Sunday 17 June 2018

मी तो बाहुले साईखड्याचे ।आधारे नाचे सूत्राच्या ।

                                                                        


श्रीसाईसच्चरित आणि हेमाडपंत - सदगुरुंच्या चरणीं पराकोटीची लीनता, विनम्रता कशी धारण करावी, अनन्य शरणागती म्हणजे काय ह्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हेमाडपंत ! साईनाथांना आपला सदगुरु मानल्यावर हेमाडपंतानी आपले स्वत:चे नाव , स्वत:ची ओळख देखिल पुसून टाकली व माझ्या सदगुरुंनी , माझ्या साईनाथांनी मला बहल केलेले नामच माझे खरे नाव आहे , ह्याच भावनेने आजीवन मिरविले देखिल, जरी साईनाथांनी उपहासात्मक शब्दांत ते उच्चारले होते तरी !

खरोखरीच हेमाडपंतासारख्या महान भक्ताचा जीवनप्रवास अभ्यासताना हीच खूणगाठ मनाशी घट्ट बांधली जाते की जे ते वदले तेच ते आजीवन जगले. सदगुरु साईनाथांना अनन्यभावाने शरण जाऊन त्यांनी एकच मागितले की आजन्म तुझी सेवा घडू दे, मला फक्त आणि फक्त, केवळ तुझ्या चरणांचा दास ह्याच भूमिकेत जगायचे आहे आणि जोवरी माझ्या ह्या देहात श्वास आहे तोवरी हे तुझे तूच करवून घे आणि मला उदास करू नकोस. तू मला दिलेले तुझे निजकार्य तूच माझ्याकडून करवून घे, साधून घे !! केवढी ही पराकोटीची लीनता !!! म्हणजेच माझा सर्व अंहकार, मीपणा लयाला जाऊ दे, जर मी तुझ्या चरणांचा दास स्वत:ला म्हणवितो तर तुझे कार्य पण मी करेन एवढाही अंहकाराचा लवलेश माझ्या जीवनात राहता कामा नये. किती ही आटाटी!!!

हेमाडपंत अगदी पूर्णपणे ह्या “दासा”च्या भूमिकेत स्थिरावलेले दिसतात. त्यांनी बाबांनी दिलेले नामच अत्यंत प्रेमाने आणि अभिमानाने शेवटच्या श्वासापर्य़ंत मिरवले. कुठेही मान, सन्मान ,प्रसिद्धीची हाव उरी न बाळगतां ज्या क्षणी श्रीसाईसच्चरिताची शेवटची ओवी लिहिली गेली त्याच क्षणी आपली लेखणी आणि मस्तक म्हणजेच बुद्धीस्वातंत्र्य आणि कर्मस्वातंत्र्य दोन्ही श्रीसाईंच्या चरणी समर्पिते झाले.

माझे सदगुरु डॉ अनिरूध्द जोशी नेहमी प्रवचनांतून सांगतात की ही “त्या”च्या प्रेमाची वाट म्हणजे फक्त एकालाच वाव आहे , जागा आहे….

संत तुलसीदासांच्या शब्दांत सांगायचे तर ” प्रेम गली अति सांकरी , तेमा दुजा न समाय , तू है तो मैं नाही ”

आणि अगदी हेच आचरण हेमाडपंतानी अवलंबिले होते जणू काही, कोठेही अल्पशी ही जागा त्यांनी स्वत: करिता राखून ठेवलीच नव्हती,फक्त माझ्या साईंचाच मी होऊन राहणे म्हणजे काय हे शिकायला मिळते ते येथे श्रीसाईसच्चरितात… अगदी पत्येक शब्द अन शब्द साईंवरच्या प्रेमाने ओथंबून भरभरून वाहतो. हेमाडपंताच्या जीवनातील प्रत्येक क्षण आणि क्षण साईमय झालेला आढळतो. ३२व्या अध्याय़ातील एका ओवीत ते म्हणतात -
” हेमाड साईंसी शरण । अपूर्व हें कथानिरुपण । 
साईच स्वयें करी जैं आपण । माझें मीपण फिकें तैं ।। 
तोच या कथेचा निवेदिता । तोच वाचिता तोच परिसता । 
तोच लिहिता आणि लिहविता । अर्थबोधकताही तोच ।। 
साईच स्वये नटे ही कथा । तोच इये कथेची रुचिरता । 
तोच होई श्रोता वक्ता । स्वांनदभोक्ताही तोच ।।

कुठेही एवढ्या महान अपौरुषेय ग्रंथाचे कर्तृत्व हेमाडपंत स्वत:कडे घेत नाही.. सर्व काही माझे बाबा आणि फक्त बाबाच!!! हेमाडपंत म्हणतात ” मी तो बाहुले साईखड्याचे । आधारे नाचे सूत्राच्या ।
सुरुवातीला पेन्शन मिळाल्यावर अण्णा चिंचणीकरांनी हेमाडपंताना नोकरी मिळावी म्हणून अजीजी केली पण नोकरी काही काळापुरतीच लागली आणि गेली तदनंतर मात्र हेमाडपंतानी बाबांचे बोल =
करावी आतां माझी चाकरीं । सुख संसारी लाधेल । 
 हेच बोल उर्वरीत आयुष्यात उरी ठामपणे कवटाळलेले दिसतात.

अवघ्या ८ वर्षांच्या कारकीर्दीमध्ये हेमाडपंतानी जो हा देवयान पंथावरचा अफाट पल्ला पार पाडला तो केवळ साईंना अनन्यभावाने शरण जाऊनच !!!

संत तुकारामाचें “हेचि दान दे गा देवा । तुझा विसर न व्हावा । विसर न व्हावा तुझा । न लगे मुक्ती धनसंपदा । संत संग देई सदा ” हे ब्रीद आचरतच जणू हेमाडपंत जगले असे मला वाटते ज्यांमुळे कोठेही आपली पाऊलेच उमटू देखिल दिली नाही … देहची जेथे नाही आपुला । तो तयाच्या पायां वाहिला । मग काय अधिकार । तयाचिया चलनवलनाला आपुला ।। ह्या उक्तीची सत्यता दाविणार्‍या हेमाडपंताचा भाव अंशत:तरी मला धारण करता यावा अशी पिपासा मनी बळावते.

“एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा ” - साक्षात परमात्मा साईमुखीचे हे बोल - सदगुरुच्यां ठायी असलेला एकमेव विश्वास -म्हणजेच माझ्या जीवनाचा हाच सूत्रधार आहे, माझे संपूर्ण जीवन ह्याच्याच इच्छेने चालते. सदगुरु असो वा परमेश्वर असो वा देव असो , त्याला आपल्या जीवनाचा सूत्रधार मानले की जीवनाचे गणित अगदी सोपे होऊन जाते.  
 माझ्या सदगुरु डॉ अनिरूध्द जोशींनी लिहिलेल्या मातृवात्सल्य-उपनिषदात स्पष्टपणे हेच वारंवार बजावले आहे की ‘सगळंकाही फक्त विश्वासातच आहे’ Yes सगळं विश्वासातच आहे. सदगुरु बापू ह्या विश्वासाचे उदाहरण देताना Nikola Tesla ह्या महान शास्त्रज्ञ ह्याचे खडतर जीवनाविषयी सांगतात २७-०३-२०१४ च्या प्रवचनात की ह्याच Scientist च्या विरोधात सगळे उद्योगपती, राजकारणी, सायन्स area मधली माणसे उभी होती पण ह्याचं काही वाकडं झालं का? एक बिल्डिंग जळली तरीही हा खरोखर राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे उभा राहिला. देवा मला मार्ग दाखव. त्याने देवाला कधीच कोसलं नाही, त्याने देवाला विचारलं नाही की, ‘शत्रुने बिल्डिंग जाळली तू ती जळू का दिलीस?’ अकरा महिन्यात तीन बिल्डिंग्ज्‌ उभ्या राहिल्यात. त्याने दिवे लावून सगळया राजकारण्यांना, उद्योगपतींना शरण आणलं. लोकं sympathy द्यायची तेव्हा तो म्हणायचा – “God is There!! God is Great !! Mother will take care.”

हेच ब्रीद हेमाडपंत ही सदैव उच्चारीत व त्यानुसारच वागत - मी तो बाहुले साईखड्याचे । आधारे नाचे सूत्राच्या ।

सदगुरुंनी श्रीसाईसच्चरितावरील हिंदी प्रवचनांत सांगितले  होते की self-confidence तेव्हाच वाढू शकतो जेव्हा self-esteem वाढतो पण माणसाकडे ही स्व:तला पारखण्याची म्हणजेच स्वत:ची capacity, competency , potency जाणण्याची क्षमता एकतर खूप कमी किंवा खूप अधिक असते , कारण self-esteem ही बुध्दीची गोष्ट आहे, आणि self-confidence ही मनाची गोष्ट आहे. जेव्हा माणूस स्वत:ची बुध्दी परमात्म्याच्या चरणांवर स्थिर करतो त्याला शरण जाऊन तेव्हा तो स्वत:ला चुकीच्या प्रश्र्नांच्या सहाय्याने चुकीच्या प्रकारे आजमावत नाही, कारण परमात्मा स्वत: त्यात हस्तक्षेप करून चुकीचे आवरण, अज्ञान दूर करतो आणि त्या त्या माणसाला त्याच्या योग्यतेची खरी जाणीव करवून देतो. आणि जेव्हा स्वत: परमात्माच self-esteem वाढवून देतो तेव्हा self-confidence वाढतो म्हणजेच automatically परमात्म्यावरचा आत्मविश्वासही वाढतोच.

श्रीसाईसच्चरितातील १४ व्या अध्यायात हीच गोष्ट रतनजींच्या कथेत स्पष्ट दिसते की ते दासगणूंनी साईबाबांविषयी सांगितलेल्या गोष्टींना खरे मानतात , आणि निशंक मनाने , कोणताही तर्क, कुतर्क वा संशय न घेता बाबांकडे जातात. तसे पहायला गेले तर त्या काळानुसार रतनजी हे पारशी धर्माचे ज्यात मानवी सदगुरुंना मानणे ह्याला खूप विरोध होतो. रतनजींना सुध्दा हा विरोध पत्करावा लागला असू शकतो. तसेच पैशाची मुबलकता, समृध्दी ह्याचा अंहकारही बाबांकडे जाण्यापासून रोखू शकत होता कारण बाबा तर एक लोकांच्या दारोदार फिरून भिक्षा मागून पोट भरणारे , मशिदीत रहाणारे , मुसलमान फकीर होते , त्या काळातील लोकांच्या मान्यतेनुसार… तरीही रतनजीच्या आड काही आले नाही कारण त्यांनी बाबांच्या चरणी दासगणूंच्या सांगण्याला प्रमाण मानून , त्यांना आपले आप्त मानून विश्वास धरला. रतनजींनी मी तो बाहुले साईखड्याचे हे सूत्र जीवनी स्विकारले म्हणूनच . हाच तो विश्वास , सदगुरुंच्या चरणीं अनन्य शरणागतीचा भाव  असावा , जो सर्वातून तारून नेतोच नेतो , अगदी १०८ % सत्य!  

माझे सदगुरु म्हणतात की विश्वास म्हणजे काय तर दिशा, अंतर कापण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे त्याची वेळ कधी चुकणार नाही ह्यालाच विश्वास म्हणतात.

बाबांनी रतनजींना फक्त “मनाची मुराद पुरवील अल्ला” हा आशीर्वाद दिला होता आणि कोठेही पुत्र होईल हे सुस्पष्ट आश्वासन दिले नाही तरी रतनजी आनंदनिर्भर मनाने परतले आणि योग्य काळ लोटल्यावर रतनजीच्या पत्नीस गर्भ राहिला व सुवेळी ती बाळंत होऊन पुत्ररत्नप्राप्ती झाली. त्यानंतरही १२ मुलांत केवळ ४ जिवंत राहिली तरी रतनजींचा विश्वास अढळच राहिला , हाच तो प्रतिदिनी वाढत जाणारा विश्वास म्हणजेच दृढ विश्वास म्हणजेच दृढ बुध्दी असावी जिचा नवस साईनाथ करायला सांगतात आणि वचनही देतात की अशा दृढ बुध्दी माझ्या ठायी करण्याच्या नवसाला माझी समाधीही पावेल. नवसास माझी पावेल समाधी धरा दृढ बुध्दी माझ्या ठायीं-
आता कोणी म्हणेल की हेमाडपंताच्या मनात पहिल्यांदा विकल्प आला होताच ना ? हो विकल्प आला होता हे सत्य आहे तरी देखिल आपण पाहतो, वाचतो श्रीसाईसच्चरितात की कायम सावध राहणार्‍या हेमाडपंताना त्याची निरर्थकता जाणवली नानांच्या आग्रहामुळे आणि त्यांनी साईंना भेटायला जायचे निश्चीत करताच, स्वत: साईनाथांनीच त्यांना उर्वरीत आयुष्यात अखंडपणे पाठीशी उभ्या राहणार्‍या छत्राची-सदगुरुची छाया मिळवून दिली.
        येथे हेमाडपंतांची बाबांशी प्रथमच भेट- धूळभेट झाल्यावरही ही सभानता म्हणजेच कायम सावध राहायचा गुण प्रकर्षाने जाणवून दिला - आनंदाच्या परमोच्च अवस्थेतही हेमाडपंत आपल्या मित्रांची (काकासाहेब दीक्षित व नानासाहेब चांदोरकर) आठवण काढतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात. बापूंनी शिकवेलीली हीच ती अंबज्ञता असावी, असे वाटते. आपल्या आयुष्यात फक्त सदगुरु साईनाथांच्या कृपेनेच आणि मित्रांच्या आग्रहामुळे आपल्याला सदगुरुप्राप्ती झाली ह्याचे सदैव स्मरणही ठेवतात आणि संकल्प-विकल्पात्मक मनाच्या आहारी जाऊन सर्वसामान्य माणसाने चुकू नये ह्यासाठी श्रीसाईसच्चरित ग्रंथात वारंवार आठवही देतात – २६व्या अध्यायांत हेमाडपंत कळवळून सांगतात –
म्हणवूनि प्रार्थूं कीं बाबांप्रत । करावी बुद्धी अंतरासक्त । नित्यानित्यविवेकयुक्त । वैराग्य्ररत मज करीं ।। मी तो सदा अविवेकी मूढ । आहें अविद्याव्यवधाननिगूढ । बुद्धि सर्वदा कुतर्कारूढ । तेणेंचि हें गूढ पडलें मज ।। गुरुवेदान्तवचनीं भरंवसा ।ठेवीन मी अढळ ऐसा । करीं मन जैसा आरसा । निजबोध ठसा प्रगटेल ।। वरी सदगुरो साईसमर्था । करवीं या ज्ञानाची अन्वर्थता। विनाअनुभव वाचाविग्लापनता । काय परमार्था साधील ।। म्हणोनि बाबा आपुल्या प्रभावें । हें ञान अंगें अनुभवावें। सहज सायुज्य पद पावावें । दान हें द्यावें कृपेनें ।। तदर्थ देवा सदगुरुसाई । देहाहंता वाहतों पायीं । आतां येथून तुझें तूं पाहीं । मीपण नाहींच मजमाजीं ।। घेंई माझा देहाभिमान । नलगे सुखदु:खाची जाण । इच्छेनुसार निजसूत्रा चालन । देऊनि मन्मन आवरीं।। अथवा माझें जें मीपण। तेंचि स्वयें तूं होऊनि आपण । घेईं सुखदु:खाचें भोक्तेपण । नको मज विवंचन त्याचें ।। जय जयाजी पूर्णकामा। जडो तुझियाठायीं प्रेमा। मन हें चंचल मंगलधामा । पावो उपरमा तव पायीं ।। तुजवांचूनि दुजा कोण । सांगेल आम्हांस हितवचन । करील आमुचें दु:खनिरसन। समाधान मनाचें ।।

माझे सदगुरु म्हणतात आयुष्याला दिशा द्यायची असेल, तर विचारांना शिस्त हवी. शिस्तबद्ध विचार करण्याची सवय स्वतःला लावून घ्यायची. त्याने आपलं आयुष्य बदलतं. हेमाडपंताच्यामध्ये ही विचारांची सुसूत्रता अथवा शिस्तबद्ध विचार करण्याची सवय होती म्हणूनच गहू दळण्याची कथा फक्त आश्चर्याने चमत्कार म्हणून न पाहता वा दुर्लक्ष करता त्यांनी त्यामागील बाबांचा मूळ उद्देश , हेतू , कारण जाणून घेतले आणि श्रीसाईसच्चरिताचा उगम झाला.

बाबांच्या अगाध लीलांना पाहता माझ्या मनाला जणू काही ह्या बाबांच्या लीला , गोष्टी गोळा कराव्या आणि ज्या कोणाला माझ्या बाबांचे प्रत्यक्ष दर्शन होणार नाही, त्यांना नयनसुखाची तृप्ती लाधून ते निवणार नाहीत, त्यांना कमीत कमी बाबांच्या कथा श्रवण करून , वाचून त्यांचे माहात्म्य कळेल आणि पुण्य़ही पदरी पडेल ह्या महान उदात्त हेतुने त्यांनी हे महत्कार्य करण्याची इच्छा मनीं धरली आणि बाबांच्याच कृपेने ती फलद्रूपही झाली. तरी देखिल ह्याही गोष्टीची सावधनता सदैव बाळगली आणि सदैव प्रत्येक अध्यायांत ह्या महान ग्रंथाचा फक्त आणि फक्त माझा सदगुरु साईनाथच कर्ता असल्याचे आणि संतसज्जनांच्या प्रेरणेनेच हा ग्रंथ लिहिला गेल्याचे नमूद केले.

स्वत:च्या अंहकारापोटी सदगुरुंना शरण न जाण्याची मोठी चूक आपण बरेच वेळा करतो आणि सदगुरुंच्या सहवासाच्या महत्भाग्यापासून वंचित होतात , हेमाडपंत आपल्याला ह्या धोक्यांपासून सावध करण्यासाठीच “श्रीसाईसच्चरित” ह्या महान अपौरुषेय ग्रंथाची विरचना करतात आणि गुरुनाम, गुरुमंत्र, गुरुगृहवास, गुरुकृपा, गुरुचरण पायस, गुरुसहवास ह्या महत्प्रयासांनी प्राप्य गोष्टींना करतलकआमलकासमान (तळहातातील आवळ्यासमान सोपे करुन) सुपुर्द करतात.म्हणजेच मानवी रुपातील साकार सगुण सदगुरुंना नाकारण्याच्या परंपरेच्या भाग बनण्याच्या अनर्थापासूनही सावध करतात असे मला प्रामाणिकपणे वाटते.

एवढेच नव्हे तर ग्रंथाची अवतरणिका लिहिण्याचे तर दूरच पण ग्रंथ पूर्णतेनंतरही ते क्षणभरही विभक्त न राहता साईंचरणी लीन झाले. किती ही पराकोटीची शारण्यता की जे बोलले तेच सत्यातही प्रकटले –
मी तो केवळ पायांचा दास । नका करू मजला उदास । 
जोवरी ह्या देहीं श्वास । निजकार्यासी साधूनि घ्या ।।
हे माझ्या लाडक्या सदगुरुराया , हे माझ्या लाडक्या प्रेमळ पित्या …अशीच अंबज्ञता माझ्याही जीवनीं तुझ्याच कृपेने प्रकटो …
जीवनी माझ्या बा अनिरुद्धा श्वासासंगे येत राहा । जीवनी माझ्या बा अनिरुद्धा श्वासासंगे येत राहा।
नको मजला कुठेही जाणे । नको मजला दुसरे येणे । तुझीच पिपासा जीवनी असणें ।
असे घर तू बांधशील ना ? घर बांधाया येत राहा ।।
जीवनी माझ्या बा अनिरुद्धा श्वासासंगे येत राहा । जीवनी माझ्या बा अनिरुद्धा श्वासासंगे येत राहा ।


श्रीसाईसच्चरित  वाचता वाचता  हेमाडपंताचा हा ध्यास जीवनी उतरो - हीच आज पितृदिनी माझ्या प्रेमळ पित्याच्या सदगुरुच्यां चरणीं भाव सुमनांजली -माझ्या मनीची आर्तता -
मी तो बाहुले साईखड्याचे ।आधारे नाचे सूत्राच्या ।



2 comments:

  1. खूप सुंदर भेट सद्गुरुचरणी अर्पण केलीस आजच्या Father's Day च्या दिवशी।
    संपूर्ण परिपूर्ण लेख. हेमाडपंत आणि श्रीसाईसचरित्र यांचा सुंदर प्रवास ह्या लेखाद्वारे अनुभवता आला.
    खूप खूप धन्यवाद. साईभक्त रतनजी शेठजीनच्या कथेतील खूप महत्वाचा पैलू उलगडला. सर्व अर्थाने सार्थ ओवी मी तो बाहुले साई खड्याचे आधारे नाचे सूत्राच्या...त्यातील सौंदर्य प्रतिबिंबित झाले.
    पुन्हा एकदा धन्यवाद.

    ReplyDelete
  2. Very good blog...it will guide us all on devyaanpanth...faith is something present or absent..it can't be partial...as we know there is Sun in the sky so we done need to say that I hv faith in the sun .similarly faith in sadguru can't be said written or talked about...it is or it is not...when it is there we don't say it...when it is not there we don't bother to say about it...
    Many thnx to blog writer for publishing such a nice blog article.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog