Tuesday 25 July 2017

घरे व उंच इमारतीं मधील अग्निसुरक्षेबाबत अजूनही उदासीनता !

मागील जून महिन्यात  लंडनमध्ये ग्रीनफेल टॉवर या इमारतीला लागलेल्‍या भीषण आगीत ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर ३० जण गंभीर जखमी झाल्‍याची बातमी आली.लंडन अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावर लागलेली आग २७ व्या मजल्यापर्यंत पोहचली. इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी ४० अग्‍निशमन दलाच्या गाड्या आणि २०० जवान प्रयत्न करत होते ह्यावरून ह्या भीषण आगीची व्याप्ती किती जबरदस्त होती हे ध्यानात येते. 
                                                                     
लंडन येथील आग
त्या पाठोपाठ नुकतेच जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात सौदी अरेबिया मधील एका खिडकीविरहीत घराला आग लागून त्यात तेथे राहणार्‍या १० भारतीय कामगारांचा मृत्यू झाला असल्याची बातमी आणि त्यानंतर लगेचच होनोलुलु , हवाई येथील मार्क पोलो अपार्टमेंट्स ह्या ३६ मजली इमारतीतील २६ व्या मजल्यावर आग लागून त्यात ३ जणांचा मृत्यु ओढावल्याची बातमी ट्विटरवर वाचली. ह्या उंच इमारतीमध्ये स्प्रिंकलर सिस्टीम नसल्याने १०० अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असूनही ती लवकर विझवू शकले नाही. १९७४ पूर्वी बांधलेल्या उंच इमारतींमध्ये "फायर कोड" च्या नियमा प्रमाणे स्प्रिंकलर सिस्टीम असणे बंधनकारक नव्हते आणि ही इमारत १९७१ साली बांधून पूर्ण झाली होती असे "सीएनएन" ह्या वृत्त वाहिनीवर म्हटले आहे. 
                                                                             
होनोलुलु येथील आग
यावरून राहत्या घरांमधील, विशेषत:  उंच गगनचुंबी इमारतीं मध्ये आगीबाबत कितपत सुरक्षा पाळली जाते हा मुद्दा विचारात घ्यावासा वाटतो.

दरवर्षी १४ अप्रिल हा अग्निशमन दिवस म्हणून साजरा केला जातो , अग्निशमन सुरक्षेवर व्याख्याने, प्रात्यक्षिके आयोजित केली जातात व त्यानंतर मात्र परत कधीतरी अशीच भीषण आगीची घटना होईपर्यंत सर्वकाही विसरून परत एकदा दैनंदिन कामात सर्व जण मग्न होऊन जातात.

९ मे २०१५ रोजी "गोकुळ निवास " ह्या काळबादेवी, मुंबई येथील ५० वर्षाहून जुन्या लाकडी बांधणीच्या पाच मजली इमारतीमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये काही  अग्निशमन दलाचे अधिकारी भीषण आगीशी तोंड देताना वीरगतीस प्राप्त झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर उंच इमारती , निवासस्थाने ह्यांतील आगीबाबतच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. 

काळबादेवी येथील आग
महाराष्ट्र राज्याचे अग्निशमन सल्लागारांच्या चिकाटी, पाठपुरावा व अथक परिश्रमाने महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ६ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन सुरक्षा उपाययोजना अधिनियम २००६ तसेच त्या अनुषंगाने २३ जून २००९ पासून महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवन सुरक्षा उपाययोजना नियम २००८ लागू केला होता. गॅस सिलेंडरचा स्फोट, पाइप गॅसची अव्यवस्थित हाताळणी, ज्वालाग्राही पदार्थ घरात ठेवणे, सिगारेट इत्यादींमुळे आग लागण्याचे प्रकार घडतात. राष्ट्रीय सुरक्षा परिषद (National Safety Council), केंद्रिय विद्युत प्राधिकरण (CEA) अशा मान्यवर संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणाप्रमाणे एकूण आगीच्या घटनांपैकी फक्त ४० ते ४५ टक्के आगी या इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटने लागतात,असे विधान त्यांच्या कार्यक्रम अंदाजपत्रकात केले असल्याचे समजते. म्हणजेच बाकीच्या आगीच्या घटना या अन्य कारणांमुळे जसे- गॅस सिलेंडरचा स्फोट, पाइप गॅसची अव्यवस्थित हाताळणी, ज्वालाग्राही पदार्थ घरात ठेवणे, सिगारेट इत्यादींमुळे घडतात हे स्पष्ट होते. तरीही शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगी जर कमी झाल्या तर ४० ते ४५ टक्के नुकसान व जीवितहानी टळू शकते, नाही का? ते साध्य करण्यासाठी सर्व ठिकाणची विद्युत संचमांडणी ही विद्युत अधिनियम- २०१० प्रमाणे ठेवणे अनिवार्य आहे. नंतर अग्नि सुरक्षेकरिता National Building Code 2016 हा लागू करण्यात आला असे वाचले होते.

सुजाण व सुशिक्षीत म्हणविणार्‍या नागरिकांनीही त्याकडे डोळेझाक केल्याने आणि इतर सर्वांच्याच या विषयातील उदासिनतेमुळे ज्याप्रकारे या कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे त्याप्रकारे ती होत नाही. आजमितीला तरी ह्या कायद्याच्या अंमलबजावणीची  अत्यंत निकडीची गरज आहे असे चित्र दिसत आहे.

सर्वसामान्य जनतेचा असा समज आहे की, सर्वात जास्त आगी या कारखाने, कार्यालये अथवा इतर ठिकाणी लागतात व या आगीमध्ये जास्तीत जास्त माणसे जखमी व मृत होतात; पण हे समीकरण एकदम उलट आहे. विशेष आश्चर्याची बाब म्हणजे आज सर्वात जास्त आगी या राहत्या वस्तीतील असून या आगीमध्येच जखमी व मृताची संख्या सर्वात जास्त असते व त्याची महत्त्वाची कारणे असतात विद्युत उपकरणे व स्वयंपाकघरातील निष्काळजीपणा आणि अगिशमनाबद्दलचे अज्ञान.

सर्वसामान्य नागरिकांना प्रशिक्षण देऊन स्वयंसेवकाची फौज (Volunteer Force) निर्माण करण्यामुळे ह्या आगीविषयक प्रतिबंधक उपाय योजना करण्यासाठी नक्कीच मोलाचा हातभार लागू शकतो. अग्निशमन करणार्‍या जवानला पहिल्या दिवसापासून शिकवण्यात येते की आग विझवणे म्हणजे आगीचे मूळस्थान शोधून काढून कमीत कमी वेळात व कमीत कमी नुकसानात आगीवर ताबा मिळवणे व सर्वप्रथम अडकलेल्यांची सुटका करणे. मग एक सामान्य सुजाण नागरिक म्हणून आपणही प्राथमिक स्वरूपाच्या आगीवर नियंत्रण नाही का करू शकत? नक्कीच करू शकतो!

आग लागल्यावर जर आपल्याला आग विझवण्याबाबतचे ज्ञान असेल तर आपण प्राथमिक स्वरूपाच्या आगीवर ताबा मिळवून आग विझवूच, शिवाय होणारे मोठे नुकसानही टाळू शकू, त्यासाठी आपल्याला काही छोटया छोटया गोष्टी माहीत असणे गरजेचे असते.

आग कुठल्या प्रकारची आहे, यावर आग विझवण्याच्या पद्धती अवलंबून असतात. जगातील सर्व अग्निशमन सेवा आग विझवण्यासाठी थंड करणे, उपासमार करणे, दडपणे या तीन पद्धतीने आगीवर नियंत्रण करतात.  प्रशिक्षण देताना आगीचा त्रिकोण व आग विझवण्याचा त्रिकोण हा महत्त्वाचा मानतात. 
आपणही याचा थोडासा अभ्यास केल्यास सहजपणे आगीवर नियंत्रण मिळवू शकतो. आगीचा त्रिकोण म्हणजे उष्णता, हवा व जळाऊ पदार्थ या तीन गोष्टी योग्य प्रमाणात एकत्र आल्या तर आग लागते व हीच आग नियंत्रणाबाहेर गेली की, त्यावर लगेच नियंत्रण मिळवणे गरजेचे असते. ही नियंत्रणाबाहेरील आग प्राथमिक अवस्थेत नियंत्रणात आणली तर नुकसानही कमी होऊ शकते.

या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी आगीच्या त्रिकोणातील घटकांपैकी एक अथवा दोन अथवा तीनही गोष्टींवर नियंत्रण करता आले तर आग विझते, व त्यालाच म्हणतात आग विझवण्याचा त्रिकोण म्हणजे थंड करणे, दडपणे व आगीची उपासमार करणे. आगीची उष्णता कमी करायची असेल, तर पाण्याचा वापर करा व आगीला थंड करा. जळणा-या पदार्थाच्या जवळील इतर जळाऊ पदार्थ बाजूला करा अथवा जळणारा पदार्थच बाजूला करा, त्यामुळे होणारे नुकसान कमी होऊ शकते, म्हणजेच काय तर आगीची उपासमार करा.

आपल्याला सर्वांना माहीतच आहे की शाळेत आपल्याला शिकवले जाते की आपल्या कपडयांना आग लागल्यास जमिनीवर लोळा अथवा ब्लँकेट/ चादर घट्ट लपेटून घ्या.
साधे घरगुती स्वयंपाक घरातील उदाहरण बघायचे झाले तर कढईमधील तेलाला आग लागल्यास गृहिणी पटकन त्या कढईवर झाकण टाकते म्हणजेच आगीचा संपर्क हवेपासून तोडला जातो व आग दडपून विझवली जाते. इलेक्ट्रिक केबल अथवा वायरिंगला आग असेल तर सुकी वाळू अथवा योग्य ते एक्स्टिंग्विशर वापरले जाते, या प्रकारातही हवेचा संपर्क आगीपासून तोडला जातो व नंतर आगीवर ताबा मिळवला जातो व विद्युत पुरवठा बंद करून आगीवर नियंत्रण मिळवले जाते.

अग्निशमनासाठी उंच इमारती, कारखाने व्यावसायिक इमारतीमध्ये विविध प्रकारची अग्निशमन यंत्रणा बसवलेली असते व ही यंत्रणा तेथील प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व अग्निशमन विभागातील कर्मचा-यांना कशा प्रकारे वापरावी याची पूर्णपणे माहिती असणे गरजेचे असते; परंतु सामान्य नागरिकांनीही प्राथमिक स्वरूपाच्या आगीमध्ये योग्य प्रकारचे एक्स्टिंग्विशर्सचा वापर योग्य प्रकारे केल्यास आग नियंत्रणात ठेवणे सहज शक्य असते. एक्स्टिंग्विशर्स ही इमारतीमधील त्या ठिकाणच्या धोक्यानुरूप ठेवण्यात येतात व इमारतीमधील रहिवाशांनी प्राथमिक स्वरूपाच्या आगीवर त्यांचा वापर करावा हाच खरा उद्देश असतो.

सर्वसाधारणपणे ड्राय पावडर केमिकल एक्स्टिंग्विशर्स किंवा ए.बी.सी. ड्राय पावडर केमिकल एक्स्टिंग्विशर्स सर्वत्र ठेवलेली आढळतात, कारण कुठल्याही प्रकारच्या आगीवर सहजपणे त्यांचा वापर करता येतो, परंतु आगीच्या वर्गीकरणानुरूप चार प्रकारची एक्स्टिंग्विशर्स प्रचलित आहेत. लाकूड, कपडा, कागद इत्यादीच्या आगीसाठी वॉटर सीओटू प्रकारचे एक्स्टिंग्विशर्स वापरतात, ज्यामध्ये पाणी सीओटू वायूच्या दाबाने बाहेर पडून आग थंड करून विझवली जाते.

फोम प्रकारचे एक्स्टिंग्विशर्स तेलाच्या किंवा द्रव पदार्थाच्या आगीवर नियंत्रण करण्यासाठी वापरले जाते. यामध्ये साबणाच्या फेसासारखा पदार्थ तेलावर तरंगून दडपून आग विझवली जाते. सीओटू एक्स्टिंग्विशर्स अथवा ड्राय पावडर केमिकल एक्स्टिंग्विशर्स वापरताना आगीला मिळणा-या हवेचे प्रमाण कमी करून आग विझवली जाते.

एक्स्टिंग्विशरवर लिहिलेल्या सूचनांचे पालन करून ही उपकरणे सहजपणे कोणीही वापरू शकतो; परंतु त्यासाठी त्यांची योग्य ती देखभाल व त्यावरील वापरासंबंधीच्या सूचनांकडे इतर वेळी लक्ष देणे तेवढेच आवश्यक नाही का? पण इथेच आपण चुकतो व त्याकडे दुर्लक्ष करतो. "दात आहेत तर चणे नाही व चणे आहेत तर दात नाही " ह्या म्हणीनुसार अग्निशमन उपकरणांची देखभाल नीट केली गेली नसेल तर आगीच्या वेळी त्यांच्या योग्य तो वापर आपण करू शकत नाही.
अग्निसुरक्षा फक्त अग्निसुरक्षा उपकरणे बसवून पूर्ण होत नाही, त्यासाठी हवी असते इमारतीच्या आराखडयाला मंजुरी घेतानाच इमारतीच्या सुरक्षतेबाबतच्या उपाययोजनेचे नियोजन.

इमारतीच्या बांधकामाच्या आराखडयाला मंजुरी घेताना अग्निसुरक्षेचे व त्यावरील उपाययोजनांचे नियोजन आवश्यक असते. ह्यामध्ये अ‍ॅक्टिव्ह व पॅसिव्ह या दोन प्रकारच्या यंत्रणा असतात. पॅसिव्ह प्रकारात इमारतीमध्ये Emergency मध्ये निवाशांना सुटकेसाठी एकत्रित होण्यासाठी योग्य मोकळी जागा, जिने, दरवाजे कॉरिडोर, पॅसेजेस, लिफ्ट लॉबी, बांधकामाची उंची, वायुविजन, रिफ्जुय एरिया इत्यादी अनेक गोष्टींचा समावेश असतो. १०-११ मजली इमारतींमध्ये अशी मोकळी जागा ६त ८ मजल्यां दरम्यान एखाद्या मजल्यावर ठेवता येऊ शकते. दुसरा भाग अ‍ॅक्टिव यंत्रणा, यामध्ये पाण्याची आगीच्या वापरासाठी असलेली टाकी, रायझर सिस्टीम, हायड्रन्ट,  स्प्रिंकलर सिस्टीम , होजरिल इत्यादी अनेक यंत्रणेचा समावेश असतो. या सर्वांचा वापर प्रत्यक्ष आग विझविण्यासाठी केला जातो.

ह्या यंत्रणांची योग्य प्रकारे निगा व काळजी न घेतल्यास प्रत्यक्ष दुर्घटनेच्या वेळी या यंत्रणा पूर्णपणे कुचकामी ठरतात व त्यामुळे अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविताना दुसर्‍या अडचणींना तोंड द्यावे लागते. ह्याची सभानता ठेवणे व काळजी घेणे आपल्याच फायद्याचे असते.

आजही कित्येकांना अजूनही माहिती नाही की, उंच इमारतीतील Fire Lift ही दुर्घटनेच्या वेळी अग्निशमन कर्मचा-यासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक असून इमारतीमधील रहिवाशाने जिन्याचा वापर स्वत:च्या सुटकेसाठी करावयाचा असतो.

थोडक्यात बघायचे झाले तर -
आग लागल्यानंतर घ्यावयाची खबरदारी -
* आग लागल्यावर प्रथम घरातील मेन स्विच बंद करावा व मगच पाणी न वापरता कार्बनडाय ऑक्साइड, कोरडी रेती यांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करावा.
* त्यापूर्वी १०१ नंबरवर फोन करून फायर ब्रिगेडला कळवणे.
* अर्थिग कार्यक्षम राहील याची दक्षता घेणे.
* घाबरून न जाता जिथे शॉर्ट सर्किट झाले आहे, तो भाग मुख्य संचमांडणीपासून अलग ठेवणे व  स्पर्श टाळणे.
* घरात व जिन्यांमध्ये पसरणाऱ्या धुरापासून सुरक्षित राहण्यासाठी उभे न राहता वाकून चालणे किंवा सरपटणे.
* पायात रबरी स्लीपर्स व हातात लाकडी काठी घेऊनच कुठल्याही बटनास हात लावणे, अन्यथा रिटर्न करंटची भीती असते

* उंच इमारतीमध्ये आग लागल्यास लिफ़्टचा वापर टाळणे व शक्यतो जिन्याने खाली उतरणे.
* फायर ब्रिगेडच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करून धोक्यापासून दूर व्हावे.

आजच्या या आधुनिक जगात अद्ययावत अग्निशमन यंत्रणा बिल्डिंग मॉनिटरी सिस्टीमद्वारे सुद्धा नियंत्रणात ठेवता येऊ शकतात असे वाचनात आले होते.परंतु त्यासाठी आपल्याला अग्निसुरक्षेबाबतच्या जागरूकतेत बदल करून सभानता बाळगायला हवी, नाही का ?

1 comment:

  1. Thank you for the Very important and useful guidance on FIRE, Suneeta.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog