Monday 7 March 2016

आली महाशिवरात्र - " ॐ नम: शिवाय" मंत्राचा जागर करू या...

कैलासराणा शिवचंद्रमौळी |  फणींद्र माथा मुकूटी झळाळी | 
कारुण्यसिंधु भवदु:खहारी|  तुजविण शंभो मज कोण तारी | | 
ॐ नम: शिवाय |  ॐ नम: शिवाय |  ॐ नम: शिवाय | ॐ नम: शिवाय |  ॐ नम: शिवाय …। 

महाशिवरात्री आली की आपण काय-काय करतो. उपवास करतो आणि काय-काय करतो? जमले तर शंकराच्या देवळात जातो , ॐ नम: शिवाय चा जप करतो , शंकराला बेलपत्र वाहतो , कोणी भाविक शिवलीलामृताचे पठण करतात,  बरोबर ना? पण आपण कधी जाणून घेण्याचा प्रयास करतो का की महाशिवरात्री म्हणजे काय? ही रात्र आहे मग दिवस कुठून आला. आपण पाहतो दुर्गा देवीच्या नवरात्रीला पण आपण नवरात्रीचे दिवस म्हणतो. नऊ दिवस नवरात्र असल्यामुळे, रात्रीमध्ये दिवस आहे. पण महाशिवरात्र तर एकच दिवस असते. दिवसभरात उपवासाचे पदार्थ खायचे बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी, वरीच्या तांदळाचा भात, शेंगदाण्याची आमटी, फ्रुट सलाड असे सगळे उपासाच्या भरपूर पदार्थांवर चांगला आडवा हात मारतो,म्हणजेच मस्त खादाडी करतो, त्या महादेवाची पूजा करण्यापेक्षा खरेतर जास्त आपण आपल्या पोटाचीच पूजा करतो आणि भोगाचे पदार्थ स्वत:च स्वाहा करतो, हादडतो, खातो. हा झाला गंमतीचा भाग, पण महाशिवरात्र म्हणजे काय ? रात्र का महत्त्वाची मानली जाते , हे तरी जाणून घ्यायचा प्रयास करू या....

महाशिवरात्र म्हणाजे माघ महिन्यातील शिवरात्र. ह्याचे विशेष महत्त्व म्हणाजे मार्कंडेय ऋषी शिवतत्वाबद्द्ल चिंतन करीत असताना त्यांना शिवकार्याचे ज्ञान झाले आणि त्यावेळी त्यांच्या समोर शिवाचे अर्धनारी नटेश्वर रूप प्रथमच प्रकट झाले. त्याच क्षणी त्यांनी ह्या रूपाचे प्रथम पूजन केले आणि त्या पूजनाला अगस्ती ॠषी पुरोहित होते, आणि हिच ती रात्र म्हणजे "महाशिवरात्र" , जी भक्तमानसांत "महाशिवरात्री" म्हणून स्थिर झाली आणि शिवपूजनाकरिता सर्वश्रेष्ठ म्हणून मान्यता पावली. 


आदिमाता दुर्गा देवीच्या बाबतीत आणि शिवाच्या बाबतीतही रात्रच महत्वाची असते. रात्र म्हणजे अंधार नाही. शिवरात्र, देवीच्या बाबतीतसुद्धा नवरात्री व शिवाच्या बाबतीत शिवरात्री. रात्रीच का? उपवास तर आपण सकाळी करतो. रात्र आणि अंधार ह्याच्या मधला फरक ओळखायला शिकावे लागते. रात्र म्हणजे अंधार नव्हे, आणि अंधार म्हणजे रात्र नव्हे. 

तुम्ही तुमच्या खोलीची खिडकी दारं बंद केली तर अंधार झाला, रात्र झाली का? तर नाही. रात्री दिवे लावलेत, सगळीकडे उजेड आहे पण म्हणून बाहेर रात्र नाही असं नाही होत. रात्र व अंधार एकरूप नाहीयेत. रात्र झाल्यावर अंधाराची भीती वाटते हे दोघे एक नाहीत हे कळलं तर ५० टक्के भीती निघून जाते.

रात्रीला तीन भागात विभागले आहे- १) मोहरात्री २) कालरात्री ३) महाकालरात्री ही तीनही आदिमातेचीच नावं आहेत. मधु-कैटभांचा नाश करण्यासाठी आणि स्वत:ला वाचविण्यासाठी ब्रह्मदेवाने आदिमातेला साद घालताना रचलेल्या स्तोत्रात वर्णन केले आहे - 
जय त्वं देवि! जय  सर्वार्तिहारिणी | 
जय जय महादेवि ! असुरकालरात्रि नमोsस्तु ते | | 
हे महादेवि चण्डिके ! तुझा जय असो. तू सर्वांचे दु:ख हरण करणारी आहेस आणि असुरनाशासाठी काळरात्र आहेस. 
म्हणजेच रात्र आणि देवीत्व ह्यांचा संबंध आहे. रात्री-अरात्री ह्याचा अत्रिशी संबंध आहे. 
रात्र म्हणजे शांती, थकलेल्या जीवाला मिळणारा आराम, जोमाने नवीन काम करण्यासाठी क्षणभर घेतलेला हॉल्ट, नवनिर्मितीची तयारी !!! 
समजा आपण दिवसभर एखाद्याला जेवायला घातलं, पण रात्री झोपू दिलं नाही, तर काय परिस्थिती होईल? दोन-तीन दिवसांनी तो म्हणेल जेवायला नको पण झोपायला द्या. एवढी ह्या झोपेची, विश्रांतीची मनुष्याला गरज आहे. माणसाच्या शरीराला केवळ इंधन पुरवून चालत नाही. तुम्ही नुसतं इंधन पुरवलं आणि गाडी सतत चालूच ठेवली तर गाडी बिघडणारच नाही का? 
रात्र म्हणजे नवनिर्मितीसाठी जुनी मरगळ काढावी लागते हे सगळं करावं लागतं ते म्हणजे रात्र.

मातृवात्सल्यविन्दानम् ह्या ग्रंथामध्ये असे वाचनात आले की भर्गात्मा भगवान अत्रि ऋषिंनी स्वत:च अगस्त्य, वसिष्ठ, कश्यपादि ऋषिंना स्वत:च्या नामाचा अर्थ उलगडून सांगितला होता -
" अरात्रिरात्रि: सा रात्रिरिया नाधीते त्रिरद्य वै | 
 अरात्रिरात्रिरित्येव नाम मे विध्दि महामुने "| | 
(अर्थ- हे महर्षि ! काम, मोह, क्रोध आदि शत्रुंपासून त्राण (रक्षण) करणार्‍याला "अरात्रि" म्हणतात आणि अत् पासून अर्थात् मृत्युपासून रक्षण करणार्‍याला ’अत्रि’ म्हणतात. 
जोपर्यंत जीवात्म्याला एकमेव अद्वितीय परमात्म्यावर निश्र्चल श्रध्दा प्राप्त होत नाही, त्या अवस्थेला ’रात्रि’ असे म्हणतात. ती अंध:कारावस्था नाहीशी होणे, ह्याला ’अरात्रि’ व पूर्ण प्रकाशावस्थेला ’अत्रि’ अवस्था म्हणतात व म्हणूनच माझे नाम ’अत्रि’ हे आहे.) 
म्हणून भगवंतावर , परमात्म्यावर , त्या आदिमातेवर निश्र्चल श्रध्दा प्राप्त करण्यासाठी व मानवाच्या जीवनातील अंध:कार नाहीसा करण्यासाठी ही रात्र महत्त्वाची मानली जाते. 

शिवरात्र का? आपल्या शरीरात नऊ चक्र असतात. त्यातील सात जागृतावस्थेत असतात आणि दोन सुप्तावस्थेत असतात. हृदयाच्या जागी जे अनाहत चक्र असते त्याचा स्वामी परमशिव आहे. जोपर्यंत त्या परमशिवाचा डमरू वाजतोय तोपर्यंत मनुष्य जिवंत असतो. मनुष्याच्या देहाच्या हृदयातील लबडब आवाज म्हणजेच शिवाच्या डमरूचा ध्वनी. डमरू झोप न घेता चालत असतो. हा परमशिव लबडब ह्या ध्वनीच्या वेळेस जागा आहे. डमरूच्या दोन स्पंदनामधला जो काळ आहे, जी जागा आहे ती जागा म्हणजे चिंतनशील, ध्यानस्थ शिव आहे. तो कोणाचं ध्यानं करतोय? ज्याच्या शरीरात ध्वनी वाजतोय त्याचं. ह्या जागेत तो निद्रिस्त, बेशुद्धावस्थेत नाहीये. तुम्ही जितक्यांदा परमेश्वराचं स्मरण करता, त्याचं गुणगाण करता त्यापेक्षा जास्त परमेश्वर तुमचं ध्यान करतो. म्हणून मी एवढं पठण केलं, एवढा जप केला हा अहंकार आपण सोडायला पाहिजे. 
  
तुम्ही त्याचं नाव घ्या अगर नका घेऊ, तो दर मिनिटाला ७२ वेळा तुमचं ध्यान करत असतो. तो प्रत्येकाच्या आत आहे, त्यामुळे त्याला तुमची प्रत्येक गोष्ट कळत असते. ह्याची भीती बाळगायची नाही. तो प्रेमाने ध्यान करतो, जसं एखादी आई आपल्या बाळाचं ध्यान करते तसं त्या रात्रीमध्ये तुमच्याकडून सगळी माहिती घेतो, ह्या क्षणाला हे घडलं, तर ह्याच्या पुढच्या क्षणाला काय घडेल, ह्याचं तो प्लानिंग करत असतो. तुमच्यासाठी शिवाची रात्र आहे तुमच्या भविष्याची योजना तो करतो म्हणून शिवरात्रीला शिवाची उपासना करायला हवी.
जो परमात्मा आपली ७२ वेळा आठवण ठेवतो, ७२ वेळा ध्यान करतो त्याचं वर्षातून एका महाशिवरात्रीच्या दिवशी ध्यान करायला काय हरकत आहे? 

आदिमाता आणि तिचा पुत्र शिव ह्याचं प्रदोष समयाला पूजन करणं श्रेष्ठ मानलं जातं, बेस्ट मानलं जातं. 
प्रदोष समय म्हणजे सूर्यास्ताआधीचा अर्धा तास आणि सूर्यास्तानंतरचा दीड तास. ‘प्र’ म्हणजे सातत्याने. पण इथे अर्थ आहे ‘प्रकर्षाने’ संस्कृत व्याकरण आणि व्ययव्याकरण वेगवेगळ आहे. ‘अ’ तुम्ही अनुस्वार दिला की आपण (अं) -‘अम्बा’ म्हणतो आणि ‘घ’ वर अनुस्वार दिला की आपण (घं) - ‘घण्टा’ म्हणतो. अनुस्वार तोच आहे पण उच्चार वेगवेगळे आहेत. हा व्याकरण आणि व्ययव्याकरणामधला फरक आहे. तसंच इथे ‘दोष’ म्हणजे ‘फॉल्ट’ म्हणून नाही वापरला आहे. आपल्या शरीरातही ‘दोष’ असतात - वात, पित्त, कफ हे फॉल्ट नाहीयेत. ‘दोष’ म्हणजे ‘मूलभूत घटक’. सर्व सृष्टीतील मूलभूत घटक, तत्व अतिशय प्रकर्षाने कार्यरत होतात त्याला ‘प्रदोषकाळ’ म्हणतात. 

आम्हाला शंकराची, शिवाची सतत भीती वाटत असते. आम्ही त्याच्या क्रोधाच्या कथा ऐकलेल्या असतात. पण "तो" भोलेनाथ म्हणूनही प्रसिद्ध आहे हे आम्ही विसरतो. पाणी-बर्फ-वाफ वेगवेगळे असतील पण केमिकल एकच आहे. मृत्यू देणं त्याचं काम नाहीए. तो transform करतो. वाल्याचा वाल्मिकी करतो. हे नुसतचं रुपांतर नाहिए, हे गुणांतरही आहे. Transform कायापालट घडवून आणणं ही प्रक्रिया परमशिवामुळे घडते. हा ह्या क्रियेचा स्वामी आहे. आपल्यात बदल तेव्हा घडायला हवेत, जेव्हा त्याची गरज असते. देवाच नाव तरुणपणी घेतलं तर फायदा झाला असता, म्हातारपणी नाम घेऊन तो फायदा घेण्यासाठी जिवंत तर असायला पाहिजे. जेव्हा बदल स्वीकारायची मनोभूमी तयार असते, तेव्हा बदल व्हायला हवेत. प्रदोष काळात शिवाचं पूजन करणं म्हणजे शिवाला प्रार्थना करणं, “देवा, माझ्या मनात, शरीरात, प्रारब्धात, पुर्व जन्मात, पुढच्या जन्मात, आजच्या जन्मात जे काही transform घडवायचं आहे ते तू तुझ्या मनाप्रमाणे घडवून आण.”

आम्ही प्रार्थना करतो , पण त्याहीपेक्षा अधिक सूचनाच करत असतो असे मला तरी वाटते. आता हेच बघा ना, मला एखादे नवीन घर विकत घ्यायचे आहे तर आम्ही देवाला किती सूचना करत असतो?  देवा, transform तुला पाहिजे तसं कर असं कधी म्हणतो का आपण? नवीन घर घ्यायचं असलं तरी त्याला सूचना करत असतो, मला अमूक ठिकाणी, अमूक गल्लीमध्ये अमूक-अमूक जागेवरच घर दे, त्याच्या आजूबाजूला हे नको, ते नको. किती सूचना करत असतो त्याला. आपण त्या देवाला फक्त एवढंच सांगायला पाहिजे की तुझ्या इच्छेप्रमाणे तू कर आणि मला ‘बेस्ट रचनेत नेऊन ठेव.’

आम्ही देवाला सांगतो , ‘देवा, मला सगळ्यांपेक्षा चांगलं व्हायचं आहे , त्यामध्ये पण त्याला आम्ही ऑप्शन देतो. मला तरी असे प्रामाणिकपणे नेहमी वाटते की आपण देवाला कधीच ऑप्शन्स देऊ नये. जर तुमची श्रद्धा खरी असेल तर, तो तुमचं मुळीच ऐकत नाही आणि तो तुमचं मुळीच ऐकत नाही म्हणूनच तुमचं भलं होत असतं. पांडवाची माता कुंती ही भगवान कृष्णाची भक्ती करायची आणि म्हणायची हे देवा, तू मला सतत दु:खात ठेव , जेणेकरून मला तुझ्या नामाचा कधीच विसर पडणार नाही. पण म्हणून कृष्णाने तिला सदैव दु:ख दिले का ? नाही ना..

महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा, गुरुपौर्णिमा ह्या दिवसात परमात्मातत्वाने त्याचे maximum व्हायब्रेशन्स मोकळे केलेले असतात. त्यावेळी ते आमची capacity बघत नाही. ‘महाशिवरात्र’ हा अख्खा दिवस पवित्र आहे. ह्या दिवशी बेल व्हा. "त्या" महादेवाला, शिवाला आपण सांगायला हवे की " हे देवा, तुझे माझ्यात जीवनात स्वागत आहे. ‘Yor are Welcome’ माझ्यात तुला जे बदल घडवायचेत ते बिनधास्तपणे घडवून आण. मी मध्ये आलो, आड आलो तर, मला बाजूला काढ. पण तुला पाहिजे तेच कर. त्यासाठी तुला full freedom आहे.

आपल्या प्रसिद्ध कथा माहित असते, तो शिकारी व्याकूळ होऊन कुत्सिकपणे शिव-शिव म्हणून हाक मारतो. हे कसं घडतं. Power of transform. हा सहजपणे लीलया बदल घडवून आणत असतो. जेव्हा आपण आपल्या मनाची भिती काढून टाकतो तेव्हा आपण बदल स्विकारतो. देव जे घडवतो ते आपोआप घडत असत. त्याने घोटाळा निर्माण होत नाही.  “हे परमशिवा, तुला पाहिजे ते घडवून आण” हे त्याला सांगायला आपल्याला शिकावे लागते. खरे तर "त्या" शिवाचे, देवाचे आलय म्हणाजे घर हे आपले मूळ स्थान आहे , त्या जगातून  म्हणजे आपल्या घरातून "तो" आपला परमपिता आपल्याला जन्म देऊन पृथ्वीवर पाठवितो. हा शिव जसा transaform घडवून आणतो, म्हणजे शाळेतून घरी घेऊन जातो, पृथ्वीवरून तिथे घेऊन जाणारा आणि तिथून ह्या जगात आणणारा आहे. पृथ्वीवरून आम्ही घरी जातो, मजा करतो, परत शाळेत येतो. तिथून इथे आणि इथून तिथे आणणारा हा परमशिव आहे. तिथे आणि इथे शिकवणारा हा महाविष्णू आहे. आणि ब्रह्मदेवाचं काम काय तर, इकडे तुमचं रूप, जन्म कुठे होणार, इथे कुठल्या वस्तू पुरवायच्या आणि तिथे कुठल्या वस्तू पुरवायच्या हे सगळं ब्रह्मदेव बघत असतो. तो एकच आहे.

महाशिवरात्र असा शुभ दिवस मानला आहे शंकराचार्य सांगतात की, “ह्या दिवशी उकिरडासुद्धा गंगेच्या काठाइतका पवित्र बनतो. स्मशानसुद्धा मंदिराच्या ओसरीप्रमाणे पवित्र, शुभ बनते.”
ह्या दिवसाचं महत्व आम्हाला कळलं पाहिजे. रामनवमी, आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा, दत्तजयन्ती, महाशिवरात्र आणि कार्तिकी एकादशी हे सात दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत.  हे दिवस अतिशय पवित्र आहेत. महाशिवरात्र अतिशय शुभ, पवित्र आहे. हा दिवस परमशिवाच्या, त्याच्या मातेच्या, गौरीच्या स्मरणात घालू तर अतिशय चांगला आहे.

महाशिवरात्रीचा दिवस, ह्यामधील शिवाची उपासना. भारतीयांचं अतिशय जवळचं नातं जोडलेल असतं शिवाशी, पार्वतीशी, त्यांच्या दोन बाळांशी, नंदीशी.

आपण शिवाला काय वाहतो- बिल्वपत्र म्हणजे बेल, जे शिवाला प्रिय आहे. बेल म्हणजे काय? परमेश्वराला काय हवंय आमच्याकडून? अथर्ववेदामध्ये आणि शिवपुराणामध्ये सांगितलेले आहे की हे शिवाला प्रिय असणारे बिल्वपत्र कशाचं प्रतिक आहे ? तर हे दोन हात आणि एक मस्तक या तिघांचे एकत्र असण्याचे प्रतिक असलेले हे बेलपत्र. ही संयुक्तिक रचना , ही position म्हणजे बिल्वपत्र ! आणि म्हणूनच "त्रिदलीय बिल्वपत्र" आम्ही जरूर वाहूच , पण नाही वाहता आले , नाही मिळाले तर नाराज न होता, दु:खी न होता आमच्या जीवनातले दोन पाय, दोन हात आणि एक माथा सगळं एकत्रपणे भगवंताला, "त्या" शिवाला देऊ. म्हणजे काय? तर हाताने करायची कृती म्हणजे आचार, आणि दुसरी कृती म्हणाजे आहार, पायाने करायची कृती म्हणाजे विहार आणी मस्तक म्हणाजे विचार !! आहार-विहार-आचार-विचार हे सगळेच्या सगळे त्या भगवंताच्या चरणी अर्पण करणे, स्वत:चे म्हणून न ठेवता, त्याच्या इच्छेनुसार घडू देणं म्हणजे बिल्वपत्र वाहाणं आणि असे भक्ताने त्याच्या जीवनाचे वाहिलेले बिल्वपत्र हेच "त्या भोळ्या सांबाला " सदाशिवाला अधिक प्रिय असावे नाही का?

हस्त म्हणजे कर्मेन्द्रिय म्हणजे प्रत्येक कर्म आणि मस्तक म्हणजे ज्ञान माहीत असलेलं आणि नसलेलं मी तुझ्या चरणी वाहतो तुला जे द्यायचं ते दे असं सांगा. तो तुम्हाला त्यातून चांगलं तेच देणार म्हणून आपलं कर्म आणि आपलं ज्ञान म्हणजे अनुभव त्याच्या चरणी अर्पण करायचं. हे बेलाचं पान म्हणजे माझं मस्तक आणि माझे दोन हात आहेत, म्हणजे माझा आतापर्यंतचा अनुभव आणि कर्म मी तुझ्या चरणी वाहतो. त्यातून तू जे द्यायचं ते दे. ह्यात - ‘तुला पाहिजे ते घडवून आण. शिवा तुला जे बदल घडवून आणायचेत त्याचं freedom तुला आहे. तुला जसं हवं तसं कर. मी मध्ये पडणार नाही आणि मी मध्ये आलो तर मला बाजूला काढ.’ असे कळवळून सांगितले की "तो" परमशिव आपल्या बाळांना , आम्हा त्याच्या लेकरांना शुध्द करून उचित ते देणारच आणि त्याने माझे भलेच होणार आहे हा अविचल भाव, निश्र्चल श्रध्दा हवी. 

आपण "ॐ नम: शिवाय " हा जप करतो शिवाला आवडतो म्हणून - ह्या जपामुळे काय होते? तर आमचे हे समांतर प्रवास चाललेले असतात भगवंतापासून , त्यातील अंतर तरी कमी करू शकतो आम्ही, जमलं तर दिशा बदलू शकतो, भगवंतापासून विरूध्द दिशेला जाण्याच्या ऐवजी त्याच्या प्रवाहाच्या दिशेने आम्ही आमच्या जीवनाची दिशा वळवू शकतो. 

शिव म्हणजे पवित्र, शिव श्ब्दाचा अर्थच मुळी तो आहे, पूर्ण शुध्द, पूर्ण पवित्र म्हणाजे शिव. शिवाने प्रत्येक मनुष्याला हे दाखवून दिल की राजांनो, माझ्या बाळांनो! तुम्ही जन्मापासून कितीही चुका केलेल्या असो, पापं केलेली असतील, तुमच्या आधीच्या जन्मांत तुम्ही अनेक पापं केली असतील पण तुम्ही ज्याक्षणी त्या शिवाच्या गंगेमध्ये सामील होता, जीवनाच्या कुठल्या वळणावर सामील होता, अगदी शेवटच्या क्षणीसुध्दा सामील होता , म्हणजे काय? तर पूर्णपणे त्या गंगेच्या प्रवाहात मिसळून जाता , म्हणजेच ज्या क्षणी तुमच्या जीवनामध्ये त्या परमात्म्याला, त्या भगवंताला पूर्णपणे शरण जाता आणि पूर्णपणे त्याचे होऊन राहता, कुठल्याही शंका-कुशंका, स्वार्थ, अंहकार यांची ओझी, गाठोडी बरोबर न घेता, जसे आहांत तसे त्याचे होऊन जाता, होऊन रहाता तेव्हा "तो" भोळा सांब आम्ही कितीही पापी असलो तरी आमच्या पापांतून आमचा उध्दार करतो आणि जीवनातील सगळी सुख मिळवून देतो. 

सुखं, सुखं जी म्हणतात ती फक्त शुध्द्त्वांतून आणि पावित्र्यांतूनच उत्पन्न होतात. आपण हे ध्यानात घ्यायला पाहिजे की अपवित्रतेतून कधीही सुख उत्पन्न झालेलं नाही. क्षणिक सुख उत्पन्न होतं जरूर पण ते लगेच दुसर्‍या क्षणाला दु:खांत परिवर्तित होतेच होते. तर खरे सुख , सचित् सुख ज्याला म्हणतात ते आत्र पावित्र्यांतून, शु्ध्दतेतूनच उत्पन्न होते, अशुध्दतेतून कधीही उत्पन्न होऊच शकत नाही, कधीदेखिल नाही . परंतु अशुध्दतेला दूर करून त्याला पुढे पुढे शुध्द करण्याचे रूपांतर म्हणजेच TRANSFORMATION - अवघा कायापालट एकमेव "तो"च करू शकतो. 

"ॐ नम: शिवाय" हा जप सर्व अशुभतत्व काढून टाकणारा अत्यंत शुभ , पवित्र मंत्र आहे , म्हणून नंदिऋषिंनी ह्यातूनच शिवपंचाक्षरी स्तोत्र विरचित केले, शिवकृपेनेच! आपण नंदीला भगवान शिवाचे वाहन मानतो. नंदि हा शिवाचा श्रेष्ठ भक्त. ह्याने शिवाने आपल्याला वाहन म्हणून धारण करावे म्हणून त्यांनीच विरचित केलेल्या शिवपंचाक्षरी स्तोत्राने शिवाची तपश्र्चर्या केली होती, महाशिवरात्रीच्या आधी एक आठवडा आणि नंतरचा एक आठवडा मिळून जो पंधरवडा येतो, त्या मध्ये. म्हणून ह्या पंधरवड्याला "नंदिपक्ष" म्हणतात, ज्यात शिवपंचाक्षरस्तोत्राचे पठण करणे अत्यंत श्रेयस्कर आणि कल्याणप्रद मानले जाते. 

तो शिव ’कर्पुरगौर’ आहे - ज्याच्यावर एकही डाग नाही, म्हणजे ज्याच्याकडे मत्सर नाहे, कोणाविषयीही, कोणाचाही मत्सर नाही. तो गिरी शिखरावर राहतो. त्याच्या अंगावर व्याघ्रांबर आहे परिधान केलेले , हातात त्रिशूळ आणि डमरू आहे. त्याचे गण पण साध्या कपडयांमध्ये आहेत. त्यांच्याकडे प्रासाद (मोठाले राजवाडे) नाहीत, कांही नाही. कांही नाही. त्याची स्वत:ची बिल्डिंग नाही. कांही नाही. त्याचे दागिने नाहीत, अगदी कांही कांही नाही, तरी देखिल त्याला कोणाचाही मत्सर नाही आणि कोणाचाही मत्सर नसल्यामुळेच तो महादेव आहे.
शिवापासून मिळवायची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे - " हे शिवा, हे परमेश्वरा माझ्यामध्ये कोणाविषयी जर मत्सर असेल तर तो काढून टाक." कारण मत्सरासारखा शत्रू नाही माणसाचा. मत्सरामध्ये माणसाला जो राग येतो ना, त्या रागापोटीच , मत्सरापोटीच क्रोध उत्पन्न होतो. मत्सरामुळेच जास्त मोह सुटतो, मत्सरामुळेच जास्त लोभ सुटतो, मत्सरामुळेच माजपण येतो. मत्सरामुळेच सगळ्या गोष्टी उत्पन्न होतात. मत्सरामुळेच काम सुध्दा विकृत दिशा धारण करतो. मला ती वस्तो मिळाली नाही, मला ती मुलगी मिळाली नाही , मग ती दुसर्‍याला पण मिळता कामा नये, मग त्या वस्तुचा विध्वंस कर, तिला घाणेरड कर, त्या मुलीच्या अंगावर Acid फेक, तिला जाळून टाक. हा मत्सर आम्हाला कधीच शांत बसू देत नाही. मत्सर नेहमी आमच्या बुध्दीवर कार्य करतो, आमची बुध्दी म्हणजे आमची विवेक बुध्दी निष्प्रभ करतो, हतबल करतो. शिवनाम कुठे कार्य करते ? तर बुध्दीवर काम करतं. " शिवं ज्ञानोपतिष्ठ:" षडरिपु जे आहेत, त्यातले पाच षडरिपु हे मनावर कार्य करतात. मत्सर हा मनावर कार्य करतोच , पण त्याच्यापेक्षा जास्त बुध्दीवर कार्य करतो आणि बुध्दी निष्प्रभ करतो पूर्णपणे. "ॐ नम: शिवाय " हा मंत्र आमच्या मनातील नाही तर आमच्या बुध्दीतला मत्सरपण काढून टाकतो.

शिवाच्या मूर्तीपेक्षा शिवलिंगाचं पूजन का केलं जाते? 
शिवनाम, शिव स्पंदन जी आहेत, ती मनावरून कार्य करीत नाहीत. ती बुध्दीतून कार्यरत होतात. आणि मन कुठेही त्याच्यामध्ये अडकू नाही अशा रीतीची आकृती ऋषींनी तयार केली , ती ’लिंगात्मक’ आहे, जी त्यांनी त्यांच्या तपश्र्चर्येने सिध्द केली. म्हणून शिवलिंगाचे पूजन केले जाते आणि तो भोलानाथ आहे, भोळा आहे - जे आम्ही त्याच्याकडे कधीच मागत नाही म्हणजे "शुध्दता".ती शुध्दता तो आम्हाला देत राहतो.

शिवलिंगाच्या सर्व प्रकारांमध्ये ’वालुकेश्वर’ हे वाळूचे जे लिंग आहे , ते सर्वांत श्रेष्ठ मानलेले आहे. ह्याला कांहे कारण आहे. कारण वाळू बनते कशी? तर समुद्राच्या लाटा खडकांवर आपटून आपटून आपटून जे अभेद्य खडक आहेत, त्यांचा जो चुरा होतो, त्याच्यापासून ही वाळू बनलेली आहे. आम्ही जन्मानुजन्म, जन्मानुजन्म त्या खडकांसारखेच राहिलेलो असतो आणि आमचं मन तसंच दगडासारखं झालेलं असतं. बुध्दी दगडासारखी झालेली असते. 

"वालुकेश्वराचे लिंग" म्हणजे " हा जो आमचा लिंगदेह आहे परमेश्वरा, तो जन्मानुजन्म एकच आहे. देह बाकीचा बदलत असेल पण लिंगदेह तोच राहतो . पुरुष असो की स्त्री असो. आम्ही लहानबाळं म्हणून मेलो की म्हातारे म्हणून मेलो, कांही असो, आमचा लिंगदेह जो आहे तो प्रत्येक जन्मामध्ये सारखाच आहे. त्याचे बाहेरचे रूप, रंग, नांव सगळं बदलतं. ह्या लिंगदेहामध्येच आमचं मन बसत असतं, बुध्दी बसत असते, जी जन्मानुजन्म पुढे चालू राहते. तर हे परामात्मा, हे शिवा , आमच्या बुध्दीचे, मनाचे जे खडक झालेले आहेत, त्याच्यावर तुझ्या कृपेच्या लाटा आपटू देत आणि आमचे खडक चुरुं देत. त्यांचीही अशीच वाळू बनू देत. या वाळूंतून आमचा लिंग देह, हा शिव म्हणजे पवित्र होऊ देत म्हणजे तुझा होऊ देत. म्हणून वाळूचे लिंग "वालुकामय लिंग" सर्वात पवित्र मानलं गेलं आणि महाशिवरात्रीला वालुकामय शिवलिंगाची पूजा सर्वश्रेष्ठ मानली गेली. 

आजच्या ह्या महाशिवरात्रीला "ॐ नम: शिवाय" मंत्र जपत खर्‍या अर्थाने आमच्या जीवनाचे बिल्वपत्र - बेलपत्र वाहू या त्या शिवाच्या चरणी - शिवलिंगावर !


संदर्भ: 
१. सदगुरु डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांचे "ॐ नम: शिवाय" वरील ६ मार्च २००८ रोजीचे प्रवचन
२. सदगुरु डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांचे " शिवपंचाक्षर स्तोत्र " वरील ५ मार्च २००९ रोजीचे प्रवचन
३. सदगुरु डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांचे " महाशिवरात्री " विषयीचे २१.०३.२०१३ रोजीचे प्रवचन
४. सदगुरु डॉक्टर अनिरूध्द जोशी ह्यांचे " महाशिवरात्री " विषयीचे २७.०२.२०१४ रोजीचे प्रवचन
५. मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्र्वर्यवेद्: 



4 comments:

  1. Ambadnya atishay sunder
    Pan shiv murtich poojan n karta shiv lingach poojan ka kartat nahikalal.

    ReplyDelete
  2. महाशिवरात्री बद्दल खूपच छान व सविस्तर माहिती दिलीत, सुनिता. आता "उपाशी दुप्पट खाशी नि जमलं तर शिवाकडे पाहशी". हे थांबवलंच्चां पाहीजे. चांगल्या गोष्टी आत्मसात करायलाच हव्या.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog