आज आपल्या भारत देशाचा स्वातंत्रदिन १५ ऑगस्ट . भारतभूमीला खर्या अर्थाने विकसित देश म्हणून नावालौकिकाला आणण्याचे नुसते स्वप्न स्वत: न पाहता, ते सत्यात उतरविण्याचा दृष्टीकोन करोडो भारतीयांना देणारा आणि त्या दिशेने भारतीयांची वाटचालही करवून आणणारे भारतमातेचे महान , थोर सुपुत्र म्हणजेच डॉक्टर अब्दुल पी जे. कलाम !
अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (ऑक्टोबर १५, १९३१ - २७ जुलै २०१५) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते .
डॉक्टर अब्दुल पी जे. कलाम - भारतमातेला लाभलेले परमात्म्याचे अनमोल "दृष्टी " वरदान !
भारतमाता आपल्या कुशीतून ज्या नररत्नांना प्रसवून आपले मातृत्त्व सार्थकी लागल्याचा अभिमान बाळगते, धन्यता मानते अशा थोर , महान सुपुत्रांपैकी एक म्हणजे डॉक्टर अब्दुल पी जे. कलाम होय.
' जगण्याला जीवन म्हणावे अशी माणसे शतकातून एखाद्या वेळेला जन्माला येतात' - पु.लं.चं हे वाक्य सोदाहरण पटविते अशी काही हाताच्या बोटावर मोजण्या इतकी दुर्मिळ व्यक्तीमत्त्व आहेत आणि त्यापैकी सद्य काळातील एक म्हणजे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम !
लहानपणी बाळ ध्रुवाची गोष्ट वाचली होती की राजा पिता उत्तानपादाच्या मांडीवर बसून खेळण्याचा हक्क सावत्र माता हिरावून घेते आणि मग परमेश्वराची निश्चल भक्ती करणारी स्वत:ची माता आणि सदगुरु नारद मुनींच्या उपदेशानुसार साक्षात भगवान विष्णूची घोर तपश्चर्या करून अगदी बालवयातही ध्रुवाने आकाशातील तारामंडळात आपले अढळ स्थान बनविले, भक्तीच्या सामर्थ्यावर !
डॉक्टर कलाम ह्यांनी सुध्दा असेच अढ्ळ स्थान आज प्रत्येक भारतीयाच्या मनात नुसते बनवलेच आहे नाही तर कोरून ठेवले आहे जे कधीच काळाच्या प्रवाहातही पुसले जाणार नाही असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.
इस्रोच्या माध्यमातून भारताला शक्तिसंपन्न करणारा हा मिसाईल मॅन निश्चितच ईश्वराने दिलेल्या बहूमूल्य मानवी जीवनाचे खर्या अर्थाने सार्थक करणारा , सोने करणारा मानव असे मला तरी वाटते. प्रजापती ब्रम्हाने जेव्हा सृष्टीच्या उत्त्पत्तीमध्ये सर्वात शेवटी जी रचना केली त्याला "मानव " म्हणजे आता नव्याने काही जन्माला येणार नाही अशा अर्थाने ह्या बुध्दीप्रधान जीवाला नाव दिले असे वाचले होते. डॉ. कलाम ह्यांचे जीवन पाहता खरोखरीच पुन्हा नव्याने असा मानव जन्माला येणे केवळ अशक्य म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
डॉ.कलाम यांनी 'भारतरत्न' पुरस्काराची प्रतिष्ठा द्विगुणित केली. २००२ ते २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून डॉ.कलाम यांनी दिलेल योगदान अजोड आहे. राष्ट्रपती म्हणून डॉ.कलाम हा एकमेव आश्वासक चेहरा भारताची नवी आंतरराष्ट्रीय ओळख बनून राहिला आहे असे मत व्यक्त केले जाते ते उगाच नाही. जितक्या सहज त्यांनी राष्ट्रपतीपद संभाळले, तितक्याच सहज ते निवृत्तीनंतरचं नियमित जीवन जगले. कुठे बडेजाव नाही की भपका नाही. राष्ट्रपतीपद त्यांनी विश्वस्त म्हणून सांभाळले. आजच्या मालक म्हणून दिमाख मिरवणार्या बडेजावाने वावरणाऱ्यांसाठी तो उत्तम वस्तुपाठ आहे. निवडणुकीच्या राजकारणाचा तिटकारा म्हणून त्यांनी पुन्हा मिळणारी उमेदवारी नाकारली असे ऐकिवात आहे. इतका सरळ साधा सज्जन माणूस आपल्याला राष्ट्रपती म्हणून पुन्हा मिळणे केवळ अशक्यप्राय वाटते.
“It is very easy to defeat someone, but it is very hard to win someone” असे म्हणणार्या कलाम साहेबांनी मात्र लहान मुले, तरूण युवा पिढी असो की मध्यमवयीन वा वयस्क मंडळी असो अगदी आबालवृध्द सार्यांनाच आपलेसे केले होते. आपल्या आगळ्या व अनोख्या कार्यपध्दतीमुळे लोकप्रिय झालेला सार्या लोकांचा हा लाडका राष्ट्रपती ! कुणा भारतीयाला आज आवडत्या राष्ट्रपतीचे नाव विचारले तर जराही वेळ न दवडता अगदी सहजपणे "डॉ. अब्दुल कलाम" हेच नाव प्रत्येक भारतीयाच्या ओठावर येईल ह्यात तिळमात्र शंका नाही, ह्यातच डॉक्टर कलाम ह्यांच्या अफाट लोकप्रियतेचे, त्यांच्या बद्दल असणार्या लोकांच्या मनातील आत्मीयतेचे, जिव्हाळ्याचे दर्शन घडते.
"शुध्द बीजाचिया पोटी फळे रसाळ गोमटी" ह्या उक्तीचे प्रत्यंतर डॉक्टर कलाम ह्यांच्या लहानपणाकडे पाहिले असता कळते. त्यांचे वडील जैनुलब्दीन कलाम हे अत्यंत सात्विक वृत्तीचे, भगवंतावर अचल विश्वास आणि कोणत्याही संकटात न डगमगणारी भक्ती असणारे होते आणि त्याच बरोबरीने ते तितकेच लोककल्याण तत्पर असल्याचे कलाम ह्यांनी आपल्या " माझी जीवनयात्रा - स्वप्ने साकारताना" ह्या पुस्तकात सांगितले आहे. डॉक्टर कलाम लिहीतात माझ्या वडिलांचं औपचारिक शिक्षण फारसं झालेलं नव्हतं किंवा त्यांना त्यांच्या दीर्घ आयुष्यात फार ऐश्वर्यही कधी लाभलं नाही, पण मला आयुष्यात ज्या अत्यंत सुज्ञ व खरोखर उदार व्यक्ती भेटल्या, त्यामध्ये माझे वडीलही आहेत. ते कुणी प्रवचनकार नव्हते की शिक्षक! स्वत:ची श्रद्धा व आपल्या धर्माच्या तत्त्वांनुसार जगणारी ती एक व्यक्ती होती.
लहानपणीच्या वडिलांनी केलेल्या संस्काराच्या आठवणी सांगताना डॉक्टर कलाम म्हणतात एकदा आईच्या हातून भाकरी करपली तरी वडील खूप समजूतीने वागतात आणि आईवर चिडत नाही, उलट करपलेली भाकरी मला आवडते असे सांगून आपल्या बायकोला दु:खी करीत नाही. लहानग्या अब्दुल कलामांना नवल वाटते आणि ते वडीलांना रात्री तुम्हाला खरेच करपलेली भाकरी आवडते का असा बाळबोध सोपा प्रश्न विचारतात त्यावर वडीलांनी दिलेल्या उत्तराने अब्दुल कलाम ह्यांना माणुसकीने माणसे कशी जोडायची आणि इतरांची मने कशी सांभाळायची असतात ह्याचे अनमोल शिकवण दिली, जी त्यांनी आयुष्यभर आपल्या आचरणात संपूर्णपणे बिंबवलेली दिसते.
डॉ.कलाम यांनी लिहिलेली ( काही ) ग्रंथसंपदा :
* इग्नाइटेड माइंड्स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
* ‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन);
‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया – माय-ड्रीम एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
* ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
* विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक :माधुरी शानभाग.
* सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
* टर्निंग पॉइंट्स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
* दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)
* अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तकं :
* इटर्नल क्वेस्ट : लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
* ’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद – मंदा आचार्य).
* ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
* प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक :आर के पूर्ती)
* रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां. ग. महाजन)
अग्नीपंख (The WINGS OF FIRE) - देशातील भारतरत्न हा सर्वोच्च नागर सन्मान मिळवणारे आमचे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्यांचा त्यांच्या कालावधीतील १९९२ पर्यंतचा प्रवास वर्णिला आहे. या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष दाखविला आहे. तर दुसर्या बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघर पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण ही फार सहज सोप्या भाषेत सामान्य माणसाला समजेल अशा सुंदरपणे वाचकांना सांगितलेली आहे. हे पुस्तक केवळ डॉ. अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र नसून स्वतंत्र भारत्याच्या तंत्रज्ञानाविषयक लढाईचे एक स्पंदन आहे असे मत मांडले जाते. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे. तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहर्षक खंडकाव्यच आहे.
सकारात्मक दृष्टीकोन(Positive attitude) ह्याचा अर्थ सोपा करून देणारा आणि जीवनातील नैराश्य संपवायचा महामंत्र देणारा हा महान द्रष्टा !