Wednesday 29 March 2017

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय |

 “स्वामी समर्थ तारक मंत्र”
नि:शंक हो | निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे ||
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी || १ ||
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय ||
आज्ञेविना काळ ना नेई त्याला | परलोकी ही ना भीती तयाला || २ ||
उगाची भीतोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे ||
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा || ३ ||
खरा होई जागा | श्रद्धेसहित | कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त ||
कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू | स्वामी देतील साथ || ४ ||
विभूती, नमन, नामध्यानादी, तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात ||
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती |न सोडी कदा स्वामी जया घेई हाती || ५ ||


सदगुरु स्वामीसमर्थांचा तारक मंत्र ऐकून अगदी मन शांत होऊन जाते, मनाला एक असीम शांती , तृप्ती, समाधान मिळते. माझ्या पाठीशी माझे आजोबा, माझे माय-बाप , माझे बंधू-सखा अशी सर्वच नाती समर्थपणे निभावून नेणारे माझे स्वामी समर्थ आहेतच , एक भक्कम आधार, प्रचंड पाठबळ, कधीही दगा न देणारा , संकट असो वा काळमत्यु वा अपमृत्यु असो, कधीही आपल्या छत्र छायेपासून आम्हा लेकरांना वंचित न करणारा असा आमचा हक्काचा आश्रयनिधान , आमच्या जीवीचा विसावा !

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८)

मराठी कॅलेंडर मध्ये आज श्रीअक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन अशी नोंद आहे. स्वामींच्या आरतीत आपण गातो -
नृसिंहसरस्वती अवतारा संपविले
कर्दळीवनात जाऊनि तपाचरण केले
नवरुपां धारण करूनि प्रगट पुन्हा झाले 
वास्तविक पाहता श्रीगुरु दत्तात्रेयांनी आपला नृसिंह अवतार संपवून कर्दळीवनात जाऊन तप केले होते आणि नंतर इसवी सन १८५६ मध्ये श्रीस्वामी समर्थ  ह्या नव्या रूपाला धारण करून ते पुनश्च प्रकटले होते तो हा आजचा परम पावन दिवस !
पुढे इसवी सन १८७८ मध्ये स्वामींनी समाधिस्त होऊन आपला सगुण साकार अवतार संपविला असे भासवले, परंतु आजतागायत प्रत्यक्षात स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी सतत उभे राहून, भक्तांना "हम गया नही जिंदा है " याच आपल्या अभिवचनाची प्रचिती सातत्याने  देत आहेत.
म्हणजेच सदगुरु हा त्रिकालाबाधित असतो हेच परम सत्य आहे की ज्याला ना जन्म असतो ना मरण असते. "तो" एकमेवाद्वितीय आहे , जो अनादि -अनंत आहे. आणि म्हणूनच देहाची मर्यादीत परिमाणे आपण त्यांना लाऊच शकत नाही मग भले सदगुरु हा सगुण साकार बनून भूतलावर मानवी देहात वावरत असो वा व्यावहारीक पातळीवर समाधि घेऊन ब्रम्हीभूत झालेला असो वा  देहातीत अवस्थेत असो. "तो" सदैव असतोच आपल्याच  सन्निध , आपल्या पाठीशी !
त्यामुळेच स्वामींचा तारक मंत्र पदोपदी ह्याचीच ग्वाही देतो की हो, मी तुझ्या पाठीशी सदैव उभाच आहे, 

नि:शंक हो | निर्भय हो मना रे | प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे ||
स्वामी समर्थ आजोबांच्या चरणी भक्ती करताना  नि:शंक मनाने , निर्भय मनाने कसे स्वत:ला झोकून द्यायचे ह्याचे उदाहरण म्हणजे स्वामींचा शिष्य श्रीपादभट ! श्रीगोपाळबुवा केळकर लिखीत अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ ह्या बखरीत २५१ व्या कथेत स्वामींचा शब्द ऐकून श्रीपादभट मनांत कोणतीही शंका -कुशंका न घेता , अगदी स्वत:च्या प्राणांची सुध्दा पर्वा न करता भर पुराच्या पाण्यात उडी घेतात, ते ह्याच अत्युच्च अढळ विश्वासापोटी की माझ्या पाठीशी माझे स्वामी उभे आहेतच आणि मला सांगतात की "भिऊ नको मी तुझ्या पाठीशी उभा आहे."
बखरकार केळकर बुवा सांगतात की एकदां आश्विन महीन्यांत  श्रीसमर्थांची स्वारी चंद्रभागेच्या तीरीं मणूर क्षेत्री गेली होती, जेथे पाऊस पडल्यामुळे भीमा नदीस मोठा पूर आला होता. स्वामी समर्थ आजोबांच्या सोबत चोळप्पा, श्रीपादभट व इतर बरेच सेवेकरी होते. तेथें भोजनाची कांहीच तयारी नसल्याने चोळप्पाने स्वामींची प्रार्थना करून काय करावे अशी विचारणा केली. स्वामी समर्थांना नदीच्या पलीकडे जावयाचे होतेआणि नौकाही नदीच्या पलीकडच्या तीरी होती, तेव्हा स्वामींनी नौका पलीकडे जाऊन कोण आणतो ? असे विचारले. चोळप्पांनी सांगाडी भोपळ्यांशिवाय जाता येणार नाही आणि नौकेशिवाय पुरात उडी घालणे म्हणजे प्राण देणे असे आपले मत मांडले. स्वामींनी हसून उत्तर दिले की " अरे आमचा लठ्ठेश्वर पंडित जाईल, तर नौका अवश्य घेऊन येईल." श्रीपादभटास स्वामी आजोबा ’लठ्ठ्या ’ म्हणून हांक मारीत. हें स्वामींच्या मुखीचे वचन श्रीपादभटाने ऐकून, गुरुचा शब्द प्रमाण मानून अंगावरची वस्त्रें काढून , पंचा नेसून समर्थ नामाचा  जयजयकार करीत भयंकर पुरात उडी मारली. सर्व सेवेकरी घाबरून जाऊन समर्थांना श्रीपादभटाचे रक्षण करा म्हणून विनवू लागली .पण स्वामी म्हणाले," मरतो कशाने ? आतां नौका घेऊन येईल पहा ! " आणि श्रीपादभटांनी समर्थांचे नामस्मरण करीत पुरातून पलीकडे पोहत जाऊन नौका आणली व आपल्या सदगुरु स्वामींना पलीकडे थोरल्या मणुरास नेले. खरोखरी स्वामींच्या तारकमंत्राची येथे जिवंत प्रचिती मिळते की भक्तानें नि:शंक कसे व्हावे, निर्भय कसे असावे आणि आपला भार "त्या" एकाच्याच चरणीं समर्पून कसे जगावे. "त्या"ला माझी काळजी आहेच ना, माझ्याही पेक्षा जास्तच !मग मला नि:शंक आणि निर्भय होता आलेच पाहिजे.
     
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी ||
बखरीमध्ये २१९व्या कथेत आपण वाचतो की शके १७७५ सालीं श्रीस्वामी समर्थ श्रावण महीन्यांत पंढरपुरास गेले आणि तेथून पुढे मोहोळ ह्या गावी गेले होते. तेथे एका सत्त्व संपन्न ब्राम्हणाचा मुलगा अकस्मात वायु होऊन मरण पावला होता. त्या ब्राम्हणाने समर्थ बसलेल्या गुहेच्या बाहेर "देवा धाव आता !" म्हणून गडबडा लोळून प्रार्थना करू लागला असता ,त्या ब्राम्हणाची करूणापर हांक ऐकून स्वामी समाधि सोडून धांवत गुहेच्या बाहेर आले व ब्राम्हणास हातास धरून म्हणालें ," भटजी , तुमच्या मुलास नीट घोड्यावर बसवून समुद्रतीराकडे पाठवा ! आणि खरोखरी तो मृत मुलगा चक्क उठून बसला !
श्री समर्थांना कोणतीच गोष्ट अशक्य नाही , अशक्य वाटणार्‍या गोष्टी , अतर्क्य गोष्टी सुध्दा स्वामी कृपेने सहज शक्य होतात.

२११व्या कथेंत ५वर्षाच्या कुणब्याच्या मुलीचा स्वामींनी मुलगा केला होता. लहानपणी ही कुणब्याची मुलगी स्वामी बसत त्या डोंगरावर आपली गुरे चरायला घेऊन जाई आणि आपल्या घरून आणलेली भाकरी स्वामींना प्रेमाने भरवीत असे. पुढे पैशाच्या लोभाने तिच्या वडिलांनी कुणब्याने तिला मुलाचा वेष करून एका निपुत्रीक असलेल्या सावकाराला विकले. त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे सावकाराने आपल्या ह्या दत्तक मुलाचे लग्न ठरविले आणि लग्नात वधूपक्षाची मंड्ळी हळद लावताना कुणब्याचे हे बिंग उघडकीस आले. सावकाराने आपल्या फसवणूकीबद्दल राजाकडे फिर्याद केली आणि राजाने चक्क दोषी मानून ह्या ५ वर्षाच्या मुलीला ठारमारण्याचे फर्मान सोडले. पुढे मारेकर्‍यांनी त्या मुलीला मारायला जंगलात नेले असता, शेवटची इच्छा म्हणून ती लहानगी मुलगी स्वामी आजोबांकडे धाव घेते आणि स्वामी चक्क मुलीचे प्राण वाचवायला मुलीचा मुलगा करतात. स्वामी तारी त्याला  कोण मारी ?
प्रत्यक्ष प्रत्यंतर - अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी | अशक्य ही शक्य करतील स्वामी ||

जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय | स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय ||
२०९ व्या कथेंत जन्मांध असलेल्या द्वारकेतील सूरदासास केवळ स्वहस्तें डोळ्यांस स्पर्श करून दिव्य दृष्टी दिली आणि श्रीकृष्ण स्वरूपात दर्शन दिले तर
२१० व्या कथेंत हनुमानधारी येथील एका पांगळ्याला पाय दिले,
भक्ताचे प्रारब्ध स्वत:च्या हाताने स्वामी घडवीत आणि आपल्या भक्तांना कसलेही न्यून भासू देत नसत, कसलीही उणीव भासू देत नसत वा कमी पडू देत नसत ह्याचीच ही प्रचिती !

आज्ञेविना काळ ना नेई त्याला | परलोकी ही ना भीती तयाला ||
बखरीमध्ये १२७व्या कथेत - स्वामी आजोबांनी बाबसाहेब जाधव ह्या भक्ताचे मरण कसे परतविले हे वाचनात येते. आजोबा त्या भक्ताला कुंभार म्हणून हांका मारीत. त्यांना स्वामी म्हणाले कुंभार तुझे नावाची चिठ्ठी आली आहे. तेव्हा ह्या भक्ताने श्रींचे चरण घट्ट धरून श्रींची सेवा मनासारखी घडलेली नाही . करिता समर्थांनी कृपा करून तूर्त निरोप देऊ नये म्हणून प्रार्थना करताच करुणाघन स्वामींनी बाबासाहेबांचे मरण रोखले व  एका जंगी बैलावर "जा बैलावर " म्हणून सोडले. आज्ञेविना काळ ना नेई त्याला |
बखरी मध्ये १२९व्या कथेत - स्वामी समर्थांनी खेडेगावातील एका स्त्रीच्या मेलेल्या मुलास कसे प्राणदान दिले होते हे आढळते. ह्यावरून स्वामींच्या आज्ञेविना काळ ही माणसाचे प्राण हरण करायला धजत नसे वा परलोकात गेलेल्या माणसालाही कसलीच भीती उरत नसल्याचे सिध्द होते. त्यामुळे आपोआप मनाला व बुध्दीलाही पटते की

उगाची भीतोसी भय हे पळू दे | जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे ||
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा ||
आपण माणसे जीवनातील लहान -सहान गोष्टींना भितो. पण तेच स्वामींवर विश्वास ठेवला तर सर्वकाही उचितच घडते. . १८६ व्या कथेंत लक्ष्मण कोळ्याचें जहाज भर समुद्रांत मोठें तुफान येऊन बुडू लागतें , तेव्हा तो "अक्कल्कोटनिवासिनी आई , धांव "! असे म्हणून आर्ततेने हांक मारतो स्वामींना , तेव्हा स्वामी चोळप्पाच्या घरी पलंगावर बसले असतां एकदम ताडकन उठून उजवा हात खालीं करून वर उचलतात आणि तोडाने हूं हूं हूं असें बोलतात आणि पुन्हा पलंगावर बसतात. कांही वेळाने स्वामींच्या हातांतून पाणी पडूं लागते जे खारट असलयाचे सेवेकर्‍यांना लक्षात येते. आणि इकडे समुद्रांत जहाज एकदम कचका मारून वर उचलले जाते, सोसाट्याचा वारा एकदम  कमी होतो आणि लक्ष्मण कोळी सुखरूप वाचतो. स्वामी जणू भर समुद्रांतही जवळींच उभे असतात व आपल्या बाळाला जन्म मृत्युच्या खेळांतून वाचवितात. जणू स्वामी आपल्या बाळांना प्रत्यक्ष ग्वाही देतात - जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा | नको घाबरू तू असे बाळ त्याचा ||


खरा होई जागा | श्रद्धेसहित | कसा होशी त्याविणा | तू स्वामीभक्त ||
२९ व्या कथेंत श्रीमंत मालोजीराजे हे गुरुप्रतिपदेच्या उत्सवास दर वर्षी गाणगापुरास जाऊन त्रिरात्र तेथे राहून ब्राम्हण भोजन घालून परत येत. एकदा रात्री नृसिंह सरस्वती स्वप्नांत येऊन बोलतात की "मी तुझें गांवी आलों असून तू येथे कां येतोस ? स्वप्न पाहून राजा जागा झाला व दुसरें दिवशी अक्कल्कोटास परत आला. श्रीस्वामी दत्तवतार असल्याची खात्री पटून पुढे राजाने श्रींच्या पादुका घेऊन गंधलेपन करून त्या आपल्या देवांत पूजेस ठेवल्या व पुंढे गुरुप्रतिपदेचा उत्सव राजा अक्कलकोटासच करू लागला - हे असते खर्‍या श्रध्देसहीत जागें होणे. कारण त्याशिवाय कोणी स्वामीभक्त होऊच शकत नाही.

कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू | स्वामी देतील साथ ||
एकदा स्वामींच्या ठायी अनन्य भाव जडला, अनन्य शरणागती आली की माणसाला सतत जाणवते की स्वामी माझी साथ निरंतर करीतच आहेत, माझ्या अडीअड्चणींतून, संकटांतून तेच मला हात देऊन बाहेर काढतात अगदी सहीसलामत , माझ्या केसालाही धक्का न लागू देता !
बखरकार केळकर बुवा स्वानुभव सांगतात १५८ व्या कथेंत की स्वामींनी त्यांना कसे असाध्य आजारांतून जीवनदान दिले. त्यानंतर १५९व्या कथेंत शूद्राच्या विहीरीवर स्नान केले म्हणून स्वामींस गुडगुडी पाजणार्‍या बळवंतराव नावाच्या माणसानें त्यांना अपमानास्पद वागणूक दिली असताना केळकरांना वाटते येथे आपल्या ओळखीचे कोणी नाही , माझा कैवारी कोणी नाही , पण स्वामी मात्र केळकरांची उपेक्षा होऊ देत नाही. म्हणजे स्वामींनी दुसर्‍यांदा हात दिला होता. पुढे गोपाळपंताचा अंहकार घालवायलाही स्वामीच हात देतात. म्हणजेच स्वामी आयुष्यात एकदाच नाही तर वारंवार मला मदतीचा हात देतच राहतात, मला कोणीही साथ नाही दिली तरी माझे स्वामी मला साथ देतातच, अगदी १०८ % !

विभूती, नमन, नामध्यानादी, तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात ||
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती |न सोडी कदा स्वामी जया घेई हाती ||
२३३व्या कथेंत केज गावचें महारूद्रराव देशपांडॆ आपल्या गांवी आजारी पडून अत्यवस्थ झाले असतां त्यांचा थोरला मुलगा रघूत्तमराव हे अक्कलकोटी श्रींच्या दर्शनास आले होते ,नमन करून प्रार्थना करून आपल्या वडीलांच्या प्राणांची भीक मागतात. श्री समर्थ आराम होईल म्हणून आशीर्वाद देतात , तेव्हा जाताना रघूत्तमराव स्वामींच्या चरणांचे तीर्थ घेऊन जातात व आपल्या वडीलांना पाजतात, त्या दिवसापासून देशपांडेना आराम वाटू लागतो आणि तें बरें होतात. येथे ध्यानांत येते की माझ्या स्वामी आजोबांचे तीर्थ ही त्यांच्या प्रत्यक्ष दर्शना समानच आहे. त्यामुळे स्वामी ज्याला कोणाला आपल्या हातीं घेतात म्हणजेच  एकदा आपला मानतात , चरणीं ठाव देतात, त्याला स्वामी कधींच टाकीत नाही.

समाधीस्थ होण्याच्या आपल्या अंतिम समयी श्री स्वामी समर्थांनी भगवद् गीतेत साक्षात श्रीकृष्ण  भगवंतानी दिलेले वचनच आपल्या भक्तगणांना दिले होते - 

अनन्याश्चिंतयतो मां ये जना: पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्॥

''जे माझे अनन्य भावाने असे चिंतन, मनन करतील, त्या अनन्य भावाच्या चिंतनाची उपासना, सेवा मला सर्वस्व समजून अर्पण करतील त्या नित्य उपासना करणाऱ्या माझ्या प्रिय भक्तांचा मी सर्व प्रकारचा योगक्षेम चालवीन,'' असे त्यांनी आश्वासन भक्तांना दिले.

म्हणजेच थोडक्यात काय तर भगवान् श्रीकृष्णाने दिलेली ही ग्वाही स्वामींनी आपल्या भक्तांना पुनश्च एकवार स्वमुखाने दिली . परंतु येथेही पुरुषार्थ करायलाच सांगितले आहे की तुला तुझे परमेश्वराने दिलेले कर्म् तू करीत रहा, मी सदैव तुझ्यासोबतच आहे.
 ''भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.'' असे अभिवचन देणाऱ्या अभयदाता श्री स्वामी समर्थ आजोबांच्या चरणीं कोटी कोटी लोटांगण आणि मानवी जीवनाचा हा जीवनयज्ञ त्यांनी दाखविलेल्या भक्तीमार्गावर चालून त्यांच्या चरणी समर्पित होवो  हीच आजच्या मंगलदिनी स्वामीचरणी प्रार्थना...

''अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज परब्रम्ह सच्चिदानंद सद्गुरु  श्री स्वामी समर्थ आजोबा की जय.''
'' अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ''

॥ ऐशा स्वामी समर्थांना सदा असो दंडवत ॥
॥ ऐशा स्वामी समर्थांना सदा असो दंडवत ॥
॥ ऐशा स्वामी समर्थांना सदा असो दंडवत ॥
॥ ऐशा स्वामी समर्थांना सदा असो दंडवत ॥

6 comments:

  1. I love you my Swami ajoba ambadny

    ReplyDelete
  2. श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे बखरीतील अनुभवांच्या आधारे तुम्ही सुन्दर स्पष्टीकरण केले आहे. अंबज्ञ

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप अंबज्ञ डॉ. योगिंद्रसिंह जोशी. सदगुरु बापूच कर्ता करविता आहे.
      सुंदरकांडातील ओवी स्मरली "सो सब तव प्रताप रघुराई | नाथ न कछु मोरी बडताई |

      Delete
  3. खूप sundar ani savistar lihile ahe. khup margdarshan milate ya blog madhun. Ambadnya.

    ReplyDelete
    Replies
    1. Hari om. Shreeram. Ambadnya Dr Nishikant Vibhute.

      Delete
  4. स्वामींच्या कथा , त्यांचे अनुभव , त्यांची भक्तांवर असलेली अकारण करूणा हेच दाखवून देते की सदगुरुतत्व हे त्याच्या भक्तांसाठी कधीही बदलत नाही, मग ते स्वामीरूप असो, साईरूप असो की माझ्या सदगुरु बापूंचे अनिरूध्द रूप असो. 
    खूप अंबज्ञ . 

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog