Sunday 31 January 2016

झिका व्हायरस - नैसर्गिक आपत्ती का मानवनिर्मीत आपत्ती?

डेंग्यु, चिकन गुनिया ह्या सारख्या जीवघेण्या आजारांच्या विळख्यातून कोठे जग बाहेर पडत नाही पडत तोच ईबोला व्हायरसने लोकांना ग्रासले होते. जवळपास एक वर्षाआधी आफ्रिकी देशांमध्ये ईबोला व्हायरसचा उद्रेक झाल्याची नोंद दाखल झाली आणि त्यात ११,३०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यु झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली. सिएरा लिओन, गिनीया ह्या देशांना ’ईबोला" चा स्रवात जास्त फटका बसला होता आणि  त्यावेळेस जवळपास २८,६०० लोक ह्या विषाणू (व्हायरस)च्या संपर्कात आले होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. 

आफ्रिकेमधील "लायबेरिया" ह्या देशात ईबोलाचा एकही रूग्ण न आढळल्याच्या पार्श्वभूमीवर नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेने ( World Health Organization - WHO) अधिकृत रीत्या ईबोला ह्या जगाला हादरवून सोडणार्‍या "संक्रमक आजार" पसरवणार्‍या व्हायरसपासून संपूर्णत: मुक्ती मिळाल्याची घोषणा केली होती. त्या दरम्यान रशियाने सुध्दा "ईबोला" वर वॅक्सिन मिळाल्याचा दावा केला होता. भयमुक्त जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला नाही तर आता पुन्हा झिका व्हायरस नावाच्या नव्या राक्षसरूपी विषाणूने आपले वर्चस्व वाढवायला सुरुवात केले असल्याच्या बातम्या एका मागोमाग एक येऊन धडकत आहेत.   



डेंग्यु म्हणा वा चिकन गुनिया म्हणा हे आजार डासांच्या चावण्यामुळे उद्भवत असल्याने आपल्या देशातील आरोग्य संघटना, महापालिका ह्यांनी डासांपासून संरक्षण करण्यासाठी दूषित पाण्याचे साठे टाळा, उघडी गटारे , सांडपाणी, नाले ह्यांच्यावर डीडीटी सारखी रोगप्रतिबंधक औषधांची फवारणी करा, घराच्या परिसरात पाणी तुंबून देऊ नका, साचलेल्या पाण्याचा योग्य पध्दतीने निचरा करा अशा प्रकारे जोरदार प्रचार -प्रसार करून जनजागृती केलेली आपल्या सर्वांना चांगलीच परिचयाची आहे. 

दैनिक प्रत्यक्षमध्ये दिनाकं २९ जानेवारी २०१६ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात सुमारे २४ देशांमध्ये ’झिका’ चा प्रसार झाला असून रुगणांची संख्या ४० लाखावर गेल्याची धक्कादायक माहिती प्रसारित केल्याची बातमी वाचनात आली. तसेच जगामध्ये झपाट्याने फैलाव होत चाललेल्या झिका व्हायरसपासून भारताला धोका संभवत असल्याचा इशारा दिला आहे ह्या बातमीने विशेष लक्ष वेधून घेतले. त्या निमीत्ताने झिका व्हायरससंबंधी जाणून घेण्याचा जो प्रयास केला त्यातून हाती लागलेली माहिती मांडण्याचा हा प्रपंच -
     
झिका व्हायरस म्हणजे काय ?
झिका व्हायरस हा व्हायरस किंवा विषाणू फ्लेवीव्हायरस फॅमिलीशी (Flavivirus family)निगडीत आहे, जो डेंग्यु आणि चिकनगुनिया आजार पसरविणार्‍या व्हायरससारखा असल्याची माहिती मिळते. हा पहिल्यांदा १९४० मध्ये शोधला गेला आणि त्याचा उद्रेक हा पहिल्यांदा आफ्रिका, साऊथईस्ट आशिया आणि पॅसेफिक बेटांवर झाला होता. 

झिका व्हायरसचा प्रसार कसा होतो?
झिका व्हायरस हा प्राथमिकत: ’एडिस इजिप्ती’ (Aedes Egyptee) नावाच्या डासांच्या चावण्यातून होतो. हेच डास डेंग्युचापण प्रसार करतात. या विषाणूंचा सर्वाधिक दुष्परिणाम हा गर्भधारणा झालेल्या महिलांवर होत असल्याचे पाहणीत समोर आले आहे. यामुळे गर्भातील मुलांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होऊन मुलांची वाढ खुंटते व मुले व्यंग घेऊन जन्माला येतात.



झिका व्हायरसची संभाव्य लक्षणे -
सर्वसामान्यत: झिका व्हायरस झालेल्या रूग्णाला ताप येणे, अंगावर लालसर पुरळ येणे, सांधेदुखी होणे, डोकेदुखी आणि डोळे लालसर होणे अशी लक्षणे आढळू शकतात. ही लक्षणे काही दिवस आठवडाभर राहू शकतात. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे संक्रमण करणार्‍या ८०% रूग्णां मध्ये ह्याची लक्षणे दिसतच नाहीत. परंतु सध्या झिका व्हायरसचा मायक्रोसिफेली (microcephaly – and possibly Guillain-Barre syndrome ) ह्या भयावह लक्षणांशी संबंध आढळून आल्याने तो अतिशय घातक ठरू शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे.              

दोन वर्षांपूर्वी ब्राझिलमध्ये ह्या झिका विषाणूंचा फैलाव झाला होता. या भयंकर विषाणूंच्या प्रभावामुळे ब्राझिल, एल सॅल्वाडोअर, तसेच इतर लॅटीन अमेरिकन देशांमध्ये आणीबाणीसदृष्य परिस्थीती ओढावळ्याचे चित्र दिसत आहे. या व्हायरसचा आपल्या देशात फैलाव होऊ नये म्हणून अनेक देशांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अशा उपाययोजना होत असून देखिल झिकाचा फैलाव अत्यंत वेगाने होत असल्यामुळे ही अत्यंत चिंतेची बाब बनत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने झिका व्हायरसकडे सर्वात अधिक लक्ष पुरवून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. 

मानवाने त्याच्या हव्यासापायी जंगलतोड केल्याने निसर्गाचा प्रकोप झाल्याचे काही सूत्र सांगत आहेत. ब्राझीलमध्ये जंगलाची बेसुमार तोड झाल्याने झिका व्हायरसच्या रूपाने नैसगिक संकट उद्भवले असल्याचा दावा " The Journal of Global Health" मध्ये केला गेला आहे. 
काही सूत्रांच्या मतानुसार झिका व्हायरस हा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत केलेल्या जैविक युध्दाचा ( Bilological warfare ) प्रयोगही असू शकतो.
अशा पार्श्वभूमीवर झिका व्हायरस ही खरोखर नैसर्गिक आपत्ती आहे का मानवनिर्मीत आपत्ती आहे असा प्रश्न साहजिकच मनात डोकावून जातो? अर्थात येणारा काळच त्याचे उत्तर देऊ शकतो...

WHOने झिका व्हायरस वर तोडगा काढण्यासाठी एक फेब्रुवारीला आपातकालीन बैठक बोलावली आहे. 'इबोला'प्रमाणे 'ग्लोबल इमरजन्सी'ची घोषणा करण्यासंदर्भात बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. WHO चे डायरेक्टर जनरल मार्गेट चान यांनी सांगितले, की ''झिका व्हायरसचा धोका आता भयनाक स्तरावर पोहोचला आहे. व्हायरसची लागण झालेल्या गर्भवती महिला अशा मुलांना जन्म देतात, की त्यांच्या मेंदूचा पूर्णपणे विकास झालेला नसतो. गेल्या काही महिन्यांत मायक्रोसेफलीच्या सुमारे 1000 पेक्षा अधिक केसेस समोर आल्या आहेत. सरकार, सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रशासन सगळेच या व्हायरसमुळे हतबल झाले आहेत.

ब्राझिलमधील दूषित हवामान, दाट लोकवस्तीची शहरे, दारीद्र्य आणि नियोजन नसलेल्या शहरांमुळे झिका व्हायरसचा प्रार्दुभाव झपाट्याने झाला आहे. ब्राझिलपाठोपाठ आता अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये झिका व्हायरस पसररला आहे. दाट लोकवस्तीमुळे मच्छरांसाठी पोषक वातावरण मिळते व त्यांच्या मार्फेत धोकादायक संसर्ग पसरत असल्याचे मार्गेट चान यांनी सांगितले आहे.

विविध आरोग्य संस्था आणि सरकारतर्फे देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर गर्भवती महिला मच्छरांपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हायरसवर लस शोधण्यासाठी विविध देश संस्था प्रयत्न करत आहेत.

रियो ऑलिम्पिकला झिकाचा धोका...
- ब्राझिलमध्ये यंदा होणार्‍या ‍रियो ऑलिम्पिकला झिका व्हायरसचा धोका निर्माण झाले आहे. रिसर्चर्सनुसार, ऑलिम्पिक गेम्सनंतर झिका व्हायरस जगभरात पसरण्याची भीती पसरण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
- रियो ओलिंम्पिकला जगभरातून सुमारे पाच लाख लोक पोहोचण्याची शक्यता आहे. यापैकी 2 लाख लोक हे अमेरिकेतील असतील.
- ब्राझिलच्या रिसर्चर्सनुसार, 2014 च्या वर्ल्ड कप इव्हेंटमध्ये आलेल्या हजारों टूरिस्ट्समुळे झिका व्हायरस देशात पोहोचला आहे.

भारतासारख्या खूप मोठी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाला झिकापासून फार मोठा धोका संभावतो असा इशारा WHO ने दिला असल्यामुळे केंद्र सरकारनेही हा इशारा अत्यंत गांभीर्याने घेतला आहे असे आढळले. 

 संदर्भ - 
१. दैनिक प्रत्यक्ष 

2 comments:

  1. धन्यवाद सुनिताजी, खूपच् चांगली माहिती दिलीत. आपल्या परिसराची स्वच्छता खऱोखरच् फार गरजेची झाली आहे, जेणेकरून झपाट्याने वाढणार्या डासांवर प्रतिबंध घातला जाईल. आणि सर्वात मुख्य म्हणजे,प्रत्येक गोष्टींसाठी इतरांवर अवलंबून न राहता, प्रत्येकाने स्वत:चे कर्तव्य समजून स्वच्छता ठेवणे निकडीचे.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog