Tuesday, 12 January 2016

आण्विक युध्द- अणुबॉम्बचे पुढचे पाऊल हायड्रोजन बॉम्ब!!!

७ जानेवारी २०१६च्या दैनिक प्रत्यक्षमधील एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले - उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी ! आणि जगात खळबळ उडविणार्‍या ह्या बातमीने हायड्रोजन बॉम्ब हा एवढा संहारक, अणु बॉम्बपेक्षा महाविनाशकारी का बरे मानला जात असावा ह्याची मनात अपार उत्सुकता दाटली.
  

उत्तर कोरियाने बुधवारी ६ जानेवारी २०१६ रोजी तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता अणुचाचणी केंद्रानजीक अणुबॉम्बपेक्षाही अधिक संहारक असलेल्या हायड्रोजन बॉम्बची यशस्वी चाचणी केल्याने, आंतरराष्ट्रीय सर्वच स्तरांवर प्रचंड खळबळ माजली आहे. ह्या चाचणीने उत्तर कोरियातील भूकंप केंद्राने ५.१ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद केली आहे. 

जागतिक शांतता धोक्यात आणल्यावरून उत्तर कोरिया हा फक्त जागतिक टीकेचा विषय बनला नसून त्याला आणखी कडक निर्बंधाना सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याआधी उत्तर कोरियाने २००६ , २००९ आणि २०१३ मध्ये अणु चाचणी घेतली होती. 

हायड्रोजन बॉम्ब हा अणुबॉम्बपेक्षा अधिक प्रमाणात संहार करण्याची क्षमता असलेला मानला जातो. उत्तर कोरियाने आपले आण्विक सामर्थ्य वाढविण्याच्या दृष्टीने उचलेले हे पाऊल सर्व जगाला चिंता व्यक्त करण्यास का भाग पाडत आहे ? ह्या मागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करताना काही माहिती मिळाली ती देण्याचा हा प्रपंच !!

आता आपल्याला साहजिकच असे वाटू शकते की आपल्या सारख्या सामान्य माणसाला काय करायचे हे हायड्रोजन बॉम्ब किंवा अणु बॉम्ब असे  सगळे समजून घेऊन ? आणि दुसरे म्हणजे उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली आहे मग आम्हाला कशाला चिंता ?  

"तिसरे महायुध्द" हे डॉक्टर अनिरुध्द जोशी ह्यांचे पुस्तक वाचनात आले आणि लक्षात आले की आपला हा विचार किती चुकीचा असू शकतो. ह्या पुस्तकात आधुनिक शस्त्रास्त्रांची माहिती करून देताना डॉक्टर जोशी म्हणतात माहिती करून घेणे ह्याचा उपयोग नक्कीच आहे कारण अज्ञान हेच अनेक दुष्परिणाम घडू देते तर विज्ञान व माहिती अनेक दुष्परिणाम टाळू शकते.

Saturday, 9 January 2016

अंतराळ युध्द - आधुनिक शस्त्रात्रे आणि प्रभाव !

नुकत्याच दैनिक प्रत्यक्ष मध्ये वाचनात आलेल्या एका बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले होते ती बातमी होती - चीनच्या राष्ट्राध्यक्षांकडून लष्कराला सज्जतेचे आदेश. काय विशेष असे होते या बातमीत? तर सैनिकांची संख्या कमी करण्याबरोबर पुढील पाच वर्षात चीनच्या लष्कराच्या अद्ययावतीकरणावर भर देण्यात येणार असून यामध्ये अंतराळ युध्दाची तयारी म्हणून ’स्पेस फोर्स’ तयार करण्यात येणार आहे. 



हे वाचल्यावर अंतराळ युध्द म्हणजे नक्की काय हे जाणून घेण्याची मनात अपार जिज्ञासा दाटली. त्या वाचनातून हाती आलेली काही माहिती येथे देण्याचा प्रयत्न करीत आहे.

Sunday, 3 January 2016

क्रांतिसूर्य जोतिबांची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले !!!!



एक मेणबत्ती हजारो मेणबत्त्या प्रज्वलित करू शकते आणि तरी तिला तिचे स्वत:चे आयुष्य कधीच उणे भासत नाही " 
महात्मा गौतम बुध्द ह्यांचे हे उद्गार वाचताना डोळ्यासमोर साकारते ती क्रांतिसूर्य जोतिबांची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ! 

जोतिबा फुले हे आधुनिक भारताचा शिक्षणाचा पाया रचणारे क्रांतिसूर्य तर त्यांच्या कार्यात खांद्याला खांदा लावून निरंतर सावली बनून ५० वर्षांहून अधिक काळ त्यांना अविरत साथ देणारी सहचारिणी , कार्यकर्ती अशा सर्व भूमिका समर्थपणे पेलणारी सावित्रीबाई फुले म्हणजे क्रांतिज्योतीच होय !


Friday, 1 January 2016

भगवंताची भाषा शिकून चला भगवंताशी नाते जोडू या ....

आज नवीन वर्षाला सुरुवात झाली. सर्वचजण एकमेकांना नव-वर्षाच्या शुभेच्छा देण्यात गुंग असतात. नवीन वर्ष म्हणजे नवीन आशेचा सूर्योदय ! नवीन ध्येयाचा, नवीन सुबत्तेचा , नवीन विचारांच्या धारेचा , नवीन सळसळत्या चैतन्याचा, नवीन जोशाचा ,नवीन ताकदीचा , नवीन सामर्थ्याचा , नवीन आविष्कारांचा , नवीन प्रार्थनांचा एक गुलदस्ताचा जणू ! ह्या शुभेच्छा , प्रार्थना आणि सदिच्छांतून अवघे प्रेमच अव्याहतपणे भरभरून वाहत असते. पण ह्या सर्वाचा मूळ स्त्रोत असणारा भगवंत , परमेश्वर ह्याची आम्हाला आठवण येते का ? आम्ही "त्या" अनंत करूणामयी परमेश्वराला, भगवंताला "त्या"नेच हे सारे आम्हाला दिले म्हणून कधीतरी कृतार्थ भावाने धन्यवाद देतो का? कधीतरी आभार मानतो का? तर कदाचित उत्तर देणे कठीण होऊन बसेल नाही? आम्हाला "त्या" भगवंताची स्मृती तरी असते का? हाच मुळात प्रश्न आहे, चला तर मग आज नवीन वर्षाच्या औचित्याने "त्या" भगवंताशी नाते जोडायला शिकू या ... 

आता कोणाशी नाते जोडायचे म्हणजे मला त्या व्यक्तीशी संवाद साधायला हवा आणि संवाद तर तेव्हाच साधता येतो जेव्हा मला त्या व्यक्तीला माहीत असलेल्या भाषेत बोलता येते किंवा मला ठाऊक असलेली भाषा त्या दुसर्‍या व्यक्तीला पण माहीत असते. आता येथे तर साक्षात भगवंताशीच मला नाते जोडायचे आहे म्हटल्यावर मला भगवंताची , परमात्म्याची भाषा येते का? हा प्रश्न उद्भवतो साहजिकच, नाही का बरे? 

आम्ही साईसच्चरितात वाचतो की कृष्णाचे वचन " संत माझ्या सचेतन मूर्ती ! " म्हणजेच संत ह्या परमात्म्याच्या, भगवंताच्या सचेतन मूर्ती आहेत. आणी "जे जे पिंडी ते ते ब्रम्हांडी " ह्या न्यायाने प्रत्येक मानव हा कितीही पापी असो की पुण्यवान असो, त्या परमात्म्याची अंशत: मूर्ती असतोच. आम्ही जर परमात्म्याचे अंश आहोत तर परमेश्वराने , त्या भगवंताने आमच्या पित्याने आम्हाला त्याची सगळी ताकद कमी-अधिक प्रमाणात दिलेली आहेच. म्हणजेच आम्हाला "त्या" परमात्म्याची, परमेश्वराची, त्या भगवंताची भाषा नक्कीच समजू शकते , जर आम्ही त्या दिशेने प्रयास केले तर !!! 

आम्हाला कधी प्रश्न पडला की परमेश्वराला कुठली भाषा कळते. तो एकच राम वा तो एकच कृष्ण वा तो एकच साई , मग त्याला आम्ही मराठीतून आळवतो, गुजराती मधून आळवतो, तमिळ , कन्नड , मल्याळी, बंगाली मधून आळवतो तरी सगळ्यांची भाषा "त्या"ला पोहचतेच ना, सारे काही "त्या" ला कळतेच ना ? कारण ती असते "प्रेमाची" भाषा ! 

रामाचे, कृष्णाचे, साईबाबांचे भक्त वेगवेगळ्या भाषा बोलणारे होते आणि आज ही आहेत, तरी सगळ्यांची भाषा "त्या" ला कळतेच. हे "त्या"चं वैशिष्टय आहे. ही "त्या"ची विशेषता आहे. पन मग आम्हाला "त्या"ची भाषा कळते का? परमात्म्याची, "त्या" प्रेमळाच्या प्रेमळ , दयानिधीची भाषा शिकणे हेच सगळ्यात विशेष आहे माणसासाठी असे मला वाटते.         

परमेश्वराने आम्हाला "त्या"ची भाषा दिलीय, वाणी (वाचा - बोलण्याची देणगी) दिलीय आणि त्या परमेश्वराची भाषा शिकायची सोयही करून ठेवलीय. पण आम्ही कधी तिचा वापर करतो का? 



प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog