Thursday 16 July 2015

श्री. परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.)वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचे पुण्यस्मरण !!!


।। ॐ द्रां दतात्रेयाय नम: । अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त ।।

आज आषाढ शुध्द प्रतिपदा - श्री. परमहंस परिव्राजकाचार्य (प.प.)वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी ह्यांची १०१ वी पुण्यतिथी !
वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हटले की पटकन आठवते ते घोरकष्टोध्दरण स्तोत्र, दत्तमालामंत्र, करुणात्रिपदी आणि असंख्य स्तोत्र !

घोरकष्टोध्दरणस्तोत्र   
श्रीपाद श्रीवल्ल्भ त्वं सदैव श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव ।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।१।।
त्वं नो माता त्वं पिताऽऽप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत्सदगुरुस्त्वम् ।
त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्र्वमूर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।२।।
पापं तापं व्याधिंमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराऽशु त्वदन्यम् ।
त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।३।।
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देव त्वं शरण्योऽकहर्ता ।
कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।४।।
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् । 
 भावासक्तिं चाखिलाऽनन्दमूर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।५।।
श्लोकपंचकमेतदयो लोकमंगलवर्धनम् ।
य: पठेत् प्रयतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ।।६।।
।। इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य
श्रीमदवासुदेवानन्दसरस्वतीस्वामीविरचितं घोरकष्टोध्दरणस्तोत्रं संपूर्णम् ।।  

श्री दत्त महाराजांच्या इच्छेनुसार श्री प. प. नृसिंह सरस्वती महाराजांचा पुढील अवतार हा माणगांवी झाला. तो अवतार अर्थातच श्री गणेशभट्ट व सौ. रमाबाई यांच्या पुत्ररुपाने १८५४ साली अवतरला असे वाचनात आले. वासुदेवशास्त्री टेंबे म्हणजेच संन्यासानंतरचे श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज , जे थोरले महाराज म्हणून सुध्दा ओळखले जातात.




आजकालच्या कलीयुगात संसारात राहून देखील आपणाला भक्ती करून दत्तरुप किंवा परमेश्वराजवळ कसे जाता येते याचे प्रत्यक्ष मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साक्षात टेंबे स्वामी म्हटले तर वावगे ठरणार नाही.  १८८३ साली त्यांनी माणगाव येथे दत्त मंदीराची स्थापना केली. त्यानंतर सुमारे २३ वर्षाच्या दीर्घ कालावधीत त्यांनी इंग्रजांच्या काळात भारतात सर्वत्र फिरून सनातन धर्माचा प्रचार प्रसार केला. त्याच बरोबरीने त्यांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. भारतातील विविध दत्तस्थानांमध्ये रोजची दिनचर्या आदि कार्यक्रमांची रुपरेषा आखून दिली. अनेक जणांना सन्मार्गाला लावण्याचे महान कार्य त्यांनी आपल्या आयुष्यात केले.

श्री दत्त गुरूंच्या पश्चात दत्त परंपरा पुढे सुरू ठेवणारे श्रीपाद श्रीवल्लभ  हे  कलियुगातील  श्रीगुरुदत्तांचे पहिले अवतार मानले जातात. यांच्या नंतरचे श्री दत्तात्रेयांचे पुढील अवतार म्हणजे जन्मतःच 'ॐ' हा शब्द म्हणू लागलेले श्री नृसिंहसरस्वती. इसवी सन  १४५७ च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली. इ.स. १८५६ मध्ये तेच  अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ या रूपात प्रकटले असे मानले जाते. श्री दत्त महाराजांच्या या अवताराच्या कृपेचा लाभ भक्तजनांना १८७८ पर्यंत लाभला.

तसे पाहता साईबाबा, टेंबे स्वामी आणि गजानन महाराज हे समकालीन होते असे वाटते त्यांच्या जीवन कालखंडाकडे पाहता कारण श्री साई बाबा (इ.स. १८३७ ते इ.स. १९१८), श्री टेंबे स्वामी महाराज (वासुदेवानंद सरस्वती) (इ.स. १८५४ ते इ.स. १९१४) आणि त्या नंतरचे श्री गजानन महाराज (इ.स. १८७८ ते इ.स. १९१०)यांना ही श्री दत्तावतार मानले जाते.

हेमाडपंतविरचिते श्रीसाईसच्चरित ह्या अपौरूषेय ग्रंथात स्वत: साईबाबांनी माधव अडकरांनी लिहिलेली "आरती साईबाबा " ह्या अध्याय ३३ मधील आरतीत स्पष्ट म्हटले आहे -
 कलियुगीं अवतार | सगुण ब्रह साचार | अवतीर्ण जाहलासे | स्वामी दत्तदिगंबर | दत्तदिगंबर ||

तसेच गजानन महाराज आणि टेंबे स्वामी महाराज हे ही दत्तावतार असल्याचा उल्लेख आढळतो. ह्या सत्पुरुषांची  कार्यस्थळे भिन्न असली तरीही त्यांनी श्री दत्त संप्रदाय सुरू ठेवून श्री दत्त भक्तीची परंपरा नित्यत्वाने अधिकाधिक वाढवली. यांचा श्री दत्तभक्ति प्रचार आणि प्रसार कार्य करण्याचा काळ कमी अधिक होता एवढेच. श्री गजानन महाराज यांचा कार्यकाल तुलनेने सर्वात कमी होता. परंतु याच काळात हे तिन्ही महापुरूष विविध ठिकाणी एकाच वेळी कार्यरत होते.  म्हणूनच यांना गुरू बंधु म्हटले जाते. या कालावधीत या संत पुरूषांची एकमेकांशी भेट होत असे. सामान्य लोकांना त्या भेटी अनाकलनीय भासत. ते एकमेकांची आठवणही काढत असत. आपल्या शिष्यांना आपल्या बधुंबद्दल गोष्टी सांगत असत.

श्री दासगणू महाराजकृत श्री  गजानन विजय ग्रंथात १९व्या अध्यायात श्री गजानन महाराज व श्री टेंबे स्वामी  यांच्या प्रत्यक्ष भेटीबद्दलचे वर्णन दिले आहे. माणगावी जन्मलेल्या आणि कृष्ण तटाकी महती असलेल्या श्री टेंबे स्वामी  यांच्या आगमनाबद्दल बाळाभाऊंना  श्री गजानन महाराजांनी आगाऊ सूचना दिल्या,
“अरे बाळा उदयिक  I माझा बंधु येतो एक I मजलागी भेटण्या देख I त्याचा आदर करावा II
तो  आहे कर्मठ भारी I म्हणून उद्या पथांतरी I चिंध्या न पडू द्या निर्धारी I अंगण स्वच्छ ठेवा रे II
चिंधी कोठे पडेल जरी I तो कोपेल निर्धारी I जमदग्नीची आहे  दुसरी I प्रतिमा त्या स्वामीची II
तो क-हाडा  ब्राम्हण I शुचिर्भूत ज्ञान संपन्न I हे त्याचे कर्मठपण I कवचापरी  समजावे II”
त्यानंतर एके दिवशी  श्री गजानन महाराज पलंगावर बसून  हाताच्या बोटांनी चुटक्या वाजावित होते. जेव्हा श्री टेंबे स्वामी मठात आले  तेव्हा   महाराजांनी चुटक्या थांबवल्या.  ते दोघे एकमेकांकडे पाहून आनंदाने हसले. एकमेकांशी केवळ दृष्टादृष्ट झाली आणि श्री टेंबे स्वामींनी नंतर श्री गजानन महाराजांकडे  परत जावयाची आज्ञा मागितली. “बरे” म्हणून महाराजांनी परवानगी देताच श्री टेंबे स्वामी लगेच निघून गेले. 

साहजिकच अशी ही  क्षणिक भेट पाहून बाळाभाऊंना प्रश्न पडला की  श्री टेंबे स्वामी यांचा कर्ममार्ग तर आपल्या गजानन महाराजांचा भक्तिमार्ग.  ह्या दोहोंचे मार्ग भिन्न असूनही हे दोघे बंधु कसे? मग  महाराज उत्तरले की ईश्वराकडे जाण्याचे भक्तिमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग हे तीन मार्ग आहेत.  ह्यांची बाह्यस्वरूपे भिन्न  दिसत असली तरी हे तिन्ही एकाच ठिकाणी पोचतात. ज्याला जो मार्ग आवडेल त्याचा अवलंब करून ते मोक्षप्राप्ती करू शकतात. त्यांच्यात काहीही फरक उरत नाही. असे सांगून गजानन महाराजांनी बाळाभाऊंची शंका निरसली.

तसेच हेमाडपंतविरचिते श्री साईसच्चरित ग्रंथातही ५१ व्या अध्यायात श्री टेंबे स्वामींनी शिरडीच्या श्री साईंनाथांना पाठवलेल्या भेटीबद्दलची गोष्ट वाचावयास मिळते.
एकदां श्रीगोदातीरीं I प्रसिध्द राजमहेंद्री शहरीं I आली श्रीवासुदेवानंदाची स्वारी I उपनामधारी ’ सरस्वती" II
महाथोर अंतरज्ञानी I कर्ममार्गाचे कट्टे अभिमानी I अखंड जयांची कीर्तिस्वर्धुनी I राहिली गर्जून महीतळीं II
यावरून टेंबे स्वामी हे कर्ममार्गाचे कट्टर पुरस्कर्ते होते हे लक्षात येते.

एकदा  गोदावारीकाठी वसलेल्या  राजमहेन्द्री शहरात  वासुदेवानंद  सरस्वती आले होते. अर्थातच त्यांच्या आगमनाची वार्ता कळताच  दूरदूरच्या लोकांनी  त्यांच्या दर्शनास  गर्दी केली.  त्यात नांदेडचे प्रसिध्द वकील पुंडलिकराव ही होते.  त्यांनी श्री वासुदेवानंद सरस्वतीचे दर्शन घेतले.  भक्तांच्या गोष्टीगोष्टींध्ये  शिरडीच्या साई बाबांचा विषय निघाला. तेव्हा बाबांसाठी  नमस्कार करुन  स्वामींनी पुंडालीकरावांना  श्रीफळ  दिले व म्हणाले, “माझे बंधु  अतिशय निष्काम आहेत. त्यांच्यावर माझे निस्सीम  प्रेम आहे. तुम्ही ज्यावेळी शिरडीस  जाल तेव्हा  हे श्रीफळ त्यांना द्या आणि त्यांना नमस्कार करून माझ्यावर कृपा दृष्टी ठेवण्यास सांगा.” वासुदेवानंदांची आज्ञा शिरसावंद्य मानून पुंडलिेकराव म्हणाले, “स्वामीजी सर्व काही आपल्या मनासारखे होईल.” पुढे महिन्याभराच्या आताच पुंडलिकरावांना शिरडीला जाण्याचा योग आला. त्यांनी स्वामीजींनी दिलेला नारळ, फराळाचे  सामान बरोबर घेतले आणि समवेत काही मित्रमंडळी घेऊन शिरडीला निघाले. मनमाडला उतरल्यानंतर  कोपरगावच्या गाडीस आवकाश होता. म्हणून ती सर्व मंडळी फराळ करू लागली. पण फराळासाठी आणलेला चिवडा अतिशय तिखट  होता. तो कुणालाही खाववेना. त्यावर उपाय म्हणून नारळ फोडून चिवड्यात घातला. फराळ झाल्यानंतर सर्व मंडळी कोपरगावला निघाली. तेव्हा पुंडलिेकरावांना स्वामीजींच्या नारळाची आठवण झाली. आणि आपण तोच नारळ फोडून चिवड्यात घातला याचे स्मरण होताच  त्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटला. मनात एका प्रकारची तगमग, तळमळ घेऊनच पुंडलिकराव शिरडीत आले. मशिदीत पोचले तेव्हा ते अतिशय घाबरलेले  होते. ते बाबांच्या दर्शनासाठी पुढे गेले तेव्हा बाबा  त्यांना म्हणाले ,“ बंधूच्या जवळून आणलेली माझी  वस्तू  आण .” त्यावेळी  पुंडलिकरावांनी बाबांच्या पायाला मिठी मारली आणि क्षमायाचना करत त्यांच्याकडून घडलेल्या त्या कृतीचा सर्व वृतांत  सांगितला. तेव्हा बाबा म्हणाले, “अरे, तुला तो नारळ व्यवस्थित सांभाळता येणार नव्हता मग तो हातात तरी कशाला घेतलास? माझ्या बंधुने तुमच्यावर जो विश्वास टाकला त्याचे तुम्ही चांगले काम केलेत! कोणतीही वस्तू त्या फळाची बरोबरी करू शकत नाही. असो. जे घडावयाचे ते घडले; आता वाईट वाटून काय उपयोग? अरे, तुला जो नारळ दिला तो माझाच संकल्प होता  आणि तो माझ्या नावानेच फुटला. मग तू स्वत:ला का अपराधी ठरवीत आहेस ? हे निरहंकर्तुत्व साधले तर तुझ्या सर्व  उपाधींचे  आपोआप निरसन होईल. बाबा रे, तुला माझी  भेट  घडावी असे जेव्हा माझ्या मनात आले तेव्हाच तो नारळ तुझ्या हातात पडला हे पक्के लक्षात ठेव. तुम्ही सर्व माझी मुले आहात. तो नारळ तुमच्या मुखी लागला तेव्हाच मला मिळाला म्हणून जे काही घडले ते सर्व विसरून जा”. बाबांचे ते उदगार ऐकून पुंडलिकरावांना हायसे वाटले. थोड्या वेळाने त्यांची उद्विग्ताही नाहीशी झाली आणि ते बाबांच्या सहवासात रमले.

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजानी रचलेल्या स्तोत्रांचे फलित -
१. घोरकष्टोध्दरण स्तोत्र - आकस्मिक अरिष्टाचे (संकटाचे) निवारण करणारे आणि भक्तीवात्सल्याने 
    ओतप्रोत भरलेले स्तोत्र म्हणजे आपत्ती निवारणाच्या व्य्वस्थापनेचे आध्यात्मिक स्वरूपाचे प्रात्यक्षिकच 
    (Disaster Management's practical approach)आहे. 
२. श्रीदत्तमाला मंत्र - रोज मनोभावे कमीत कमी १०८ वेळा जपला असता मानवी देहाचेच तीर्थक्षेत्र होते.
३. श्री दत्तात्रेय कवच - सर्व शारीरिक संरक्षण.
४. श्री दत्तस्तोत्र - राग कमी होणे, मनशांती व रक्तदाबाचा विकार कमी होणे.
५. श्रीपादवल्लभस्तोत्र - देहरुपी श्रीसदगुरुप्राप्तीसाठी.
६. अपराधक्षमापनस्तुति - नित्य पूजा केल्यानंतर म्हणावयाचे स्तोत्र.
७. श्री दत्तभावसुधारसस्तोत्र - पूर्ण वाचनाने श्रीगुरुचरित्र वाचनाचे फल मिळते.
 (मंत्र क्रं ६३ भगवदभक्त संतान होण्यासाठी व मंत्र क्रं ६६  पोटदुखी कमी होण्यासाठी असे सांगितले आहे.)
८. श्री सप्तशतीगुरुचरित्र - घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.
९. श्री दत्तलीलामृताब्धिसार - घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.
१०. श्री दत्तमाहात्म्य - घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी.
११. वासुदेवमननसार - प्रपंचामध्ये राहून अध्यात्म कसे साधावे.
१२. सार्थ बालाशिषस्तोत्र - कुमाराना क कुमारिकांना दृष्ट, नजर लागू नये व अर्भकांना ग्रहादि पीडा पासून 
      मुक्त करणारे.
१३. मंत्रात्मक श्लोक - जप कसा करावा, कर्ज निवारण्याचा व सौभाग्याचा मंत्र..
१४. चाक्षुषोपनिषद - डोळ्यांचे सर्व विकार व नंबर कमी होण्यासाठी व वंशामध्ये कोणालाही नेत्रविकार न 
       होण्यासाठी.
१५.  मेशं केशं सुशम्भुं भुवनवनवहं मारहं रत्न रत्नं । वन्दे श्री देवदेवं सुगुणगुरुगुरुं श्रीकरं कंज कंजम ।।
       मामज्ञं मत्तमर्भं भवदवसुवहं वासनासर्वसंघे । मात पात सुतस्ते वहरहसि हरे देशिके शिष्यशिष्यं ।। -
 श्री स्वामी महाराजांच्या गळ्यातील हारामध्ये गुंफलेला हा श्र्लोक आहे श्री सदगुरु कृपा प्राप्त होण्यासाठी. असे वाचनात आले.

अशा ह्या गुरुतत्वाला सादर प्रणाम ... ॐ द्रां दतात्रेयाय नम: । अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त ।।


4 comments:

  1. Apratim mahiti Sunitaveera.... Ambadnya... Ambadnya. Jar yatil stotre post karta aali tar jarur kara...

    ReplyDelete
  2. Very nice info... thx for valuable blog.
    Khup khup Ambadnya

    ReplyDelete
  3. Atishay Sundar mahiri! Ambadnya!

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर माहिती आहे सुनितावीर, अंबज्ञ

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog