Saturday, 2 April 2016

घनकचरा व्यवस्थापन - काळाची नितांत गरज?

घनकचरा व्यवस्थापन - काळाची नितांत गरज? हा विषय वाचून चक्रावून गेला असाल नाही का? आपण नेहमी Business Management (व्यापाराचे व्य्वस्थापन ), Finance Management, (आर्थिक व्यवस्थापन), Disaster Management (आपत्ती व्यवस्थापन) ह्या बाबतीत बहुतांश प्रमाणात वाचतो आणि हे विषय आपल्या थोडया-फार प्रमाणात परिचयाचे असतात, परंतु आजकाल घन कचरा व्यवस्थापनाची चिंता मोठ-मोठ्या शहरांनाच नव्हे तर सर्व जगालाच भेडसावू लागली आहे. त्यामुळे ह्या घन कचर्‍याचे व्यवथापन करणे ही काळाची नितांत गरज होऊन बसली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 


नुकत्याच मुंबईच्या देवनार कचरा डेपोमध्ये एका पाठोपाठ एक लागलेल्या भीषण आगी आणि त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात उडालेला धुराचा उद्रेक, आरोग्याच्या दृष्टीने उद्भवलेला भयानक जीवघेणा परिणाम हे एक जिवंत उदाहरण ह्या घन कचरा व्यवस्थापनाची गरज दाखवून देण्यास पुरेसे आहे असे वाटते. 

देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे आरोग्यास घातक अशा मिथेन वायूच्या विळख्यात सापडल्यामुळे भोवतालच्या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले , श्वसनाच्या त्रासामुळे रूग्णालयात दाखल करावे लागले, वातावरणातही धुराचे साम्राज्यच पसरले असल्याने हवेच्या प्रदूषणाची समस्या अजूनच बिकट बनली, आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागल्याने पाण्याच्या तुटवड्यात आणखीनच भर पडली. ह्या वरून घन कचर्‍याचे व्यवस्थापन उचित प्रकारे न झाल्यास किती  भयंकर दुष्परिणामांना तोंड दयावे लागू शकते ह्याची जणू झलकच बघायला मिळाली. सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच उग्र स्वरूप धारण करीत असताना आग विझवण्यासाठी १४.४ लक्ष लिटर्स वापरावे लागलेले पाणी हे पाण्याचा अनाठायी वापरच दाखविते. म्हणतात ना ’दुष्काळात तेरावा महिना" तशीच परिस्थिती उभी ठाकते.   

आता जाणून घेऊ या घन कचरा म्हणजे नक्की काय?
      घनकचरा म्हणजे माणसाच्या रोजच्या वापरातून उरलेला निरुपयोगी पदार्थ. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून निर्माण होणारा घनकचरा व त्याची विल्हेवाट ही आपल्या देशापुढील एक मोठी समस्या आहे. पूर्वीच्या काळी घनकचरा विल्हेवाटीची फार मोठी समस्या भेडसावत नव्हती; कारण लोकसंख्या त्यामानाने फार कमी होती आणि घनकचरा टाकण्यासाठी जमीन मोठया प्रमाणात उपलब्ध होती. परंतु आता जरी लोकसंख्या भरमसाठ वाढली असल्यामुळे घनकचरा मोठया प्रमाणात तयार होत असला तरी जमीन पूर्वी होती तेवढीच आहे. त्यामुळे घनकचरा ही एक बिकट समस्या तोंड आ वासून उभी ठाकत असल्याचे चित्रच सर्वत्र दिसते. 

घनकचरा वाढण्या मागची संभाव्य कारणे - 
पूर्वीच्या काळी प्लास्टीकचा वापर हा खूपच कमी प्रमाणावर होत असे. भाजीपाला, धान्य, किराणा सामान, जीवनाश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी सामान्यत: लोक कापडी पिशव्यांचा वापर करीत असत. आजकालच्या जमान्यात कापडी पिशव्या जणू ह्द्दपार झाल्या आहे आणि त्याची जागा मनमोहक रंगीत स्वरूपात आकर्षक दिसणार्‍या वजनाने हलक्या असलेल्या प्लास्टीकने घेतली आहे. प्लास्टीक ही एक अशी गोष्ट आहे की जी एकदा फॅक्टरीत निर्माण झाली की कमीत कमी ३०० वर्षे ती टिकून राहू शकते. त्यामुळे सहसा नाश न पावणारे प्लास्टीक हे एक घनकचरा वाढविण्यास खूप मोठ्या प्रमाणावर हातभार लावत आहे. तसेच घनकचरा मोठया प्रमाणात निर्माण होण्याचे कारण म्हणजे वाढते शहरीकरण, औद्योगीकरण, प्लास्टिकच्या वस्तूंचा सढळ हस्ते होणारा वापर , उंचावलेले राहणीमान आणि त्यासाठी लागणा-या वेगवेगळया प्रकारच्या वस्तू, वाढलेल्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी शेतातील वाढलेले उत्पादन व त्यापासून निघणारा घनकचरा.  अशा प्रकारे साचत जाणार्‍या या सर्व घनकच-याचे व्यवस्थापन करणे दिवसेंदिवस फार अवघड होत चालले आहे. घनकचरा वाढल्यामुळे त्यापासून निर्माण होणारे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे हे वेगळे सांगायला नकोच. 

भारतात दरमाणशी दर दिवसाला 0.4 कि.ग्रॅ एवढा घनकचरा तयार होतो. एकट्या मुंबईत गेल्या ५० वर्षात सुमारे १२ दशलक्ष टन इतका घनकचरा साठला असून त्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावणे ही अत्यंत तातडीची बाब बनली आहे असे वाचनात आढळले. तसेच The Ministry of Environment, Forests and Climate Change ह्यांच्या माहितीच्या आधारे जवळपास १७ लाख टन ई-कचरा हा दरवर्षी साधारणत: (प्रतीवर्षी ५% वाढीच्या अंदाजाने) भारतात जमा होऊ शकतो असा अंदाज आहे. यावरुन घनकचरा प्रदूषणाची कल्पना आपण करु शकतो. 

गावामध्ये शेतातील, घरातील कचरा किंवा शहरांमध्ये कचरा उचलण्याची नगरपालिकेची सोय नसलेल्या भागांमध्ये घरातून निघालेला घनकचरा उघडयावर टाकला जातो, तो कुजतो व त्यापासून दुर्गंधी सुटते याबरोबर कीटकांची उत्पत्ती होऊन आरोग्यास हानी पोहोचते. फार पूर्वीपासून घनकचरा जाळूनच त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु त्यामुळे हवेचे प्रदूषण होते व पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात येते. माणसाचे राहणीमान जसे सुधारते तसे कचरा जास्त निर्माण होतो. कच-याचे प्रकारही वाढत जातात. हा अनेक प्रकारचा कचरा वेगवेगळया समस्या निर्माण करतो. आजार, प्रदूषण, सौंदर्यहानी आणि पर्यावरणाचे नुकसान असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच घनकचरा व्यवस्थापन करताना काही उद्दिष्टे ध्यानात ठेवणे जरूरीचे बनते. आरोग्य-संरक्षण, जीवनाची गुणवत्ता सुधारणे. पर्यावरण प्रदूषण टाळणे, परिसर स्वच्छता. भंगार-कच-यावर पुनर्प्रक्रिया होण्यासाठी चालना देणे. जैविक-कच-यातून ऊर्जा निर्माण करून इंधन वाचवणे. या सगळयातून शक्य असल्यास काही रोजगार निर्मिती करणे. समाजातील संपूर्ण स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या केरकच-यात विविध पदार्थ असतात; त्यात वर्गवारी करावी लागते. वर्गवारी केल्याशिवाय घनकचरा व्यवस्थापन चांगल होऊ शकणार नाही असे वाचनात लक्षात आले.  

घनकचरा व्यवस्थापन
सर्वप्रथम व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर म्हणजेच आपल्या स्वत:च्या राहत्या घरापासून याबद्दल जाणीव निर्माण करायला पाहिजे; कारण तिथूनच व्यवस्थापनाला खरी सुरुवात करायची आहे. हे झाले तरच सार्वजनिक पातळीवर म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्यांचे काम सुलभे रीत्या हाताळता येऊ शकते.
यापुढची पायरी म्हणजे गाव-नगर-शहर पातळीवर घन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन . कचरा वर्गीकरण करणे, वेगवेगळा केलेला कचरा जमा करून आणणे, त्याची विल्हेवाट लावणे इत्यादी सर्व घटकांचा विचार व्हायला पाहिजे. यात अनेक संस्था, गट सहभागी झाले तर हे काम यशस्वीरीत्या पार पाडता येऊ शकते. 
काही घनकचरा सार्वजनिक जागीही निर्माण होतो. दुकाने, गावोगावी भरणारे आठवडे बाजार, शाळा, मंदिरे,यात्रा,कॉलेज, हॉटेल, खाणावळी, लग्नसमारंभ इ. ठिकाणी पण पुष्कळ कचरा निर्माण होतो. या सर्व घटकांचा विचारही व्यवस्थापनात करणे जरूरीचे आहे.

न कुजणारा किंवा सुका कचरा साधारणत: जमीन किंवा रस्ता भरण्यासाठी वापरला जाऊ शकतो. तर कुजणा-या कच-याचा उपयोग करून आपण कंपोस्ट खत किंवा गांडुळखत तयार करु शकतो. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणारी अनिरूध्दाज अकादमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ही संस्था "गांडुळ खत प्रकल्प" ही योजना राबविण्याबाबत विनामूल्य मार्गदर्शन करून समाजातील घन कचरा व्यवस्थापनाच्या कार्याला मोलाचा हातभार लावताना आढळते. 
घरगुती स्वरूपाचे गांडूळ खत 
VJTI कॉलेज मधील प्रकल्प 
घनकच-याचे परिणामकारक व्यवस्थापन प्रामुख्याने तीन तत्त्वांवर अवलंबून असते असे वाचनांती आढळले - 
१. वापर कमी करणे (Reduce Method)
२. पुनर्वापर (Reuse Method )
३. चक्रीकरण (Recycle Process) पुनर्प्रक्रिया
वापर कमी करणे सध्याचा काळ वापरा व फेका ( Use and throw) अशा स्वरुपांच्या वस्तूंचा आहे. एकदाच वापरण्याच्या वस्तूंमुळे प्रचंड प्रमाणावर टाकाऊ पदार्थ तयार होतात. फेकण्याजोगे साहित्य वापरण्यापेक्षा कायमस्वरुपी वापरण्यात येणा-या वस्तूंचा वापर केल्यास टाकाऊ वस्तूंची निर्मिती कमी होईल. उदा. पाणी पिण्यासाठी धातूची भांडी ( स्टीलचा ग्लास ), चहासाठी प्लास्टिक कप वापरण्यापेक्षा चिनी मातीचे किंवा काचेचे कप वापरावेत.
पुनर्वापर करावा म्हणजे  त्याच स्वरुपातील टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरणे. टाकाऊ पदार्थ अनेक प्रकारांनी वापरता येतात. जुने प्लॅस्टिकचे व धातूचे डबे, बाटल्या,बरण्या पुन्हा वापरल्यामुळे अविघटनशील कच-याचे प्रमाण कमी होईल.
पुनर्प्रक्रिया उदा. लोखंड भंगारापासून परत लोखंडी वस्तू तयार करणे.

मुंबईमध्ये घनकचराव्यवस्थापनावर तोडगा काढण्यासाठी " टाटा कन्सलटंसी" ह्या नामांकीत कंपनीला अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची बातमी वाचनात आली. त्याच प्रकारे आधुनिक तंत्राच्या आधारे घनकचरा व्यवथापनच्या कार्याला आयआयटी, बीएआरसी, डीआरडीओ  ह्या मान्यवर संस्थाही आपले अमूल्य योगदान देऊन हातभार लावू शकतात असे वाटते. 

घनकचरा व्यवस्थापन हे संभाव्य  मानवनिर्मित आपतीच्या  व्यवस्थापनाचे एक पाउलं आहे जणू !  
नागरीकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने तसेच पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी म्हणून घनकचरा व्यवस्थापन उचित दिशेने , उचित वेळीच करणे हीच काळाची नितांत गरज आहे,ह्या भूमिकेशी प्रत्येकजण नक्कीच सहमत असेल.      

संदर्भ :
१.http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Government-has-taken-Deonar-fire-very-seriously-Prakash-Javadekar/articleshow/51659970.cms
२.http://www.aniruddhafriend-samirsinh.com/solid-waste-management-crisis-major-challenge-mega-cities/
३.http://indianexpress.com/article/cities/mumbai/deonar-dumping-ground-fire-for-them-rummaging-through-smouldering-yard-not-an-option-but-source-of-livelihood/
४.http://www.hindustantimes.com/mumbai/deonar-fire-under-control-but-toxic-smoke-refuses-to-wane/story-AvpTfIOKxu3i0EeMrmkj3I.html
५. http://www.aniruddhasadm.com/



12 comments:

  1. घन कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी गांडूळ खत प्रकल्प हा अत्यंत उत्कृष्ट ठरू शकतो.
    सुनीताजी तुम्ही अगदी योग्य माहिती उत्कृष्ट पद्धतीने दिली आहे.

    ReplyDelete
  2. Good information. 0.4 kg per per day per person is a menace.

    ReplyDelete
  3. Yes indeed best article...as mentioned by KK it's best way to convert.
    ॥ हरिॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥
    । जय जगदंब, जय दूर्गे ।

    ReplyDelete
  4. सुनीता करंडे आपला लेख खुप सुंदर व माहितीपूर्ण आहेच परंतु आपण ज्या संस्थेबद्दल लिहिले आहे त्या अनिरूद्धाज अकैडमी ऑफ डिसास्टर मैनजमेंट ह्यांच्या देखरेखेख़ाली असा प्रोजेक्ट सध्या अंधेरी येथील होटल तुंगा इंटरनॅशनल व त्यांच्याच दोंन इतर होटेल मध्ये चालू असलेला मी पाहिला आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Nitin Gurav. Thanks for Information regarding Vermiculture Project carried out at Hotel Tunga International as well as its others hotels.

      Delete
  5. सुनिताजी अतिशय मार्मिक विषयाला हात घातल्याबद्दल तुमचे अभिनंदन.
    आपल्याला ,देशाचे हितशत्रू सहज समोर दिसतात पण ह्या 'घनकचर्याच्या विल्हेवाटीच्या वाढत्या चिंतेचा छुपा शत्रू' देखील आपल्या देशाचे आरोग्य पोखारण्याच्या दिशेने जलद पावले टाकत येत आहे ह्या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही .
    काही वसाहतीत ' ओला कचरा ' व 'सुका कचरा' वेगवेगळा गोळा केला जाण्याची व्यवस्था केलेली दिसून येते, त्याचे प्रयोजन त्या वसाहतीत राहणार्या रहिवाशांना तरी माहित असते का ? हेही एक कोडेच आहे. बर ,पुढे जाऊन असे निदर्शनास येते कि,वेगवेगळा गोळा केलेला हा कचरा , एकाच कचराकुंडीत जमा केला जातो मग तो वेगळा का केला गेला ? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.
    'गांडूळशेती ' सारखा प्रकल्प घराघरात ,इमारतींच्या आवारात, ,हॉटेल्स व तत्सम कंपन्याच्या आवारात राबवण्याचे कार्य आपण नमूद केलेल्या 'ANIRUDDHA's ACADAMY OF DISASTER MANAGEMENT'तर्फे '
    राबवले जात आहे .
    'घन कचर्याच्या विल्हेवाटीच्या समस्येच्या दिशेने उचललेले हे पाउल निश्चितच अभिमानास्पद आणि या समस्येवर उत्तम तोडगा आहे.
    राजश्री चुरी.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Rajashree Churi for sharing your thought. I noticed same thing in my Society premises. They separated waste into two separate bins for dry and wet. But finally failed to decompose both separately. Finally BMC banned this project due to possible threat of mosquitoes-breeding.
      In such cases I observed Vermiculture Projects carried out by a NGO Aniruddha's Academy of Disaster Management are successfully working.

      Delete
  6. Thanks for this article as it is going to help sensitizing urban population. The present challenges in the field Solid Waste Management (SWM) in urban areas are attributable to speedy urbanisation and growing population . It is a good sign that some eminent institutions have come forward to work out solution. Timely action by all stake holders and initiative by citizens for proper SWM would certainly reduce the potential risk on health and environment . Thanks once again.

    ReplyDelete
  7. Thanks Rajeev Kadam. I second your opinion.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog