Monday 13 April 2015

आपत्ती व्यवस्थापन आणि जन जागृती.

आपत्ती व्यवस्थापन आणि जन जागृती. 

आपती व्यवस्थापनात जनजागृती आणि पर्य़ायाने जन सहभाग हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.

स्थानिक पातळीवर आपत्ती व्यस्थापनाची गरज -

ढोबळमानाने, मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. पूर , भूकंप , त्सुनामी अशा नैसर्गिक आपत्ती ह्या  विशेषत: हवामानातील बदलामुळे आकस्मिकपणे उदभवतात. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीत जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता ही अधिक मोठ्या प्रमाणावर संभवते. आपण सर्वसाधारणपणे रोजच्या धावपळीत ही अनुभवतो की कापणे , चिरणे, भाजणे असे घरगुती स्वरूपाचे अपघात असो वा आगी लागणे, वाहनांचे अपघात होणे असे अपघात असो,  कोणत्याही अपघातात प्राथमिक उपचार (First-aid) तात्काळ केले गेले तर अपघातग्रस्त वा जखमी व्यक्तीला कमी इजा होऊ शकते. म्हणजेच माणसाच्या त्या अपघाताला प्रतिसाद देण्याच्या कृतीवर होणारे नुकसान हे कमी वा अधिक स्वरूपाचे असू शकते. "एकमेंका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ " ह्या न्यायाने म्हणा वा माणसुकीच्या कळवळ्यापोटी म्हणा जेव्हा एक माणूस दुसर्‍या संकटात सापडलेल्या माणसाच्या मदतीला धावून जातो तेव्हा त्या संकटात सापडलेल्या, घाबर्‍याघुबर्‍या झालेल्या , आक्स्मिक संकटाने , अपघाताने खचलेल्या, भेदरलेल्या जीवाला नक्कीच दिलासा मिळतो, उभारी मिळते, आणि आपण एकटे नाही आहोत, कोणी तरी आपल्या मदतीला आले आहे आणि आपण ह्यातून नक्की वाचू शकतो हा आत्मविश्वास माणसाला खूप मोठा मानसिक , भावनिक आधार मिळवून देतो, ज्याच्या बळावर तो धैर्याने त्या अपघातावर, संकटावर मात करू शकतो.
आणि  म्हणूनच आपत्ती व्यवस्थापन आणि लोकांचा सहभाग ह्यांच नातं फार जवळच आहे.



भूकंप, महापूर, चक्रीवादळ अतिवृष्टि ह्या सर्व घटना नैसर्गिक आपत्तीमध्येच गणल्या जातात. अशा आपत्तीमध्ये होणारी जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत विभागीय व जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर केंद्र शासनाने २००५ मध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा पारित केला आहे. याचा मूळ उद्देश नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे नुकसान टाळणे व सर्वांना सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. हा कार्यक्रम प्रशासकीय यंत्रणेकडून राबविला जात असला तरी देखील आपात्कालीन  परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी, सामोरे जाण्यासाठी लोकांचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे.

आपत्ती व्यवस्थापनात शासनाचा सिंहाचा वाटा असतो. तसेच आपत्ती व्यवस्थापनामध्ये स्थानिक पातळी ही देखील महत्वाची आहे. त्यामुळे विविध गट स्थापन करणे आवश्यक ठरते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने जिल्हास्तरावर जिल्हा आपत्ती आराखडा तयार करणे तो अद्ययावत करणे, विविध कार्यशाळा आयोजित करणे तसेच रंगीत तालीम आदी उपक्रम जिल्हा पातळीवरील कार्यक्रमात राबविण्यात येतात.
तालुका स्तरावरही अशाच प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येतात. गाव आपत्ती व्यवस्थापन समिती आदी सदस्यांचे प्रशिक्षण, कार्यलयीन कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी यांचे प्रशिक्षण तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी पथनाट्य, भितीचित्र, जाहिरात फलक, पोस्टर्स स्पर्धा, आदी कार्यक्रमाव्दारे जनजागृती करण्यात येते.


गावात येणारे पूर, महापूर वा अन्य नैसर्गिक आपतींचा मुकाबला करण्यासाठी सुरुवातीला गावकऱ्यांनाच हिमतीने सज्ज राहावे लागते. नागरिकांचे मनोबल वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर व्यवस्थापनाची गरज निर्माण होते.

काश्मीर पूर बचाव कार्य

दरवर्षी सातत्याने येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी, अकस्मात येणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी, आपत्ती विषय़क जुजबी ज्ञान असणे तसेच आपती पूर्वी घ्यावयाची खबरदारी/काळजी, आपती दरम्यान घ्यावयाची काळजी आणि आपत्ती नंतर घ्यावयाची काळजी ह्या बद्दल आवश्यक ती माहिती असणे किंवा जाणून घेणे एखाद्या आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणाद्वारे) कधीही हितावह असते. त्याच्या सुयोग्य वापरानेअसल्यास संभवणारी जीवित व वित्त हानी अगदी संपूर्णत: जरी टाळता आली नाही तरी काही अंशी का होईना आपण त्याचे प्रमाण कमी करू शकतो. जनजागृती द्वारे समाजातील लोक एकत्रित येऊन त्यांनी  प्रयास केल्यास नक्कीच कमीत कमी जीवित व वित्त हानी होईल ह्या करीता खात्रीपूर्वक उपाय योजना अवलंबिता येऊ शकतात. त्यामुळे आपण स्थानिक पातळीवर तरी कमीत कमी आपत्तीनंतर दैनंदिन जीवन उध्वस्त होऊ नये याची खबरदारी घेऊन पर्यायी तयारी करू शकतो.

आपत्ती काळात तसेच आपत्तीनंतर विशेषत: अल्पवयीन बालके, वृध्द, महिलां तसेच अपंग यांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता बाळगणे अत्यंत गरजेचे असते. याशिवाय आपत्ती काळात पाणी (पिण्यायोग्य)  पुरवठा, खाण्यापिण्याची व्यवस्था, वैद्यकीय सेवा, औषध सामग्री, सांडपाण्याची व्यवस्था  तसेच ग्रामीण भागात जनावरांना चारा इत्यादी सुरळीत चालतील याकरिता  स्थानिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी तितकाच उत्स्फूर्तपणे लोकसहभाग मिळणे आवश्यक असते जो आपल्याला जनजागृती द्वारे साध्य करता येऊ शकतो.

आपात्कालीन परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणेसोबतच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, होमगार्डस, पोलीस प्रशासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आदीचा प्रामुख्याने सहभाग असतो. तसेच आपात्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामस्थांनी देखील हिरीरीने पुढाकार घेऊन सुरक्षा व्यवस्थेला सहकार्य करण्याची गरज आहे.

फिलीपाईन्स - जनसहभाग-बचाव कार्यात 

जनसहभागांतर्गत आपत्तीनंतरची काळजी कशा प्रकारे घेता येऊ शकते ? 
  
१. आपत्तीचा नीट अंदाज येण्यासाठी आपण जेथे आसर्‍यासाठी थांबलो त्या ठिकाणी रेडिओ, टीव्हीवरील बातम्यांकडे लक्ष ठेवून असले पाहिजे. त्याचबरोबर त्याचबरोबर भारतीय हवामान खात्याने ( Indian Meteorological Department - http://www.imd.gov.in/ )  दिलेल्या सूचना काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजेत. येथे लक्षात घेण्याची महत्त्वाची बाब म्हणजे खंडीत वीज पुरवठ्यामुळे रेडिओ वा टीव्ही वरून संपर्क साधणे अशक्य झाल्यास बॅटरीवर चालणार्‍या रेडिओचा वा हॅम रेडिओचा वापर करता येऊ शकतो.

२. ढगफुटी अथवा अतिवृष्टि  झाल्यामुळे दरडी कोसळतात. टेकड्या , डोंगर खचतात आणि खाली येतात. मोठ्या प्रमाणात दगड-माती खाली येते. तेव्हा अशा आपतीं मध्ये आश्रयासाठी म्हणून डोंगराच्या पायथ्याशी थांबू नका.


३. प्रचंड पावसामुळे समुद्राला, नदीला पूर येतो. तेव्हा समुद्रा काठी वा नदीकाठच्या  परिसरात, हॉटेलात, घरात, न थांबता अन्यत्र सुरक्षित जागी आसरा घ्यायला जावे अथवा शक्यतोवर उंचावर थांबावे.

४.. पावसामुळे रस्त्याला तडे जातात. पूल वाहून जातात, रस्त्यावर दगड, माती मोठ्या प्रमाणत येते तेव्हा आहे तेथेच थांबून मदतीची वाट पाहा. पाण्याच्या वाहत्या प्रवाहात चालणे सुध्दा  ( १-२ फूट पाण्यात ) कठीण बनते , त्यांमुळे शक्यतो वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका  किंवा वाहन पुढे नेऊ नका."सिर सलामत तो पगडी पचास" ह्या न्यायाने माझी गाडी कितीही महागडी असेल तरी वाहनाचा मोह टाळून पहिले स्वत:चे प्राण वाचवावे.

५. . भूकंपामध्ये रस्ते दुभंगतात, जमीनीला भेगा पडतात, रेल्वेचे रूळ उखडले जातात, त्यामुळे अशा वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित आहे ना, मध्ये कुठलीही दुसरी अन्य आपत्ती नाही ना, हे कटाक्षाने पडताळून पहा.

६. पूर, म्हापूर, त्सुनामी मध्ये पाण्याच्या मोठ्या प्रवाहाने,  प्रचंड प्रलयामुळे रस्ते खचतात वा उखडले जातात, वाहतूक कोलमडते, वीज जाते, मोबाईल टॉवर उद्‌ध्वस्त होतात. फोन लागत नाहीत, दळणवळण यंत्रणा तसेच संपर्क यंत्रणा कुचकामी ठरतात.  अशा वेळी धैर्याने संकटाला तोंड द्यावे,

७. शक्यतो आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने उभारलेल्या मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्या, जेथे सुरक्षितता जास्त असते.

८. अशा आपत्तीच्या काळात लहान-सहान चोर्‍या होंण्याची वा लुटालूट होण्याची शक्‍यता असते. अशा वेळी मोठ्या संख्येने एकत्रितपणे व ग्रुपने राहाणे कधीही सोईस्कर आणि हितावह असते.

९.. शासनाने स्थापन केलेल्या मदत केंद्राच्या संपर्कात राहावे जेणे करून औषधे, अन्नाची पाकिटे, पाणी  इत्यादी मदत लवकर मिळू शकते.

उत्तराखंड

१०. उत्तराखंड, काश्मीर येथील पूर, महापूर ह्यावरून आपण अनुभवले की  पूर, महापूर ह्या आपत्तींमध्ये आपत्तिप्रवण क्षेत्रातून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी लष्कराचे जवान मदत करीत असतात. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मदत करीत असतात तेव्हा त्यांना सहकार्य करून त्यांची मदत घ्यावी.

११. आपत्तीच्या वेळी स्वत:च्या काळजीबरोबरच आपल्या सहकाऱ्यांचीही काळजी घेतली पाहिजे. येथे फक्त आर्थिक स्वरूपाचीच मदत अपेक्षित नसते. आपल्या जवळ पैसे नसल्यास इतरही अन्य प्रकारे आपण गरज पडल्यास तातडीने एकमेकांना सहकार्य केले पाहिजे.

१२. नातेवाइकांनी मदत कक्षाशी संपर्कात राहून तातडीने सुरू केलेल्या हेल्पलाइनवरून संपर्क साधण्याचा, माहिती घेण्याचा प्रयत्न करावा.

१३. नातेवाइकांनी शासकीय यंत्रणेला संपूर्ण सहकार्य केले पाहिजे. शांतता राखून संयम पाळला पाहिजे.



१४. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी, सुजाण, जागरूक नागरिकांनी अशा काळात मदत करताना प्रशासन, लष्कराबरोबर त्यांच्या सूचनेनुसार काम केले पाहिजे. बघ्यांची गर्दी हटविल्यास मदत कार्यात अडथळा येत नाही व वेगाने बचाव कार्य सुरळीतपणे पार पाडता येऊ शकते. त्यामुळे सुजाण , प्रशिक्षीत आपत्ती व्यवस्थापनच्या कार्यकर्त्यांनी अशा बिकट प्रसंगी  शांतता, शिस्त पाळून सेवाभावी वृत्तीने मदतकार्यात सहभागी झाले पाहिजे, जेणे करून आपण शासनाला खर्‍या अर्थाने हातभार लावू शकतो.


१५. प्रसारमाध्यमांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सत्य, अचूक बातम्या, वृत्तान्त देऊन नागरिकांना माहिती पोचवली पाहिजे. शक्यतो रक्तरंजित चित्रे वा बातम्या टाळाव्या , जेणे करून जनसमुदाय हा अधिक प्रक्षोभक होणार नाही.

१६. आपत्ती काळात अनेक अडचणी येतात. मदत लवकर पोचू शकत नाही. त्यामुळे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने शासनावर वा अन्य कुणावर दोषारोपण करणे, चुकीचे निष्कर्ष काढणे व अफवा पसरवणे टाळावे.

अशा प्रकारे न डगमगता, खंबीरपणे आपण नक्कीच आपत्तीवर मात मिळवू शकतो.

संदर्भ -  १. http://www.aniruddhasadm.com/2014/10/aadm-response.html
             २. http://www.aniruddhasadm.com/2014/10/aadm-support.html





1 comment:

  1. Tai Tumche vichar khup chhan Aahe.te mla Aavdle Majhya mulala ha nibhandh UPYUKT Pdla V Tyachi Ek prkarchi madat jhali Thank you

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog