Thursday 20 July 2017

वणवे ,जंगलतोड आणि जागतिक तापमानवाढ

दैनिक प्रत्यक्षच्या दिनांक २ जुलै २०१७ रोजीच्या अंकातील जितेंद्र पाटील ह्यांचा "जंगलांना लागणारे वणवे आणि वातावरण " हा लेख हा खूपच दु:खद आणि धक्कादायक  बातमी देणारा !

पोर्तुगालमध्ये १७ जून २०१७ च्या रात्री जंगलांमध्ये भीषण आग लागली होती आणि त्या आगीवर अथक प्रयत्नांनी ५ दिवसांनंतर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने सुमारे ६५ जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले तर ५० हजार हेक्टर वनक्षेत्र बेचिराख झाले. 
                                                               


जागतिक तापमानवाढ आणि त्यास कारणीभूत असणार्‍या कार्बन  डायऑक्साईड व तत्सम वायूंच्या उत्सर्जनात होणाऱ्या वाढीची गती रोखण्यासाठी जंगलांचे किती महत्व आहे हे आपण सारे जाणतो. पोर्तुगालमधील जंगलात लागलेल्या आगीतून निर्माण झालेल्या राखेचे अंश स्वित्झर्लंडमध्ये मिळाले हे वाचल्यावर लक्षात आले की  जंगलात लागणारे वणवे  हे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढविण्यास अधिक हातभार लावतात. म्हणजेच जंगलातील वणवे हे शक्यतोवर लागू न देण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे व हे वणवे लागल्यास त्यांची आग लवकरात लवकर आटोक्यात आणणे व त्यासाठी आवश्यक उपाय योजना करणे हे ही तितकेच महत्त्वाचे असल्याचे ध्यानात आले.

नुकतेच १ जुलै रोजी वनमहोत्सव साजरा करण्याच्या निमीत्ताने सुजाण. संवेदनशील नागरिक, सेवाभावी संस्था, वृक्षप्रेमी संघटनानी  वृक्षारोपणाचे कार्यक्रम पार पाडल्याच्या अनेक बातम्या वाचनात आल्या, खरोखरी ही स्तुत्य गोष्ट आहे. तथापि आपण कितीही प्रमाणात झाडे लावली तरीदेखील जोपर्यंत आपण अस्तित्त्वातआहे ती जंगले , डोंगर नाहीसे करणारी प्रक्रिया थांबवत नाही , म्हणजे जंगलतोड करून जंगल कमी करण्यास प्रतिबंध करावयाचे , जंगलातील आगींमुळे जंगलांचे घटणारे प्रमाण कमी करावयाचे,  डोंगराच्या पायथ्याशी होणार्या खाणकामामुळे होणारे डोंगरांचे खच्चीकरण थांबवण्याचे उपाय योजत नाही तोपर्यंत आपल्या झाडे लावण्यामागचा तापमान वाढ रोखण्याचा मूळ हेतू साध्य होतं  नाही असे वाट्ते.

डिसेंबर महिन्यात पॅरिस येथे युनोतर्फे जगातील १९६ देशांच्या प्रमुखांची परिषद झाली होती ज्यातील ‘पॅरिस कराराच्या’ दस्तावेजात म्हटले आहे की, “वातावरणातील बदल हे तातडीचे, अत्यंत धोकादायक स्वरूपाचे अपरिवर्तनीय स्वरूप धारण करीत असलेले संकट आहे. सर्व मानवजातीने सहकार्याने व एकत्र प्रतिसाद देऊन कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करणे जरुरीचे आहे.”
“सर्व देशांनी वार्षिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी सन २०२० पर्यंत घेतलेल्या प्रतिज्ञेच्या अमलबजावणीतील त्रुटीची गांभीर्याने दखल घ्यावी. उद्योगपूर्ण काळाच्या (१९५०) तुलनेत तापमानात २० सें. ची वाढ होऊ नये आणि झालेली वाढ १.५ सें. पर्यंत कमी करावी अशा रीतीने गांभीर्याने प्रयत्न करावे.”
हा करारातील भाग वाचून मानवजातीच्या जबाबदारीची जाणीव आपल्याला होईल.

वाचनात असे आढळले की नासाचे माजी संचालक डॉ. जेम्स हेनसेन यांच्या ‘स्टोर्म्स ऑफ माय ग्रँडचिल्ड्रन’ या पुस्तकात म्हटले आहे की, “सध्या होत असलेली वातावरणातील कार्बनची वाढ अभूतपूर्व व अत्यंत चिंताजनक आहे”. “सध्या दरवर्षी ६०० कोटी टन कार्बनची वाढ होत आहे. पृथ्वीवर आतापर्यंत आलेल्या सर्वात वेगवान उष्णयुगात साडेसहा कोटी वर्षांपूर्वी, कार्बनच्या वाढीचा वेग दहा हजार वर्षांत ३०० कोटी टन असा होता. सध्या आपण त्या उष्णयुगाच्या तुलनेत एका वर्षात २० हजार वर्षे ओलांडत आहोत.” दि. १२ मे-२०१३ रोजी वातावरणातील कार्बनने ४०० पीपीएम (१ पीपीएम = ३०० कोटी टन) ही धोक्याची पातळी ओलांडली आहे. साधारण १२ मे-२०२३ पर्यंत २० पीपीएमची वाढ होईल. या काळात तापमानवाढ अनियंत्रित होऊ शकते, असा तज्ञांचा अंदाज आहे. याचा अर्थ पृथ्वीवर आणीबाणीची स्थिती आहे. अहवाल म्हणत आहे की, कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याची गरज आहे; कारण, एकदा वातावरणात गेलेला कार्बन एक हजार वर्षे टिकतो.
‘हेनसेन’ यांनी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहीले आहे की, “वातावरणातील हा बदल महाविस्फोटक स्वरूपाचा आहे. ही मानवजातीला वाचवण्याची शेवटची संधी आहे. तापमानवाढ अनियंत्रित झाल्यास या शतकात मानवजात व पृथ्वीवरील बहुतांश जीवसृष्टी नष्ट होईल.”
पुढे हेनसेन म्हणतात की, “जनतेची समज आणि वैज्ञानिक सत्य यात प्रचंड दरी आहे. आता कुठे थोड्याशा जनतेला तापमानवाढीची जाणीव होत आहे; मात्र, त्याचवेळी या संबंधित शास्त्रज्ञांना, ज्यांना ते काय व कशाबद्दल बोलत आहेत याची माहिती आहे, ते समजून चुकले आहेत की, पृथ्वीची वातावरणीय व्यवस्था कडेलोटच्या क्षणाला पोहचलीय.”
अजून एक उदाहरण वाचनात आले की -
‘गाम्बिया’ ह्या आफ्रिकेतील देशातील विकासामुळे  १९८१ पासून पुढील बारा वर्षात झालेल्या कॉंक्रीटीकरण, शहरीकरण आणि जंगलांच्या नाशामुळे पावसाचे प्रमाण सुमारे १४०० मि.मी.वरून निम्म्यापेक्षा कमी म्हणजे सुमारे ६०० मि.मी. एवढे कमी झाल्याचे नमूद केले आहे.

ह्यावरून जंगलांचे घटणारे प्रमाण हे तापमान वाढीत किती मोठा हातभार लावतात हे कळते.
                             
आपण मानवानेच लोभापोटी केलेल्या बेसुमार जंगलतोडीने, तसेच जंगलातील वणव्यांनी  वातावरणावर किती दुष्परिणाम होतात  हे जाणून आता तरी जंगल वाचविण्याचा प्रभावी उपाय आपण योजलाच पाहिजे.जागतिक तापमानवाढीच्या समस्येच्या अक्राळविक्राळ स्वरूपासमोर सर्वतोपरीने लढणे  आवश्यक असल्याने झाडे लावण्यावरोबरीनेच जंगलातील झाडे वाचविणे, त्यांचे आगींपासून संरक्षण करणे हे ही  अपरिहार्य ठरत आहे असे चित्र सध्या तरी दिसत आहे.

3 comments:

  1. अतिशय अभ्यासपूर्ण आणि विचार करायला लावणारा लेख आहे. काही दिवसांपूर्वी याच जागतिक तापमान वाढीच्या परिणामस्वरूप अंटार्कटिकावरील ग्लेशियरचे विभक्त होण्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याचा परिणाम समुद्र पातळीवर होणार असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ज्यांच्या हजारों किलोमीटर लांबीच्या किनारपट्ट्या आहेत असे सर्व देश व बेटे अत्यंत चिंताक्रांत आहेत. कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी सरकारी व सार्वजनिक पातळीवर अथक प्रयास चालू आहे. असंख्य एनजीओज यावर काम करत आहेत असे दृश्य आहे परंतु बहूतांशी संस्था विकसनशील व प्रगतिशील देशात विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करणे व देशांतर्गत अस्थिरता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील दिसतात उदाहरणार्थ ग्रिन पीस फाऊंडेशन. यासाठी जनतेतील असंतुष्ट आणि अशिक्षित तसेच समाजविघातक घटकांना, भ्रष्ट नेत्यांना आणि पेड मिडिया व सोशल मीडिया यांना हाताशी धरून हे काम सुरू आहे. हातावर मोजण्याइतक्या सेवाभावी संस्था व माणसंच भरीव योगदान देताना दिसतात. सुसंघटीत, सुसज्ज आणि ध्येय पूर्ण काम करणाऱ्या संस्था आवश्यक आहेत. तसेच वैयक्तिक पातळीवर जीथे शक्य आहे तिथे प्रत्येक व्यक्ति स्वयंशिस्तीने हा प्रयास नक्की करु शकते. असेच ठोस प्रयास अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेन्ट या एनजीओ अंतर्गत गेली कित्येक वर्षे वृक्षारोपण तसेच कागदाच्या लगद्यापासून ईकोफ्रेंडली गणेश मूर्ती सेवा केली जाते. एकदम मोठा घास न घेता स्थानिक पातळीवर अशा छोटय़ा उपक्रमांद्वारे आपण या जागतिक समस्येवर उपाययोजना करु शकतो. मी दैनिक प्रत्यक्षचा वाचक आहे आणि हा पेपर इतरांपेक्षा वेगळा आहे कारण यात मला हव्या त्या नाही तर माझ्यासाठी आवश्यक अशा विविध विषयांवर महत्वपूर्ण स्थानिक व आंतरराष्ट्रीय बातम्या व स्तंभलेख असतात. अशाच एका अप्रतिम माहितीपूर्ण लेखासंदर्भात हे विचार मांडले आहेत. धन्यवाद!

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog