Sunday 1 July 2018

ह्या साईची ऐसीच रीती । अघटित लीला अद्भुत कृती ।।

ह्या साईची ऐसीच रीती । अघटित लीला अद्भुत कृती ।।
आज दैनिक प्रत्यक्षच्या जपाची ओवी वाचली आणि मन नकळत माझ्या लाडक्या सदगुरुमाऊलीच्या साईनाथांच्या अपार प्रेमात न्हाऊन निघाले . "न्हाऊ तुझिया प्रेमे  अनिरूध्द प्रेमसागरा । माझ्या भक्तनायका । थेंब एक हा पुरा अवघे न्हाण्या ।। " ह्या एका अभंगाच्या कानी पडलेल्या ओव्या सुध्दा साईनाथांचे हेच भक्तांवर असलेले अपार, अगाध , अनिरुध्द असे प्रेम च दावितात , नाही का बरे? वयाच्या ७व्या वर्षी आपल्या पित्याने दिलेल्या श्रीसाईसच्चरित ह्या अमूल्य अपौरूषेय ग्रम्थाला ज्यांनी उराशी घट्ट कवटाळले आणि साईनाथांवर अनन्य भावाने प्रेम केले त्या श्री सुरेशचंद्र दत्तोपाध्ये ह्या श्रेष्ठ, महान साईभक्ताचा हा स्वानुभावातून साकारलेला अभंग खरोखरीच साईमाऊलीचा भक्तांलागीचा अगाध कळवळा, ओतप्रोत दुथडी भरून वाहणारा प्रेम पान्हाच दर्शवितो.

बाबासाहेब तर्खड ह्यांची श्रीसाईसच्चरितातील अध्याय ९ मधील कथा आठवली.  बाबासाहेबांना साईचरणी अतुलनीय प्रेम होते , त्यांच्या घरी भव्य चंदनी देव्हार्‍यात साईनाथांची आलेख्य प्रतिमा होती व जिचे तीन्ही त्रिकाळ पूजन ही होत असे. तर्खड मोठे पुण्यवान होते की त्यांचा पुत्र ही साईभक्तीत एवढ रममाण झालेला होता की साईंस नैवेद्य समर्पण केल्या शिवाय तो अन्न ग्रहण करीत नसे. त्याचा नित्य क्रम म्हणजे  तो  रोज सकाळी प्रात:स्नान करून, कायावाचामनाने  नित्य साईनाथांच्या छबीचे  पूजन करीत असे व भक्तीभावाने नैवेद्य समर्पण करीत असे व हा त्याचा क्रम अविश्रम चालला असता, त्याला सफळ संपूर्णता देण्यासाठीच जणू काही नटनाटकी साईमाऊलीने अघटित लीला रचली. त्याची आई देखिल साईबाबांची परम भक्त होती, जिला शिरडीस जाऊन  साईनाथांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची  उत्सुकता मनी दाटली होती. शेवटी वडिलांनी पूजा करून नैवेद्य अर्पण करण्याचे कबूल केल्यावर तो मुलगा आईला घेऊन शिरडीला गेला. मुलाचे वडील प्रार्थनासमाजिष्ट असल्याने त्यांना मूर्तीपूजेचे वावडे होते . पण आपल्या पत्नीवरील प्रेमाखातर आणि मुलाला दिलेल्या शब्दाबद्दल त्यांनी साईंना रोज खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायला सुरुवात केली तसेच प्रांजळपणाने साईचरणीं आपल्याकडून कवाईत घडू नये  व मुलाप्रमाणे प्रेमाने पूजा घडावी म्हनून साईचरणीं आपले मनोगत निवेदन करून साईंबद्दल अंतरीं प्रेम मागायला देखिल ते चुकले नाहीत. अशा प्रेमळ भक्तीमान कुटूंबीयांना साईनाथ कधीच टाकत नाही कारण त्याची मुळी भक्ताला ग्वाहीच दिलेली असते- शरण मजसी आला अन् वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी !   
                                                                           

मूर्तीपूजा करायला कष्ट होत असतानाही तर्खडकरांनी जी साईबाबांना प्रेमाने साद घातली त्याला ही कनवाळू, परम दयाळू , प्रेमळ साईमाऊली न भुलली तोच नवल ! हेमाडपंतांनी कथिल्याप्रमाणे माणसाच्या मनाची कळी उमलायला सगुण साकाराची भक्ती करणे हाच एकमेव रामबाण उपाय! प्रार्थनासमाजिष्ट वडीलांना सगुण साकार परमात्म्याच्या भक्तीची गोडी चाखायला लावण्यासाठी साईनाथ एक अघटित लीला रचतात. वडिलांकडून एके दिवशी कामाच्या व्यापात मन गुंतले असल्याने साईनाथांना नैवेद्य अर्पण करण्याचा विसर पडतो. अर्थातच जेवायला बसताना रोजची नैवेद्याची शर्करा न मिळाल्याने वडीलांच्या लक्षांत आपली चूक येते, तत्क्षणी ते भरल्या ताटावरून उठून साश्रु नयनांनी बाबांची माफी मागतात, साईंच्या प्रैमेसमोर लोटांगण्ही घालतात व आपल्या चुकीची कबूली देणारे पत्रही प्रांजळपणाने मुलाला पाठवितात.त्याच दिवशी  साईनाथ ही तर्खड बाईंना ह्याची खूण पटविणारे उद्गार स्वमुखे काढतात-  


" काय करावें आई आज ।  गेलों मी बांद्रास जैसा रोज ।  नाहीं खावया प्यावया पेज ।  उपाशी मज यावें लागलें । ।  
कैसा पहा ऋणानुबंध ।  कवाड होते जरी बंद ।  तरी मी प्रवेशलों स्वच्छंद ।  कोण प्रतिबंध मज करी । ।  मालक नाहीं  मिळाला  घरीं ।  आंतडीं माझीं कळवळलीं भारी ।  तैसाचि मी अन्नावीण माघारी ।  भर दुपारीं पातलों ।। 
बाबांचे बोल ऐकून मुलाला तात्काळ कळले की आज माझे वडील  बहुधा साईनाथांना नैवेद्य दावायला चुकले आणि त्याने त्या अर्थाचे पत्र सविस्तर लिहून वडिलांना त्याच दिवशी धाडिले, जे वाचून वडिलांचे अंत:कर्णरण वितळले आणि त्याच वेळी वडिलांनी क्षमा प्रार्थनेचे पाठविलेले पत्र मुलालाही मिळालेव ते वाचून मुलालाही आश्चर्य वाटले व त्याच्याही नयनीं साईंची अघटित लीला पाहून अश्रू दाटले. साईनाथांनी आपल्या ह्या अघटित लीलेतून अद्भुत कृतीतून तर्खड मुलालाही त्याने रोज समर्पण करीत असल्याची पोच पावती दिलीच आणि वडिलांनाही सगुण साकार भक्तीचे महत्त्व सप्रमाण दाविले. भक्ती असेल तर मूर्तीतही ’तोच’ तो असतो, निवसतो . "त्या’ एकाला ना दिशेचे बंधन , ना काळाचे बंधन , आपल्या भक्तांसाठी तो स्मर्तुगामी आहेच आणि ’त्या’ च्या अनिरूध्द गतीला कोणी थांबवूच शकत नाही हे स्वानुभवाने दाविले . कितीही अद्भुत कृती आहे नाही का बरे? आहे भक्तां तारण्या सिध्द माझा अनिरुध्द साई-अनिरुध्द !
                                                                              
साईनाथांच्या ह्या अनिरुध्द गतीची , "त्या"च्या प्रवेशाला दार उघडे लागत नाही की बंद कवाडे "त्या" ला रोखू शकत नाही ह्याचीच प्रचिती मेघा नावाच्या भक्ताला सुध्दा साईनाथांनी दिलेली आपण २८व्या अध्यायातील कथेंत वाचतो. मेघाच्या भक्तीचे फळ देण्याचे साईनाथांच्या मनी येते व बारा मास अहोरात्र चालणारी त्याची पूजा पाहून साईनाथ मेघाला पहाटे तो शेजेवर जागृत अवस्थेत असताना दृष्टांत देतात व बिछान्यावर अक्षता टाकून "मेघा त्रिशूल काढीं रे " म्हनून गुप्त होतात . बाबांचे हे शब्द ऐकून मेघा डोळे उघडून अति उल्हासाने बघतां बाबा तेथे दिसत नाहीत व त्यांचे अंतर्धान झालेले रूप पाहून मेघा आणखीनच अति विस्मयात पडतो. चोहोंकडे त्याला तांदूळ पडलेले दिसतात शेजेवर आणि वाड्याची कवाडें तर पूर्ववत बंदच असतात, त्यामुळे मेघा बुचकाळ्यात पडतो. त्याच्या मनाला कोडे पडते व तो तात्काळ मशिदींत जाऊन बाबांचे दर्शन घेतो व त्रिशूळकथा सांगून त्रिशूळा काढण्याची आज्ञा मागतो. मेघाने बाबांना दृष्टांत साद्यंत कथिला असतां साईनाथ स्पष्टच समज देतात की -


दृष्टांत कसला ।  शब्द नाहीं का माझा परिसिला । 
काढ म्हणितला त्रिशूळ तो । । दृष्टांत म्हणूनि माझे बोल । 
जातां काय कराया तोल ।  बोल माझे अर्थ सखोल । नाहीं फोल अक्षरही । ।
येथे लक्षात येते पुन्हा की माझ्या साईनाथांच्या अनिरुध्द गतीला कोणी थांबवूच शकत नाही, ना बंद कवाडे , ना बंद दारे ह्याला रोखू शकत , ना कोणी प्रतिबंध करू शकत माझ्याकडे येण्यापासून ! अघटितच आहे ना ही मेघाची कथा सुध्दा , साईनाथांच्या ह्या अद्भुत कृती पाहताना जाणवते ते "त्या"चे सर्वव्यापक्त्त्व - अनंताला  व्यापूनिही दशांगुळे उरणारे "त्या"चे स्वरूप ! "त्या" काय खरेच कोणती आकृती बांधू शकणार का "तो" फक्त मानवाच्या साडे तीन हाताच्या देहात सामावू शकणार ? आणि म्हणूनच फक्त आणि फक्त ’तो’ एकमेवाद्वितीयच वचन देऊ शकतो की -
नित्य मी जिवंत , जाणा हेचि सत्य ।  नित्य घ्या प्रचीत अनुभवें । । 
जरी हे शरीर गेलो मी टाकून ।  तरी मी धावेन भक्तांसाठी । ।        

आणी म्हणूनच नारायणराव जानींना साईबाबा देहविसर्जनानंतरही वर्ष झाले असून देखिल स्वप्नात जाऊन बरे होण्याचे आश्वासन देणारा आशीर्वाद देतात एका भुयारामधून बाहेर येऊन व जानी बरे होतात देखिल एका आठवडा संपताना कारण माझ्या सदगुरु साईनाथांची अद्भुत कृती व अघटित लीला - साईनाथ स्वमुखे नारायणरावांना वदतात ," काळजी कांहीं न धरीं मनीं ।  उतार पडेल उद्यांपासूनि ।  
                                      एक आठवडा संपतांक्षणीं । बसशील उठूनि तूं स्वयें । ।
नानासाहेब चांदोरकराच्या मुलीची प्रसूती समय पातला , असह्य प्रसूतीवेदना चालल्या होत्या , घरात उदी नाही नानांपाशी आणि नानांचा सतत धांवा चालू होता , साईसमर्थांना नाना सर्वथा हांका मारीत होते जामनेराहून आणि जामनेरची ही नानाम्ची स्थिती कोणाला ठाऊक नव्हती पण सर्वज्ञ , सर्वगती माझ्या सदगुरु मायला , माझ्या साईनाथाला  ते माहीतच होते  , बाबांना आपल्या भक्तांची , लेकरांची एकात्त्मता आहेच , समर्थ साईंचे चित्त द्रवले आणि मग ही नटनाटकी साईमाऊली धाव घेते ती टांगेवाल्याच्या वेषांत - रामगीर बुवांना नानांच्या घरी  आरती व उदीची पुडी घेऊन वेळेवर पोहोचण्यासाठी स्वत: माझा साईनाथ रजपूत टांगेवाला बनून घोडागाडीही हांकतो व अचानक नानांच्या घरी पोहचण्याआधीही गायबही होतो-   
कुठला टांगा, कुठला शिपाई । नट नाटकी ही माऊली साई । संकटसमयीं धांवत येई । भावापायीं भक्तांच्या ।।   

अखंड श्रीसाईसच्चरितात हेमाडपंतांनी ह्याच माझ्या सद्गुरु माऊलीचा महिमा गायला आहे -तो वाचताना कंठ सदगदित होतो व जाणवते -
ह्या साईची ऐसीच रीती । अघटित लीला अद्भुत कृती ।।
 

1 comment:

  1. सद्गुरू हा एकच एक आहे.भले त्याला कोणी साईनाथ म्हणो अथवा स्वामी म्हणो अथवा अनिरुद्ध म्हणो...हेच वरील कथेतून समजते...
    दैनिक प्रत्यक्षच खूप आभार...
    खूप सुंदर विवेचन ब्लाॅग रायटरकडून...

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog