नुकतीच माघी गणेश चतुर्थी साजरी झाली ,त्या निमीत्ताने आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या काही कथांची आठवण झाली. श्री गणेशाचा जन्म मंगळवारी माघी शुध्द चतुर्थीला झाला त्यामुळे हा दिवस " श्री गणेश जयंती" म्हणून साजरा केला जातो. श्रीगणेशाला श्रीगजानन, गणपती अशीही दुसरी नावे आहेत. श्रीगणेश म्हणजे साक्षात परब्रम्ह !
भगवान श्रीशंकराचे २ पुत्र कार्तिकेय व गणेश ह्यांच्यात सर्वश्रेष्ठ कोण असे ठरवायचे होते म्हणून एक स्पर्धा घेण्याचे ठरले. जो पृथ्वीला सर्वप्रथम प्रदक्षिणा घालून येईल तो सर्वश्रेष्ठ असे ठरले. आता थोरले बंधू कार्तिकेय खुषीत असतात की आपला हा लहान भाऊ तुंदील तनु , लंबोदर कधी आपले विशाल काय पॊट सांभाळत अख्खी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणार, म्हणजेच आपणच भरधाव वेगाने जाऊन पहिले येऊ व स्पर्धा जिंकू. आणि मग काय कार्तिकेय पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले. आपले गणपती बाप्पा खरोखरी चतुर आणि साक्षात बुध्दीदाता असल्याने विचार करतात क्षणभर की कार्तिकेयाला आपण धावताना काही हरवू शकत नाही. मग "शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ " ह्या नीतीचा वापर करायचे ठरवितात. ते पार्वती मातेकडे जातात आणि आणि पार्वतीमातेलाच ३ प्रदक्षिणा घालतात. भगवान शंकराकडे जाऊन गणपती आपण पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केल्याचे सांगतात. त्यानंतर बर्याचे वेळाने कार्तिकेय तेथे येऊन पोहचला. कार्तिकेय बिचारा संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालून धापा टाकीत येतो आणि बघतो तर काय नवल हे गणपती महाराज आधीच हजर तेथे. आता अवाक होण्याची पाळी असते.
भगवान शंकर मग गणपतीला एवढ्या लवकर प्रदक्षिणा पूर्ण कशी केली असे विचारतात. तेव्हा गणपती अर्थात श्रीगणेश आपल्या बुध्दीचातुर्याने उत्तर देतात की पृथ्वी ही माता आहे. आणि म्हणूनच मी माझ्या पार्वतीमातेलाच तीन प्रदक्षिणा घातल्याने माझी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. अर्थातच भगवान शिवशंकर श्रीगणेशाच्या बुध्दीचातुर्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी श्रीगणेश विजयी झाल्यामुळे ते सर्वश्रेष्ठ देव असल्याचे जाहीर करून त्यांना अग्रपूजेचा मानही दिला.
या कथेवरून विचारांची धाराच जणू प्रवाहीत झाली -
पृथ्वी ही सूर्य मालिकेतील तिसरा ग्रह म्हणजे आपली लाडकी वसुंधरा ! पृथ्वी ही स्वत:भोवती सतत फिरते आणि स्वत:भोवती फिरता फिरताच ती सूर्याभोवती सुध्दा प्रदक्षिणा घालते असे आपण शाळेत असताना भूगोल शिकताना अभ्यासले होते. पृथ्वी 23 तास 56 मिनिटे व 4.09 सेकंदात एक परिवलन पूर्ण करते यालाच तिची दैनिक गती (एक दिवस) एक आवर्तन म्हणतात. स्वत:भोवती फिरता फिरताच ती 365.25 दिवसात म्हणजेच 365 दिवस 5 तास 48 मिनिट व 46.09 सेकंदात सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. म्हणजेच ढोबळमानाने पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो. आपल्या लाडक्या गणपतीबाप्पानेही आपण ह्या आपल्या पृथ्वीचे म्हणजेच भूमातेचे अनुकरण कसे करायचे हे स्वत:च्या आचरणातून प्रदक्षिणा घालून पट्वून दिले आहे.
प्रदक्षिणा ह्याचा खरा अर्थ ’ईक्ष्यण’ (’ईक्ष ’धातू) म्हणजे संपूर्णपणे पहाणे आणि "पश्य" म्हणजे ’नीट पहाणे’.
प्रदक्षिणा - सतत सर्व दिशांनी संपूर्णपणे पहाणे.
अगदी लहानपणापासून आपण पहातो "गोल गोल राणी " म्हणत स्वत:भोवती रिंगण घालून खेळणारी लहान लहान मुले किंवा "रिंगा रिंगा रोजेस "म्हणत खेळणारी मुले... जणू काही हेच सत्य आपल्याला शिकवीत असावे.
Wikipedia मधील मुक्त ज्ञानकोषात एकदा सहज वाचताना आढळले की २ मार्च १९४९ हा दिवस इतिहासात नोंदविला आहे की जेम्स गॅलाघरने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.
आता बघू या -
प्रदक्षिणा आणि अध्यात्मिक महत्त्व -
प्रदक्षिणा घालणे हा भक्तांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय़ आणि अनुभवही असतो. प्रदक्षिणा करताना सर्वात महत्त्वाचे असते ते दक्ष राहणे, सावध राहणे. प्रदक्षिणा घालताना मी माझ्या डोळ्यांनी फक्त माझ्या देवास पाहीन, मुखाने त्याचे नाम घेईन, मंत्र वा गजर म्हणेन. म्हणजेच कमीत कमी प्रदक्षिणा घालताना तरी मी सर्वतोपरीने देवाला, माझ्या आराध्यस्थानाला माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू करत असतो. जसे प्रत्येक वर्तुळाला एकच केंद्रबिंदू असतो व म्हणूनच वर्तुळास पूर्णत्त्व येते, त्याच प्रमाणे माझ्या जीवनाचा केंद्रबिंदू भगवंत हाच एक्मेव केंद्रबिंदू झाल्याशिवाय माझे जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही.
प्रदक्षिणेच्या प्रकारांनुसार साक्षी प्रदक्षिणेत भक्त एखाद्या पवित्र मंदिराला किंवा प्रार्थनास्थळाला प्रदक्षिणा घालतो , तर ऋत प्रदक्षिणेत उपास्य देवतेच्या मूर्तीभोवती प्रदक्षिणा घालतो तर सत्य प्रदक्षिणा करताना भगवंताच्या प्रतिमेसन्निध लोटांगण घालतो व नंतर स्वत: भोवतीच प्रदक्षिणा घालतो.
"प्रदक्षिणा" हा भगवंताला जीवनाचा केंद्रबिंदू बनविण्याच्या ध्येयाचाचा मूळ गाभा असावा. म्हणूनच आज ह्जारो वर्षे भक्तमानसात एक पवित्र श्लोक आपणास आढळतो -
यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च |
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणापदे पदे ||
(अर्थ- जन्मजन्मांतरी केलेली पापे मन:पूर्वक केलेल्या ह्या प्रदक्षिणा नामक स्वाध्यायामुळे नष्ट होतात.)
वाल्याकोळ्यानेही आयुष्यभर आपले आई-वडील, बायको-मुले ह्यांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी म्हणून वाट्पाड्याचा , रस्त्याने जाणार्या वाटसरूंना लुबाडण्याचा धंदा चालू केला, आणि मग असंख्य खून , बलात्कार ह्या सारख्या पापांचा धनी झाला. ज्या क्षणी सदगुरु नारदमुनींचा वाल्याच्या जीवनास परीस स्पर्श झाला आणि भगवंताचे नाम मुखी आले त्याक्षणापासून जणू अवघ्या जीवनाचा कायापालटच झाला ....
"राम" नाम नीट जीभ उच्चारू ही शकत नव्हती आणि फक्त प्रेमाने "मरा- मरा" असे रामाचे उलटे घेतलेले नामही "त्या" अत्यंत करुणामयी भगवंताने गोड मानून घेतले एवढेच नव्हे तर स्वत:चा अवतार होण्याआधीच स्वत:च्या जीवन-कार्याचे "रामाय़ण" नामक महाकाव्य ही निर्माण करवून घेतले. कारण वाल्या कोळ्याने भगवंताला "राम " नामाला आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू करून स्वत:च्या जीवाची पर्वा न करीता उन्हा-पावसात- थंडीतही अंगावर मुंग्याचे वारुळ झाले तरी भगवंताचीच अहोरात्र प्रदक्षिणाच जणू घातली होती आणि जीवनभर केलेल्या पापांचा नाश सदगुरुकृपेने करवून घेतला होता.
श्रीसाईसच्चरितात साक्षात भगवंत कृष्णानेही सदगुरुंचा महिमा कसा गाईला होता ह्याचा संदर्भ आढळ्तो-
भगवंताचीं पूजास्थानें | अष्टप्रकार असती जाणें |
प्रतिमा स्थंडिलादि आनानें | सर्वां तुळणें गुरु श्रेष्ठ || १६६ ||
कृष्ण स्वयें ब्रम्ह पूर्ण | तोही धरी सांदिपनीचरण |
म्हणें करिता सदगुरुस्मरण | मी नारायण संतुष्टें || १६७ ||
मजहूनि मज सदगुरुस्तवन | आवडें की सहस्त्रगुण |
ऐंसे सदगुरुचें वरिष्ठपण | महिमान गहन तयाचें || १६८ ||
( अध्याय ३ )
म्हणजेच थोडक्यात काय तर आपण भगवंताला प्रिय असणार्या सदगुरुंना ही आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी स्थापून जीवन प्रदक्षिणा खर्या अर्थाने सफल करू शकतो. उगाच नाही बरे आपण आरती सुध्दा गात -
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सदगुरुरायाची |
झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची |
प्रदक्षिणा करूनि देह भावे वाहिला |
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ||
भले आम्हांला ह्यातले काही कळले नाही की साक्षी प्रदक्षिणा आहे का ऋत का सत्य तरी कोठे बिघडले, आम्हाला विमान प्रदक्षिणा घालणे सुध्दा खिशाला परवडणारे नाही तरी देखिल आम्ही जर अत्यंत प्रेमाने , भोळ्या भावाने सदगुरुंभोवती जरी कोणतीही प्रदक्षिणा घातली तरी "तो "अत्यंत प्रेमळा, करूणानिधान भगवंत माझ्या भावाला स्विकारणार आहे हे १०८% खरे....
चला तर मग आता बिगी बिगी "त्या " भगवंताला , परमेश्वराला आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी स्थापण्याचा संकल्प करू या आणि खरी प्रदक्षिणा घालून धन्य होऊ या...
- सुनीतावीरा करंडे
अतिशय सुंदर आणि विचारपूर्वक पोस्ट सुनितवीरा.
ReplyDeleteअंबज्ञ
Your hardwork is really inspiration to us Sunitaveera .
ReplyDeleteThis is an outstanding article .
Ambadnya
Extra Ordinary Post Sunitaveera !!!
ReplyDeletewhat a writing skill and information you have !!!
such a perfectly execute with the perfect examples!!!
Ambadnya
Ambadnya, Suneetaveera.very rhythmic &interesting flow of thoughts. very nicely explained.
ReplyDeleteShreeram Ambadnya Anil, Dr. Nishikant, Supriya and Dr. Smriti ....
ReplyDeleteJust like the definition of Pradakshina this post takes a complete and comprehensive look at the term. A very educative post and also reminds me that we should not do Pradakshina hurriedly as we usually do. Now I understand the reason behind it- to enable us to look at God with total attention and savor His darshan slowly.
ReplyDeleteSandeep Mahajan