वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा ! हिंदू कालगणनेनुसार मराठी वर्षातील ज्येष्ठ महिना हा नावाप्रमाणेच ज्येष्ठ वैशिष्ट्ये धारण करणारा म्हणावा लागेल. संपूर्ण वर्षभरातील सर्वांत मोठा दिवस याच महिन्यात असतो.( २१ जून - ह्या वर्षी अधिंक महिन्यामुळे तो आषाढ शुध्द पंचमीला येतो - अपवाद अधिक महिना कालगणनेनुसार) उन्हाळ्याची दाहकता सोसून सर्व चराचर आर्ततेने पावसाची कधी चाहूल लागेल म्हणून आसुसलेले असते आणि अशावेळी आभाळ काळ्या मेघांनी भरून आलेले, त्यामुळे वातावरणात उष्मा वाढलेला, कधी पाउस येईल वाटते आणि मध्येच पावसाची हलकी सर येणार्या पावसाळ्याची आठवण करून देते. परतीच्या वाटेवर पाऊल ठेवत निरोप घेणारा उन्हाळा नि सुरू होऊ पाहणारा पावसाळा यांची जणूकाही गळाभेट या महिन्यात पाहता येते. ज्येष्ठात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. या पौर्णिमेला अध्यात्मिक व धार्मिक महत्त्व तर आहेच, पण त्यामागचे वैज्ञानिक महत्त्वही समजून घेतल्याने खर्या अर्थाने आजच्या वैज्ञानिक युगाशी मिळते जुळते घेण्यासारखे होईल.
भारतीय संस्कृती, शास्त्र, परंपरा या महान ऋषी-मुनींच्या वैज्ञानिक, अध्यात्मिक चिंतनातून निर्माण झाल्या आहेत ज्यात त्यांनी चराचरातील प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अभ्यासिले, जाणले आणि समाजात रुजवले, बिंबवले ते अनेक सण, उत्सवांच्या आधारे. त्यात त्यांनी निसर्गाचा समतोल सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार्या वृक्षांचे अनन्यसारधारण महत्त्व आहे हे जाणूनच वृक्ष, वेली झाडांचे मानवी जीवनाशी पूर्वापार नांत जुळवून दिले.
माणसाला निरोगी, निरामय जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची खूप मदत होते. याशिवाय झाडांची पाने, फुले फळे अगदी वाळलेले लाकडे देखील मानवाला उपयोगीच असतात. या अनमोल देण्याचे जपणूक करावी, संवर्धन करावे हा संदेश पूर्वजांनी पूर्वापार काळापासून समस्त मानवजातीला दिला. म्हणूनच विविध व्रते, उत्सव, सण तसेच विविध देवी देवतांच्या पूजेत झाडांना, त्यांच्या पाना-फुलांना फळांना मानाचे महत्त्वाचे स्थान आहे. वृक्षांचा महिमा वाढून वृक्ष जतन करण्यास माणूस प्रवृत्त व्हावा, म्हणूनच आपल्याकडे वटपौर्णिमेसारखी व्रतं, परंपरा पाळली जातात. गरज आहे ती आपण ती व्रते सुजाण पणे पाळण्याचा. वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची महिमा आपण जर समजून घेतला तर खरे वृक्षपूजन करण्याचा प्रयत्न आपण केला असे आपण म्हणू शकतो.