Friday 24 July 2015

आली आषाढी एकादशी..चला करू पंढरीची वारी ... माझी विठ्ठल रखुमाई !!!

आषाढी एकादशी म्हटले की, डोळ्यांसमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी ! भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची आषाढी एकादशी यात्रा.



लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वाट धरतात, विठ्ठल विठ्ठल च्या नामस्मरणाने अवघे पंढरपूर दणाणून जाते, जात, धर्म, भाषा, द्वेष, मत्सर या पलीकडे जाऊन सर्व लोक एकमेकांना "माउली-माउली" ची हाक देतात, हा अनोखा माऊलीच्या अफाट प्रेमाचा मेळावा बघणार्‍यांचे खरेच डोळ्यांचे पारणे फिटतात असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.

आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.


महाराष्ट्रात बहुसंख्य  शेतकरी वर्ग हा खेड्यांपाड्यांतून राहतो आणि त्या वर्गात आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या म्हणजेच पंढपूरच्या प्रेमनगरी वारकरी चंद्रभागेच्या प्रेमात न्हाऊन , "त्याच्या आणि एकमेव फक्त त्याच्याच असणार्‍या त्याच्या लाडक्या , प्राणप्रिय सावळ्या विठूमाऊलीच्या प्रेमात आकंठ डुंबून आणि "त्या" सावळ्या परब्रम्हाच्या चरणी स्वत:ला झोकून देऊन अमाप प्रेमाची लयलूट तर करतोच पण साठवणही करतो आणि पुढे वर्षभर व्यवहारात वापरतो. हा असतो अक्षय असा त्याच्या परम निधानाचा प्रेमाचा साठा - जो कधीच संपूच शकत नाही. 

हिंदू कॅलेंडर प्रमाणे कालगणना करताना मराठी वर्षामध्ये जो आषाढ महिना येतो त्यातील पहिल्या पंधरवड्यातील ( १५ दिवसांतील) शुध्द/शुक्ल एकादशीला आषाढी एकादशी असे म्हटले जाते आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात. आषाढी एकादशीला  ‘देवशयनी (देवांच्या निद्रेची)’ एकादशी म्हणूनही ओळखले जाते. 
  
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी’ म्हणण्याचे कारण : मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात.वषर्भरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीचे एक विशेष महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज प्रचलित आहे

आता आपण जाणून घेऊ या आषाढी एकादशीचे पौराणिक वा ऐतिहासिक महत्त्व... 

पौराणिक काळी म्हणजे फार पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने घोर तप करून भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले आणि वर मागितला. तो तर भोळा सांब सदाशिवच !!! आणि ह्या दैत्याने त्याचाच फयदा घेत  ह्या भोळ्या शिवाकडून अमरपद मिळवले. थोडक्यात काय तर तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल असा वर मिळविला. अर्थातच त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्यामुळे या म्रुदुमान्याने उन्मत्त होऊन याच वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्रीविष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला, उभयतांच्या लढाईत श्रीविष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता. नंतर ब्रम्हा - विष्णू - महेश व सर्व देव त्रिकुट नावाच्या एका पर्वतावर धात्री (आवळी) वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अक्समात तिथे ब्रम्हा - विष्णू - महेश या तिघांच्या श्वासाने एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने देवांना अभय देऊन गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे. नंतर देवांनी तिची स्तुती केली आणि तिनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील.

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात हे आपण आधी पाहिलेच होते तर ह्या देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्‍तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. म्हणून अशा प्रकारे त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला. परस्परावर प्रेम करणे, प्राणीमात्र, अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.

सर्वेपि सुखिन: सन्तु । सर्वे सन्तु निरामया । सर्वे भद्राणि पश्यन्तु । मा कश्चिद दु:खमाप्नुयात ।

आषाढी एकादशीला बहुधा सामान्य जन व्रत वा उपवास करतात ते कसे? 

आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहायचे. एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसीपत्र वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा, रात्री हरिभजन करत जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी काही लोक करतात.


पंढरपूरची वारी - हे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून आरंभ करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.

वारकरी संप्रदायात पंढरपूराला आपले माहेर म्हटले जाते आणि विठ्ठ्ल-रखुमाईला आपले माय-बाप ! 
साखरेच्या गोडीलाही लाजवेल अशी अवीट मधुरता आहे- मी आणि माझा देव -किती सोपा , साधा , सहज भाव का नाही "ते" सावळे परब्रम्ह ही भुलणार ? भक्तांच्या ह्या भावाला - भाव तोचि देव , ना मग घ्या प्रचिती- अठ्ठावीस युगे हा आपल्या लाडक्या भक्ताने पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर , कटीवर हात ठेवून उभाच आहे....
माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी माझी बहीण चंद्रभागा करीतसे पापभंगा 
बाप अन आई माझी विठ्ठल रखुमाई ....


आता आपण पाहू या की पंढरपूरची वारी का केली जाते ? 
पंढरपूरची वारी म्हणजे हिंदू कुटुंब आणि समाज यांच्यातील एकोपा वाढवणारे व्रत !
पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे अत्यंत लाडके आणि लोकप्रिय दैवत आहे. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी चालू आहे, असे वारकरी संप्रदायाच्या जडण-घडणीविषयी संत सांगतात,

‘संतकृपा झाली इमारत फळा आली ।
ज्ञानदेवे रचिला पाया । उभारीले देवालया ।।
नामा तयाचा हा किंकर । तेणे केला हा विस्तार ।
जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ।।
तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।’

येथे ‘ज्ञानदेवे रचिला पाया ।’ याचा अर्थ संत ज्ञानेश्वरांनी या संप्रदायाला तत्त्वज्ञानाची बैठक दिली, असा आहे. पंढरपूरच्या वारीने हिंदू कुटुंब आणि समाज यांत एकोपा वाढण्यास हातभार लावला आहे. व्रतांना अशा प्रकारे सामाजिक महत्त्व मिळाले असावे. महाराष्ट्रातील देव-धर्म संप्रदायांच्या रूपाने जी परंपरा ज्ञानेश्वरांपासूनच्या काळात अस्तित्वात आली , पुढे काही काळ त्यातील चैतन्य, उत्साह हा मावळत चालला अशी भीती दाटू लागताच एकनाथरूपी सूर्य नव चैतन्याने पुन्हा तळपू लागला आणि लोकांमध्ये देव आणि धर्म यांच्या अभिमानाचा उल्हास संचारला होता असे निदर्शनास आले. पूर्वीच्या काळी संत एकत्र आले की, प्रत्येक जणच भगवत्‌स्वरूप झालेला आहे ह्या अत्यंत पवित्र भावनेने, अत्यंत प्रेमाने एकमेकांच्या चरणांवर डोके ठेवून एकमेकांप्रती आदर व्यक्त करत. (पायांवर डोके ठेवण्याने अनेक लाभ होतात, जसे वाकल्याने माझा ‘मी’पणा, ताठा, अहंकार कमी  होतो. माझ्यात लीनता , विनम्रता हा भाव येतो. सर्वांभूती परमेश्वर म्हणजेच सगळीकडे ईश्वर भरलेला आहे, ह्या भावनेला अनुभवायला मिळते. मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया !!!

पंढरीच्या वारीत सारे वारकरी मोठ्या प्रेमाने एकत्र येतात, पायवारी करताना एकमेकांना आपले अनुभव सांगतात, नवीन रचना (अभंग, भजने, ओव्या) म्हणून दाखवतात. आपल्या लाडक्या विठूरायाच्या , पंढरीरायाच्या म्हणजेच विठ्ठल भक्तीच्या प्रसाराच्या नवीन कल्पना सांगतात. वारीत नव्याने आलेल्या नवख्यांना जुने , जाणकार, अनुभवी वारकरी मार्गदर्शन करतात. प्रत्येक जण या मेळाव्यात उपस्थित असल्याचे इतरांना समजावे, यासाठी पताका बाळगत असे. तोच प्रघात आजतागायत चालू आहे. 

संत तुकाराम आपल्या एका अभंगात ह्या प्रथेचे आणि पंढरीच्या वारीचे किती जिवंत वर्णन जणू काही साकार केले आहे -
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे 
क्रोध अभिमान गेला पावतणी, एक एका लागतील पायी रे 

गोपीचंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळा 
टाळ मृदुंग घाई पुष्पवर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे 

वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती 
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे 

होतो जयजयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे 
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे 

आषाढ शुक्ल ११ व कार्तिक शुक्ल ११ या दोन एकादशांना महाएकादशी असे म्हणतात. त्यातील आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी तर कार्तिकी एकादशीला प्रबोधीनी एकादशी असेही म्हट्ले जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी शेषशायी भगवान श्रीविष्णु शयन करतात (झोपतात) ते कार्तिकी एकादशी पर्यंत झोपलेलेच असतात अशी समजुत आहे. म्हणुनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ ला होतो व कार्तिक शुक्ल ११ ला संपतो. हे चार महिने व्रतस्थ रहायचे असुन सणासुदीनी भरलेले आहेत.

फ़ार पूर्वी आर्य लोक ऊत्तर ध्रुव प्रदेशी किंवा त्याच्या जरा खाली वस्ती करुन रहात होते. तेव्हा याच दिवसात चार महिने त्यांना सूर्यदर्शन होत नसे. त्यामुळे सूर्यरुपी विष्णू झोपलेला आहे अशी कल्पना त्यांनी केली असावी व नंतर पुराणकारांनी त्या घटनेवर कथा रचल्या असाव्यात असे काही जणांचे मत आहे.

महाराष्ट्रातील विशेषत: भागवतधर्मीय किंवा पंथीय म्हणवणारे लोक या दिवशी उपवास तर करतातच पण शक्य तर पंढरीची वारी करुन श्रीविठ्ठ्ल दर्शन घेतात नाहीच जमले तर गावातल्या एखाद्या देवळात जाऊन अभंग गाऊन ती रात्र नामसंकीर्तन, भजन, पूजनात घालवितात. अगदी लहान बाल गोपाळही ह्या विठ्ठल सावळ्याच्या रुपात नटून जातात , किती लोभस ,  गोड रुपडे असते ना ? 
  
आषाढी एकादशीच्या या व्रताला विष्णूशयनोस्तव असेही म्हणतात. चातुर्मास व्रतारंभ याच दिवशी करतात. यापुढील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना या दिवशी करतात.

आता थोडासा निराळ्या दृष्टीकोनातून आषाढी एकादशीला केल्या जाणार्‍या उपवास ह्या संकल्पनेकडे पाहू या . उपवास या शब्दाचा अर्थ केवळ उपास करणे किंवा दिवसभर उपासाचे खाणे असा नसून थोडा वेगळा आहे. उपासकाला आहार कमी करण्यावाचुन गत्यंतर नाही असे पाहून धार्मिक साधनेप्रीत्यर्थ केलेल्या अन्नत्यागाला पुढे उपवास म्हणण्याची प्रथा पडली असावी असे वाचनात आढळते. 

माझे सदगुरु Doctor अनिरुद्ध जोशी (बापू) ह्यांनी उपवासाच्या पारंपारिक रुढींना बगल देऊन,अध्यात्माच्या वाटेवर पाऊल स्थिर ठेऊन खर्‍या अर्थाने आम्हा भक्तांना भगवंताच्या जवळ कसे जायचे ह्याचे खूपच सुंदर प्रकारे मार्गदर्शन केले. 

बापू म्हणतात की उपवास याचा मूळ अर्थ जवळ जाणे (उप + वास) असा आहे. म्हणजेच परमेश्वराच्या जवळ जाणे, त्याची आराधना करणे. परमात्म्याचे स्मरण करणे, त्याचा निकटवास अनुभवणे म्हणजे उपवास. अशा उपवासाने खर्‍या अर्थाने माणसाचे मन अंतर्मुख होते, द्रुष्टि निर्मळ होते, शरीर हलके रहाते, वासना शुध्द होते, संकल्प शक्ति वाढते. नीट विचार केला तर आपल्याही मनाला हे नक्कीच पटेल असे मला वाटते.

बापू प्रवचनांतून सांगतात की  माणूस स्वत:च्या संकटातून , अडी-अडचणींतून आधार म्हणून देवाला भजतो, त्याची पूजा , उपासना करतो आणि त्याचाच एक भाग हा उपवास आहे. मग कधी हा देव त्याचा मानवी देहधारी गुरु असेल वा भगवंताचे कोणतेही स्वरूप असेल जसे राम, कृष्ण , विठ्ठ्ल ,साई. उपवास करणे आणि देहाला कष्ट्विणे , अन्नत्याग करणे ह्याने कधीही देव प्रसन्न होत नाही. देवाला आवडतात ते माणसाने जीवनविकास करण्यासाठी केलेले प्रयास.    

बापू म्हणतात की आपण भाताचा अंकुर जमीन भेदून बाहेर आलेला बघतो, पण तोच अंकुर उलटा जमिनीत पेरुन बघा, पेरता येईल का? नाही येत. अंकुर अत्यंत नाजूक असतो. म्हणजेच कडक अशी जमीन भेदून बाहेर येण्यासाठी त्या अंकुराला किती मोठी energy लागत असेल? त्या लहानश्या कोंबात एवढी कडक जमीन भेदून वर येण्याची ताकद "तो"(देव)  निर्माण करत असतो व हीच ताकद तुम्हाला सदैव देतो जर तुम्ही उचित दिशेने उचित मार्गाने उचित प्रयास कराल. देवाचे अधिकाधिक नामस्मरण कराल. 

कल्पना करा तुम्ही एक बीज आहात व त्यातून अंकुर फुटून तुम्हांला वर यायचे आहे. त्या कडक बीजाला व जमिनीला छेदण्यासाठी ताकद लागेल ना. माझ्या जीवनातील अंधार छेदून, नशिबाचा खडक छेदून, प्रारब्धाचा कडा भेदून मला बाहेर यायचे आहे, त्यासाठी तेवढीच प्रचंड ताकद लागणार ना. जेवढी ताकद बीजाचा अंकुर बाहेर येण्यासाठी लागते तेवढीच ताकद तुमच्या मनाला प्रारब्धाच्या अंधारातून बाहेर यायला लागते व ही ताकद म्हणजेच प्रयासांची ताकद. 

बापूंनी एका प्रवचनातून सांगितले होते की आपण महाविष्णूला तुलसीपत्र अर्पण करतो. तुलसीपत्र म्हणजे नि:शंक भक्तीभाव. तुलसीपत्र हे राधेच्या आल्हादिनीच्या भक्तिभावाचं प्रतीक आहे. जे तोललं जात नाही. देवाने ह्याच्यावर जास्त कृपा केली, माझ्यावर कमी कृपा केली असं तोललं जात नाही. त्याचं प्रेम जसं आहे तसं स्वीकारायचं असतं. हा माझ्यावर जीवापाड प्रेम करतो ह्या एकमेव अनन्य भावाने, अनन्य विश्वासाने. 
"एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा " 

म्हणूनच की काय कलीयुगात असे म्हटले जाते की -
"YOU ARE JUDGED BY YOUR FAITH AND NOT BY YOUR PERFORMANCE ."

त्रिविक्रम हे सद्गुरुतत्त्वाचे प्रतिक आहे ते हरिहराचे एकत्रित स्वरूप आहे मग तो कोणासाठी साई असेल तर कोणासाठी विठ्ठल तर कोणासाठी राम वा कॄष्ण असेल, अशा ह्या हरिहराला आषाढी एकादशीच्या पावन दिवशी तुलसीपत्र म्हणजेच नि:शंक भक्तीभाव मला अर्पण करता आला पाहिजे.  


श्रीसाईसच्चरितात ह्याचे प्रत्यंतर आपणास येते ते ४ थ्या अध्यायातील ९५ वर्षे वयाच्या गौळीबुवांची उक्ती ऐकून , जे ८ महिने पंढरपूरास व चातुर्मासात गंगातटावर निवास करीत, ज्यांना विठ्ठलाची दृढ भक्ती होती, ज्यांची जिव्हा सतत "रामकृष्णहरी"चा गजर करीत असे- ते वर्षातून एकदा शिरडीला जात आणि साईनाथांना पाहून विनत होऊन म्हणत -
" हाचि तो मूर्त पंढरीनाथ । अनाथनाथ दयाळ । 
हाचि हो प्रत्यक्ष पंढरीराव । जग वेडें रे वेडें हा दृढ भाव । ठेवूनि देव लक्षावा ।।"
तर प्रात स्नानानंतर नियमानुसार आसनावर बसलेले असताना काका दीक्षित ह्यांना जेव्हा विठ्ठल दर्शन होते तेव्हा विठ्ठलाची मोठी खूण स्वत; साईनाथ सांगतात की
मोठा पळपुट्या बरें तो विठ्ठल । मेख मारूनि करीं त्या अढळ । 
दृष्टी चुकवूनि काढील पळ । होतां पळ एक दुर्लक्ष ।।
मला वाटते हे जाणणारे वारकरी म्हणूनच प्रतिवर्षी न चुकता ह्या त्यांच्या लाडक्या पळपुट्या विठ्ठलाच्या चरणांना मेख मारून अढळ करायलाच स्वत: पायी वारी करीत त्याच्या चरणांशी जातात..
जणू काही गात असतात ...
विटेवरी उभा कटेवरी हात काय मौजेचा पंढरीनाथ । पंढरीनाथ पंढरीनाथ मी अपराधी घ्या पदरात ।।
थोडक्यात काय तर " जया मनी जैसा भाव " कोणी त्या विठूला विठ्ठल-मूर्तीत , तर कोणी "त्या सदगुरुरूपात" भजतो , पण हाच तो "ठ्म" बीजाचा स्वामी जो आपल्याला भक्तीत दृढता देतो, भक्ती, विश्वास कसा दृढ करायचा ते शिकवतो....

म्हणूनच आषाढी एकादशीला अन्नत्याग करून उपास करण्यापेक्षा त्या विठ्ठ्लाचे नाव मुखाने घ्या, त्याच्या नामाच्या अवीट गोडीचा गोडवा चाखून तर बघा आणि त्याच्या नामाच्या जयघोषात तुमचीही पाऊले वारकर्‍यांप्रमाणे थिरकू देत आणि मग उपास न करूनही , पंढरीला वारी न करूनही "भावाचा भुकेला श्रीहरी " प्रसन्न नक्कीच होईल आणि अनुभवाल संत चोखा मेळ्याचे अभंगाचे बोल प्रत्यक्षात -
बोला विठ्ठ्ल विठ्ठ्ल गजरी अवघी दुमदुमली पंढरी होतो नामाचा गजर ताटी दिंड्या पताकांचा भार 

चला तर मग खर्‍या अर्थाने आषाढी एकादशी साजरी करू या त्या विठ्ठ्लाच्या गळी संत जनाबाईंनी सांगितलेली हरिनामाची वैजंयती माळ वाहू या, त्याच्या चरणी "वाहू तुझिया चरणी भाळ " असे म्हणत तुलसीपत्र वाहू या...आणि अविरत, अखंड नामचा उपवास स्वत:ला घडवू या....स्वत:ला "त्या" सावळ्या विठ्ठ्लाच्या प्रेमरसात चिंब भिजविण्यासाठी...

हरि ॐ. श्रीराम. अंबज्ञ. 

5 comments:

  1. Ambadnya Suneetaveera for such an informative post ..got to understand and learn plenty of things through your article. .

    ReplyDelete
  2. Ambadnya Harshsinh. Shreeram.

    ReplyDelete
  3. Khup Chan lihIle aahe.. Baryach gosti janun gheta aalya..
    ananya prem swarup asnara parmeshvar aaplya bhaktichach bhukela asto..
    upvas mhanjech parmeshvarachya javal Jane.. Bhagvantache namsmaram, tyachyavar niswartha prem karne.. Bhagvant ha aaplyala prem denyasathich basla aahe.. Tyache prem bharbharun vahat aahe.. Utuni chalila khajina..

    ReplyDelete
  4. विठु माउली तू अनिरुद्ध मधे दिसे..

    ReplyDelete
  5. अंबज्ञ सुनिताविरा आषाढी एकादशीची खुपच छान माहिती मिळाली अंबज्ञ

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog