Saturday 7 March 2015

माझा कुणा म्हणू मी?

नुकतीच होळी-पौर्णिमा अगदी जल्लोषात साजरी झाली . होळी म्हटली की मला पहिली आठवते ती बाळ प्रल्हाद आणि होलिका राक्षसीची गोष्ट. जन्मदात्या निष्ठुर पित्याच्या राक्षसराज हिरण्यकश्यपूच्या आदेशावरून त्याची बहीण होलिका राक्षसी प्रल्हादाला जिवंत अग्नीत जाळायला निघते. तिला आगीपासून अभय असते. पण प्रल्हादाच्या भक्तीच्या हाकेला त्याने ज्याला एकमेव आपला मानला, माझा मानला  "तो" त्याचा लाडका महाविष्णू धाव न घेईल तरच नवल ....आणि मग विपरीत घडते, आगीपासून अभय वरदान असूनही होलिका आगीत भस्म होते आणि भक्त प्रल्हाद मात्र सुखरूप वाचतो.






अशा प्रल्हादाच्या भक्तीच्या , त्या बालरुपाच्या आठवणीत रमून सकाळी चालायला जाऊन घरी परतत होते आणि अचानक लक्ष वेधले ....     



लहानगी मृदुला एकटीच बाल्कनीत उभी राहून ऑफीसला निघून गेलेल्या आई-बाबांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पहात उभी होती, भोकाड पसरून रडूनही झाले होते , तिला सांभाळणार्‍या मावशीबाईंनी प्रेमाने समजूत काढली बराच वेळ आणि हातात तिच्या आवडीचा टेडीबेअर आणि खाऊ सोपावून त्या आत राहिलेली कामे उरकायला निघून गेल्या होत्या... ह्या चिमुकल्या जीवाला प्रश्न पडला होता आई आणि बाबा दोघे रोज मला सोडून का निघून जातात, माझे कोण आहे? मी एकटीच कशी राहू? मी कोणा बरोबर खेळू , मी कोणाशी मस्ती करू , माझे कुणीच नाही आता ? मी कोणाला माझे म्हणू? हा झाला निरागस लहान मुलाचा बाल-सुलभ प्रश्न ....
    
आता हे बघा हे गृहस्थ कपाळाला हात मारून नशीबाला दोष देत बसले आहेत - एकुलत्या एक मुलाला संसाराच्या खर्चाची  जेमेतेम हातमिळवणी करीत उच्च शिक्षण दिले , पुढे त्याची आवड पुरवायला आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी कर्ज कादून विलायतेला पाठविले, तेथे तो मुलगा स्थायिकही झाला आणि आता राहत्या घराचे कर्जाचे हफ्ते फेडता न आल्याने घर सोडायची पाळी आली आहे , आता राहायचे कोठे ?जायचे कोठे ह्या उतार वयात?  हा यक्ष प्रश्न समोर आ वासून उभा ठाकला आहे. खरेच आपले कोणी नसते का ह्या जगात? माझे माझे म्हणून ज्याच्या साठी एवढ्या आयुष्यभर खस्ता खाल्या तो माझा लाडका मुलगा आज माझ्याकडे ढुंकूनही पहायला तयार नाही.

आणि ही बघा विपरीत कहाणी - आजोबांना वयाच्या ७२ व्या वर्षी रस्त्यावर अपघातात पाय मोडून जबरदस्त दुखापत झाली , आजींचे तर दोन वर्षांपूर्वीच निधन झाले होते, मुलगा आणि सून सकाळीच आप-आपल्या ऑफीसला निघून गेले होते आणि आज तर अचानक स्वंयपाकवाल्या बाईंचा फोन आला की त्या काही कारणास्तव स्वंयपाक करायला येऊ शकत नाही .. आता झाली का पंचाईत ... अंथरूणावरून धडपणे तोल सांभाळून उठायलाही जमत नव्हते तर जेवण कोण बनवणार? आजींच्या आठवणीने आजोबांचा कंठ दाटून आला , मुलाची व सूनेची ऑफीसच्या जबाबदारीपायी  होत असणारी कुंचबणा त्यांना ठाऊक ही होती आणि मान्य ही होती, तरी अशा प्रसंगी उमाळा दाटायचा हमखास- माझा कुणा म्हणू मी?
कसा एकाकी आयुष्य जगतोय , का रे देवा मला असा खितपत पाडले आहेस , बोलाव रे बाबा एकदाच
तुझ्याकडे , घेऊन चल मला, संपव एकदाचे सारे !!!

               किती हे अगतिकतेचे, निराशेचे सूर माणसाचे अवघे जीवन व्यापून टाकतात. जीवनभर जी नाती माझी माझी म्हणून जपली, कुरवाळली  ती खरेच माझी असतात का? माझे ह्या जगात नक्की कोण आहे हक्काचे , जे माझी कधीच साथ सोडणार नाही, माझ्या सुखाने जे सुखावेल, माझ्या दु:खाने जे दु:खी तर होईलच पण मला खंबीर आधारही देईल, माझ्या चुका मला न घाबरता दाखवेल आणि माझ्या हुषारीचीही मनमोकळी दिलखुलास दादही देईल, कौतुकाची थाप माझ्या पाठी देईल, कधीच माझ्याशी तुलना करून माझा मत्सर करणार नाही, माझ्याशी भांडणार नाही , माझ्यावर रागावणार नाही, उलट मी रागावलो तर माझी समजूत काढेल, माझा रुसवा-फुगवा सांभाळेल -फक्त माझा आणि माझाच असेल हक्काचा , आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला कधीच एकटे सोडून जाणार नाही, सतत माझ्या अवती भवती असेन आणि माझी खूप खूप काळजी घेईल, जीव लावेल, माया करेल, आपुलकी देईल... छे असे कोणी असूच शकत नाही ह्या जगात ? उगाच काय दिवास्वप्न दाखवताय का कवी कल्पना करत आहेत. असेच वाटते ना?

साहजिकच आहे म्हणा, आजकालच्या ह्या कलीयुगाच्या चरम सीमेच्या काळात जेथे सारी माणूसकीच लयाला गेली आहे, सर्वत्र फक्त स्वार्थीपणा बोकाळत आहे, तेथे असे वाटणे काही वावगे नक्कीच नाही. पण आजही असे कुणीतरी आहे ,असते जे ह्या सर्व माझ्या प्रश्नांना मला हवे तसे सकारात्मक उत्तर देऊ शकते.

एक गोष्ट वाचली की एकदा भगवंत एका माणसाला प्रसन्न होतो आणि काय हवे ते माग म्हणून वर देतो. तेव्हा हा माणूस म्हणतो की देवा तू माझ्या सोबत असतोस सदैव असे म्हणतोस ना,मग मला पटवून दाखव. त्याकरीता तू मला माझ्या जीवनाचा प्रवास दाखव. भगवंत म्हणतो अरे माझ्या बालका मी तर असतोच सदैव तुझ्या बरोबर. तुला नक्की दाखवतो बघ. भगवंत त्या माणसाला दुसर्‍या दिवशी समुद्रकिनार्‍यावर बोलावतो व किनार्‍या वरच्या वाळूत त्याचा आतापर्य़ंतच्या जीवनाचा प्रवास दाखवतो. त्याच्या खूपशा काळात त्याला त्या वाळूत चार पावले उमटलेली दिसतात आणि त्याच्या दु:खाच्या काळात फक्त दोनच पावले दिसतात. माणूस म्हणतो बघ देवा तू पण माझी साथ सोडली होतीस संकटात. देव म्हणतो नाही रे बाळा , मी तर होतोच, तेव्हा पण ? माणूस म्हणतो ते कसे काय ? वाळूत तर फक्त दोनच पावले दिसतात. ती माझीच असणार ना? देव हसतो आणि म्हणतो बाळा नीट बघ , ती दोन मोठी पावले तुला दिसतात ना, ती माझी आहेत , संकटात तुला मी उचलून माझ्या खांद्यावर घेतले होते आणि म्हणूनच तुला फक्त दोनच पावले दिसतात.
आता माणसाला कळते की माझा भगवंत , माझा देव माझ्या सोबत सदैव असतोच असतो.

खोटे वाटते ना ? अशक्य वाटते ना, हे  काय ही तर गोष्ट आहे , खरोखरीच्या जीवनात असे थोडेच घडते.
अहो खरेच घडू शकते नाही , घडतेच. "हातच्या काकणाला आरसा कशाला?"

चला तर मग आपण बाळ प्रल्हादाची गोष्ट पाहू या. हिरण्यकश्यपू राक्षस आणि महाविष्णू भक्त कयाधूचा हा पुत्र प्रल्हाद. कयाधूच्या भक्तीभावाने जन्मत:च भक्तीचे बाळकडू पिऊन वाढणारा प्रल्हाद , लहानपणापासूनच महाविष्णूची अपार भक्ती करीत होता. अर्थात त्याच्या पित्याला हिरण्यकश्यपूला हे मुळीच आवडत नसे. त्याने प्रल्हादाला देवाचे नाव घ्यायचे नाही म्हणून बरेच वेळा गोडी गुलाबीने सांगून पाहिले, धाकदपटशाही केला , पण प्रल्हादावर त्याचा काही ढिम्म परीणाम झाला नाही. त्याचे आपले देवाचे नाव घेणे सतत चालूच असे. अत्यंत क्रोधापायी अगदी पिता असूनही हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा अतोनात छळ केला, त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवायला लावले, उकळत्या आगीच्या तेलाच्या कढईत फेकले , उंच पर्वतावरून त्याचा कडेलोटही केला तरी प्रल्हाद त्याच्या भक्तीच्या आणि देवावरील अतूट विश्वासापोटी सुखरूप जिवंतच राहिला ना? अगदी वेळप्रंसंगी कयाधू जमेल तितका विरोध स्वपतीला म्हणजेच प्रल्हादाच्या वडीलांना करत असे. पण सारे प्रयत्न विफल होत. म्हणजेच आईचीही साथ नव्हती , अख्खे राक्षस साम्राज्य , स्वत: जन्मदाता बाप विरोधात उभा ठाकलेला, जीवावर उठलेला तरीही प्रल्हादाच्या केसालाही धक्का बसू दिला नाही कोणी व कसे तर ? प्रल्हादाची साथ त्याच्या देवाने कधीच सोडली नाही म्हणून!!

प्रल्हादाने त्याच्या वागण्याने अख्या जगाला दाखवून दिले की केवळ आणि केवळ "तो" अनंत करूणामयी, प्रेमळ , अत्यंत दयाळू , कनवाळू भगवंतच म्हणजेच एकमेव देवच माझा पाठीराखा, माझा सच्चा , कधीही दगा न देणारा एकमेव साथी असतो. माझा कुणा म्हणू मी?

बाळ प्रल्हादाने किती चुटकी सरशी हा अवघड प्रश्न सोडवला होता नाही का बरे? प्रल्हादाने  "त्या" एकालाच - "त्या" भगवंतालाच आपले मानले- माझे मानले 

               हेच तर त्या अवघड भासणार्‍या प्रश्नाचे उत्तर - माझा कुणा म्हणू मी?
उत्तर आहे अगदी सोपे एकमेव भगवंत - माझा आहे. "तो" एकमेव - फक्त आणि फक्त तो असीम करूणा मयी, लाभेवीण प्रेम करणारा, अचिंत्य दानी भगवंतच , माझा सदगुरुच फक्त माझा असतो.

तो फक्त माझाच आणि मी फक्त त्याचाच !!! मी त्याचा असतो म्हणूनच तो माझाच असतो.

वाल्याकोळ्याच्या जीवनात आयुष्यभर त्याने माझी बायको, माझी मुले, माझे आई-वडील म्हणून ज्यांच्या पोटापाण्याकरीता एवढे खून , बलात्कार केले , एवढ्या चोर्‍या केल्या , दरोडे घातले, पण शेवटी पापाचे वाटेकरी व्हायला कोणीच तयार होईना. एकमेव त्याचा भगवंत , त्याचा रामच त्याच्या हाकेला धावून आला आणि तेही कसे नावही जिभेला नीट उच्चारता येत नव्हते. "मरा मरा" असे उलटे नाव घेऊनही ज्याने त्याला मरणाच्या दारात ढकलले नाही तर त्याचा वाल्मिकी म्हणून उध्दारच केला आणि अखिल मानवजातीला "रामाय़ण" हे चिरंतन वरदान देऊन त्याचे नावही अजरामर केले.
वाल्यालाही जीवनाच्या अर्ध्या वाटेवर हे उमगले तरीहे भगवंताने त्याला ही कधीच टाकले नाही
कारण "तो" एकटाच ग्वाही देतो " मी तुला कधीच टाकणार नाही."

मला माझा नवरा आहे, बायको आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे ,संसार आहे, आहेच ना? नाही कोण म्हणते? ते सगळे माझे आहेतच पण ते सगळे देणारा "तो" भगवंत आधी माझा आहे हे मला कधीही विसरून चालणार नाही. ह्या सगळ्या नात्यांच्या पलीकडे माझा सगळ्यात जवळचा माझा आणि फक्त माझा , माझा स्वत:चा असा कोण आहे? तर तो फक्त एकच ! माझा एकमेव नाथ! 
"सबका मालिक एक !  तो माझा एकच ! माझ्या सर्वस्वाचा तो एकमेव मालिक आहे, मालक आहे आणि त्याला मालिक म्हणायला शिकवता आहेत कोण तर साईबाबा - साईनाथ - साक्षात ईश्वर !!!

संत तुलसीदासजी ही हेच शिकवतात की हृदयात ठेवणे म्हणजे काय? फक्त माझा तो एकच असणे म्हणजे काय? हृदयात फक्त एकालाच ठेवता येऊ शकते ना? येथे तुलसीदासांना अभिप्रेरीत असलेले हृदय म्हणजे heart नव्हे तर ते असते अंत:करणातली प्रेमाचे जागा.
संत तुलसीदासजी अत्यंत प्रेमाने वर्णन करून गातात -
" प्रेम गली अती सांकरी , तेमा दुजा न समाए, तू रहे तो मैं नहीं "
म्हणजेच काय तर प्रेम गली अती सांकरी म्हणजे खर्‍याखुया प्रेमाची, भक्तीची गली जी आहे ती एवढी अरूंद (narrow) आहे की " तेमा दुजा न समाए म्हणजे दुसर्‍यांना अस्तित्त्वच राहू शकत नाही. एकच राहू शकतो फक्त. तू आहेस तर मी नाही , मी आहे तर तू नाही. म्हनून "त्या" एकालाच आयुष्यभर सांगत राहू देवा तू माझा , देवा तू फक्त माझाच आहेस. मग आपोआप माझी सगळी नाती अर्थपूर्ण होतील आपोआपच!  

संत एकनाथांनी म्हनूनच स्व:तचे नावच "एकनाथ" असे धारण केले की ज्याचा नाथ एकच आहे." तो एकमेव माझा "

श्रीसाईसच्चरितात हेमाडपंत ह्या नात्यांच्या बाबत एक खूप समर्पक मार्मिक उदाहरण देतात व जी नाती मी जीवनात माझी माझी म्हणून घट्ट उरी कवटाळतो त्याची क्षणभंगुरता सहज सांगून जातात -

मेघमंडळीं विद्द्युल्लेखा । संसार हा चंचल तिजसारिखा । 
एथें कालाहिग्रस्त लोकां । सुखाची घटिका दुमिळ ॥ २१ ॥
माता पिता भगिनी भ्राता । दारा पुत्र सुता चुलता । 

नदीप्रवाही काष्ठें वाहतां । एकत्र मिळतात तैसे हे ॥ २२ ॥
दिसलीं क्षण एक एकवट । लाटेसरशी फाटाफूट ।

होऊनि पडे जैं ताटातूट । जुळेना घाट तो पुनश्र्च ॥ २३ ॥  
                                                                             - (श्रीसाईसच्चरित- अध्याय १४ )   


बरे ह्या गोष्टीची माणसालाही जाणीव नसते म्हणावे तर तेही पटत नाही कारण आम्ही माणसे अगदी प्रेमाने गातोच ना -
त्वमेव माता । पिता त्वमेव । त्वमेव बंधू । सखा त्वमेव ॥
म्हणजेच माझे सर्व काही तू आहेस देवा, भगवंता. पण आपण फक्त मोठ्या आवाजात गातो पण वास्त्वात त्याची जाणीवही ठेवत नाही. अन्यथा माझा कुणा म्हणू मी ? हा प्रश्न मला कधीच भेडसावणार नाही.                                                            

काय पटतय ना ?

साखरेची गोडी जशी दुसर्‍याने साखर खाऊन मला कळणार नाही, दुसर्‍याने जेवून जसे माझे पोट भरणार नाही , माझी भूक भागणार नाही , दुसर्‍याने पाणी पिऊन जशी माझी तहान भागणार नाही तसे संतानी सांगितलेले स्वानुभवाचे बोल चाखून पाहिल्याशिवाय मलाही त्याची मधुरता कशी कळणार?

चला तर मग येताय ना , अवीट अभेद्य अशा ह्या अपरिचीत नात्याची मधुर चव चाखायला ? माझा कुणा म्हणू मी हा प्रश्न कधीच सतावणार नाही, छळणार तर मुळीच नाही ह्या पुढे कधीही उभ्या आयुष्यात, अगदी १०८%, निर्विवाद सत्य !!!!        
                                                                                                  - सुनीता करंडे                                  
               


9 comments:

  1. rightly said. One and only one LORD BAPU.
    AMBADNYA.

    ReplyDelete
  2. Very deep and thought provoking post...loved the small story that you shared about the interaction between God and the Man ...
    I bet after reading your post most of us would have got the answer to the question that has troubled us always ...!! Ambadnya Suneetaveera ..

    ReplyDelete
  3. So true Suneetaveera, he is the only dear and he is the only Savior.
    खोटी सारी नाती, ना प्रेम ना ओलावा
    नाते तुझे माझे अभंग रे......

    ReplyDelete
  4. Suneetaveera Hats of to u and your fabulous writing skill.
    Amazing post....
    by your post u remind me my childhood, when i used to listen "Bhakt Pralhad Story ".
    n that time we listened as a story only but nw realize the true meaning of that...
    Thanks for sharing such beautiful post...

    ReplyDelete
  5. Suneetaveera jabardast udaharan deun bhakticha mahima varnilat tumhi..

    Mi tu pan gele vaya pahta pandharichya raya. - Kishori aamonkaranI gaylela abhanga aathavla

    Tukaramanchya abhangatli last ovi -
    Tuka mhane kahi n mage aanik
    tujhe payi sukh sarva aahe

    khupach Chan lihila Suneetaveera
    khup Chan vatatay vachun.. Na magtach to bharbharin denara..
    Shreeram
    ambadnya

    ReplyDelete
  6. Khup chan.. Apratim.. Ambadnya..

    ReplyDelete
  7. Aplyavar jevha kharach vel yete tevha fakt to bapuch dhaun yeto agdi hak na martahi... hech tyach akaran karunya ani prem..Apan apli bhakti kashi keli pahije ani fakt tyachyavarach purn vishwas thevla pahije he tumhi agdi sopa karun lihila.... Ambdnya

    ReplyDelete
  8. ambadnya Suneetaveera for the lovely post on Pralhad and God's Unconditional Love.

    i must say your every post is in proper format as well as in easy language.. thats helps us to understand.

    i have noted down some points for the next panchasheel exam..

    ambadnyaaa..

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog