Showing posts with label आपत्ती व्यवस्थापन. Show all posts
Showing posts with label आपत्ती व्यवस्थापन. Show all posts

Sunday, 24 December 2017

दगडफेक करणारे हात आता फूटबॉलचा गोल रोखत आहे....

आज सद्य परिस्थितीत आपल्या जवानांनी, सुरक्षा दलांनी राबविलेल्या धडक मोहीमा, त्यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांनी जम्मू-काश्मीरमध्ये दोनशेहून अधिक दहशतवाद्यांना संपविण्यात यश आले आहे. परंतु गेली कित्येक महिने आपल्या भारतीय जवानांवर होत असलेली दगडफेक आणि तेथील  स्थानिकांचा अतिरेकी, दहशतवाद्यांना मिळणारा पाठींबा ह्यामुळे सीमेवरून घुसखोरीचे प्रमाण वाढण्यास हातभारच लागत होता. ह्या दगडफेकीच्या बातम्या वाचतानाच मागच्या वर्षी नॅशनल मिडीयावर एक संतप्त काश्मीरी तरूणीचे जम्मू अणि काश्मीर पोलीसांवर दगडफेक करतानाचे चित्र सर्वत्र प्रसिध्द झालेले पाहण्यात आले होते. त्यामुळे  अल्पावधीत्च अफशान आशिक हे नाव सर्वांना परिचितही झाले होते.  परंतु आज त्याच अफशान आशिकचे नाव ट्विटर सारख्या मिडीयावर जम्मू -काश्मीरच्या स्त्री फुटबॉल  संघाची  कप्तान , गोलकिपर म्हणून झळकत आहे. ती मुंबई संघातर्फे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनीधीत्व करत आहे २२ जणांच्या फुटबॉल टीमचे !
खरोखरीच ही खूप सुखावह ,आनंददायक बाब आहे ! 
                                                                   
अफशान सांगते मागच्या वर्षीच्या तिच्या दगडफेक करणार्‍या जम्मु-काश्मीरच्यासंतप्त युवतीच्या फोटोमुळेच तिच्या आयुष्याला एक नवीनच कलाटणी मिळाली. मुळातच त्याच फोटोची सत्यता पडताळून पाहताना अफशान ही एक मूळ फुटबॉल प्रेमी असल्याचे उघडकीस आले. तिच्या मते त्या फोटोनेच तिच्या वैयक्तिक जीवनातील तिच्या स्वत:च्या खेळातील करिअरला सुध्दा एक नवीच सुसंधी उपलब्ध झाली आणि त्याच मुळे जम्मु-काश्मीर मधील कित्येक मुलींना ती फुटबॉल ह्या पुरुषप्रधान खेळाची ओळख करून देऊ शकली.  आपल्या रागाला व्यक्त करण्यासाठी दगडफेक करतानाचा तिचा फोटो प्रसिध्द झाल्यामुळे ती एक खेळासाठी हपापलेली, उत्सुक क्रीडाप्रेमी असल्याचे तिचे मूळ स्वरूप जगासमोर आले. त्यानंतर जम्मु-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती ह्यांनी अफशानला जम्मु-काश्मीर तर्फे फुटबॉल खेळण्यासाठी आणि जम्मु-काश्मीरमध्ये महिलांचा फुटबॉल खेळातील समावेश वाढवैण्यासाठी प्रेरीत केले, प्रोत्साहनही दिले आणि खूप मोठे पाठबळ पुरविले. मेहबूबा मुफ्तींनी स्पोर्टस  सेक्रेटरींना अफशान व तिच्या सहखेळाडू महिला फुटबॉल टीमला सर्वतोप्रकारे सहाय्य पुरविण्याचे आदेश दिले आणि राज्य प्रशासनाने सुध्दा जराही दिरंगाई न करता वा आदेशाकडे काणाडोळा न करता महिला फुटबॉलपटूंना खेळाचे सर्व साहित्य देखिल पुरविले आणि त्यामुळेच अवघ्या एका वर्षात एक संपूर्ण टीम बनविता आली.  

नुकतीच मंगळवारी अफशान व तिच्या नेतृत्त्वाखाली खेळणारी २२ जणांची फुटबॉल टीम , त्यांचे कोच सतपाल सिंग काला आणि मॅनेजर त्सेरींग अंगमो ह्यांनी युनियन होम मिनीस्टर राजनाथ सिंग ह्यांची भेट घेतली. स्पोर्टस ऑथोरिटी ऑफ इंडिया (Sports Authority of India (SAI) ह्या इंस्टिट्युटची काश्मीरमध्ये सुरुवात व्हावी आणि त्या योगे काश्मीरमधील तरूण मुलींना फुटबॉल खेळाचे प्रशिक्षण मिळावे ह्याबाबत संमती मिळविण्यासाठी ही भेट घेतली गेली होती.  अफशानने  एका वृत्तपत्राला (TOI) बातमी देताना अशी प्रतिक्रिया दिली की युनियन होम मिनीस्टरांनी आमच्या फुटबॉल खेळासंबंधीच्या समस्या शांतपणे जाणून घेतल्या , ज्याने मी अत्यंत प्रभावित झाले. आम्हांला जम्मु-काश्मीरमध्ये आता खेळासाठी पायाभूत सुविधा अजून उत्तमरीत्या पुरविल्या जातील असा विश्वासही तिने व्यक्त केला. होम मिनीस्टरांनी अफशान आणि तिच्या सहकारी खेळांडू समोरच जम्मु-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा करून त्यांना ते श्रीनगरला पोहचल्यावर त्यांना भेट देण्याविषयी सुचविले असे तिने सांगून आपले समाधान व्यक्त केले.

२३ वर्षांची अफशान आशिक ही श्रीनगर मधील कॉलेजमधून बीएचे शिक्षणही घेत आहे. थोड्याच कालावधीत बॉलीवुड मध्ये तिच्या  जीवनातील खेळातील प्रवासाबाबत एक फिल्मही बनविली जाणार आहे असे वाचनात आले. 

                                                                         


                                                                   
पोलिसाच्या चुकीच्या वागणे नसते तर आपण दगड उचलला नसता असे सांगून मागील वर्षी झालेल्या दगडफेकीच्या बद्दल आपल्या मनात पश्चात्ताप नसल्याचे अफशानने मत व्यक्त केले . परंतु आज मला प्रतिष्ठा मिळाली आहे आणि मला सन्मान मिळाला आहे , तो मला जपायचा आहे. मला माझ्या फुटबॉलवर माझे लक्ष केंद्रीत करायचे आहे आणि मला माझ्या राज्याला आणि माझ्या देशाला अभिमानास्पद कामगिरी करायची आहे असे अफशानने उद्गार काढले.     

आपत्ती व्यवस्थापनामध्ये जातीय दंगली , वैमनस्यातून उद्भवलेले दंगे ह्यांना मानवी आपती ( Man made disasters) असे संबोधिले जाते, ह्या आपत्तींना तोंड देण्यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून बचावात्मक उपाय योजले जाऊन त्याची तीव्रता, होणारे भयावह परिणाम कमी करता येऊ शकतात असे वाचनात आले होते. त्यामुळे जम्मु-काश्मीर मधील जातीय दंगली , दहशतवाद्यांची, अतिरेक्यांची घुसखोरी ह्यांवर तेथील स्थानिकांच्या समस्या जाणून त्यावर उपाय योजणे हे अत्यंत आवश्यक पाऊल होते. तरूण पिढी शिक्षणापासून वंचित राहिल्याने त्यांचे जीवन अनुचित दिशेने भरकटत चालले होते व युवा शक्तिचा गैरवापर करून जातीय दंगली घडविल्या जात होत्या. जम्मु-काश्मीर मध्ये युवा -वर्गाला त्यांची कर्तबगारी दाखविण्यास योग्य पध्द्तीने वाव दिल्याने, तेथील शांतता, तेथील समजाचा विकास हे शक्य होऊ शकते असे चित्र दिसू लागले आहे. 

खरोखरीच सरकारने उचलेली ही खूप स्तुत्य बाब आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. 

खेळाडूंना प्रोत्साहन देऊन , त्यांना पाठींबा दिल्यास ऑलिम्पिकमधील वा अन्य आंतरराष्ट्रीय खेळांमधील भारताची कामगिरी अधिक उज्ज्वल होऊ शकते हे निर्विवादास्पद सत्य कोणीच नाकारू शकत नाहीत.  


    
सूचना -  हा लेख प्रथम दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक १० डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रथम प्रसिध्द्व झाला होता.

Thursday, 12 October 2017

एलफिन्स्टन येथील चेंगराचेंगरीनंतरचा स्वंयशिस्तीचा धडा !

पश्चिम रेल्वेच्या एलफिन्स्टन रोड स्टेशन आणि परळ स्टेशनला जोडणार्‍या फुटओव्हर ब्रिज म्हणजेच पुलावर गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत दुर्दैवाने २३ रेल्वे प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर दुर्घटना घडल्याबद्दल कुणी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरले तर कुणी अपुरी यंत्रणा कारणीभूत आहे तर कुणी ढिसाळ नियोजन जबाबदार आहे तर कुणी पायाभूत सुविधा न देणार्‍या सरकारला दोष दिला. दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ५ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात तर ’फूल गिर गया ’ च्या ऐवजी ’पूल ’ ऐकल्याने गोंधळ उडाल्याने ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सध्या तरी दुर्घटना नेमक्या कोणत्या कारणामुळे घडलीहे निश्चित करणे तूर्तास तरी कठीण असल्याचे आढळत आहे.

ह्या दोषारोपांच्या ,प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच एक आश्चर्याची बाब सामोरी आली ज्यातून मुंबईच्या सुजाण नागरिकांनी आपला रेल्वे प्रवास सुरक्षित होण्याकरिता उचलेल्या एका अत्यंत सुंदर, स्तुत्य अशा पावलाची सुरुवात केली आहे आणि ते पाऊल म्हणजे स्वंयशिस्तीचे पालन , आचरण! परळ रेल्वे स्टेशनवर रविवारी सकाळी नऊ वाजता प्रवासी रांगेत उभे राहून शिस्तीने पुलावर चढताना काही कॅमेर्‍यांनी टिपले होते.



कोणत्याही समस्येला उत्तर शोधताना , ती समस्या उद्भवली का , कोणामुळे ह्या सारख्या प्रश्नांचा सारासार विचार करणे हे जेवढे गरजेचे असते त्याही पेक्षा भविष्यात पुन्हा नव्याने अशा समस्या येऊच नये म्हनून खबरदारी घेणे , त्यानुसार उपाय योजना आखणे व त्यांचा प्रत्यक्षात अवलंब करणे हे ही तितकेच किंवा त्याहून कैक पटीने अधिक महत्त्वाचे असते. आपण मराठीत एक म्हण म्हणतो की "पुढच्यास ठेच मागचा शहाणा ’ पण व्यवहारात बहुधा आपल्याला स्वत:ला ठेच लगल्याशिवाय आपण शहाणपणा शिकत नाही वा दुसर्‍याच्या अनुभवावरून सहजगत्या खबरदारी घेण्याची , काळजी घेण्याची जागरूकता सहजासहजी बाळगत नाही.

पण ह्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर नागरिकांनी रांगेतून शिस्तीने पुलावर चढण्याची जी स्वंय शिस्त अंगी बाणविण्याचे पहिले पाऊल उचलले हे खरोखरीच कौतुकास्पद आहेच आणि अत्यंत आवश्यकही आहे. आपली सुरक्षा आपणच घेण्याचा हा छोटासाही प्रयत्न गर्दीच्या नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका नक्कीच बजावेल.     

गर्दीचे व्यवस्थापन व नियंत्रण हा एक खूप सखोल अभ्यासाचा विषय आहे. क्राऊड मॅनेजमेंट म्हणजेच गर्दीचे व्यवथापन ! अनियंत्रित जमावाचे गर्दीत रूपांतरण व्हायला फारसा वेळ लागत नाही अशावेळी कोणत्याही कारणास्तव वाहत्या गर्दीला विरोध करणारा कोणताही अडथळा अचानक पणे समोर आला तर चेंगराचेंगरी सारखी गंभीर, धोकादायक परिस्थिती कधीही उद्भवू शकते.  गर्दी होणार्‍या जागी स्वयंशिस्तीचे पालन करून रांगेचा वापर केल्यास गर्दी होण्याची शक्यता कमी होते.

म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन करतानाही गर्दीचे व्यवस्थापन हा महत्त्वाचा पैलू ध्यानात ठेवावाच लागतो.  

आपण व्यवहारात अनुभवतो की  " दूधाने जर जीभ पोळली तर माणूस ताक सुध्दा फुंकर मारूनच पितो’ त्याप्रमाणेच नुकत्याच घडलेल्या चेंगराचेंगरीने रोज रेल्वेने प्रवास करणार्‍या मागरिकांची मनात भीतीने धडकी भरली आहे, जीभ पोळली आहेच त्यामुळे पुढची पाऊले उचलताना शक्यतोवर गर्दी होणाची कारणे टाळणे हाच सोपा उपाय आहे.   

गर्दीमध्ये धक्काबुक्की, चेंगराचेंगरी होऊ शकते आणि एलफिस्टन रोड येथील चेंगराचेंगरी अनियंत्रित गर्दीने , धक्काबुक्कीने झाली हे जाणून खबरदारी म्हणून अरूंद जागेत गर्दी करून घुसून , धक्काबुक्की करत राहण्यापेक्षा रांगेचे पालन केल्य्यास, नक्कीच गर्दीच्या नियंत्रणाला मोठा हातभार लागेलच, शेवटी स्वंयशिस्त     हा मर्यादा पालनाचा भाग आहे आणि मर्यादा पाळली की अपघात होतच नाहीत किंवा त्यांची व्याप्ती , प्रभाव कमी होतो. चला तर रांग लावून स्वंयशिस्तीचा कित्ता गिरवू याव गर्दी व्यवस्थापनाला सहकार्य करू या !

सूचना -  हा लेख प्रथम दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ९ ऑक्टोबर २०१७ च्या अंकात प्रथम प्रसिध्द्व झाला होता.

Thursday, 27 July 2017

इमारतींच्या दुर्घटना आणि त्यामागील संभाव्य कारणे

२५ जुलै २०१७ रोजी घाटकोपर येथील दामोदर पार्क भागातील  साईदर्शन ही चार मजली इमारत सकाळी १०.३० च्या सुमारास कोसळली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत मृतांची संख्या आतापर्यंत १७ वर पोहचली असल्याचे वृत्त वाचून दु:ख झाले.  अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरुच आहे . 
                                                                      

आता पर्यंत ठाणे, भिवंडी, मुंब्रा, माहिम आणि इतर ठिकाणी इमारती पडून झालेल्या दुर्घटनांमागे  इमारतींच्या बांधकामाचा दर्जा , बांधकामाची अयोग्य पध्दत , बांधकामात वापरलेले निष्कृष्ट दर्जाचं साहित्य , इमारतींच्या डागदुजीकडे झालेले दुर्लक्ष  , जुन्या इमारतीं मध्ये नूतनीकरणासाठी विना परवानगी केलेले  बदल अशा अनेक बाबी असल्याचे निदर्शनास आले आहे. 

२७ जुलैच्या दैनिक प्रत्यक्षच्या घाटकोपर येथील साईदर्शन इमारतीच्या दुर्घटनेच्या बातमीतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की दुर्घटना  वा अपघात झाल्याशिवाय त्यामागच्या कारणांचा आपण पाठपुरावा करीत नाही. तसे पाहता आपण राहतो ती घरे, इमारती अथवा सोसायटी ह्यांची सुरक्षा हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा विषय असायला पाहिजे. आपण सारेच जण अगदी शाळेत असल्यापासून "Prevention is better than cure " ह्या उक्ती शी परिचित असतो. परंतु व्यवहारात वा दैनंदिन जीवनात आपण खरेच ह्याचा जेवढा पाहिजे तेवढा विचार करतो का हा महत्त्वाचा प्रश्न पडतो. प्रत्यक्षच्या बातमीतून ध्यानी आले की पालिकेच्या नियमांनुसार ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करणे बंधनकारक आहे. घाटकोपर येथील ’साईदर्शन’ इमारत ही १९८१ साली बांधण्यात आली होती म्हणजे आता २०१७ साली तिला जवळपास ३७ वर्षे होत आली आहेत. अशा परिस्थितीत त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट झालेले असणे हे गरजेचे होते. परंतु ’साईदर्शन ’ ह्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आलेले नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातच भरीस भर म्हणजे गेल्या २-३ महिन्यांपासून इमारतीच्या तळमजल्यावर नूतनीकरणाचे काम चालू होते ज्यात इमारतीच्या मूळ आराखाड्यात बदल करण्यात आले होते व त्यातूम इमारत कमकुवत झाल्याचे आरोप इमारतीतील रहिवाशांनी केले आहेत.
ह्यावरून आपण राहतो त्या घराची ,इमारतींची सुरक्षा , विशेषत: जुन्या पडकळीला आलेल्या इमारतींची सुरक्षा ही किती महत्त्वाची बाब आहे हे ध्यानात येते.

ह्या दुर्घटनेच्या अनुभवाने जागे  होऊन सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मालाड येथील कुरार गावातील दफ्तरी रोडवरील विजयद्वारा ही चार मजली इमारत रहिवाशांनी रिकामी केली व ’पी’ उत्तर पालिका विभागाने त्यांना शांताराम तलावानजीक असलेल्या पालिका शाळेत स्थलांतरीत केले ही खरोखरी दखल घेण्याजोगी गोष्ट आहे. विजयद्वारा ही इमारत सुध्दा मंगळवारी दुपारी खचली होती. इमारत पुनर्विकासासाठी विकासकाला देण्यात आली होती व इमारत रिकामी करण्यासाठी आठवडाभराची मुदत दिली असतानाही पालिकेने हा निर्णय त्वरीत घेतला आणि रहिवाशांनीही सहकार्य केले त्यामुळे एक खूप मोठा येऊ घातलेला धोका टळला गेला. 

जीर्ण झालेल्या , मोडकळीस आलेल्या इमारतींच्या डागदुजीबाबत त्वरीत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करून घेणे हे कधीही आपल्याच फायद्याचे असते ही गोष्ट आपण विसरता कामा नये.  जुन्या इमारतींची वजन पेलण्याची क्षमता कमी होत जात असते. या इमारतींच्या कॉलम-बीम, स्लॅब, बाल्कनीचे सज्जे किंवा भिंती यामध्ये जर काही कारणांनी भेगा पडल्या असतील,तर त्या लवकरात लवकर बुजवून टाकाव्यात. कारण सुरुवातीला ह्या भेगा जरी अगदी लहान किंवा बारीक दिसत असल्या तरी या भेगांमधून दर पावसाळ्यात पाणी मुरत जातं आणि शेवटी काँक्रीटच्या  आतील भागांमधल्या सळ्या गंजायला सुरुवात होते. बऱ्याच वर्षांनी किंवा खूप महिन्यांनी या सळ्या पूर्णपणे गंजल्या की, त्यांची वजन पेलण्याची क्षमता खूपच कमी होते. 

                                                                           


आपण आपल्या शरीरामध्ये ही हा बदल पाहतो की माणसाच्या शरीरात म्हातारपणी  पायांमधली हाडं किंवा पाठीच्या मणक्यामध्ये झीज झाल्याने किंवा कूर्चा (दोन हाडांमधील वंगण ) कमी झाल्याने ठिसूळप्णा येतो , व हाडांना दुखापत होऊन ती मोडण्याची वा गंभीर इजा होण्याची जास्त शक्यता असते. हाडे ठिसूळ झाल्यामुळे वजन पेलायची ताकदच उरत नाही आणि त्यामुळे घसरून पडण्याचा वा कोलमडण्याचा धोका बळावतो. त्याप्रमाणेच जुन्या इमारतीच्या बीम-कॉलमची ताकद पेलण्याची क्षमता नाहीशी झाली की इमारत कोसळते. त्यामुळे इमारतीच्या कोणत्याही भागात निर्माण होणाऱ्या भेगा या इमारतीला संभवणाऱ्या धोक्यांपकी एक महत्त्वाचा धोका असतो. त्यामुळे या भेगा निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणं आवश्यक असतं. जुन्या झालेल्या इमारतीच्या भेगा ह्या धोकादायक ठरण्याआधीच योग्य ती काळजी घेतली तर या भेगा आपण नियंत्रणात ठेवून इमारतीचं आयुष्य कमी होण्यापासून रोखू शकतो.

त्याच बरोबरीने इमारतीच्या विविध भागांमध्ये केल्या जाणाऱ्या नूतनीकरणाच्या वेळी केल्या जाणाऱ्या तोडफडीमुळे इमारतीला हादरे बसतात. जर इमारत जास्त जुनी असेल  किंवा इमारतीचं मूळ बांधकाम मजबूत नसेल, तर अशा हादऱ्यांमुळे बीम-कॉलम, स्लॅब किंवा सज्जामध्ये भेगा निर्माण होऊ शकतात ज्यातून इमारत कमकुवत होण्याचा धोका अजून वाढतो. घाटकोपर येथील साईदर्शन इमारतीच्या कोलमडण्यामागे हे ही एक कारण असल्याची शक्यता स्थानिक रहिवाशांनी वर्तविली आहे हे जिवंत, बोलके उदाहरण ह्याच्या पुराव्यासाठी पुरेसे आहे असे वाटते.   
                                                                           
                                                                            


आपण बरेच वेळा इमारतींच्या बाहेरील भिंतीवर उगवलेली लहान झुडुपे किंवा झाडे पाहतो. पक्षी जेव्हा इमारतीवर बसतात, तेव्हा त्यांच्या पायांना चिकटून आलेल्या अनन्धान्याच्या बिया ह्या अशा भेगांमध्ये जाऊन रूजतात व त्यांचीच पुढे रोपे म्हणा वा लहान झुडूपे , झाडे बनून बाहेर उगवतात. ह्यांचीच मुळे वाढून  खोलवर जातात आणि या भेगा किंवा तडे अधिकच रुंदावतात. त्यातून मग पाण्याची गळती किंवा पाझर सुरु होते जी इमारतीसाठी धोकादायक असते. अशा प्रकारच्या पाण्याच्या गळतीमुळे किंवा झिरपण्यामुळे बुरशी येते. इमारतीच्या भिंतींना लागणारी बुरशी , ओल ही केवळ बाहेरच्याच किंवा पावसाच्या पाण्यानेच येते असं नाही, तर टॉयलेट, स्वयंपाकघराचं सिंक किंवा बेसिन यांतून होणारी पाण्याची गळतीही त्याला कारणीभूत असते.
त्यामुळे पाण्याच्या गळतीचं कारण काहीही असलं, तरी ती ताबडतोब थांबवली पाहिजे. कारण अखेरीस ह्या भेगा, ही ओल हेच पुढे इमारतीच्या आयुष्याला धोका निर्माण करतात. 

अनिरूध्दाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट  ह्या संस्थेच्या वतीने करण्यात येणार्‍या आपती व्यवस्थापनाचा कोर्स (विनामूल्य) करण्याची संधी मिळाली होती त्यामधील प्रशिक्षणाच्या द्वारे आणि लोटस पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमीटेड आणि अनिरूध्दाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या "आपत्ती व्यवस्थापन " ह्या पुस्तकाच्या आधारे इमारतीला पडणार्‍या भेगा आणि गळतीच्या बाबतीत काही खबरदारी घेता येऊ शकते ह्याची माहिती हाती लागली होती ती अशी -
* घर घेण्याआधी शक्य असेल, तर एखाद्या स्थापत्य अभियंत्याला दाखवून इमारतीच्या दर्जाची खात्री करून घर घ्यावं. कुठेही घर विकत घेताना किंवा नवीन घर बांधताना राष्ट्रीय प्रमाणक संस्थेचे (नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅंडर्डस ) कोड पाळले आहेत किंवा नाही ह्याची खात्री करून घ्यावी, हे कोड आहेत IS: 1893:1984, IS: 4326:1993 , IS: 13828:1993 इत्यादि.
* आपण राहात असलेल्या इमारतीत आपल्या घरातले पाण्याचे किंवा सांडपाण्याचे पाइप किंवा नळ यातून गळती होणार नाही, याची काळजी घ्यावी. विशेषत: कन्सिल्ड पाईपसंबंधी ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
* एअरकंडिशनरच्या आऊटलेट पाईपमधून येणारं पाणी इमारतीच्या सज्जावर किंवा इतर भागांवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी व हा पाइप एखाद्या बादलीत सोडावा. म्हणजे इमारतीच्या भागांवर हे सतत पडणारं पाणी ओल किंवा बुरशी निर्माण करणार नाही.
* इमारतीला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी घराचं नूतनीकरण करताना एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी व शक्यतो तोडफोड टाळावी. उदाहरणार्थ - बाल्कनीत किचन किंवा न्हाणीघर बांधायला परवानगी देऊ नये. सर्वसामान्य आरसीसी स्लॅबवर (RCC Slab) क्षमतेपेक्षा जास्त वजान टाकू नये. शौचालयांची जागा बदलायला किंवा अशा स्लॅबवर नवीन शौचालय बांधायला परवानगी देऊ नये.
* बांधकामाविषयक सल्ला देणार्‍या (Structural Consultant) योग्य सल्ल्याशिवाय गच्चीवर पाण्याच्या अतिरिक्त टाक्य़ा बांधू नये किंवा बांधण्यास परवानगी देऊ नये.
* विशेष करून जुजबी तांत्रिक ज्ञान असलेल्या अगर स्थापत्य अभियंता किंवा वास्तुविशारद नसलेल्या कोणाही व्यक्तिच्या सल्ल्यावरून  हे असले बदल करणं टाळावं. कारण या धोकादायक बदलांमुळे तुमचं आयुष्य सुखकर होण्याऐवजी तुम्ही तुमच्याबरोबरच इतरांचीही आयुष्य धोक्यात घालता ह्याची जाणीव ठेवा.
* फ्लोअिरगच्या जुन्या लाद्या काढून त्याजागी नव्या लाद्या बसवण्याआधी इमारतीचं वय, तिची स्ट्रक्चरल परिस्थिती आणि वजन पेलण्याची क्षमता लक्षात घ्यावी.
* इमारतीच्या कोणत्याही भागात रोपं अगर झाडं वाढू देऊ नयेत. तशी ती आढळलीत, तर लगेचच मुळासकट उपटून टाकावीत आणि त्या भेगा लवकरात लवकर भरून घ्याव्यात. अ‍ॅसिडचा वापर करू नये. कारण हे अ‍ॅसिड भेगांमधून आत शिरून लोखंडी सळ्यांना घातक ठरू शकते.
* गच्चीवरून होणारी गळती थांबवण्यासाठी भेगांमध्ये डांबर घालू नये. कारण उन्हाळ्यात दिवसभर गच्चीबरोबरच हे डांबरही तापून प्रसरण पावल्यामुळे भेगा अधिक मोठ्या होतात तर रात्रीच्या वेळी तापमान कमी झाले की डांबर आकुंचन पावतं; पण भेगा मात्र तशाच राहतात. याच वाढलेल्या भेगांमधून मग पावसाळ्यात अधिकच गळती सुरू होते.
* घराच्या वा इमारतीच्या कुठल्याही भागावर, भिंतीवर वा अन्य कुठेही ओल दिसली, तर त्या पाण्याचे मूळ शोधून काढून ते पाणी थांबवावं.

वरीलप्रकारे जर सुजाण , सुशिक्षीत नागरिकाची भूमिका बजावून आपणच आपल्या घरांची, इमारतींची , सोसायटीची काळजी घेतली तर इमारती कोसळून पडल्याने होणार्‍या दुर्घटनांचे प्रमाण रोखण्यासाठी आपण नक्कीच हातभार लावू शकतो.

संदर्भ : १. दैनिक प्रत्यक्ष दिनांक २७ जुलै २०१७ 
२. आपती व्यवस्थापनाचा कोर्स (विनामूल्य)- ह्या विषयी अधिक http://www.aniruddhasadm.com/माहितीसाठी ह्या संकेत-स्थळाला भेट देऊ शकता.
३. लोटस पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमीटेड आणि अनिरूध्दाज अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या "आपत्ती व्यवस्थापन " ह्या पुस्तकासाठी http://www.e-aanjaneya.com/ ह्या लिंकवर भेट देऊ शकता.


Tuesday, 25 July 2017

घरे व उंच इमारतीं मधील अग्निसुरक्षेबाबत अजूनही उदासीनता !

मागील जून महिन्यात  लंडनमध्ये ग्रीनफेल टॉवर या इमारतीला लागलेल्‍या भीषण आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर ३० जण गंभीर जखमी झाल्‍याची बातमी आली.लंडन अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग २७ व्या मजल्यापर्यंत पोहचली. इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी ४० अग्‍निशमन दलाच्या गाड्या आणि २०० जवान प्रयत्न करत होते ह्यावरून ह्या भीषण आगीची व्याप्ती किती जबरदस्त होती हे ध्यानात येते. 
                                                                     
लंडन येथील आग
त्या पाठोपाठ नुकतेच जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात सौदी अरेबिया मधील एका खिडकीविरहीत घराला आग लागून त्यात तेथे राहणार्‍या १० भारतीय कामगारांचा मृत्यू झाला असल्याची बातमी आणि त्यानंतर लगेचच होनोलुलु , हवाई येथील मार्क पोलो अपार्टमेंट्स ह्या ३६ मजली इमारतीतील २६ व्या मजल्यावर आग लागून त्यात ३ जणांचा मृत्यु ओढावल्याची बातमी ट्विटरवर वाचली. ह्या उंच इमारतीमध्ये स्प्रिंकलर सिस्टीम नसल्याने १०० अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असूनही ती लवकर विझवू शकले नाही. १९७४ पूर्वी बांधलेल्या उंच इमारतींमध्ये "फायर कोड" च्या नियमा प्रमाणे स्प्रिंकलर सिस्टीम असणे बंधनकारक नव्हते आणि ही इमारत १९७१ साली बांधून पूर्ण झाली होती असे "सीएनएन" ह्या वृत्त वाहिनीवर म्हटले आहे. 
                                                                             
होनोलुलु येथील आग
यावरून राहत्या घरांमधील, विशेषत:  उंच गगनचुंबी इमारतीं मध्ये आगीबाबत कितपत सुरक्षा पाळली जाते हा मुद्दा विचारात घ्यावासा वाटतो.

दरवर्षी १४ अप्रिल हा अग्निशमन दिवस म्हणून साजरा केला जातो , अग्निशमन सुरक्षेवर व्याख्याने, प्रात्यक्षिके आयोजित केली जातात व त्यानंतर मात्र परत कधीतरी अशीच भीषण आगीची घटना होईपर्यंत सर्वकाही विसरून परत एकदा दैनंदिन कामात सर्व जण मग्न होऊन जातात.

९ मे २०१५ रोजी "गोकुळ निवास " ह्या काळबादेवी, मुंबई येथील ५० वर्षाहून जुन्या लाकडी बांधणीच्या पाच मजली इमारतीमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये काही  अग्निशमन दलाचे अधिकारी भीषण आगीशी तोंड देताना वीरगतीस प्राप्त झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर उंच इमारती , निवासस्थाने ह्यांतील आगीबाबतच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. 

काळबादेवी येथील आग
महाराष्ट्र राज्याचे अग्निशमन सल्लागारांच्या चिकाटी, पाठपुरावा व अथक परिश्रमाने महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ६ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन सुरक्षा उपाययोजना अधिनियम २००६ तसेच त्या अनुषंगाने २३ जून २००९ पासून महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन सुरक्षा उपाययोजना नियम २००८ लागू केला होता. गॅस सिलेंडरचा स्फोट, पाइप गॅसची अव्यवस्थित हाताळणी, ज्वालाग्राही पदार्थ घरात ठेवणे, सिगारेट इत्यादींमुळे आग लागण्याचे प्रकार घडतात. राष्ट्रीय सुरक्षा परिषद (National Safety Council), केंद्रिय विद्युत प्राधिकरण (CEA) अशा मान्यवर संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे एकूण आगीच्या घटनांपैकी फक्त ४० ते ४५ टक्के आगी या इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटने लागतात,असे विधान त्यांच्या कार्यक्रम अंदाजपत्रकात केले असल्याचे समजते. म्हणजेच बाकीच्या आगीच्या घटना या अन्य कारणांमुळे जसे- गॅस सिलेंडरचा स्फोट, पाइप गॅसची अव्यवस्थित हाताळणी, ज्वालाग्राही पदार्थ घरात ठेवणे, सिगारेट इत्यादींमुळे घडतात हे स्पष्ट होते. तरीही शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगी जर कमी झाल्या तर ४० ते ४५ टक्के नुकसान व जीवितहानी टळू शकते, नाही का? ते साध्य करण्यासाठी सर्व ठिकाणची विद्युत संचमांडणी ही विद्युत अधिनियम- २०१० प्रमाणे ठेवणे अनिवार्य आहे. नंतर अग्नि सुरक्षेकरिता National Building Code 2016 हा लागू करण्यात आला असे वाचले होते.

सुजाण व सुशिक्षीत म्हणविणार्‍या नागरिकांनीही त्याकडे डोळेझाक केल्याने आणि इतर सर्वांच्याच या विषयातील उदासिनतेमुळे ज्याप्रकारे या कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे त्याप्रकारे ती होत नाही. आजमितीला तरी ह्या कायद्याच्या अंमलबजावणीची  अत्यंत निकडीची गरज आहे असे चित्र दिसत आहे.

सर्वसामान्य जनतेचा असा समज आहे की, सर्वात जास्त आगी या कारखाने, कार्यालये अथवा इतर ठिकाणी लागतात व या आगीमध्ये जास्तीत जास्त माणसे जखमी व मृत होतात; पण हे समीकरण एकदम उलट आहे. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे आज सर्वात जास्त आगी या राहत्या वस्तीतील असून या आगीमध्येच जखमी व मृताची संख्या सर्वात जास्त असते व त्याची महत्त्वाची कारणे असतात विद्युत उपकरणे व स्वयंपाकघरातील निष्काळजीपणा आणि अगिशमनाबद्दलचे अज्ञान.

सर्वसामान्य नागरिकांना प्रशिक्षण देऊन स्वयंसेवकाची फौज (Volunteer Force) निर्माण करण्यामुळे ह्या आगीविषयक प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी नक्कीच मोलाचा हातभार लागू शकतो. अग्निशमन करणार्‍या जवानला पहिल्या दिवसापासून शिकवण्यात येते की आग विझवणे म्हणजे आगीचे मूळस्थान शोधून काढून कमीत कमी वेळात व कमीत कमी नुकसानात आगीवर ताबा मिळवणे व सर्वप्रथम अडकलेल्यांची सुटका करणे. मग एक सामान्य सुजाण नागरिक म्हणून आपणही प्राथमिक स्वरूपाच्या आगीवर नियंत्रण नाही का करू शकत? नक्कीच करू शकतो!

आग लागल्यावर जर आपल्याला आग विझवण्याबाबतचे ज्ञान असेल तर आपण प्राथमिक स्वरूपाच्या आगीवर ताबा मिळवून आग विझवूच, शिवाय होणारे मोठे नुकसानही टाळू शकू, त्यासाठी आपल्याला काही छोटया छोटया गोष्टी माहीत असणे गरजेचे असते.

आग कुठल्या प्रकारची आहे, यावर आग विझवण्याच्या पद्धती अवलंबून असतात. जगातील सर्व अग्निशमन सेवा आग विझवण्यासाठी थंड करणे, उपासमार करणे, दडपणे या तीन पद्धतीने आगीवर नियंत्रण करतात.  प्रशिक्षण देताना आगीचा त्रिकोण व आग विझवण्याचा त्रिकोण हा महत्त्वाचा मानतात. 
आपणही याचा थोडासा अभ्यास केल्यास सहजपणे आगीवर नियंत्रण मिळवू शकतो. आगीचा त्रिकोण म्हणजे उष्णता, हवा व जळाऊ पदार्थ या तीन गोष्टी योग्य प्रमाणात एकत्र आल्या तर आग लागते व हीच आग नियंत्रणाबाहेर गेली की, त्यावर लगेच नियंत्रण मिळवणे गरजेचे असते. ही नियंत्रणाबाहेरील आग प्राथमिक अवस्थेत नियंत्रणात आणली तर नुकसानही कमी होऊ शकते.

या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी आगीच्या त्रिकोणातील घटकांपैकी एक अथवा दोन अथवा तीनही गोष्टींवर नियंत्रण करता आले तर आग विझते, व त्यालाच म्हणतात आग विझवण्याचा त्रिकोण म्हणजे थंड करणे, दडपणे व आगीची उपासमार करणे. आगीची उष्णता कमी करायची असेल, तर पाण्याचा वापर करा व आगीला थंड करा. जळणा-या पदार्थाच्या जवळील इतर जळाऊ पदार्थ बाजूला करा अथवा जळणारा पदार्थच बाजूला करा, त्यामुळे होणारे नुकसान कमी होऊ शकते, म्हणजेच काय तर आगीची उपासमार करा.

आपल्याला सर्वांना माहीतच आहे की शाळेत आपल्याला शिकवले जाते की आपल्या कपडयांना आग लागल्यास जमिनीवर लोळा अथवा ब्लँकेट/ चादर घट्ट लपेटून घ्या.
साधे घरगुती स्वयंपाक घरातील उदाहरण बघायचे झाले तर कढईमधील तेलाला आग लागल्यास गृहिणी पटकन त्या कढईवर झाकण टाकते म्हणजेच आगीचा संपर्क हवेपासून तोडला जातो व आग दडपून विझवली जाते. इलेक्ट्रिक केबल अथवा वायरिंगला आग असेल तर सुकी वाळू अथवा योग्य ते एक्स्टिंग्विशर वापरले जाते, या प्रकारातही हवेचा संपर्क आगीपासून तोडला जातो व नंतर आगीवर ताबा मिळवला जातो व विद्युत पुरवठा बंद करून आगीवर नियंत्रण मिळवले जाते.

अग्निशमनासाठी उंच इमारती, कारखाने व्यावसायिक इमारतीमध्ये विविध प्रकारची अग्निशमन यंत्रणा बसवलेली असते व ही यंत्रणा तेथील प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व अग्निशमन विभागातील कर्मचा-यांना कशा प्रकारे वापरावी याची पूर्णपणे माहिती असणे गरजेचे असते; परंतु सामान्य नागरिकांनीही प्राथमिक स्वरूपाच्या आगीमध्ये योग्य प्रकारचे एक्स्टिंग्विशर्सचा वापर योग्य प्रकारे केल्यास आग नियंत्रणात ठेवणे सहज शक्य असते. एक्स्टिंग्विशर्स ही इमारतीमधील त्या ठिकाणच्या धोक्यानुरूप ठेवण्यात येतात व इमारतीमधील रहिवाशांनी प्राथमिक स्वरूपाच्या आगीवर त्यांचा वापर करावा हाच खरा उद्देश असतो.

सर्वसाधारणपणे ड्राय पावडर केमिकल एक्स्टिंग्विशर्स किंवा ए.बी.सी. ड्राय पावडर केमिकल एक्स्टिंग्विशर्स सर्वत्र ठेवलेली आढळतात, कारण कुठल्याही प्रकारच्या आगीवर सहजपणे त्यांचा वापर करता येतो, परंतु आगीच्या वर्गीकरणानुरूप चार प्रकारची एक्स्टिंग्विशर्स प्रचलित आहेत. लाकूड, कपडा, कागद इत्यादीच्या आगीसाठी वॉटर सीओटू प्रकारचे एक्स्टिंग्विशर्स वापरतात, ज्यामध्ये पाणी सीओटू वायूच्या दाबाने बाहेर पडून आग थंड करून विझवली जाते.

फोम प्रकारचे एक्स्टिंग्विशर्स तेलाच्या किंवा द्रव पदार्थाच्या आगीवर नियंत्रण करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये साबणाच्या फेसासारखा पदार्थ तेलावर तरंगून दडपून आग विझवली जाते. सीओटू एक्स्टिंग्विशर्स अथवा ड्राय पावडर केमिकल एक्स्टिंग्विशर्स वापरताना आगीला मिळणा-या हवेचे प्रमाण कमी करून आग विझवली जाते.

एक्स्टिंग्विशरवर लिहिलेल्या सूचनांचे पालन करून ही उपकरणे सहजपणे कोणीही वापरू शकतो; परंतु त्यासाठी त्यांची योग्य ती देखभाल व त्यावरील वापरासंबंधीच्या सूचनांकडे इतर वेळी लक्ष देणे तेवढेच आवश्यक नाही का? पण इथेच आपण चुकतो व त्याकडे दुर्लक्ष करतो. "दात आहेत तर चणे नाही व चणे आहेत तर दात नाही " ह्या म्हणीनुसार अग्निशमन उपकरणांची देखभाल नीट केली गेली नसेल तर आगीच्या वेळी त्यांच्या योग्य तो वापर आपण करू शकत नाही.
अग्निसुरक्षा फक्त अग्निसुरक्षा उपकरणे बसवून पूर्ण होत नाही, त्यासाठी हवी असते इमारतीच्या आराखडयाला मंजुरी घेतानाच इमारतीच्या सुरक्षतेबाबतच्या उपाययोजनेचे नियोजन.

इमारतीच्या बांधकामाच्या आराखडयाला मंजुरी घेताना अग्निसुरक्षेचे व त्यावरील उपाययोजनांचे नियोजन आवश्यक असते. ह्यामध्ये अ‍ॅक्टिव्ह व पॅसिव्ह या दोन प्रकारच्या यंत्रणा असतात. पॅसिव्ह प्रकारात इमारतीमध्ये Emergency मध्ये निवाशांना सुटकेसाठी एकत्रित होण्यासाठी योग्य मोकळी जागा, जिने, दरवाजे कॉरिडोर, पॅसेजेस, लिफ्ट लॉबी, बांधकामाची उंची, वायुविजन, रिफ्जुय एरिया इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश असतो. १०-११ मजली इमारतींमध्ये अशी मोकळी जागा ६त ८ मजल्यां दरम्यान एखाद्या मजल्यावर ठेवता येऊ शकते. दुसरा भाग अ‍ॅक्टिव यंत्रणा, यामध्ये पाण्याची आगीच्या वापरासाठी असलेली टाकी, रायझर सिस्टीम, हायड्रन्ट,  स्प्रिंकलर सिस्टीम , होजरिल इत्यादी अनेक यंत्रणेचा समावेश असतो. या सर्वांचा वापर प्रत्यक्ष आग विझविण्यासाठी केला जातो.

ह्या यंत्रणांची योग्य प्रकारे निगा व काळजी न घेतल्यास प्रत्यक्ष दुर्घटनेच्या वेळी या यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरतात व त्यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविताना दुसर्‍या अडचणींना तोंड द्यावे लागते. ह्याची सभानता ठेवणे व काळजी घेणे आपल्याच फायद्याचे असते.

आजही कित्येकांना अजूनही माहिती नाही की, उंच इमारतीतील Fire Lift ही दुर्घटनेच्या वेळी अग्निशमन कर्मचा-यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक असून इमारतीमधील रहिवाशाने जिन्याचा वापर स्वत:च्या सुटकेसाठी करावयाचा असतो.

थोडक्यात बघायचे झाले तर -
आग लागल्यानंतर घ्यावयाची खबरदारी -
* आग लागल्यावर प्रथम घरातील मेन स्विच बंद करावा व मगच पाणी न वापरता कार्बनडाय ऑक्साइड, कोरडी रेती यांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करावा.
* त्यापूर्वी १०१ नंबरवर फोन करून फायर ब्रिगेडला कळवणे.
* अर्थिग कार्यक्षम राहील याची दक्षता घेणे.
* घाबरून न जाता जिथे शॉर्ट सर्किट झाले आहे, तो भाग मुख्य संचमांडणीपासून अलग ठेवणे व  स्पर्श टाळणे.
* घरात व जिन्यांमध्ये पसरणाऱ्या धुरापासून सुरक्षित राहण्यासाठी उभे न राहता वाकून चालणे किंवा सरपटणे.
* पायात रबरी स्लीपर्स व हातात लाकडी काठी घेऊनच कुठल्याही बटनास हात लावणे, अन्यथा रिटर्न करंटची भीती असते

* उंच इमारतीमध्ये आग लागल्यास लिफ़्टचा वापर टाळणे व शक्यतो जिन्याने खाली उतरणे.
* फायर ब्रिगेडच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करून धोक्यापासून दूर व्हावे.

आजच्या या आधुनिक जगात अद्ययावत अग्निशमन यंत्रणा बिल्डिंग मॉनिटरी सिस्टीमद्वारे सुद्धा नियंत्रणात ठेवता येऊ शकतात असे वाचनात आले होते.परंतु त्यासाठी आपल्याला अग्निसुरक्षेबाबतच्या जागरूकतेत बदल करून सभानता बाळगायला हवी, नाही का ?

Thursday, 20 July 2017

वणवे ,जंगलतोड आणि जागतिक तापमानवाढ

दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक २ जुलै २०१७ रोजीच्या अंकातील जितेंद्र पाटील ह्यांचा "जंगलांना लागणारे वणवे आणि वातावरण " हा लेख हा खूपच दु:खद आणि धक्कादायक  बातमी देणारा !

पोर्तुगालमध्ये १७ जून २०१७ च्या रात्री जंगलांमध्ये भीषण आग लागली होती आणि त्या आगीवर अथक प्रयत्नांनी ५ दिवसांनंतर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने सुमारे ६५ जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले तर ५० हजार हेक्टर वनक्षेत्र बेचिराख झाले. 
                                                               


जागतिक तापमानवाढ आणि त्यास कारणीभूत असणार्‍या कार्बन  डायऑक्साईड व तत्सम वायूंच्या उत्सर्जनात होणाऱ्या वाढीची गती रोखण्यासाठी जंगलांचे किती महत्व आहे हे आपण सारे जाणतो. पोर्तुगालमधील जंगलात लागलेल्या आगीतून निर्माण झालेल्या राखेचे अंश स्वित्झर्लंडमध्ये मिळाले हे वाचल्यावर लक्षात आले की  जंगलात लागणारे वणवे  हे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढविण्यास अधिक हातभार लावतात. म्हणजेच जंगलातील वणवे हे शक्यतोवर लागू न देण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे व हे वणवे लागल्यास त्यांची आग लवकरात लवकर आटोक्यात आणणे व त्यासाठी आवश्यक उपाय योजना करणे हे ही तितकेच महत्त्वाचे असल्याचे ध्यानात आले.

नुकतेच १ जुलै रोजी वनमहोत्सव साजरा करण्याच्या निमीत्ताने सुजाण. संवेदनशील नागरिक, सेवाभावी संस्था, वृक्षप्रेमी संघटनानी  वृक्षारोपणाचे कार्यक्रम पार पाडल्याच्या अनेक बातम्या वाचनात आल्या, खरोखरी ही स्तुत्य गोष्ट आहे. तथापि आपण कितीही प्रमाणात झाडे लावली तरीदेखील जोपर्यंत आपण अस्तित्त्वातआहे ती जंगले , डोंगर नाहीसे करणारी प्रक्रिया थांबवत नाही , म्हणजे जंगलतोड करून जंगल कमी करण्यास प्रतिबंध करावयाचे , जंगलातील आगींमुळे जंगलांचे घटणारे प्रमाण कमी करावयाचे,  डोंगराच्या पायथ्याशी होणार्या खाणकामामुळे होणारे डोंगरांचे खच्चीकरण थांबवण्याचे उपाय योजत नाही तोपर्यंत आपल्या झाडे लावण्यामागचा तापमान वाढ रोखण्याचा मूळ हेतू साध्य होतं  नाही असे वाट्ते.

डिसेंबर महिन्यात पॅरिस येथे युनोतर्फे जगातील १९६ देशांच्या प्रमुखांची परिषद झाली होती ज्यातील ‘पॅरिस कराराच्या’ दस्तावेजात म्हटले आहे की, “वातावरणातील बदल हे तातडीचे, अत्यंत धोकादायक स्वरूपाचे अपरिवर्तनीय स्वरूप धारण करीत असलेले संकट आहे. सर्व मानवजातीने सहकार्याने व एकत्र प्रतिसाद देऊन कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करणे जरुरीचे आहे.”
“सर्व देशांनी वार्षिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सन २०२० पर्यंत घेतलेल्या प्रतिज्ञेच्या अमलबजावणीतील त्रुटीची गांभीर्याने दखल घ्यावी. उद्योगपूर्ण काळाच्या (१९५०) तुलनेत तापमानात २० सें. ची वाढ होऊ नये आणि झालेली वाढ १.५ सें. पर्यंत कमी करावी अशा रीतीने गांभीर्याने प्रयत्न करावे.”
हा करारातील भाग वाचून मानवजातीच्या जबाबदारीची जाणीव आपल्याला होईल.

वाचनात असे आढळले की नासाचे माजी संचालक डॉ. जेम्स हेनसेन यांच्या ‘स्टोर्म्स ऑफ माय ग्रँडचिल्ड्रन’ या पुस्तकात म्हटले आहे की, “सध्या होत असलेली वातावरणातील कार्बनची वाढ अभूतपूर्व व अत्यंत चिंताजनक आहे”. “सध्या दरवर्षी ६०० कोटी टन कार्बनची वाढ होत आहे. पृथ्वीवर आतापर्यंत आलेल्या सर्वात वेगवान उष्णयुगात साडेसहा कोटी वर्षांपूर्वी, कार्बनच्या वाढीचा वेग दहा हजार वर्षांत ३०० कोटी टन असा होता. सध्या आपण त्या उष्णयुगाच्या तुलनेत एका वर्षात २० हजार वर्षे ओलांडत आहोत.” दि. १२ मे-२०१३ रोजी वातावरणातील कार्बनने ४०० पीपीएम (१ पीपीएम = ३०० कोटी टन) ही धोक्याची पातळी ओलांडली आहे. साधारण १२ मे-२०२३ पर्यंत २० पीपीएमची वाढ होईल. या काळात तापमानवाढ अनियंत्रित होऊ शकते, असा तज्ञांचा अंदाज आहे. याचा अर्थ पृथ्वीवर आणीबाणीची स्थिती आहे. अहवाल म्हणत आहे की, कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याची गरज आहे; कारण, एकदा वातावरणात गेलेला कार्बन एक हजार वर्षे टिकतो.
‘हेनसेन’ यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहीले आहे की, “वातावरणातील हा बदल महाविस्फोटक स्वरूपाचा आहे. ही मानवजातीला वाचवण्याची शेवटची संधी आहे. तापमानवाढ अनियंत्रित झाल्यास या शतकात मानवजात व पृथ्वीवरील बहुतांश जीवसृष्टी नष्ट होईल.”
पुढे हेनसेन म्हणतात की, “जनतेची समज आणि वैज्ञानिक सत्य यात प्रचंड दरी आहे. आता कुठे थोड्याशा जनतेला तापमानवाढीची जाणीव होत आहे; मात्र, त्याचवेळी या संबंधित शास्त्रज्ञांना, ज्यांना ते काय व कशाबद्दल बोलत आहेत याची माहिती आहे, ते समजून चुकले आहेत की, पृथ्वीची वातावरणीय व्यवस्था कडेलोटच्या क्षणाला पोहचलीय.”
अजून एक उदाहरण वाचनात आले की -
‘गाम्बिया’ ह्या आफ्रिकेतील देशातील विकासामुळे  १९८१ पासून पुढील बारा वर्षात झालेल्या कॉंक्रीटीकरण, शहरीकरण आणि जंगलांच्या नाशामुळे पावसाचे प्रमाण सुमारे १४०० मि.मी.वरून निम्म्यापेक्षा कमी म्हणजे सुमारे ६०० मि.मी. एवढे कमी झाल्याचे नमूद केले आहे.

ह्यावरून जंगलांचे घटणारे प्रमाण हे तापमान वाढीत किती मोठा हातभार लावतात हे कळते.
                             
आपण मानवानेच लोभापोटी केलेल्या बेसुमार जंगलतोडीने, तसेच जंगलातील वणव्यांनी  वातावरणावर किती दुष्परिणाम होतात  हे जाणून आता तरी जंगल वाचविण्याचा प्रभावी उपाय आपण योजलाच पाहिजे.जागतिक तापमानवाढीच्या समस्येच्या अक्राळविक्राळ स्वरूपासमोर सर्वतोपरीने लढणे  आवश्यक असल्याने झाडे लावण्यावरोबरीनेच जंगलातील झाडे वाचविणे, त्यांचे आगींपासून संरक्षण करणे हे ही  अपरिहार्य ठरत आहे असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

Wednesday, 19 April 2017

अणुकिरणोत्सर्गी आयोडीन -१३१ ची युरोप मध्ये गळती - आण्विक अपघाताची दाट चिंता?

काही संस्थांनी हवेच्या नमुन्यांच्या केलेल्या चाचणींमधून आयोडीन- १३१ चे धक्कादायक प्रमाण युरोपीय प्रदेशांमधील हवेमध्ये आढळले, जे आर्क्टिकच्या ध्रुवीय प्रदेशातील संभाव्य  आण्विक अपघाताच्या धोक्याची इशाराघंटा वाजवित आहे जणू ! आयोडीन १३१  हे आयोडीनचे रेडीओऍक्टीव्ह आयसोटोप (Radioactive Isotope) अणुकिरणोत्सर्गी समस्थानिक आहे जे प्रामुख्याने ( न्युक्लिअर फिजन (न्युक्लिअर विखण्डन ) ह्या प्रक्रियेमध्ये वापरले जाते. 

मार्च २०११ मध्ये फुकुशिमा येथे जी आण्विक गळती झाली त्यातून वातावरणात खूप मोठ्या प्रमाणावर किरणोत्सार झाला सल्याचे निदर्शनास आले, ज्यात आयोडीन १२९ हे दीर्घकाळ टिकणारे ( १५.७ दशलक्ष वर्षे)  व वातावरणात हजारो वर्षे तग धरून राहणारे समस्थानिक होते आणि आयोडीन १३१ हे कमी काळ टिकणारे (८ दिवस) . परंतु दोन्ही आयोडीन १२९ आणि आयोडीन १३१ ही किरणोत्सारा दरम्यान मानवाला अत्यंत घातक असे बीटा पार्टिकल्स सोडतात ज्याने थायरॉईड कॅन्सर होण्याची जास्त शक्यता असते. थायरॉईड हे मानव निर्मीत रेडीओऍक्टीव्ह आयोडीन १२९ आणि आयोडीन १३१ विषारी पदार्थ शोषून घेते. प्रत्येक आण्विक आपत्ती किंवा अपघात हे हजारो विषारी पदार्थ , जड धातुची विषारी रेडीओऍक्टीव्ह द्रव्ये बाहेर उत्सर्जित करतातच , परंतु ह्यापैकी खूप कमींची मोजणी होते आणि चर्चा होते.

थायरॉईड ही मानवाच्या शरीरातील ग्रंथी रेडीओऍक्टीव्ह  आयोडीन आणि स्थिर आयोडीन असा फरक समजू शकत नाही. त्यामुळे रेडीओऍक्टीव्ह आयोडीन १२९ किंवा आयोडीन १३१ चे  प्रमाण जेव्हा प्रमाणित प्रमाणापेक्षा अधिक वाढते , तेव्हा थायरॉईड ही रेडीओऍक्टीव्ह  आयोडीनची समस्थानिके असलेले आयोडीन १२९ किंवा आयोडीन १३१ पेशींमध्ये शोषून साठवून ठेवते आणि ते थायरॉईड हार्मोनच्या वाढीसाठी वापरते, पुढे  हेच आजूबाजूच्या पेशींना प्रत्यक्ष धोका देते आणि पुढे त्यांची बेसुमार वाढ होऊन परिणाम स्वरूप कॅन्सर होऊ शकतो.

ह्याच कारणास्तव कोणतीही आण्विक गळती वा  रेडीओऍक्टीव्ह  किरणोत्सार हा धोकादायक म्हणून पाहिला जातो आणि त्याची गंभीर दखलही घेतली जाते. म्हणून अणुकिरणोत्सर्गी आयोडीन -१३१ ची युरोप मधील गळती -  ह्या आण्विक अपघाताची दाट चिंता व्यक्त केली जात आहे.         

आयोडीन -१३१ ह्या रेडीओऎक्टीव्ह पदार्थाचे कण रशियाच्या सीमेजवळील नोर्वे येथील स्वानहोव्ड येथे जानेवारी महीन्याच्या दुसर्‍या आठवड्यात साधारणपणे ९ ते १६ जानेवारी च्या दरम्यान आढळले. असेच Radioactive पदार्थ पुढे फिनीश लॅपलॅण्ड मधील रोवनिअमी (Rovaniemi in Finnish Lapland ), पोलंड, झेक रिपब्लिक , जर्मनी, फ्रान्स, स्पेन येथे पुढील २ आठवड्यातच  आढळले. म्हणजेच थोडक्यात जानेवारी महिन्याच्या शेवटापर्यंत अणु किरणोत्सर्गी आयोडीन -१३१ चे पुराव्यांचे प्रमाण अगदी नगण्य स्वरूपातले असले, आरोग्याला हानीकारक नसले तरी वाढलेले नक्कीच होते.
                                                                   
हवेत आढळलेले आयोडीन-१३१ चे प्रमाण हे खूप कमी तीव्रतेचे असल्यामुळे त्याने लोकांच्या आरोग्याला आणि वातावरणाला काही धोका नसल्याचे निश्चित झाले.
त्यामुळेच आपात्कालीन सज्जता पाहणार्‍या नॉर्वेजियन किरणोत्सार सुरक्षा विभागाच्या प्रमुख अधिकारी ऍसटरीड लिलॅण्ड (head of section for emergency preparedness at the Norwegian Radiation Protection Autority, Astrid Liland, ) ह्यांनी नॉर्वेने ही माहिती उघड न केल्याची कबूली  "बॅरण्टस ऑबझर्व्हर" ( Barents Observer ) ह्या इंटरनेट वेब सर्व्हीसला दिली. 

परंतु फ्रान्सने मात्र आपल्या नागरीकांना ही माहिती ताबडतोब उघड करून सांगितली.  
अशा परिस्थीतीत आयोडीन १३१ चे आढळलेले पुरावे हे कोणत्याही पूर्व काळात घडलेल्या आण्विक गळतीचे नसून ,नुकत्याच  झालेल्या आण्विक गळतीचे असल्याची दाट शक्यता वर्तवित होते. त्यामागील शास्त्रीय कारणही तसेच गंभीर आणि विचारांना चालना देणारे आहे. आयोडीन १३१ चे आयुष्यमान हे खूप कमी काळाचे म्हणजेच अवघ्या ८ दिवसांचेच असते त्यामुळे आयोडीन १३१ चे अंश सापडणे म्हणजे ते फक्त नुकत्याच घडलेल्या आण्विक गळतीमुळे होऊ शकण्याचीच दाट शक्यता दाखवित होते.  
       
अनेक संभाव्य शक्योपशक्यतेचा अभ्यास करूनही  गळतीचे कारण मात्र सापडू शकले नाही. काही संभाव्य कारणांचा अभ्यास केला गेला त्यापैकी -

१. ह्या गळतीच्या दरम्यान अमेरीकी हवाई दलाने WC-135 हे Constant Phoenix  एअरक्राफ्ट  युरोपला पाठवले होते असे आढळले. 
WC-135 हे अमेरीकन हवाई दलाचे Constant Phoenix  एअरक्राफ्ट हे वातावरणातील हवेच्या नमुन्यांमधील संभाव्य आण्विक  स्फोटाचे प्रमाण शोधून काढण्याच्या तसेच आण्विक घटनांना प्रतिसाद देता यावे , कोणत्याही प्रकारचे आण्विक उत्सर्जन घडत असल्यास ते कोणत्या प्रकारच्या आण्विक वा तत्सम शस्त्राच्या माध्यमातून घडत आहे हे शोधून काढणे, आणि स्फोटाची तीव्रता जाणून घेणे अशा  विशेष कार्याच्या उद्देशाने   निर्माण केले गेले आहे.

ट्विटर ह्या सोशल मिडीयावर U.S. Aircrafts Spots ह्यांनी प्रसिध्द केलेल्या मॅप नुसार  WC-135 चा मार्ग खालील दिल्याप्रमाणे आहे जे फ्लोरिडाहून निघून UK's Mildenhall airbaseवर उतरले .

                                                                       

अजूनही अमेरीकी मिलीटरीने "Constant Phoenix"  हे युरोपकडे का पाठविण्यात आले ह्याचे स्प्ष्टीकरण दिलेले नाही.  

२.  रशियाच्या आण्विक चाचणींचा धोका -
दुसर्‍या एका अंदाजानुसार रशियाने आर्क्टिक प्रदेशात आण्विक शस्त्रांची चाचणी पुन्हा सुरू केली असावी किंवा परमाणु बॉम्बची चाचणी करण्याची रशियाची नवी रणनैतिक खेळी असावी असा कयास बांधला जात आहे. परंतु परमाणु बॉम्बच्या चाचणीच्या संदर्भाला सहमती दर्शविणारे कोणतेही भूकंपीय पडसाद/पुरावे सापडले नाही.

अजून एका अनुमानानुसार  नॉर्वेच्या सीमेलगतच्या कारा समुद्र आणि कोला पेनिन्सुला ह्या भागातील मोठ्या प्रमाणावरील रशियाचा आण्विक कचरा आणि विघटन होऊ  घातलेल्या आण्विक पाणबुड्या ह्यासुध्दा ह्या सध्याच्या आण्विक गळतीचे कारण असण्याची संभाव्यता वर्तविली जाते.

शीत युध्दाच्या दरम्यान आणि नंतर  रशियाने प्रक्रिया न केलेल्या आण्विक वेसल्स. अणुभट्टीचे वापरलेले फ्युएल रॉड , किरणोत्सर्गी आण्विक कचरा हा आर्क्टिक प्रदेशात विल्हेवाट लावण्यासाठी डम्प केला आहे. बर्‍याच जणांनी हा किरणोत्सर्गी गळती करणारा आणि प्रदूषण वाढविणारा  टाईम-बॉम्बच  असल्याची संतप्त प्रतिक्रिया नोंदवली आहे.

३. आयोडीन १३१ चा औषधोपयोगी वापर -
काही मंडळी असा दावा करीत आहेत की आयोडीन १३१ चे हवेतील प्रमाण हे आण्विक अणुभट्टीतील आण्विक प्रक्रियेमुळे असू शकते तर काहींच्या मते आयोडीन १३१ हे समस्थानिक ( isotope ) हे मोठ्या प्रमाणावर औषधांमध्ये (कॅन्सरच्या प्रतिबंधात्मक औषधांमध्ये ) वापरले जाते आणि म्हणून जगातील बहुतांशी राष्ट्रे ही आयोडीन १३१ चे जागतिक पातळीवर उत्पादन देखिल करतात, त्याच्याशी हे निगडीत असू शकते.
आण्विक अणुभट्ट्यांचे चालक वा तत्सम संस्था ज्या आयोडीन १३१ चा औषधोपयोगी वापर करतात त्या ह्या किरणोत्सर्गी वापराचा बाह्य वातावरणात उत्सर्ग करण्यासाठी डिटेक्टरचा वापर करतात, ज्यामुळे ह्याची शक्यता खूपच नगण्य असावे असा मतप्रवाह आहे. 

सद्य स्थितीत होत असलेल्या आयोडीन १३१ च्या किरणोत्सर्गी गळतीचे मूळ शोढून काढण्याच्या निष्कर्षाप्रत पोहचताआले नाही असे चित्र दिसते आहे. जरी संबंधित राष्ट्रांचे एकमेकांवरील दोषारोप आणि नकारात्मक युक्तिवाद  काहीही असले आणि त्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटणारे सूर काही असतील तरी देखिल सामान्य माणसाने आण्विक दुर्घटना ही अपघाताने घडलेली असो वा मानव निर्मीत असो , त्याकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही . उलट अशा प्रकारच्या आण्विक गळतींपासून होणारे  विघातक परिणाम , त्यांपासून उद्भवणारा धोका जाणून घ्यायला पाहिजे आणि त्या आपत्तीला तोंड देण्याच्या व्यवस्थापनाची अद्ययावत सुसज्जता करूनच ठेवली पाहिजे आणि हेच वास्तवाला सभानतेने , सजगपणे सामोरे जाणे असेल जे समस्त मानवांना नैसर्गिक वा मानव -निर्मीत आपत्तींपासून तारू शकेलअसे वाटते.  

संदर्भ:

Saturday, 4 March 2017

जैविक दहशतवादाची टांगती तलवार?

दिनांक २१ फेब्रुवारी २०१७ च्या दैनिक प्रत्यक्ष मधील एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले होते . ती बातमी होती जगविख्यात ’मायक्रोसॉफ्ट’ कंपनीचे प्रमुख बिल गेट्स यांनी दिलेला इशारा - जैविक दहशतवाद तीन कोटींचे बळी घेईल ! सिरीयामध्ये गेल्या ६ वर्षांपासून  सुरु असलेल्या संघर्षात सुमारे ४ लाख जणांचा बळी गेला असून सर्व जगभरातून सिरीयातील परिस्ठितीवर चिंता व्यक्त केली जाते. मात्र सिरीयापेक्षाही भीषण अरिष्ट जगावर कोसळणार असल्याचा दावा बिल गेट्स ह्यांनी केला.

जर्मनीच्या म्युनिक शहरात आयोजित करण्यात आलेल्या ’म्युनिक सिक्युरिटी कॉन्फरन्स ’ येथे आमंत्रित केल्या गेलेल्या जगभरातील प्रमुख देशांतील नेते , अधिकारी तसेच व्यापारी व उद्योजक वर्गातील प्रभावी व्यक्तींच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर बिल गेट्स यांनी जागतिक सुरक्षेला दहशतवाद्यांपासून असलेल्या धोक्यासंबंधी उहापोह केला. पुढे त्यांनी दहशतवाद्यांचा जैव हल्ला हा अण्विकयुध्द आणि हवामानबदलाच्या परिणामांपेक्षाही अधिक धोकादायक असेल असा इशाराही दिला होता.

ह्यावरून जैविक दहशतवाद (biological terrorism) हा किती भयावह असू शकतो ह्याचे विदारक चित्र नजरेसमोर तरळून गेले आणि त्याचे गांभीर्य , होणारे तात्कालीन व दूरगामी  दुष्परिणाम ह्याच्या संभाव्य जाणीवेने मन अधिकच कातर झाले.

जैविक शस्त्रे अनेक पातळ्यांवर हानिकारक ठरू शकतात . श्वसनातून मानवाच्या शरीरात गेल्यास ही जैविक शस्त्रे बर्‍याच प्रमाणावर हानी करतात वा मृत्युदेखिल घडवून  आणू शकतात. त्वचेच्या संपर्कात आल्याने किंवा अन्नपदार्थातून शरीरात गेल्याने या शस्त्रांचा परिणाम दिसून येतो. ह्या शस्त्रांनी मानवांना, प्राण्यांना आणि वनस्पतींना देखिल हानी होऊ  शकते.



जैविक शस्त्रे सैन्याचे तळ किंवा निर्वासित छावण्यांवरही वापरली जातात व ती वापरण्यामागे शत्रूचा उद्देश्य पिकांवर व गुराढोरांवर हल्ला करून , अन्नधान्याच्या साठ्यात कमतरता आणणे, लोकवस्त्यांवर हल्ला करणे, माणसांचे मानसिक धैर्य कमकुवत करणे व त्यांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण करणे हा असतो.

जैविक दहशतवादाच्या आपत्तीचं असं हे भीतीदायक वास्तव आपल्या समोर खडे ठाकले आहे.


सूचना : हा लेख पहिल्यांदा दिनांक ०४ -०३ -२०१७ च्या " दैनिक प्रत्यक्ष " मध्ये व्यासपीठ ह्या सदरात प्रकाशित झाला होता.   


Tuesday, 7 February 2017

सागरी प्रदूषणाचे विपरीत परिणाम रोखण्यासाठी ठोस पावले उचलायलाच हवीत !





चेन्नई : येथील कामराजर बंदरानजीक एम टी मॅपल आणि एम टी डॉन कांचीपुरम ह्या दोन जहाजांत शनिवारी  टक्कर होऊन त्यातून मोठ्या प्रमाणावर तेल गळती सुरू आहे. याचा फार मोठा फटका येथील समुद्रातील जैवविविधतेला बसला असून स्थानिक मासेमारांचा रोजगार ही बुडाला आहे. शनिवारी हा प्रकार घडला असून मंगळवारपर्यंत थिरूवनमियूर किनाऱ्यापर्यंत तेलाचा तवंग पसरला होता.


                                                                   

                                                                
इन्कॉईस, नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फर्मेशन सर्व्हिस  INCOIS (Indian National Center for Ocean Information Services), हैद्राबाद ही संस्था कोस्ट गार्डच्या सहाय्याने तेल गळतीचा आढावा घेत आहे.  तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने माहिती दिली की अंदाजे ७२ टन तेल सध्या एकत्रित केले आहे आणि तेल गळती ही पलावक्कमच्या जवळील वेट्टुवन्कणीच्या पुढे पर्य़ंत पसरली आहे. एन्नोरमधील २५०० मीटर्सचा परिसर हा बॅक्टेरियल औषधाच्या सहाय्याने तेलापासून प्रतिबंधित करण्यात आला आहे.

                                                                             
                                                                          
ह्या तेल गळतीच्या बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले.

ह्या आधी मुरगाव बंदरातील वेस्टर्न इंडिया शिपयार्डमध्ये सहारा इंडियाच्या ‘एमव्ही क्वींग’ या जहाजातून जुलै २०१६ मध्ये अशीच मोठ्या प्रमाणात तेल गळती झाली होती.  भारतीय तटरक्षक दलाचे ‘समुद्र प्रहरी’ या जहाजाने या तेल गळतीमुळे पसरत असलेला तेलाचा तवंग इतरत्र समुद्रात पसरू नये म्हणून वेस्टर्न इंडियाच्या धक्क्यापासून काही अंतरावर सभोवताली संरक्षक ‘बूम फोम’ सोडून तेल गळती न पसरण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते.

सिंगापूरहून जेद्दाहला जात असलेल्या ‘एमव्ही मोल कम्फोर्ट’ या जहाजाला  भारतीय सागरी हद्दीत येमेन येथे रात्री आग लागण्याची  दुर्घटना घडली होती. येमेन येथून २०० समुद्री मैल आणि मुंबईच्या पश्चिम समुद्र किना-यापासून ८४० समुद्री मैल अंतरावर १७ जून २०१३ रोजी भर समुद्रात या जहाजाचे दोन तुकडे झाले होते. या जहाजावर साडेचार हजार कंटेनर होते. यातील काही कंटेनरला रात्री भीषण आग लागली.आगीचे वाढते लोण आणि पसरलेल्या काळ्या धुरामुळे आग विझवताना व्यत्यय येत होता आणि त्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले नव्हते. त्या वेळी काही कंटेनर पाण्यात बुडून त्यामधील तेल समुद्रात पसरले होते ,ज्यामुळे बर्‍याच मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. पर्यावरणाची झालेली हानी भरुन काढण्यासाठीही बर्‍याच महिन्यांचा काळ लागला असे तटरक्षक दलाच्या अधिका-यांनी सांगितले असल्याचे निदर्शास आले होते.

एम एस सी चित्रा ह्या व्यापारी जहाजाची एम व्ही खलिजा ३ ह्या जहाजाशी अरबी समुद्राच्या किनार्‍यापासून ५ नॉटिकल मैलाच्या परिसरात सकाळी ९.५० वाजता ०७ ऑगस्ट २०१० रोजी टक्कर होऊन प्रचंड मोठ्या प्रमाणावर तेल गळती झाली होती. याचा फार मोठा फटका येथील समुद्रातील जैवविविधतेला बसला होता आणि स्थानिक मासेमारांचा रोजगार बुडून फार मोठ्या आर्थिक फटका बसल्याच्या बातम्या आपण वाचल्या होत्या. १२०० कार्गो तेल वाहून नेणार्‍या चित्रा जहाजाचे सुमारे ३००-४०० कार्गो तेल समुद्रात सांडल्याने अरबी समुद्राच्या पृष्टभागावर तेलाचा तवंग पसरला होता आणि मुंबई, मुंबई उपनगरीय, ठाणे, रायगड ह्या ४ जिल्ह्यांतल्या ११० किलोमीटर किनारपट्टीचे खूप मोठे नुकसान झाले होते.

सागरी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी भारत सरकारने समुद्राच्या उच्चत्तम भरतीरेषेपासून 500 मीटरचा भूभाग ते 12 सागरी मैलापर्यंतचा भाग सीआरझेड 2011 कायद्याच्या नियंत्रणाखाली आणलेला आहे. सीआरझेड कायद्याचा उद्देश  चांगला असला, तरी  वरील तेल गळतीच्या बातम्या पहाता मोठय़ा जहाजांमधून होणारी तेल गळती आणि जहाजांची समुद्रातच होणारी साफसफाई यासारख्या समस्यांवर आपण आजवर प्रभावी उपाय योजना राबवू शकण्यास पाहिजे त्या प्रमाणात समर्थ नसल्यामुळे आपल्याला सागरी प्रदूषण ही आपत्ती आपल्याला वारंवार भेडसावत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मोठ्या तेलवाहू व्यापारी जहाजांचे अपघात व तेल वाहतूक करणाऱया जहाजांचे टँक धुण्यासाठी होत असलेला समुद्राचा वापरामुळे, परिणामस्वरूप  सागरी प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

                                                              
तेल वाहतूक करणाऱया जहाजांच्या अपघातांमधून उद्भवणार्‍या तेल गळतीच्या समस्येचा राक्षस  दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणावर आ वासून उभा ठाकत आहे . त्यामुळे सागरी प्रदूषणाची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. गेल्या सहा-सात वर्षांत पश्चिम किनाऱयावर जहाजांना मोठे अपघात झाले आहेत.  त्याचे विपरित परिणाम सागरी पर्यावरणावर झालेले आहेत.
Aerial View of Marina Beach
तेल गळती सोबत समुद्र हा डंपिंग ग्राऊंड म्हणून वापरला जात असल्याने अजूनही वेगळ्या प्रकारच्या सागरी प्रदूषणाचा धोका जास्तच बळावत चालल्याचेही चित्र सामोरी येत आहे. 


भारताचा समुद्र इतरांसाठी डंपिंग ग्राऊंड

इतर देश भारताच्या सागरी क्षेत्राचा डंपिंग ग्राऊंडसाठी सर्रास वापर करतात. त्यांना लगाम घालणे आवश्यक आहे. परदेशी जहाजांच्या अपघाताविषयी भारतामध्ये असाही एक मतप्रवाह आहे, की भंगारात आलेल्या जुनाट जहाजांच्या विल्हेवाटीचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, तेव्हा इतर राष्ट्र भारताच्या पश्चिम किनाऱयाचा वापर जहाज बुडविण्यासाठी करतात.

सागरी पर्यावरणावर विघातक परिणाम – डॉ. बबन इंगोळे

काही वर्षांपूर्वी गोवा येथील राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. बबन इंगोळे यांनी आपले मत मांडताना तेल गळती, जहाजांचे अपघात व जहाजांची मोठय़ा प्रमाणावरील साफसफाई यामुळेच किनाऱयावर डांबरसदृश तवंगांची समस्या उद्भवते, याला ठामपणे दुजोरा दिला असल्याचे वाचनात आले होते.
आंतरराष्ट्रीय हद्दीत जरी परदेशी जहाजांचे टँक व इतर साफसफाई केली गेल्यास प्रवाहाबरोबर या सर्व तेलाच्या घटकांची समुद्रात घुसळण होऊन ते जवळच्या किनाऱयावर लागतात. सागरी पर्यावरण त्यामुळे धोक्यात आले आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जहाजांमधील तेल गळती व साफसफाईबाबत काही कडक निर्बंध लादून त्यांची ठोस अंमलबजावणी आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते. किनारा स्वच्छतेची जबाबदारी कोस्ट गार्ड व स्थानिक जिल्हा प्रशासनाची असल्याचे त्यांनी सांगितले होते.


एकूणच ही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरची परिस्थिती पाहता, केंद्र सरकारने सागरी प्रदूषणाचा मुद्दा येणाऱया काळात गांभीर्याने घेतला तरच आपला तरणोपाय लागेलअसेच चित्र आजमितीस दिसत आहे.


संदर्भ  : १.  ७ ऑगस्ट २०१० रोजी एम एस सी चित्रा व एम व्ही खलिजिअ जहाज टक्कर त्यानंतरच्या सागरी पर्यावरणशास्त्र वर मुंबई बे तेल घातक रसायनांची अपघाती सांडून जाण्याची क्रिया प्रभाव वर अंतरिम अहवाल.
                  //www.mpcb.gov.in/marathi/oilSpill/oilSpill.php 

सूचना : हा लेख पहिल्यांदा "दैनिक प्रत्यक्ष" मध्ये ०७ फेब्रुवारी २०१७ रोजी प्रकाशित झाला होता.
                                                                     

Wednesday, 6 July 2016

ऑपरेशन जल- राहत


आज पहिल्यांदा टेलिव्हीजन वरील बातमी पाहून आपला भारत देश आपत्ती निवारणासाठी उच्च तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करताना पाहून उर अभिमानाने भरून आला. तसा आपला भारत देश हा सतत दुष्काळ, पूर ह्या नैसर्गिक आपत्तींचे तडाखे सोसत असतो. परंतु तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापराच्या अभावी मदत आणि बचाव कार्य पार पडताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असे आणि परिणामी होणारी मनुष्यहानी, वित्तहानी ह्यांची आकडेवारी मनाला चटका लावून जात असे.   
     
आपल्या भारत देशात पूराच्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी व मदत आणि बचाव कार्य   प्रभावीपणे पार पाडण्याकरीता प्रथमच भूदल , नौदल , वायुदल , अशा तीन्ही सेना  आणि एनडीआरएफ़ आणि एसडीआरएफ़ ह्या संस्था सुसंघटीत झाल्या आणि "ऑपरेशन जल- राहत " आसाम येथील गुवहाटी येथील ब्रम्हपुत्रा नदीच्या किनार्‍यावर प्रथम खेपेस  यशस्वी रीत्या पार पाडण्यात आले. ह्या मागे अर्थातच आपल्या पंतप्रधान नरेंद मोदीजी ह्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. 

वास्तविक पहाता डिसेंबर २०१५ मध्ये कंबाइंड कमांडर कॉन्फरन्स मध्ये पंतप्रधान नरेंद मोदीजी ह्यांनी आपत्ती निवारणाचे मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी तीन सेनांनी सुसंघटीत होऊन  एकत्रित प्रयास करावे ह्या विषयी सूतोवाच केले होते. त्यावेळी पंतप्रधानानी भूदल, नौदल आणि वायुदल अशा तीन सेना आणि बाकी इतर एंजसींनी आपापसात सुसूत्रीकरण करून मदत आणि बचाव कार्याचे आयोजन करावे ह्यावर अधिक भर दिला होता. पूरामुळे दरवर्षी सुमारे अडीच लाख लोकांना झळ पोहचते आणि त्यामुळे अशा प्रकारचा अभ्यास आणि सराव आपत्तीग्रस्त लोकांना तात्काळ मदतीचा हात देऊ शकेल असा अंदाज वर्तविण्यात  आला होता. सेनेच्या हार्न डिव्हीजनचे मेजर जनरल राजीव सिरोही ह्यांच्या मते "ऑपरेशन जल राहत " मध्ये तीन सेनांनी एकत्रित येऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.ह्या ऑपरेशन दरम्यान चिता हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. तर त्याच बरोबरीने भारतीय वायुसेनेच्या "एम आई १७ : हेलिकॉप्टरच्या वापराने पूराच्या प्रभावाखाली असलेल्या पोहचण्यास  दुर्गम अशा  भागात जाऊन वैद्यकीय मदत देऊन सुटका करणे, बचाव करणे शक्य झाले आणि सोबत बचाव पुरवठा साहित्य पोहचविणे सुध्दा सुकर झाले. ह्या संपूर्ण बचाव कार्यात तीन सेनांबरोबर एनडीआरएफच्या तीन युनिट आणि आसाम   एसडीआरएफच्या टीमही सहभागी झाल्या आहेत. 

अशा प्रकारच्या सरावाने आपण नक्कीच निसर्गाच्या प्रकोपाला सुसंघटीतपणे ,सशक्त सबल होऊन सामोरे जाऊ शकतो ह्याची अनूभूती मिळाली आहे.  

मदत आणि बचाव कार्य कशा प्रकारे पार पाडण्यात आले हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडीओ पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=jisouq7iaiI


Saturday, 2 April 2016

घनकचरा व्यवस्थापन - काळाची नितांत गरज?

घनकचरा व्यवस्थापन - काळाची नितांत गरज? हा विषय वाचून चक्रावून गेला असाल नाही का? आपण नेहमी Business Management (व्यापाराचे व्य्वस्थापन ), Finance Management, (आर्थिक व्यवस्थापन), Disaster Management (आपत्ती व्यवस्थापन) ह्या बाबतीत बहुतांश प्रमाणात वाचतो आणि हे विषय आपल्या थोडया-फार प्रमाणात परिचयाचे असतात, परंतु आजकाल घन कचरा व्यवस्थापनाची चिंता मोठ-मोठ्या शहरांनाच नव्हे तर सर्व जगालाच भेडसावू लागली आहे. त्यामुळे ह्या घन कचर्‍याचे व्यवथापन करणे ही काळाची नितांत गरज होऊन बसली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 


नुकत्याच मुंबईच्या देवनार कचरा डेपोमध्ये एका पाठोपाठ एक लागलेल्या भीषण आगी आणि त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात उडालेला धुराचा उद्रेक, आरोग्याच्या दृष्टीने उद्भवलेला भयानक जीवघेणा परिणाम हे एक जिवंत उदाहरण ह्या घन कचरा व्यवस्थापनाची गरज दाखवून देण्यास पुरेसे आहे असे वाटते. 

देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे आरोग्यास घातक अशा मिथेन वायूच्या विळख्यात सापडल्यामुळे भोवतालच्या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले , श्वसनाच्या त्रासामुळे रूग्णालयात दाखल करावे लागले, वातावरणातही धुराचे साम्राज्यच पसरले असल्याने हवेच्या प्रदूषणाची समस्या अजूनच बिकट बनली, आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागल्याने पाण्याच्या तुटवड्यात आणखीनच भर पडली. ह्या वरून घन कचर्‍याचे व्यवस्थापन उचित प्रकारे न झाल्यास किती  भयंकर दुष्परिणामांना तोंड दयावे लागू शकते ह्याची जणू झलकच बघायला मिळाली. सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच उग्र स्वरूप धारण करीत असताना आग विझवण्यासाठी १४.४ लक्ष लिटर्स वापरावे लागलेले पाणी हे पाण्याचा अनाठायी वापरच दाखविते. म्हणतात ना ’दुष्काळात तेरावा महिना" तशीच परिस्थिती उभी ठाकते.   

आता जाणून घेऊ या घन कचरा म्हणजे नक्की काय?
      घनकचरा म्हणजे माणसाच्या रोजच्या वापरातून उरलेला निरुपयोगी पदार्थ. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून निर्माण होणारा घनकचरा व त्याची विल्हेवाट ही आपल्या देशापुढील एक मोठी समस्या आहे. पूर्वीच्या काळी घनकचरा विल्हेवाटीची फार मोठी समस्या भेडसावत नव्हती; कारण लोकसंख्या त्यामानाने फार कमी होती आणि घनकचरा टाकण्यासाठी जमीन मोठया प्रमाणात उपलब्ध होती. परंतु आता जरी लोकसंख्या भरमसाठ वाढली असल्यामुळे घनकचरा मोठया प्रमाणात तयार होत असला तरी जमीन पूर्वी होती तेवढीच आहे. त्यामुळे घनकचरा ही एक बिकट समस्या तोंड आ वासून उभी ठाकत असल्याचे चित्रच सर्वत्र दिसते. 

घनकचरा वाढण्या मागची संभाव्य कारणे - 
पूर्वीच्या काळी प्लास्टीकचा वापर हा खूपच कमी प्रमाणावर होत असे. भाजीपाला, धान्य, किराणा सामान, जीवनाश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी सामान्यत: लोक कापडी पिशव्यांचा वापर करीत असत. आजकालच्या जमान्यात कापडी पिशव्या जणू ह्द्दपार झाल्या आहे आणि त्याची जागा मनमोहक रंगीत स्वरूपात आकर्षक दिसणार्‍या वजनाने हलक्या असलेल्या प्लास्टीकने घेतली आहे. प्लास्टीक ही एक अशी गोष्ट आहे की जी एकदा फॅक्टरीत निर्माण झाली की कमीत कमी ३०० वर्षे ती टिकून राहू शकते. त्यामुळे सहसा नाश न पावणारे प्लास्टीक हे एक घनकचरा वाढविण्यास खूप मोठ्या प्रमाणावर हातभार लावत आहे. तसेच घनकचरा मोठया प्रमाणात निर्माण होण्याचे कारण म्हणजे वाढते शहरीकरण, औद्योगीकरण, प्लास्टिकच्या वस्तूंचा सढळ हस्ते होणारा वापर , उंचावलेले राहणीमान आणि त्यासाठी लागणा-या वेगवेगळया प्रकारच्या वस्तू, वाढलेल्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी शेतातील वाढलेले उत्पादन व त्यापासून निघणारा घनकचरा.  अशा प्रकारे साचत जाणार्‍या या सर्व घनकच-याचे व्यवस्थापन करणे दिवसेंदिवस फार अवघड होत चालले आहे. घनकचरा वाढल्यामुळे त्यापासून निर्माण होणारे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे हे वेगळे सांगायला नकोच. 

भारतात दरमाणशी दर दिवसाला 0.4 कि.ग्रॅ एवढा घनकचरा तयार होतो. एकट्या मुंबईत गेल्या ५० वर्षात सुमारे १२ दशलक्ष टन इतका घनकचरा साठला असून त्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावणे ही अत्यंत तातडीची बाब बनली आहे असे वाचनात आढळले. तसेच The Ministry of Environment, Forests and Climate Change ह्यांच्या माहितीच्या आधारे जवळपास १७ लाख टन ई-कचरा हा दरवर्षी साधारणत: (प्रतीवर्षी ५% वाढीच्या अंदाजाने) भारतात जमा होऊ शकतो असा अंदाज आहे. यावरुन घनकचरा प्रदूषणाची कल्पना आपण करु शकतो. 

गावामध्ये शेतातील, घरातील कचरा किंवा शहरांमध्ये कचरा उचलण्याची नगरपालिकेची सोय नसलेल्या भागांमध्ये घरातून निघालेला घनकचरा उघडयावर टाकला जातो, तो कुजतो व त्यापासून दुर्गंधी सुटते याबरोबर कीटकांची उत्पत्ती होऊन आरोग्यास हानी पोहोचते. फार पूर्वीपासून घनकचरा जाळूनच त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु त्यामुळे हवेचे प्रदूषण होते व पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात येते. माणसाचे राहणीमान जसे सुधारते तसे कचरा जास्त निर्माण होतो. कच-याचे प्रकारही वाढत जातात. हा अनेक प्रकारचा कचरा वेगवेगळया समस्या निर्माण करतो. आजार, प्रदूषण, सौंदर्यहानी आणि पर्यावरणाचे नुकसान असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच घनकचरा व्यवस्थापन करताना काही उद्दिष्टे ध्यानात ठेवणे जरूरीचे बनते. आरोग्य-संरक्षण, जीवनाची गुणवत्ता सुधारणे. पर्यावरण प्रदूषण टाळणे, परिसर स्वच्छता. भंगार-कच-यावर पुनर्प्रक्रिया होण्यासाठी चालना देणे. जैविक-कच-यातून ऊर्जा निर्माण करून इंधन वाचवणे. या सगळयातून शक्य असल्यास काही रोजगार निर्मिती करणे. समाजातील संपूर्ण स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या केरकच-यात विविध पदार्थ असतात; त्यात वर्गवारी करावी लागते. वर्गवारी केल्याशिवाय घनकचरा व्यवस्थापन चांगल होऊ शकणार नाही असे वाचनात लक्षात आले.  

घनकचरा व्यवस्थापन
सर्वप्रथम व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर म्हणजेच आपल्या स्वत:च्या राहत्या घरापासून याबद्दल जाणीव निर्माण करायला पाहिजे; कारण तिथूनच व्यवस्थापनाला खरी सुरुवात करायची आहे. हे झाले तरच सार्वजनिक पातळीवर म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्यांचे काम सुलभे रीत्या हाताळता येऊ शकते.
यापुढची पायरी म्हणजे गाव-नगर-शहर पातळीवर घन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन . कचरा वर्गीकरण करणे, वेगवेगळा केलेला कचरा जमा करून आणणे, त्याची विल्हेवाट लावणे इत्यादी सर्व घटकांचा विचार व्हायला पाहिजे. यात अनेक संस्था, गट सहभागी झाले तर हे काम यशस्वीरीत्या पार पाडता येऊ शकते. 
काही घनकचरा सार्वजनिक जागीही निर्माण होतो. दुकाने, गावोगावी भरणारे आठवडे बाजार, शाळा, मंदिरे,यात्रा,कॉलेज, हॉटेल, खाणावळी, लग्नसमारंभ इ. ठिकाणी पण पुष्कळ कचरा निर्माण होतो. या सर्व घटकांचा विचारही व्यवस्थापनात करणे जरूरीचे आहे.

न कुजणारा किंवा सुका कचरा साधारणत: जमीन किंवा रस्ता भरण्यासाठी वापरला जाऊ शकतो. तर कुजणा-या कच-याचा उपयोग करून आपण कंपोस्ट खत किंवा गांडुळखत तयार करु शकतो. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणारी अनिरूध्दाज अकादमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ही संस्था "गांडुळ खत प्रकल्प" ही योजना राबविण्याबाबत विनामूल्य मार्गदर्शन करून समाजातील घन कचरा व्यवस्थापनाच्या कार्याला मोलाचा हातभार लावताना आढळते. 
घरगुती स्वरूपाचे गांडूळ खत 
VJTI कॉलेज मधील प्रकल्प 
घनकच-याचे परिणामकारक व्यवस्थापन प्रामुख्याने तीन तत्त्वांवर अवलंबून असते असे वाचनांती आढळले - 
१. वापर कमी करणे (Reduce Method)
२. पुनर्वापर (Reuse Method )
३. चक्रीकरण (Recycle Process) पुनर्प्रक्रिया
वापर कमी करणे सध्याचा काळ वापरा व फेका ( Use and throw) अशा स्वरुपांच्या वस्तूंचा आहे. एकदाच वापरण्याच्या वस्तूंमुळे प्रचंड प्रमाणावर टाकाऊ पदार्थ तयार होतात. फेकण्याजोगे साहित्य वापरण्यापेक्षा कायमस्वरुपी वापरण्यात येणा-या वस्तूंचा वापर केल्यास टाकाऊ वस्तूंची निर्मिती कमी होईल. उदा. पाणी पिण्यासाठी धातूची भांडी ( स्टीलचा ग्लास ), चहासाठी प्लास्टिक कप वापरण्यापेक्षा चिनी मातीचे किंवा काचेचे कप वापरावेत.
पुनर्वापर करावा म्हणजे  त्याच स्वरुपातील टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरणे. टाकाऊ पदार्थ अनेक प्रकारांनी वापरता येतात. जुने प्लॅस्टिकचे व धातूचे डबे, बाटल्या,बरण्या पुन्हा वापरल्यामुळे अविघटनशील कच-याचे प्रमाण कमी होईल.
पुनर्प्रक्रिया उदा. लोखंड भंगारापासून परत लोखंडी वस्तू तयार करणे.

मुंबईमध्ये घनकचराव्यवस्थापनावर तोडगा काढण्यासाठी " टाटा कन्सलटंसी" ह्या नामांकीत कंपनीला अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची बातमी वाचनात आली. त्याच प्रकारे आधुनिक तंत्राच्या आधारे घनकचरा व्यवथापनच्या कार्याला आयआयटी, बीएआरसी, डीआरडीओ  ह्या मान्यवर संस्थाही आपले अमूल्य योगदान देऊन हातभार लावू शकतात असे वाटते. 

घनकचरा व्यवस्थापन हे संभाव्य  मानवनिर्मित आपतीच्या  व्यवस्थापनाचे एक पाउलं आहे जणू !  
नागरीकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने तसेच पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी म्हणून घनकचरा व्यवस्थापन उचित दिशेने , उचित वेळीच करणे हीच काळाची नितांत गरज आहे,ह्या भूमिकेशी प्रत्येकजण नक्कीच सहमत असेल.      

संदर्भ :
१.http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Government-has-taken-Deonar-fire-very-seriously-Prakash-Javadekar/articleshow/51659970.cms
२.http://www.aniruddhafriend-samirsinh.com/solid-waste-management-crisis-major-challenge-mega-cities/
३.http://indianexpress.com/article/cities/mumbai/deonar-dumping-ground-fire-for-them-rummaging-through-smouldering-yard-not-an-option-but-source-of-livelihood/
४.http://www.hindustantimes.com/mumbai/deonar-fire-under-control-but-toxic-smoke-refuses-to-wane/story-AvpTfIOKxu3i0EeMrmkj3I.html
५. http://www.aniruddhasadm.com/



Sunday, 31 January 2016

झिका व्हायरस - नैसर्गिक आपत्ती का मानवनिर्मीत आपत्ती?

डेंग्यु, चिकन गुनिया ह्या सारख्या जीवघेण्या आजारांच्या विळख्यातून कोठे जग बाहेर पडत नाही पडत तोच ईबोला व्हायरसने लोकांना ग्रासले होते. जवळपास एक वर्षाआधी आफ्रिकी देशांमध्ये ईबोला व्हायरसचा उद्रेक झाल्याची नोंद दाखल झाली आणि त्यात ११,३०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यु झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली. सिएरा लिओन, गिनीया ह्या देशांना ’ईबोला" चा स्रवात जास्त फटका बसला होता आणि  त्यावेळेस जवळपास २८,६०० लोक ह्या विषाणू (व्हायरस)च्या संपर्कात आले होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 

आफ्रिकेमधील "लायबेरिया" ह्या देशात ईबोलाचा एकही रूग्ण न आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेने ( World Health Organization - WHO) अधिकृत रीत्या ईबोला ह्या जगाला हादरवून सोडणार्‍या "संक्रमक आजार" पसरवणार्‍या व्हायरसपासून संपूर्णत: मुक्ती मिळाल्याची घोषणा केली होती. त्या दरम्यान रशियाने सुध्दा "ईबोला" वर वॅक्सिन मिळाल्याचा दावा केला होता. भयमुक्त जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला नाही तर आता पुन्हा झिका व्हायरस नावाच्या नव्या राक्षसरूपी विषाणूने आपले वर्चस्व वाढवायला सुरुवात केले असल्याच्या बातम्या एका मागोमाग एक येऊन धडकत आहेत.   

Saturday, 14 November 2015

मधुमेह- गोड विषाच्या आपत्तीचे व्यवस्थापन

१४ नोव्हेंबर म्हटले की आम्हा भारतीयांना बाल दिन आणि चाचा नेहरू आठवतात , पण जगात १४ नोव्हेंबर हा दिवस एका विशीष्ट कारणासाठी साजरा केला जातो. काय आहे बरे वेगळे कारण ? चला तर जाणून घेऊ या -

आज शनिवारी ऑफीसला सुट्टी असली तरी १४ नोव्हेंबर निमीत्त " Walkethon" आणि मधुमेह अर्थात डायबेटीस संबंधी जनजागरूकता वाढविण्याच्या हेतूने ऑफीसने सर्व कर्माचार्‍यांसाठी "मधुमेह - जागरूकता" परिसंवाद आणि शिबीराचे आयोजन केले होते. एक तर सुट्टीच्या दिवशी मस्तपैकी झोप काढण्याच्या मनसुब्यावर पाणी पडले होते आणि त्यातून कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबादारी असलेल्या विभागाच्या कर्मचारी वर्गाला नियोजित वेळेच्याही २ तास आधीच पोहचायचे होते, त्यामुळे त्या विभागाचे कर्मचारी तणतणतच कार्यक्रमाच्या नियोजित स्थळी पोहचले होते.  

परंतु मधुमेहाबाबत झालेल्या परिसंवादानें तर प्रत्येकाचे डोळे खाडकन उघडले होते आणि आपल्या आळसापोटी नियमित व्यायाम न करून, खाण्याच्या गोष्टींचा मोह न टाळता आल्याने अनावश्यक चरबट गोष्टी खाऊन, जंक फूडच्या वेडापायी चुकीचे खाणे खाऊन आपणच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून स्वत:च्या हातांनीच स्वत:च्या पायावर कसा धोंडा मारून घेतलाय ह्याबाबत खडसून कान उघाडणी झाली आणि आपल्या चुकांची किती मोठी भरपाई  आपल्याला स्वत:ला आणि आपल्या कुटूंबीयांना, आप्त-स्वकीयांना करावी लागेल ह्या भीषण वास्तवाशी चांगलाच परिचयही झाला. सकाळचा राग कुठेच पळाला होता आणि ऑफीसच्या कार्यक्रम नियोजनाचे महत्त्व मनापासून पटले होते. मनातल्या मनात प्रत्येक जणच परमेश्वराकडे आभार व्यक्त करीत होता.   
       
जागतिक मधुमेह दिवस - दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची सुरूवात जागतिक मधुमेह फेडरेशन (World Diabetes Foundation )  आणि  जागतिक आरोग्य संघटनेने ( World Health Organization )  संयुक्तपणे केली. मधुमेहामुळे होणार्‍या रोगाच्या तक्रारीविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने या दिवसाची सुरूवात करण्यात आली. फ्रेड्रिक बॅटिंग व चार्ल्स बेस्ट यांनी सर्वप्रथम इन्शुलिन तयार करण्याची कल्पना जगासमोर मांडली. फ्रेड्रिक बॅटिंग ह्याचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस असल्यामुळे पुढे १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा करण्याचा पायंडा पडला.


प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog