Showing posts with label तिसरे महायुध्द. Show all posts
Showing posts with label तिसरे महायुध्द. Show all posts

Tuesday, 6 November 2018

मायक्रोचिप्स तंत्रज्ञान अणि मानव !!!





स्वीडनमध्ये चार हजारांहून अधिक नागरिकांच्या शरीरात ‘मायक्रोचिप्स’ - या शीर्षकाखाली एक बातमी दैनिक प्रत्यक्षच्या २४ ऑक्टोबरच्या अंकात वाचनात आली आणि खूप मोठा धक्काच बसला.  आतापर्यंत ’मायक्रोचिप्स" ह्या घरगुती पाळीव प्राण्यांच्या ओळखीसाठी वापरात येत असल्याचे माहितीत होते. मायक्रोचिपींग ही एक सोपी , सुरक्षित आणि जलद पध्दती असून हरवलेल्या वा गमावलेल्या आपल्या पाळीव प्राण्यांच्या विशेषत: कुत्र्यांच्या पुन: भेटीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे ऐकिवात होते.  आता तर स्वीडनमध्ये तब्बल चार हजारांहून अधिक नागरिकांच्या शरीरात त्यांनी आपणहून ’मायक्रोचिप्स’ बसवून घेतल्या आहेत . 



स्वीडनमध्ये सध्या रेल्वेसेवा, रेस्टॉरंट, लिंक्ड्सारख्या खाजगी कंपन्या यासारख्या ठिकाणी ह्या मायक्रोचिप्सचा वापर होत आहे, ज्या ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ (आरएफआयडी) नावाने ओळखण्यात येणार्‍या तंत्रज्ञानावर आधारलेल्या आहेत. तांदळाच्या दाण्याइतका आकार असलेली ही मायक्रोचिप  सुमारे  $180 (£140)  एवढ्या किमतीत इच्छुक माणसाच्या हातात बसविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

ह्या मायक्रोचिप्सचा वापर रेल्वेस्टेशन्सपासून ते नोकरीच्या ठिकाणापर्यंत सर्व जागी, तसेच इमारतींमधील प्रवेशासाठी , संगीत जलसा (कार्यक्रम) वा मैफिलींमधील प्रवेशासाठी होऊ लागला आहे.  ह्या लघु तंत्रज्ञानाने पैसा (रोकड रक्कम) वा तिकीटे जवळ बाळगण्याची गरज संपते   एवढेच नव्हे तर सोशल मिडीयावर ह्याद्वारे सहभागी होता येते असे निदर्शनास आले आहे. मायक्रोचिप्सचा वाढती लोकप्रियता लक्षात घेता स्वीडनमधील काही कंपन्यांनी तर आपल्या कर्मचार्‍यांना   ही ’मायक्रोचिप्स इंप्लांट ’ करण्याची सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याचेही वृत्त वाचनात आले आहे. 



मायक्रोचिप्स वापरण्याची सुरुवात सुमारे जून २०१७ मध्ये झाली असावी जेव्हा एस जे रेल ह्या स्वीडीश ट्रेन ऑपरेटरने सुमारे १०० लोक ट्रेनच्या प्रवासासाठी मायक्रोचिप्स वापरत असल्याचे घोषित केले होते. प्रवासी त्यांच्या हातातील इंप्लाट केलेल्या मायक्रोचिप्स च्या आधारे त्यांचे तिकीट डिव्हाईसवर थेट प्रत्यक्ष लोड करू शकत होते आणि ट्रेन कंडक्टर  स्मार्टफोन वापरून ह्या चिप वाचून खात्री करू शकत असे की प्रवाशांनी त्यांच्या  प्रवासाचे पैसे भरले आहेत की नाही .  खूपच व्यापक आणि मुख्य प्रवाही तंत्रज्ञानाच्या वापरापैकी हा एक वापर होता जो भरपूर अग्रेसर  विचारवंत कंपन्यांनी स्विकारला. लिंक्ड्सारख्या व्यावसायिक सोशल मिडीया वापरणार्‍या कंपनीने देखिल मायक्रोचिपींग तंत्रज्ञानाचा स्विकार केला आहे.   स्वीडनमधून समोर आलेल्या माहितीमुळे हे दावे खरे ठरल्याचे दिसत आहे. स्वीडनमधील ‘बायोहॅक्स इंटरनॅशनल’ ही जॉवान ऑस्ट्र्लुंड ह्यांनी ५ वर्षांपूर्वी सुरु केलेली ह्या नवीन उद्योगातील बाजारातील अग्रणी कंपनी आहे. या कंपनीकडून नागरिकाची संपूर्ण माहिती असणार्‍या मायक्रोचिप्स तयार करून त्या शरीरात रोपण केल्या जात आहेत.

मायक्रोचिप्स या संकल्पनेचे समर्थक ‘मायक्रोचिपिंग’ म्हणजे माणसाला स्वातंत्र्य बहाल करणारी व्यवस्था सल्याचा दावा करीत आहे कारण या मायक्रोचिपमुळे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा कुठल्याही स्वरुपाचे ओळखपत्र जवळ बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही.  परंतु प्रत्यक्षात ‘कॉन्स्पिरसी थिएरिस्ट’ मायक्रोचिपींग ही जागतिकीकरणवाद्यांची जगभरातील जनतेला गुलाम करण्याची योजना असल्याचा आरोप करीत आले आहेत. 

मायक्रोचिपींग ह्या सदर तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या नागरिकाची वैयक्तिक माहिती त्याच्या परवानगीशिवाय सहजपणे मिळविता येऊ शकते. त्यामुळे हे तंत्रज्ञान नागरिकांना व्यवस्थेचे गुलाम बनविणारी आहे. तसेच आपल्याला नको असलेल्या विरोधकांचा काटा काढणे यामुळे व्यवस्थेला सहज शक्य होऊ शकते, अशी चिंताही ‘कॉन्स्पिरसी थिएरिस्ट’कडून व्यक्त केली जात आहे ज्यात तथ्य असावे असे वाटते.

. ‘सीबीएस ऑस्ट्रेलिया’ या वृत्तवाहिनीने ऑस्ट्रेलिया सरकारने २०१० सालीच आपल्या देशातील सर्व नागरिकांमध्ये ‘मायक्रोचिप’ बसविण्याची योजना आखली होती ही माहिती उघड केली होती. स्वीडनमधील ‘बायोहॅक्स इंटरनॅशनल’ ही जॉवान ऑस्ट्र्लुंड ह्यांनी ५ वर्षांपूर्वी सुरु केलेली ह्या नवीन उद्योगातील बाजारातील अग्रणी कंपनी आहे. या कंपनीकडून नागरिकाची संपूर्ण माहिती असणार्‍या मायक्रोचिप्स तयार करून त्या शरीरात रोपण केल्या जात आहेत. स्वीडनमध्ये चार हजारांहून अधिक नागरिकांच्या शरीरात ‘मायक्रोचिप्स असल्याच्या समोर आलेल्या माहितीमुळे ‘कॉन्स्पिरसी थिएरिस्ट’ प्रतिपादन करीत असलेले दावे खरे ठरण्याची चिन्हे स्प्ष्ट दिसू लागली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

स्वीडीश शहर लुंड मधील मॅक्स ४ प्रयोगशाळेतील  बेन लिबर्टन हा मायक्रोबायॉलॉजिस्ट AFP ला सांगतो की मायक्रोचिप्स रोपण करून  सध्या साठवण्यात आलेली आणि पुरविली जाणारी माहिती ही जरी लहान असली तरी ती वाढण्याची शक्यता अधिक आहे. मायक्रोचिप मध्ये जास्त माहिती एका जागी साठवून ठेवल्यास तीच माहिती आपल्याच विरोधात वापरली जाण्याचा धोका अधिक वाढतो.   जर मायक्रोचिप एके दिवशी वैद्यकीय समस्या शोधू शकते तर तशा मायक्रोचिप्समुळे माणसाच्या  रोग प्रतिकारक प्रणालीवर संक्रमण किंवा प्रतिक्रिया उद्भवू शकते . ही बाबही दुर्लक्षित करून चालणार नाही.    

स्वीडनसारख्या प्रगत युरोपिय देशामधील हजारो नागरिकांनी मायक्रोचिप स्वीकारल्याने नजिकच्या काळात ही व्यवस्था युरोपात अन्य देशांत ही लवकरच प्रस्थापित होण्याची संभाव्यता अधिक असल्याचे गडद चित्र स्पष्ट  दिसत आहे . माणूस तंत्रज्ञानावर एवढा अवलंबून राहिला तर नक्कीच त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहणार नाही ह्यात तिळमात्र शंका नाही. माणसाच्या विकासासाठी तंत्रज्ञान का तंत्रज्ञानाच्या अवाजवी उपयोगामुळे माणूसच  तंत्रज्ञानाचा गुलाम बनतो की काय ही आशंका मनाला भेडसावत राहते, त्यामुळे ती नजरेआड करून मुळीच चालणार नाही असे प्रामाणिकपणे वाटते.    

संदर्भ: १.  दैनिक प्रत्यक्ष
 

 टीप - " मायक्रोचिप्स तंत्रज्ञान अणि मानव  !!! "  ह्या संदर्भातील लेख दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ३ नोव्हेम्बर २०१८ च्या अंकात "व्यासपीठ" ह्या सदरात पान क्रमांक ८ वर प्रथम छापून आला होता

Saturday, 23 June 2018

कृत्रिम बुध्दीमत्ता ( आर्टिफिशियल इंटिलिजन्स - Artificial Intelligence )- मानवतेसाठी शाप की वरदान ???

                                                                  
जगन्नियंत्या परमेश्वराने वसुंधरा पृथ्वीवर नानाविध प्रकारचे जीव जंतु, प्राणी , पक्षी निर्माण केले आणि मानवाची निर्मिती करून तो अत्यंत आनंदीत झाला आणि आता नवीन काही नको ह्या अर्थाने ’त्या’ मानव हा शब्द उच्चारला आणि ’त्या’च्याच सर्वात सुंदर निर्मितीला वा आकृतीला म्हणा ’त्या’ ने मानव असे नामकरण केले. इतर सर्व अन्य प्राण्यांमध्ये त्याने आतापर्यंत कधी न बहाल केलेले अत्यंत दोन सुंदर वरदान त्याने मानवाला बहाल केले ते म्हणजे बुध्दीमत्ता आणि वाणी . 

आपण  पाहतो की आजुबाजुच्या सर्व प्राणी जगतात ह्या दोन गोष्टी बहुधा आढळतच नाही . मानवाला परमेश्वाराने बुध्दीमत्ता ही दिलेली अत्यंत सुंदर , अमूल्य अशी देणगी आहे म्हणा किंवा वरदान आहे, ज्यामुळे तो सर्व प्राणीमात्रांमध्ये श्रेष्ठ आणि वरचढ ठरतो. ह्याच बुध्दीमत्तेच्या आधाराने मानवाने स्वत:चे जीवन सुख, समृध्द केले. वाणीच्या म्हणजेच आवाजाच्या माध्यमातून माणूस बोलू लागला, एकमेकांशी संवाद साधू लागला . वेगवेगळ्या भाषा वाप्रून तो आपल्या आचार विचारांचे प्रदान करू लागला.  पुढे ह्याच बुध्दीमत्ता आणि वाणी ह्या भगवंताने दिलेल्या अत्यंत श्रेष्ठ वरदानांचा वापर करून मानवाने आकाशाला गवसणी घालण्याइतकी प्रगती विज्ञान , संशोधन, तंत्रज्ञान  ह्यांच्या सहाय्याने केलेली आपण पाहतो.

मानवाने कॉम्प्युटरचा म्हणजेच संगणकाचा शोध लावला व त्याचा वापर दिवसागणिक वाढतच गेला. आज आपण पाहतो मानवाचे अवघे जीवन, त्याच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गोष्टी ह्या सार्‍या ह्याच संगणकाने संपूर्ण रीत्या काबीज केल्या आहेत म्हणजेच मानव हा कॉम्प्युटरवर जास्तीत जास्त अवलंबून राहू लागला आहे. पूर्वी आकडेमोड किंवा हिशोब करताना माणूस स्वत:च्या बुध्दीमत्तेने करायचा, कोणत्याही प्रकारच्या मशीनवर अवलंबून नव्हता. पण तेच आता कॅल्क्युलेटर , कॉम्प्युटर ह्यांच्या मदतीशिवाय हिशोब करणे सहसा जमत नाही वा अवघड होत चालले आहे. पूर्वीच्या पिढीमध्ये कोणाचाही टेलिफोन नंबर , घराचा पत्ता , कोणा व्यक्तीच्या वाढदिवसाच्या  तारखा किंवा लग्नाच्या तारखा ह्यांची एकतर छोट्या डायरीत नोंद ठेवली जायची किंवा माणसाच्या बुध्दीनुसार त्या गोष्टी पाठ करून त्या लक्षातही ठेवल्या जायच्या, पण आता मात्र हेच चित्र संपूर्णत: पालटले आहे . माणूस एवढा मोबाईल किंवा स्मार्टफोनच्यावर अवलंबून राहू लागला आहे की कधी कधी स्वत:चा मोबाईल नंबर वा घरातील/कुटूंबातील  दुसर्‍या सदस्यांच्या फोनचा नंबर सुध्दा लक्षात राहत नाही आणि  त्यासाठी आधार घ्यावा लागतो तो ह्या मोबाईल रूपी मशीनचाच !         

’गरज ही शोधाची जननी आहे ’अशी म्हण प्रचलित आहे , बुध्दीमत्ता ह्या वरदानाचा यथोचित वापर करून मानवाने निरनिराळ्या विभिन्न क्षेत्रांत अगदी नेत्रदीपक प्रगती केली आहे. संगणकाच्या आधारे माणसाने सर्वच क्षेत्रांत खूप मोठी भरारी मारली आहे. संगणकाच्या अफाट कार्यक्षमतेमुळे, त्याच्या अतुलनीय वेगामुळे माणसाचे कष्टही वाचू लागले, वेळेची बचतही होऊ लागली. त्यातूनच मानवाच्या मनाला भुरळ पडू लागली ती ह्या बुध्दीमत्तेला कृत्रिम रीत्या तयार करून तिचा वापर करण्याची ! अशा रीतीने परमेश्वराने बहाल केलेल्या ह्याच बुध्दीमत्तेला कृत्रिम रीत्या मशीनच्या सहायाने बनविण्यासाठी मानवाने अहोरात्र परिश्रम घेतले आणि त्यातून साकार झाली ती ’कृत्रिम बुध्दीमत्ता’ म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजन्स - Artificial Intelligence ( AI ) 

कृत्रिम बुध्दीमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटिलिजन्स  ही सुध्दा सोप्या भाषेत समजून घ्यायचे असेल तर कॉम्प्युटर सायन्सचीच (संगणक शास्त्राची )एक शाखा आहे ज्याद्वारे मनुष्यासारखे बुध्दीमान असलेले असे मशीनस् बनविले गेले की ज्यांना स्वत: निर्णय घेण्याची क्षमता आहे, जे माणसाप्रमाणे विचार करून , बुध्दी वापरून , माणसाच्या मदतीशिवाय निर्णय स्वत:च घेऊ शकतात.

कृत्रिम बुध्दीमत्ता हे एक असे सिम्युलेशन (अनुकरण) आहे ज्याद्वारे मानव मशीन्सना मानवी बुध्दीमत्ता प्रदान करतो की ज्यामुळे त्या मशीन्समध्ये अशी बुध्दीमत्ता विकसित केली जाते की ज्यायोगे ती मशीन्स मानवाप्रमाणे विचार करतील व कामे करतील. अर्थातच हे सारे संगणाकाच्या मदतीनेच  करता येते . ह्यात तीन प्रक्रिया सामिल असतात. पहिल्या प्रक्रियेत शिकणे म्हणजे ह्यात त्या मशीनच्या मेंदूत किंवा बुध्दीमह्ये माहिती ( Information) दिली जाते व काही नियम शिकविले जातात , जेणेकरून त्या नियमांचे पालन करून ती मशीनस त्यांना दिलेली कामे पार पाडू शकतील. दुसर्‍या प्रक्रियेत कारण-मिमांसा म्हणजे Reasoning . ह्यातून ती मशीन्स त्यांना दिल्या गेलेल्या सूचनांनुसार त्यांना दिलेल्या नियमांचे पालन करून निर्णय घेण्यामध्ये यशस्वी होतात व त्याद्वारे ते अनुमानित (सर्वसाधारण, ढोबळमानाने) किंवा निश्चित स्वरूपाचा, स्पष्ट किंवा ठाम निर्णय घेऊ शकतात आणि तिसरी प्रक्रिया असते ती स्व-सुधारणा करण्याची म्हणजेच Self-correction ची.

कृत्रिम बुध्दीमत्तेची ओळख जगाला जॉन मॅकार्थी ह्या अमेरिकेन शास्त्रज्ञाने १९५६ साली डार्ट्माऊट परिषदेत करून दिली होती ज्याचे आज विशाल महाकाय वृक्षात रूपांतर झाले आहे ज्यात आज Robotics Process Automation  पासून  Actual Robotics पर्यंत सर्वांचा समावेश करण्यात येत आहे.     

कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर -

१. कृत्रिम बुध्दीमत्ता - आरोग्य क्षेत्रात
आज  कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर  हा अनेक हॉस्पिटलमध्ये आरोग्य निगडीत कार्यात करण्यात येत आहे, ज्यामुळे रूग्णांवर लवकरात लवकर आणि अत्यंत प्रभावीरीत्या औषधोपचार करता येऊ शकतो . अशारीत्या कृत्रिम बुध्दीमत्तेचा  वापर करणार्‍यांपैकी एक नाव सुप्रसिध्द आहे  ते म्हणजे आयबीएम वॅटसन . ह्यातून असे आढळले आहे की कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून  आरोग्यविषयक क्षेत्रात एक खूप मोठी क्रांती घडवून आणता येऊ शकते .
२. कृत्रिम बुध्दीमत्ता - व्यापार क्षेत्रात
Robotics Process Automation च्या मदतीने आता मशीन्सकडून मानव Highly Repetitive Tasks खूप्च सुंदर रीत्या करवून घेऊ शकतो ज्यातून कंपनी आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे , प्रभावीरीत्या , मदत करू शकतात, अति वेगाने, शीघ्रतेने उत्तम दर्जाच्या  सेवा पुरवू शकतात
३. कृत्रिम बुध्दीमत्ता - शिक्षण क्षेत्रात 
   कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून शिक्षक मुलांचे अधिक चांगल्या प्रकारे वर्गीकरण करून, त्यांना समजून घेऊन, त्यांची बौध्दिक क्षमता समजून घेऊन त्यांना जास्त वेळ देऊन अभ्यासात मदत करू शकतात. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्याचे निराकरण करू शकतात. कोणकोणत्या विषयांत त्याची प्रगती कमी होते व ती का कमी होते हे जाणून त्यांना त्यावर मार्गदर्श करू शकतात , ज्यामुळे त्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना अधिक रूची वाटेल, त्यांना अधिक आवड निर्माण होईल व ते विषय अभ्यासण्यास अधिक सोपे जातील.
४. कृत्रिम बुध्दीमत्ता - वित्त क्षेत्रात (Finance )    
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून वित्त क्षेत्रात खूप मोठा फायदा होत आहे कारण Financial Institutions , नानाविध वित्त -संस्थांना आता जो Data Analysis करण्यामागे भरपूर वेळ व पैसा  खर्ची घालावा लागायचा तो आता खूपच कमी झाला आहे.
 ५. कृत्रिम बुध्दीमत्ता - कायदा क्षेत्रात     
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून Documents Processing सारखे कायदा क्षेत्रांतील अत्यंत कटकटीचे , वेळखाऊ काम आता खूपच सोपे , सहज झाले आहे व त्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक कार्यक्षम रीत्या पार पाडता येऊ शकते.
६. कृत्रिम बुध्दीमत्ता - उत्पादन क्षेत्रात  ( Manufacturing )   
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून उत्पादन क्षेत्रात भरभराट झालेली आढळते. पूर्वी ज्या कामासाठी अधिक मनुषयबळ लागायचे ते आता कमी मनुष्य़बलाचा वापर करूनही कमी खर्चात करता येऊ शकते. 
७.  कृत्रिम बुध्दीमत्ता - लष्करी क्षेत्रात  ( मिलिटरी - Military aaplications)
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून लष्करी क्षेत्रांत Fighter Pilots ना प्रशिक्षण देता येऊ शकते जेथे unpredictable situations युध्दात उद्भवू शकतात , जेथे मानव पोहचू शकत नाही अशा ठिकाणी ड्रोनचा वापर , शस्त्रांचा वापर करता येऊ शकतो , अर्थातच ह्यामध्ये मानवी युध्दाचे नियम पायदळी तुडविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच हा वापर विध्वंसक वा विघातक परिणाम घडवू शकतो अशी भीती संशोधक व्यक्त करीत आहेत.

कृत्रिम  बुध्दीमत्ता आणि मानवाचे भवितव्य
दिवसागणिक मानवाच्या जीवनातील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वाढता वापर आणि त्याचा प्रभाव बघता कुठे तरी अशी अनामिक भीती मनाल स्पर्शून जाते की मान हाच त्या कृत्रिम बुध्दीमत्तेच्या जाळ्यात अडकणार त नाही ना? कोणत्याही गोष्टीच्या चांगले आणि वाईट अशा दोन बाजू असतात. कृत्रिम बुध्दीमत्ता ही मानवाने स्वत:च्या प्रगतीसाठी विधायक कार्यात वापरली तर लाभदायक ठरेल ह्यात दुमतच नाही . परंतु हीच कृत्रिम बुध्दीमत्ता विघातक , संहारक कार्यासाठी पण वापरता येऊ शकते ह्याचे सदैव भान राखायलाच हवे. कृत्रिम बुध्दीमत्ता हे तसे पाहता दुधारी तलवारीसारखे शस्त्र आहे. जर मशीनसमधील त्याचा वापर हा अनाठायी झाला तर हीच मशीनस मानवावर सत्ता गाजवू शकतात ह्याचा कधीही विसर पडून चालणार नाही. 

आज मानव कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून मशीनस मुळे सुखी झाला असे जरी चित्र दिसत असले तरी कोणी सांगा उद्या हीच मशीन्स ह्याच कृत्रिम बुध्दीमत्तेच्या आधारे मानवाला गुलामही बनवू शकतात अशीच भीती काही नामवंत संशोधक, उद्योजक व्यकत करीत आहेत व तसा निर्वाणीचा इशाराही देत आहेत.

बुध्दीबळ खेळातील जगज्जेत्या गॅरी कॉस्पोरोव्हला १९९७ साली आयबीएम कंपनीच्या Deep Blue ह्या सुपरकॉम्प्युटरने हरविले होते ही बाब हेच दाखविते की यंत्रातील, संगणकातील कृत्रिम  बुध्दीमत्ता मानवाच्या बुध्दीमत्तेवर मात करून त्याला पराजित करू शकते.

जानेवारी २०१८ च्या एका बातमीनुसार अमेरीकेत झालेल्या वाचन आणि आकलनाच्या एका उच्च पातळीच्या स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) बसविलेल्या यंत्रांनी मानवांवर मात केली आहे. त्यात असे आढळले की अलीकडेच घेण्यात आलेल्या या चाचणीत दोन नैसर्गिक भाषा प्रक्रिया साधनांना मानवांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.यातील एक साधन हे मायक्रोसॉफ्ट या अमेरीकी सॉफ्टवेअर कंपनीने तयार केले असून दुसरे साधन अलीबाबा या चिनी ऑनलाईन विक्री कंपनी तयार केलेले होते.

अवघ्या काही वर्षांपूर्वी केवळ अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी विज्ञानाने आज सिद्ध करून दाखवल्या आहेत . आज आपण पाहतो की माणूस म्हणून तो जे काही करतो, ते तंत्रज्ञान करू लागले. काही वर्षांपर्यंत बुध्दीमत्तेचे म्हणजेच मेंदूचे काम तेवढे माणसाच्या हातात शिल्ल्क राहिले असे वाटत होते. आता तेही जवळपास केले जाऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजूबाजूचे वातावरण, एखाद्या घटनेच्या  त्यावेळच्या किंवा आधीच्या घडामोडी, परिस्थिती, भाव भावना , मानवी बंध  या साऱ्या गोष्टीचा परिणाम एकवेळ माणसाच्या मेंदूवर होऊ शकतो. परंतु कृत्रिम बुध्दीमत्त वापरण्याने  या यंत्रावर तसा कुठलाही परिणाम होणार नाही.

त्यामुळेच सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयावर जगभरात चिंतन सुरू आहे. सगळ्याच गोष्टी यंत्राच्या सहाय्याने होत गेल्या तर मग माणसाचा उपयोग तो काय? अशी भीती सार्‍या स्तरांवर व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कृत्रिम बुध्दीमत्ता हे मानवतेसाठी शाप आहे की वरदान आहे ह्यावर विचार करण्याची वेळ आता नक्कीच येऊन ठेपली आहे.
जगभारातील संशोधक, विचारवंत आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या लष्करी वापरावर चिंता व्यक्त करीत आहेत आणि त्यामुळे जगात प्रचंड विध्वंस माजेल असा सज्जड  इशाराही देत आहेत. 

विख्यात संगणक प्रोग्रामर्स, तत्वज्ञ , नामवंत मुत्सद्दी, आणि अग्रगण्य उद्योजकांपर्य़ंत अनेकजणांनी कृत्रिम बुध्दीमत्ता म्हणजेच  आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या वापराबाबत, त्याच्या विकासाबाबत इशारे दिले आहेत , याबाबत त्यांना  काय वाटतं? ह्याचा आपण आढावा घेतल्यास आपल्या नक्कीच लक्षात येऊ शकते -  

व्लादिमिर पुतीन-
रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेले व्लादिमिर पुतीन म्हणतात आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या क्षेत्रात अग्रेसर असलेला देशच पुढच्या काळात जगावर सत्ता गाजवू शकेल.

स्टीफन हॉकींग
सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, लेखक आणि कृष्णविवर  भौतिकशास्त्र प्रणेते स्टीफन यांना हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा इव्हेंट असल्याचे वाटते. या माध्यमातून युद्ध, रोगराई आणि गरिबीवर मात करता येईल. यामुळे आयुष्याला एक प्रचंड गती येईल. आर्थिक बाजार, मानवी संशोधन, शस्त्रास्त्रांचा विकास समजण्यापलिकडे झालेला असेल. यातील धोके कसे टाळायचे हे जर आम्ही समजून नाही घेतले तर मानवी इतिहासातील तो शेवटचा इव्हेंट असेल, असा  सावधानतेचा गंभीर इशाराही ते देतात.

एलॉन मस्क
टेस्ला मोटर्सचा सीईओ आणि नावाजलेला सुप्रसिध्द द्रष्टा  उद्योजक एलॉन मस्क म्हणतो, कृत्रिम बुध्दीमत्तेचा विध्वंसक वापर  हा अनुभवातून घेतलेला सर्वात मोठा धोका असेल. प्रगतीच्या नावाखाली आपण काही वेडेपणाचे पाऊल तर उचलत नाही ना याचाही विचार करायला हवा. अर्थात याचा वापर चांगल्या हेतूतूनच व्हायला हवा.
म्हणूनच हा धडाडीचा उद्योजक ’आर्टिफिशियल इंटेलिजन्स ’ अर्थात कृत्रिम बुध्दीमत्ता ह्याच्या धोक्यांबद्दल सातत्याने आवाज उठविणारा  ’ओपन ए आय’ हा उपक्रम जागतिक पातळीवर बहुतांश व्यासपीठावरून राबवित आहे व त्यातून एलॉन मस्क ह्यांची जगाला तिसर्‍या महायुध्दातील होऊ घातलेल्या भीषण नरसंहारापासून वाचविण्याची अटाटी दिसते असे मला प्रामाणिकपणे वाटते.
परंतु हाच एलॉन मस्क दुसरीकडे कृत्रिम बुध्दीमत्तेचा विधायक कार्यासाठी कसा वापर करता येऊ शतो हे ही दाखवित आहे.  कृत्रिम बुध्दीमत्तेचा  वापर करून ’न्यूरालिंक ’ द्वारे मानवी मेंदूला संगणकाशी जोडून मेंदूशी निगडीत गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी उत्पादन येत्या ४ वर्षांत  विकसित करण्याची मस्क ह्यांची महत्त्वाकांक्षा आहे व त्यावर ते कार्य करीत आहेत.

बिल गेट्स
मायक्रोकॉफ्टचे सहसंस्थापक ६० वर्षीय बिल गेट्स म्हणतात, ‘सर्वत्र कमी भासणाऱ्या मजुरांची ती योग्य रिप्लेसमेंट असेल. हे तंत्रज्ञान योग्यच आहे. त्याचा वापर फक्त सकारात्मक विचारातून व्हायला हवा. आगामी काही दशकांत हे तंत्रज्ञान सर्वत्र दिसेल तेव्हा चिंताही वाढलेली असेल.’

कृत्रिम बुध्दीमत्ता अर्थात  आर्टिफिशियल इंटिलिजन्स हे मानवाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी हातभार लावणारे वरदान ठरो व  त्याच्या अमर्याद लष्करी पातळीवरील वापरामुळे भीषण मानवी नरसंहारासाठी  वापरता येणारा तो शाप न ठेरो हीच त्या जगन्नियंत्या परमेश्वराच्या , आदिमातेच्या  चरणीं प्रार्थना !!!

संदर्भ - दैनिक प्रत्यक्ष

Wednesday, 16 May 2018

अमेरिका , इराण, अणुकरार आणि कॉन्डोलिझा राईस !!!

दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ३ मे २०१८च्या तिसरे महायुध्द ह्या सदराखालील एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले ! त्या बातमीचे शीर्षकही त्याचे आगळेपण स्पष्टपणे आणि प्रभावीरीत्या मांडण्यास पुरेपूर समर्थ होते. 
अमेरिकेने इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेतल्याने जगबुडी होणार नाही - कॉन्डोलिझा राईस यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प यांच्या भूमिकेचे समर्थन. 

ह्या बातमीचे शीर्षकच अमेरीका व इराणच्या अणुकराराचे जागतिक पातळीवरील महत्त्व अधोरेखित करत आहे. कोणत्याही गोष्टीतून महाभयंकर, प्रलंयकारी विध्वंस होऊन सर्वच पातळ्यांवर अतोनात नुकसान होऊन त्यातून विश्वसंहार , जागतिक संहार उद्भवू शकतो तेव्हाच बहुतांशी जगबुडीशी  त्याचे नाते जोडले जात असावे असे वाटते.. अर्थातच अमेरीकेने इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेतल्यास असाच पराकोटीचा नरसंहार, अगणित वित्तहानी आणि अपरिमीत नुकसान ह्यांना सामोरे लागेल असे स्पष्ट संकेत विवीध पातळ्यांवरून विवीध देश सातत्याने देत असल्यामुळेच हे अस्मानी सुलतानी संकट असल्याचे चित्र उभे केले जात आहे . ते कसे ह्याचा दैनिक प्रत्यक्षच्या बातम्यांद्वारे आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता आढळले -

एकीकडे दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ३० एप्रिल २०१८ च्या बातमीनुसार इस्त्रायलमधील फ्रान्सच्या राजदूत - ’हेलन ली गाल ’ यांनी इशारा दिला आहे की - अमेरिकेने  इराण बरोबरील अणुकरारातून माघार घेतली तर त्याचे भयंकर परिणाम होतील . यानंतर इराणही अणुकरार तोडून अण्वस्त्रे मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु करील . म्हणूनच अणुकरार मोडला तर युध्द पेटण्याची दाट शक्यता आहे व खामेनी अणवस्त्रनिर्मितीचे आदेश देतील असेही त्यांनी बजावले होते. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन ह्यांनी देखिल अमेरिकेने अणुकरारातून बाहेर पडण्याच्या केलेल्या तयारीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. 

इराणबरोबरील अणुकरार निर्दोष नाही, हे मान्य करूनही जर्मनीच्या चॅंसेलर मर्केल हा अणुकरार वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याच बरोबरीने युरोपातले प्रमुख देशही हा अणुकरार वाचविण्यासाठी जोरदार पप्रयत्न करीत आहेत. 

खामेनी यांचे सल्लागार अली अकबर विलायती ह्यांनी ट्रम्प यांनी अणुअकरारातून माघार घेतल्यास त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल अशी धमकी दिली होती तर खामेनी ह्यांचे सहाय्यक मानले जाणार्‍या ’रिव्होल्युशनरी गार्डस्’ चे ब्रिगेडियर जनरल हुसैन सलामी यांनी इराण पुढच्या २५ वर्षांमध्ये अमेरिकेला जमीनदोस्त करील आणि  इस्त्रायलला जगाच्या नकाशावरून पुसून टाकील अशी  धमकी दिली होती.    

दुसरीकडे इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी अणुकरारातून बाहेर पडल्यानंतर इराण दोन दिवसांत २०% संवर्धित युरेनियम मिळविल असा इशारा काही दिवसांपूर्वी दिला होता. संवर्धित युरेनियमचा साठी वाढविण्याइतके प्रगत तंत्रज्ञान इराणकडे असल्याचे सांगून राष्ट्राध्यक्ष रोहानी यांनी अण्वस्त्रनिर्मितीचे संकेत दिल्याचे चित्र दिसत आहे. 

हे एवढ्यावर थांबत नाही तर  इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी खुद्द अमेरिकेत दाखल झाले असताना देखिल त्यांनी इराणला अणुबॉम्ब नको आहे पण अमेरिकेने अणुकरारातून माघार घेतल्यास वा बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास इराणसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत . अमेरिकेच्या माघारीनंतर इराणची प्रतिक्रिया सगळ्यांसाठीच अस्वस्थ करणारी असेल व इराण पुन्हा एकदा ’न्युक्लिअर एनरिचमेंट ’ ची प्रक्रिया सुरु करेल असा   लक्ष वेधून घेणारा  सज्जड इशारा उघड उघड दिला आहे ही बाब दुर्लक्षित करून चालणारी नाही.  
अशा ह्या बहुचर्चित अणुकराराबद्दल आता थोडेसे मागे वळून जाणून घ्यायला हवे की ह्या अणुकराराला एवढे महत्त्व का प्राप्त झाले आहे ? 

अणुकरार २०१५ -
१९५०च्या सुमारास अमेरिकेच्याच पुढाकाराने इराणचा अणुकार्यक्रम सुरू झाला होता. मात्र १९७९मध्ये इराणमध्ये क्रांती होऊन शाह यांची राजवट उलथवून टाकण्यात आल्यापासून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन, रशिया आणि जर्मनी या सहा प्रमुख अण्वस्त्रधारी देशांनी इराणने अण्वस्त्रनिर्मितीत उतरू नये, यासाठी प्रयत्न केले होते. २००६पासून या देशांनी त्यासाठी इराणशी व्यापक चर्चा सुरू केली होती, ती २०१५ मध्ये सफळ संपूर्ण झाली ती ह्याच अणुकराराच्या माध्यमातून  !

त्यावेळी या अणुकराराने इराणचे घातक अण्वस्त्र निर्मितीचे इराणचे मार्ग रोखले गेले आहेत, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा (२०१५ सालीचे) यांनी म्हटले होते  तर इराणनेही या करारामुळे जागतिक सहकार्याचे नवे पर्व सुरू झाल्याचे नमूद केले होते. या कराराअभावी लागू असलेल्या र्निबधांमुळे इराणचे १०० अब्ज डॉलरचे महसूली नुकसान होत असूनही इराणने त्यास मान्यता दिली होती असे निदर्शनास आले होते.

ह्या सर्व पार्श्वभूमीचा विचार करता नुकत्याच २ मे २०१८ च्या दैनिक प्रत्यक्ष मधील शोधपत्रकार बेंजामिन फुलफोर्ड ह्यांचा दावा ह्या अणुकरारापलिकडे जाऊन इराणमध्ये काहीतरी नवीनच प्रकरण शिजत असण्याकडे अंगुलीनिर्देश तर करीत नाही ना असेच जाणवते. अणुकरारावरून इस्त्रायलसह अमेरिकेशीही टक्कर घेण्याची तयारी करीत असलेल्या इराणच्या मागे वेगळीच शक्ती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बॅंकिग क्षेत्रात कार्यरत असलेल्या रॉथचाईल्ड ह्या जगातील सर्वात धनाढ्य कुटूंबाचे पाठबळ इराणला लाभले असून ,  त्यांच्याकडून इराणला प्रचंड आर्थिक मदतही दिली जात आहे व त्यांच्या इशार्‍यानुसार जगात फार मोठ्या उलथापालथी होत असतात असा बेंजामिन फुलफोर्ड व इतर ’कॉन्स्पिरसी थिअरिस्ट’ करीत असलेला आरोप बिनबुडाचा असूच शकत नाही असे प्रामाणिकपणे वाटते. कारण त्यांचे वास्तविक स्वरूप व त्यांच्याबाबतच्या बातम्या कधीही मुख्य धारेतील माध्यमांसमोर येत नाही असाही त्या मंडळींचा दावा फोल नसल्याचेच चित्र प्रकर्षाने नजरेसमोर येत आहे. अजून तरी फुलफोर्ड ह्यांनी केलेल्या दाव्याला कुठूनही दुजोरा मिळालेला नाही तसेच अण्वस्त्रे व हा प्रचंड प्रमाणातील निधी इराणपर्यंत पोहचला आहे का ह्याबाबतही खात्रीलायक माहिती देखिल उपलब्ध झालेली नाही तरी देखिल इराण सारख्या देशाला पैसा व अण्वस्त्रे पुरवून रॉथचाईल्ड यांनी जगात विध्वंस माजविण्याचा कट आखल्याचे फुलफोर्ड ह्यांचे मत दुर्लक्षित करून चालणार नाही. 

सद्य परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प  ह्यांनी २०१५ साली अमेरिका व मित्रदेशांनी केलेला अणुकरार सर्वात वाईट करार असून १२ मेच्या आधी या करारात आवश्यक ते बदल करून इराणकडून  सदर करार संमत करून घेण्याची सूचना केली असताना पुढच्या काही दिवसांतच अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री आणि इराण बरोबरील अणुकरारात महत्त्वाची भूमिका पार पाडणार्‍या जॉन केरी यांनी युरोपमध्ये इराणच्या परराष्ट्र्मंत्री जावेद झरीफ ह्यांची घेतलेली गोपनीय भेट तसेच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन व जंर्मनीचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅंक-वॉल्टर यांच्याशी झालेल्या चर्चा काही तरी अघटीत घडणार असल्याची कल्पना देत आहेत जणू असेच वाटते.  

अशा वेळी अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राईस यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प यांच्या भूमिकेचे समर्थन केले जाते व तेही अमेरिकेने इराणबरोबरील अणुकरारातून माघार घेतल्याने जगबुडी होणार नाही अशा शब्दांत ! तेव्हा आश्चर्याने तोंडच आ वासले गेले नाही तरच नवल , नाही का बरे? 
                                                                     


हा करार इराणच्या अणुकार्यक्रमाला रोखण्यात यशस्वी ठरल्याचा दावा अमेरिकेचे सहकारी देश करीत आहेत ह्याकडे राईस यांनी लक्ष वेधले पण त्याच वेळी इराणबरोबर आर्थिक सहकार्यात गुंतल्यामुळे अमेरिकेच्या मित्रदेशांना या कराराबद्दल प्रेम वाटत आहे असा टोला ही त्यांनी लगावला. त्यांच्यासाठी अमेरिका अणुकरारात राहण्याचा निर्णय घेतला घेतला तर ते ठीक आहे. पण या अणुकरारापासून अमेरिकेला काही मिळणार नाही . तसेच या अणुकरारातून माघार घेतल्यामुळेही काही फरक पडणार नाही असे सूचक उद्गार राईस ह्यांनी एका वृत्तपत्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काढले व त्याच वेळी माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या कार्यकाळात इराणबरोबर झालेल्या करारावर ताशेरेही ओढले.  

त्यात भरीस भर म्हणजे इराणला आर्थिक सवलत देणार्‍या तसेच निर्बंध शिथिल करणार्‍या आणि अणुकार्यक्रमावरील पकड ढिली करणार्‍या या करारावर मी कधीही सही केली नसती ’ असे सांगून राईस यांनी आपली भूमिका परखडपणे मांडली.                                                                        

राजकीय मुत्सेद्देगिरीत अत्यंत प्रवीण , डावपेचात कुशल आणि धडाडीचे व खंबीर अंतर्मुख व्यक्तीमत्त्व असे कॉन्डोलिझा राईस  ह्यांचे वर्णन केले जाते - ते का ? ह्याची पुरेपूर प्रचिती ह्या त्यांच्या मतांद्वारे मिळाली . अणुकरारातील सहभागी असलेल्या बहुतांशी प्रमुख राष्ट्राध्यक्षांची मते आणि राईस ह्यांचे मत पाहताना प्रकर्षाने जाणवतात -   राईस ह्यांचा खंबीरपणा, सुस्पष्ट विचारसरणी व त्यांची  मुद्देसूद मांडणी . इतर कोणाच्या मतांनी बुजून न जाता धरलेला स्वमताग्रह व स्वत:च्या ताकदीचे व गरजांचे संपूर्ण भान !

राईस ह्यांची ही परखड भूमिका वाचताना आठवले ती "तिसरे महायुध्द" ह्या आपल्या पुस्तकात दैनिक प्रत्यक्षचे कार्यकारी संपादक डॉ अनिरूध्द धैर्यधर जोशी ह्यांनी तब्बल १२ वर्षांपूवी म्हणजेच २००६ साली ’कॉन्डोलिझा राईस ’ ह्यांच्या बाबत नेमक्या शब्दांत माहिती दिली होती  ती अशी -
                                                                             


तिसर्‍या महायुध्दाची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली आहे ह्याची पुरेपूर जाणीव ह्या जबर महत्त्वाकांक्षी व धोरणी महिलेला आहे. अगदी मोजकेच बोलणे व स्वत:च्या मनाचा थांगपत्ताही लागू न देणे , हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. स्वत:च्या जबाबदारीची पुरेपूर जाणीव असल्यामुळे त्या कधीही उतावीळपणा वा धरसोड वृत्तीला जवळपास फटकूही देत नाहीत.    

डॉ जोशी कॉन्डोलिझा राईस ह्यांच्या विषयी सांगतात की मिडीयाशी  काय बोलायचे ह्याचे ज्ञान त्यांना सहज अवगत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या मिडीयाशी ह्यांचे अधिक चांगले संबंध आहेत. ह्याची प्रचीती ह्या समर्थनातून सहज येते

त्यामुळेच डॉ अनिरुद्ध जोशी यांचे मत -
कॉन्डोलिझा राईस हे नाव  तिसर्‍या महायुध्दाबरोबर इतिहासात कायमचे जोडले जाईल. हिची पुढील सर्व घटनांवर घट्ट पकड असेल. ह्या स्त्रीचा सल्ला जगातील अनेक देशांचे भवितव्य ठरवू शकतो. 
हे पूर्णपणे माझ्या मनास पटते. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ह्यांनी अणुकरारातून माघार घेतल्याचे वृत्त वाचले. या निर्णयाचे  राईस ह्यांनी केलेले समर्थन पाहता , हा निर्णय योग्यच होता ,असे वाटू लागले. राईस ह्यांच्या अशाच सल्ल्यामुळे अमेरिकेची मोठी हानी टाळू शकते, असे संकेत यातून मिळू लागले आहेत. 

टीप - " अमेरिका , इराण,  अणुकरार आणि  कॉन्डोलिझा राईस  ! " ह्या संदर्भातील लेख दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक १६ मे २०१८ च्या अंकात "व्यासपीठ" ह्या सदरात पान क्रमांक ८ वर प्रथम छापून आला होता.  

Wednesday, 30 August 2017

चीन भारतावर वॉटर वॉर लादू पाहत आहे का?

File image of China's Three Gorges Dam. Reuters


दैनिक प्रत्यक्षच्या २० ऑगस्ट २०१७ च्या अंकातील "भारतातील महापुरामागे चीनचे कटकारस्थान - सामरिक विश्लेषकांचा आरोप " हे पहिल्याच पानावरील वृत्त वाचले आणि बुध्दी चक्रावून गेली. "डोकलाम" प्रश्न सहजासहजी सुटण्याची  दुरान्वये शक्यता दिसत नाही, भारत तर आपले सैन्य तसूभर माघारी घेण्यास तयार नाही, राजनैतिक चर्चेचा भारताने दिलेला प्रस्ताव आपणच धुडकावून लावला आहे त्यामुळे ती संधी आपणच गमावली आहे आणि आता आपल्या साम्राज्य विस्ताराच्या स्वप्नाला सुरूंग लावून भारत चंगलीच खिंडारे पाडीत आहे, आपला शेजारील शत्रू राष्ट्रांना धमकाविण्याचा मनसुबाही त्याने विफल ठरत आहे आणि आपली आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलीच नाचक्की होऊ शकते ह्या  न्युनगंडाने ग्रासलेला चीन दिवसेंदिवस नवनवीन क्लुप्त्या लढवून भारताला नामोहरम करण्याची एकही संधी सोडीत नाही असे दिसत आहे. मानसिक दबावतंत्र वापरूनही ना भारत द्बत आहे ना भारताचे नागरिक हे पाहून तर चीन आता इरेलाच पेटला आहे जणू ! त्यातील एक भाग म्हणून १५ ऑगस्ट ह्या भारताच्या स्वातंत्र्य दिवशी भारतीय जनता स्वातंत्र्य्दिन साजरा करीत असताना बेसावध असेल असे समजून चीनच्या सैन्याने लडाखच्या पॅंन्गॉंग सरोवराजवळील भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पण डोळ्यांत तेल घालून अहोरात्र  जागता पहारा देणार्‍या आमच्या भारतीय जवानांनी चीनच्या घुसखोरीला कडवे प्रत्युत्तर देऊन  तेही मनसुबे हाणून पाडले. चीनच्या अरेरावीला जराही भारत भीक घालीत नाही हे लक्षात घेऊन आता चीन कुटील नीतीचा अवलंब करून भारतात महापूर आणण्याचे सूत्रबध्द कत कारस्थान रचित असल्याचा सामरिक विश्लेषक आरोप करीत आहेत त्यात नक्कीच तथ्य असावे असे दिसत आहे व त्यामागे तसेच सबळ पुरावेही हाती लागत आहेत .           

जपान मध्ये २०११ साली त्सुनामीचे जे अस्मानी संकट ओढावले होते ते सुरुवातीला निसर्गाचा प्रकोप आहे असे आढळले होते आणि नैसर्गिक आपत्ती म्हणून गणलेही गेले होते , परंतु काही काळाने ही त्सुनामी ही मानव-निर्मीत आपत्ती असू शकल्याचे आरोप व त्यावर रंगलेले वाद वाचनात आले होते. तेव्हा बुध्दीला खरेच कोडे पडले होते की मानव हा विज्ञानाचा वापर वरदान म्हणून करत आहे की तो शाप ठरावा इतक्या अधोगतीला जाऊन त्याचा दुरुपयोग करीत आहे. त्यानंतरही बरेच वेळा येणार्‍या काळात तिसरे महायुध्द कधीही भडकू शकते ह्यावर अनेकांनी आपली मते मांडली होती आणि ह्यात पाण्यावरून युध्द पेटण्याचच्या शक्यता असल्याचे मतप्रवाह ही वाचनात आले होते. सध्याची भारतात आसाम, बिहार, उत्तराखंड, पश्चिम बंगाल ह्या राज्यांमध्ये आलेल्या भयंकर महापुरात होणारी मनुष्यहानी , वित्तहानी पाहता जरी हे निसर्गाचे तांडव आहे असे म्हणावे , तरी त्याच वेळी वास्तव  काही  वेगळ्याच गोष्टींकडे अंगुलीनिर्देश करीत आहे ह्याकडे डोळेखांक करून चालणार नाही.  मानवाचा घात होत असतो अंध;कारातच आणि हा अंध:कार असतो  अज्ञानापोटीच ! तो दूर करण्यासाठीच दैनिक प्रत्यक्ष अविरत परिष्रम घेत आहे. त्यामुळेच  ह्या दुर्लक्षिल्या जाणार्‍या महत्त्वपूर्ण वास्तवाची जाण करून देणार्‍या दैनिक प्रत्यक्ष च्या नागरिकांना सुजाण व  जागरूक बनविण्याच्या कार्याला मनापासून सलाम !

पाणी,अन्न , वस्त्र , निवारा ह्या मानवाच्या अत्यंत मूलभूत गरजा आहेत आणि त्यामुळेच ह्यांचा दुर्भिक्ष्य (अभाव ) म्हणजे जीवन जगण्यावर ओढावलेली आपत्तीच ! सामान्यत: नैसर्गिक आपत्ती (Natural Disasters)  व मानव निर्मित आपत्ती ( Man made disasters) अशा दोन प्रकारांत प्रामुख्याने आपत्तींचे वर्गीकरण होते. वरवर पाहता आसाम, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, व बिहार मध्ये उद्भवलेली महापूराची परिस्थिती पाहता हा पूर मुसळधार पावसाने आला असावा असा भारतीयांचा समज झाला होता, पण तो किती फोल आहे हे ह्या बातमीच्या वाचनातून प्रकर्षाने जाणवले. यावर्षी देशातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा पाच टक्क्यांनी कमी आहे आणि विशेष म्हणजे ईशान्य भारतातही पावसाचे प्रमाण वाढलेले नाही. मग हा महापूर आला कसा ? असा साहजिकच प्रश्न उद्भवू शकतो.

चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमधून उगम पावणार्‍या नद्यांचा प्रवाह भारतातून पुढे जातो. या नद्यांवर चीनने लहान - मोठी धरणे , पाण्याशी निगडीत बांधकामे  ( dams, barrages and other water infrastructure ) उभारली आहेत. जेव्हा काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या कारवाया पाकिस्तानने वाढविल्यानंतर, भारताने पाकिस्तान सोबतच्या "इंडस वॉटर ट्रिटी " (सिंधु जल वाटप )ह्या कराराचे पुनरावलोकन करण्याची शक्यता दर्शविली तेव्हा चीनच्या गळ्यातील कंठमणी असलेल्या पाकिस्तानला वाचविण्यासाठी चीनने भारताला उलटपक्षी ब्रम्हपुत्रा नदीचे पाणी अडविण्याची धमकीही दिली होती. ब्रम्हपुत्रा ही आसाम आणि ईशान्योत्तर राज्यांची जीवन-संजीवनी आहे हे चीन चांगलेच जाणतो, त्यामुळे भारताची गळचेपी करण्यासाठी ब्रम्हपुत्रेचे पाणी अडविण्याचा आडमुठेपणा तेव्हा चीनने धमकीतून उघड केला होता हे आम्हाला विसरून चालणार नाही. त्याच पाण्याचा वापर विपरीत तर्‍हेने करून आता ही चीन भारताला काटशह देऊ पाहत आहे. दुर्दैवाने ब्रम्हपुतेचा उगम हा चीनमधील Yarlung Tsangpo ह्या नदीपासोन होतो व पुढे ती भारतातून व बांग्ला देशातून वाहत जाते. हे जाणून चीनने अतिशय धूर्तपणाने ब्रम्हपुत्रा व इतर नद्यांवर अवाढव्य धरणे बांधून त्यांचे पाणी अडविले आहे
                                                                    
             

२०१३ व २०१४ मध्ये  भारत व चीन ह्या दोघांमध्ये झालेल्या द्विपक्षीय कराराप्रमाणे (bilateral MOUs) चीनने भारताला १५ मे ते १५ ऑक्टोबर ह्या काळात दर वर्षी तिबेटमधील ब्रम्हपुत्रा आणि इतर नद्यांच्या वरील प्रवाहावरील  ३ महत्त्वाच्या देखरेख करणार्‍या स्टेशन्सकडून हायड्रोलॉजिकल डेटा ( धरणांमधून किती पाणी नद्यांमध्ये सोडले जाते व तत्स्म माहिती ) देणे बंधनकारक आहे. पण ह्या वर्षी१५ मे पासून असा कोणत्याही स्वरूपाची माहिती चीनने भारताला पुअरविली नाही आहे. परंतु करारचे पालन करणार्‍या भारताने मात्र ह्याची रक्कम नियमाप्रमाणे आधीच चीनला दिली आहे असे सूत्रांच्या माहिती नुसार कळते

तसे चीन अनेक वेळा आंतरराष्ट्रीय कायद्यांना आपण मानत नसून, त्याचे पालन करणे चीनला बंधनकारक नाही अशी बेताल वक्तव्ये वारंवार करीत असल्याचेच निदर्शनास येते. त्यामुळे भारत व चीन मधील ह्या द्विपक्षीय करारालाही चीनने झुगारल्याचे नाकारता येत नाही. या उलट भारत मात्र नीती -नियमांचे पालन करून आपल्या शेजारील पाकिस्तान व बांग्लादेश ह्या राष्ट्रांशी झालेल्या पाणी वाटप करारानुसार त्या देशांना आपल्या देशातील नद्यांच्या धरणांवरील हायड्रोलॉगिकल डेटा  पुरविताना कोणतेही मूल्य आकारत नाही अशी माहिती वाचनात आली.
                                                                  
      

दैनिक प्रत्यक्षचे कार्यकारी संपादक डॉ अनिरूध्द जोशी ह्यांनी लिहिलेल्या "तिसरे महायुध्द " ह्या  पुस्तकात त्यांनी महायुध्द म्हणजे काय हे सांगताना असे लिहिले आहे की युध्दाचे उद्दिष्ट शत्रुपक्षाला शरण आणून त्याच्यावर आपली इच्छा लादणे हेच असते. ह्यात त्यांनी ’क्लाओसवेत्ज’ (कार्ल फॉन क्लाओसवेत्ज , १७८० ते १८३१)’ ऑन वॉर ’ ह्या महान ग्रंथाच्या लेखकाचे मत प्रतिपादीत केले आहे -
’ ऑन वॉर ’ च्या सिध्दांतानुसार युध्द म्हणजे आपल्या स्वार्थासाठी शत्रूला आपल्या इच्छेनुसार बलप्रयोगाने वाकविणे, ह्यात दयाळूपणा, सौम्यता, वेळकाढूपणा व नैतिकता ह्यांना जराही स्थान उरत नाही. वाटेल ते करून शत्रुपक्षाचे सामर्थ्य व वैभव पूर्णपणे उध्वस्त करणे, हेच युध्दाचे एकमेव उद्दीष्ट असते.चीनचे सद्य परिस्थितीतील महापुराचे कटकारस्थान हेच दाखवून देत आहे. 

चीनवर भारताने कारवाई केली तर त्यांच्या आर्थिक नाड्या भारतालाही आवळता येतील ह्याचेही भान चीनने अवश्य बाळगावे. तिबेटचा लचका चीनला केवळ भारताच्या मूर्खपणामुळे तोडता आला तेव्हाचा भारत वा १९६२ साली हार मानणारा भारत आणि आताचा भारत व भारताचे बलाढ्य व सामर्थ्यस्थान, जागतिक पातळीवरील भारताचे वाढते वर्चस्व ह्यात जमीन-अस्मानचा फरक आहे हे चीननेही नक्कीच ध्यानात ठेवावे. 

सूचना - 
१.  "तिसरे महायुध्द " हे पुस्तक मराठी , हिंदी व इंग्लिश अशा भाषा मध्यें उपलब्ध आहे -
२. `Third World War eBook by Aniruddha D. Joshi - Amazon Kindle Edition
३. हा लेख प्रथम दैनिक प्रत्यक्षच्या ३० ऑगस्ट २०१७ च्या अंकात प्रथम प्रसिध्द्व झाला होता. 

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog