२५ जुलै २०१७ रोजी घाटकोपर येथील दामोदर पार्क भागातील साईदर्शन ही चार मजली इमारत सकाळी १०.३० च्या सुमारास कोसळली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत मृतांची संख्या आतापर्यंत १७ वर पोहचली असल्याचे वृत्त वाचून दु:ख झाले. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरुच आहे .
आता पर्यंत ठाणे, भिवंडी, मुंब्रा, माहिम आणि इतर ठिकाणी इमारती पडून झालेल्या दुर्घटनांमागे इमारतींच्या बांधकामाचा दर्जा , बांधकामाची अयोग्य पध्दत , बांधकामात वापरलेले निष्कृष्ट दर्जाचं साहित्य , इमारतींच्या डागदुजीकडे झालेले दुर्लक्ष , जुन्या इमारतीं मध्ये नूतनीकरणासाठी विना परवानगी केलेले बदल अशा अनेक बाबी असल्याचे निदर्शनास आले आहे.
२७ जुलैच्या दैनिक प्रत्यक्षच्या घाटकोपर येथील साईदर्शन इमारतीच्या दुर्घटनेच्या बातमीतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की दुर्घटना वा अपघात झाल्याशिवाय त्यामागच्या कारणांचा आपण पाठपुरावा करीत नाही. तसे पाहता आपण राहतो ती घरे, इमारती अथवा सोसायटी ह्यांची सुरक्षा हा आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा विषय असायला पाहिजे. आपण सारेच जण अगदी शाळेत असल्यापासून "Prevention is better than cure " ह्या उक्ती शी परिचित असतो. परंतु व्यवहारात वा दैनंदिन जीवनात आपण खरेच ह्याचा जेवढा पाहिजे तेवढा विचार करतो का हा महत्त्वाचा प्रश्न पडतो. प्रत्यक्षच्या बातमीतून ध्यानी आले की पालिकेच्या नियमांनुसार ३० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करणे बंधनकारक आहे. घाटकोपर येथील ’साईदर्शन’ इमारत ही १९८१ साली बांधण्यात आली होती म्हणजे आता २०१७ साली तिला जवळपास ३७ वर्षे होत आली आहेत. अशा परिस्थितीत त्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट झालेले असणे हे गरजेचे होते. परंतु ’साईदर्शन ’ ह्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आलेले नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यातच भरीस भर म्हणजे गेल्या २-३ महिन्यांपासून इमारतीच्या तळमजल्यावर नूतनीकरणाचे काम चालू होते ज्यात इमारतीच्या मूळ आराखाड्यात बदल करण्यात आले होते व त्यातूम इमारत कमकुवत झाल्याचे आरोप इमारतीतील रहिवाशांनी केले आहेत.
ह्यावरून आपण राहतो त्या घराची ,इमारतींची सुरक्षा , विशेषत: जुन्या पडकळीला आलेल्या इमारतींची सुरक्षा ही किती महत्त्वाची बाब आहे हे ध्यानात येते.
ह्या दुर्घटनेच्या अनुभवाने जागे होऊन सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मालाड येथील कुरार गावातील दफ्तरी रोडवरील विजयद्वारा ही चार मजली इमारत रहिवाशांनी रिकामी केली व ’पी’ उत्तर पालिका विभागाने त्यांना शांताराम तलावानजीक असलेल्या पालिका शाळेत स्थलांतरीत केले ही खरोखरी दखल घेण्याजोगी गोष्ट आहे. विजयद्वारा ही इमारत सुध्दा मंगळवारी दुपारी खचली होती. इमारत पुनर्विकासासाठी विकासकाला देण्यात आली होती व इमारत रिकामी करण्यासाठी आठवडाभराची मुदत दिली असतानाही पालिकेने हा निर्णय त्वरीत घेतला आणि रहिवाशांनीही सहकार्य केले त्यामुळे एक खूप मोठा येऊ घातलेला धोका टळला गेला.
जीर्ण झालेल्या , मोडकळीस आलेल्या इमारतींच्या डागदुजीबाबत त्वरीत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करून घेणे हे कधीही आपल्याच फायद्याचे असते ही गोष्ट आपण विसरता कामा नये. जुन्या इमारतींची वजन पेलण्याची क्षमता कमी होत जात असते. या इमारतींच्या कॉलम-बीम, स्लॅब, बाल्कनीचे सज्जे किंवा भिंती यामध्ये जर काही कारणांनी भेगा पडल्या असतील,तर त्या लवकरात लवकर बुजवून टाकाव्यात. कारण सुरुवातीला ह्या भेगा जरी अगदी लहान किंवा बारीक दिसत असल्या तरी या भेगांमधून दर पावसाळ्यात पाणी मुरत जातं आणि शेवटी काँक्रीटच्या आतील भागांमधल्या सळ्या गंजायला सुरुवात होते. बऱ्याच वर्षांनी किंवा खूप महिन्यांनी या सळ्या पूर्णपणे गंजल्या की, त्यांची वजन पेलण्याची क्षमता खूपच कमी होते.
आपण आपल्या शरीरामध्ये ही हा बदल पाहतो की माणसाच्या शरीरात म्हातारपणी पायांमधली हाडं किंवा पाठीच्या मणक्यामध्ये झीज झाल्याने किंवा कूर्चा (दोन हाडांमधील वंगण ) कमी झाल्याने ठिसूळप्णा येतो , व हाडांना दुखापत होऊन ती मोडण्याची वा गंभीर इजा होण्याची जास्त शक्यता असते. हाडे ठिसूळ झाल्यामुळे वजन पेलायची ताकदच उरत नाही आणि त्यामुळे घसरून पडण्याचा वा कोलमडण्याचा धोका बळावतो. त्याप्रमाणेच जुन्या इमारतीच्या बीम-कॉलमची ताकद पेलण्याची क्षमता नाहीशी झाली की इमारत कोसळते. त्यामुळे इमारतीच्या कोणत्याही भागात निर्माण होणाऱ्या भेगा या इमारतीला संभवणाऱ्या धोक्यांपकी एक महत्त्वाचा धोका असतो. त्यामुळे या भेगा निर्माण होणार नाहीत, याची काळजी घेणं आवश्यक असतं. जुन्या झालेल्या इमारतीच्या भेगा ह्या धोकादायक ठरण्याआधीच योग्य ती काळजी घेतली तर या भेगा आपण नियंत्रणात ठेवून इमारतीचं आयुष्य कमी होण्यापासून रोखू शकतो.
त्याच बरोबरीने इमारतीच्या विविध भागांमध्ये केल्या जाणाऱ्या नूतनीकरणाच्या वेळी केल्या जाणाऱ्या तोडफडीमुळे इमारतीला हादरे बसतात. जर इमारत जास्त जुनी असेल किंवा इमारतीचं मूळ बांधकाम मजबूत नसेल, तर अशा हादऱ्यांमुळे बीम-कॉलम, स्लॅब किंवा सज्जामध्ये भेगा निर्माण होऊ शकतात ज्यातून इमारत कमकुवत होण्याचा धोका अजून वाढतो. घाटकोपर येथील साईदर्शन इमारतीच्या कोलमडण्यामागे हे ही एक कारण असल्याची शक्यता स्थानिक रहिवाशांनी वर्तविली आहे हे जिवंत, बोलके उदाहरण ह्याच्या पुराव्यासाठी पुरेसे आहे असे वाटते.
त्याच बरोबरीने इमारतीच्या विविध भागांमध्ये केल्या जाणाऱ्या नूतनीकरणाच्या वेळी केल्या जाणाऱ्या तोडफडीमुळे इमारतीला हादरे बसतात. जर इमारत जास्त जुनी असेल किंवा इमारतीचं मूळ बांधकाम मजबूत नसेल, तर अशा हादऱ्यांमुळे बीम-कॉलम, स्लॅब किंवा सज्जामध्ये भेगा निर्माण होऊ शकतात ज्यातून इमारत कमकुवत होण्याचा धोका अजून वाढतो. घाटकोपर येथील साईदर्शन इमारतीच्या कोलमडण्यामागे हे ही एक कारण असल्याची शक्यता स्थानिक रहिवाशांनी वर्तविली आहे हे जिवंत, बोलके उदाहरण ह्याच्या पुराव्यासाठी पुरेसे आहे असे वाटते.
आपण बरेच वेळा इमारतींच्या बाहेरील भिंतीवर उगवलेली लहान झुडुपे किंवा झाडे पाहतो. पक्षी जेव्हा इमारतीवर बसतात, तेव्हा त्यांच्या पायांना चिकटून आलेल्या अनन्धान्याच्या बिया ह्या अशा भेगांमध्ये जाऊन रूजतात व त्यांचीच पुढे रोपे म्हणा वा लहान झुडूपे , झाडे बनून बाहेर उगवतात. ह्यांचीच मुळे वाढून खोलवर जातात आणि या भेगा किंवा तडे अधिकच रुंदावतात. त्यातून मग पाण्याची गळती किंवा पाझर सुरु होते जी इमारतीसाठी धोकादायक असते. अशा प्रकारच्या पाण्याच्या गळतीमुळे किंवा झिरपण्यामुळे बुरशी येते. इमारतीच्या भिंतींना लागणारी बुरशी , ओल ही केवळ बाहेरच्याच किंवा पावसाच्या पाण्यानेच येते असं नाही, तर टॉयलेट, स्वयंपाकघराचं सिंक किंवा बेसिन यांतून होणारी पाण्याची गळतीही त्याला कारणीभूत असते.
त्यामुळे पाण्याच्या गळतीचं कारण काहीही असलं, तरी ती ताबडतोब थांबवली पाहिजे. कारण अखेरीस ह्या भेगा, ही ओल हेच पुढे इमारतीच्या आयुष्याला धोका निर्माण करतात.
त्यामुळे पाण्याच्या गळतीचं कारण काहीही असलं, तरी ती ताबडतोब थांबवली पाहिजे. कारण अखेरीस ह्या भेगा, ही ओल हेच पुढे इमारतीच्या आयुष्याला धोका निर्माण करतात.
अनिरूध्दाज अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ह्या संस्थेच्या वतीने करण्यात येणार्या आपती व्यवस्थापनाचा कोर्स (विनामूल्य) करण्याची संधी मिळाली होती त्यामधील प्रशिक्षणाच्या द्वारे आणि लोटस पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमीटेड आणि अनिरूध्दाज अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या "आपत्ती व्यवस्थापन " ह्या पुस्तकाच्या आधारे इमारतीला पडणार्या भेगा आणि गळतीच्या बाबतीत काही खबरदारी घेता येऊ शकते ह्याची माहिती हाती लागली होती ती अशी -
* घर घेण्याआधी शक्य असेल, तर एखाद्या स्थापत्य अभियंत्याला दाखवून इमारतीच्या दर्जाची खात्री करून घर घ्यावं. कुठेही घर विकत घेताना किंवा नवीन घर बांधताना राष्ट्रीय प्रमाणक संस्थेचे (नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅंडर्डस ) कोड पाळले आहेत किंवा नाही ह्याची खात्री करून घ्यावी, हे कोड आहेत IS: 1893:1984, IS: 4326:1993 , IS: 13828:1993 इत्यादि.
* आपण राहात असलेल्या इमारतीत आपल्या घरातले पाण्याचे किंवा सांडपाण्याचे पाइप किंवा नळ यातून गळती होणार नाही, याची काळजी घ्यावी. विशेषत: कन्सिल्ड पाईपसंबंधी ही काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.
* एअरकंडिशनरच्या आऊटलेट पाईपमधून येणारं पाणी इमारतीच्या सज्जावर किंवा इतर भागांवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी व हा पाइप एखाद्या बादलीत सोडावा. म्हणजे इमारतीच्या भागांवर हे सतत पडणारं पाणी ओल किंवा बुरशी निर्माण करणार नाही.
* इमारतीला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी घराचं नूतनीकरण करताना एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घेऊन आवश्यक ती काळजी घ्यावी व शक्यतो तोडफोड टाळावी. उदाहरणार्थ - बाल्कनीत किचन किंवा न्हाणीघर बांधायला परवानगी देऊ नये. सर्वसामान्य आरसीसी स्लॅबवर (RCC Slab) क्षमतेपेक्षा जास्त वजान टाकू नये. शौचालयांची जागा बदलायला किंवा अशा स्लॅबवर नवीन शौचालय बांधायला परवानगी देऊ नये.
* बांधकामाविषयक सल्ला देणार्या (Structural Consultant) योग्य सल्ल्याशिवाय गच्चीवर पाण्याच्या अतिरिक्त टाक्य़ा बांधू नये किंवा बांधण्यास परवानगी देऊ नये.
* विशेष करून जुजबी तांत्रिक ज्ञान असलेल्या अगर स्थापत्य अभियंता किंवा वास्तुविशारद नसलेल्या कोणाही व्यक्तिच्या सल्ल्यावरून हे असले बदल करणं टाळावं. कारण या धोकादायक बदलांमुळे तुमचं आयुष्य सुखकर होण्याऐवजी तुम्ही तुमच्याबरोबरच इतरांचीही आयुष्य धोक्यात घालता ह्याची जाणीव ठेवा.
* फ्लोअिरगच्या जुन्या लाद्या काढून त्याजागी नव्या लाद्या बसवण्याआधी इमारतीचं वय, तिची स्ट्रक्चरल परिस्थिती आणि वजन पेलण्याची क्षमता लक्षात घ्यावी.
* इमारतीच्या कोणत्याही भागात रोपं अगर झाडं वाढू देऊ नयेत. तशी ती आढळलीत, तर लगेचच मुळासकट उपटून टाकावीत आणि त्या भेगा लवकरात लवकर भरून घ्याव्यात. अॅसिडचा वापर करू नये. कारण हे अॅसिड भेगांमधून आत शिरून लोखंडी सळ्यांना घातक ठरू शकते.
* गच्चीवरून होणारी गळती थांबवण्यासाठी भेगांमध्ये डांबर घालू नये. कारण उन्हाळ्यात दिवसभर गच्चीबरोबरच हे डांबरही तापून प्रसरण पावल्यामुळे भेगा अधिक मोठ्या होतात तर रात्रीच्या वेळी तापमान कमी झाले की डांबर आकुंचन पावतं; पण भेगा मात्र तशाच राहतात. याच वाढलेल्या भेगांमधून मग पावसाळ्यात अधिकच गळती सुरू होते.
* घराच्या वा इमारतीच्या कुठल्याही भागावर, भिंतीवर वा अन्य कुठेही ओल दिसली, तर त्या पाण्याचे मूळ शोधून काढून ते पाणी थांबवावं.
वरीलप्रकारे जर सुजाण , सुशिक्षीत नागरिकाची भूमिका बजावून आपणच आपल्या घरांची, इमारतींची , सोसायटीची काळजी घेतली तर इमारती कोसळून पडल्याने होणार्या दुर्घटनांचे प्रमाण रोखण्यासाठी आपण नक्कीच हातभार लावू शकतो.
संदर्भ : १. दैनिक प्रत्यक्ष दिनांक २७ जुलै २०१७
२. आपती व्यवस्थापनाचा कोर्स (विनामूल्य)- ह्या विषयी अधिक http://www.aniruddhasadm.com/माहितीसाठी ह्या संकेत-स्थळाला भेट देऊ शकता.
३. लोटस पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमीटेड आणि अनिरूध्दाज अॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या "आपत्ती व्यवस्थापन " ह्या पुस्तकासाठी http://www.e-aanjaneya.com/ ह्या लिंकवर भेट देऊ शकता.