Wednesday, 21 June 2017

बोलावा विठ्ठल , पहावा विठ्ठल , करावा विठ्ठल जीवभाव ....गानसरस्वतीचे अभंग सुर - किशोरीताई आमोणकर !

बोलावा विठ्ठल , पहावा विठ्ठल , करावा विठ्ठल जीवभाव ....गानसरस्वतीचे अभंग सुर - किशोरीताई आमोणकर !

 

आषाढी एकादशीला भागवतसंप्रदायात खूप महत्त्व आहे. या दिवशी मातृतुल्य विठुमाऊलीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी पायवारी करतात ती पंढरपूरच्या विठोबाची ! या वारीची सुरुवात सुमारे 700-800 वर्षांपूर्वी झाली असावी. ज्येष्ठ वद्य अष्टमीपासून सलग १५ दिवस एका नादात, लयीत, तालात तहान-भूक हरपून, ऊन-वारा-पाऊस कशाचीही पर्वा न करता वारकरी चालत असतात. सार्‍या वारकर्‍यांना वेध लागतात ते पंढरपूरच्या विठू माऊलीच्या भेटीचे ... त्या सर्वांचीच मने धाव घेत असतात ते पंढरीच्या वारीसाठी .. त्यांच्या जिवीच्या जिवलगाला भेटण्यासाठी तन-मन आसुसलेले असते  कधी एकदा माझ्या विठूरायाला डोळे भरून पाहीन , त्याच्या चरणांचे दर्शन घेईन - भेटी लागी जीवा लागलीसे आस पाहे रात्रं दिवस वाट तुझी...........
असा तो विठ्ठ्ल -  म्हणजे वारकरींचा भोळाभाळा शुध्द मूर्तीमंत प्रेम भावच जणू !

 "त्या" निर्गुण , निराकाराला पंढरपूरच्या मूर्तीतून सगुण , साकार करून भक्तांच्या जीवीची हाद पुरविणारा तो स्वर्गीय आवाज म्हणजे किशोरीताई आमोणकर ! असे म्ह्टले तर वावगे ठरणार नाही मुळीच.!

अभंग वाणीचे मह्त्त्व नुसते सांगून कसे कळणार?  बोलावा विठ्ठल , पहावा विठ्ठल , करावा विठ्ठल जीवभाव म्हणजे काय ? हे शब्दावीण सांगण्याची सुरांची जादू , अद्वितीय सुरांची महती म्हणजे किशोरीताईंची वाणी...मन अगदी अमृताच्या अवीट गोडीने न्हाऊन निघते. 



संत तुकाराम महाराजांनी भंडार्‍याच्या डोंगरावर जाऊन एकांतात आर्त भावाने परमेश्वराला जगजेठी पांडुरंगाला आळविले होते असे वाचायचो , पण ती आर्तता कशी हृदयाला आरपार भिडून जाते हे ताईंच्या आवाजाने अनुभवता आले. शांती म्हणजे काय, तृप्ती , समाधान  म्हणजे ते परमेशाचे नाव, भगवंताचे नाम हे कळायला फक्त ताईंची वाणी , मग तो अभंग कोणत्याही संताचा असू दे. तुकोबांची बोलावा विठ्ठल ऐकताना आपोआप मनाच्या गाभार्‍यात "तो" सावळा विठ्ठल आनंदाने डोलू लागतो आणि "त्या" सावळ्या परब्रम्हासवे आपणही त्याच सच्चिदानंदाच्या भाव समाधीत तल्लीन होऊन जातो. आषाढी एकादशीला पंढरीची वारी करण्याचे सौभाग्य जरी लाभले नसले तरी किशोरीताईंचा अभंग ऐकताना आपसूक वारीच घडते, सर्व देहभान विसरून फक्त "तो" माझा विठ्ठल , माझी विठू माऊली आणि मी ह्याची अनूभूती ह्याची देही ह्याची डोळा घेता येते. जणू ताई आपल्या स्वर्गीय सुरांनी "त्या" परमात्म्याचे , परमेश्वराचे खरे रूप आपल्या भेटीला आणतात. देव्हार्‍यातील शांत पणे तेवणारी समई किंवा निरांजनाची ज्योत जशी मनाचा गाभारा एका क्षणात उजळवून टाकते लख्ख ! तसेच ह्या स्वर्गीय सुरांनी आपल्या अंतरात्मा, आपले तन-मन न्हाऊन निघते. आज कालियुगात परमेश्वराच्या अस्तित्त्वाविषयी अनेक कल्लोळ उठत असताना संताच्या अभंगाची, परमेशवरी अस्तित्वाची , "त्या " परब्रम्हाची , "त्या" सावळ्या रूपाची मोहिनीची गोडी लागणे खूप दुर्मिळ होत चालले आहे. तेव्हा फक्त डोळे मिटून शांत चित्ताने किशोरीताईंची ही अभंग वाणी ऐकली की कळते आणि अंतरीची खूण पटते . सुरांना "नादब्रम्ह" का म्हणतात ह्याची जिवंत प्रचिती ! 

"नाम घेता उरापोटी ब्रम्ह धरीते आकृती " ह्या अभंगाचा अर्थ मला कळायचा नाही पण किशोरीताईंचे "बोलावा विठ्ठल" ऐकले आणि कळले की नाम उरापोटी कसे घ्यायचे असते, किती ते अवर्णनीय प्रेम , किती ती निर्मळ भक्ती, किती तो गाढ विश्वास - तेव्हाच असा सहजसुंदर एकमेवाद्वैतीय भाव छेडता येऊ शकतो. तुका म्हणे देह हरीला विठ्ठ्ल , काम क्रोधे केले घर रिते ...... हे ऐकताना देहंभाव हरपणे म्हणजे काय ह्याचा जो अनुभव येतो ना तो शब्दांत वर्णणे खरेच पराकोटीतील अशक्य बाब आहे. साक्षात माझ्या विठू माऊलीच्या चरणांशी बसून मी फक्त "त्या" एकालाच अनुभवते ह्याहून जीवनात दुसरा आनंद काय असू शकतो.

संत सोयराबाईंचा अभंग "अवघा रंग एक झाला " ह्याचा तर अर्थ भल्या भल्यांना लावणे जड जाते पण किशोरीताई गाताना सोयराबाईंची ती भावसमाधी नयनांपुढे साकार होते. देव हा बुध्दीगम्य नसून भावगम्य आहे असे का म्हणतात ह्याचे उत्तर येथे अनुभवता येते. "देही असूनी  विदेही सदा समाधीस्थ पाही" ही सोयराबाईंची आंतरीक अवस्था , पाहते पहाने गेले दूरी - अहाहा ! किती प्रेमाने माझ्या देवाला न्याहाळू , "त्या" च्या अनिरूध्द गतीने "तो " येईलच मला भेटायला ह्याचा १०८ % भरोसा देणारा हा स्वर ! 



ज्यांच्या शास्त्रीय गायनाने मनाचा पवित्र  गाभारा बनतो आणि देह देवाचे मंदीर , अशी उच्च दर्जाची सुरांची अनमोल देणगी - परमेश्वरी प्रतिभेचा नितांत सुंदर आविष्कार म्हणजे किशोरीताई आमोणकर! साधना, अभ्यास व चिंतन या त्रिसूत्रीच्या आधारे त्यांनी आपली गायकी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे.सादरीकरण करताना केवळ गायचे म्हणून त्या कधीच गात नसाव्या तर  तो राग - ते भजन - ते गीत संपूर्णपणे अभ्यासून , त्यामागची त्या संताची वा गीतकाराची भूमिका जाणून घेऊनच त्या गात असत. त्यामुळेच त्यांचे भजन असो वा गीत - एक प्रकारची पूजाच ठरते.

मानसपूजा करणे हे खूप श्रेष्ठ मानले जाते ही "मानसपूजा" केल्याचा आनंद घ्यायचा असेल तर किशोरीताईंचे सुर ऐकावे बस्स !
त्यांचा गातानाचा भाव समाधीत तल्लीन झालेला चेहरा आणी तो स्वगीय आवाज ऐकण्या साक्षात "तो" अवतरत नसेल तरच नवल ! म्हणूनच तसाच निर्भेळ आनंद त्या श्रोत्यांनाही देतात व देत राहतीलच !

संगीतातील शास्त्रशुद्धतेचा व पावित्र्याचा किशोरीताईंचा स्वत:चा सक्रिय आग्रह तर असतोच  पण या क्षेत्रातील इतरांकडूनही त्यांची याबाबत तशीच अपेक्षा असते असे वाचनात आले होते . "पावित्र्य हेच प्रमाण " जपणार्‍या किशोरीताईंचा `अशी' अपेक्षा व्यक्त करण्याइतका या क्षेत्रातील अधिकार निश्चितच स्पृहणीय आणि वंदनीय आहे . हा अधिकार लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार, राष्ट्रपती गौरव पदक, पद्‌मभूषण व पद्‌मविभूषण असे पुरस्कार बहाल केले. खरे तर ह्या पुरस्कांरांना "गानसरसवती" ने कृतकृत्यच केले असे म्हणणे उचित ठरेल असे वाटते. भगवंताच्या अगम्य,अनाकलनीय स्वरूपाची चिरंतन  गोडी लावणार्‍या गानतपस्विनीचे , गानसरस्वतीचे सुर अजरामरच असतात आणि राहतात ते  १०८% निर्विवाद सत्य !

3 comments:

  1. खूपच सुंदर सुनिताजी.. विठ्ठल आणि त्याच्या वर्णनाचे आणि ते हि गानसरस्वती किशोरीताई ह्यांनी स्वरसाज चढवलेले ultimate अभंग आणि त्याचा अर्थ वाचून मनाला वारकरी होऊन वारी करण्याचा अनुभव झाला.

    ReplyDelete

  2. खूप सुंदर.....अवघा रंग या ब्लॉग मध्ये विठुमय झाला. किशोरीताईंचा आवाज अप्रतिम. त्यात गायकी सोबत भावनांचाही मृदू ओलावा आणि त्यामुळे त्यांचे सूर काळजाला भिडतात. जणू हा अभंग किशोरीताईंनी गाण्यासाठीच रचला गेला असावा असे जाणवते.

    ReplyDelete
  3. Excellent flow of emotions and love in ur Article. Thnx a lot Sunita Karande..I always wait for ur Articles​ of blog. This article itself made us as if we went to Pandharpur for Vari.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog