Saturday 21 February 2015

कोsहं- मी कोण ?

आज माझ्या एका आप्त स्नेह्याच्या बाबतीत घडलेला प्रसंग कानी आला आणि मन विचारात पडले. त्याचे असे झाले की माझे हे आप्त संगीत क्षेत्रातील अत्यंत जाणकार आणि स्व मेहनतीने संगीतात कौशल्य संपादन करत असलेले व्यक्तीमत्त्व. एका आंतरराष्ट्रीय पातळीवरील पारितोषक वितरण समारंभाला हे गेले होते. तेथे मोठ-मोठ्या प्रथितयश व्यक्तींशी भेट-गाठ होत होती, नव्याने ओळख होत होती. नाट्य-संगीत क्षेत्रातील अनेक नामांकित कलावंताशी भेट घेताना ह्या माझ्या स्नेह्याने कोठेही स्वत:च्या कलेच्या अभिरुचीचा वा संगीत क्षेत्रातील प्राविण्य संपादलेल्या मान-सन्मानाचा आधार जराही घेतला नाही. उलट स्वत:ची ओळख आपल्या सदगुरुंच्या नावाने करून दिली...खरेच हृदय हेलावून गेले, सदगदीत झाले मी....किती हे भाबडे , निर्व्याज प्रेम आपल्या सदगुरुवर, कोठे ही स्वत:च्या यशाची, प्रसिध्दीची, मान-सन्मानाची जराही अपेक्षा न ठेवता फक्त सदगुरुंच्या नावातच आपली खरी ओळख असल्याचे भान ठेवणे...मी अवाक् झाले....त्या प्रसंगाने विचारांची शृंखलाच उद्धृत झाली माझ्याही नकळत...आपोआप --


         
बाळ जन्मता क्षणी रडू लागते , खरे तर वैद्यक शास्त्राच्या नुसार बाळ पहिल्यांदा श्वास घ्यायला शिकते आणि तेव्हा तो रडण्याचा आवाज म्हणजे श्वसन प्रक्रिया नीट सुरळीत चालू झाल्याची खूण असते. तेच जर बाळ रडले नाही तर खरे चिंतेची बाब असते, कारण असते की त्या बाळाचा श्वास नीट होत नाही. त्याच्या रडण्याचा नीट आवाज ऐकला तर जाणवते क्याव क्याव म्हणजेच...कोsहं

ह्यालाच अध्यात्मात म्हटले जाते की कोsहं- मी कोण ? ह्याचा शोध , जो जन्मत: सुरुच होतो.

प्रत्येक जीव हा शोध घेत असतो मी कोण आहे नक्की? म्हणजेच कोsहं ? आणि जीवात्म्याच्या ह्या प्रश्नाला मृत्यु समयी जाणीव होते आणि उत्तर ही मिळते सोsहं - तो "तू" म्हणजे मी राम आहे.
ह्यालाच अध्यात्मात म्हटले जाते की कोsहं- सोsहं - ह्याचा शोध. 
आपल्याला प्रत्येकाला आपण "त्या" परमेश्वराचे अंश आहोत ही जाणीव असतेच.

संत आपली ही खरी ओळख जाणतात आणि जपतात ही. ती कशी तर ? ते आपल्या परमात्म्याला, आपल्या भगवंताला एवढे आपले खरे आप्त मानतात की त्याचा दास म्हणवून घेण्यात जराही त्यांना लाज वाटत नाही. नाही तर कमीत कमी आपल्या सदगुरुलाच परमेश्वराचे स्वरूप मानून स्वत: आधी त्याचे नाव लावतात.

आता हेच बघा ना समर्थ रामदास स्वामी म्हणून आपल्याला परिचीत असलेल्या ह्या संताचे मूळ नाव पण खूप कमी प्रमाणात ऐकीवात असेल. नारायण सूर्याजीपंत ठोसर हे त्यांचे मूळ नाव. परंतु संपूर्ण आयुष्य रामाच्या आणि हनुमंताच्या भक्ती आणि सेवेत घालविण्याचे आजन्म व्रत घेऊन त्यांनी स्वत:ला त्या भगवंत प्रभू श्रीरामाचे दास म्हणून मिरवण्यातच धन्यता मानली आणि स्वत:च्या नावाचा ही चक्क विसर पाडला.

संत एकनाथ ह्यांनी जनार्दनपंत ह्यांना आपले सदगुरु म्हणून मनोमनी वरले होते. जनार्दन स्वामी हे आपले सदगुरु असल्याचा सार्थ अभिमान त्यांनी आयुष्यभर मिरविला.  ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात असे त्यांच्या अभंग असो वा काव्य रचनां मध्ये आढळते. जणू एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा झाली आहे.

संत जनाबाई ह्या संत नामदेवांना आपले गुरु मानीत आणि त्यांच्या अभंगातही "म्हणे नामयाची जनी" असाच उल्लेख येतो. 

संत चोखोबांची पत्नी सोयराबाई ह्यांनी सुध्दा आपल्या पतीला म्हणजेच चोखोबांना आपला सदगुरु मानले होते आणि त्यांच्या ही अभंगात त्या स्वत:चे नावही न घेता कायम" म्हणे चोखयाची महारी" असा उल्लेख करीत. संत चोखामेळा हे जातीने महार होते म्हणून सोयराबाई स्वत:ला चोखयाची महारी असे संबोधीत.

अद्वैत तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत सांगणारा सोयराबाईंचा "अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग" हा माझा अत्यंत आवडता अभंग आहे ज्यात त्या शेवटच्या पदात "पाहता पाहणे गेले दूरी म्हणे चोखयाची महारी असा उल्लेख करतात , जे खूप मनाला भिडते. "मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया " अहाहा काय ते देवाचे -विठू माउलीवरचे प्रेम की अरे माझ्या पंढरीच्या राया , अरे माझ्या देवा तुझ्या गोड रुपाला पाहता पाहता माणसाचे मी-तू पण विरून जाते....

आता आपण म्हणू की हे संत काय परमात्म्याच्या भक्तीत स्वत: देह भान विसरून गेले होते म्हणून त्यांना स्वत:च्या नावाची गरज वाटत नव्हती. सर्वसामान्य संसारी माणसाला असे स्वत:ची ओळख विसरून कसे चालेल ?

परंतु अशी अनेक उदाहरणे आपण अनुभवतो ना सर्वसामान्य माणसाच्या जीवनातही ज्यांच्या ह्याच स्वत:ची ओळख विसरण्याच्या भानात जगाने असामान्यत्त्व दिले आणि एक स्वत:ची वेगळी ओळखही दिलीच जी आजतागायत त्यांना अजरामर करून गेली.

इतिहासात आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचेही जीवन पाहतोच ना ... आयुष्यभर सदैव आपले आराध्य दैवत माता तुळजा-भवानी ही ची इच्छाच शिरोधार्य मानली - " ही तो श्रींची इच्छा "

आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याचा ध्यास उरी बाळगून स्वप्राणांची तमा न बाळगता आपले अवघे आय़ुष्य स्वातंत्याच्या रणवेदीवर ओवाळून टाकणारे सावरकर खचितच त्यांच्या विनायक दामोदर सावरकर ह्या नावाने परिचीत आहेत कारण स्वातंत्र्यवीर सावरकर हीच त्यांची खरी ओळख भारतीय जनमानसांत रुजली आहे.

मोहनदास करमचंद गांधी म्हटले तर एकवेळ समजणार नाही पण महात्मा गांधी म्हटले की मस्तक आपोआप आदराने झुकते. बाळ गंगाधर टिळक म्हटले तर कोडे पडेल पण लोकंमान्य टिळक म्हटले की पटकन लक्षात येते.

एवढेच काय "श्रीसाईसच्चरित" हा महान अपौरुषेय ग्रंथ लिहीणारे श्री गोविंद रघुनाथ दाभोळकर ह्यांच्या बाबतीत सुध्दा तोच किस्सा आढळतो. दाभोळकरांच्या सदगुरु साईनाथांच्या प्रथम भेटीतच साईनाथांनी उपरोधात्मक रित्या त्यांच्या वाद-विवाद करण्याच्या चुकीच्या प्रवृत्तीवर निरंजन म्हणून " काय म्हणतात हे हेमाडपंत" अशा वाग्बाणाचा प्रहार केला. परंतु पुढे आयुष्यभर दाभोळकरांनीही स्वत:ची ओळखच न ठेवता "हेमाडपंत" हीच कायमस्वरूपी ओळख धारण केली, अत्यंत प्रेमाने.

"श्रीसाईसच्चरित" ह्या संपूर्ण  ग्रंथात प्रत्येक अध्यायाच्या अंती "स्वस्ति श्रीसंतसज्जनप्रेरिते । भक्तहेमाडपंतविरचिते । श्रीसाईसमर्थ्सच्चरिते ।" असा उल्लेख येतो.

साक्षात परब्रम्ह साईनाथांनी स्वत:च्या आचरणातून उपदेशिलेले बोल -

आपण कोणाचें होऊनि रहावें। किंवा कोणास आपुलें करावें ।
याहूनि अन्य असणें न बरवें । तेणें न उतरवे परपार ।। १५५ ।।
                                                                                             - (अध्याय ५)
हेच आपल्या सदगुरु साईंचे बोल हेमाडपंतानीही स्वत:ला साईंचे करून सत्यात प्रत्यक्षात उतरविले ,स्वत:ची ओळखही जी मला माझ्या साईंनी दिली तीच धारण करून आणि तेही स्वत:च्या चुकीला प्रांजळपणे कबूल करून , कोठेही लपवाछपवी न करता !! ते सदैव आयुष्यभर "साईंचा दास" ह्याच भूमिकेत जगले , जी त्यांची अंतरीची आर्त होती -
मी तो केवळ पायांचा दास ।  न करा मजला उदास ।  
जोवरी ह्या देही श्वास ।  निजकार्यासी साधूनि घ्या ।।

असेच एकदा शिरडीला जाताना प्रवासात काही साई-भक्त मंडळी भेटली. मलाही साईबाबांची भक्ती करायला खूप आवडते. त्यामुळे त्यांचे गजर , भजने मी अत्यंत आवडीने कान टवकारून ऐकत होते. असाच एक गजर त्यांचा सुरु होता , जो मला खूपच भावला -
       दिक्षीत शामा हेमाड बायजाबाई नाना गणू मेघ:श्याम ।
       ह्यांची वाट पुसता पुसता मिळेल आम्हां साईराम ।।

गजर तर मला खूप आवडला आणि हृदयाला भिडला ही , परंतु एक कोडे मला पडले आणि जे स्वस्थही बसू देईना, मग न राहवून शेवटी विचारलेच की अहो साईंबाबांच्या बहुतेक श्रेष्ठ भक्तांची नावे आहेत ह्या गजरात , पण साईनाथांचा अत्यंत श्रेष्ठ भक्त म्हाळसापती ह्याचे नाव कसे काय नाही बरे ह्या गजरात?
तेव्हा मिळालेले उत्तर एकून तर मी खूप आनंदून गेले. त्या मेळाव्यातील एका वयोवृध्द ज्येष्ठ भक्ताने माझ्या शंकेचे निरसन केले की अगदी बरोबर प्रश्न केलात, पण म्हाळसापती म्हणजे तर साक्षात शिरडीची वाट , ज्या श्रेष्ठ भक्ताच्या पाऊलवाटेने , ज्याला न्याहाळून ही भक्त मंडळी त्यांच्या साईंरामाच्या चरणी पोहचू शकली ती वाट म्हणजेच म्हाळसापती !!! उत्तर ऐकून खरेच मी धन्य धन्य झाले. किती परम सत्य आहे ज्या म्हाळसापतींनी आजन्म साईंची आज्ञा ह्या पलीकडे कधीही कोणाकडून काहीच स्विकारले नाही त्या भक्तचूडामणीशिवाय तो गजर पूर्णच होऊ शकत नव्हता, पण ज्याला स्वत:च्या नावागावाची तमा नव्हती , ज्याला साईंच्या व्यतिरिक्त काही नकोच होते ,ज्याने आपले अस्तित्त्वच सर्वस्वी साईबाबांना केले तोच एकमेव सार्‍या भक्तांसाठी वाट बनू शकतो. अतीव आदराने मनोमन मी नतमस्तक झाले म्हाळसापतींच्या आणि माझ्या साईनाथांच्या !
                   धन्य ते म्हाळसापती आणि धन्य त्यांची साईभक्ती !!!             

मला तर खरेच वाटते की जगावे तर असेच - एकतर "त्या" परमेश्वराचे होऊन वा आपल्या सदगुरुंचे होऊन काया-वाचा-मनाने -  जी आहे माझी जन्मा-जन्मांतरीची खरीखुरी ओळख !!!

किती समर्पक आहेत बघा ह्या हिंदी चित्रपटातील गीताचे बोल -
तेरा मुझसे है पहले का नाता कोई यूंही नहीं दिल लुभाता कोई
जाने तू या जाने ना माने तू या माने ना.....

- सुनीता करंडे

3 comments:

  1. Beautiful post Suneetaveera ..it touches various points yet it always stays true to the original idea that you are trying to convey.. Also got to learn some new facts ( real names of various individuals ) with the help of your post..keep writing ...!!!

    ReplyDelete
  2. हरी ओम सुनीतावीरा,

    तुमच्या लेखावरून जाणवले कि संतांनी स्वत:ची ओळख आणि नावाची ओळख हि सद्गुरूंच्या अथवा आराध्य देवतेच्या नावाबरोबर जोडूनच दिलेली आहे; जसे आपण गावाचे (मुळाचे) किंवा घराण्याचे (कुळाचे) नाव लावतो. ह्या संतांचे अस्तित्वच मुळी सद्गुरूंच्या चरणाशी एकरूप झाले आहे. आद्य पिपादादा ही म्हणतात : "तुझ्या चरणाची धूळ, हेच आमचे गोत-कुळ".

    सामान्य माणसाला हल्लीच्या व्यवहारी जगात असे नाव जोडून ओळख करून देणे कदाचित जमणार नाही .... आपल्या अस्तित्वाला आणि जगण्याला खरा आधार हा सद्गुरुंचाच आहे पण 'आधार कार्ड' वर असणारी आपली ओळख हीच ग्राह्य धरली जाते. पण आपण खरे कोण? हा प्रश्न तुम्ही लिहिल्या प्रमाणे प्रत्येकाला पडतच असतो.....तो सद्गुरूंना भेटेपर्यंत.

    सद्गुरूच्या तत्वाशी, त्यांनी सांगितलेल्या मार्गाशी कोणीही स्वत;ला जोडून घेऊ शकतो.....तेवढे कर्म स्वातंत्र्य (कायद्याने सुद्धा ) प्रत्येकालाच आहे. आणि माझा अनुभव असा आहे कि एकदा आपण सद्गुरूंच्या मार्गावरून त्यांच्या तत्वाप्रमाणे चालत राहिलो........मनापासून सेवाकार्य करत राहिलो तर प्रश्न आपल्याला न पडता लोकांना पडतात.....कि हा कोण???

    भर पावसात आपली जागा न सोडता मनापासून सेवा करत असणारा DMV , पाहिला तर लोकांना प्रश्न पडतो.... कि हा कोण?
    किंवा समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती जो बापूंचा सेवक आहे आणि सेवा करताना स्वत;चे status विसरून जेव्हा तो कार्य करतो तेव्हा सुद्धा लोकांना हाच प्रश्ना पडतो.... कि हाच का तो? मग त्या लोकांना मिळायचे ते उत्तर बरोबर मिळते.

    बापूंनी प्रवचनात आणि मीटिंग मध्य सुद्धा बरेचदा सांगितले आहे कि TRUTH IS TO BE REVEALED & NOT TO BE TOLD . 'आम्ही आमच्या प्रेमळ सद्गुरू बापूंचे अनुयायी-भक्त आहोत' हि आपली खरी ओळख जगाला, आपण बापूंनी आखून दिलेल्या मार्गावरून चालता चालता सहज मिळू शकेल.

    हा सुंदर लेख लिहिल्याबद्दल आणी एक सुंदर विचार दिल्याबद्दल अम्बज्ञ.

    राजीवसिंह कदम.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog