आधुनिक भारताचे पोलादी पुरुष किंवा लोह पुरुष म्हणून ओळखल्या जाणार्या सरदार वल्लभभाई पटेल ह्या खंबीर व्यक्तिमत्त्वाच्या कणखर नेतृत्त्वाची आज ३१ ऑक्टोबर रोजी १४० वी जयंती आहे त्या निमीत्ताने -
धाडसी, कुशल, न्यायप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पोलादी पुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्त्व शब्दात मांडणे म्हणजे टिटवीने समुद्र उपसण्याचा अट्टाहास करण्यासारखेच आहे. अष्ट्पैलू असामान्य प्रतिभेचे वरदान लाभलेला हा भारतमातेचा सुपुत्र गुजरातमधील खेडा जिल्ह्यतील नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी लेवा पाटीदार ह्या समाजातील एका शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन भारतमातेची कूस खर्या अर्थाने उजविता झाला. लाडबा व झव्हेरीभाई पटेल ह्या माता-पित्यांच्या उदरी जन्मलेले हे चौथे अपत्य. वल्लभभाईंच्या वडिलांनी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला होता व या कुटुंबावर स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव होता. देशप्रेमाचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला व लहानपणी घरीच राजकीय संस्कारांचे बाळकडूही पाजले गेले होते.