Monday, 9 February 2015

लहान मुलांची दुखापत आणि सतर्कता


आधीच्या लेखात सतर्कता आपण पाहिली. यावरुन एक गोष्ट आठवली मी शाळेत असताना वाचली होती. गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सतर्कतेची. शिवराज्याभिषेकापुर्वी एक महीना आधी लिहिलेल्या एका पत्रातुन त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. महाराजांनी आपल्या सैन्याच्या अधिकार्‍यांना लिहिलेल्या एका पत्रात असे नमूद केले होते की रात्री निजताना पेटत्या दिव्यांची ज्योत मालवावयाची काळजी घ्यावी अन्यथा उंदरानी ती ज्योत इतस्तत: नेऊन टाकल्यास सुके वैरण वा दाणापाणी असलेली कोठारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडतील आणि प्रचंड नुकसानाला सामोरे जावे लागेल. राजे आपल्या सैन्याबाबत किती जागरूक आणि दक्ष होते ह्याची जाणीव होते. असे असावे आपत्ती व्यवस्थापन प्रशासकीय पातळीवरचे.


मागच्या लेखात आपण मुलांच्या बाबतीत छोटे मोठे अपघात कोणते हे पाहिले व ते होऊ नये म्हणून सतर्क कसे रहावे याची अगदी थोडक्यात माहीती घेतली. आता अपघात म्हटला की आली दुखापत...आणि दुखापत मधील सर्वात महत्त्वाची चिंताजनक बाब म्हणजे - हाड मोडणे वा अस्थिभंग वा फ्रॅक्चर

हाड मोडणे म्हणजेच 'अस्थिभंग'. अस्थिभंगाचे विविध प्रकार आहेत. हाड हा मुळात कठीण आणि मजबूत पदार्थ आहे. उतारवयात काही आजारात, आणि कॅल्शियम द्रव्याच्या अभावामुळे मात्र हाड नाजूक आणि ठिसूळ होऊन एवढया तेवढया कारणाने मोडते. अपघातामध्ये वेडावाकडा मार लागून हाडे मोडण्याचा संभव असतो. 

अपघाताची तीव्रता वाढून गंभीर स्वरूप होऊ नये ह्याकरिता घ्यावयाच्या काही दक्षता - विशेषत: अस्थिभंग (हाड मोडणे , फ्रॅक्चर) झाल्यास - 
(पुढील सर्व उपाय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणांतर्गत बचाव पद्धती प्रात्यक्षिकासहीत शिकल्यानंतरच करावेत. केवळ पु्स्तकी ज्ञानावर अवलंबून राहून उपाय केल्यास रुग्णास अधिक हानी पोहचू शकते. याची कृपया नोंद घ्यावी.)

  • लहान मुलांची हाडं कोवळी आणि लवचिक असल्याकारणानं पुष्कळवेळा ती पूर्णपणे न मोडता, तुटता फक्त हिरवट फांद्याप्रमाणे केवळ एक बाजूला मोडतात वा वाकतात आणि अशा तऱ्हेने वाकलेले पाय, दंड अथवा हात पाहून पालकांना साहजिकच भीती वाटते, अशा वेळी नुसतीच मसाज करणं, हात चोळणं लेप अथवा हाडं बसवून देणाऱ्या वैदूला दाखवणं असे उपाय न करता हात एखाद्या स्वच्छ फडक्याने गळ्यात अडकवून ठेवावा. पाय एका टणक फळीला किंवा  दोन बांबूच्यामध्ये फडक्याने बांधून ठेवावा. 
  • तज्ञ डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घेणेही अशा वेळी आवश्यक ठरते कारण असा अस्थिभंग केवळ क्ष-किरणांच्या सहाय्याने पटकन (X -Ray) दिसतो. 
  • खूपदा कोपराजवळची हाडे मोडतात. आणि खूप सूज येते. सूज आली म्हणून दु:ख-दबाव सारखे वा अन्य घरगुती स्वरूपाचे किरकोळ लेप लावले जातात. एक दोन दिवसांतच कोपरांची हालचाल कमी होते वा बंद होते. मग शक्यतो चोळणं हा उपाय केला जातो. यानं तुटलेली हाडं आणखीनच सरकून शेजारील रक्तवाहिनीलाही इजा होऊ शकते. अशा प्रकारचे फ्रॅक्चर मुलांमध्ये खरोखरच गंभीर असते. चोळणे ही पध्दत घातक असून त्यामुळे रक्तस्राव वाढतो व जास्त नुकसान होते. चोळण्यामुळे फायदा काही नसतो. ते लवकरात लवकर योग्य जागी जुळवून प्लॅस्टरमध्ये बसविणे अतिशय आवश्यक आहे. या गोष्टीत उशीर केल्यामुळं कोपर, हात व बोटे आखडून हातात व्यंग आलेलं नेहमी पाहण्यात येतं. 
  • मुलांच्या हातावर, कोपरावर, घोट्यावर अथवा पायावर आलेली सूज बिनमहत्त्वाची म्हणून दुर्लक्षित न करता लवकरात लवकर तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 
  • विशेषतः लहान मुलांना तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शरीराच्या कुठल्याही भागात सूज आल्यानंतर मसाज करणं अथवा चोळणं कटाक्षानं टाळावं.


रक्तस्त्राव होत असताना योग्य प्राथमिक उपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. 

  • काही वेळा जखमेतून अतिशय रक्तस्त्राव होऊन लहान वा मोठी मुले बेशुद्ध पडतात, डोळे फिरवतात. अशावेळी नुसतं डोक्यावर पाणी मारणं किंवा कांदा/चप्प्ल हुंगायला देणं उचित नसतं. 
  • मुलाला प्रथम पलंगावर झोपवून त्याच्या पायाकडील भाग उशी ठेवून अथवा लाकडी ठोकळ्यावर उंच करावा. जखमेवर स्वच्छ फडके आणि कापूस यांचा दाब देऊन ती घट्ट पकडून धरावी. 
  • उपचाराची पूर्ण माहिती नसल्यास जखमेच्यावर रुमालाने अथवा दोरीने करकचून बांधणे टाळावे कारण रक्तस्त्राव अशुध्द रक्तवाहिनीतून म्हणजेच नीलेतून होत असल्यास, अशा आवळून बांधण्याने तो आणखीनच वाढू शकतो ह्याची जाणीव ठेवावी.
  • खूप उंचीवरून मूल खाली पडल्यास मेंदूला जबरदस्त मार बसतो. मूल बेशूद्ध होणं, त्याला उलट्या होणं, नाकातून किंवा कानातून रक्त येणं, फीटस येणं अशा गोष्टी घडू शकतात. ही सारी  मेंदूला मार लागल्याची गंभीर लक्षणं आहेत. अशा वेळी रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटलामध्ये नेणं अत्यावश्यक असते.


लहान मुलांच्या बाबतीतील संभाव्य अपघात आपण नुकतेच पाहिले आता वृध्द आजी आजोबा मंडळीच्या अपघातांची ओळख करून घेऊ या पुढील भागात.

 - सुनीता करंडे  

2 comments:

  1. Good information on fractures irt children. Falling is part of growing up and minor injuries are part of the game. But things start getting serious when such falls and injuries result into fractures, This post gives a very useful review of what is to be done and what not to be done in such circumstances.


    Sandeep Mahajan

    ReplyDelete
  2. Shreeram. Ambadnya Sandeep Mahajan.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog