Monday, 14 March 2016

महादुर्गा सदा विजयते !!!

अखिल विश्वाची दुर्गतिहारिणी तारक संजीवनी -आदिमाता दुर्गा !

नुकतीच महिषासुरमर्दिनी आदिमाता दुर्गा स्तुती वाचनात आली आणि मृकंड ऋषींनी आणि अग्न्यादि देवांनी आदिमातेच्या दुर्गा स्वरूपाची स्तुती ही केवळ स्तुती स्तोत्र नसून तिसर्‍या महायुध्दाच्या खाईपासून अखिल विश्वाला तारणारी ती एकमेव आदिमाता दुर्गाच आहे ह्याचा मनाला १०८ % भरोसा वाटला. 

दुर्गा दुर्गार्तिशमनी दुर्गा ssपत्तिनिवारिणी ।
दुर्गमच्छेदिनी दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी ।।१।।

दुर्गतोध्दारिणी दुर्गतिहन्त्री दुर्गमा sपहा ।
दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला ।।२।। 

दुर्गमा दुर्गमा ssलोका दुर्गमा ssत्मस्वरुपिणी ।
दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता ।।३।।

दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गभा दुर्गदारिणी ।
दुर्गमांगी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्र्वरी ।।४।।

महाभयात् जगत्-तारिणी त्वं जगतां विधात्री ।
विचित्ररूपा sपि चिदेकरूपा हविभाव्यशक्ति: परिपाहि दुर्गे ।।५।।


Monday, 7 March 2016

जागतिक महिला दिन- महिलांच्या प्रेरणा स्त्रोताला अभिवंदन !

८ मार्च म्हणजे जागतिक महिला दिन !

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून आणि आज २१व्या शतकातही महिलांनी "चूल आणि मूल" हे एवढेच कार्यक्षेत्र न ठेवता अनेक क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेऊन दैदिप्यमान कर्तुत्व केलेले आढळते. मग हा दिन साजरा करण्या मागची पार्श्वभूमी काय असावी अशी उत्कंठा मनी दाटली , चला तर  जाणून घेऊ या - 

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया सक्रिय व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालये तसेच काही प्रमाणावर घरांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. 
मला तरी वाटते की खर्‍या अर्थाने महिला दिन साजरा करणे म्हणजे महिलेच्या, स्त्रीच्या गुणांचा, कार्याचा आढावा घेणे.

स्त्री वा महिला ही कन्या, बहीण, प्रेयसी, पत्नी, माता, आजी अशा विवीध भूमिका यथार्थपणे सांभाळते. स्त्री आणि पुरुष ही दोन संसाररथाची चाके आहेत आणि ती समांतर असली तरच संसार रथाचा गाडा व्यवस्थित चालू राहून , सुरळीत मार्गक्रमणाही करतो. 

स्त्री ही जशी प्रेमळ, वात्सल्याची मूर्ती , सहनशील, सौदंर्य ह्याची खाण असते, तसेच कणखर बाण्याची, वेळप्रसंगी कर्तव्यकठोर, भावनांना मुरड घालून सोशिकतेचा परमोच्च बिंदू गाठून , त्यागाची परिसीमा गाठणारी, अतुलनीय शौर्यालाही सहजतेने लीलया गाठणारी असते. स्त्रीला हे सारे अमाप गुणांचे  वरदान तिच्या मातेकडून अर्थातच जगज्जननी आदिमातेकडूनच मिळाले आहे. कोणी तिला रणरागिणी चण्डिका, अशुभनाशिनी महिषासुरमर्दिनी म्हणून साद घालते, तर कोणी दुगतीपासून रोखणारी दुर्गा म्हणते तर कोणी पातिव्रत्याचा आदर्श आणि मातृवात्सल्य भावाची सगुण साकार स्वरूपिणी अनसूया माता म्हणून स्मरते तर कोणी अंबा जगदंबा, भवानी , महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी आदी नावांनी पूजते. 

आपल्या सर्व आबालवृध्दांना अतिशय आवडणारी आणि चांगल्याच परिचयाची असणारी ही आपल्या जगन्माऊलीची आरती म्हणजे तिच्या अपार प्रेमाचा, अथांग करूणेचा, क्षमेचा, अफाट गुणांचा खजिनाच जणू - ज्यात दडलेले असते एका महिलेच्या यशोगाथेचे रहस्य असते. अखिल स्त्री वर्गाला मिळालेल्या ह्या अचिंत्यदानाची महती जाणून घेण्याचा प्रयास करू या. म्हणूनच एका महिलेचा गौरव म्हणजे "त्या" आदिमातेचा गौरवच आहे नाही का?

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारी जन्ममरणांतें वारी ।
हारी पडलो आता संकट निवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ ॥
हे आदिमाता दुर्गा, तुझ्याविना ह्या संसारात,  भवसागरात, जगात तरून जाणे ही अत्यंत कठीण गोष्ट आहे. हे अनाथांना सनाथ करणार्‍या, आपल्या मायेच्या पदराखाली आश्रय देणार्‍या अंबे , माते तू आपल्या करूणेचा विस्तार कर. आई मी तुझ्यापर्यंत पोहचू शकत नाही , परंतु तू आपल्या करूणेचा विस्तार करून मी जेथे आहे तेथवर नक्कीच पोहचू शकतेस. 
इतिहासातील रायगडाचे दरवाजे बंद झाल्यावर गडाच्या बुरुज माथ्यावर अडकलेली हिरकणी आठवते. लहानग्या तान्हुल्या बाळाला दूध पाजण्यासाठी गडावर दूध विकून रोज संध्याकाळी गडावरून उतरणारी हिरकणी, त्या दिवशी उशीर झाला आणि गडाचे दरवाजे बंद झाले. घरी माझे बाळ भुकेने व्याकुळ झाले असेल, टाहो फोडून केविलवाणे रडत असेल, ह्या मातृवात्सल्य भावाने तिळ तिळ अंत:करण तुटणारी हिरकणी मग ह्याच आदिमातेची करूणा भाकते , आणि शौर्याची परिसीमा ओलांडते. ज्या बुरुजावरून ती उतरते तेही रात्रीच्या गडद अंधारात , विना दोराच्या सहाय्याने ते एक रणझुंझार , लढवय्या पुरुषही करू धजावला नसता हे त्या थोर , महान शिवाजी राजाने जाणले आणि स्त्री मधल्या मातृत्त्वाचा गौरव करीत बुरुजाला नाव दिले "हिरकणीचा बुरुज" जो आजही गिर्यारोहकांसमोर एक मोठे आव्हान बनून उभा ठाकतो 

वारी वारी जन्ममरणांतें वारी । हारी पडलो आता संकट निवारी ।जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी । सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी 
हे आदिमाता दुर्गे, तू तर जन्म- मरणांच्या फेर्‍यातून निवारण करणारी आहेस. हे अंबे, हे जगदंबे मी संकटाशी झुंजता झुंजता हरून गेले आहे , आता तूच धाव घे आणि ह्या संकटाचा नाश कर. 
यवनी राजांच्या अंमलाखाली पूरा दख्खन (अवघा महाराष्ट्र )भरडला गेला होता. जुलमी पातशाहीच्या विरूध्द बंड पुकारण्याची ताकद कुणा कुणात नावालाही उरली नव्हती, दिवसाढवळ्या कोवळ्या , तरूण मुली पळविल्या जात होत्या, लेकीसुना, बायांची अब्रू वेशीला टांगली जात होती, अन्यायाविरूध्द तोंडातून ब्र काढणार्‍यांच्या पाठी आसुडाच्या कोरड्याने सोलल्या जात, मुंडकी छाटून रक्ताचे पाट तर किती वाहत त्याची खिजगणतीच नव्हती , जिवंतपणी  मरण परवडले अशा नरक यातना भोगत समाज अगतिक होऊन गेला होता आणि आदिमातेला कळवळून साद घालत होता - हे आदिमाता दुर्गे, तू तर जन्म- मरणांच्या फेर्‍यातून निवारण करणारी आहेस. हे अंबे, हे जगदंबे मी संकटाशी झुंजता झुंजता हरून गेले आहे , आता तूच धाव घे आणि ह्या संकटाचा नाश कर. 
हे देवी भवानी , हे रणमर्दिनी तू तर सुरवरांनाच काय तर ईश्वराला , परमात्म्यालाही वर देणारी आहेस, तूच तारक आहेस, तू संजीवनी आहेस....आई धाव घे .... 
आदिमाता सत्वरी धावली आणि जिजाऊच्या पोटी शिवबा नावाचे एकमेवाद्वितीय नररत्न जन्मले... तारक संजीवनी आदिमातेचे हे जिजाऊलाच वरदान नव्हते तर होते अवघ्या महाराष्ट्राला संजीवन,  अभेद्य तारक कवच !!

त्रिभुवनभुवनी पाहता तुजऐसी नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे कांही ॥
साही विवाद करिता पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तांलागी पावसि लवलाही॥ जय देवी…

हे आदिमाते दुर्गे , समस्त त्रिभुवनांत तुझ्यासारखे कोणी नाही, तुझे गुणगान गाताना चारही वेद थकून जातात, सहा दर्शन शास्त्रे विवाद करण्यात काल प्रवाहात वाहून जातात. हे अंबे तुझे असे स्वरूप जे वेदंना आणि शास्त्रांना सुध्दा समजले नाही , ते मात्र तुझ्या आदिमातेच्या भक्तांना मात्र भक्तीने सहज प्राप्त होते.
पंडितांना  न मार्गाने जे लाभले नाही ते आदिमातेचे , परमेश्वरीचे स्वरूप जनाबाई, मीराबाई , मुक्ताई, सोयराबाई ह्या सार्‍या संत स्त्रियांना मात्र सहज आकळले होते - " अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग" श्रीचा , श्रीविद्येचा "त्या" श्यामेचा सावळा रंग , तोच तिच्या पुत्राचा "श्रीरंगाचा" रंग हे परम सत्य प्रेमळा भक्तीने विलसणारे मातृवत्सल हृदयच , मातेचे अंत:करणच ओळखू शकले ...

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।
क्लेशांपासुनि सोडवी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा  ।
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशा॥ जय देवी…
हे प्रसन्नवदना आदिमाता दुर्गे तू आपल्या दासांवर प्रसन्न होतेस आणि त्यांची भवपाशातून सुटका करतेस. हे अंबे, तुझ्यावाचून दुसरा कोणी माझी आस पुरवूच शकत नाही. हे आदिमाते दुर्गे तुझी आरती गाणारा नरहरि तुझ्या चरणकमळांच्या धुळीकणांमध्येच तल्लीन झाला आहे. 

झाशीच्या राणी लक्ष्मीबाई ह्या वीरांगनेला आपल्या दत्तक घेतलेल्या लहानग्या पुत्रासह आपले झाशीचे राज्य ब्रिटीशांच्या तावडीतून सोडवायचे होते, खालसा होऊन द्यायचे नव्हते , मदतीला कोणी तयार नव्हते आणि घरभेद्यांनी किल्ला इंग्रजाच्या हवाली करण्याचे कारस्थान रचले होते , तेव्हा जीवाची पर्वा न करता आदिमातेच्या ह्याच प्रसन्नवदना रूपाला साद घालत, संसाराच्या आत्यंतिक क्लेशांपासून , भवपाशातून सुटका करायला धावा करत लक्ष्मीबाईंनी आदिमातेचे रणदुर्गा स्वरूप धारण केले होते. राणीचे ते रणागंणावरील शौर्य, ते तेज, ते धाडस पाहून ब्रिटीश सुध्दा अचंबित झाले होते. अर्थातच राणी लक्ष्मीबाईला हौतात्म्य मरण लाभले असले तरी तेजाची तेजाने केलेली आरती आणि तेजात तेजाचे विलीन होणे हेच राणी लक्ष्मीबाईंनी दाखवून दिले होते जणू काही. 

ब्रम्हवादिनी गार्गी, याज्ञवल्क्य पत्नी ब्रम्हवादिनी मैत्रेयी ह्या आदिमातेच्या ज्ञानोन्मयी स्वरूपाच्या उपासक आणि आविष्कारदर्शक होत्या. परंतु कालपरत्वे स्त्री शिक्षणापासून वंचित होऊ लागली तेव्हा स्त्री शिक्षणाचे बीज पुनश्च सावित्रीबाई फुले ह्या क्रांतीज्योतीने समाजात रूजविले आणि आजतागायत त्याच बीजाचा महान वटवृक्ष बनून सर्व स्त्रियांकरिता आधारवड बनला आहे.   
अनसूया रूपात आदिमाता स्त्रीला मातेचे अगाध प्रेम, क्षमा शिकविते , गायत्री स्वरूपातून ज्ञानदात्री बनते, तर महिषासुरमर्दिनी बनून रणागंणावर शौर्य गाजविणारी रणमर्दिनी बनविते. म्हणूनच स्त्रीने कधीच स्वत:ला कमी लेखून अबला समजून अन्याय सहन करायचा नसतो. 
आपल्या मातेचे हे अगणित गुणभांडार स्त्री साठी सदैव मार्गदर्शक आणि प्रेरणादाय़ी असते आणि म्हणूनच असामान्य कर्तुत्त्व गाजविणार्‍या आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणार्‍या महिला ह्या गृहिणी बनून पत्नी, माता , बहीण , कन्या अशा सर्वच नात्यांना लीलया सांभाळतातच आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात उत्तुंग गगनभरारी घेताना दिसतात.

संशोधनापासून ते राज्याची, देशाची धुरा सांभाळण्यापर्यंत, कुटूंबाची जबाबदारी समर्थपणे पेलतानाच समाजकार्यातही हातभार लावणारी, अंतराळात झेप घेण्यापासून गिर्यारोहणातही बाजी मारणारी अशी स्त्री विवीध पातळींवर अजोड कामगिरी करीत आहे.

म्हणूनच रविंद्रनाथ टागोर सुध्दा महिलांचा गौरव करताना उद्गारतात -
WOMAN ARE THE ORNAMENTS OF THE SOCIETY.

अशा ह्या सर्व सामर्थ्याच्या मूळ स्त्रोत असणार्‍या आदिमातेला आज अखिल महिलांकडून शतश: अभिवंदन -   
हे आदिमाते , आम्हाला सदैव तुझ्या अखंड स्मरणात ठेव,  सदैव आमच्या जीवनातील प्रत्येक पावलावर तुझी निरंतर साथ लाभो.
हे दुर्गे तू सदैव अशीच तुझ्या लेकींच्या पंखाना उचित सामर्थ्य दे, उचित तेज, उचित बल आणि प्रेमाचा अव्याहत स्त्रोत बनून तुझा वरदहस्त आमच्या शिरावर ठेव जेणेकरून आमच्या जीवनाचे पुष्प तुझ्याच चरणी समर्पित करताना आम्ही नरजन्माची इतिकर्तव्यता पार पाडू शकू, तुझ्या चरणांशी कृतज्ञ भाव आजन्म राहो , तरच खर्‍या अर्थाने जागतिक स्तरावर " महिला" ह्या सक्षम, सबल आणि सजग होतील.

जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !!!

आली महाशिवरात्र - " ॐ नम: शिवाय" मंत्राचा जागर करू या...

कैलासराणा शिवचंद्रमौळी |  फणींद्र माथा मुकूटी झळाळी | 
कारुण्यसिंधु भवदु:खहारी|  तुजविण शंभो मज कोण तारी | | 
ॐ नम: शिवाय |  ॐ नम: शिवाय |  ॐ नम: शिवाय | ॐ नम: शिवाय |  ॐ नम: शिवाय …। 

महाशिवरात्री आली की आपण काय-काय करतो. उपवास करतो आणि काय-काय करतो? जमले तर शंकराच्या देवळात जातो , ॐ नम: शिवाय चा जप करतो , शंकराला बेलपत्र वाहतो , कोणी भाविक शिवलीलामृताचे पठण करतात,  बरोबर ना? पण आपण कधी जाणून घेण्याचा प्रयास करतो का की महाशिवरात्री म्हणजे काय? ही रात्र आहे मग दिवस कुठून आला. आपण पाहतो दुर्गा देवीच्या नवरात्रीला पण आपण नवरात्रीचे दिवस म्हणतो. नऊ दिवस नवरात्र असल्यामुळे, रात्रीमध्ये दिवस आहे. पण महाशिवरात्र तर एकच दिवस असते. दिवसभरात उपवासाचे पदार्थ खायचे बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी, वरीच्या तांदळाचा भात, शेंगदाण्याची आमटी, फ्रुट सलाड असे सगळे उपासाच्या भरपूर पदार्थांवर चांगला आडवा हात मारतो,म्हणजेच मस्त खादाडी करतो, त्या महादेवाची पूजा करण्यापेक्षा खरेतर जास्त आपण आपल्या पोटाचीच पूजा करतो आणि भोगाचे पदार्थ स्वत:च स्वाहा करतो, हादडतो, खातो. हा झाला गंमतीचा भाग, पण महाशिवरात्र म्हणजे काय ? रात्र का महत्त्वाची मानली जाते , हे तरी जाणून घ्यायचा प्रयास करू या....

महाशिवरात्र म्हणाजे माघ महिन्यातील शिवरात्र. ह्याचे विशेष महत्त्व म्हणाजे मार्कंडेय ऋषी शिवतत्वाबद्द्ल चिंतन करीत असताना त्यांना शिवकार्याचे ज्ञान झाले आणि त्यावेळी त्यांच्या समोर शिवाचे अर्धनारी नटेश्वर रूप प्रथमच प्रकट झाले. त्याच क्षणी त्यांनी ह्या रूपाचे प्रथम पूजन केले आणि त्या पूजनाला अगस्ती ॠषी पुरोहित होते, आणि हिच ती रात्र म्हणजे "महाशिवरात्र" , जी भक्तमानसांत "महाशिवरात्री" म्हणून स्थिर झाली आणि शिवपूजनाकरिता सर्वश्रेष्ठ म्हणून मान्यता पावली. 

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog