Wednesday 10 February 2016

माघी गणेशोत्सव - श्रीगणेश जंयती - ब्रम्हणस्पती व अष्टविनायक पूजनाची पर्वणी !

गणेशोत्सव म्हटले की पटकन आठवतो तो भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव. ह्या भाद्रपद गणेशोत्सवाबरोबर आपल्या भारतवर्षात माघी गणेशोत्सव सुध्दा साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव साजरा करण्यामागची भूमिका बहुधा आम्हाला माहितच असते की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक ह्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या महान रणझुंझार,लढवय्या, खंबीर नेतृत्वाने सन १९८३ मध्ये घराघरात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची मुहुर्तमेढ रोवून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जनजागृती करून भारतीय देशवासियांना सुसंघटीत करण्याचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर आजपावेतो हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. 

आता माघी गणेशोत्सवामागची संकल्पना बघू या- 
"मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्वर्यवेद्:" ह्या ग्रंथात वाचनात आले की आपल्या भारतवर्षात प्राचीन काळी जेव्हा गुरुकुलांची परंपरा होती तेव्हा अत्री ऋषिंनी यज्ञसंस्था आखीवरेखीव व नियमबध्द केली होती आणि ते अगस्त्य , वसिष्ठ, मृकंड ऋषिंच्या सहाय्याने शुभ विद्यांची गुरुकुले स्थापन करीत होते आणि अत्रि ऋषिंची पत्नी माता अनसूया ऋषिंना, ऋषिपत्नींना तसेच राजांना व राजपत्नींना धर्मपालन व भक्ती ह्यांचे महत्त्व आणि त्यांचे नियम समजावून सांगण्याचे कार्य करीत होती. ही कार्ये करीत असताना अत्रि ऋषि व माता अनसूयेच्या लक्षात आले की कर्मस्वातंत्र्याचा वापर करून मानव द्रव्यशक्तीचा अनुचित वापरच जास्त करीत आहे व त्यामुळे ह्या विश्वाचा घनप्राण मनुष्य़ास सहाय्यभूत होण्याऐवजी त्याच्यावर क्रोधित होऊन मनुष्याच्या कार्यशक्तीस अटकाव करू लागला आहे. 

घन म्हणजे स्थूल थोडक्यात सोप्या भाषेत बघायचे तर घन म्हणजे ज्याला अस्तित्त्व आहे अशा दिसू शकणाऱ्या  गोष्टी. 
घनप्राण म्हणजे द्रव्यशक्तीच्या वापरातून त्रिविध मनुष्यदेहात (भौतिक, प्राणमय आणि मनोमय) व निसर्गात उत्पन्न होणारी स्थूल स्तरावरील कार्यशक्ती. 

तेव्हा त्यावर उपाय योजण्यासाठी अत्रि ऋषि व माता अनसूयेने ह्या विश्वातील मूळ द्रव्यशक्ती (पदार्थशक्ती) असणाऱ्या पार्वतीमातेस बोलावून घेतले व सांगितले की ह्या सामान्य मानवांची बुध्दी त्यांच्या मनापुढे अबला ठरत आहे. अशाने मानवास त्याचा अभ्युदय करून घेणे व परमात्मप्राप्ती करून घेणे कठीण होत चालले आहे. त्यामुळे आता तू तुझ्यापासूनच उत्पन्न होणाऱ्या  ह्या घनप्राणास पुत्ररूपाने धारण कर.

अशा प्रकारे माता अनसूयेच्या आज्ञेनुसार पार्वती मातेने कैलासावर जाऊन विश्वाच्या घनप्राणास आपला पुत्र म्हणून साकार केला तो दिवस म्हणजे माघ शुध्द चतुर्थी. पार्वती मातेने आपल्या पुत्राचे ’ब्रम्हणस्पती’ तर परमशिवाने ’गणपति’ व कार्तिकेयाने ’ हेरंब’ असे नामकरण केले असले तरी सर्व शिवगण मात्र त्यास ’गणेश’ ह्या कौतुकाच्या नावाने संबोधू लागले. म्हणून हा माघ शुध्द चतुर्थीचा दिवस "श्री गणेश जयंती" म्हणून ओळखला जातो आणि माघ महिन्यात येत असल्याने "माघी गणेशोत्सव " म्हणून साजरा केला जातो. तसेच काही ठिकाणी माघी महिन्यातील श्री गणेश जयंतीला " तिळकुंद  चतुर्थी " ह्या नावाने सुध्दा ओळखले  जाते,

सर्वसामान्यपणे लग्न झालेल्या विवाहित स्त्रीला माहेरी नेऊन नेहमी तिचे व तिच्या अपत्यांचे लाड केले जातात म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत भगवान शिवशंकराच्या पत्नीला पार्वतीमातेला माहेरवाशीण म्हणून अत्यंत प्रेमाने भाद्रपद महिन्यात घरी आणले जाते आणि तिचे व तिच्या पुत्राचे गणपतीचे नातू म्हणून स्वागत केले जाते तो दिवस म्हणजे भाद्रपद शुध्द चतुर्थी - भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव !

ब्रम्हणस्पती - ऋगवेदातील गणपती स्वरूप 

अत्रि ऋषिंनी स्वत: पौरोहित्य करून आपल्या नातवाचे बालगणपतिचे उपनयन संपन्न केले होते आणि त्यानंतर मंगलविधिचा एक भाग म्हणून बालगणेश अनसूया मातेकडे बटूरूपात ’ॐ भवति भिक्षां देहि’ असे म्हणून भिक्षा मागतो तेव्हा अनसूया मातेने त्याच्या झोळीत २१ मोदकांचे व त्याच्या चार हातांत मोदक, पाश, परशु व दन्त ह्या चार साधनांचे आणि मनात सुखकर्ता ब्रीदाचे व बुध्दीत दु:खहर्ता तत्त्वाचे दान केले होते. 
ऋगवेदातील ऋचांमध्ये गणपतीच्या ज्या स्वरूपाचे वर्णन "ब्रम्हणस्पती" म्हणून केले आहे त्याच्या पुढील उजव्या हातात मोदक आहे, डाव्या हातात दन्त (दात )आहे आणी मागील दोन हातांमध्ये परशु आणि पाश ही आयुधे आहेत.              
आपल्याला चांगलेच परिचयाचे असते की श्रीगणपती हा मूलाधार ह्या आपल्या मानवी देहातील अगदी पहिल्याच चक्राचा स्वामी आहे. ह्या चक्रास चार पाकळ्या आहेत , 
त्या म्हणजे १. आहार २. विहार ३. आचार व ४. विचार 
ब्रम्हणस्पती म्हणजेच गणपतिच्या हातातील मोदक, दन्त , पाश व परशु ह्यांचा ह्या पाकळ्यांशी संबंध आहे तो असा- 
१. मोदक -’आहार’ ह्या पाकळीवरील गणपतिच्या प्रभावाचे प्रतिक.
२. दन्त - ’विहार’ ह्या पाकळीवरील गणपतिच्या प्रभावाचे प्रतिक.
३. पाश - ’आचार’ ह्या पाकळीवरील गणपतिच्या प्रभावाचे प्रतिक.
४. परशु - ’विचार’ ह्या पाकळीवरील गणपतिच्या प्रभावाचे प्रतिक.
म्हणून माघी गणेशोत्सवाच्या दिवशी अशा ह्या ब्रम्हणस्पतीच्या पुण्यप्रद व पावन दर्शनाने मानवास सर्वतोपरी कल्याणप्रद लाभ होतो. ह्या समयी ब्रम्हणस्पतीच्या मूर्तीवर ब्रम्हणस्पती सूक्ताच्या पठणाद्वारे अभिषेकही केला जातो. 

ब्रम्हणस्पती सूक्ताचे माहात्म्य - 
" गणानां त्वां गणपतिं हवामहे ..." हा सुप्रसिध्द मंत्र आपण कधी ना कधी ऐकलेला असतो. हा मंत्र म्हणजे ऋगवेदातल्या ब्रम्हणस्पती ह्या गणपतीच्या स्वरूपाचे वर्णन करणाऱ्या ६२ ऋचांचा संग्रह असलेले ब्रम्हणस्पती सूक्त ! 
गृत्समद हा एक वैदिक मंत्रद्रष्टा ऋषी, गणपतिचा हा श्रेष्ठ आद्यभक्त, ज्याने स्वत:च्या पवित्र आचरणातून व आपल्या चिंतनातून परमेश्वराचा प्रसाद म्हणून गणपतीचे म्ह्णजेच ब्रम्हणस्पतीचे हे श्रेष्ठ सूक्त सर्व जगासाठी अर्पण केले.     
ब्रम्हणस्पती सूक्त हे ऋग्वेदातील अत्यंत पवित्र सूक्त आहे, जे केवळ एका व्यक्तीचेच नाही किंवा फक्त समाजाचेच नाही तर अवघ्या राष्ट्राचे भले करणारे आहे. आपल्या अवघ्या राष्ट्राला, प्रत्येक नागरिकाला समर्थ आणि निर्भय करणारे असे हे सूक्त आहे.

मोदक म्हणजे लाभेवीण प्रीतीचे म्हणजेच निख्खळ आनंदाचे अन्नमय अर्थात घनस्वरूप ! अर्थातच असा हा लाभेवीण प्रेम करणारा मोदक ज्याचे साधन आहे असा तो ब्रम्हणस्पती- गणपती अर्थातच निरागस भावनेने प्रेम व भक्ती करणाऱ्या त्याच्या भक्तांवर ह्या दिवशी अगणित कृपा करता होतोच हे अधिक सांगायला नकोच. 

अष्टविनायकांचे फलदायी पूजन -



माघी गणेशोत्स्वाच्या वेळेस अष्टविनायकांचे पूजन हे अत्यंत फलदायी  मानले जाते. प्रत्येकाला परमेश्वराची सदोदीत प्रवाहीत होणारी कृपा  प्राप्त व्हावी, त्यासाठी प्रत्येकाच्या त्रिविध देहात जी यंत्रणा परमात्मा (सदगुरू) कार्यान्वित करीत असतो ती यंत्रणा म्हणजेच गणपती. 

ह्या यंत्रणेची, व्यवस्थेची आठ महत्वाची केंद्रे प्रत्येकाच्या देहात असतात. ही स्थाने म्हणजेच अष्टविनायक. म्हणूनच ह्या अष्टविनायकांचा संबंध भक्ती करताना जागृत होणाऱ्या अष्ट भावांशी आहे . ही मानवी देहातील आठ तीर्थक्षेत्रे परमेश्वराची कृपा मानवाच्या जीवनात प्रवाहित करीतच असतात. परंतु मानव स्वतःच्या प्रज्ञापराधामुळे, प्रारब्धामुळे ही कृपा स्वीकारण्यात अडथळे म्हणजेच विघ्ने निर्माण करत असतो व त्यामुळेच तो परमेश्वरी कृपेस वंचित होत असतो . त्या परमेश्वरी कृपेस वंचित होऊ नये म्हणून ते मूळ "परब्रम्ह दत्तगुरू" श्रध्दावानांच्या समुद्धरासाठी परमात्मा सद्गुरूची योजना करतो.

श्रध्दावानांवर लाभेवीण प्रेम करणारे सदगुरुतत्व मग आपल्या श्रध्दावानांना नव अंकुर ऐश्वर्य प्राप्त व्हावीत व त्यासाठी देहातील आठ तीर्थक्षेत्रे  म्हणजेच अष्टविनायक उचितपणे कार्यरत रहावेत म्हणून ह्या माघी गणेशोत्सवाच्या दिवशी ब्रम्हणस्पती व अष्टविनायकांचे एकत्र पूजन करतात असे वाचनात आले. ब्रम्हणस्पतीसह अष्टविनायकांच्या मूर्तींचेही अर्चन गणपती अथर्वशिर्षाद्वारे अभिषेक करून करता येते. माघी गणेशोत्सवाच्या दिवशी ब्रह्मणस्पतीला म्हणजेच गणपतीला भाविक अत्यंत प्रेमाने लाल रंगाची फुले व दुर्वा अर्पण करतात .  

अशाच प्रकारे माघी गणेशोत्सव ह्या मंगल सोहळयाद्वारे जीवनाचा विकास करून घेण्याची संधी, एक अभूतपूर्व पर्वणीच माझे सदगुरू डॉक्टर अनिरुध्द  जोशी आपल्या श्रध्दावानांना प्राप्त करून देतात. 

२०१० साली माघी गणेशोत्सवाच्या पावन दिवशी सदगुरु डॉक्टर अनिरुध्द  जोशी ह्यांनी माघी गणेशोत्सवच्या दिवशी तसेच दर मंगळवारी आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रम्हणस्पतीच्या खालील मंत्राचा ७२ वेळा जप करणे कल्याणप्रद आहे असे सांगितले होते.           
|| ॐ श्री ब्रह्मणस्पतये पार्वतीपुत्राय मंगलमूर्ते गणपतये विश्व घनप्राणाय सर्व विघ्न निवारकाय नमो नम: ||

संदर्भ : 
१. मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्वर्यवेद्: 
२. श्रीमद्पुरुषार्थ: तृतीय खण्ड: आनंदसाधना 

2 comments:

  1. Ambadnya khup sunder mahiti
    Vachayla bhetali ganpati bappa vishayi.
    Ganpati bappa morya mangal murti morya

    ReplyDelete
  2. Ambadnya
    Atishay sunder mahiti bappachi.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog