Saturday 5 September 2015

शिक्षक दिन - ०५ सप्टेंबर - राष्ट्रउभारणीचा पाया रचणार्‍या पाईक शिक्षकांना मानाचा मुजरा !!!

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर: ।
गुरुरेव परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नम: ।।
गुरुची महती गाणारा हा श्लोक  सार्‍या आबालवृध्दांना ठाऊक असतोच.  

मानवाच्या जीवनात त्याचा प्रथम गुरु ही त्याची जन्मदात्री माताच असते, जी त्याला अगदी जन्मापासून बोलायचे, चालायचे , धावायचे कसे ह्याचे प्राथमिक धडे शिकविते. पाटीवर हाताला धरून धुळाक्षरे गिरवायला शिकविते. ओल्या मातीच्या गोळ्याला जसे कुंभार चाकावर फिरवून सुंदर , सुबक आकार देतो, तसेच बाळाच्या जीवनाला आकार देण्याचे , घडवण्याचे महत्त्वपूर्ण काम मुलाची आई/माता करते. त्यानंतर पिता ही गुरुची भूमिका पावलोपावली निभावतच राहतो. परंतु व्यावहारीक जगाचे शिक्षण घेण्यासाठी लहान मुलाला शाळेची पायरी चढावी लागते आणि तेथून पुढे त्याच्या बाल जगात त्याचे शिक्षक , त्याचे गुरुवर्य अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची भूमिका पार पाडतात. म्हणूनच आपल्या भारतभूमीत वैदिक संस्कृतीने गुरुला वा आजच्या कालानुसार शिक्षकाला मानवाच्या जीवनात अत्यंत मानाचे , आदराचे असे अत्युच्च स्थान दिले आहे. आज जगात जी डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनीयर, शास्त्रज्ञ, विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी अशी अनेकविध क्षेत्रातील नामवंत , कीर्तीवंत मान्यवर मंडळी आहेत , ती त्यांच्या यशाचे मानकरी बहुतांशाने त्यांच्या शालेय वा महाविद्यालयीन जीवनातील मार्गदर्शक शिक्षक/गुरुवर्य असल्याचे कौतुकाने आणि अभिमानाने सांगताना आढळतात.  
   
आपल्या भारतवर्षात फार प्राचीन काळापासून गुरूंची थोर परंपरा आहे. साक्षात भगवान शिव पार्वती मातेला गुरुगीतेमधील एका श्लोकात गुरुंचे अनन्यसाधारण महत्त्व समजावून सांगताना म्हणतात - 
                      न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोर्धिकं तप: ।
                   तत्त्वं ज्ञानात्परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नम: ।
                     ध्यानमूलं गुरोर्मूर्ति: पूजामूलं गुरो: पदम् ।। ७४ ।।
                   मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरो: कृपा ।। ७६ ।। 
                             ॐ दत्तगुरवे नम: ।।
सद्गुरु वा गुरुतत्त्वापेक्षा अधिक श्रेष्ठ असे कोणतेही अन्य तत्त्व नाही, गुरुसेवेपेक्षा अधिक श्रेष्ठ असे कोणतेही अन्य तप नाही. ह्या ज्ञानाहून श्रेष्ठ असे कोणतेही तत्त्व नाही. (ह्याचा अर्थ गुरुतत्व/सदगुरुतत्त्वच सर्वोच्च , परम श्रेष्ठ तत्त्व आहे, हेच सत्य आहे.) अशा श्रीसदगुरुंना नमस्कार असो. 
सदगुरुमूर्ति हेच ध्यानाचे मूळ आहे. सद्गुरुंचे चरण हेच सर्व पूजांचे मूळ आहे . सदगुरुंचे वाक्य हेच सर्व मंत्रांचे मूळ आहे व मोक्षाचे मूळ आहे, सदगुरुकृपा. 
पुढे एका श्लोकात शिव पार्वतीस म्हणतात ," हे देवी , गुरुभाव हेच सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. गुरुदत्तांचा चरणांगुष्ठ ( पायाचा आंगठा ) सर्व तीर्थांचे आश्रय स्थान आहे ब्रम्हाविष्णुमहेश्वरांना नमस्कार असो." 
                      गुरुभाव: परं तीर्थं अन्यतीर्थं निरर्थकम् ।
                      सर्व तीर्थाश्रयं देवि पादाङ्गुष्ठे च् वर्तते ।।
                          ॐ ब्रम्हाविष्णुमहेश्वरेभ्य: नम: ।। 

संत कबीर सुध्दा आपल्या एका दोह्यात गुरुंच्या ह्या महती गाताना अप्रतिम उदाहरण देतात -  
गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागुं पांय ।
बलिहारी गुरु आपने , गोविंद दियो बताय ।।
म्हणजे माझे गुरु आणि माझा परमेश्वर (गोविंद) एकाच वेळी माझ्या समोर उभे असतील तर माझ्या मनाला मी आधी कोणाच्या पाया पडू हा प्रश्नच पडता कामा नये , मला माझ्या गुरुंच्याच चरणांवर लोटांगण घालायला हवे आधी ज्यांनी मला माझा गोविंद , माझा देव , माझा परमेश्वर मला दाखविला. 

तर अशा ह्या आदरणीय गुरुंच्या ऋणांचे स्मरण करण्याचा, आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा पायंडा आपल्या भारतवर्षात सुरु केला ते महान व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन !




डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचा प्रथम नागरीक म्हणून गौरवल्या जाणार्‍या सन्मानीय राष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळलेले एक शिक्षक. ज्येष्ठ विचारवंत. तत्त्वज्ञ व गाढे अभ्यासक असलेले डॉ. राधाकृष्णन यांनी तत्त्वज्ञान आणि धर्म या विषयावर लिहिलेली ४० हून अधिक पुस्तके त्यांच्या प्रतिभेचे, परखड विचारांचे व प्रखर विद्वत्तेचे दर्शन घडवितात. आधुनिक विचारवंतांमधला, पूर्व व पश्चिमेला जोडणारा दुवा असा त्यांचा आदराने आवर्जून उल्लेख केला जातो. 1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते. 

त्यानंतर डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल. 

अशा ह्या डॉ. राधाकृष्णन्‌ यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी मद्रासजवळील तिरुराणी येथे झाला होता. ब्राम्हण कुळात जन्मलेले डॉ. राधाकृष्णन्‌ धार्मिक संस्काराच्या वातावरणातच लहानाचे मोठे झाले. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली. 'तत्त्वज्ञान' हा त्यांचा आवडता विषय असल्याने त्यांनी या विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी मद्रासच्या एका महाविद्यालयात नोकरी केली. नोकरी करत असतानाही त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी 'वेदांतातील नीतिशास्त्र' या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांच्या प्रबंधास विद्यापीठाने सर्वोत्तम प्रबंध म्हणून जाहीर करून त्यांचा गौरव केला. एक उत्कृष्ट प्राध्यापक म्हणून त्यांनी आपल्या कार्यातून स्वत:ची सार्‍या जगाला ओळख करून दिली. कुशल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवर असलेल्या त्यांच्या प्रभुत्वामुळे थेट परदेशा‍त त्यांची प्रशंसा झाली. ऑक्सफर्ड विद्यापीठातही ते 'नीतिशास्त्र' या विषयाचे प्राध्यापक होते. 

'शिक्षक' हा आपल्या मातृभूमीसाठी भावी युवा पिढीचा शिल्पकार बनून, मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतो. आपल्या निरपेक्ष , निरालस वृत्तीने शिक्षक आपल्या ज्ञानाचे बोधामृत विद्यार्थ्यांना पाजून जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी प्रदान करतो. शिक्षकांना वैदिक काळापासूनच गुरूचे स्थान आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमूल्यन होत असल्याचे चित्र समाजात दिसू लागले आहे. तसेच गुरू-शिष्य संबंधांमधील पवित्र  नाते, गुरु प्रतीचा आदरभाव लोप पावत चालला आहे. या संबंधामधील पावित्र्य कायम ठेवण्‍यासाठी व डॉ. राधाकृष्णन् यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी  आपण शिक्षक दिन साजरा केला पाहिजे असे मला वाटते. 

शाळेमध्ये पाऊल टाकल्यावर किमान दहावीपर्यंत वा बारावीपर्यंत म्हणजे वयाची १०-१२ वर्षे आपण शिक्षकांच्या सान्निध्यात असतो. त्यामुळे आपल्या आई-वडीलांनंतर शिक्षक हेच जणू काही आपले अप्रत्यक्षरित्या पालकच असतात. त्यामुळेच शिक्षक लहान मुलांच्या मनाच्या कोर्‍या पाटीवर योग्य संस्कार करून त्यातून उज्ज्वल भविष्याची पेरणी करून देशासाठी सुजाण आणि जबाबदार नागरिक घडवित असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ह्याच महत्त्वाच्या भूमिकेमुळे शिक्षक हा समाजात खूप मोठे परिवर्तन करू शकतो. 

शिक्षक हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवित नाहीत तर आपल्या विद्यार्थ्याना जीवन विकास करण्याची कला आत्मसात करायलाही प्रेरीत करत असतो. आपल्या भारतवर्षात धौम्य नावाच्या ऋषींनी त्याकाळच्या प्रथेनुसार गुरुकुलात शिक्षण घेण्यास मनाई असलेल्या एका होतकरू, शिक्षण घेण्यास उत्सुक आरूणी नावाच्या विद्यार्थ्याला आपल्या गुरुकुलात प्रवेश दिला. त्याची गुरुपदीची निष्ठा आणि कौशल्य पाहून धौम्य ऋषींनी त्यांच्या ह्या शिष्याला "केदारबंध" नावाची विद्या शिकवून ह्याच शास्त्रात प्रगत केले होते, ज्यात मातीचे बंधारे बांधून जमिनीची मशागत केली जात असे. पुढे हाच आरूणी "उद्दालक आरूणी ऋषी " ह्या नावाने प्रसिध्द झाला व जो केदारबंध विद्येचा संपूर्ण देशभरात प्रचार व प्रसार करता झाला अशी कथा वाचली होती. 

त्रेतायुगात अत्रि ऋषींनी पृथ्वीच्या पाठीवर ठिकठिकाणी शुभ विद्यांचे अध्ययन करणारी गुरुकुले स्थापन केली होती. ’ कुल ’ शब्दाचे अनेक अर्थ आहेत; परंतु त्यांतील विशेष अर्थ  - ’ कु ’ म्हणजे वाईट आणि अपवित्र व त्या अशा कुठल्याही "कु" तत्त्वाचा लय करणारे ते कुल - असा आहे. , जेव्हा सर्व भावशारीरि गुणांमध्ये श्रेष्ठतम , पवित्रतम आणि सक्षम अस्णार्‍या "गुरु" गुणाच्या सहाय्याने अशा "कु" चा ’लय’ होतो, तेव्हा त्या रचनेस ’गुरुकुल’ असे म्हणतात. 

प्राचीन काळी मुले गुरुकुलात विद्या ग्रहण करायला जात आणि १२ वर्षांनंतर आपल्या स्वगृही परतत असत. साक्षात श्रीराम प्रभूंनी वसिष्ठ ऋषींच्या आश्रमात आणि भगवान श्रीकृष्णाने देखील सांदिपनी ऋषींच्या आश्रमात १२ वर्षे राहून विद्या ग्रहण केली होती असे आपल्याला वाचनात आढ्ळते. गुरुंनी किंवा शिक्षकांनी कोणत्याही परतफेडीची  अपेक्षा न करता आपल्या जवळचे ज्ञान इतरांना द्यावे ही अपेक्षा समाजाची गुरुकडून असते. जे जे आपणासि ठावे |  ते  ते दुसर्‍यांस सांगावे |  शहाणे करून सोडावे सकलजन | अशी वृत्ती गुरुची / शिक्षकाची हवी अशी जनमानसात सर्वसाधारण धारणा आहे. शिक्षक आपल्या व्यक्तीमत्त्वावर संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती असे पैलू पाडून जणू दगडातील अनावश्यक भाग काढून सुंदर सुबक शिल्पच साकार करतात. म्हणूनच राष्ट्रउभारणीच्या कार्यात पाया रचणार्‍या पाईक शिक्षकाचा मोठा हातभार लागतो.

जुलमी  राजसत्तेला उलथवून टाकणारे आर्य चाणक्य असो वा देशप्रेमाने भारलेले व देशस्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक असो वा रंजल्या गांजल्या समाजाची उन्नती करण्यासाठी झटणारे तुकाराम , ज्ञानेश्वर, एकनाथ,रामदासादि संत असो वा समाजात निरपराध जीवांचे बळी घेण्याच्या अनिष्ट प्रथेविरुध्द लढा देणारे व गावोगावी पायी फिरून स्वच्छतेचे महत्त्व ठसविणारे गाडगेबाबा, तुकडोजी महाराज असो वा समाजाने उपेक्षित केलेल्या, बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन करणारे डॉक्टर बाबासाहेब आमटे आणि त्यांचे पुत्र डॉक्टर प्रकाश आमटे असो हे सारे आपापल्या पातळीवरून शिक्षणच देत होते असे वाटते. म्हणजेच शिक्षक हा फक्त शाळेच्या चार बंदिस्त भिंतीतच सामावलेला असतो असे मुळीच नाही. 

डॉ. राधाकृष्णन यांनी एके ठिकाणी असे उद्गार काढले होते - "ज्या देशात निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते तेंव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानाला पात्र होतात." आणि म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी शिक्षकांचा सन्मान केला जातो. विद्यार्थ्यांनी‍ देखिल आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. आपल्या शिक्षकांविषयी/ गुरुवर्यांविषयी शिक्षक दिनी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे अंशत: ऋण फेडण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे शिक्षकांचा , गुरुजनांचा केलेला आदर, गौरव आणि सन्मान हीच राधाकृष्णन यांना खर्‍या अर्थाने वाहिलेली आदरांजली ठरेल, नाही काय?

संदर्भ: 
१. मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्र्वर्यवेद: 

No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog