आज नवीन वर्षाला सुरुवात झाली. सर्वचजण एकमेकांना नव-वर्षाच्या शुभेच्छा देण्यात गुंग असतात. नवीन वर्ष म्हणजे नवीन आशेचा सूर्योदय ! नवीन ध्येयाचा, नवीन सुबत्तेचा , नवीन विचारांच्या धारेचा , नवीन सळसळत्या चैतन्याचा, नवीन जोशाचा ,नवीन ताकदीचा , नवीन सामर्थ्याचा , नवीन आविष्कारांचा , नवीन प्रार्थनांचा एक गुलदस्ताचा जणू ! ह्या शुभेच्छा , प्रार्थना आणि सदिच्छांतून अवघे प्रेमच अव्याहतपणे भरभरून वाहत असते. पण ह्या सर्वाचा मूळ स्त्रोत असणारा भगवंत , परमेश्वर ह्याची आम्हाला आठवण येते का ? आम्ही "त्या" अनंत करूणामयी परमेश्वराला, भगवंताला "त्या"नेच हे सारे आम्हाला दिले म्हणून कधीतरी कृतार्थ भावाने धन्यवाद देतो का? कधीतरी आभार मानतो का? तर कदाचित उत्तर देणे कठीण होऊन बसेल नाही? आम्हाला "त्या" भगवंताची स्मृती तरी असते का? हाच मुळात प्रश्न आहे, चला तर मग आज नवीन वर्षाच्या औचित्याने "त्या" भगवंताशी नाते जोडायला शिकू या ...
आता कोणाशी नाते जोडायचे म्हणजे मला त्या व्यक्तीशी संवाद साधायला हवा आणि संवाद तर तेव्हाच साधता येतो जेव्हा मला त्या व्यक्तीला माहीत असलेल्या भाषेत बोलता येते किंवा मला ठाऊक असलेली भाषा त्या दुसर्या व्यक्तीला पण माहीत असते. आता येथे तर साक्षात भगवंताशीच मला नाते जोडायचे आहे म्हटल्यावर मला भगवंताची , परमात्म्याची भाषा येते का? हा प्रश्न उद्भवतो साहजिकच, नाही का बरे?
आम्ही साईसच्चरितात वाचतो की कृष्णाचे वचन " संत माझ्या सचेतन मूर्ती ! " म्हणजेच संत ह्या परमात्म्याच्या, भगवंताच्या सचेतन मूर्ती आहेत. आणी "जे जे पिंडी ते ते ब्रम्हांडी " ह्या न्यायाने प्रत्येक मानव हा कितीही पापी असो की पुण्यवान असो, त्या परमात्म्याची अंशत: मूर्ती असतोच. आम्ही जर परमात्म्याचे अंश आहोत तर परमेश्वराने , त्या भगवंताने आमच्या पित्याने आम्हाला त्याची सगळी ताकद कमी-अधिक प्रमाणात दिलेली आहेच. म्हणजेच आम्हाला "त्या" परमात्म्याची, परमेश्वराची, त्या भगवंताची भाषा नक्कीच समजू शकते , जर आम्ही त्या दिशेने प्रयास केले तर !!!
आम्हाला कधी प्रश्न पडला की परमेश्वराला कुठली भाषा कळते. तो एकच राम वा तो एकच कृष्ण वा तो एकच साई , मग त्याला आम्ही मराठीतून आळवतो, गुजराती मधून आळवतो, तमिळ , कन्नड , मल्याळी, बंगाली मधून आळवतो तरी सगळ्यांची भाषा "त्या"ला पोहचतेच ना, सारे काही "त्या" ला कळतेच ना ? कारण ती असते "प्रेमाची" भाषा !
रामाचे, कृष्णाचे, साईबाबांचे भक्त वेगवेगळ्या भाषा बोलणारे होते आणि आज ही आहेत, तरी सगळ्यांची भाषा "त्या" ला कळतेच. हे "त्या"चं वैशिष्टय आहे. ही "त्या"ची विशेषता आहे. पन मग आम्हाला "त्या"ची भाषा कळते का? परमात्म्याची, "त्या" प्रेमळाच्या प्रेमळ , दयानिधीची भाषा शिकणे हेच सगळ्यात विशेष आहे माणसासाठी असे मला वाटते.
परमेश्वराने आम्हाला "त्या"ची भाषा दिलीय, वाणी (वाचा - बोलण्याची देणगी) दिलीय आणि त्या परमेश्वराची भाषा शिकायची सोयही करून ठेवलीय. पण आम्ही कधी तिचा वापर करतो का?