दीपावली असो वा कार्तिक पौर्णिमा असो दीप उजळवून अंधकाराचा नाश करण्याची शिकवण देणारे हे भारतवर्षातले सण वा उत्सव आपल्याला आपल्या आदर्श, महान भारतीय परंपरेची ओळखच करून देतात जणू काही ! दिवे लावून परमेश्वरी कृपेच्या सत्याचा उजेड आपल्या मनात पडावा यासाठी असे दीपोत्सव आवश्यक असतात आणि त्यांपासून प्रेरणा घ्यायची असते ती निराशाजनक वातावरणातही न डगमगता खंबीरपणे, मनोधैर्य उंचावून , "त्या" एकावर , "त्या"च्या अगाध सामर्थ्यावर अढळ , अविचल श्रध्दा ठेवून जीवनात, "त्या" भगवंताच्या तेजाचा वारसा जागवायचीच असे मला वाटते.
आपल्या भारतवर्षातील बहुतेक सण, उत्सवांमागील कथा या दुष्ट-निर्दालनाच्या असतात. यावरून असे लक्षात येईल की आपण पराक्रमाचे पूजक आहोत. पण पूजा करून पराक्रम विसरून गेलो तर काय उपयोग? सांप्रतकाली आपली तशीच अवस्था झाली आहे असेच चित्र दिसू लागले आहे व ते पाहून संभ्रम पडतो की क्षात्रतेज आटू लागले आहे की काय? रणधुरंधर योध्दा बनून संकटाशी झुंज देण्याचे , लढवय्या वृत्तीचा परिपोष करून प्रारब्धावर मात करण्याची आम्हा भारतीयांची झुंजार वृत्ती , रणमर्दानी शक्ती कुठे लोप पावत चालली आहे का? सैन्यात जाऊन पराक्रम गाजवण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा आम्ही सुखासीनता आणि चंगळवादी भोग संस्कृतीचे पुजारी बनून अध:पतनाकडे तर नाही झुकत आहोत ना? छत्रपती शिवराय, राणा प्रताप, गुरू गोविंदसिंह, शंभू राजे, पहिला बाजीराव , सावरकर, भगतसिंग अशा क्रांतिकारक वीरांची चरित्रेच आजच्या पिढीला माहिती करून घ्यायलाच हवीत आणि त्यांच्यातील असीम पराक्रम अंगी बाळगायला हवा , त्यांची संकटांवर विजय मिळविण्याची इच्छा, तेज, साहस आणि क्षात्रवृत्ती परत नव्याने चेतवायला हवीच ....अन्यथा मरगळ आलेल्या समाजाची दैन्यावस्था पाहून -
कुसुमाग्रजांसारख्या कवीला खंत व्यक्त करण्याची दुर्दैवी पाळी ओढावते -
सूर्यकुलाचा दिव्य वारसा, प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे।
काळोखाचे करूनी पूजन, घुबडाचे व्रत वरू नका।।..........
भानु म्हणजे सूर्य त्यावरून "भारत " ह्या शब्दाचा मला भावलेला अर्थ म्हणजे -
"भा' म्हणजे तेज आणि "रत' म्हणजे नित्य पूजन करणे. तेजाचे पूजन करणारा तो भारतीय. नुसताच भारतात राहणारा तो भारतीय असे नव्हे! म्हणूनच आपली भारतीय हिंदवी तेजोमयी संस्कृती असा दिव्य संदेश देते आपल्या सणांतून , उत्सवांतूनही !
त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच कार्तिक पौर्णिमा . कार्तिक महिन्यातील शुध्द पक्षातील ही पौर्णिमा "त्रिपुरारी पौर्णिमा"म्हणून साजरी केली जाते.
त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे मानवी जीवनात प्रकाश, उजेड, आनंद देणारा उत्सव. आपल्या मनातील क्रोध, द्वेष, मत्सर नाहीसा करून भगवान शिव-शंकराची पूजा करावी, आराधना करावी व सुख-शांती याची मागणी करावी. असा संदेश या उत्सवातून मिळतो.
आता त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करण्यामागची जनमानसांतील कथा बघू या....
कार्तिक शुध्द पौर्णिमा म्हणजेच त्रिपु्रारी पौर्णिमेशी निगडीत कथेशी रांजणगाव व महागणपतीच्या आणि महडच्या वरदविनायकाचा संबंध आहे असे अष्टविनायक महात्म्य वर्णिते.
रांजणगाव - महागणपती - त्रिपुरारी पौर्णिमा |