Monday 14 March 2016

महादुर्गा सदा विजयते !!!

अखिल विश्वाची दुर्गतिहारिणी तारक संजीवनी -आदिमाता दुर्गा !

नुकतीच महिषासुरमर्दिनी आदिमाता दुर्गा स्तुती वाचनात आली आणि मृकंड ऋषींनी आणि अग्न्यादि देवांनी आदिमातेच्या दुर्गा स्वरूपाची स्तुती ही केवळ स्तुती स्तोत्र नसून तिसर्‍या महायुध्दाच्या खाईपासून अखिल विश्वाला तारणारी ती एकमेव आदिमाता दुर्गाच आहे ह्याचा मनाला १०८ % भरोसा वाटला. 

दुर्गा दुर्गार्तिशमनी दुर्गा ssपत्तिनिवारिणी ।
दुर्गमच्छेदिनी दुर्गसाधिनी दुर्गनाशिनी ।।१।।

दुर्गतोध्दारिणी दुर्गतिहन्त्री दुर्गमा sपहा ।
दुर्गमज्ञानदा दुर्गदैत्यलोकदवानला ।।२।। 

दुर्गमा दुर्गमा ssलोका दुर्गमा ssत्मस्वरुपिणी ।
दुर्गमार्गप्रदा दुर्गमविद्या दुर्गमाश्रिता ।।३।।

दुर्गभीमा दुर्गभामा दुर्गभा दुर्गदारिणी ।
दुर्गमांगी दुर्गमता दुर्गम्या दुर्गमेश्र्वरी ।।४।।

महाभयात् जगत्-तारिणी त्वं जगतां विधात्री ।
विचित्ररूपा sपि चिदेकरूपा हविभाव्यशक्ति: परिपाहि दुर्गे ।।५।।


सध्याचा चिघळत जाणारा जेएनयुचा वाद, मातृभूमीशी प्रतारणा करणारे विद्यार्थ्यांचे अश्लाघ्य, अश्लील वागणे आणि अखिल विश्वाची वंदनीय , पूज्यनीय असणार्‍या आदिमाता दुर्गेविषयीचे ओकले गेलेले गरळ हे पाहताना तळपायाची आग मस्तकात भिनत होती, कानात कोणीतरी तप्त लाव्हा रस ओतावा अशी विदारक मनोस्थिती झाली होती. दशदिशांनी बोकाळलेली अनीती, मर्यादेचे अवाजवी उल्लंघन , सत्य-पावित्र्य-आनंद ह्या मूल्यांना पायदळी तुडविणारे बेछूट, अदांधुंद स्वैराचार हे पाहून मन विषण्ण झाले होते खरे पण आदिमातेचे दुर्गा स्वरूप हेच अंधाराला चिरून प्रकाशाची नवी दिशा देऊ शकते असा दुर्दम्य आशेचा किरणही गवसला खरे आणि नुसत्या आठवल्याच नाही तर साक्षात प्रचिती देऊन गेल्या  ओळी -
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दर्‍या खोर्‍यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश .... 

सर्वत्र काळजाचा थरकाप उडविणारी इतकी भयावह, भीषण परिस्थिती चोहोबाजूंनी उभी ठाकलेली दिसते - युरोपादि देशांमध्ये निर्वासितांच्या दिवसागणिक वाढत जाणार्‍या लोंढयामुळे उद्भवलेल्या अनाकलनीय समस्या, आण्विक अस्त्रांपेक्षाही भीषण नरकयातना भोगायला लावून मरणप्राय जीवन देणारी ’मारिजुआना’ अर्थात "कैनबिस" सारखी  मादक, नशीली द्रव्ये, आण्विक अस्त्रांची जीवघेणी चढाओढ, आधुनिक तंत्रज्ञान हा शाप वाटावा अशी सायबर युध्दे, अंतराळ-युध्दे ह्यातून वाटू लागते आज संपूर्ण विश्व जणू काही आय. सी यू. मध्ये गेले आहे की काय?
आणि मग वाटते विश्वाला दुर्गतीच्या खोल खोल गर्तेत जाण्यापासून ही एकमेवाद्वितीय अशी आदिमाता दुर्गाच तारू शकते. 
श्रीसाईसच्चरिताच्या पहिल्या अध्यायातच आपण वाचतो की सदगुरु साईनाथांनी स्वत: जात्यावर गहू दळून आणि त्याच भरडा दळणातून आलेले पिठ शिरडी गावाच्या वेशीवर टाकून कसे समस्त गावकर्‍यांना महामारीच्या जीवघेण्या संकटापासून मुक्त केले. "जरी हें शरीर गेलो मी टाकून तरी मी धांवेन भक्तांसाठी " हे साईनाथांचे वचन त्यांच्या श्रध्दावान भक्तांना सदैव त्रिकालाबधित हीच ग्वाही देते की " मी तुला कधीच टाकणार नाही." किंवा स्वामी समर्थांची वाणी "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" हेच परम सत्य दाविते की आदिमाता असो की तिचे पुत्र असो सदैव आपले वचन पाळण्यास कटीबध्द असतातच. आदिशंकराचार्य आदिमातेच्या ह्या अपराधांना क्षमा करून उध्दार करणार्‍या, जीवनाचा सर्वांगीण विकास करण्यास प्रेरीत करणार्‍या आदिमातेविषयी उद्गारतात - कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति  ।

श्रीसाईसच्चरित - भाग १८ मध्ये वाचनात आले ते इतके मनाला भिडले की किती सत्य आहे हे की आज अवघ्या जगावरच तिसर्‍या महायुध्दाचे काळे कुळकुळीत ढग घोंघावत आहेत, सर्वच जगामध्ये अशांतीचेच जणू साम्राज्य पसरले आहे आणि विश्वातील प्रत्येक देशवासी हा   अनामिक भीतीने ग्रासलेला आहे. "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे " हे नुसते स्वप्नच उरले आहे आणि मनुष्य मानवधर्म विसरून  मत्सराच्या, असूयेच्या दलदलीत गाडला जात आहे. ह्यात लेखकाने मांडलेले मत तंतोतंत पटले की बाह्य परिस्थितीचे मूळ हे आंतरीक परिस्थीतीत असते. म्हणूनच संत तुकाराम महाराजही आपल्याला सांगतात त्यांच्या रसाळ वाणीतून " शुध्द बीजाचिया पोटी फळे रसाळ गोमटी" जेव्हा मनुष्य मर्यादामार्ग सोडून स्वैराचार अवलंबतो जीवनात तेव्हाच बाह्य आणि आंतरिक अशा सर्वच विश्वाचे संतुलन बिघडते. 

आज सर्वत्र जगात नैसर्गिक आणि मानवनिर्मीत अशा दोन्ही आपत्तींनी सर्वत्र हाहाकार माजविला आहे आणि ह्या सर्वांचे मूळ स्त्रोत म्हणजे मानवाने केलेले मर्यादा उल्लंघन. अनिर्बंध, बेसुमार जंगलतोड, जागेच्या हव्यासापोटी समुद्रकिनांर्‍याची पिछेहाट, मातीशी नाते झिडकारून उभारलेले कॉक्रींटचे जंगल आणि तत्सम गोष्टींमुळे पर्यावरणाचा र्‍हास वाढतच गेला आणि त्यातूनच उद्भवले जागतिक तापमान वाढीचे , विपरीत काळी भेडसावणारे मुसळधार पाऊस, वादळे, पूर ह्यांचे अस्मानी भासणारे संकट !

सत्य-प्रेम -आनंद, पावित्र्य ह्यांच्या मर्यादा ओलांडण्यापासून एकमेव आदिमाता दुर्गाच तारू शकते कारण तिचे नावच मुळी दर्शविते की ती दुर्गती रोखणारी आहे. ती एकमेव आदिमाता महिषासुरमर्दिनीच सर्व दुर्गम कार्ये अत्यंत सहजतेने आणि लीलया करते आणि तिच्याकडेच अशुभाचा विनाश करण्याची अद्भुत ताकद, सामर्थ्य पण आहे तिनेच अशुभाच्या जनकाला महिषासुराला पायाखाली चिरडले, शुंभ-निशुंभाचे निर्दालन केले, तिनेच दैत्यराज रावणाच्या मातामहास दैत्य दुर्गमास मानवाकडून अवध्यत्त्वाचा वर असल्याने स्वत: परशुने छिन्नविच्छिन्न करून प्रभु श्रीरामास "रामवरदायिनी-दुर्गा" रूपात अवतरून विजयाचा वर दिला व अवघ्या मानव समाजाला तारकमंत्र "रामनाम" देऊन "रामो राजमणि: सदा विजयते" ह्याचे वरदान दिले, आणि म्हणून ती एकमेवच "दुर्गतिहारिणी " आहे, तिच्या ह्या मानवी जीवनाला  दुर्गतीपासून तारणार्‍या , नव संजीवनी देणार्‍या आगळ्या वेगळ्या "दुर्गा " रूपाच्या चरणी मानवाने सदैव नतमस्तक व्हावे ह्यातच जीवनाची खरी इतिकर्तव्यता सामावली आहे ....

म्हणूनच आदिमातेचे पुत्र प्रथम ज्येष्ठ पुत्र श्रीगुरुदत्तात्रेय, कनिष्ठ पुत्र परमात्मा परशुराम हे आदिमाता दुर्गेलाच सदैव "चण्डिका" ह्या नावाने संबोधतात कारण ह्या परमेश्वरीचे कार्य तीन्ही स्तरांवर अगदी आरंभापासूनच सदैव अभावाचे कारण दूर करणारे आहे.
’चण्ड’ म्हणजे अभाव, ’चण्डि’ म्हणजे अभाव दूर करणारी. ’चण्डक’ म्हणाजे अभाव उत्पन्न करणारा अर्थात अभावाचे कारण आणि ’चण्डिका’ म्हणजे अभावकारण दूर करणारी.
गायत्री रूपाने ही परमेश्वरी चण्डिका ज्ञानाचा अभाव करणारे कारण म्हणजेच ’आवरण’ अर्थात सत्याचे झाकलेपण दूर करतेव त्यासाठी वेदमाता अर्थात ज्ञानमाता बनते.
महिषासुरमर्दिनी आणी दुर्गा रूपाने ही परमेश्वरी शुभाचा अभाव करणारे कारण म्हणजेच ’दुर्मल’ अर्थात पावित्र्याचा संकोच, पावित्र्याची बंधित अवस्था दूर करते व त्यासाठी रणमाता अर्थात अपत्यसंरक्षक आक्रमक माता बनते.
तर अनसूयारूपाने हीच परमेश्वरी चण्डिका परमेश्वरी भक्तीचा व श्रध्देचा अभाव करणारे कारण म्हणजेच ’विकल्प’ आणि ’विक्षेप’ दूर करणारी अर्थात नीतीशून्य स्वार्थी वृत्ती दूर करते व त्यासाठी अपत्यावर उचित संस्कार करणारी वत्सल माता बनते.

अशा ह्या वत्सलमातेला साद घालून आळवू या -
सर्वत्र दिसती जीवाणु नाना ।
विषहारी विषारी मज उमगेना ।
कैसे रहावे घर सापडेना ।
हे माते दुर्गे तूच आता तार तुझ्या ह्या बालकाला....

श्रीसाईसच्चरितात सदगुरु साईनाथ म्हणूनच म्हणतात -
आई ती आई बहु मायाळू । लेंकरालागी अति कनवाळू।  परी लेंकरेंच निघता टवाळू । कैसा सांभाळू करी ती ।।
आजही आपण पाहतो कन्हैयाकुमार , उमर खालिद आणि औव्वासी सारखे नराधम सज्जनपनाचे बुरखे पांघरून त्याच जगज्जननी दुर्गा मातेविषयी किती अश्लील गरळ ओकतात आणि काहीजण तथाकथित बुध्दीवादी म्हणून त्यांचा उदोउदो करून सामान्यांची दिशाभूल करीत आहेत. म्हणूनच एका श्लोकीमधील ही प्रार्थना माते दुर्गे , आदिमाते तुझ्या चरणी अर्पाविशी वाटते...            

जगी नाचते सैन्य ते दानवांचे ।  शिरी लाविती मुंडके सज्जनांचे ।।
तुझिया पदी अर्पितो शुध्द भाव । खलमर्दनाचा जाणूनि तुझा माव ।।
हे आई , हे जगज्जननी आदिमाते दुर्गे, जगामध्ये दानवांचे सैन्य नाचत आहे आणि शिरी मात्र मुंडके सज्जनांचे ते लावतात (आणि त्यामुळे आम्हां सामान्य मानवांची कुतरओढ होते मनाची , भले ही आम्हांला काही समजत नसेल पण तू हे जाणतेस माते.) म्हणूनच तुझा खल प्रवृत्तींचे मर्दन , समूळ विनाश करण्याचा माव( लीला) जाणूनच मी तुझा दास तुझ्या चरणी माझा शुध्द भाव अर्पण करत आहे.


महादुर्गा सदा विजयते !!!
जय जगदंब जय दुर्गे !!!
प्रसीद परमेश्वरी !
संदर्भ :
१.  http://www.pratyaksha-mitra.com/
२.  मातृवात्सल्यविंदानम् अर्थात् मातरैश्र्वर्यवेद्: 
3.  श्रीसाईसच्चरित
      

3 comments:

  1. Apratim Sunitaveera.. khup sundar mahiti.. agdi pratyekachya manatil vichar mandle ahet... Ambadnya

    ReplyDelete
  2. आपल्या लेखाने पुढची दिशा लक्षात आली. जगी नाचते सैन्य ते दानवांचे शिरी लावते मुण्डक सज्जनांचे एकदम मार्मिक

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog