Monday, 7 March 2016

जागतिक महिला दिन- महिलांच्या प्रेरणा स्त्रोताला अभिवंदन !

८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन !

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून आणि आज २१व्या शतकातही महिलांनी "चूल आणि मूल" हे एवढेच कार्यक्षेत्र न ठेवता अनेक क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेऊन दैदिप्यमान कर्तुत्व केलेले आढळते. मग हा दिन साजरा करण्या मागची पार्श्वभूमी काय असावी अशी उत्कंठा मनी दाटली , चला तर  जाणून घेऊ या - 

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया सक्रिय व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालये तसेच काही प्रमाणावर घरांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. 
मला तरी वाटते की खर्‍या अर्थाने महिला दिन साजरा करणे म्हणजे महिलेच्या, स्त्रीच्या गुणांचा, कार्याचा आढावा घेणे.

स्त्री वा महिला ही कन्या, बहीण, प्रेयसी, पत्नी, माता, आजी अशा विवीध भूमिका यथार्थपणे सांभाळते. स्त्री आणि पुरुष ही दोन संसाररथाची चाके आहेत आणि ती समांतर असली तरच संसार रथाचा गाडा व्यवस्थित चालू राहून , सुरळीत मार्गक्रमणाही करतो. 

स्त्री ही जशी प्रेमळ, वात्सल्याची मूर्ती , सहनशील, सौदंर्य ह्याची खाण असते, तसेच कणखर बाण्याची, वेळप्रसंगी कर्तव्यकठोर, भावनांना मुरड घालून सोशिकतेचा परमोच्च बिंदू गाठून , त्यागाची परिसीमा गाठणारी, अतुलनीय शौर्यालाही सहजतेने लीलया गाठणारी असते. स्त्रीला हे सारे अमाप गुणांचे  वरदान तिच्या मातेकडून अर्थातच जगज्जननी आदिमातेकडूनच मिळाले आहे. कोणी तिला रणरागिणी चण्डिका, अशुभनाशिनी महिषासुरमर्दिनी म्हणून साद घालते, तर कोणी दुगतीपासून रोखणारी दुर्गा म्हणते तर कोणी पातिव्रत्याचा आदर्श आणि मातृवात्सल्य भावाची सगुण साकार स्वरूपिणी अनसूया माता म्हणून स्मरते तर कोणी अंबा जगदंबा, भवानी , महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी आदी नावांनी पूजते. 

आपल्या सर्व आबालवृध्दांना अतिशय आवडणारी आणि चांगल्याच परिचयाची असणारी ही आपल्या जगन्माऊलीची आरती म्हणजे तिच्या अपार प्रेमाचा, अथांग करूणेचा, क्षमेचा, अफाट गुणांचा खजिनाच जणू - ज्यात दडलेले असते एका महिलेच्या यशोगाथेचे रहस्य असते. अखिल स्त्री वर्गाला मिळालेल्या ह्या अचिंत्यदानाची महती जाणून घेण्याचा प्रयास करू या. म्हणूनच एका महिलेचा गौरव म्हणजे "त्या" आदिमातेचा गौरवच आहे नाही का?

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारी जन्ममरणांतें वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥
हे आदिमाता दुर्गा, तुझ्याविना ह्या संसारात,  भवसागरात, जगात तरून जाणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. हे अनाथांना सनाथ करणार्‍या, आपल्या मायेच्या पदराखाली आश्रय देणार्‍या अंबे , माते तू आपल्या करूणेचा विस्तार कर. आई मी तुझ्यापर्यंत पोहचू शकत नाही , परंतु तू आपल्या करूणेचा विस्तार करून मी जेथे आहे तेथवर नक्कीच पोहचू शकतेस. 
इतिहासातील रायगडाचे दरवाजे बंद झाल्यावर गडाच्या बुरुज माथ्यावर अडकलेली हिरकणी आठवते. लहानग्या तान्हुल्या बाळाला दूध पाजण्यासाठी गडावर दूध विकून रोज संध्याकाळी गडावरून उतरणारी हिरकणी, त्या दिवशी उशीर झाला आणि गडाचे दरवाजे बंद झाले. घरी माझे बाळ भुकेने व्याकुळ झाले असेल, टाहो फोडून केविलवाणे रडत असेल, ह्या मातृवात्सल्य भावाने तिळ तिळ अंत:करण तुटणारी हिरकणी मग ह्याच आदिमातेची करूणा भाकते , आणि शौर्याची परिसीमा ओलांडते. ज्या बुरुजावरून ती उतरते तेही रात्रीच्या गडद अंधारात , विना दोराच्या सहाय्याने ते एक रणझुंझार , लढवय्या पुरुषही करू धजावला नसता हे त्या थोर , महान शिवाजी राजाने जाणले आणि स्त्री मधल्या मातृत्त्वाचा गौरव करीत बुरुजाला नाव दिले "हिरकणीचा बुरुज" जो आजही गिर्यारोहकांसमोर एक मोठे आव्हान बनून उभा ठाकतो 

वारी वारी जन्ममरणांतें वारी । हारी पडलो आता संकट निवारी ।जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी 
हे आदिमाता दुर्गे, तू तर जन्म- मरणांच्या फेर्‍यातून निवारण करणारी आहेस. हे अंबे, हे जगदंबे मी संकटाशी झुंजता झुंजता हरून गेले आहे , आता तूच धाव घे आणि ह्या संकटाचा नाश कर. 
यवनी राजांच्या अंमलाखाली पूरा दख्खन (अवघा महाराष्ट्र )भरडला गेला होता. जुलमी पातशाहीच्या विरूध्द बंड पुकारण्याची ताकद कुणा कुणात नावालाही उरली नव्हती, दिवसाढवळ्या कोवळ्या , तरूण मुली पळविल्या जात होत्या, लेकीसुना, बायांची अब्रू वेशीला टांगली जात होती, अन्यायाविरूध्द तोंडातून ब्र काढणार्‍यांच्या पाठी आसुडाच्या कोरड्याने सोलल्या जात, मुंडकी छाटून रक्ताचे पाट तर किती वाहत त्याची खिजगणतीच नव्हती , जिवंतपणी  मरण परवडले अशा नरक यातना भोगत समाज अगतिक होऊन गेला होता आणि आदिमातेला कळवळून साद घालत होता - हे आदिमाता दुर्गे, तू तर जन्म- मरणांच्या फेर्‍यातून निवारण करणारी आहेस. हे अंबे, हे जगदंबे मी संकटाशी झुंजता झुंजता हरून गेले आहे , आता तूच धाव घे आणि ह्या संकटाचा नाश कर. 
हे देवी भवानी , हे रणमर्दिनी तू तर सुरवरांनाच काय तर ईश्वराला , परमात्म्यालाही वर देणारी आहेस, तूच तारक आहेस, तू संजीवनी आहेस....आई धाव घे .... 
आदिमाता सत्वरी धावली आणि जिजाऊच्या पोटी शिवबा नावाचे एकमेवाद्वितीय नररत्न जन्मले... तारक संजीवनी आदिमातेचे हे जिजाऊलाच वरदान नव्हते तर होते अवघ्या महाराष्ट्राला संजीवन,  अभेद्य तारक कवच !!

त्रिभुवनभुवनी पाहता तुजऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे कांही ॥
साही विवाद करिता पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तांलागी पावसि लवलाही॥ जय देवी…

हे आदिमाते दुर्गे , समस्त त्रिभुवनांत तुझ्यासारखे कोणी नाही, तुझे गुणगान गाताना चारही वेद थकून जातात, सहा दर्शन शास्त्रे विवाद करण्यात काल प्रवाहात वाहून जातात. हे अंबे तुझे असे स्वरूप जे वेदंना आणि शास्त्रांना सुध्दा समजले नाही , ते मात्र तुझ्या आदिमातेच्या भक्तांना मात्र भक्तीने सहज प्राप्त होते.
पंडितांना  न मार्गाने जे लाभले नाही ते आदिमातेचे , परमेश्वरीचे स्वरूप जनाबाई, मीराबाई , मुक्ताई, सोयराबाई ह्या सार्‍या संत स्त्रियांना मात्र सहज आकळले होते - " अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग" श्रीचा , श्रीविद्येचा "त्या" श्यामेचा सावळा रंग , तोच तिच्या पुत्राचा "श्रीरंगाचा" रंग हे परम सत्य प्रेमळा भक्तीने विलसणारे मातृवत्सल हृदयच , मातेचे अंत:करणच ओळखू शकले ...

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।
क्लेशांपासुनि सोडवी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा  ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा॥ जय देवी…
हे प्रसन्नवदना आदिमाता दुर्गे तू आपल्या दासांवर प्रसन्न होतेस आणि त्यांची भवपाशातून सुटका करतेस. हे अंबे, तुझ्यावाचून दुसरा कोणी माझी आस पुरवूच शकत नाही. हे आदिमाते दुर्गे तुझी आरती गाणारा नरहरि तुझ्या चरणकमळांच्या धुळीकणांमध्येच तल्लीन झाला आहे. 

झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ह्या वीरांगनेला आपल्या दत्तक घेतलेल्या लहानग्या पुत्रासह आपले झाशीचे राज्य ब्रिटीशांच्या तावडीतून सोडवायचे होते, खालसा होऊन द्यायचे नव्हते , मदतीला कोणी तयार नव्हते आणि घरभेद्यांनी किल्ला इंग्रजाच्या हवाली करण्याचे कारस्थान रचले होते , तेव्हा जीवाची पर्वा न करता आदिमातेच्या ह्याच प्रसन्नवदना रूपाला साद घालत, संसाराच्या आत्यंतिक क्लेशांपासून , भवपाशातून सुटका करायला धावा करत लक्ष्मीबाईंनी आदिमातेचे रणदुर्गा स्वरूप धारण केले होते. राणीचे ते रणागंणावरील शौर्य, ते तेज, ते धाडस पाहून ब्रिटीश सुध्दा अचंबित झाले होते. अर्थातच राणी लक्ष्मीबाईला हौतात्म्य मरण लाभले असले तरी तेजाची तेजाने केलेली आरती आणि तेजात तेजाचे विलीन होणे हेच राणी लक्ष्मीबाईंनी दाखवून दिले होते जणू काही. 

ब्रम्हवादिनी गार्गी, याज्ञवल्क्य पत्नी ब्रम्हवादिनी मैत्रेयी ह्या आदिमातेच्या ज्ञानोन्मयी स्वरूपाच्या उपासक आणि आविष्कारदर्शक होत्या. परंतु कालपरत्वे स्त्री शिक्षणापासून वंचित होऊ लागली तेव्हा स्त्री शिक्षणाचे बीज पुनश्च सावित्रीबाई फुले ह्या क्रांतीज्योतीने समाजात रूजविले आणि आजतागायत त्याच बीजाचा महान वटवृक्ष बनून सर्व स्त्रियांकरिता आधारवड बनला आहे.   
अनसूया रूपात आदिमाता स्त्रीला मातेचे अगाध प्रेम, क्षमा शिकविते , गायत्री स्वरूपातून ज्ञानदात्री बनते, तर महिषासुरमर्दिनी बनून रणागंणावर शौर्य गाजविणारी रणमर्दिनी बनविते. म्हणूनच स्त्रीने कधीच स्वत:ला कमी लेखून अबला समजून अन्याय सहन करायचा नसतो. 
आपल्या मातेचे हे अगणित गुणभांडार स्त्री साठी सदैव मार्गदर्शक आणि प्रेरणादाय़ी असते आणि म्हणूनच असामान्य कर्तुत्त्व गाजविणार्‍या आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणार्‍या महिला ह्या गृहिणी बनून पत्नी, माता , बहीण , कन्या अशा सर्वच नात्यांना लीलया सांभाळतातच आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात उत्तुंग गगनभरारी घेताना दिसतात.

संशोधनापासून ते राज्याची, देशाची धुरा सांभाळण्यापर्यंत, कुटूंबाची जबाबदारी समर्थपणे पेलतानाच समाजकार्यातही हातभार लावणारी, अंतराळात झेप घेण्यापासून गिर्यारोहणातही बाजी मारणारी अशी स्त्री विवीध पातळींवर अजोड कामगिरी करीत आहे.

म्हणूनच रविंद्रनाथ टागोर सुध्दा महिलांचा गौरव करताना उद्गारतात -
WOMAN ARE THE ORNAMENTS OF THE SOCIETY.

अशा ह्या सर्व सामर्थ्याच्या मूळ स्त्रोत असणार्‍या आदिमातेला आज अखिल महिलांकडून शतश: अभिवंदन -   
हे आदिमाते , आम्हाला सदैव तुझ्या अखंड स्मरणात ठेव,  सदैव आमच्या जीवनातील प्रत्येक पावलावर तुझी निरंतर साथ लाभो.
हे दुर्गे तू सदैव अशीच तुझ्या लेकींच्या पंखाना उचित सामर्थ्य दे, उचित तेज, उचित बल आणि प्रेमाचा अव्याहत स्त्रोत बनून तुझा वरदहस्त आमच्या शिरावर ठेव जेणेकरून आमच्या जीवनाचे पुष्प तुझ्याच चरणी समर्पित करताना आम्ही नरजन्माची इतिकर्तव्यता पार पाडू शकू, तुझ्या चरणांशी कृतज्ञ भाव आजन्म राहो , तरच खर्‍या अर्थाने जागतिक स्तरावर " महिला" ह्या सक्षम, सबल आणि सजग होतील.

जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!!

आली महाशिवरात्र - " ॐ नम: शिवाय" मंत्राचा जागर करू या...

कैलासराणा शिवचंद्रमौळी |  फणींद्र माथा मुकूटी झळाळी | 
कारुण्यसिंधु भवदु:खहारी|  तुजविण शंभो मज कोण तारी | | 
ॐ नम: शिवाय |  ॐ नम: शिवाय |  ॐ नम: शिवाय | ॐ नम: शिवाय |  ॐ नम: शिवाय …। 

महाशिवरात्री आली की आपण काय-काय करतो. उपवास करतो आणि काय-काय करतो? जमले तर शंकराच्या देवळात जातो , ॐ नम: शिवाय चा जप करतो , शंकराला बेलपत्र वाहतो , कोणी भाविक शिवलीलामृताचे पठण करतात,  बरोबर ना? पण आपण कधी जाणून घेण्याचा प्रयास करतो का की महाशिवरात्री म्हणजे काय? ही रात्र आहे मग दिवस कुठून आला. आपण पाहतो दुर्गा देवीच्या नवरात्रीला पण आपण नवरात्रीचे दिवस म्हणतो. नऊ दिवस नवरात्र असल्यामुळे, रात्रीमध्ये दिवस आहे. पण महाशिवरात्र तर एकच दिवस असते. दिवसभरात उपवासाचे पदार्थ खायचे बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी, वरीच्या तांदळाचा भात, शेंगदाण्याची आमटी, फ्रुट सलाड असे सगळे उपासाच्या भरपूर पदार्थांवर चांगला आडवा हात मारतो,म्हणजेच मस्त खादाडी करतो, त्या महादेवाची पूजा करण्यापेक्षा खरेतर जास्त आपण आपल्या पोटाचीच पूजा करतो आणि भोगाचे पदार्थ स्वत:च स्वाहा करतो, हादडतो, खातो. हा झाला गंमतीचा भाग, पण महाशिवरात्र म्हणजे काय ? रात्र का महत्त्वाची मानली जाते , हे तरी जाणून घ्यायचा प्रयास करू या....

महाशिवरात्र म्हणाजे माघ महिन्यातील शिवरात्र. ह्याचे विशेष महत्त्व म्हणाजे मार्कंडेय ऋषी शिवतत्वाबद्द्ल चिंतन करीत असताना त्यांना शिवकार्याचे ज्ञान झाले आणि त्यावेळी त्यांच्या समोर शिवाचे अर्धनारी नटेश्वर रूप प्रथमच प्रकट झाले. त्याच क्षणी त्यांनी ह्या रूपाचे प्रथम पूजन केले आणि त्या पूजनाला अगस्ती ॠषी पुरोहित होते, आणि हिच ती रात्र म्हणजे "महाशिवरात्र" , जी भक्तमानसांत "महाशिवरात्री" म्हणून स्थिर झाली आणि शिवपूजनाकरिता सर्वश्रेष्ठ म्हणून मान्यता पावली. 

Sunday, 14 February 2016

तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम...

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे ....
जीवनावर मनापासून प्रेम करणारे आणि त्याच बरोबरीने आपल्या सहजसोप्या कवितांतून महाराष्ट्रातील मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवणारे, जगण्याची प्रेरणा , नवचैतन्य देणारे महाराष्ट्रभूषण, पद्मभूषण मंगेश पाडगांवकरांचे हे अजरामर शब्द ....

तसे पाहता नरजन्म हा अत्यंत दुर्मिळ , चौर्‍याऐंशी लक्ष योनींचा फेरा फिरल्यानंतरच प्राप्त होणारा हा मानवी जन्म ! त्यामुळेच ह्या जन्मावर , ह्या जगण्यावर प्रेम कितीही केले तरी कमीच ..म्हणूनच मानवाला पाडगांवकर देखिल आवर्जून सांगतात की या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे ....

सत्य, प्रेम आणि आनंद ह्याच त्रिसूत्रीचा आविष्कार असलेला "तो" परमात्मा वा परमेश्वर म्हणजे तर प्रेम , प्रेम आणि प्रेमच.. सतत अव्याहतपणे , निरंतर , अखंडीत, अबाधित असे ज्याचे प्रेम असते तो एकमेवाद्वितीय "अनन्यप्रेम्स्वरूप" मग कुणी त्याला राम म्हणेल, कुणी शाम म्हणेल, कुणी कृष्ण कन्हैया म्हणेल, कुणी त्याला सदगुरु रूपात साईनाथ तर कुणी स्वामी समर्थ आजोबा रूपात अनुभवेल...

सर्वसामान्यपणे आपल्या मानवी जीवनात आपल्या संसारात आपली पत्नी, पती, मुले-बाळे , आई-वडील हे आपल्या प्रेमाची जागा घेणारे हक्काचे आपले आप्त असतात. पण तरीही कुठेतरी , कधीतरी त्या प्रेमालाही मर्यादा पडतातच ना? परंतु आपल्यावर "अनिरुध्द" अशा प्रेमाचा वर्षाव करणारा "तो" एकमात्र आणि एकमेवच असतो , कारण "त्या" एकाचेच प्रेम हे लाभेवीण असते. 

मानवी पातळीवर कधी आपल्या प्रेमाची परिमाणे ही पैशात , महागड्या चैनी वस्तूंमध्ये , आकर्षक भेटवस्तूंमध्ये, मौल्यवान हिरे-माणके, सोन्यांच्या दागिंन्यात असू शकतात. परंतु कधीही साथ न सोडणारा आपला एकमेव जिवाभावाचा साथीदार केवळ "तो" भगवंत वा सदगुरुच अस्तो , हे मात्र १०८%  त्रिकालाबाधित सत्य आहे, जे कुणीच नाकारू शकत नाही. 

"राजा रंक भेद नहीं पाई " म्हणजेच सर्वासाठी मुक्त हस्ताने , मुक्त कंथाने प्रेम उधळणारा .... मग "त्या" परमात्म्याला, "त्या" भगवंताला मी त्याच्यावर प्रेम करतो किती ह्याची गणतीच नसते, भले मी "त्या" भगवंतावर, परमात्म्यावर थोडे फार काम्य भक्तीने (माझे काम होण्या पुरते) का होईना प्रेम करो वा रात्रंदिवस "त्या"चे नाम उराशी कवटाळून त्याला आळवू, खरेच "त्या"ला मात्र त्या कशाने यत्किंचीतही फरक पडत नाही. ही गोष्ट सामान्य माणसाला विश्वास ठेवायलाही अवघडच आहे ना? कसे काय बाबा , हे तर मुळीच शक्य नाही , आपण काय़म प्रेमात सुध्दा मोजमाप लावत बसतो, जणू प्रेमाच्या तराजूत तोलत असतो , ह्याचे प्रेम जास्त की त्याचे प्रेम जास्त... पण अनंत हस्तांनी प्रेमाची उधळण सदोदीत करणार्‍या "त्या" अनन्यप्रेमस्वरूपाला मुळी आपल्या कडून कशाची म्हणजे कशाचीच अपेक्षा नसते. फक्त प्रेमाने तुम्ही काही द्या , मग ते भले पान असो, फुल असो, फळ असो की फक्त पाणी असो , "तो" भुलतो फक्त प्रेमाला, प्रेम भावाला ...

गीतेच्या नवव्या अध्यायातील २६ व्या श्लोकात साक्षात भगवान श्रीकृष्ण ह्याची ग्वाही देतात की -
पत्रं पुष्पं फलं तोयं मे भक्त्या प्रयच्छति  तदम भक्त्युहृतमश्रामि प्रयत्मामन: 
ह्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भगवंत कृष्णाच्या जीवनात कंसाच्या आज्ञेनुसार पुतना राक्षसी ही लहानग्या बालकृष्णाला जीवानिशी मारण्यासाठी विषाचे स्तनपान करविते. म्हणजे कृष्णाच्या प्राणांवर बेतले असते ते विष, परंतु अशा स्वत:च्या जीववार उठलेल्या पुतना राक्षसीचा सुध्दा कृष्णाने अव्हेर न करता तिला माता म्हणूनच आदराने गौरविले होते. 

महाभारत युध्दानंतर आपल्या १०० पुत्रांचा वध हा श्रीकृष्णाच्या कारस्थानानेच पांडवांना करता आला हे पूर्णपणे जाणणारी आणि जीवनभर कृष्णाची पूजा करणारी गांधारी मातृप्रेमाने विवश होऊन सूडाच्या भावनेने , अविवेकाने कृष्णाला त्याच्या यादव कुळाचा समूळ नाश होईल असा शाप उच्चारते तरीही भगवान कृष्ण तिच्यावर जराही न रागावता त्या शापाचाही स्विकार तर करतातच पण पुढील जन्मात तिच्या वंशाला वाचवण्याचे अभयवचनही देतात. 
म्हणजेच काय तुम्ही "त्या" प्रेमळा भगवंताला प्रेमाने काही द्या वा काही पण देऊ नका , "त्या"च्या अनाकलनीय प्रेमापुढे कशानेच फरक पडत नाही , हेच खरे, प्रेमाने, भक्तीने तुम्ही राजा आहात की रंक (भिकारी) आहात , "तो" मात्र फक्त प्रेमच करतो आणि प्रेमच लुटवित राहतो अव्याहतपणे...

म्हणूनच संत तुलसीदासजी "सुंदरकांड" ह्या अपौरूषेय ग्रंथात साक्षात महाप्रभु हनुमंताच्या मुखातून भक्तीस्वरूपा जानकी मातेला श्रीरामांच्या अगाध प्रेमाची खूण पटविताना म्हणतात " तुम ते प्रेमु रामू के दुना" माते तुझे जे श्रीरामांवर प्रेम आहे त्याच्या दुप्पट प्रेम श्रीराम तुझ्यावर करतात. तुलसीदासजी सांगतात सीतामाईच्या सारखेच प्रभु श्रीराम आपल्यावरही आपण करू त्याच्या दुप्प्ट प्रेम करतात. 

ह्याच श्रीरामांनी लंकेला पोहचण्यासाठी सेतू बांधण्याचे काम चालू असताना आपल्या परीने स्वत:चे अंग वाळूत लोळवून वानरांनी फेकलेल्या मोठाल्या दगडांमधील भेगा बुजवायचे काम करीत राहणार्‍या इवलुशा खारूताईच्या श्रमांची नोंद घेऊन तिच्या पाठीवरून प्रेमाने आपला हात फिरविला होता , ज्याची खूण म्हणून ती श्रीरामांची बोटे आजही समस्त खारींच्या पाठीवर आपण पाहतो. 


ह्या प्रभु श्रीरामांना तर अगदी राज्याभिषेक होण्याच्या ऐन वेळीस स्वत:च्या अटींची मागणी करून , वचनांमध्ये दशरथ राजाला अडवून १४ वर्षांचा वनवास घडविला होता ती कैकयी कोण बरे विसरेल ? सामान्य माणूस अशा एखाद्या स्वत:च्या जीवनातील बहूमूल्य काळ उध्वस्त करण्याला कोणाला कधीतरी माफ करू शकेल का? साधी कल्पना देखिल सहन होत नाही ना? पण श्रीरामांनी स्वत: तर कैकयीला उदार अंत:करणाने माफ केलेच , पण तिच्या स्वत:च्या पुत्राने भरताने तिला झिडकारले, धिक्कारले असून देखिल भरताला परत माता म्हणून तिचा स्विकार करण्यास भाग पाडले होते. 

आपण कथा-पुराणांमध्ये वाचतो की भगवान विष्णूने तर स्वत:च्या छातीवर भृगू ऋषींनी रागाने मारलेली लाथ सुध्दा "वत्सलांछन " म्हणून प्रेमाने मिरवली होती. 

विष्णू असो की प्रभु श्रीराम असो वा भगवान श्रीकृष्ण असो ह्यांच्या जीवनातून आपण अनुभवतो की हा अपार वात्सल्य, प्रेमाने ओतप्रोत भरलेला परमेश्वर , भगवंत एकमेव आहे जो आमच्यावर फक्त लाभेवीण प्रेम करतो, "अनन्य" ज्याला दुसरी कशाचीच उपमा देता येऊच शकत नाही असे अनन्य प्रेम करतो. "त्या" च्या त्या अनन्य प्रेमापोटी "तो" कधी कबीराचे शेले विणतो कौत्स्ल्येचा राम बनून, तर कधी "झाला महार पंढरीनाथ " बनून दामाजीला वाचवायला महाराचे रूप धरतो तर कधी जनाबाईला गोवर्‍या वेचायला, धुणी धुवायला, जाते दळून पिठ काढायला , हातभार लावायला धाव घेतो....  

संत तुलसीदासजी आपल्याला एक सोपा उपाय दावतात "प्रेम गली अति सांकरी तेमा दुजा न समाय, तू है तो मै नाही "  म्हणजेच हृदयरूपी प्रेमाच्या गल्लीत एकतर "तो" भगवंत राहतो किंवा मी म्हणजेच माझा अंहकार. आपण "त्या" परमेश्वराला आपल्या हृदयात निवास करायला सांगू म्हणजे "त्या"चे प्रेम आपल्याला आपसूक मिळेलच. 

आपण साधी माणसे आपल्या आप्तांवर प्रेम करूयाच पण "त्या" अनन्यप्रेमस्वरूप भगवंताला, परमेश्वरालाच साद घालू या की हे माझ्या बाप्पा तुझ्या अनन्य प्रेमाचा आम्हाला तू अंश तरी दे , केवळ तुझ्यावर प्रेम करण्यासाठी, तुझ्या चरणांवर तुझ्याच कृपेने निरंतर प्रेम करीत राहण्यासाठी, तुझ्या चरणांवरचे आमचे प्रेम असेच नित्य वाढत राहो... "त्या"च्या प्रेमाने मग आपण खरोखरीचे ह्या जन्मावर , जगण्यावर प्रेम करायला नक्कीच शिकू या... गरज आहे ती फक्त "त्या" अनन्यप्रेमस्वरूपाशी आपली नाळ जोडून घट्ट करायची ...

अवचित स्मरल्या त्या  माझ्या मनाला खूपच भावलेल्या काही पंक्ती - 
न्हाऊ तुझिया प्रेमे अनिरूध्द प्रेमसागरा  थेंब एक हा पुरा अवघे नहाण्या  
किती यथार्थ बोल आहेत ना, प्रेमाचा सागर असणार्‍या परमेश्वराच्या अनिरुध्द प्रेमाचा एक थेंब सुध्दा मला अवघे न्हाऊ -माखू घालायला अगदी पुरेसा असतो.  "तो" प्रेमाचा सागर आहेच आणि "त्या "च्या अनंत प्रेमाचा एक थेंब सुद्धा माझी तृषा भागवायला पुरेसा आहेच… मला तहान लागायला तर हवी ना "त्या "चे प्रेम प्यायला    
हेच सांगत असावे ह्या गीताचे बोल - तू प्यार का सागर है, तेरी एक बूंद के प्यासे हम...      

संदर्भ: 
१. संत तुलसीदास- "सुंदरकांड" 

          

Wednesday, 10 February 2016

माघी गणेशोत्सव - श्रीगणेश जंयती - ब्रम्हणस्पती व अष्टविनायक पूजनाची पर्वणी !

गणेशोत्सव म्हटले की पटकन आठवतो तो भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव. ह्या भाद्रपद गणेशोत्सवाबरोबर आपल्या भारतवर्षात माघी गणेशोत्सव सुध्दा साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव साजरा करण्यामागची भूमिका बहुधा आम्हाला माहितच असते की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या महान रणझुंझार,लढवय्या, खंबीर नेतृत्वाने सन १९८३ मध्ये घराघरात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची मुहुर्तमेढ रोवून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जनजागृती करून भारतीय देशवासियांना सुसंघटीत करण्याचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर आजपावेतो हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. 

आता माघी गणेशोत्सवामागची संकल्पना बघू या- 
"मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्वर्यवेद्:" ह्या ग्रंथात वाचनात आले की आपल्या भारतवर्षात प्राचीन काळी जेव्हा गुरुकुलांची परंपरा होती तेव्हा अत्री ऋषिंनी यज्ञसंस्था आखीवरेखीव व नियमबध्द केली होती आणि ते अगस्त्य , वसिष्ठ, मृकंड ऋषिंच्या सहाय्याने शुभ विद्यांची गुरुकुले स्थापन करीत होते आणि अत्रि ऋषिंची पत्नी माता अनसूया ऋषिंना, ऋषिपत्नींना तसेच राजांना व राजपत्नींना धर्मपालन व भक्ती ह्यांचे महत्त्व आणि त्यांचे नियम समजावून सांगण्याचे कार्य करीत होती. ही कार्ये करीत असताना अत्रि ऋषि व माता अनसूयेच्या लक्षात आले की कर्मस्वातंत्र्याचा वापर करून मानव द्रव्यशक्तीचा अनुचित वापरच जास्त करीत आहे व त्यामुळे ह्या विश्वाचा घनप्राण मनुष्य़ास सहाय्यभूत होण्याऐवजी त्याच्यावर क्रोधित होऊन मनुष्याच्या कार्यशक्तीस अटकाव करू लागला आहे. 

घन म्हणजे स्थूल थोडक्यात सोप्या भाषेत बघायचे तर घन म्हणजे ज्याला अस्तित्त्व आहे अशा दिसू शकणाऱ्या  गोष्टी. 
घनप्राण म्हणजे द्रव्यशक्तीच्या वापरातून त्रिविध मनुष्यदेहात (भौतिक, प्राणमय आणि मनोमय) व निसर्गात उत्पन्न होणारी स्थूल स्तरावरील कार्यशक्ती. 

तेव्हा त्यावर उपाय योजण्यासाठी अत्रि ऋषि व माता अनसूयेने ह्या विश्वातील मूळ द्रव्यशक्ती (पदार्थशक्ती) असणाऱ्या पार्वतीमातेस बोलावून घेतले व सांगितले की ह्या सामान्य मानवांची बुध्दी त्यांच्या मनापुढे अबला ठरत आहे. अशाने मानवास त्याचा अभ्युदय करून घेणे व परमात्मप्राप्ती करून घेणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे आता तू तुझ्यापासूनच उत्पन्न होणाऱ्या  ह्या घनप्राणास पुत्ररूपाने धारण कर.

अशा प्रकारे माता अनसूयेच्या आज्ञेनुसार पार्वती मातेने कैलासावर जाऊन विश्वाच्या घनप्राणास आपला पुत्र म्हणून साकार केला तो दिवस म्हणजे माघ शुध्द चतुर्थी. पार्वती मातेने आपल्या पुत्राचे ’ब्रम्हणस्पती’ तर परमशिवाने ’गणपति’ व कार्तिकेयाने ’ हेरंब’ असे नामकरण केले असले तरी सर्व शिवगण मात्र त्यास ’गणेश’ ह्या कौतुकाच्या नावाने संबोधू लागले. म्हणून हा माघ शुध्द चतुर्थीचा दिवस "श्री गणेश जयंती" म्हणून ओळखला जातो आणि माघ महिन्यात येत असल्याने "माघी गणेशोत्सव " म्हणून साजरा केला जातो. तसेच काही ठिकाणी माघी महिन्यातील श्री गणेश जयंतीला " तिळकुंद  चतुर्थी " ह्या नावाने सुध्दा ओळखले  जाते,

सर्वसामान्यपणे लग्न झालेल्या विवाहित स्त्रीला माहेरी नेऊन नेहमी तिचे व तिच्या अपत्यांचे लाड केले जातात म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत भगवान शिवशंकराच्या पत्नीला पार्वतीमातेला माहेरवाशीण म्हणून अत्यंत प्रेमाने भाद्रपद महिन्यात घरी आणले जाते आणि तिचे व तिच्या पुत्राचे गणपतीचे नातू म्हणून स्वागत केले जाते तो दिवस म्हणजे भाद्रपद शुध्द चतुर्थी - भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव !

ब्रम्हणस्पती - ऋगवेदातील गणपती स्वरूप 

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog