्त माझाच . 
I LOVE YOU MY DAD ALWAYS AND FOREVER ! ) 
अनिरुद्धा ,तुझा मी किती ऋणी झालो।।
अनिरुद्धा ,तुझा मी किती ऋणी झालो।।
सदैव तुझ्याच चरणी तुझा एक दास बनून , तुझ्या चरणी बापूज्ञ , अंबज्ञ बनव ! 



आजच्या पुण्यप्रद पावन दिवशी माझ्या जीवनाची नाव अलगद लीलया सांभाळणार्‍या माझ्या सदगुरु श्री अनिरूध्द बापूंच्या चरणीं कोटी कोटी लोटांगण आणि हेमाडपंताच्या शब्दांत एकच मागणे -
मी तो केवळ पायांचा दास  नका करू मजला उदास। जोवरी ह्या देही श्वास। निजकार्यासी साधूनि घ्या ।।

हरि ॐ. श्रीराम . अंबज्ञ.



  

4 comments:

  1. "सद्गुरू पहिले मी याची डोळा याची डोळा अनुभवले मी "

    ReplyDelete
  2. Sunitaveera beautiful depiction of Gurupournima!

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog