Tuesday, 6 November 2018

मायक्रोचिप्स तंत्रज्ञान अणि मानव !!!





स्वीडनमध्ये चार हजारांहून अधिक नागरिकांच्या शरीरात ‘मायक्रोचिप्स’ - या शीर्षकाखाली एक बातमी दैनिक प्रत्यक्षच्या २४ ऑक्टोबरच्या अंकात वाचनात आली आणि खूप मोठा धक्काच बसला.  आतापर्यंत ’मायक्रोचिप्स" ह्या घरगुती पाळीव प्राण्यांच्या ओळखीसाठी वापरात येत असल्याचे माहितीत होते. मायक्रोचिपींग ही एक सोपी , सुरक्षित आणि जलद पध्दती असून हरवलेल्या वा गमावलेल्या आपल्या पाळीव प्राण्यांच्या विशेषत: कुत्र्यांच्या पुन: भेटीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे ऐकिवात होते.  आता तर स्वीडनमध्ये तब्बल चार हजारांहून अधिक नागरिकांच्या शरीरात त्यांनी आपणहून ’मायक्रोचिप्स’ बसवून घेतल्या आहेत . 



स्वीडनमध्ये सध्या रेल्वेसेवा, रेस्टॉरंट, लिंक्ड्सारख्या खाजगी कंपन्या यासारख्या ठिकाणी ह्या मायक्रोचिप्सचा वापर होत आहे, ज्या ‘रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन’ (आरएफआयडी) नावाने ओळखण्यात येणार्‍या तंत्रज्ञानावर आधारलेल्या आहेत. तांदळाच्या दाण्याइतका आकार असलेली ही मायक्रोचिप  सुमारे  $180 (£140)  एवढ्या किमतीत इच्छुक माणसाच्या हातात बसविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

ह्या मायक्रोचिप्सचा वापर रेल्वेस्टेशन्सपासून ते नोकरीच्या ठिकाणापर्यंत सर्व जागी, तसेच इमारतींमधील प्रवेशासाठी , संगीत जलसा (कार्यक्रम) वा मैफिलींमधील प्रवेशासाठी होऊ लागला आहे.  ह्या लघु तंत्रज्ञानाने पैसा (रोकड रक्कम) वा तिकीटे जवळ बाळगण्याची गरज संपते   एवढेच नव्हे तर सोशल मिडीयावर ह्याद्वारे सहभागी होता येते असे निदर्शनास आले आहे. मायक्रोचिप्सचा वाढती लोकप्रियता लक्षात घेता स्वीडनमधील काही कंपन्यांनी तर आपल्या कर्मचार्‍यांना   ही ’मायक्रोचिप्स इंप्लांट ’ करण्याची सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याचेही वृत्त वाचनात आले आहे. 



मायक्रोचिप्स वापरण्याची सुरुवात सुमारे जून २०१७ मध्ये झाली असावी जेव्हा एस जे रेल ह्या स्वीडीश ट्रेन ऑपरेटरने सुमारे १०० लोक ट्रेनच्या प्रवासासाठी मायक्रोचिप्स वापरत असल्याचे घोषित केले होते. प्रवासी त्यांच्या हातातील इंप्लाट केलेल्या मायक्रोचिप्स च्या आधारे त्यांचे तिकीट डिव्हाईसवर थेट प्रत्यक्ष लोड करू शकत होते आणि ट्रेन कंडक्टर  स्मार्टफोन वापरून ह्या चिप वाचून खात्री करू शकत असे की प्रवाशांनी त्यांच्या  प्रवासाचे पैसे भरले आहेत की नाही .  खूपच व्यापक आणि मुख्य प्रवाही तंत्रज्ञानाच्या वापरापैकी हा एक वापर होता जो भरपूर अग्रेसर  विचारवंत कंपन्यांनी स्विकारला. लिंक्ड्सारख्या व्यावसायिक सोशल मिडीया वापरणार्‍या कंपनीने देखिल मायक्रोचिपींग तंत्रज्ञानाचा स्विकार केला आहे.   स्वीडनमधून समोर आलेल्या माहितीमुळे हे दावे खरे ठरल्याचे दिसत आहे. स्वीडनमधील ‘बायोहॅक्स इंटरनॅशनल’ ही जॉवान ऑस्ट्र्लुंड ह्यांनी ५ वर्षांपूर्वी सुरु केलेली ह्या नवीन उद्योगातील बाजारातील अग्रणी कंपनी आहे. या कंपनीकडून नागरिकाची संपूर्ण माहिती असणार्‍या मायक्रोचिप्स तयार करून त्या शरीरात रोपण केल्या जात आहेत.

मायक्रोचिप्स या संकल्पनेचे समर्थक ‘मायक्रोचिपिंग’ म्हणजे माणसाला स्वातंत्र्य बहाल करणारी व्यवस्था सल्याचा दावा करीत आहे कारण या मायक्रोचिपमुळे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा कुठल्याही स्वरुपाचे ओळखपत्र जवळ बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही.  परंतु प्रत्यक्षात ‘कॉन्स्पिरसी थिएरिस्ट’ मायक्रोचिपींग ही जागतिकीकरणवाद्यांची जगभरातील जनतेला गुलाम करण्याची योजना असल्याचा आरोप करीत आले आहेत. 

मायक्रोचिपींग ह्या सदर तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्या नागरिकाची वैयक्तिक माहिती त्याच्या परवानगीशिवाय सहजपणे मिळविता येऊ शकते. त्यामुळे हे तंत्रज्ञान नागरिकांना व्यवस्थेचे गुलाम बनविणारी आहे. तसेच आपल्याला नको असलेल्या विरोधकांचा काटा काढणे यामुळे व्यवस्थेला सहज शक्य होऊ शकते, अशी चिंताही ‘कॉन्स्पिरसी थिएरिस्ट’कडून व्यक्त केली जात आहे ज्यात तथ्य असावे असे वाटते.

. ‘सीबीएस ऑस्ट्रेलिया’ या वृत्तवाहिनीने ऑस्ट्रेलिया सरकारने २०१० सालीच आपल्या देशातील सर्व नागरिकांमध्ये ‘मायक्रोचिप’ बसविण्याची योजना आखली होती ही माहिती उघड केली होती. स्वीडनमधील ‘बायोहॅक्स इंटरनॅशनल’ ही जॉवान ऑस्ट्र्लुंड ह्यांनी ५ वर्षांपूर्वी सुरु केलेली ह्या नवीन उद्योगातील बाजारातील अग्रणी कंपनी आहे. या कंपनीकडून नागरिकाची संपूर्ण माहिती असणार्‍या मायक्रोचिप्स तयार करून त्या शरीरात रोपण केल्या जात आहेत. स्वीडनमध्ये चार हजारांहून अधिक नागरिकांच्या शरीरात ‘मायक्रोचिप्स असल्याच्या समोर आलेल्या माहितीमुळे ‘कॉन्स्पिरसी थिएरिस्ट’ प्रतिपादन करीत असलेले दावे खरे ठरण्याची चिन्हे स्प्ष्ट दिसू लागली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

स्वीडीश शहर लुंड मधील मॅक्स ४ प्रयोगशाळेतील  बेन लिबर्टन हा मायक्रोबायॉलॉजिस्ट AFP ला सांगतो की मायक्रोचिप्स रोपण करून  सध्या साठवण्यात आलेली आणि पुरविली जाणारी माहिती ही जरी लहान असली तरी ती वाढण्याची शक्यता अधिक आहे. मायक्रोचिप मध्ये जास्त माहिती एका जागी साठवून ठेवल्यास तीच माहिती आपल्याच विरोधात वापरली जाण्याचा धोका अधिक वाढतो.   जर मायक्रोचिप एके दिवशी वैद्यकीय समस्या शोधू शकते तर तशा मायक्रोचिप्समुळे माणसाच्या  रोग प्रतिकारक प्रणालीवर संक्रमण किंवा प्रतिक्रिया उद्भवू शकते . ही बाबही दुर्लक्षित करून चालणार नाही.    

स्वीडनसारख्या प्रगत युरोपिय देशामधील हजारो नागरिकांनी मायक्रोचिप स्वीकारल्याने नजिकच्या काळात ही व्यवस्था युरोपात अन्य देशांत ही लवकरच प्रस्थापित होण्याची संभाव्यता अधिक असल्याचे गडद चित्र स्पष्ट  दिसत आहे . माणूस तंत्रज्ञानावर एवढा अवलंबून राहिला तर नक्कीच त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहणार नाही ह्यात तिळमात्र शंका नाही. माणसाच्या विकासासाठी तंत्रज्ञान का तंत्रज्ञानाच्या अवाजवी उपयोगामुळे माणूसच  तंत्रज्ञानाचा गुलाम बनतो की काय ही आशंका मनाला भेडसावत राहते, त्यामुळे ती नजरेआड करून मुळीच चालणार नाही असे प्रामाणिकपणे वाटते.    

संदर्भ: १.  दैनिक प्रत्यक्ष
 

 टीप - " मायक्रोचिप्स तंत्रज्ञान अणि मानव  !!! "  ह्या संदर्भातील लेख दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक ३ नोव्हेम्बर २०१८ च्या अंकात "व्यासपीठ" ह्या सदरात पान क्रमांक ८ वर प्रथम छापून आला होता

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog