Saturday, 23 June 2018

कृत्रिम बुध्दीमत्ता ( आर्टिफिशियल इंटिलिजन्स - Artificial Intelligence )- मानवतेसाठी शाप की वरदान ???

                                                                  
जगन्नियंत्या परमेश्वराने वसुंधरा पृथ्वीवर नानाविध प्रकारचे जीव जंतु, प्राणी , पक्षी निर्माण केले आणि मानवाची निर्मिती करून तो अत्यंत आनंदीत झाला आणि आता नवीन काही नको ह्या अर्थाने ’त्या’ मानव हा शब्द उच्चारला आणि ’त्या’च्याच सर्वात सुंदर निर्मितीला वा आकृतीला म्हणा ’त्या’ ने मानव असे नामकरण केले. इतर सर्व अन्य प्राण्यांमध्ये त्याने आतापर्यंत कधी न बहाल केलेले अत्यंत दोन सुंदर वरदान त्याने मानवाला बहाल केले ते म्हणजे बुध्दीमत्ता आणि वाणी . 

आपण  पाहतो की आजुबाजुच्या सर्व प्राणी जगतात ह्या दोन गोष्टी बहुधा आढळतच नाही . मानवाला परमेश्वाराने बुध्दीमत्ता ही दिलेली अत्यंत सुंदर , अमूल्य अशी देणगी आहे म्हणा किंवा वरदान आहे, ज्यामुळे तो सर्व प्राणीमात्रांमध्ये श्रेष्ठ आणि वरचढ ठरतो. ह्याच बुध्दीमत्तेच्या आधाराने मानवाने स्वत:चे जीवन सुख, समृध्द केले. वाणीच्या म्हणजेच आवाजाच्या माध्यमातून माणूस बोलू लागला, एकमेकांशी संवाद साधू लागला . वेगवेगळ्या भाषा वाप्रून तो आपल्या आचार विचारांचे प्रदान करू लागला.  पुढे ह्याच बुध्दीमत्ता आणि वाणी ह्या भगवंताने दिलेल्या अत्यंत श्रेष्ठ वरदानांचा वापर करून मानवाने आकाशाला गवसणी घालण्याइतकी प्रगती विज्ञान , संशोधन, तंत्रज्ञान  ह्यांच्या सहाय्याने केलेली आपण पाहतो.

मानवाने कॉम्प्युटरचा म्हणजेच संगणकाचा शोध लावला व त्याचा वापर दिवसागणिक वाढतच गेला. आज आपण पाहतो मानवाचे अवघे जीवन, त्याच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गोष्टी ह्या सार्‍या ह्याच संगणकाने संपूर्ण रीत्या काबीज केल्या आहेत म्हणजेच मानव हा कॉम्प्युटरवर जास्तीत जास्त अवलंबून राहू लागला आहे. पूर्वी आकडेमोड किंवा हिशोब करताना माणूस स्वत:च्या बुध्दीमत्तेने करायचा, कोणत्याही प्रकारच्या मशीनवर अवलंबून नव्हता. पण तेच आता कॅल्क्युलेटर , कॉम्प्युटर ह्यांच्या मदतीशिवाय हिशोब करणे सहसा जमत नाही वा अवघड होत चालले आहे. पूर्वीच्या पिढीमध्ये कोणाचाही टेलिफोन नंबर , घराचा पत्ता , कोणा व्यक्तीच्या वाढदिवसाच्या  तारखा किंवा लग्नाच्या तारखा ह्यांची एकतर छोट्या डायरीत नोंद ठेवली जायची किंवा माणसाच्या बुध्दीनुसार त्या गोष्टी पाठ करून त्या लक्षातही ठेवल्या जायच्या, पण आता मात्र हेच चित्र संपूर्णत: पालटले आहे . माणूस एवढा मोबाईल किंवा स्मार्टफोनच्यावर अवलंबून राहू लागला आहे की कधी कधी स्वत:चा मोबाईल नंबर वा घरातील/कुटूंबातील  दुसर्‍या सदस्यांच्या फोनचा नंबर सुध्दा लक्षात राहत नाही आणि  त्यासाठी आधार घ्यावा लागतो तो ह्या मोबाईल रूपी मशीनचाच !         

’गरज ही शोधाची जननी आहे ’अशी म्हण प्रचलित आहे , बुध्दीमत्ता ह्या वरदानाचा यथोचित वापर करून मानवाने निरनिराळ्या विभिन्न क्षेत्रांत अगदी नेत्रदीपक प्रगती केली आहे. संगणकाच्या आधारे माणसाने सर्वच क्षेत्रांत खूप मोठी भरारी मारली आहे. संगणकाच्या अफाट कार्यक्षमतेमुळे, त्याच्या अतुलनीय वेगामुळे माणसाचे कष्टही वाचू लागले, वेळेची बचतही होऊ लागली. त्यातूनच मानवाच्या मनाला भुरळ पडू लागली ती ह्या बुध्दीमत्तेला कृत्रिम रीत्या तयार करून तिचा वापर करण्याची ! अशा रीतीने परमेश्वराने बहाल केलेल्या ह्याच बुध्दीमत्तेला कृत्रिम रीत्या मशीनच्या सहायाने बनविण्यासाठी मानवाने अहोरात्र परिश्रम घेतले आणि त्यातून साकार झाली ती ’कृत्रिम बुध्दीमत्ता’ म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजन्स - Artificial Intelligence ( AI ) 

कृत्रिम बुध्दीमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटिलिजन्स  ही सुध्दा सोप्या भाषेत समजून घ्यायचे असेल तर कॉम्प्युटर सायन्सचीच (संगणक शास्त्राची )एक शाखा आहे ज्याद्वारे मनुष्यासारखे बुध्दीमान असलेले असे मशीनस् बनविले गेले की ज्यांना स्वत: निर्णय घेण्याची क्षमता आहे, जे माणसाप्रमाणे विचार करून , बुध्दी वापरून , माणसाच्या मदतीशिवाय निर्णय स्वत:च घेऊ शकतात.

कृत्रिम बुध्दीमत्ता हे एक असे सिम्युलेशन (अनुकरण) आहे ज्याद्वारे मानव मशीन्सना मानवी बुध्दीमत्ता प्रदान करतो की ज्यामुळे त्या मशीन्समध्ये अशी बुध्दीमत्ता विकसित केली जाते की ज्यायोगे ती मशीन्स मानवाप्रमाणे विचार करतील व कामे करतील. अर्थातच हे सारे संगणाकाच्या मदतीनेच  करता येते . ह्यात तीन प्रक्रिया सामिल असतात. पहिल्या प्रक्रियेत शिकणे म्हणजे ह्यात त्या मशीनच्या मेंदूत किंवा बुध्दीमह्ये माहिती ( Information) दिली जाते व काही नियम शिकविले जातात , जेणेकरून त्या नियमांचे पालन करून ती मशीनस त्यांना दिलेली कामे पार पाडू शकतील. दुसर्‍या प्रक्रियेत कारण-मिमांसा म्हणजे Reasoning . ह्यातून ती मशीन्स त्यांना दिल्या गेलेल्या सूचनांनुसार त्यांना दिलेल्या नियमांचे पालन करून निर्णय घेण्यामध्ये यशस्वी होतात व त्याद्वारे ते अनुमानित (सर्वसाधारण, ढोबळमानाने) किंवा निश्चित स्वरूपाचा, स्पष्ट किंवा ठाम निर्णय घेऊ शकतात आणि तिसरी प्रक्रिया असते ती स्व-सुधारणा करण्याची म्हणजेच Self-correction ची.

कृत्रिम बुध्दीमत्तेची ओळख जगाला जॉन मॅकार्थी ह्या अमेरिकेन शास्त्रज्ञाने १९५६ साली डार्ट्माऊट परिषदेत करून दिली होती ज्याचे आज विशाल महाकाय वृक्षात रूपांतर झाले आहे ज्यात आज Robotics Process Automation  पासून  Actual Robotics पर्यंत सर्वांचा समावेश करण्यात येत आहे.     

कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर -

१. कृत्रिम बुध्दीमत्ता - आरोग्य क्षेत्रात
आज  कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर  हा अनेक हॉस्पिटलमध्ये आरोग्य निगडीत कार्यात करण्यात येत आहे, ज्यामुळे रूग्णांवर लवकरात लवकर आणि अत्यंत प्रभावीरीत्या औषधोपचार करता येऊ शकतो . अशारीत्या कृत्रिम बुध्दीमत्तेचा  वापर करणार्‍यांपैकी एक नाव सुप्रसिध्द आहे  ते म्हणजे आयबीएम वॅटसन . ह्यातून असे आढळले आहे की कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून  आरोग्यविषयक क्षेत्रात एक खूप मोठी क्रांती घडवून आणता येऊ शकते .
२. कृत्रिम बुध्दीमत्ता - व्यापार क्षेत्रात
Robotics Process Automation च्या मदतीने आता मशीन्सकडून मानव Highly Repetitive Tasks खूप्च सुंदर रीत्या करवून घेऊ शकतो ज्यातून कंपनी आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे , प्रभावीरीत्या , मदत करू शकतात, अति वेगाने, शीघ्रतेने उत्तम दर्जाच्या  सेवा पुरवू शकतात
३. कृत्रिम बुध्दीमत्ता - शिक्षण क्षेत्रात 
   कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून शिक्षक मुलांचे अधिक चांगल्या प्रकारे वर्गीकरण करून, त्यांना समजून घेऊन, त्यांची बौध्दिक क्षमता समजून घेऊन त्यांना जास्त वेळ देऊन अभ्यासात मदत करू शकतात. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून त्याचे निराकरण करू शकतात. कोणकोणत्या विषयांत त्याची प्रगती कमी होते व ती का कमी होते हे जाणून त्यांना त्यावर मार्गदर्श करू शकतात , ज्यामुळे त्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना अधिक रूची वाटेल, त्यांना अधिक आवड निर्माण होईल व ते विषय अभ्यासण्यास अधिक सोपे जातील.
४. कृत्रिम बुध्दीमत्ता - वित्त क्षेत्रात (Finance )    
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून वित्त क्षेत्रात खूप मोठा फायदा होत आहे कारण Financial Institutions , नानाविध वित्त -संस्थांना आता जो Data Analysis करण्यामागे भरपूर वेळ व पैसा  खर्ची घालावा लागायचा तो आता खूपच कमी झाला आहे.
 ५. कृत्रिम बुध्दीमत्ता - कायदा क्षेत्रात     
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून Documents Processing सारखे कायदा क्षेत्रांतील अत्यंत कटकटीचे , वेळखाऊ काम आता खूपच सोपे , सहज झाले आहे व त्यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक कार्यक्षम रीत्या पार पाडता येऊ शकते.
६. कृत्रिम बुध्दीमत्ता - उत्पादन क्षेत्रात  ( Manufacturing )   
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून उत्पादन क्षेत्रात भरभराट झालेली आढळते. पूर्वी ज्या कामासाठी अधिक मनुषयबळ लागायचे ते आता कमी मनुष्य़बलाचा वापर करूनही कमी खर्चात करता येऊ शकते. 
७.  कृत्रिम बुध्दीमत्ता - लष्करी क्षेत्रात  ( मिलिटरी - Military aaplications)
कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून लष्करी क्षेत्रांत Fighter Pilots ना प्रशिक्षण देता येऊ शकते जेथे unpredictable situations युध्दात उद्भवू शकतात , जेथे मानव पोहचू शकत नाही अशा ठिकाणी ड्रोनचा वापर , शस्त्रांचा वापर करता येऊ शकतो , अर्थातच ह्यामध्ये मानवी युध्दाचे नियम पायदळी तुडविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच हा वापर विध्वंसक वा विघातक परिणाम घडवू शकतो अशी भीती संशोधक व्यक्त करीत आहेत.

कृत्रिम  बुध्दीमत्ता आणि मानवाचे भवितव्य
दिवसागणिक मानवाच्या जीवनातील कृत्रिम बुध्दीमत्तेचा वाढता वापर आणि त्याचा प्रभाव बघता कुठे तरी अशी अनामिक भीती मनाल स्पर्शून जाते की मान हाच त्या कृत्रिम बुध्दीमत्तेच्या जाळ्यात अडकणार त नाही ना? कोणत्याही गोष्टीच्या चांगले आणि वाईट अशा दोन बाजू असतात. कृत्रिम बुध्दीमत्ता ही मानवाने स्वत:च्या प्रगतीसाठी विधायक कार्यात वापरली तर लाभदायक ठरेल ह्यात दुमतच नाही . परंतु हीच कृत्रिम बुध्दीमत्ता विघातक , संहारक कार्यासाठी पण वापरता येऊ शकते ह्याचे सदैव भान राखायलाच हवे. कृत्रिम बुध्दीमत्ता हे तसे पाहता दुधारी तलवारीसारखे शस्त्र आहे. जर मशीनसमधील त्याचा वापर हा अनाठायी झाला तर हीच मशीनस मानवावर सत्ता गाजवू शकतात ह्याचा कधीही विसर पडून चालणार नाही. 

आज मानव कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून मशीनस मुळे सुखी झाला असे जरी चित्र दिसत असले तरी कोणी सांगा उद्या हीच मशीन्स ह्याच कृत्रिम बुध्दीमत्तेच्या आधारे मानवाला गुलामही बनवू शकतात अशीच भीती काही नामवंत संशोधक, उद्योजक व्यकत करीत आहेत व तसा निर्वाणीचा इशाराही देत आहेत.

बुध्दीबळ खेळातील जगज्जेत्या गॅरी कॉस्पोरोव्हला १९९७ साली आयबीएम कंपनीच्या Deep Blue ह्या सुपरकॉम्प्युटरने हरविले होते ही बाब हेच दाखविते की यंत्रातील, संगणकातील कृत्रिम  बुध्दीमत्ता मानवाच्या बुध्दीमत्तेवर मात करून त्याला पराजित करू शकते.

जानेवारी २०१८ च्या एका बातमीनुसार अमेरीकेत झालेल्या वाचन आणि आकलनाच्या एका उच्च पातळीच्या स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) बसविलेल्या यंत्रांनी मानवांवर मात केली आहे. त्यात असे आढळले की अलीकडेच घेण्यात आलेल्या या चाचणीत दोन नैसर्गिक भाषा प्रक्रिया साधनांना मानवांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.यातील एक साधन हे मायक्रोसॉफ्ट या अमेरीकी सॉफ्टवेअर कंपनीने तयार केले असून दुसरे साधन अलीबाबा या चिनी ऑनलाईन विक्री कंपनी तयार केलेले होते.

अवघ्या काही वर्षांपूर्वी केवळ अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी विज्ञानाने आज सिद्ध करून दाखवल्या आहेत . आज आपण पाहतो की माणूस म्हणून तो जे काही करतो, ते तंत्रज्ञान करू लागले. काही वर्षांपर्यंत बुध्दीमत्तेचे म्हणजेच मेंदूचे काम तेवढे माणसाच्या हातात शिल्ल्क राहिले असे वाटत होते. आता तेही जवळपास केले जाऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजूबाजूचे वातावरण, एखाद्या घटनेच्या  त्यावेळच्या किंवा आधीच्या घडामोडी, परिस्थिती, भाव भावना , मानवी बंध  या साऱ्या गोष्टीचा परिणाम एकवेळ माणसाच्या मेंदूवर होऊ शकतो. परंतु कृत्रिम बुध्दीमत्त वापरण्याने  या यंत्रावर तसा कुठलाही परिणाम होणार नाही.

त्यामुळेच सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयावर जगभरात चिंतन सुरू आहे. सगळ्याच गोष्टी यंत्राच्या सहाय्याने होत गेल्या तर मग माणसाचा उपयोग तो काय? अशी भीती सार्‍या स्तरांवर व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कृत्रिम बुध्दीमत्ता हे मानवतेसाठी शाप आहे की वरदान आहे ह्यावर विचार करण्याची वेळ आता नक्कीच येऊन ठेपली आहे.
जगभारातील संशोधक, विचारवंत आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या लष्करी वापरावर चिंता व्यक्त करीत आहेत आणि त्यामुळे जगात प्रचंड विध्वंस माजेल असा सज्जड  इशाराही देत आहेत. 

विख्यात संगणक प्रोग्रामर्स, तत्वज्ञ , नामवंत मुत्सद्दी, आणि अग्रगण्य उद्योजकांपर्य़ंत अनेकजणांनी कृत्रिम बुध्दीमत्ता म्हणजेच  आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या वापराबाबत, त्याच्या विकासाबाबत इशारे दिले आहेत , याबाबत त्यांना  काय वाटतं? ह्याचा आपण आढावा घेतल्यास आपल्या नक्कीच लक्षात येऊ शकते -  

व्लादिमिर पुतीन-
रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेले व्लादिमिर पुतीन म्हणतात आर्टिफिशियल इंटिलिजन्सच्या क्षेत्रात अग्रेसर असलेला देशच पुढच्या काळात जगावर सत्ता गाजवू शकेल.

स्टीफन हॉकींग
सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, लेखक आणि कृष्णविवर  भौतिकशास्त्र प्रणेते स्टीफन यांना हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा इव्हेंट असल्याचे वाटते. या माध्यमातून युद्ध, रोगराई आणि गरिबीवर मात करता येईल. यामुळे आयुष्याला एक प्रचंड गती येईल. आर्थिक बाजार, मानवी संशोधन, शस्त्रास्त्रांचा विकास समजण्यापलिकडे झालेला असेल. यातील धोके कसे टाळायचे हे जर आम्ही समजून नाही घेतले तर मानवी इतिहासातील तो शेवटचा इव्हेंट असेल, असा  सावधानतेचा गंभीर इशाराही ते देतात.

एलॉन मस्क
टेस्ला मोटर्सचा सीईओ आणि नावाजलेला सुप्रसिध्द द्रष्टा  उद्योजक एलॉन मस्क म्हणतो, कृत्रिम बुध्दीमत्तेचा विध्वंसक वापर  हा अनुभवातून घेतलेला सर्वात मोठा धोका असेल. प्रगतीच्या नावाखाली आपण काही वेडेपणाचे पाऊल तर उचलत नाही ना याचाही विचार करायला हवा. अर्थात याचा वापर चांगल्या हेतूतूनच व्हायला हवा.
म्हणूनच हा धडाडीचा उद्योजक ’आर्टिफिशियल इंटेलिजन्स ’ अर्थात कृत्रिम बुध्दीमत्ता ह्याच्या धोक्यांबद्दल सातत्याने आवाज उठविणारा  ’ओपन ए आय’ हा उपक्रम जागतिक पातळीवर बहुतांश व्यासपीठावरून राबवित आहे व त्यातून एलॉन मस्क ह्यांची जगाला तिसर्‍या महायुध्दातील होऊ घातलेल्या भीषण नरसंहारापासून वाचविण्याची अटाटी दिसते असे मला प्रामाणिकपणे वाटते.
परंतु हाच एलॉन मस्क दुसरीकडे कृत्रिम बुध्दीमत्तेचा विधायक कार्यासाठी कसा वापर करता येऊ शतो हे ही दाखवित आहे.  कृत्रिम बुध्दीमत्तेचा  वापर करून ’न्यूरालिंक ’ द्वारे मानवी मेंदूला संगणकाशी जोडून मेंदूशी निगडीत गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी उत्पादन येत्या ४ वर्षांत  विकसित करण्याची मस्क ह्यांची महत्त्वाकांक्षा आहे व त्यावर ते कार्य करीत आहेत.

बिल गेट्स
मायक्रोकॉफ्टचे सहसंस्थापक ६० वर्षीय बिल गेट्स म्हणतात, ‘सर्वत्र कमी भासणाऱ्या मजुरांची ती योग्य रिप्लेसमेंट असेल. हे तंत्रज्ञान योग्यच आहे. त्याचा वापर फक्त सकारात्मक विचारातून व्हायला हवा. आगामी काही दशकांत हे तंत्रज्ञान सर्वत्र दिसेल तेव्हा चिंताही वाढलेली असेल.’

कृत्रिम बुध्दीमत्ता अर्थात  आर्टिफिशियल इंटिलिजन्स हे मानवाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी हातभार लावणारे वरदान ठरो व  त्याच्या अमर्याद लष्करी पातळीवरील वापरामुळे भीषण मानवी नरसंहारासाठी  वापरता येणारा तो शाप न ठेरो हीच त्या जगन्नियंत्या परमेश्वराच्या , आदिमातेच्या  चरणीं प्रार्थना !!!

संदर्भ - दैनिक प्रत्यक्ष

Sunday, 17 June 2018

मी तो बाहुले साईखड्याचे ।आधारे नाचे सूत्राच्या ।

                                                                        


श्रीसाईसच्चरित आणि हेमाडपंत - सदगुरुंच्या चरणीं पराकोटीची लीनता, विनम्रता कशी धारण करावी, अनन्य शरणागती म्हणजे काय ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हेमाडपंत ! साईनाथांना आपला सदगुरु मानल्यावर हेमाडपंतानी आपले स्वत:चे नाव , स्वत:ची ओळख देखिल पुसून टाकली व माझ्या सदगुरुंनी , माझ्या साईनाथांनी मला बहल केलेले नामच माझे खरे नाव आहे , ह्याच भावनेने आजीवन मिरविले देखिल, जरी साईनाथांनी उपहासात्मक शब्दांत ते उच्चारले होते तरी !

खरोखरीच हेमाडपंतासारख्या महान भक्ताचा जीवनप्रवास अभ्यासताना हीच खूणगाठ मनाशी घट्ट बांधली जाते की जे ते वदले तेच ते आजीवन जगले. सदगुरु साईनाथांना अनन्यभावाने शरण जाऊन त्यांनी एकच मागितले की आजन्म तुझी सेवा घडू दे, मला फक्त आणि फक्त, केवळ तुझ्या चरणांचा दास ह्याच भूमिकेत जगायचे आहे आणि जोवरी माझ्या ह्या देहात श्वास आहे तोवरी हे तुझे तूच करवून घे आणि मला उदास करू नकोस. तू मला दिलेले तुझे निजकार्य तूच माझ्याकडून करवून घे, साधून घे !! केवढी ही पराकोटीची लीनता !!! म्हणजेच माझा सर्व अंहकार, मीपणा लयाला जाऊ दे, जर मी तुझ्या चरणांचा दास स्वत:ला म्हणवितो तर तुझे कार्य पण मी करेन एवढाही अंहकाराचा लवलेश माझ्या जीवनात राहता कामा नये. किती ही आटाटी!!!

हेमाडपंत अगदी पूर्णपणे ह्या “दासा”च्या भूमिकेत स्थिरावलेले दिसतात. त्यांनी बाबांनी दिलेले नामच अत्यंत प्रेमाने आणि अभिमानाने शेवटच्या श्वासापर्य़ंत मिरवले. कुठेही मान, सन्मान ,प्रसिद्धीची हाव उरी न बाळगतां ज्या क्षणी श्रीसाईसच्चरिताची शेवटची ओवी लिहिली गेली त्याच क्षणी आपली लेखणी आणि मस्तक म्हणजेच बुद्धीस्वातंत्र्य आणि कर्मस्वातंत्र्य दोन्ही श्रीसाईंच्या चरणी समर्पिते झाले.

माझे सदगुरु डॉ अनिरूध्द जोशी नेहमी प्रवचनांतून सांगतात की ही “त्या”च्या प्रेमाची वाट म्हणजे फक्त एकालाच वाव आहे , जागा आहे….

संत तुलसीदासांच्या शब्दांत सांगायचे तर ” प्रेम गली अति सांकरी , तेमा दुजा न समाय , तू है तो मैं नाही ”

आणि अगदी हेच आचरण हेमाडपंतानी अवलंबिले होते जणू काही, कोठेही अल्पशी ही जागा त्यांनी स्वत: करिता राखून ठेवलीच नव्हती,फक्त माझ्या साईंचाच मी होऊन राहणे म्हणजे काय हे शिकायला मिळते ते येथे श्रीसाईसच्चरितात… अगदी पत्येक शब्द अन शब्द साईंवरच्या प्रेमाने ओथंबून भरभरून वाहतो. हेमाडपंताच्या जीवनातील प्रत्येक क्षण आणि क्षण साईमय झालेला आढळतो. ३२व्या अध्याय़ातील एका ओवीत ते म्हणतात -
” हेमाड साईंसी शरण । अपूर्व हें कथानिरुपण । 
साईच स्वयें करी जैं आपण । माझें मीपण फिकें तैं ।। 
तोच या कथेचा निवेदिता । तोच वाचिता तोच परिसता । 
तोच लिहिता आणि लिहविता । अर्थबोधकताही तोच ।। 
साईच स्वये नटे ही कथा । तोच इये कथेची रुचिरता । 
तोच होई श्रोता वक्ता । स्वांनदभोक्ताही तोच ।।

कुठेही एवढ्या महान अपौरुषेय ग्रंथाचे कर्तृत्व हेमाडपंत स्वत:कडे घेत नाही.. सर्व काही माझे बाबा आणि फक्त बाबाच!!! हेमाडपंत म्हणतात ” मी तो बाहुले साईखड्याचे । आधारे नाचे सूत्राच्या ।
सुरुवातीला पेन्शन मिळाल्यावर अण्णा चिंचणीकरांनी हेमाडपंताना नोकरी मिळावी म्हणून अजीजी केली पण नोकरी काही काळापुरतीच लागली आणि गेली तदनंतर मात्र हेमाडपंतानी बाबांचे बोल =
करावी आतां माझी चाकरीं । सुख संसारी लाधेल । 
 हेच बोल उर्वरीत आयुष्यात उरी ठामपणे कवटाळलेले दिसतात.

अवघ्या ८ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये हेमाडपंतानी जो हा देवयान पंथावरचा अफाट पल्ला पार पाडला तो केवळ साईंना अनन्यभावाने शरण जाऊनच !!!

संत तुकारामाचें “हेचि दान दे गा देवा । तुझा विसर न व्हावा । विसर न व्हावा तुझा । न लगे मुक्ती धनसंपदा । संत संग देई सदा ” हे ब्रीद आचरतच जणू हेमाडपंत जगले असे मला वाटते ज्यांमुळे कोठेही आपली पाऊलेच उमटू देखिल दिली नाही … देहची जेथे नाही आपुला । तो तयाच्या पायां वाहिला । मग काय अधिकार । तयाचिया चलनवलनाला आपुला ।। ह्या उक्तीची सत्यता दाविणार्‍या हेमाडपंताचा भाव अंशत:तरी मला धारण करता यावा अशी पिपासा मनी बळावते.

“एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा ” - साक्षात परमात्मा साईमुखीचे हे बोल - सदगुरुच्यां ठायी असलेला एकमेव विश्वास -म्हणजेच माझ्या जीवनाचा हाच सूत्रधार आहे, माझे संपूर्ण जीवन ह्याच्याच इच्छेने चालते. सदगुरु असो वा परमेश्वर असो वा देव असो , त्याला आपल्या जीवनाचा सूत्रधार मानले की जीवनाचे गणित अगदी सोपे होऊन जाते.  
 माझ्या सदगुरु डॉ अनिरूध्द जोशींनी लिहिलेल्या मातृवात्सल्य-उपनिषदात स्पष्टपणे हेच वारंवार बजावले आहे की ‘सगळंकाही फक्त विश्वासातच आहे’ Yes सगळं विश्वासातच आहे. सदगुरु बापू ह्या विश्वासाचे उदाहरण देताना Nikola Tesla ह्या महान शास्त्रज्ञ ह्याचे खडतर जीवनाविषयी सांगतात २७-०३-२०१४ च्या प्रवचनात की ह्याच Scientist च्या विरोधात सगळे उद्योगपती, राजकारणी, सायन्स area मधली माणसे उभी होती पण ह्याचं काही वाकडं झालं का? एक बिल्डिंग जळली तरीही हा खरोखर राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभा राहिला. देवा मला मार्ग दाखव. त्याने देवाला कधीच कोसलं नाही, त्याने देवाला विचारलं नाही की, ‘शत्रुने बिल्डिंग जाळली तू ती जळू का दिलीस?’ अकरा महिन्यात तीन बिल्डिंग्ज्‌ उभ्या राहिल्यात. त्याने दिवे लावून सगळया राजकारण्यांना, उद्योगपतींना शरण आणलं. लोकं sympathy द्यायची तेव्हा तो म्हणायचा – “God is There!! God is Great !! Mother will take care.”

हेच ब्रीद हेमाडपंत ही सदैव उच्चारीत व त्यानुसारच वागत - मी तो बाहुले साईखड्याचे । आधारे नाचे सूत्राच्या ।

सदगुरुंनी श्रीसाईसच्चरितावरील हिंदी प्रवचनांत सांगितले  होते की self-confidence तेव्हाच वाढू शकतो जेव्हा self-esteem वाढतो पण माणसाकडे ही स्व:तला पारखण्याची म्हणजेच स्वत:ची capacity, competency , potency जाणण्याची क्षमता एकतर खूप कमी किंवा खूप अधिक असते , कारण self-esteem ही बुध्दीची गोष्ट आहे, आणि self-confidence ही मनाची गोष्ट आहे. जेव्हा माणूस स्वत:ची बुध्दी परमात्म्याच्या चरणांवर स्थिर करतो त्याला शरण जाऊन तेव्हा तो स्वत:ला चुकीच्या प्रश्र्नांच्या सहाय्याने चुकीच्या प्रकारे आजमावत नाही, कारण परमात्मा स्वत: त्यात हस्तक्षेप करून चुकीचे आवरण, अज्ञान दूर करतो आणि त्या त्या माणसाला त्याच्या योग्यतेची खरी जाणीव करवून देतो. आणि जेव्हा स्वत: परमात्माच self-esteem वाढवून देतो तेव्हा self-confidence वाढतो म्हणजेच automatically परमात्म्यावरचा आत्मविश्वासही वाढतोच.

श्रीसाईसच्चरितातील १४ व्या अध्यायात हीच गोष्ट रतनजींच्या कथेत स्पष्ट दिसते की ते दासगणूंनी साईबाबांविषयी सांगितलेल्या गोष्टींना खरे मानतात , आणि निशंक मनाने , कोणताही तर्क, कुतर्क वा संशय न घेता बाबांकडे जातात. तसे पहायला गेले तर त्या काळानुसार रतनजी हे पारशी धर्माचे ज्यात मानवी सदगुरुंना मानणे ह्याला खूप विरोध होतो. रतनजींना सुध्दा हा विरोध पत्करावा लागला असू शकतो. तसेच पैशाची मुबलकता, समृध्दी ह्याचा अंहकारही बाबांकडे जाण्यापासून रोखू शकत होता कारण बाबा तर एक लोकांच्या दारोदार फिरून भिक्षा मागून पोट भरणारे , मशिदीत रहाणारे , मुसलमान फकीर होते , त्या काळातील लोकांच्या मान्यतेनुसार… तरीही रतनजीच्या आड काही आले नाही कारण त्यांनी बाबांच्या चरणी दासगणूंच्या सांगण्याला प्रमाण मानून , त्यांना आपले आप्त मानून विश्वास धरला. रतनजींनी मी तो बाहुले साईखड्याचे हे सूत्र जीवनी स्विकारले म्हणूनच . हाच तो विश्वास , सदगुरुंच्या चरणीं अनन्य शरणागतीचा भाव  असावा , जो सर्वातून तारून नेतोच नेतो , अगदी १०८ % सत्य!  

माझे सदगुरु म्हणतात की विश्वास म्हणजे काय तर दिशा, अंतर कापण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे त्याची वेळ कधी चुकणार नाही ह्यालाच विश्वास म्हणतात.

बाबांनी रतनजींना फक्त “मनाची मुराद पुरवील अल्ला” हा आशीर्वाद दिला होता आणि कोठेही पुत्र होईल हे सुस्पष्ट आश्वासन दिले नाही तरी रतनजी आनंदनिर्भर मनाने परतले आणि योग्य काळ लोटल्यावर रतनजीच्या पत्नीस गर्भ राहिला व सुवेळी ती बाळंत होऊन पुत्ररत्नप्राप्ती झाली. त्यानंतरही १२ मुलांत केवळ ४ जिवंत राहिली तरी रतनजींचा विश्वास अढळच राहिला , हाच तो प्रतिदिनी वाढत जाणारा विश्वास म्हणजेच दृढ विश्वास म्हणजेच दृढ बुध्दी असावी जिचा नवस साईनाथ करायला सांगतात आणि वचनही देतात की अशा दृढ बुध्दी माझ्या ठायी करण्याच्या नवसाला माझी समाधीही पावेल. नवसास माझी पावेल समाधी धरा दृढ बुध्दी माझ्या ठायीं-
आता कोणी म्हणेल की हेमाडपंताच्या मनात पहिल्यांदा विकल्प आला होताच ना ? हो विकल्प आला होता हे सत्य आहे तरी देखिल आपण पाहतो, वाचतो श्रीसाईसच्चरितात की कायम सावध राहणार्‍या हेमाडपंताना त्याची निरर्थकता जाणवली नानांच्या आग्रहामुळे आणि त्यांनी साईंना भेटायला जायचे निश्चीत करताच, स्वत: साईनाथांनीच त्यांना उर्वरीत आयुष्यात अखंडपणे पाठीशी उभ्या राहणार्‍या छत्राची-सदगुरुची छाया मिळवून दिली.
        येथे हेमाडपंतांची बाबांशी प्रथमच भेट- धूळभेट झाल्यावरही ही सभानता म्हणजेच कायम सावध राहायचा गुण प्रकर्षाने जाणवून दिला - आनंदाच्या परमोच्च अवस्थेतही हेमाडपंत आपल्या मित्रांची (काकासाहेब दीक्षित व नानासाहेब चांदोरकर) आठवण काढतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. बापूंनी शिकवेलीली हीच ती अंबज्ञता असावी, असे वाटते. आपल्या आयुष्यात फक्त सदगुरु साईनाथांच्या कृपेनेच आणि मित्रांच्या आग्रहामुळे आपल्याला सदगुरुप्राप्ती झाली ह्याचे सदैव स्मरणही ठेवतात आणि संकल्प-विकल्पात्मक मनाच्या आहारी जाऊन सर्वसामान्य माणसाने चुकू नये ह्यासाठी श्रीसाईसच्चरित ग्रंथात वारंवार आठवही देतात – २६व्या अध्यायांत हेमाडपंत कळवळून सांगतात –
म्हणवूनि प्रार्थूं कीं बाबांप्रत । करावी बुद्धी अंतरासक्त । नित्यानित्यविवेकयुक्त । वैराग्य्ररत मज करीं ।। मी तो सदा अविवेकी मूढ । आहें अविद्याव्यवधाननिगूढ । बुद्धि सर्वदा कुतर्कारूढ । तेणेंचि हें गूढ पडलें मज ।। गुरुवेदान्तवचनीं भरंवसा ।ठेवीन मी अढळ ऐसा । करीं मन जैसा आरसा । निजबोध ठसा प्रगटेल ।। वरी सदगुरो साईसमर्था । करवीं या ज्ञानाची अन्वर्थता। विनाअनुभव वाचाविग्लापनता । काय परमार्था साधील ।। म्हणोनि बाबा आपुल्या प्रभावें । हें ञान अंगें अनुभवावें। सहज सायुज्य पद पावावें । दान हें द्यावें कृपेनें ।। तदर्थ देवा सदगुरुसाई । देहाहंता वाहतों पायीं । आतां येथून तुझें तूं पाहीं । मीपण नाहींच मजमाजीं ।। घेंई माझा देहाभिमान । नलगे सुखदु:खाची जाण । इच्छेनुसार निजसूत्रा चालन । देऊनि मन्मन आवरीं।। अथवा माझें जें मीपण। तेंचि स्वयें तूं होऊनि आपण । घेईं सुखदु:खाचें भोक्तेपण । नको मज विवंचन त्याचें ।। जय जयाजी पूर्णकामा। जडो तुझियाठायीं प्रेमा। मन हें चंचल मंगलधामा । पावो उपरमा तव पायीं ।। तुजवांचूनि दुजा कोण । सांगेल आम्हांस हितवचन । करील आमुचें दु:खनिरसन। समाधान मनाचें ।।

माझे सदगुरु म्हणतात आयुष्याला दिशा द्यायची असेल, तर विचारांना शिस्त हवी. शिस्तबद्ध विचार करण्याची सवय स्वतःला लावून घ्यायची. त्याने आपलं आयुष्य बदलतं. हेमाडपंताच्यामध्ये ही विचारांची सुसूत्रता अथवा शिस्तबद्ध विचार करण्याची सवय होती म्हणूनच गहू दळण्याची कथा फक्त आश्चर्याने चमत्कार म्हणून न पाहता वा दुर्लक्ष करता त्यांनी त्यामागील बाबांचा मूळ उद्देश , हेतू , कारण जाणून घेतले आणि श्रीसाईसच्चरिताचा उगम झाला.

बाबांच्या अगाध लीलांना पाहता माझ्या मनाला जणू काही ह्या बाबांच्या लीला , गोष्टी गोळा कराव्या आणि ज्या कोणाला माझ्या बाबांचे प्रत्यक्ष दर्शन होणार नाही, त्यांना नयनसुखाची तृप्ती लाधून ते निवणार नाहीत, त्यांना कमीत कमी बाबांच्या कथा श्रवण करून , वाचून त्यांचे माहात्म्य कळेल आणि पुण्य़ही पदरी पडेल ह्या महान उदात्त हेतुने त्यांनी हे महत्कार्य करण्याची इच्छा मनीं धरली आणि बाबांच्याच कृपेने ती फलद्रूपही झाली. तरी देखिल ह्याही गोष्टीची सावधनता सदैव बाळगली आणि सदैव प्रत्येक अध्यायांत ह्या महान ग्रंथाचा फक्त आणि फक्त माझा सदगुरु साईनाथच कर्ता असल्याचे आणि संतसज्जनांच्या प्रेरणेनेच हा ग्रंथ लिहिला गेल्याचे नमूद केले.

स्वत:च्या अंहकारापोटी सदगुरुंना शरण न जाण्याची मोठी चूक आपण बरेच वेळा करतो आणि सदगुरुंच्या सहवासाच्या महत्भाग्यापासून वंचित होतात , हेमाडपंत आपल्याला ह्या धोक्यांपासून सावध करण्यासाठीच “श्रीसाईसच्चरित” ह्या महान अपौरुषेय ग्रंथाची विरचना करतात आणि गुरुनाम, गुरुमंत्र, गुरुगृहवास, गुरुकृपा, गुरुचरण पायस, गुरुसहवास ह्या महत्प्रयासांनी प्राप्य गोष्टींना करतलकआमलकासमान (तळहातातील आवळ्यासमान सोपे करुन) सुपुर्द करतात.म्हणजेच मानवी रुपातील साकार सगुण सदगुरुंना नाकारण्याच्या परंपरेच्या भाग बनण्याच्या अनर्थापासूनही सावध करतात असे मला प्रामाणिकपणे वाटते.

एवढेच नव्हे तर ग्रंथाची अवतरणिका लिहिण्याचे तर दूरच पण ग्रंथ पूर्णतेनंतरही ते क्षणभरही विभक्त न राहता साईंचरणी लीन झाले. किती ही पराकोटीची शारण्यता की जे बोलले तेच सत्यातही प्रकटले –
मी तो केवळ पायांचा दास । नका करू मजला उदास । 
जोवरी ह्या देहीं श्वास । निजकार्यासी साधूनि घ्या ।।
हे माझ्या लाडक्या सदगुरुराया , हे माझ्या लाडक्या प्रेमळ पित्या …अशीच अंबज्ञता माझ्याही जीवनीं तुझ्याच कृपेने प्रकटो …
जीवनी माझ्या बा अनिरुद्धा श्वासासंगे येत राहा । जीवनी माझ्या बा अनिरुद्धा श्वासासंगे येत राहा।
नको मजला कुठेही जाणे । नको मजला दुसरे येणे । तुझीच पिपासा जीवनी असणें ।
असे घर तू बांधशील ना ? घर बांधाया येत राहा ।।
जीवनी माझ्या बा अनिरुद्धा श्वासासंगे येत राहा । जीवनी माझ्या बा अनिरुद्धा श्वासासंगे येत राहा ।


श्रीसाईसच्चरित  वाचता वाचता  हेमाडपंताचा हा ध्यास जीवनी उतरो - हीच आज पितृदिनी माझ्या प्रेमळ पित्याच्या सदगुरुच्यां चरणीं भाव सुमनांजली -माझ्या मनीची आर्तता -
मी तो बाहुले साईखड्याचे ।आधारे नाचे सूत्राच्या ।



प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog