Thursday, 5 May 2016

आमुचे अभयदाता स्वामी समर्थ आजोबा !!!


अक्कलकोटस्वामी स्तवन 

नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता |
प्रगटला अद्भुतसा | ब्रम्हांडाचा हाच पिता || १ ||
नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सूत्रधार | 
नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ ||
नरदेही नरसिंह | प्रगटला तरूपोटी |
नास्तिकाच्या कश्यपूला | आस्तिकाची देण्या गती || ३ ||
कधी चाले पाण्यावरी | कधी धावे अधांतरी |
यमा वाटे ज्याची भीती | योगेश्वर हाच यती || ४ || 
कधी जाई हिमाचली | कधी गिरी अरवली |
कधी नर्मदेच्या काठी | कधी वसे भीमा तटी || ५ ||
काली माता बोले संगे | बोले कन्याकुमारी ही |
अन्नपूर्णा ज्याचे हाती | दत्तगुरु एक मुखी || ६ ||
भारताच्या कानो कानी | गेला स्वये चिंतामणी |
सुखी व्हावे सारे जन | तेथे धावे जनार्दन || ७ ||
प्रज्ञापुरी स्थिर झाला | माध्यान्हीच्या रविप्रत |
रामानुज करी भावे  | स्वामी पदा दंडवत || ८ ||

|| श्री सदगुरु अक्कलकोट स्वामी समर्थ  आजोबा की जय  || 

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८)

मराठी कॅलेंडर मध्ये आज श्रीअक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी अशी नोंद आहे. वास्तविक पाहता इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी समाधिस्त होऊन आपला सगुण साकार अवतार संपविला असे भासवले, परंतु आजतागायत प्रत्यक्षात स्वामी भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून, भक्तांना "हम गया नही जिंदा है " याच आपल्या अभिवचनाची प्रचिती सातत्याने  देत आहेत. 

''सबसे बडा गुरू.. गुरूसे बडा गुरू का ध्यास..
और उससे बडे श्री स्वामी समर्थ आजोबा...''

"श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ " अक्कललोटच्या स्वामी समर्थांचा हा गजर  स्टेजवर अगदी छान रंगात आला होता . स्वामी समर्थांच्या प्रेमात आकंठ बुडालेले स्वामीभक्तीत न्हाऊन निघालेले श्रध्दावान  भक्त अगदी तल्लीन होऊन गजर गात होते आणि तेवढ्यात त्यांना त्यांच्या सदगुरुंनी जवळ बोलावून अत्यंत प्रेमाने काही समजावले आणि पुढील गजरात एक बदल करून गजर पुन्हा त्याच प्रेमाने गाईला गेला. आणि आता त्याच गजराची श्रवणीयता अजूनच मधुर झाली होती, गोडवा अवीट झाला होता , एक अनाकलनीय तृप्ती मनाला आपलेपणाचे नाते उलगडून दावीत होती ... काय उत्सुकता शिगेला पोहचली असेल नाही ? काय बरे केला असेल तो बदल? 

कानी आलेल्या एका संवादाने आपसूकच उत्तर तर मिळतेच आणि जीवनाला एक नवीन दिशा गवसली - आपुलकीचे नाते जोपासण्याची !

"त्या" एका शी - अनन्य प्रेमस्वरूपाशी ! माझ्या सदगुरुंशी माझे जन्मानुजन्मीचे जे नाते आहे ते - माझे आजोबा ! माझे मायबाप ! 

एक ५-६ वर्षाची चिमुरडी आपल्या आजीला सांगत होती ,मला ना खूप आवडले बघ आजी ! स्वामींना महाराज काय म्हणायचे , कसे तरी वाटत होते , मला ना मुळीच आवडत नव्हते , त्यापेक्षा आता त्यांनी म्हटले ना स्वामी आजोबा ... किती छान वाटले, माझे आजोबा... आठवले मला ... खूप आवडले मला . आपले बापू किती मस्त आहेत , आम्हाला आवडते तसे म्हणायला सांगतात... 

चिमुरडी भलती खूष होती.... माझ्या आजोबांचा गजर झाला म्हणून .... 

खरे तर म्हटले तर ही गोष्ट छोटीशी, पण त्या लहान निरागस बाळाने आमच्या डोळ्यावरचे जणू अज्ञानाचे पडळ दूर सारले होते आपसूक ! कोणत्याही नात्याला जिवंतपणा, रसरशीतपणा , चैतन्य लाभते ते त्या नात्य़ातील आपुलकी, प्रेम  ह्या बांधिलकीनेच नाही का बरे?       

नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता |
प्रगटला अद्भुतसा | ब्रम्हांडाचा हाच पिता || 
रामानुज हेच तर वर्म आपल्याला स्वामींच्या स्तवनाच्या सुरुवातीलाच प्रथम चरणांतच सांगत आहेत जणू की -  माझे स्वामी समर्थ हेच तर अवघ्या ब्रम्हांडाचे जनक आहेत , पिता आहेत , त्यामुळे साहजिकच त्यांना ना स्वत:चे नाव ना त्यांचा जन्म कुणाला ठाऊक , ना त्यांच्या माता-पित्याची कोणाला माहिती . 

नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सूत्रधार | 
नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || 
जो स्वत:चा सदगुरु, परब्रम्ह आहे त्याला कोण अन्य गुरु लाभणार ? "तो" स्वयं हाच जगाचा एकमेव सूत्रधार आहे. "तो"च अखिल जगतातील अनाथांचा जगन्नाथ आहे. 

स्वामींच्या प्रकटीकरणाची ( वाचनात आलेली ) कथा -  नरदेही नरसिंह | प्रगटला तरूपोटी |

इ.स.१४५७ च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष स्वामींनी कठोर तपश्चर्या केली.ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली.व ती वारूळावर पडली. ही स्वामी आजोबांची लीलाच की त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक आजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आजोबा...

नास्तिकाच्या कश्यपूला | आस्तिकाची देण्या गती || 
आपण बाळ प्रल्हादाची कथा वाचतो की प्रल्हादाचे पिता हिरण्यकश्यपू हे राक्षस होते आणि खांबातून नरसिंह रूपाने  प्रकटून महाविष्णूने प्रल्हादाच्या भक्तीला तारले होते , नास्तिक असलेल्या त्याच्या पित्याला शेवटच्या क्षणी आस्तिकाची गती दिली होती.

यमा वाटे ज्याची भीती | योगेश्वर हाच यती || 
बखरीमध्ये १२७व्या कथेत - स्वामी आजोबांनी बाबसाहेब जाधव ह्या भक्ताचे मरण कसे परतविले हे वाचनात येते. आजोबा त्या भक्ताला कुंभार म्हनून हांका मारीत. त्यांना स्वामी म्हणाले कुंभार तुझे नावाची चिठ्ठी आली आहे. तेव्हा ह्या भक्ताने श्रींचे चरण घट्ट धरून श्रींछी सेवा मनासारखी घडलेली नाही . करिता समर्थांनी कृपा करून तूर्त निरोप देऊ नये म्हनून प्रार्थना करताच बाबासाहेबांचे मरण रोखले व  एका जंगी बैलावर "जा बैलावर " म्हणून सोडले 
बखरी मध्ये १२९व्या कथेत - स्वामी समर्थांनी खेडेगावातील एका स्त्रीच्या मेलेल्या मुलास कसे प्राणदान दिले होते 
ह्या  दोन्ही कथांतून यमा वाटे ज्याची भीती हे प्रचीतीस येते. 

कधी चाले पाण्यावरी | कधी धावे अधांतरी |
स्वामी समर्थ क्षणात अंतर्धान पावत व अचानक प्रगट होत. स्वामी गिरनार पर्वतावर गुप्त झाले व क्षणात आंबेजोगाई येथे प्रगट झाले. हरिद्वारहून काठेवाडातील जिविक क्षेत्रातील नारायण सरोवराच्या मध्यभागी सहजासन घालून बसलेले दिसले. तर पुढे स्वामींना पंढरपुरातील भीमा नदीच्या भर पुरातून चालत जाताना भक्तांनी पहिले.

कधी जाई हिमाचली | कधी गिरी अरवली | कधी नर्मदेच्या काठी | कधी वसे भीमा तटी ....
स्वामीं आजोबांच्या बखरीतील २०२ व्या कथेमध्ये  समर्थ अक्कलकोटाला प्रसिध्द होण्या आधी कांही दिवस हिमालय पर्वतावर होते असा उल्लेख आढळतो . तेथे त्यांना पाहून  औषधे शोधण्याकरिता चीन देशातून आलेल्या एक स्त्री व एक पुरुष  ह्यांनी  कुचेष्टेने  स्वामी आजोबांना भगवा वेष धारण करणारा कोणी सैतान आहे , कीं राक्षस आहे, कीं वृती पिशाचमय दिसणारा जादूगार आहे अशी थट्टा केली होती आणि ते उभततां पोट धरून हसत होते. तेव्हा तें दोघे वृक्षाआड जाऊन कामेच्छेने विनोद करू लागली, तों चमत्कार झाला - स्त्रीची आकृती नाहीशी होऊन पुरुषाकृती  दिसू लागली. पुढे त्यांनी हंबरडा फोडून पश्चात्ताप्पूर्वक श्रींच्या चरणाम्ना मिठी मारली व प्रार्थना केली की आम्ही मूर्खपणाने आपले सामर्थ्य न ओळखून काममदाने आपली पुष्कळ निंदा केली . आम्हाला निंदेचे प्रायश्चित्त मिळाले. तरी मायबापा, आता कृपा करून स्त्रीचा देह पूर्ववत करावा. 
अर्थातच श्रींच्या चरणांवर ते उभयतां गडबडा लोळू लागतांच दयाघन स्वामीआजोबा कळवलले व त्यांनी स्त्रीचे शरीर पूर्ववत केले आपल्या कृपादृष्टीने...      

बखरीमध्येच २०३ व्या कथेमध्ये स्वामी आजोबांनी त्यांच्या हिमगिरीवरील वास्तव्यात वृक्षछायेखाली बसले असता चार व्याधांनी ’सर्वथैव न गांजावे कवणास’ असे सर्व शास्त्रांतील वचन माहीत असूनही स्वामी आजोंबाना गांजले , तेव्हा त्यांना त्यांच्या कुकर्माची जाणीव करून देण्यासाठी आधी त्यांची काष्ठवत स्थिती करून समज देऊन नंतर कृपादृष्टीने त्यांचा उध्दारच केला व सर्व भूतांच्या ठिकाणी अविरोध प्रेम ठेवा . स्वधर्माचे रक्षण करा असा उपदेश करून जाण्याची आज्ञा दिली व त्यांचा उध्दारच केला. 
ह्याच कथेत हरिणाच्या जोडप्याला त्यांचा पूर्वजन्म कथून संसारभयातून मुक्त केले  असा उल्लेख आहे. 

बखरीमध्ये १५५ व्या कथेत स्वामी आजोबांनी खेड गावच्या  नारायणभटास शके १७९२ आश्विन शुध्द ३ रोजी गिरीवर दर्शन दिले असा उल्लेख आहे. 

हे सर्व चमत्कार स्वामी समर्थांनी लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी केले.   आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने लाकूडतोड्या उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले.गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. काली माता बोले संगे |नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. बोले कन्याकुमारी ही |

अन्नपूर्णा ज्याचे हाती | 
बखरीमध्ये १९२ व्या ’अन्नपूर्णेकडील भोजन’ कथेत स्वामी आजोबा कोनळी गांवच्या रानातून सुमारे १०० सेवेकर्‍यांसोबत जात होते व त्यांनी सकाळपासून स्वत:ही कांही खाल्ले नव्हते आणि सेवेकर्‍यांनाही कांही खाऊ दिले नव्हते.  जेव्हा सेवेकरी स्वामींना कांही खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याविषयी आज्ञा देण्यासाठी प्रार्थना करीत होते तेव्हा स्वामी सेवेकर्‍यांना म्हणाले होते की चला तुम्हाला अन्नपूर्णा जेऊं घालणार आहे. स्वामी आजोबा कोणाचेंहि न ऐकता कोनळी गांवच्या त्या रानातील कांट्यातून चालत राहिले. असे होता होता दिवस मावळू लागला व सेवेकर्‍यांपैकी श्रीपादभट स्वामींच्या वाटेत आडवा पडला व सर्वांच्या वतीने अन्नासाठी विनवू लागला. तोपर्यंत रात्र झाली असल्याने श्रीपादभटांनी स्वामींना एवढ्या मंडळींस भोजन कोठून मिळणार असा साहजिक प्रश्न विचारला असता , स्वामी आजोबांनी हेच उत्तर दिले होते की "त्या पलिकडच्या मळ्यांत जा. अन्नपूर्णा वाट पाहत आहे.
अर्थातच स्वामींची अमोघ वाणी ! पलिकडच्या मळ्यांत एक पोक्त बाई उभी होती , जिने शिजविलेले सर्व अन्न व पाणी दिले. सेवेकर्‍यांनी जेव्हा त्या बाईस स्वामींच्या दर्शनाला चलण्यास सुचविले , तेव्हाही त्या बाईने ," माझा नमस्कार सांगा . माझें नाव अन्नपूर्णा . मी मागाहून दर्शनाला येते. तुम्ही चला पुढे ! हे उद्गार काढले होते.
सेवेकर्‍यांना जेव्हा स्वामी आजोबा म्हणाले की "ती आमच्याच कुटूंबातील होती, तेव्हा कुठे सेवेकर्‍यांना लक्षात आले की स्वामी जे म्हणत होते की " अन्नपूर्णेकडे भोजनाला चला." तर हीच ती मातोश्री , संपूर्ण जगाला अन्न पुरविणारी ! नंतर त्या  सर्वांना खूप वाईट वाटले की काय आम्ही पापी , अज्ञानी ! तिचें दर्शनही घेतले नाही. नमस्कार केला नाहीं.
ही कथा स्पष्टपणे स्वामी आजोबांचे व जगज्जननी अन्नपूर्णा मातेचे नाते दर्शविते असे वाटते.      

भारताच्या कानो कानी | गेला स्वये चिंतामणी | सुखी व्हावे सारे जन | तेथे धावे जनार्दन || 

संत हे लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या धारणेसाठी आणि लोकांच्या आत्मिक, पारमार्थिक ऐश्वर्यासाठीच असतात ते दुसर्यांना सुखाने सुखावणारे असतात.
स्वामी समर्थांनी समाजातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी करून तेथे सत विचारांची पुनर्स्थापना केली. दुःखी, पिडीत लोकांवर कृपेचा वर्षाव केला. इच्छुक भक्तांना स्मरणात राहील असा अनुभव देऊन प्रेमबंधनाने आपलेसे केले. स्वामी समर्थांना श्रीमंत व गरीब सारखेच मानीत. त्यांना साधा भोळा भक्तीभाव आवडत असे. त्यांच्या अंतरी जनसामान्यांविषयी अपार प्रेम होते. 

सर्वत्र भारतवर्षात भ्रमण करून नंतर स्वामी आजोबा अक्कलकोटात (प्रज्ञापुरी ) दीर्घ काळ वास्तव्य करून होते. प्रज्ञापुरी स्थिर झाला |  

स्वामी समर्थ अतिशय तेजःपुंज होते. कोटी सूर्याचे तेज त्यांच्या मुखावर विलसत असे. डोळ्यात अपरंपार कारुण्य होते. भक्तांवर संकट कोसळले तर ते दूर करत.      
प्रज्ञापुरी स्थिर झाला | माध्यान्हीच्या रविप्रत  

“स्वामी समर्थ तारक मंत्र”

नि:शंक हो | निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे || 
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी || १ ||
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय || 
आज्ञेविना काळ ना नेई त्याला | परलोकी ही ना भीती तयाला || २ ||
उगाची भीतोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे ||
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा || ३ ||
खरा होई जागा | श्रद्धेसहित | कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त || 
कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू | स्वामी देतील साथ || ४ ||
विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात || 
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती |न सोडी कदा स्वामी जया घेई हाती || ५ ||

कोणतीही संकटे आल्यास स्वामींचा हा अद्भुत व निराळा तारक मंत्र म्हणावा. संकटे दूर होतात आणि स्वामी आजोबांची वैखरी " भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" ह्याची खूण पटतेच, पटते १०८%!

स्वामी समर्थांचे चोळाप्पा आणि बाळाप्पा नावाचे २ अत्यंत प्रेमळ भक्त होते, त्यांची भक्ती , त्यांच्यासारखे निर्मळ, निर्व्जाज प्रेम करता यावे आणि विभक्तीचा अंशही जीवनात न उरो हीच स्वामी आजोबांच्या चरणी प्रार्थना करू या -
               चोळप्पाचे प्रेम हवे मज बाळाप्पाची भक्ती हवी 
               विभक्तीचा अंश नको मज स्वामी तुमची कृपा हवी ....
    
अभयदाता श्री स्वामी समर्थ आजोबांच्या चरणीं कोटी कोटी लोटांगण आणि मानवी जीवनाचा हा जीवनयज्ञ त्यांनी दाखविलेल्या भक्तीमार्गावर चालून त्यांच्या चरणी समर्पित होवो  हीच आजच्या मंगलदिनी स्वामी आजोबांच्या चरणी प्रार्थना...

संदर्भ: 
             १, श्री स्वामी समर्थ - बखर  

2 comments:

  1. Apratim lekh Suneetaveera... Shri Swami samartha jai jai swami samartha aajoba shri swami samartha jai jai swami samartha

    ReplyDelete
  2. हरी ओम सुनितावीरा,

    श्री स्वामी आजोबंवरील लेख खूप भावला मनाला...बखरी मधील संदर्भांनी श्री स्वामी स्तवन अधिक सुंदररित्या समजले...खरच आपला बापुराया खूप great आहे..त्या भगवंताशी असलेलं आपलं नातं बापूनी खूप सहज, सोपं आणि प्रेमळ करून दिलंय...इतकी सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप अम्बज्ञ वीरा..

    राक्षवीरा संदेश्सिंह शिंगरे

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog