Monday, 24 September 2018

कुठल्या लीलेचा काय अर्थ । साईच सुसंगत जाणता ।।

कुठल्या लीलेचा  काय अर्थ । साईच सुसंगत जाणता ।।
दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ५ ऑगस्टच्या अंकातील " कुठल्या लीलेचा  काय अर्थ । साईच सुसंगत जाणता ।। " हा जप लिहीता लिहीता श्रीसाईसच्चरितातील श्रीसाईनाथांच्या अगणित लीला नजरेसमोर तरळून गेल्या ,

                                                                       

त्यातील काहींचा विचार करताना जाणवले ते- 
एकदां नानासाहेब चांदोरकर ह्यांना साईनाथांच्या अनन्य सेवेचे फळस्वरूप साक्षात भूवैकुंठाची जणू प्राप्ती झाली आणि पंढरपुराची मामलत मिळाली, तसा नंदुरबारी हुकूमही आला. त्यामुळे नाना सहकुटूंब सहपरिवार शिरडीस जाण्यास निघाले. नानांच्या मनी शिर्डी हेच माझे प्रथम पंढरपूर , माझ्या साईनाथांचे दर्शन घ्यावे, त्यांना नमस्कार करावा व मग पंढरपूरास जावे असा होता. किती किती गोड भाव आहेना? देवा साईनाथा, हे सगळे तुझेच , तुझ्या कृपेनेच हे मला मिळाले , माझ्यासाठी माझे खरेखुरे पहिले पंढरपूर म्हणजे माझ्या साईनाथांची शिरडीच आणि त्यांचे चरण, त्यांचे दर्शनच होय! ’त्या" एकाच्याच चरणीं अननय शरणागती, नाचायचे , डोलायचे आनंदाने ते ’त्या" एकाच्याच संगतीत - हाच तर खरा भक्तिभाव चैतन्य - जो त्रिविक्रमाच्या चरणी आहे - भक्ताचे सर्वोच्च सुखधाम !सुखनिधान ! 

त्या काळी आता सारखी ना मोबाईलची सोय, ना फोनची की उचलला फोन , लावला कानाला आणि आनंदाची वा द:खाची बातमी कळविली तत्क्षणी - तेव्हा आपली खुशाली कळविण्यासाठी पत्र धाडणे वा निरोप पाठविणे प्रत्यक्ष कोणा निरोप्यासोबत हीच साधने होती. अर्थातच साईदर्शनाच्या भुकेल्या नानांनी ना पत्र पाठविले, ना निरोप वृत्त कळविले, स्वत: नानाच सरसामान आवरून लगबगीने गाडीत बसले होते. त्यामुळे तसे पाहतां नाना शिरडीत यायला निघाले हे कोणालाच ठाऊक नव्हते . पण सर्वांतर्यामी साईनाथांना कोणती गोष्ट लपणार थोडीच ! साईनाथ स्वमुखे ग्वाहीच देतात की -
"कुठेंही असा कांहींही करा । एवढें पूर्ण सदैव स्मरा । कीं तुमच्या इत्थंभूत कृतीच्या खबरा  । मज निरंतरा लागती  ।। १४३ ।। " - (अध्याय ३ ) 

नाना निमगांवाच्या शिवेंवर असताना शिरडीत चमत्कार घडला . बाबा मशिदींत म्हाळसापती, आप्पा शिंदे, काशीराम आदी भक्तांसमवेत वार्ता करीत बसलेले होते . इतुक्यांत बाबा म्हणालें "अवघे। मिळूनि करूंया भजन चौघे । उघडले पंढरीचे दरवाजे । भजन मौजेनें चालवूं ।। " 
साईनाथ पूर्ण त्रिकालज्ञाता , त्यांना ही नानांची वार्ता कळून चुकली होती, त्यामुळेच नाना शिवेच्या ओढ्यासी असतां बाबांसी भजनोल्लासता दाटली व बाबांनी स्वत: आनंदाने केले ते भजन , भक्त बसलेले त्याचा अनुवाद करीत होते आणि सारे पंढरीच्या प्रेमांत रंगून गेले होते. 
"पंढरपुरला जायाचें जायाचें  । तिथेंच मजला राह्याचें । 
तिथेंच मजला राह्याचें राह्याचें । घर तें माझ्या रायाचें ।।  

इतुक्यांत नानाही तेथे पोहचले आणि सहकुटूंब साईनाथांच्या पायी लागलें व बाबांना म्हणतात आतां आम्हांसमवेत महाराजांनी पंढरपुरांत निवांत निश्चिंत बैसावें ही विनंती . तेव्हा लोकांनीच त्यांना बाबांचीउल्हासवृत्ती, पंढरीगमनाची भजनस्थिती सांगितली तेव्हा नाना मनीं अतिशय विस्मित झालें , साईनाथांची लीला पाहून
आश्चर्यचकित झाले व सद्गदित हौउन बाबांच्या पायीं डोई ठेवून , आशीर्वचन घेऊन , उदी प्रसाद मस्तकीं वंदून, निरोप घेऊन पंढरपुरास निघालें.

 साईनाथांच्या ह्या लीलेचा अर्थ कोणालाच ठाऊक नव्हता, कोणालाही कळले देखिल नाही की असे गप्पा मारीत असतांना अचानक साईनाथ एकाएकी उठून भजन का करूं लागले व तेही पंढरपुराला जायचे, तेथेंच राह्याचे आणि आता तें माझ्या रायाचें घरच आहे -म्हणजेच साईनाथांनी नानांचीच स्थिती , त्यांची पंढरपुराला झालेली बदली ह्याचेच इत्थंभूत वर्णन केले होते - त्यांना नानांच्या इत्थंभूत खबरा निरंतरा लागतात हेच त्यांनी सप्रमाण दावून दिधले होते.

हेमाडपंत आपल्या सदगुरु साईनाथांविषयी अध्याय ७ मध्ये नाना चांदोरकरांची ही स्थिती कथिण्याआधी खूपच सुंदर रीत्या वर्णन करतात की माझी साईनाथ गुरुमाऊली एवढी प्रेमळा आहे, तिचे चित्त मेणाहूनि मऊ आहे, नवनीत -लोणी जसे असते मृदू , कोमल तसे माझ्या साईबाबांचे अंत:करण सबाह्य नवनीत आहे. ते आपल्या भक्तांवर लाभेंवीण प्रेम करतात , त्यांच्यासाठी त्यांचे स्वत:चे भक्त हेच गणगोत आहेत.
आपल्या माणसाच्या प्रगतीने, त्याच्या प्रमोशनने, बढतीने जसे आनंदीत होतात, खुश होतात तसेच साईनाथांनी नानांच्या पंढरपुराच्या बढतीमुळे ते अत्यंत आनंदीत झाल्याचे भजन स्वत: करून दावून दिधले. खरेच अगदी आपसूकपणे शब्द स्फुरण पावतात मनीं  की  -
" कुठल्या लीलेचा  काय अर्थ । साईच सुसंगत जाणता ।। "

   
आता पाहू या दुसरी कथा  एकदां नानांची मुलगी असह्य प्रसववेदनेने जर्जर झाली होती, आसन्नमरण अवस्थेत होती, नानांच्या जवळील साईनाथांची उदी संपली होती व संकटी धाव गा साईनाथा म्हणून नाना जामनेराहून साईनाथांना सर्वथा हांका मारीत होते . बाबांना भक्तांची एकात्मता , त्यामुळे तात्काळ साईनाथांना नानांची जामनेर येथील अवस्था समजली, समर्थ साईनाथ चित्ती द्रवलें व त्यांनी तत्वतां उपायही योजिला. साईनाथांच्या जीवा वाटलें की नानांना ताबडतोब उदी पाठवावी आणि बुध्दीस्फुरणदात्या साईनाथांनी लीला आरंभिली. गोसावी रामगीरबुवा ह्यांच्या मनीं आपुल्या गावीं खानदेशला जावें असा उठावा आला आणि ते साईनाथांच्या दर्शनाला मशिदींत आले. बाबांजवळ जाऊन त्यांच्या पायीं लागून बाबांची उदी-आशीर्वाद व जाण्यासाठी अनुज्ञा मागू लागले . बाबा त्यांना प्रेमाने ’बापूगीर ’ म्हणत असत. बाबांनी त्यांना खुशाल गांवी जा म्हनून प्रवानगी दिली, पण जाताना वाटेत जामनेरला उतर नानांच्या घरीं , त्यांचा समाचार घेऊन मग पुढील मार्गा लाग अशी आज्ञा केली. माधवराव देशपांड्यांना शामा अडकरांनी साईनाथा,म्ची लिहीलेली आरती कागदावर उतरवून द्यायला व सोबत उदी प्रसाद देऊन तो नानांना द्यावयाला सांगितले. पुढे बापूगीर्कडे दोनच रूपये असल्याने आपण जामनेर्ला कसे जाणार असे बाबांना सांगता बाबांनी त्यांना पुन्हा आश्वस्त केले की "तूं स्वस्थ जाईं । लागेल तुझी सर्व सोयी । " मग अर्थातच बापूगीर साईंच्या बोलावर विश्वास ठेवून निघाले , १रुपया १४ आणे ह्यांचे रेल्वेचे टिकीट घेऊन ते जळगांव स्टेशनला उतरले आणि आता पुडःए कसे जायचे म्हणून चिंतातुर होऊन गोसावी स्टेशनच्या जो बाहेर पडलें तोच एक शिपाई दूरून शोध घेत येत होता की शिर्डीचा बापूगीर कोणी आहे का? पुढे नानांनी मला तुमच्यासाठी पाठविले, चला सत्वर तांग्यात बैसून , नाना तुमाची वाट पाहत आहेत असे त्याने बापूगीरांना सांगितले. शिर्डीहून वेळेवर निरोप गेला हे पाहून गोसावीबुवांना आनंद झाला , म्हनून हा वेळीच टांगा आला आणि माझा घोर मिटला. तो शिपाई मोठा चतुर होता, दाढी, मिशा कल्लेदार, नीट इजार घातलेला - तो बापूगीरांना घेऊन कार्याच्या ओढीने उत्साहाने इतर तांग्याच्या पुढें भरधांव वेगाने निघाला. वाटेत त्याने बापूगीरांना आंबे पेढे आणिक गुळपापडीचें तुकडेंही फराळाकरिता दिले व स्वत: हिंदू गरवाल क्षत्रियपूत असल्याचे सांगून त्यांच्या मनींची शंकाही दूर केली. नानांचे घर येतां बापूगीर लघुशंकेसाठी गेले असतां मात्र हा टांगेवाला शिपाई दिसेनासा झाला आणि तो नंतर भेटलाच नाही. रामगीरबुवा नानांच्या घरी पोहचले, नानांना उदी व आरती दिली आणि नानांनी आपल्या कुटूंबाला हांक मारून उदी आपल्या लेकीला पाजायला दिली व स्वत: आरती म्हणतां , ओठांस उदीचा प्याला लागतांच आराम पडला मुलगीस व तिची तात्काळ क्लेश निर्मुक्ती होऊन ती निर्विघ्न प्रसूती पावली .

                                                                       


मग विचारपूसी अंती कळली ती साईनाथांची अतर्क्य लीला - बापूगीरने नानांना टांगेवाला वेळीच पाठविल्या बद्द्ल सांगताना नानांनी आपण टांगा पाठविला नाही , तुम्ही येणार हेच मला मुळी माहीत नव्हते असे सांगता कळली ती साईंची वत्सलता - नानांच्या चित्तीं विस्मयता दाटली की -
कुठला तांगा, कुठला शिपाई । नट नाटकी ही माऊली साई । 
संकटसमयीं धांवत येई । भावापायीं भक्तांच्या । । 


 म्हणजेच माझी साईमाऊली तांगेवाला बनून स्वत: धांवत आली होती नानांच्या मदतीसाठी -

बापूगीरने बाबांना आपली शंका ही विचारली नव्हती असेही नाही , तेव्हा कुठे बाबांनी त्यांना सांगितले की तुझ्यासाठी टांगेवाल्याची सोय केली आहे . शेवटपर्यंत त्यांना कळत देखिल नाही की साक्षात माझी गुरुमाऊली माझ्या सोबत आहे , त्यांना मनांत असेही वाटत नाही की निरोप आणणार कोण ? नानांना देणार तरी कोण? परंतु ही तर होती माझ्या साईनाथांची लीला - तिचा अंत , आदी त्या एका साईंच्या शिवाय कोणाला लागणे कदापि शक्य नाही. त्या लीलेमागील सुसंगतता साईनाथच जाणतात.
भक्ताने मात्र त्याच्या चरणीं अनन्य विश्वास ठेवावा व आनंदाने स्वत:ला त्यांच्या चरणीं समर्पित करायचे बस्स एवढेच !
माझ्या साईनाथांच्या ह्या कथा वाचताना माझ्या सदगुरु अनिरूध्द माऊलीच्या लीलाही मनीं स्मरतात आणि आठवतात त्या अभंगाच्या ओळी -
त्याचा हस्त शिरावरी । आता उरेल कैची भीती । 
तुझे रूप मी पाहणें ।  दुजे कांही न दिसणें ।   
माझा अनिरूध्द प्रेमळा ।  त्याला माझिया कळवळा  ।  
सदगुरु असाच प्रेमळा असतो की " त्या" च्या अनिरूध्द प्रेमाची गणनाच करता येत नाही, ’त्या ’ ची लीला ही अतर्क्य असते कारण ’तो’ असतो अचिंत्यदानी , आपुल्या लेकरांसाठी सदैव धांव घेणारा , स्मर्तुगामी - स्मरणासवेच प्रकटणारा - स्वयं भगवान त्रिविक्रम ! अखिल सदगुरुतत्त्वाचें प्राकट्य - माझा सदगुरु - इतुके अनंत प्रेम तयाचे - काय म्यां पामरा शब्दे वर्णावे ?


 म्हणूनच हा जप यथार्थतेने मनी पटला , भिडला की
" कुठल्या लीलेचा  काय अर्थ । साईच सुसंगत जाणता ।। " 
           

  संदर्भ-
  १. श्रीसाईसच्चरित
  २. दैनिक प्रत्यक्ष

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog