Saturday 29 August 2015

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन द्रौपदीसी बंधु शोभे नारायण - रक्षा बंधन

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन
द्रौपदीसी बंधु शोभे नारायण

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, "शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?"
पाठची बहिण झाली वैरिण !

द्रौपदी बोलली, "हरिची मी कोण ?
परी मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देउन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !"
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न





 https://www.youtube.com/watch?v=cyAOzD6_5ms ह्या लिंकवर आपण हे गीत ऐकू शकता.

"श्यामची आई " ह्या अत्यंत लोकप्रिय चित्रपटातील हे प्रल्हाद केशव अत्रेंनी लिहीलेले , वसंत देसाईंनी संगीत दिलेले आणि आशाताईंच्या सुमंजूळ स्वरांनी साज लेऊन नटलेले हे सुश्राव्य गीत ऐकताना आठवते ते द्रौपदी व कृष्णाचे एक्मेकांवरील अगाध प्रेम आठवून ऊर दाटून येतो, नकळत डोळे पाणावतात.  


तसेच तोच प्रसंग गदिमांनीही शब्दांकीत केला  आपल्या  रसमयी गीतातून -

चिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला !
भरजरी फाडुन शेला
चिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला

बघून तिचा तो भाव अलौकीक
मनी कृष्णाच्या दाटे कौतुक
कर पाठीवर पडला अपसुक
प्रसन्‍न माधव झाला
चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !

म्हणे खरी तू माझी भगिनी
भाऊ तुझा मी दृपद नंदिनी
साद घालिता येईन धावुनी
प्रसंग जर का पडला
चिंधी बांधिते द्रौपदी हरिच्या बोटाला !

प्रसंग कैसा येईल मजवर
पाठीस असशी तू परमेश्वर
बोले कृष्णा दाटून गहिवर
पूर लोचना आला
चिंधी बांधिते द्रौपदी, हरिच्या बोटाला !

गदिमा (गजानन दिगंबर माडगूळकर ) ह्यांनी रचलेले हे गीत , बाबूजी उर्फ सुधीर फडकेंनी त्याला दिलेले अप्रतिम संगीत आणि आशा भोसलेंचा मंजूळ स्वरांनी स्वरबध्द केलेले  "झेप" ह्या चित्रपटातील हे गाणे ! 



आज रक्षा बंधन - बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आदर राखणारा, सन्मान वाढविणारा दिवस ! ह्या दिवशी आवर्जून आठवण येते ती कृष्णाच्या आणि दौपदीच्या भाऊ -बहीण नात्याची, अतूट प्रेम बंधनाची ! 

काय असेल ना ते रेशीम बंधांनी जुळलेले, पवित्र प्रेमाने गुंफलेले, दिव्य , अलौकीक नाते बहीण - भावाचे साक्षात परमात्मा प्रभू श्रीकृष्ण आणि दौपदीचे !!! 

उगाच नाही कृष्णाच्या बंधू प्रेमाला मिरवणारी द्रौपदी "कृष्णा" म्हणूनही संबोधिली जायची तेही साक्षात भगवंत श्रीकृष्णाकडूनच !

"श्यामची आई" हा चित्रपट लहान मुलांवर , बाल संस्कार कसे करावे ह्याचा उत्तम दिग्दर्शक ! 
अत्रेंच्या गीतातले बोल खरेच काळीज चिरतात - प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पटलि पाहिजे अंतरीची खुण .... नाते भले रक्ताचे नसेल तरी देखिल प्रेमाच्या विलक्षण शक्तीपोटी " भावाचा भुकेला श्रीहरी नाराय़ण " प्रसन्न होऊन "अंतरीची खूण " पटवितोच...

आपल्या भावच्या मनगटावर राखीचा रेशमी धागा बांधून बहीण आपले प्रेम तर व्यक्त करतेच आणि त्याच प्रेमापोटी आपल्या लाडक्या भावाच्या यशाची मनोकामना परमेश्वराच्या चरणी अर्पण करते . तर भाऊ आपल्या बहीणीच्या शीलाची , चारित्र्याची जपणूक करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे वचन देतो "त्या" च अनंत करूणामयी प्रेमस्वरूप परमेश्वराच्या साक्षीने !

आजकाल ह्या नात्याची वीण कुठेतरी काळाच्या ओघात , पैसा, तुलना, मानापमान ह्यात अडकून ढिली पडत चालली आहे आणि पुढे पुढे तर एकाच मुलाच्या अटाहासापायी वा मूलच न होऊ देण्याच्या संकल्पनेपोटी बहीण - भाऊ हे नातेच संपुष्टात येते की काय अशी अनामिक भीती दाटून येते. खरेच हा मायेचा ओलावा, आपलेपणा , जिव्हाळा आज किती दुर्मिळ होत चालला आहे नाही. 

तसे पाहायला गेले तर दौपदी ही राजकन्या- राजा द्रुपदाची नंदिनी आणि भगवान श्रीकृष्ण हे रक्ताचे बहीण-भाऊ पण नव्हते. द्रौपदीच्या स्वंयवराच्या वेळीस फिरत्या माशाची प्रतिमा खालच्या तरंगत्या जलात पाहून त्याच्या डोळ्याचा अचूक वेध घेऊन शरसंधान करणार्‍या शूरवीराच्या गळ्यात मी विजयश्रीची माळ बांधेन हा पण ! अर्थातच हे कुणा येरागबाळ्याचे कामच नव्हते मुळी , अत्यंत धनुर्विद्येत निपुण अशा निष्णात धनुर्धरालाच हे शक्य झाले असते. कर्ण सूतपुत्र म्हणून त्याला स्वंयवरात सहभागी होण्यापासून रोखले जाते. त्याने दुर्योधनाच्या अंगाचा तिळपापड होतो, हात चोळत बसण्याशिवाय गत्यंतर उरत नाही आणि श्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाच्या गळ्यात विजयश्री माळ घालते खरी. पण वनवासी पांडवांना आपली बहीण देण्यास दौपदीचा भाऊ तयार नसतो आणि घनघोर युध्द होते . अर्थातच पांडवाचा पाठीराखा साक्षात यदुराणा कृष्ण भगवंत असल्याने पांडवाचाच विजय होतो पण त्यामुळे दौपदीचे माहेर मात्र कायमचे दुरावते, तेव्हा कृष्ण भगवान ह्या याज्ञसेनी दौपदीला आपली बहीण मानून तिचे सांत्वन करतात असे वाचले होते लहानपणी. 

पुढे एकदा कृष्णाचे बोट कापते आणि जखमेतून वाहणार्‍या रक्ताला थांबवायला चिंधी हवी असते , नारद्मुनी कृष्णाची रक्ताच्या नात्याने असलेली सख्खी बहीण सुभद्रा हिच्याकडे चिंधी मागतात , तेव्हा आपल्या श्रीमंतीत खर्‍या प्रेमाचा विसर पडलेली सुभद्रा आपले भरजरी शालू, पैठण्या कसे फाडायचे म्हणून कोड्यात पडते , तेव्हा नारद्मुनी दौपदीकडे जातात तेव्हा दौपदी मात्र क्षणाचाही विचार न करता पितांबर फाडून त्याची चिंधी हरिच्या बोटाला बांधते. हे असते लाभेवीण प्रेम ! 

पुढे जेव्हा भर दरबारात नीच कौरव आपल्या कपट्जालात , दुष्ट शकुनीकडून द्युतात युधिष्ठीराला हरवतात व दौपदी पणाला लावली जाते आणि दासी बनलेल्या दौपदीच्या वस्त्राला हात घालण्याचा नंगा नाच चालू होतो. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, कुलगुरु कृपाचार्य असे सारे सत्तेपुढे मान तुकविणारे मूग गिळून गप्प बसतात, अगदी कुणी कुणी मदतीला येत नाही, स्वत:चे पाचही पती म्हणवणारे पांडव सुध्दा हातावत हात धरून बसतात. तेव्हा एकमेव मदतीला येणार्‍या कृष्णाचा धावा द्रौपदी करते आणि आपले सर्व वस्त्रभांडार हा भाऊ , हा बंधूराया आपल्या लाडक्या बहीणीच्या लज्जारक्षणासाठी पुरवितो आणि शेवटी पितांबर पाठवितो-ज्याने दौपदीचे वस्त्रहरणाचा किळसवाणा विकृत खेळ संपतो - संपवावाचा लागतो त्या नराधमांना !

सुभद्रा जरी कृष्णाशी निर्व्याज शुध्द लाभेवीण निख्खळ प्रेमाचे नाते नाही स्थापू शकली तरी कृष्णाने तिला कधीच दुखावले नाही . उलट महाभारत युध्दाच्या शेवटी आपला पिता द्रोणाचार्याच्या मृत्युने क्रोधाने आणि सूडाने भरलेला अश्वत्थामा जेव्हा पांडवाच्या संपूर्ण कुलाच्या विनाशासाठी ब्रम्हास्त्राचा चुकीचा वापर करतो तेव्हा सुभद्रेच्या पुत्राची अभिमन्युची पत्नी असलेल्या उत्तराच्या गर्भात पांडवाच्या कुलाचा एकमेव अंश वाढत असतो , त्याला स्वत:ची "ना धरी करी शस्त्र मी" ही प्रतिज्ञा मोडूनही श्रीकृष्ण वाचवतातच --"लाभेवीण प्रीती " एकमेव "तो" परमात्माच करू शकतो. १०८ % त्रिकालाबाधित सत्य ! 

आता आपण म्हणू शकतो की कृष्ण हा साक्षात भगवान , त्याला काय अशक्य ! 

पण आपल्या शिवछत्रपतींनी म्हणजेच शिवाजी महाराजांनी पण हाच स्त्रीच्या शीलाचे रक्षण करण्याचा महान आदर्श स्वत:च्या आचरणातून घालून दिला होता. शिवरायांना सख्खी बहीण नव्हती. पण लहानपणी जिजाऊंच्या संस्कारात वाढलेले आणि मर्यादा पुरुषोताम श्रीराम- श्रीकृष्णांच्या मानवी चिरंतन जीवन मूल्यांचे बाळकडू प्यालेले राजे स्वराज्यातीलच नव्हे तर परकीयांच्या शत्रू मुलुखातील प्रत्येक स्त्रीला मातेसमान, बहिणीसमानच मानीत होते. 

कल्याणच्या सुभेदाराची सून अशीच पराजित झालेल्या अवस्थेत राजांसमोर आणली जाते तेव्हा तिचा राजे चोळी-बांगडी देऊन सन्मान करवून परत तिची स्वत:च्या घरी आदरपूर्वक रवानगी करतात. 

तसेच दक्षिणेहून दिग्विजय करून परतणाया शिवाजी राजांना कर्नाटकात बेलवडी नावाच्या गावात देसाईगढी काही हाती लागेना, तब्बल एक महिनाभर मावळ्यांनी नेटाची झुंज देऊन ही गढी जिंकली. अत्यंत चिवट असा लढा दिला होता सावित्रीबाई देसाई नावाच्या स्त्रीने... जेव्हा ह्या सावित्रीबाईंना कैद करून राजांसमोर आणण्यात आले तेव्हा ती आपल्या लहान बाळाच्या जीवाच्या आकांताने राजांच्या पायावर पडून रडत रडत बाळाच्या प्राणांची याचना करू लागली. सदय राजांनी तिला बंधनमुक्त करून बाळाला न मारण्याचे वचन दिले आणि सांगितले मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा लागतो. आज मी पहिल्यांदा माझ्या भाच्याला भेटतोय तर माझ्या भाच्याच्या दूधभातासाठी ही गढी आणि आजुबाजूचा प्रदेश तुला चोळीबांगडीसाठी दिला आणि सन्मानाने तिला परत तिच्या राजगादीवर बसविले. 

अर्थातच ती स्त्री राजांच्या स्वभावाने दिपून गेली नसेल तरच नवल -- स्त्रीला अबला म्हणून न लाथाडता, न तिची उपेक्षा वा अवहेलना वा मानभंग न करता , भावा-बहिणीचे पवित्र नाते निर्माण करून जपणारा हा आदर्श राजा - बेलवडी गावात त्याच्या स्मरणार्थ त्या सावित्रीबाईंनी उभारलेले शिवरायांचे शिल्प आजही अभिमानाने त्याची साक्ष पटविते.

धन्य तो शिवबा आणि धन्य ती जिजाऊ माता !!! 

अशा भारतवर्ष ह्या संस्काराच्या पावन भूमीत , मानवी नीती व जीवन मूल्यांची जपणूक करण्यासाठी प्रत्येक पुरुष हा स्त्रीच्या पावित्र्याचे, शीलाचे रक्षण करण्यास मर्यादा पुरुषार्थाचे कंकण बांधून जर उभा ठाकला तर कोणा स्त्रीवर लाचारीचे जिणे जगण्याची अगतिक होण्याची पाळीच उद्भवणार नाही. निर्भयासारखी प्रकरणे घडूच शकणार नाहीत . 

एक स्त्री मोकळा श्वास घेऊन , निर्भय होऊन जगू शकेल तरच खर्‍या अर्थाने हा " रक्षा -बंधन " दिवस साजरा करण्याचा पवित्र , पावन , उदात्त हेतू साध्य होईल, असे मला प्रामाणिकपणे वाटते, काय पटतय का तुम्हाला ?


No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog