कबीराचे विणतो शेले
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम ।
भाबडया या भक्तासाठी देव करी काम । ।
एक एकतारी हातीं, भक्त गाई गीत ।
एकएक धागा जोडी जानकीचा नाथ ।
राजा घनश्याम !
दास रामनामी रंगे, राम होई दास ।
एकएक धागा गुंते रूप ये पटास । ।
राजा घनश्याम !
विणुन सर्व झाला शेला, पूर्ण होई काम ।
ठायिंठायिं शेल्यावरती दिसे रामनाम । ।
राजा घनश्याम !
हळूहळू उघडी डोळे पाहि जो कबीर ।
विणूनिया शेला गेला सखा रघुवीर । ।
कुठे म्हणे राम ?
" भाबडया ह्या भक्तासाठी देव करी काम " ही ओळ लहानपणापासूनच मनाला भुरळ पाडणारी , खरेच देवबाप्पा असा एवढा प्रेमळ आहे का? खरेच तो भक्तांच्या हाकेला एवढा लगबगीने धावत जातो का ? असे बालसुलभ प्रश्न आणि आजीचे त्यावरील बोधामृत ! ह्यांनी मनावर घट्ट कोरले गेले ते कायमचेच की देव हा भाबडया भक्तीभावाला भुलतो, आपले अंत:करण "त्या"च्या प्रेमाने भरून वाहू लागले की भले तो चक्षूंना सगुण साकार रूपात न दिसो पण मनाच्या अंत:चक्षूंना मात्र नक्कीच दिसतो.
कबीर हा संत पण असाच रामभक्तीत आकंठ बुडून गेलेला ! तो जातीने विणकर होता, शेले विणून विकायचा आणि त्यावर आपली गुजराण करायची. पण हातमागावर बसले आणि एक एक धागा विणताना कबीराचे ध्यान रामाच्या नयनमनोहारी रूपात असे काही बुडून जाई की आपसूक डोळे मिटले जात आणि साक्षात त्याचा लाडका "श्रीराम - जानकीचा नाथ - राजा घनश्याम " एक एक धागा गुंतवीत शेला गुंफून जाई.
नंतरच्या काळात भगवद्गीता वाचताना भगवान श्रीकृष्णाचे " संत माझ्या सचेतन प्रतिमा" ह्या वचनातून प्रकर्षाने जाणवले की भगवंत हा संतरूपातून अवतरतो , भक्तीची शिकवण देतो. भगवंताशी खरी नाळ जोडून देतो. श्रीसाईसच्चरित हा ग्रंथ वाचताना तर पदोपदी सदगुरु श्रीसाईनाथ आपल्या भक्तांसाठी कसे धावून जातात, भक्ताचे अपूर्ण काम कसे पूर्णत्वाला नेतात हे वाचून तर मनाचा ठाम निर्धारच झाला की भगवंत असो वा सदगुरु वा संत आपल्या भक्तांचे अपूर्ण काम स्वत: पूर्ण करवून देतात , जेव्हा भक्त त्यांच्या प्रेमात रंगून जाऊन , नामस्मरण करतो , गुणांचे संकीर्तन करतो. साईनाथ स्वत: ग्वाहीच देतात आपल्या भक्तांना
" प्रेमें घेईल जो मन्नामा । तयाच्या मी सकल कामा । पुरवीं प्रेमा वाढवीं ।।
मज जो गाई वाडेंकोडें । माझें चरित्र माझें पवाडे । तयाचिया मी मागें पुढें । चोहींकडें उभाचि ।। "
आपल्याला आपल्या भगवंताने नेमून दिलेले काम वा सदगुरुंचे कार्य जेव्हा मी माझ्या छोट्याशा का होईना ताकदीनुसार, पूर्ण प्रेमाने "त्या"चे नाव घेत, नाम गुणगुणत प्रामाणिकपणे करतो तेव्हा त्यात राहिलेली उणीव हा "तो" माझा भगवंत वा सदगुर स्वत: शिरावर जबाबदारी घेऊन पूर्णत्वाला नेतोच नेतो. वाल्याकोळ्याला सदगुरु नारदमुनींनी "राम" नाम उच्चारायला सांगितले होते पण त्याच्या पूर्वायुष्यातील परिस्थीतीनुसार त्याला काही राम नाम उच्चारताच येईना आणि तो "मरा मरा" असे उलटे नाम जपू लागला , पण त्याच्या अंतरीचा पश्चात्तापाचा शुध्द भाव आणि भगवंताने मला शुध्द करून घ्यावे ह्या आंतरिक तळमळीला जाणून रामाने ते उलटे उच्चारलेले नामही गोड मानून घेतले एवढेच नव्हे तर स्वत:चा अवतार होण्याआधीच स्वत:चे चरित्र "रामाय़ण" रूपाने लिहून घेऊन वाल्याकोळ्याला "वाल्मिकी ऋषी" नामाने अजरामरही केले.
नीतीमर्यादेची लक्ष्मण रेषा जोवर मी उल्लंघत नाही म्हणजेच भगवंताच्या "सत्य -प्रेम - आनंद" ह्या तीन मूळ परमेश्वरी तत्वांना आणि "पावित्र्य हेच प्रमाण" ह्या ब्रीदाला अनुसरून वागतो तेव्हा माझ्या कळत-नकळत , माझ्या हातून जाणते-अजाणतेपणाने घडलेल्या चुकांना "तो" माफीच देतो, आपल्या पोटाशी प्रेमाने कवटाळतो असे प्रत्यक्ष-मित्र वरील श्रीसाईसच्चरित लेखमालेतील दहाव्या भागातून वाचनात आले आणि मनाची १०८ % खात्रीच पटली की सदगुरु हा आपल्या भक्तांना कधीच टाकत नाही कारण "तो" आपल्या भकतांचा कैवारी असतो तीन्ही त्रिकाळ ! "मी तुला कधीच टाकणार नाही" ही ग्वाही , हे वचन फक्त आणि फक्त " तो" परमात्माच , "तो" सदगुरुच देऊ शकतो कारण "तो"च एकमेव माझा खराखुरा आधार असतो.
म्हणूनच "तो" कृष्ण असो की राम असो की साईनाथ असो की स्वामी-समर्थ असो , एकमेव "तो" च मला आश्वासन देऊ शकतो - " भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे " वा
सर्वधर्मान परित्यज मामेकं शरण व्रज , अहं त्वां सर्व पापेव्यो मोक्षयिस्हमी मा शुच: ।
(भगवदगीता अध्याय १८ , ओवी ६६ )
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ," हे अर्जुना , तू सर्व धर्मांचा त्याग करून , फक्त मला शरण ये, मी तुला सर्व पापांतून मुक्ती देतो , तू अजिबात काळजी करू नकोस. "
साईनाथांच्या "श्रीसाईसच्चरित " ह्या ग्रथांतील पहिल्या अध्यायांत साईबाबा गहू दळायला बसतात तेव्हा गावातील चार बायका त्यांच्या वरील प्रेमाने, कळवळ्याने साईबाबांच्या हातातील जात्याचा खुंटा स्वत: खेचून घेतात आणि दळण दळू लागतात. बाबांना स्वत;ळा वस्त्रगाळ पिठ दळून हवे होते आणि त्या बाय़का बाबांचे नाव घेत, साई-प्रेमाची गाणी म्हणत भरडा दळण करतात, तरीही बाबा त्यांच्यावर रागावत नाही, चिडत नाही कारण ही चूक अजाणतेपणी घडली असते. परंतु त्या जेव्हा स्वार्थापोटी ते दळलेले पीठ घरी नेऊ पहातात तेव्हा बाबा त्यांना रागे भरतात कारण ही चूक जाणतेपणी मोहापायी, लोभापोटी त्या करीत असतात. चूक कळत वा नकळत घडली तरी साईबाबा भक्तांना कधीच झिडकारीत नाहीत, त्यांचे अर्धवट काम स्वत: पूर्ण करवून घेतात. खरेच भगवंत असो वा सदगुरु केवळ "तो"च आपला प्रत्यक्ष मित्र असतो जो आपल्याला कधीच , कोणत्याही परिस्थितीत एकाकी सोडत नाही, सदैव मित्रत्वाच्या नात्याने सांभाळतो , आपली पाठराखण करतो, हे सत्य उमगायला आणि मनावर बिंबवाय़ला, ठसायला "प्रत्यक्ष-मित्र" मोलाचा हातभार लावतोय असेच वाटते.
संदर्भ:
१. श्रीसाईसच्चरित
२. https://youtu.be/Gm7Jqpkg_LQ
३. http://www.pratyaksha-mitra.com/shree-sai-satcharitra-adhyay1-part10-hindi/
४. भगवद्गीता
Well said!
ReplyDelete