Monday, 30 May 2016

द इम्पॉसिबल स्टेट



सध्याची उत्तर कोरीया आणि दक्षिण कोरीया मधील चिघळत जाणारी परिस्थिती पाहताअमेरिकेचे आशियासंबंधितविषयाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व्हिक्टर चा ह्यांचा ४ वर्षांपूर्वी दिलेला इशारा खरा होत आहे., असे दिसत आहे. व्हिक्टर चा ह्यांचे ४ वर्षांपूर्वी  ’ द इम्पॉसिबल स्टेट ’ ( The impossiblle state)  पुस्तक प्रसिध्द झाले होते. या पुस्तकात त्यांनी उत्तर कोरीया या देशाची मानसिकता आणि त्याचा जगाला असलेला धोका उलगडून सांगताना अनेक इशारे दिले होते.  

दोन महिन्यांपूर्वी उत्तर कोरीयाने आंतरराष्ट्रीय विरोधाला न जुमानता अणुचाचणी केली. त्यानंतर आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या. अमेरीकेची बेटेही या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात असल्याचा उत्तर कोरीयाचा दावा आहे. उत्तर कोरीया ज्या पध्द्तीने सध्या आक्रमकपणे हालचाली करत आहे, ते वाचून व्हिक्टर ह्यांच्या ’ द इमपॉसिबल स्टेट ’ ची आठवण झाली. ह्या पुस्तकात व्हिक्टर चा ह्यांनी उत्तर कोरीयाच्या झाकलेल्या भूतकाळावरील पडदा दूर केला आहे आणि भविष्यातील अनिश्चित आकस्मिक विध्वंस घडविण्याच्या शक्यतेवर वा त्यातून उदभवणार्‍या प्रखर भीषण वास्तवावर  प्रकाश टाकला आहे.   

उत्तर कोरिया हा दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलवर एका प्रचंड आक्रमणाची तयारी करीत आहे ज्यातून ताशी पाच लाख तोफखान्याच्या गोळ्यांचा धुवांधार वर्षाव डागला जाऊ शकतो आणि त्याच बरोबरीने ६०० रासायनिक बॉम्ब विमानतळाचा धुव्वा उडवून बेचिराख करू शकतात. उत्तर कोरियाच्या ह्या विनाशकारी हल्ल्यातून दक्षिण कोरियाला  मदतीचा हात द्यायला जराही विलंब न लावता  त्वरेने अमेरीका आणि दक्षिण कोरीयाचे इतर सहयोगी देश पुढे सरसावतील, ज्याची परिणती युध्दात होऊ शकते अशी चेतावणी व्हाईट हाऊसचे माजी सल्लागार  श्री ’व्हिक्टर चा' (Victor Cha) ह्यांनी ह्या पुस्तकात दिली आहे. उत्तर कोरीया जे युध्द पुकारण्याची तयारी करीत आहे, त्यात लाखो जीव आपल्या प्राणाला मुकू शकतात अशी भीती व्हिक्टर व्यक्त करतात.  

KIM Inspects ...

’ द इमपॉसिबल स्टेट ’ ( The impossiblle state)  पुस्तकातून उत्तर कोरीयाच्या युध्दाच्या अवाढव्य क्षमतेचा आढावा घेतला आहे. देशातील बहुतांश भाग हे अन्नधान्याच्या तीव्र कमतरतेने ग्रासलेले आहेत ज्यांना अन्नधान्यासाठी संयुक्त राष्ट्रांची मजुरी मिळाली होती. हुकूमशहा किम जॉंग-ऊन ह्यांच्या शासनकाळात लोकसंख्येच्या अन्न पुरवठ्याच्या मागणीला तोंड द्यायला असमर्थता आल्याने अब्जावधि लोकांना भुकेला आणि उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. दक्षिण कोरीयाने जनतेच्या मनात अशांती आणि असमाधान खदखदत असल्याचा दावा व्यक्त केला आहे. ह्या परिस्थितीवर मात करून नियंत्रण मिळविण्याकरिता किम जॉंग-ऊन ह्यांनी त्यांच्या सैन्याला दक्षिण कोरीयात घुसविण्याच्या योजना आखायचा आश्रय घेतला आहे. त्यांच्या सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी दक्षिण कोरीयाच्या राष्ट्र्पतिंच्या महालाची प्रतिकृती बांधून घेतली आहे. ह्या आक्रमणाचा खर्च हाअंदाजे १अब्ज डॉलर इतका असून एक ट्रिलियन डॉलर इतक्या किंमतीच्या मालमत्तेची नासधूस आणि नुकसान संभवते. 

ह्या हल्ल्याचे प्रमुख उद्देश्य उर्जा प्रकल्प आणि संपर्क यंत्रणेची नासधूस आहे ज्यातून संपूर्ण दक्षिण कोरीया हा जमीनदोस्त होऊन तेथे अराजकता, गोंधळ माजेल. व्हिक्टर ह्यांनी अशी चेतावणी दिली आहे की ह्या प्रसंगी जपान दक्षिण कोरीयाच्या मदतीसाठी मिसाईलसह एक जोरदार मुंसडी मारून तळ ठोकेल व युध्दात  उडी घेईल अशी दाट शक्यता आहे.  जपान हा किनारी भागात व्यस्त झाल्यावर उत्तर कोरीयाचे ७ लाख सैन्य आणि २० हजार शस्त्रास्त्रांनी सुसज्ज  टॅंक्स ( सुमारे ४७५ फूट खोल आक्रमण करण्यासाठी निर्माण केलेल्या बोगद्यांतून , ज्यापैकी काही प्रती ताशी ३०,००० सैन्याची वाहतूक करण्याची क्षमता  आहे  ) दक्षिण कोरीयात थेट घुसून विध्वंसक नरसंहार करतील असा व्हिक्टर ह्यांचा दावा आहे. हे सैन्य युध्दभूमीवरील सुमारे ५००० मॅट्रीक टन एवढा परीसर नर्व्ह गॅस, मस्टर्ड गॅस आणि जैविक शस्त्रात्रे वापरून दूषित करून करोडो लोकांना ठार मारतील असे मत  चा ह्यांनी व्यक्त केले आहे. 

उत्तर कोरीयाच्या  उत्कृष्ट प्रतिकार तंत्रामुळे शत्रूने प्रति-आक्रमण केले तरी त्यातून शत्रूचाच प्रचंड नरसंहारच होण्याची शक्यता अधिक आहे. उत्तर कोरीयाचे सैन्य हे जगातील अत्यंत भयावह सैन्यापैकी एक म्हणून प्रसिध्द आहे, ज्यातील सैन्य हे दर दिवशी ३१ मैलाचा अथक प्रवास ८८ पौड वजनाच्या सामानासह करू शकते.  ह्या सैन्याला घुसखोरी आणि गुप्त ऑपरेशनचे एवढे सखोल प्रशिक्षण दिले जाते की ज्यात स्वंयपाकाच्या भांड्याचा सुध्दा वेळप्रसंगी शस्त्रे म्हणून वापर करण्यात ते प्रवीण असतात. 

Troops march
हे अनपेक्षित आक्रमण हे अमेरीकेला आणि इतर पाश्चिमात्त्य राष्ट्रांना युध्दात खेचेल. ह्या संघर्षातून प्रचंड युध्दाच्या ज्वाळा पेट घेतील ज्याचे दोन्ही पक्षांना आघात सोसावे लागतील . उत्तर कोरीयाचे हे घणाघाती हल्ले पचवून त्याच्या  परिणामाला तोंड द्यायला अमेरीका , दक्षिण कोरीया आणि त्याच्या सहयोगी मित्र राष्ट्रांना फार मोठा काळ वाट पहावी लागेल. 

ह्या दरम्यान जरी उत्तर कोरीयन जनसंख्येला तीव्र अन्नधान्य टंचाईला सामोरे जावे लागत असले तरी ह्या देशाच्या सैन्य तळावर सहा महिने पुरेल इतक्या अन्न साठा आणि इंधन साठा  सुरक्षित साठवलेला आहे. येथील बंकर मध्ये  भरपूर ताज्या पाण्याचा साठा केलेला आहे आणि प्यॉनग्यांग राजधानीच्या खाली सुमारे १ लाख लोक राहू शकतील असा सुरंग (बोगदा) बांधून तयार केला आहे ही आश्चर्यजनक बाब आहे असे मत व्हिक्टर चा त्यांच्या पुस्तकात नमूद करतात. 


उत्तर कोरीया ज्या पध्द्तीने सध्या आक्रमक हालचाली करत आहे, अमेरीकेवर हल्ल्याच्या धमक्या देत आहे, ते पाहून व्हिक्टर यांच्या पुस्तकातील या गोष्टी आठवल्यावाचून राहत नाहीत. त्यामुळे व्हिक्टर ह्यांनी वर्तविलेला धोका जवळ येत असल्याचे जाणवत राहते. अर्थात उत्तर कोरीयाला चीनची फूस आहे, हे उघड आहे. उत्तर कोरीयाला अणु तंत्रज्ञानही पाकिस्तानमार्फत चीननेच पुरविले आहे. दैनिक प्रत्यक्षचे कार्यकारी संपादक डॉ. अनिरुध्द जोशी यांच्या ’तिसरे महायुध्द’ या पुस्तकातून चीन, पाकिस्तान आणि उत्तर कोरीया या तिकडीचा जगाला असलेला धोका ठळकपणे मांडला आहे.पाकिस्तानात सध्या जी परिस्थिती आहे, चीन आणि उत्तर कोरीया ज्या पध्दतीने सध्या आक्रमक हालचाली करत आहेत, ते पाहून या तिकडीच्या हालचाली लवकरच जगात विध्वंस माजवितील, हे लक्षात येते.       


संदर्भ ; 
१. http://www.newscast-pratyaksha.com/north-korea-will-drag-west-into-third-world-war/
२.http://www.dailystar.co.uk/news/latest-news/512138/North-Korea-invasion-plan-South-Korea-USA-Japan-DMZ
३.http://www.express.co.uk/news/world/666468/World-War-Three-North-Korea-planning-war-with-West-which-could-leave-ONE-MILLION-dead

सूचना : हा लेख पहिल्यांदा "दैनिक प्रत्यक्ष" मध्ये २३ मे २०१६ रोजी प्रकाशित झाला होता. त्याचे कात्रण सोबत देत आहे. 



Thursday, 5 May 2016

आमुचे अभयदाता स्वामी समर्थ आजोबा !!!


अक्कलकोटस्वामी स्तवन 

नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता |
प्रगटला अद्भुतसा | ब्रम्हांडाचा हाच पिता || १ ||
नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सूत्रधार | 
नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ ||
नरदेही नरसिंह | प्रगटला तरूपोटी |
नास्तिकाच्या कश्यपूला | आस्तिकाची देण्या गती || ३ ||
कधी चाले पाण्यावरी | कधी धावे अधांतरी |
यमा वाटे ज्याची भीती | योगेश्वर हाच यती || ४ || 
कधी जाई हिमाचली | कधी गिरी अरवली |
कधी नर्मदेच्या काठी | कधी वसे भीमा तटी || ५ ||
काली माता बोले संगे | बोले कन्याकुमारी ही |
अन्नपूर्णा ज्याचे हाती | दत्तगुरु एक मुखी || ६ ||
भारताच्या कानो कानी | गेला स्वये चिंतामणी |
सुखी व्हावे सारे जन | तेथे धावे जनार्दन || ७ ||
प्रज्ञापुरी स्थिर झाला | माध्यान्हीच्या रविप्रत |
रामानुज करी भावे  | स्वामी पदा दंडवत || ८ ||

|| श्री सदगुरु अक्कलकोट स्वामी समर्थ  आजोबा की जय  || 

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८)

मराठी कॅलेंडर मध्ये आज श्रीअक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी अशी नोंद आहे. वास्तविक पाहता इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी समाधिस्त होऊन आपला सगुण साकार अवतार संपविला असे भासवले, परंतु आजतागायत प्रत्यक्षात स्वामी भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून, भक्तांना "हम गया नही जिंदा है " याच आपल्या अभिवचनाची प्रचिती सातत्याने  देत आहेत. 

''सबसे बडा गुरू.. गुरूसे बडा गुरू का ध्यास..
और उससे बडे श्री स्वामी समर्थ आजोबा...''

"श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ " अक्कललोटच्या स्वामी समर्थांचा हा गजर  स्टेजवर अगदी छान रंगात आला होता . स्वामी समर्थांच्या प्रेमात आकंठ बुडालेले स्वामीभक्तीत न्हाऊन निघालेले श्रध्दावान  भक्त अगदी तल्लीन होऊन गजर गात होते आणि तेवढ्यात त्यांना त्यांच्या सदगुरुंनी जवळ बोलावून अत्यंत प्रेमाने काही समजावले आणि पुढील गजरात एक बदल करून गजर पुन्हा त्याच प्रेमाने गाईला गेला. आणि आता त्याच गजराची श्रवणीयता अजूनच मधुर झाली होती, गोडवा अवीट झाला होता , एक अनाकलनीय तृप्ती मनाला आपलेपणाचे नाते उलगडून दावीत होती ... काय उत्सुकता शिगेला पोहचली असेल नाही ? काय बरे केला असेल तो बदल? 

कानी आलेल्या एका संवादाने आपसूकच उत्तर तर मिळतेच आणि जीवनाला एक नवीन दिशा गवसली - आपुलकीचे नाते जोपासण्याची !

"त्या" एका शी - अनन्य प्रेमस्वरूपाशी ! माझ्या सदगुरुंशी माझे जन्मानुजन्मीचे जे नाते आहे ते - माझे आजोबा ! माझे मायबाप ! 

एक ५-६ वर्षाची चिमुरडी आपल्या आजीला सांगत होती ,मला ना खूप आवडले बघ आजी ! स्वामींना महाराज काय म्हणायचे , कसे तरी वाटत होते , मला ना मुळीच आवडत नव्हते , त्यापेक्षा आता त्यांनी म्हटले ना स्वामी आजोबा ... किती छान वाटले, माझे आजोबा... आठवले मला ... खूप आवडले मला . आपले बापू किती मस्त आहेत , आम्हाला आवडते तसे म्हणायला सांगतात... 

चिमुरडी भलती खूष होती.... माझ्या आजोबांचा गजर झाला म्हणून .... 

खरे तर म्हटले तर ही गोष्ट छोटीशी, पण त्या लहान निरागस बाळाने आमच्या डोळ्यावरचे जणू अज्ञानाचे पडळ दूर सारले होते आपसूक ! कोणत्याही नात्याला जिवंतपणा, रसरशीतपणा , चैतन्य लाभते ते त्या नात्य़ातील आपुलकी, प्रेम  ह्या बांधिलकीनेच नाही का बरे?       

नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता |
प्रगटला अद्भुतसा | ब्रम्हांडाचा हाच पिता || 
रामानुज हेच तर वर्म आपल्याला स्वामींच्या स्तवनाच्या सुरुवातीलाच प्रथम चरणांतच सांगत आहेत जणू की -  माझे स्वामी समर्थ हेच तर अवघ्या ब्रम्हांडाचे जनक आहेत , पिता आहेत , त्यामुळे साहजिकच त्यांना ना स्वत:चे नाव ना त्यांचा जन्म कुणाला ठाऊक , ना त्यांच्या माता-पित्याची कोणाला माहिती . 

नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सूत्रधार | 
नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || 
जो स्वत:चा सदगुरु, परब्रम्ह आहे त्याला कोण अन्य गुरु लाभणार ? "तो" स्वयं हाच जगाचा एकमेव सूत्रधार आहे. "तो"च अखिल जगतातील अनाथांचा जगन्नाथ आहे. 

स्वामींच्या प्रकटीकरणाची ( वाचनात आलेली ) कथा -  नरदेही नरसिंह | प्रगटला तरूपोटी |

इ.स.१४५७ च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे ३०० वर्ष स्वामींनी कठोर तपश्चर्या केली.ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली.व ती वारूळावर पडली. ही स्वामी आजोबांची लीलाच की त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक आजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ आजोबा...

नास्तिकाच्या कश्यपूला | आस्तिकाची देण्या गती || 
आपण बाळ प्रल्हादाची कथा वाचतो की प्रल्हादाचे पिता हिरण्यकश्यपू हे राक्षस होते आणि खांबातून नरसिंह रूपाने  प्रकटून महाविष्णूने प्रल्हादाच्या भक्तीला तारले होते , नास्तिक असलेल्या त्याच्या पित्याला शेवटच्या क्षणी आस्तिकाची गती दिली होती.

यमा वाटे ज्याची भीती | योगेश्वर हाच यती || 
बखरीमध्ये १२७व्या कथेत - स्वामी आजोबांनी बाबसाहेब जाधव ह्या भक्ताचे मरण कसे परतविले हे वाचनात येते. आजोबा त्या भक्ताला कुंभार म्हनून हांका मारीत. त्यांना स्वामी म्हणाले कुंभार तुझे नावाची चिठ्ठी आली आहे. तेव्हा ह्या भक्ताने श्रींचे चरण घट्ट धरून श्रींछी सेवा मनासारखी घडलेली नाही . करिता समर्थांनी कृपा करून तूर्त निरोप देऊ नये म्हनून प्रार्थना करताच बाबासाहेबांचे मरण रोखले व  एका जंगी बैलावर "जा बैलावर " म्हणून सोडले 
बखरी मध्ये १२९व्या कथेत - स्वामी समर्थांनी खेडेगावातील एका स्त्रीच्या मेलेल्या मुलास कसे प्राणदान दिले होते 
ह्या  दोन्ही कथांतून यमा वाटे ज्याची भीती हे प्रचीतीस येते. 

कधी चाले पाण्यावरी | कधी धावे अधांतरी |
स्वामी समर्थ क्षणात अंतर्धान पावत व अचानक प्रगट होत. स्वामी गिरनार पर्वतावर गुप्त झाले व क्षणात आंबेजोगाई येथे प्रगट झाले. हरिद्वारहून काठेवाडातील जिविक क्षेत्रातील नारायण सरोवराच्या मध्यभागी सहजासन घालून बसलेले दिसले. तर पुढे स्वामींना पंढरपुरातील भीमा नदीच्या भर पुरातून चालत जाताना भक्तांनी पहिले.

कधी जाई हिमाचली | कधी गिरी अरवली | कधी नर्मदेच्या काठी | कधी वसे भीमा तटी ....
स्वामीं आजोबांच्या बखरीतील २०२ व्या कथेमध्ये  समर्थ अक्कलकोटाला प्रसिध्द होण्या आधी कांही दिवस हिमालय पर्वतावर होते असा उल्लेख आढळतो . तेथे त्यांना पाहून  औषधे शोधण्याकरिता चीन देशातून आलेल्या एक स्त्री व एक पुरुष  ह्यांनी  कुचेष्टेने  स्वामी आजोबांना भगवा वेष धारण करणारा कोणी सैतान आहे , कीं राक्षस आहे, कीं वृती पिशाचमय दिसणारा जादूगार आहे अशी थट्टा केली होती आणि ते उभततां पोट धरून हसत होते. तेव्हा तें दोघे वृक्षाआड जाऊन कामेच्छेने विनोद करू लागली, तों चमत्कार झाला - स्त्रीची आकृती नाहीशी होऊन पुरुषाकृती  दिसू लागली. पुढे त्यांनी हंबरडा फोडून पश्चात्ताप्पूर्वक श्रींच्या चरणाम्ना मिठी मारली व प्रार्थना केली की आम्ही मूर्खपणाने आपले सामर्थ्य न ओळखून काममदाने आपली पुष्कळ निंदा केली . आम्हाला निंदेचे प्रायश्चित्त मिळाले. तरी मायबापा, आता कृपा करून स्त्रीचा देह पूर्ववत करावा. 
अर्थातच श्रींच्या चरणांवर ते उभयतां गडबडा लोळू लागतांच दयाघन स्वामीआजोबा कळवलले व त्यांनी स्त्रीचे शरीर पूर्ववत केले आपल्या कृपादृष्टीने...      

बखरीमध्येच २०३ व्या कथेमध्ये स्वामी आजोबांनी त्यांच्या हिमगिरीवरील वास्तव्यात वृक्षछायेखाली बसले असता चार व्याधांनी ’सर्वथैव न गांजावे कवणास’ असे सर्व शास्त्रांतील वचन माहीत असूनही स्वामी आजोंबाना गांजले , तेव्हा त्यांना त्यांच्या कुकर्माची जाणीव करून देण्यासाठी आधी त्यांची काष्ठवत स्थिती करून समज देऊन नंतर कृपादृष्टीने त्यांचा उध्दारच केला व सर्व भूतांच्या ठिकाणी अविरोध प्रेम ठेवा . स्वधर्माचे रक्षण करा असा उपदेश करून जाण्याची आज्ञा दिली व त्यांचा उध्दारच केला. 
ह्याच कथेत हरिणाच्या जोडप्याला त्यांचा पूर्वजन्म कथून संसारभयातून मुक्त केले  असा उल्लेख आहे. 

बखरीमध्ये १५५ व्या कथेत स्वामी आजोबांनी खेड गावच्या  नारायणभटास शके १७९२ आश्विन शुध्द ३ रोजी गिरीवर दर्शन दिले असा उल्लेख आहे. 

हे सर्व चमत्कार स्वामी समर्थांनी लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी केले.   आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने लाकूडतोड्या उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले.गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. काली माता बोले संगे |नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. बोले कन्याकुमारी ही |

अन्नपूर्णा ज्याचे हाती | 
बखरीमध्ये १९२ व्या ’अन्नपूर्णेकडील भोजन’ कथेत स्वामी आजोबा कोनळी गांवच्या रानातून सुमारे १०० सेवेकर्‍यांसोबत जात होते व त्यांनी सकाळपासून स्वत:ही कांही खाल्ले नव्हते आणि सेवेकर्‍यांनाही कांही खाऊ दिले नव्हते.  जेव्हा सेवेकरी स्वामींना कांही खाण्यापिण्याची व्यवस्था करण्याविषयी आज्ञा देण्यासाठी प्रार्थना करीत होते तेव्हा स्वामी सेवेकर्‍यांना म्हणाले होते की चला तुम्हाला अन्नपूर्णा जेऊं घालणार आहे. स्वामी आजोबा कोणाचेंहि न ऐकता कोनळी गांवच्या त्या रानातील कांट्यातून चालत राहिले. असे होता होता दिवस मावळू लागला व सेवेकर्‍यांपैकी श्रीपादभट स्वामींच्या वाटेत आडवा पडला व सर्वांच्या वतीने अन्नासाठी विनवू लागला. तोपर्यंत रात्र झाली असल्याने श्रीपादभटांनी स्वामींना एवढ्या मंडळींस भोजन कोठून मिळणार असा साहजिक प्रश्न विचारला असता , स्वामी आजोबांनी हेच उत्तर दिले होते की "त्या पलिकडच्या मळ्यांत जा. अन्नपूर्णा वाट पाहत आहे.
अर्थातच स्वामींची अमोघ वाणी ! पलिकडच्या मळ्यांत एक पोक्त बाई उभी होती , जिने शिजविलेले सर्व अन्न व पाणी दिले. सेवेकर्‍यांनी जेव्हा त्या बाईस स्वामींच्या दर्शनाला चलण्यास सुचविले , तेव्हाही त्या बाईने ," माझा नमस्कार सांगा . माझें नाव अन्नपूर्णा . मी मागाहून दर्शनाला येते. तुम्ही चला पुढे ! हे उद्गार काढले होते.
सेवेकर्‍यांना जेव्हा स्वामी आजोबा म्हणाले की "ती आमच्याच कुटूंबातील होती, तेव्हा कुठे सेवेकर्‍यांना लक्षात आले की स्वामी जे म्हणत होते की " अन्नपूर्णेकडे भोजनाला चला." तर हीच ती मातोश्री , संपूर्ण जगाला अन्न पुरविणारी ! नंतर त्या  सर्वांना खूप वाईट वाटले की काय आम्ही पापी , अज्ञानी ! तिचें दर्शनही घेतले नाही. नमस्कार केला नाहीं.
ही कथा स्पष्टपणे स्वामी आजोबांचे व जगज्जननी अन्नपूर्णा मातेचे नाते दर्शविते असे वाटते.      

भारताच्या कानो कानी | गेला स्वये चिंतामणी | सुखी व्हावे सारे जन | तेथे धावे जनार्दन || 

संत हे लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या धारणेसाठी आणि लोकांच्या आत्मिक, पारमार्थिक ऐश्वर्यासाठीच असतात ते दुसर्यांना सुखाने सुखावणारे असतात.
स्वामी समर्थांनी समाजातील दुष्ट प्रवृत्ती नाहीशी करून तेथे सत विचारांची पुनर्स्थापना केली. दुःखी, पिडीत लोकांवर कृपेचा वर्षाव केला. इच्छुक भक्तांना स्मरणात राहील असा अनुभव देऊन प्रेमबंधनाने आपलेसे केले. स्वामी समर्थांना श्रीमंत व गरीब सारखेच मानीत. त्यांना साधा भोळा भक्तीभाव आवडत असे. त्यांच्या अंतरी जनसामान्यांविषयी अपार प्रेम होते. 

सर्वत्र भारतवर्षात भ्रमण करून नंतर स्वामी आजोबा अक्कलकोटात (प्रज्ञापुरी ) दीर्घ काळ वास्तव्य करून होते. प्रज्ञापुरी स्थिर झाला |  

स्वामी समर्थ अतिशय तेजःपुंज होते. कोटी सूर्याचे तेज त्यांच्या मुखावर विलसत असे. डोळ्यात अपरंपार कारुण्य होते. भक्तांवर संकट कोसळले तर ते दूर करत.      
प्रज्ञापुरी स्थिर झाला | माध्यान्हीच्या रविप्रत  

“स्वामी समर्थ तारक मंत्र”

नि:शंक हो | निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे || 
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी || १ ||
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय || 
आज्ञेविना काळ ना नेई त्याला | परलोकी ही ना भीती तयाला || २ ||
उगाची भीतोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे ||
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा || ३ ||
खरा होई जागा | श्रद्धेसहित | कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त || 
कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू | स्वामी देतील साथ || ४ ||
विभूती, नमन, नामध्यानाधी, तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात || 
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती |न सोडी कदा स्वामी जया घेई हाती || ५ ||

कोणतीही संकटे आल्यास स्वामींचा हा अद्भुत व निराळा तारक मंत्र म्हणावा. संकटे दूर होतात आणि स्वामी आजोबांची वैखरी " भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" ह्याची खूण पटतेच, पटते १०८%!

स्वामी समर्थांचे चोळाप्पा आणि बाळाप्पा नावाचे २ अत्यंत प्रेमळ भक्त होते, त्यांची भक्ती , त्यांच्यासारखे निर्मळ, निर्व्जाज प्रेम करता यावे आणि विभक्तीचा अंशही जीवनात न उरो हीच स्वामी आजोबांच्या चरणी प्रार्थना करू या -
               चोळप्पाचे प्रेम हवे मज बाळाप्पाची भक्ती हवी 
               विभक्तीचा अंश नको मज स्वामी तुमची कृपा हवी ....
    
अभयदाता श्री स्वामी समर्थ आजोबांच्या चरणीं कोटी कोटी लोटांगण आणि मानवी जीवनाचा हा जीवनयज्ञ त्यांनी दाखविलेल्या भक्तीमार्गावर चालून त्यांच्या चरणी समर्पित होवो  हीच आजच्या मंगलदिनी स्वामी आजोबांच्या चरणी प्रार्थना...

संदर्भ: 
             १, श्री स्वामी समर्थ - बखर  

Saturday, 30 April 2016

हायपरसोनिक क्षेपणास्त्रे- आधुनिक युध्दातील वाढता प्रभाव !


दैनिक प्रत्यक्षमधील  हायपरसोनिक क्षेपणास्त्रासंबंधी  लागोपाठ आलेल्या दोन बातम्यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. त्यातील पहिली बातमी होती - रशियाकडून आंतरखंडीय क्षेपणास्त्रासह ’हायपरसोनिक’ यंत्रणेची यशस्वी चाचणी घेण्यात आली आणि त्या पाठोपाठ दुसरी बातमी होती - की रशिया नंतर  लगेच दुसर्‍या दिवशी चीनने एका तासात अकरा हजार किलोमीटर अंतर पार करू शकणार्‍या त्यांच्या ’डीएफ -झेडएफ’ (DF-ZF) ह्या अणवस्त्रवाहू हायपरसोनिक क्षेपणास्त्राची सातवी यशस्वी चाचणी घेतली. ह्या दोन्ही बाताम्यांनी सर्वत्र मोठी चर्चेची झोड उठवून दिली. काही विश्लेषकांच्या मते ह्या दोन्ही हायपरसोनिक क्षेपणांस्त्रांच्या यशस्वी चाचण्या रशिया, चीन आणि अमेरीकेमध्ये हायपरसोनिक शस्त्रांत्रांबाबत सुरु असलेली स्पर्धा दर्शवित आहे.  


या बातम्यांच्या अनुषंगाने क्षेपणास्त्र , आधुनिक युध्दातील त्यांचे वाढते वर्चस्व याबाबत कुतुहल चाळवले गेले आणि सध्याच्या काळातील ह्या आधुनिक शस्त्रात्रांचा वाढता प्रभाव , तिसर्‍या महायुध्दाचे पडघम वाजू लागल्याचे वारंवार दिले जाणारे संकेत, सार्‍या जगाला ग्रासून टाकणारी एक अनामिक भीती, बद्दल जे वाचनातून जाणवले ते मांडण्याचा हा प्रयास- 

’क्षेपणास्त्र ’ म्हणजे मिसाईल ( missile) . क्षेपणास्त्र हा शब्द तसा आजकाल वारंवार कानावर पडत असतो . परंतु आपण सामान्य माणसे ह्या युध्दाच्या गोष्टी जाणून आपल्याला काय करायचे आहे अशा काहीशा तटस्थ भूमिकेमुळे क्षेपणास्त्रे म्हणजे नक्की काय असते , खरेच त्यांचा एवढा प्रभाव भयावह आहे का? आणि असल्यास का ह्याची उत्तरे शोधण्याचा ना प्रयास करत , ना आपली जिज्ञासा दाटून येत असे बहुतांशी कमी-अधिक फरकाने चित्र आढळते. 

पूर्वीच्या काळापासून युध्द हे फक्त देशाच्या सीमेवर दोन वा अधिक देशांच्या सैनिकांमध्ये लढले जाते असे चित्र आढळत असे. पण  ह्या विचारसरणीला तडा गेला जेव्हा ४ डिसेंबर २००६ साली डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांनी लिहिलेले " तिसरे महायुध्द" वाचनात आले आणि डोळे खाडकन उघडले. सध्याची युध्द ही फक्त सीमांपुरतीच मर्यादीत राहिली नसून त्या देशातील शहरांतील, गावांतील नागरीकांपर्यंत आणि  थेट घराघरांमध्ये ह्यांची व्याप्ती पोहचलेली आहे असे प्रकर्षाने आढळले.  त्यामुळे बदलत्या काळाबरोबर पावले न उचल्यास माणसाचा घात हा खूपदा अज्ञानामुळे संभवू शकतो ह्याची जाणीव प्रखरतेने मनाला भिडली. 

"Survival of the fittest" ह्या नियमाला अनुसरून आपण बदलत्या काळाची पावले ओळखून स्वत:ला बदलले नाही तर आपण ह्या काळात तग धरून राहूच शकत नाही  हे ह्या पुस्तकाच्या वाचनाने प्रकर्षाने जाणवले आणि मग दिवसागणिक येऊन धडकणार्‍या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या बातम्यांच्या आधारे आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्याचा प्रयास सुरु केला... ज्याला मोलाचा हातभार लावला गेला दैनंदिन आंतरराष्ट्रीय घडामोडींना प्राधान्य देणार्‍या दैनिक प्रत्यक्षच्या माध्यमातून !

क्षेपणास्त्रे ही बहुत करून आण्विक अस्त्रे त्याच्या टप्प्यापर्य़त पोहचविण्यास सहाय्य करणारी यंत्रणा असते असे म्हटले तर फारसे चुकीचे ठरणार नाही असे वाटते. पहिले महायुध्द झाले , दुसरे महायुध्द झाले आणि तिसरे महायुध्द सुध्दा सुरु झाल्याच्या बातम्य़ा आणि त्याला दुजोरा देणारी वक्तव्ये सध्या वारंवार कानी येतात. आज येऊ घातलेल्या वा सतत दार ठोठावणार्‍या तिसर्‍या महायुध्दाच्या बातम्यांनी ध्यानी येते ते प्रखर वास्तव की पहिल्या दोन महायुध्दांपेक्षा होणारा विध्वंस , जीवीत हानी, वित्त- हानी ही कैक पटींनी वाढणार आहे. आज देशांमध्ये स्वत:चे सामर्थ्य वाढवून केवळ स्वत: अधिक बलशाही होण्याचेच ध्येय उरले नसून , स्वत:च्या देशाच्या सीमा विस्तारण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दिसते. आज येऊ घातलेल्या तिसर्‍या महायुध्दामध्ये हवेतून बॉम्बफेक करणार्‍या विमानांपेक्षाही ही आंतरराष्ट्रीयच नव्हे तर आंतरखंडीय क्षेपणास्त्रे अधिक विध्वंस सहज , सोप्या पध्दतीने घडवून आणू शकतात असे निदर्शनास आले. 

’क्रूज मिसाईल’ हे या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे आघाडीचे पाऊल ! पहिल्या महायुध्दाच्या वेळी म्हणजे १९१७ साली सर्वात प्रथम ’केटरींग बग’ ह्या शास्त्रज्ञाने ही क्रूज मिसाईल पहिल्यांदा विकसित केली खरी, पण त्याचा युध्दात काही वापर झालाच नाही आणि पहिले महायुध्द संपले. त्यानंतर मात्र  हिटलरच्या नाझी जर्मन सैन्याने दुसर्‍या महायुध्द्दाच्या वेळीस इ.स. १९४४ साली जगात सर्वप्रथम ह्या क्रूज मिसाईलचा वापर केला होता. ह्या पहिल्या क्रूज मिसाईलचे नाव ’व्ही -वन ’ (V-1) होते. ह्या प्राथमिक क्रूज क्षेपणास्त्रांचा टप्पा आणि दिशा अचूक नव्हती आणि मुख्य म्हणजे त्यांना फेकणार्‍या मशिनचा प्रचंड मोठा कर्णकर्कश आवाज होत असे आणि त्यामुळे त्यांना ’बझ बॉम्ब ’ (Buzz bomb) असे नाव मिळाले. 

पुढे अमेरीकेने जपानवर केलेल्या अणुबॉम्बहल्ल्यामुळे दुसरे महायुध्द संपले खरे, पण दुसर्‍या महायुध्दाच्या अनुभवाने भीतीपोटी म्हणा वा स्वत:च्या सुरक्षेपोटी सावध झालेली राष्ट्रे स्वत:ला अधिकाधिक शस्त्रात्रांनी सुसज्ज , संपन्न आणि बलशाली करण्यासाठी पावले उचलू लागली. अमेरीका व सोविएत युनियन म्हणजेच सध्याचा रशिया ह्या दोन महासत्त्तांनी आण्विक शस्त्रांत्रामध्ये जोरदार प्रगती करून प्रचंड प्रमाणावर आण्विक शस्त्रात्रांचा साठा केला व त्यामुळे ह्या दोन महासत्तांमध्ये शीतयुध्द सुरु झाले आणि त्यामुळे जगभरात अनेक राष्ट्रांनी आपआपले उघड व गुप्त गट तयार केले. ह्या दोन महासत्तांच्या पाठोपाठ जगभरातील  साम्राज्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा असणा‍र्‍या चीनने ह्या आण्विक शस्त्रांत्रांच्या चढाओढीत हिरीरीने सहभाग घेतला. एवढेच नव्हे तर आज तर चीनची ही आण्विक क्षमता अमेरीकेला  भयकारक बनून राहिली आहे आणि रशियाला सुध्दा  दखल घेण्यास भाग पाडीत आहे असे चित्र दिसत आहे.

रशियाने २०१३ साली हायपरसोनिक यंत्रणा तसेच क्षेपणास्त्रे विकसित करण्यावर भर देण्यात येईल असे संकेत दिले होते आणि त्यानंतर २०१५साली रशियाने आपल्या ’हायपरसोनिक ग्लाईड व्हेईकल’ ची पहिली यशस्वी चाचणी घेतली होती आणि त्यानंतर वर्षभरातच, २३ एप्रिल २०१६ रोजी रशियाने ध्वनीच्या ५ ते १० पट वेग असणार्‍या ’हायपरसोनिक’ यंत्रणेसह प्रगत क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केल्याच्या वृत्ताला रशियाच्या सरकारी वृत्तसंस्था ’इंटरफॅक्स’ ने संमती दर्शविली. रशियाने विकसित केलेली ही हायपरसोनिक यंत्रणा लवकरच सध्या रशियात अस्तित्त्वात असलेल्या तसेच भविष्यातील दीर्घ पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांवर तैनात करण्यात येईल अशी माहितीही रशियाने दिली .

हायपरसोनिक यंत्रणा वापरताना प्रचंड प्रमाणात उष्णता व दाब निर्माण होतो , ज्यामुळे लक्ष्य करणे ही अत्यंत अवघड आणि कठीण बाब असते. जगात सध्या उपलब्ध असलेल्या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा अशा प्रकारच्या लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम नाहीत. अमेरीकेने २०१४ साली हायपरसोनिक यंत्रणेचे परीक्षण केले होते ते अयशस्वी झाले होते. त्यामुळे सध्या परिस्थीतीत अमेरीका मात्र याबाबतीत पिछाडीवर पडला असल्यामुळे अमेरीकेच्या वरीष्ठ संसद सदस्य माईक रॉजर्स यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  या पार्श्वभूमीवर रशियाची ही चाचणी अमेरीकेसमोर नवे आव्हान असल्याची चिंता अमेरीकी अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे ही महत्त्वाची गोष्ट दुर्लक्षित करण्यासारखी नसल्याचे लक्षात येते.  

रशियन संरक्षणदलाच्या ’ स्ट्रॅटेजिक मिसाईल फोर्सेस’ ने कझाकस्तान सीमेजवळील ओरेनबर्ग प्रांतातून ’आरएस १८ए’ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी करताना ’हायपरसोनिक ग्लाईड व्हेईकल’ (Hypersonic Glide Vehicle) वापर केला होता. कमीत कमी ४ ते जास्तीत जास्त ८ हजार मैल प्रति तास वेग असणारे हे हायपरसोनिक ग्लाईड व्हेईकल अणवस्त्रे तसेच पारंपारीक क्षेपणास्त्रांचा मारा करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. 

गायडेड मिसाईल्स म्हणजे संगणक नियंत्रित क्षेपणास्त्र ! आक्रमण करून येणार्‍या ( शत्रूदेशाच्या ) विमानांच्या ताफ्यावर बचाव करणारं सैन्यदल, ही क्षेपणास्त्र सोडतं. मग त्या विमानांनी क्षेपणास्त्रांना चुकविण्याचा किंवा चकवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी उपयोग नसतो. ते क्षेपणास्त्र आपल्या संगणकाने ठरवून दिलेल्या लक्ष्यावर जाऊन धडकल्याशिवाय थांबतच नाही.

ध्वनीचा वेग हा सर्वात अधिक आहे असे आपल्याला वाटते. पण आता ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेग असणारी ही मिसाईल असतात. 
कोणत्याही गोष्टीचा वेग मोजण्यासाठी त्या गोष्टीचा वेग हा ध्वनीच्या किती पट आहे हे सापेक्षतेने  मोजले जाते त्या एककाला "मॅक" असे म्हणतात . 
MACH NUMBER is defined as a speed ratio, referenced to the speed of sound, i.e 
MACH NUMBER = Velocity of Object / Velocity of Sound (at the given atmospheric conditions)

थोडक्यात एखाद्या वस्तूचा एखाद्या वातावरणातला वेग आणि ध्वनीचा वेग ह्यांचा रेशिओ म्हणजे त्या वस्तूचा मॅक नंबर. 
सुपरसोनिक वेग हा १.२ ते ५ मॅक असतो तर हायपर सोनिक वेग हा ५ ते १० मॅक नंबर एवढा असतो.  

हायपरसोनिक क्षेपणास्त्रे ५ ते १० मॅक ह्या वेगाने म्हणजेच अंदाजे ३८३६ मैल ते ७६७३ मैल  प्रति ताशी ह्या वेगाने प्रवास करू शकतात. 

आता आपण वेगवेगळ्या देशांनी विकसित केलेल्या क्षेपणास्त्रांविषयी थोडक्यात जाणून घेऊ या -

अमेरीकेकडे आणि  ब्रिटनकडे "टॉम हॉक"  पध्द्तीची सर्वश्रेष्ठ आणि सर्वात जलद क्षेपणास्त्रे आहेत. भारताचा कटटर हाडवैरी असणारा आणि सदैव शत्रू असणार्‍या पाकितानने ’बाबर ’ मध्यम पल्ल्याची आणि मध्यम क्षमतेची क्रूज क्षेपणास्त्रे तयार केली आहेत जी "टॉम हॉक" पध्द्तीच्या क्षेपणास्त्रांची कमी दर्जाची व छोटी प्रतिकृती मानली जाते. 

आपल्या भारताने विधायक कार्यासाठी अणुतंत्र विकसित करत असतानाच स्वसंरक्षणाची सर्व काळजी घेतलेली आहे. "ब्रम्होस" ही सुपरसोनिक पध्द्तीची क्षेपणास्त्रे रशियाच्या सहकार्याने आपण विकसित केली आहेत.

भारताच्या "मिसाईल मॅन " म्हणून गौरविल्या जाणार्‍या डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांचा हायपर सोनिक मिसाईल बाबतचा दृष्टीकोन: 

८ नोव्हेंबर २०११ ला इंडो-रशियन जॉईंट व्हेंचरच्या अधिपत्याखाली  ब्रम्होस ऍरोस्पेस ह्या कंपनीचे इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स येथे उद्घाटन करताना डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांनी एक आगळाच दृष्टीकोन भारतीय शास्त्रज्ञांसमोर मांडला होता - आज मॅक २ च्या वेगाचे मिसाईल बनवायला सुमारे २०० करोड एवढा पैसा खर्च होत आहे, त्यामुळे आपण अशा प्रकारच्या मिसाईलची पुन्हा पुन्हा निर्मीती करून अधिक पैसा खर्च करता कामा नये. ह्या सेंटरने  ८ ते १० मॅकचे  re-usable (पुनर्वापर करू शकणारे ) मिसाईल २०२० पर्यंत निर्माण करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे.

ह्यावरून डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांनी हायपरसोनिक मिसाईल निर्मीती साठी स्विकृती दिली असली तरी त्याचा वापर विधायक कार्यासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी व्हावा यावर किती भर दिला होता हेच सिध्द होते.


भविष्यात भारत ब्रम्होस-२ ह्या हायपरसोनिक मिसाईलची निर्मीती करण्याच्या वाटेवर प्रगती करीत आहे ज्याचा वेग ७ मॅक असेल आणि ६००० किलोमीटर प्रती-तास वेगाने २९० किलोमीटरवरील लक्ष्याचा ते भेद घेऊ शकेल. परंतु ह्यापेक्षा जास्त दूरच्या अंतराची मारक क्षमता असलेल्या मिसाईलच्या निर्मीतीमध्ये  भारताला रशियाचे सहकार्य लाभू शकत नाही . रशियाने Missile Technology Control Regime(एमटीसीआर) करारावर स्वाक्षरी केल्यामुळे ३०० किमी पेक्षा अधिक मारक क्षमता असलेल्या मिसाईलच्या विकासासाठी रशिया दुसर्‍या देशांना मदत करू शकत नाही.
थोडक्यात ब्रम्होस -२ ची निर्मीती ही भारताची स्वदेशी निर्मीती असेल असे दिसते.


चीनने ’डीएफ- झेडएफ’ ह्या त्यांच्या हायपरसोनिक क्षेपणास्त्रासंबंधी कमालीची गुप्तता पाळली होती. तरी देखिल वॉशिंगटन येथील ’फ्री बिकॉन’ ह्यांना त्याचा सुगावा लागलाच होता. पॅंटेगॉनने ' WU-14' सांकेतिक नाव चीनच्या ह्या हायपरसोनिक क्षेपणास्त्राला दिले होते , जे आज ’डीएफ- झेडएफ’ ह्या नावाने ओळखले जाते. नोव्हेंबर २३,ऑगस्ट १९,जून ७,२०१५ आणि जानेवारी ९,ऑगस्ट ७, व डिसेंबर २, २०१४ रोजी सहा वेळा चीनने हायपरसोनिक क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या पार पाडल्या होत्या आणि आता एप्रिल २०१६ मध्ये पुन्हा एकदा सातवी चाचणी चीनने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. 

ह्यावरून ’हायपरसोनिक क्षेपणास्त्र " यंत्रणांचा आधुनिक युध्दातील वाढता प्रभाव ध्यानात येतो.

संदर्भ -
१. तिसरे महायुध्द - डॉक्टर अनिरुध्द  धैर्यधर जोशी
२. दैनिक प्रत्यक्ष
३.http://www.popularmechanics.com/military/research/a20604/china-successfully-tests-hypersonic-weapon-system/
४.https://www.quora.com/What-is-the-difference-between-hypersonic-supersonic-and-cruise-missiles
५. http://freebeacon.com/national-security/russia-tests-hypersonic-glide-vehicle/
६.http://www.realcleardefense.com/2016/04/23/russia_tests_hypersonic_glide_vehicle_on_icbm_281305.html


Saturday, 2 April 2016

घनकचरा व्यवस्थापन - काळाची नितांत गरज?

घनकचरा व्यवस्थापन - काळाची नितांत गरज? हा विषय वाचून चक्रावून गेला असाल नाही का? आपण नेहमी Business Management (व्यापाराचे व्य्वस्थापन ), Finance Management, (आर्थिक व्यवस्थापन), Disaster Management (आपत्ती व्यवस्थापन) ह्या बाबतीत बहुतांश प्रमाणात वाचतो आणि हे विषय आपल्या थोडया-फार प्रमाणात परिचयाचे असतात, परंतु आजकाल घन कचरा व्यवस्थापनाची चिंता मोठ-मोठ्या शहरांनाच नव्हे तर सर्व जगालाच भेडसावू लागली आहे. त्यामुळे ह्या घन कचर्‍याचे व्यवथापन करणे ही काळाची नितांत गरज होऊन बसली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 


नुकत्याच मुंबईच्या देवनार कचरा डेपोमध्ये एका पाठोपाठ एक लागलेल्या भीषण आगी आणि त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात उडालेला धुराचा उद्रेक, आरोग्याच्या दृष्टीने उद्भवलेला भयानक जीवघेणा परिणाम हे एक जिवंत उदाहरण ह्या घन कचरा व्यवस्थापनाची गरज दाखवून देण्यास पुरेसे आहे असे वाटते. 

देवनार कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे आरोग्यास घातक अशा मिथेन वायूच्या विळख्यात सापडल्यामुळे भोवतालच्या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले , श्वसनाच्या त्रासामुळे रूग्णालयात दाखल करावे लागले, वातावरणातही धुराचे साम्राज्यच पसरले असल्याने हवेच्या प्रदूषणाची समस्या अजूनच बिकट बनली, आग विझवण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागल्याने पाण्याच्या तुटवड्यात आणखीनच भर पडली. ह्या वरून घन कचर्‍याचे व्यवस्थापन उचित प्रकारे न झाल्यास किती  भयंकर दुष्परिणामांना तोंड दयावे लागू शकते ह्याची जणू झलकच बघायला मिळाली. सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच उग्र स्वरूप धारण करीत असताना आग विझवण्यासाठी १४.४ लक्ष लिटर्स वापरावे लागलेले पाणी हे पाण्याचा अनाठायी वापरच दाखविते. म्हणतात ना ’दुष्काळात तेरावा महिना" तशीच परिस्थिती उभी ठाकते.   

आता जाणून घेऊ या घन कचरा म्हणजे नक्की काय?
      घनकचरा म्हणजे माणसाच्या रोजच्या वापरातून उरलेला निरुपयोगी पदार्थ. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातून निर्माण होणारा घनकचरा व त्याची विल्हेवाट ही आपल्या देशापुढील एक मोठी समस्या आहे. पूर्वीच्या काळी घनकचरा विल्हेवाटीची फार मोठी समस्या भेडसावत नव्हती; कारण लोकसंख्या त्यामानाने फार कमी होती आणि घनकचरा टाकण्यासाठी जमीन मोठया प्रमाणात उपलब्ध होती. परंतु आता जरी लोकसंख्या भरमसाठ वाढली असल्यामुळे घनकचरा मोठया प्रमाणात तयार होत असला तरी जमीन पूर्वी होती तेवढीच आहे. त्यामुळे घनकचरा ही एक बिकट समस्या तोंड आ वासून उभी ठाकत असल्याचे चित्रच सर्वत्र दिसते. 

घनकचरा वाढण्या मागची संभाव्य कारणे - 
पूर्वीच्या काळी प्लास्टीकचा वापर हा खूपच कमी प्रमाणावर होत असे. भाजीपाला, धान्य, किराणा सामान, जीवनाश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी सामान्यत: लोक कापडी पिशव्यांचा वापर करीत असत. आजकालच्या जमान्यात कापडी पिशव्या जणू ह्द्दपार झाल्या आहे आणि त्याची जागा मनमोहक रंगीत स्वरूपात आकर्षक दिसणार्‍या वजनाने हलक्या असलेल्या प्लास्टीकने घेतली आहे. प्लास्टीक ही एक अशी गोष्ट आहे की जी एकदा फॅक्टरीत निर्माण झाली की कमीत कमी ३०० वर्षे ती टिकून राहू शकते. त्यामुळे सहसा नाश न पावणारे प्लास्टीक हे एक घनकचरा वाढविण्यास खूप मोठ्या प्रमाणावर हातभार लावत आहे. तसेच घनकचरा मोठया प्रमाणात निर्माण होण्याचे कारण म्हणजे वाढते शहरीकरण, औद्योगीकरण, प्लास्टिकच्या वस्तूंचा सढळ हस्ते होणारा वापर , उंचावलेले राहणीमान आणि त्यासाठी लागणा-या वेगवेगळया प्रकारच्या वस्तू, वाढलेल्या लोकसंख्येची अन्नाची गरज भागविण्यासाठी शेतातील वाढलेले उत्पादन व त्यापासून निघणारा घनकचरा.  अशा प्रकारे साचत जाणार्‍या या सर्व घनकच-याचे व्यवस्थापन करणे दिवसेंदिवस फार अवघड होत चालले आहे. घनकचरा वाढल्यामुळे त्यापासून निर्माण होणारे प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे हे वेगळे सांगायला नकोच. 

भारतात दरमाणशी दर दिवसाला 0.4 कि.ग्रॅ एवढा घनकचरा तयार होतो. एकट्या मुंबईत गेल्या ५० वर्षात सुमारे १२ दशलक्ष टन इतका घनकचरा साठला असून त्याची विल्हेवाट लवकरात लवकर लावणे ही अत्यंत तातडीची बाब बनली आहे असे वाचनात आढळले. तसेच The Ministry of Environment, Forests and Climate Change ह्यांच्या माहितीच्या आधारे जवळपास १७ लाख टन ई-कचरा हा दरवर्षी साधारणत: (प्रतीवर्षी ५% वाढीच्या अंदाजाने) भारतात जमा होऊ शकतो असा अंदाज आहे. यावरुन घनकचरा प्रदूषणाची कल्पना आपण करु शकतो. 

गावामध्ये शेतातील, घरातील कचरा किंवा शहरांमध्ये कचरा उचलण्याची नगरपालिकेची सोय नसलेल्या भागांमध्ये घरातून निघालेला घनकचरा उघडयावर टाकला जातो, तो कुजतो व त्यापासून दुर्गंधी सुटते याबरोबर कीटकांची उत्पत्ती होऊन आरोग्यास हानी पोहोचते. फार पूर्वीपासून घनकचरा जाळूनच त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु त्यामुळे हवेचे प्रदूषण होते व पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात येते. माणसाचे राहणीमान जसे सुधारते तसे कचरा जास्त निर्माण होतो. कच-याचे प्रकारही वाढत जातात. हा अनेक प्रकारचा कचरा वेगवेगळया समस्या निर्माण करतो. आजार, प्रदूषण, सौंदर्यहानी आणि पर्यावरणाचे नुकसान असे अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच घनकचरा व्यवस्थापन करताना काही उद्दिष्टे ध्यानात ठेवणे जरूरीचे बनते. आरोग्य-संरक्षण, जीवनाची गुणवत्ता सुधारणे. पर्यावरण प्रदूषण टाळणे, परिसर स्वच्छता. भंगार-कच-यावर पुनर्प्रक्रिया होण्यासाठी चालना देणे. जैविक-कच-यातून ऊर्जा निर्माण करून इंधन वाचवणे. या सगळयातून शक्य असल्यास काही रोजगार निर्मिती करणे. समाजातील संपूर्ण स्वच्छतेसाठी कचरा व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या केरकच-यात विविध पदार्थ असतात; त्यात वर्गवारी करावी लागते. वर्गवारी केल्याशिवाय घनकचरा व्यवस्थापन चांगल होऊ शकणार नाही असे वाचनात लक्षात आले.  

घनकचरा व्यवस्थापन
सर्वप्रथम व्यक्तिगत आणि कौटुंबिक पातळीवर म्हणजेच आपल्या स्वत:च्या राहत्या घरापासून याबद्दल जाणीव निर्माण करायला पाहिजे; कारण तिथूनच व्यवस्थापनाला खरी सुरुवात करायची आहे. हे झाले तरच सार्वजनिक पातळीवर म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका ह्यांचे काम सुलभे रीत्या हाताळता येऊ शकते.
यापुढची पायरी म्हणजे गाव-नगर-शहर पातळीवर घन कचरा व्यवस्थापनाचे नियोजन . कचरा वर्गीकरण करणे, वेगवेगळा केलेला कचरा जमा करून आणणे, त्याची विल्हेवाट लावणे इत्यादी सर्व घटकांचा विचार व्हायला पाहिजे. यात अनेक संस्था, गट सहभागी झाले तर हे काम यशस्वीरीत्या पार पाडता येऊ शकते. 
काही घनकचरा सार्वजनिक जागीही निर्माण होतो. दुकाने, गावोगावी भरणारे आठवडे बाजार, शाळा, मंदिरे,यात्रा,कॉलेज, हॉटेल, खाणावळी, लग्नसमारंभ इ. ठिकाणी पण पुष्कळ कचरा निर्माण होतो. या सर्व घटकांचा विचारही व्यवस्थापनात करणे जरूरीचे आहे.

न कुजणारा किंवा सुका कचरा साधारणत: जमीन किंवा रस्ता भरण्यासाठी वापरला जाऊ शकतो. तर कुजणा-या कच-याचा उपयोग करून आपण कंपोस्ट खत किंवा गांडुळखत तयार करु शकतो. मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणारी अनिरूध्दाज अकादमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ही संस्था "गांडुळ खत प्रकल्प" ही योजना राबविण्याबाबत विनामूल्य मार्गदर्शन करून समाजातील घन कचरा व्यवस्थापनाच्या कार्याला मोलाचा हातभार लावताना आढळते. 
घरगुती स्वरूपाचे गांडूळ खत 
VJTI कॉलेज मधील प्रकल्प 
घनकच-याचे परिणामकारक व्यवस्थापन प्रामुख्याने तीन तत्त्वांवर अवलंबून असते असे वाचनांती आढळले - 
१. वापर कमी करणे (Reduce Method)
२. पुनर्वापर (Reuse Method )
३. चक्रीकरण (Recycle Process) पुनर्प्रक्रिया
वापर कमी करणे सध्याचा काळ वापरा व फेका ( Use and throw) अशा स्वरुपांच्या वस्तूंचा आहे. एकदाच वापरण्याच्या वस्तूंमुळे प्रचंड प्रमाणावर टाकाऊ पदार्थ तयार होतात. फेकण्याजोगे साहित्य वापरण्यापेक्षा कायमस्वरुपी वापरण्यात येणा-या वस्तूंचा वापर केल्यास टाकाऊ वस्तूंची निर्मिती कमी होईल. उदा. पाणी पिण्यासाठी धातूची भांडी ( स्टीलचा ग्लास ), चहासाठी प्लास्टिक कप वापरण्यापेक्षा चिनी मातीचे किंवा काचेचे कप वापरावेत.
पुनर्वापर करावा म्हणजे  त्याच स्वरुपातील टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरणे. टाकाऊ पदार्थ अनेक प्रकारांनी वापरता येतात. जुने प्लॅस्टिकचे व धातूचे डबे, बाटल्या,बरण्या पुन्हा वापरल्यामुळे अविघटनशील कच-याचे प्रमाण कमी होईल.
पुनर्प्रक्रिया उदा. लोखंड भंगारापासून परत लोखंडी वस्तू तयार करणे.

मुंबईमध्ये घनकचराव्यवस्थापनावर तोडगा काढण्यासाठी " टाटा कन्सलटंसी" ह्या नामांकीत कंपनीला अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची बातमी वाचनात आली. त्याच प्रकारे आधुनिक तंत्राच्या आधारे घनकचरा व्यवथापनच्या कार्याला आयआयटी, बीएआरसी, डीआरडीओ  ह्या मान्यवर संस्थाही आपले अमूल्य योगदान देऊन हातभार लावू शकतात असे वाटते. 

घनकचरा व्यवस्थापन हे संभाव्य  मानवनिर्मित आपतीच्या  व्यवस्थापनाचे एक पाउलं आहे जणू !  
नागरीकांच्या आरोग्याचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने तसेच पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्यासाठी म्हणून घनकचरा व्यवस्थापन उचित दिशेने , उचित वेळीच करणे हीच काळाची नितांत गरज आहे,ह्या भूमिकेशी प्रत्येकजण नक्कीच सहमत असेल.      

संदर्भ :
१.http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Government-has-taken-Deonar-fire-very-seriously-Prakash-Javadekar/articleshow/51659970.cms
२.http://www.aniruddhafriend-samirsinh.com/solid-waste-management-crisis-major-challenge-mega-cities/
३.http://indianexpress.com/article/cities/mumbai/deonar-dumping-ground-fire-for-them-rummaging-through-smouldering-yard-not-an-option-but-source-of-livelihood/
४.http://www.hindustantimes.com/mumbai/deonar-fire-under-control-but-toxic-smoke-refuses-to-wane/story-AvpTfIOKxu3i0EeMrmkj3I.html
५. http://www.aniruddhasadm.com/



प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog