Wednesday, 29 June 2016

" तू फक्त माझाच आणि मी फक्त तुझाच "

दोन जीवलग सख्यांमध्ये संवाद चालला होता - 
अग स्वराली , माझ्या बछडीची एक गंमत तुला कधी सांगते असे झाले... तिचे वाक्य अर्धवट असतानाच स्वराली मुग्धाचा हात  हातात धरत म्हणाली ," अग सांग ना लवकर काय नवीन गंमत केली आपल्या प्रिन्सेसने.... गोडच आहे भारी सानिका आपली. आता काय नवीन पराक्रम केला ...

बहुधा लहान मुले म्हणजे घरातील , मित्र-मैत्रिणींच्या घोळक्यातील अत्यंत आवडीचा , जिव्हाळ्याचा विषय असतो. आपली छकुली, सोनुली , बछडी ही प्रत्येक आई-बाबांची राजकन्या असते तर आपला सोनुला हा राजकुमार असतो जणू. आजकालच्या घड्याळाच्या धावत्या काट्यांसोबत सतत धावत राहणार्‍या ,नोकरी सांभाळत घर , संसार करणार्‍या स्त्रियांना तर आई झाल्यावर दिवसाचे २४ तास पण कमी पडतात असे भासू लागते. त्यात घरात लहानग्यांना सांभाळायला हक्काचे आजी-आजोबा असेल तर सुटकेचा नि:श्वास टाकता येतो नाहीतर पाळणाघर , बालसंगोपन केंद्र ह्यांच्या मागे धावताना  जीवाची प्रचंड घालमेल तर होतेच पण अनाहूत काळजी , चिंता ह्यांची टांगती तलवारच मानेवर कुणी धरली आहे अशी बिकट परिस्थिती रोजच अनुभवावी लागते. 

आजी-आजोबांसाठी आपल्या मुला-मुलींची मुले - त्यांची नातवंडे - नात असो वा नातू ही दूधावरची सायच असते. अगदी प्रेमाने , मायने,लाडा-कोडात ती लहान बाळे सांभाळतात-स्वत:च्या उतरत्या वयाची , थरथरत्या हाता-पायांची , थकलेल्या शरीराची पर्वा न करताही ! त्यामुळे आई-बाबा सुध्दा निर्धास्त होतात...

तर अशा ह्या लहानग्या बछड्यांना त्यांची आजी - आजोबा हे खूपच आवडतात , त्यांना त्यांच्या प्रेमाच्या वाट्यात दुसरा कोणी वाटेकरी झालेला मुळीच पंसद नसते. तीच सानिकाची गंमत स्वरालीला मुग्धाला कधी सांगते असे झाले होते...

सानिकाला तिची आजी खूप खूप खूप आवडते. आजीला कोणी माझे म्हटले की सानिकाने जोरात रडायला सुरुवात केलीच. मोठ्याने भोकाड पसरून छोटीशी सानिका रडून रडून घर डोक्यावर घेते. आजी फक्त माझीच आहे, मी नाही कुणाला देणार तिला ... 

त्या दिवशी सकाळी सानिकाच्या भावाने तिला चिडवायला आजी माझी माझी म्हणून डिवचले आणि ह्या बाईसाहेबांनी रडून रडून एकच आकांत मांडला . आजी फक्त माझीच आहे, आजी फक्त माझीच आहे , ए आजी तू सांग ना दादाला तू त्याची नाहीस , तू फक्त माझी आणि माझीच आहेस. आजीने किती समजावले , सानिकाच्या दादाला दमही दिला खोटा खोटा पण नाहीच मुळी... 
सानिका आजीबरोबर तिच्या महिला मंडळात संध्याकाळी गेली तरी तिचे पालुपद चालूच होते .. आजी तू फक्त माझीच आहे. महिला मंडळातील बाकीच्या दुसर्‍या आज्यांशी सानिका भांडली देखिल.. ही फक्त माझीच आजी. तुमची नाही कुणाची. शेवटी सगळ्या आजींनी कबूल केले ही फक्त तुझीच आजी , तेव्हा आमच्या सानिकाच्या चेहर्‍यावर हसू आले. आता काय म्हणायचे ह्या पोरीला ... किती लहान आहे ती .. काय समजवणार तिला ... आजीची पुरती वाट लागली तिला समजवताना...

खरेच किती सुंदर असते हे आपुलकीचे नाते, "तू फक्त माझा आहेस आणि तू फक्त माझीच आहेस. "
किती हक्क, किती आपलेपणा, किती प्रेमाचे नाते हे घट्ट रेशीम धाग्यांनी विणलेले असते ना , हळूवारपणे... प्रेमाची बांधिलकी मनाने ,बुध्दीने आपणहून स्विकारलेली, कुठेही जबरदस्ती नसते, कुठेही अट नसते, जर-तर ची व्यवहारी गणिते नसतात... 

लहान मुले म्हणजे देवाघरची फुलेच जणू त्यांच्या भोळ्या,निष्पाप, निर्व्याज भावाने माणसाचे मन गहिवरून गेले नाही तरच नवल ! कुठेही लबाडी नाही , कुठेही कपट नाही , कसलीही कटुता नाही, कोणताही आडपडदा नाही, किती सरळ , साध्या , सोप्या मोकळ्या मनाने ती नाती बनवतात.      

ह्यावरून आठवली ती भक्त बाळ प्रल्हादाची गोष्ट! भगवान विष्णूंची भक्ती करणार्‍या कयाधू आणि राक्षसकुळातील हिरण्यकश्यपू ह्यांचा प्रल्हाद हा पुत्र! खरेतर 
कयाधूच्या भक्तीभावातूनच ह्याचा जन्म झाला म्हणल्यास वावगे ठरणार नाही. जन्मत:च प्रल्हाद हा नारायणाच्या , हरीच्या भक्त्तीत आकंठ बुडालेला ! आता झाली का पंचाईत , येथे हिरण्यकश्यपूला तर कोणी देवाचे नाव उच्चारलेले सुध्दा चालत नसे आणि त्याचा स्वत:चा मुलगा प्रल्हाद तर देवाच्या भक्तीत मंत्रमुग्ध झालेला. प्रल्हादाच्या तोंडी सतत देवाचे नाव असायचे , शेवटी राजा हिरण्यकश्यपूने स्वत:च्याच मुलाला प्रल्हादाला शिक्षा करायचे ठरविले , काळजाचा थरकाप उडविणार्‍या एकाहून एक कठोर शिक्षा होत्या , उकळत्या तेलात टाकले, हत्तीच्या पायाखाली दिले , उंच डोंगराच्या कड्यावरून कडेलोट केला , होळीच्या सणाच्या दिवशी होळीच्या आगीत घातले तरी प्रल्हादाचा केसालाही धक्का पोहचला नाही कारण बाळ प्रल्हादाचा अनन्य भाव आणि भक्ती होती त्या महाविष्णूवर
"तो फक्त माझाच आहे आणि मी फक्त त्याचाच आहे " तुझ्यावाचून मला आणखी दुसरे कुणीच नाही. माझ्यासाठी माझे सर्व काही तूच आहे... अशी कळवळ्याची हांक ऐकून  "तो" भक्तवत्सल , करूणासिंधु, दया-कृपा सागर नाही हेलावला तरच नवल ! 
प्रत्येक संकटात माझा देवबाप्पाच माझा आहे , "तो"च माझा सांभाळ करेल हा भाव होता प्रल्हादाच्या मनात . जेथे प्रेम आणि अपार विश्वास असतो ना तेथे भीतीचा लवलेशही उरतच नाही मुळी. 
जेव्हा जेव्हा नात्यात "तू माझाच आणि मी तुझाच " हा "च " येतो ना तेव्हा तो प्रेमाचा , आपुलकीचा रेशीम बंध कोणी कोणी तोडूच शकत नाही. 
म्हणूनच संत मंडळी पण आपल्या भगवंताशी असेच घट्ट प्रेमाचे , आपुलकीचे नाते विणायला शिकवतात . 


संत मीराबाईच्या श्रीकृष्ण भक्तीचा महिमा काय वर्णावा " मेरे तो गिरीधर गोपाल दूसरो न कोई "
संत जनाबाई रोजच्या घरकामांतून शेणाच्या गोवर्‍या थापताना, धुणी धुताना , भांडी घासताना, दळण दळताना तिच्या लाडक्या विठू माऊलीचे नाव सतत प्रेमाने आळवीत राही " देव माझा विठू सावळा , माळ त्याची माझिया गळा " 
संत नरहरी सोनार देवाला साद घालतात - देवा तुझा मी सोनार , तुझे नामाचा व्यवहार ..

आपल्या सर्वांचे लाडके छत्रपती शिवाजी महाराजही आपल्या कुलदैवत असणार्‍या तुळजापूरच्या भवानी मातेशी अशाच प्रेमाच्या नात्याने , अनन्य भावाने बांधले गेले होते " हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा ! असेच उद्गार ते नेहमी काढीत . "जय जगदंब " म्हणून ते आपल्या भवानी मातेचा , जगदंबा मातेचा उदोउदो करीत. 

श्रीसाईसच्चरितात साक्षात सदगुरु साईबाबा स्वत: सांगतात माझ्या सदगुरुंनी मला दुसरे काही शिकविले नाही. ना त्यांनी माझे कान फुंकले ना त्यांनी मला कोणता गुरुमंत्र दिला . "तू मजकडे अनन्य पाही , पाहीन मी तुज ऐसेच " म्हणजेच तू मला अनन्य भावाने पाहा , मला तुझ्याशिवाय दुसरे कुणीच नाही , तू एकमेव माझा आणि फक्त माझाच आहे ." आणि मग मी (सदगुरु ) पण तुला त्याच अनन्य भावाने पाहीन . 

आपण आपल्या देवाशी असे नाते जोडायला शिकले पाहिजे. संकट समयी , कठीण प्रसंगी आपण त्याला साद घालतोच. पण एरव्ही सुध्दा मी माझ्या देवाला प्रेमाने हाक मारली , त्याचे नाव घेतले तर त्याला ते खूप आवडते. मला तू हे दिलेस तर मी तुला सोन्याचा मुकूट देईन, चांदीचे तबक देईन, ११ नारळाचे तोरण वाहीन , पाच किलो मोदक देईन ...कशाला असला देवघेवीचा व्यवहार ... 
त्यापेक्षा आपण प्रेमाने नाव घेत राहू "तो" प्रेमाचा भुकेला श्रीहरी भोळ्या भावालाच भुलतो 
शबरीची उष्टी बोरे मोहविती ह्याला , हावरा हा भक्ती प्रेमा विके कवडी मोला 

ह्या शब्दांनी माझ्या मनाला अधिकच भुरळ घातली आणि देवाशी आपले नाते कसे असावे ह्याचा मार्ग दाविला

नको गोकुळीचे लोणी नको द्वारकेचे हिरे 
मज हवे माझ्या देवा फक्त सर्व तुझे होणे 

काय अप्रतिम मागणे आहे ह्या शब्दांमध्ये , हे माझ्या लाडक्या देवा मला तुझे वैभव नको , मला ना कसल्या अन्नाची , पक्वानांची आस , पण माझ्या देवा मला फक्त तुझेच आणि सर्वस्वी तुझेच होऊन राहायचे आहे .... 

चला तर मग देवाशी असे अनन्य भावाचे नाते घट्ट विणू या ..." तू फक्त माझाच आणि मी फक्त तुझाच ..." 


  

Tuesday, 21 June 2016

"एक पानी डायरी " - वेळेचे नियोजन

हा हा , अरे डायरी कधी एक पानाची असते का  बाबा ?  सर्व मित्रांमध्ये अतुल आणि त्याची "एक पानाची डायरी " हा हास्याचा विषय बनला होता.  

अतुल त्याच्या मित्रांना कळवळून  समजावून सांगायचा प्रयत्न करत होता. कोणी त्याची मस्करी करत होते , तर कोणी खिल्ली उडवत होते. 

वेळेचे नियोजन म्हणे करणार ? तेही एका पानाच्या डायरीने ? 

शेवटी काही मित्रांनी अतुलचे म्हणणे ऐकून घ्यायचे ठरविले . अतुल आता उत्साहाने सांगू लागला मित्रांनो बघा आपल्याला नेहमीच्या कामांव्यतिरीक्त रोज काही ना जास्तीची कामे करायची असतात.  मग ते कधी विजेचे बिल भरायचे असेल तर कधी कोणत्या विमा पॉलिसीचा हफ्ता भरायचा असेल. एवढेच काय तर कधी कोणाचा वाढदिवस असतो तर कधी कोणाच्या लग्नाचा वाढदिवस. आपण  त्या व्यक्तीला शुभेच्छा देण्याचे ठरवतो देखिल आणि कामाच्या घाई गडबडीत आपण कधी विसरून जातो ते कळत देखिल नाही. 

हो ना दोस्ता, काल परवाचीच गोष्ट बघ ऑफीसमध्ये आमच्या मॅनेजर साहेबांचा वाढदिवस होता. रात्री ठरविले सुध्दा की सकाळी ऑफीसात पाऊल टाकताच साहेबांना शुभेच्छा द्यायच्या आणि सकाळी विसरूनच गेलो पार. संध्याकाळच्या चहाच्या वेळी आठवण झाली आणि शेवटी साहेबांची नाराजीला सामोरे जावे लागले. 

अरे मी पण आमच्या सौभाग्यवतीने फर्माईश केलेल्या काही वस्तू न्यायला विसरून गेलो ऑफीसच्या टेन्शन मध्ये आणि मग काय बाईसाहेबांच्या रागाचा पारा जो चढला की विचारता सोय नाही बघ बाबा...

अतुलने मग सांगितले ह्यावर सोपा उपाय बघा आहे माझ्याकडे तो हा "एक पानाच्या डायरी" चा ! 
आता सर्वच जण कान टवकारून बसले. 

चला तर पाहू या "एक पानी डायरी " म्हणजे काय?


अतुलने मग समजाविले की एक छोटीशी पॉकेट साईझची डायरी (खिशात मावेल) अशी घ्यायची. त्याच्या एका पानाचे मधोमध रेषा मारून दोन सारखे भाग करायचे . एका डाव्या कडच्या भागात आदल्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी करायच्या बाकी राहिलेल्या गोष्टी लिहायच्या आणि दुसर्‍या उजवीकडील भागात मला आज करायच्या गोष्टी, आठवलेल्या गोष्टी , सुचलेल्या गोष्टी, वाढदिवस , लग्नाचा वाढदिवस , कोणाचा नवीन पत्ता, बदलेला फोन नंबर , मोबाईल नंबर अशा गोष्टी लिहायच्या . 
आता लिहीलेल्या गोष्टी जशा जशा आपण करू तशा तशा त्यावर टिक मार्क करून ठेवायच्या म्हणजे किती केले आणि किती बाकी राहिल्या ह्याचा अंदाज घेत राहायचा. 
अरे बाबा, पण त्यासाठी डायरी उघडावी लागणार ना सारखी ? 
सुरुवातीला सवय नसते तेव्हा जड जाते, कठीण वातते , पण जमले की सोपे वाटते बघ ... अतुल नव्या जोमाने पटवून देत होता. 
दोन तास , तीन तासाने डायरी उघडून बघायची आणि खुणा करायच्या की काम एकदम सोपे होते बघा. 
रात्रीत झोपायच्या आधी पुन्हा एकदा तपासायचे , त्या दिवशीच्या  राहिलेल्या गोष्टी नवीन पानावर लिहायच्या आणि ते आजच्या दिवसाचे पान फाडून टाकायचे. 
य़ेस ! अतुल संध्याकाळी घरी जायच्या आधी आठवणीने डायरी तपासली की घरी जाताना न्यायचे सामान , वाटेवर करायची कामे आठवली की घरच्या कटकटी, भांडणे एकदम बंद होतील... 
कधी बिल भरायचे राह्ते तर कधी शाळेची फी, क्लासची फी भरायची शेवटची तारीख विसरायला होते ... एक ना दोन कितीतरी छोट्या वाटणार्‍या गोष्टी वेळेत केल्याने आपलीच डोकेदुखी कमी होते. 

अतुलचे म्हणणे मित्रांना आता पटू लागले होते. वेळेचे नियोजन करायला शिकायलाच पाहिजे. 
सुरेशने विचारले ए अतुल तुझी डायरी बघू ना ? मग सर्व मित्रांनी अतुलची डायरी पाहिली त्या दिवशीच्या पानावर अर्ध्या भागात कालच्या राहिलेल्या गोष्टींची नोंद होती तर अर्ध्या पानावर आजच्या करायच्या गोष्टी...
सुरेश वाचू लागला ... आजच्या पानाचा भाग 
१. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या आणि २ ग्लास कोंमट पाणी पिणे.
२. आन्हिक 
३. व्यायाम - सूर्य नमस्कार / चालणे - १ तास 
४. शताक्षी प्रसाद खाणे 
५. जेवायच्या आधी अर्धा तास औषधे 
६.  संध्याकाळी MRI Report घरी नेणे 
७.  आईची डायबिटीसची औषधे आणणे
८.  रात्री ह्नुमान चलिसा (३) 

त्यातील पहिल्या ५ गोष्टींवर टिक मार्क करून त्या खोडल्या होत्या. 



रमण म्हणाला अतुल तू अजून पण व्यायाम करतोस , शाळा- कॉलेज संपले आणि व्यायाम बंदच झाला होता बघ... परत सुरु करायला हवा ...

कार्तिक खट्याळपणे म्हणाला हनुमान चलिसा कशाला रे ? आता कोणासाठी ?
अतुल हसत हसत म्हणाला माझ्या मनुसाठी ! तिचे दहावीचे वर्ष आहे ना , महत्त्वाचे , तिचा अभ्यास नीट व्हावा, परीक्षेची भीती वाटू नये म्हणून संकटमोचक हनुमानाची प्रार्थना करतो रे मी... 

अतुलने सांगितलेले "एका पानाच्या डायरी"चे महत्त्व आणि वेळेचे नियोजन बर्‍याच अंशी सर्वच मित्रांना पटले होते. 

कार्तिक परत अतुलला म्हणाला हे तुला आरती वहिनींनी शिकविले का? 

अतुल उत्तरला , नाही रे बाबा. माझ्या सदगुरुंनी शिकविले . "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" असे आपण म्हणतो ना , त्याची प्रचिती म्हणजे माझे सदगुरु! 
एवढा कामाचा व्याप , एवढे कामाचे नियोजन आम्ही त्यांच्या कडूनच शिकलो सारे. कोणत्याही गोष्टीचे कामाचे नियोजन कसे करायचे हे त्यांनीच आम्हाला त्यांच्या प्रत्येक कृतीतून शिकविले बघ.

सुरेश सांगू लागला अरे मी "श्रीसाईसच्चरित " रोज वाचतो . त्याच्या पहिल्याच अध्यायात साईबाबा गहू दळतात ती कथा येते. त्यात साईबाबा एका सकाळी गहू दळायला बसायच्या आधी उठून स्वत:ची नित्यकर्मे नीट करतात. दात घासतात, तोंड धुतात. मगच बसतात. गहू दळायच्या आधी पण किती ती तयारी . जाते घेतात , खुंटा घट्ट रोवला का हे तपासून बघतात, कफनीच्या अस्तन्या वर सारतात , कफनीचा घोळ आवरतात .... माझा साईनाथ मला त्याच्या वागण्यातून शिकवितो की मी माझी रोजची कामे कशी नीट करावी , कोणत्या कामाआधी ते नीट व्हावे म्हणून कशी काळजी घ्यावी....

रमण अरे ह्याच संबंधी मी एक सुंदर लेख वाचला आहे साईबाबांचा. त्यात लेखकाने सांगितले की दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठायचे तर मला रात्री झोपताना घड्याळात गजर किंवा मोबाईलमध्ये अलार्म लावावा लागतो तसे मला सकाळी उठल्यावर देवाचे नाव घ्यायचे असेल तर रात्री झोपताना देवाचे नाव घेत झोपायला पाहिजे. म्हणजे तो देवच मला सकाळी जागे करताना त्याचे नाव वदवून घेतो.....

सुरेश ", हो साईसच्चरितात अशी ह्या अर्थाची एक कथा येते. लेखक हेमाडपंत रात्री रामनाम घेत झोपतात आणि दुसर्‍या दिवशी उठताना त्यांच्या मुखात रामनामच येते पहिले. साईबाबा त्यांना खूणही पटवून देतात....
अरे रमण तू जो लेख वाचला त्याची लिन्क मला दे , मी पण वाचतो ....

रमण सुरेशला त्या लिन्कची मा हिती देतो http://www.newscast-pratyaksha.com/shree-sai-satcharitra-adhyay1-part32-hindi/
ह्या संकेतस्थळावर जाऊन भेट दे आणि वाच  तो लेख ! तुला तुझे साईबाबा नव्याने भेटतील आणि त्यांच्या वागण्याचा , त्या गोष्टीचा एक वेगळाचअर्थ वाचायला मिळेल. 

सदगुरु हा नेहमीच वेळेचे महत्त्व जाणतो आणि आपल्या शिष्यांना, भक्तांना स्वत:च्या कृतीतून ते पटवून देतो. वेळेचे नियोजन ही खरेच खूपच महत्त्वाची बाब आहे. 

धनुष्यातून सुटलेला बाण , तोंडातून निघालेला शब्द हा जसे मागे घेता येत नाही तसेच हातातून निघून गेलेला वेळ हा कधीच परत मिळवता येत नाही. म्हणूनच वेळेचे महत्त्व ओळखून आपण वेळीच वेळेचे नियोजन करायला शिकायला हवे . 

अतुलच्या  सदगुरुंनी सांगितलेला "एक पानी डायरी " चा उपाय मला खूपच आवडला आणि तो आचरणात आणून बघायचा मी प्रयास केला आणि खरोखरी मला वेळेचे महत्त्व कळले, जीवनाला एक नव्याने शिस्त लागली. 
मग काय अनुभवून बघायचे का आपण स्वत:च ? 

संदर्भ: 
१. श्रीसाईसच्चरित 
२. http://www.newscast-pratyaksha.com





प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog