Monday, 29 December 2014

माझे मायबापगुरु - माझे बापू

आजी म्हटली की डोळ्यापुढे उभी राहते ती फक्त प्रेम आणि प्रेम ह्याने ओतप्रोत भरलेली ...आई-वडीलांनी रागे भरता प्रेमाने पोटाशी धरणारी , नातवंडाच्या चुकांवर पांघरूण घालणारी आणि थोरा-मोठ्यांचा मार चुकवणारी, पण गोडी गुलाबीने चुका न व्हाव्या म्हणून कान उघाडणी करणारी आणि प्रेमाच्या धाकातही ठेवणारी.....अशा माझ्या लाडक्या आजीने लहानपणी खूप-खूप गोष्टी सांगून धार्मिक संस्काराचे बी पेरले. त्या गोष्टींतील संत कान्होपात्राची गोष्ट खूप आवडायची. कठीण प्रसंगी देवाला आर्ततेने साद घातल्यावर देव हाकेला धावतोच ह्याची जाणीव होत होती.
पण त्याआधी देवबाप्पाला कष्ट करणारी, श्रम करणारी , मेहनत करणारी माणसेच जास्त आवडतात हे बाळकडूही आजीने पाजले होते. त्यातूनच पुढे गोष्टी वाचनाचे वेड जडले आणि देव हा असतो तरी कसा आणि कोणाला भेटतो, कधी भेटतो ह्याचा शोध सुरु झाला . मग हळू हळू ध्रुव बाळाची गोष्ट, भक्त प्रल्हादाची गोष्ट, धनुर्विद्या शिकणार्‍या एकलव्याची गोष्ट, गुरुंचे शेत वाचावे म्हणून स्वत:च्या शरीराचा बांध घालणार्‍या बाळ आरुणीची गोष्ट अशा गोष्टी आवडू लागल्या आणि त्यातून देवाचा मार्ग हा गुरु , सद्गुरु दाखवतो हे समजायला लागले. मग आपण ज्यांना देव म्हणून पूजा करतो ते राम आणि कृष्ण सुध्दा गुरुंच्या घरी विद्या शिकायला गेले होते आणि त्यांच्या ऋषी वसिष्ठ आणि ऋषी सांदिपनी ह्यांच्याशी स्वत: राम आणी कृष्ण किती आदराने वागत, कसे त्यांचा सन्मान करीत हे वाचून आपल्या पण जीवनात असा सदगुरु नक्कीच असायला हवा ही ओढ लागली. पुढे शाळा-महाविद्यालय ह्या प्रवासात अनेक शिक्षक भेटले पण ते लौकीक विद्यांचे गुरु होते. मनी ध्यास लागलेला गुरु , त्याचे गुरुकूल कधीतरी प्रत्यक्ष जीवनात भेटेल का ह्याची पिपासा वाढतच गेली. मग "श्रीसाईसच्चरीत"  ह्या महान ग्रंथाने जीवनाला एक नवीन कलाटणी दिली. सगुण , साकार सदगुरु जीवनी यावा ही तळमळ वाढतच गेली , शिरडीच्या भेटी वाढल्या आणि भक्तांच्या मेळाव्यात रमणार्‍या , त्यांना गोष्टी सांगणा‍र्‍या साईनाथांचे दर्शन घडावे ,असा साईनाथ सदगुरु म्हणून आपल्याही जीवनात यावा म्हणून "त्या" साईलाच गार्‍हाणे घातले जाऊ लागले आणि खरोखरी "त्या" साईने माझ्या सदगुरुंच्या शोधाला उत्तरच दिले जणू ...
माझ्या अनिरुद्ध बापूंच्या रुपात...
डॉक्टर अनिरुध्द जोशी हे  M.D Medicine मधले एक प्रथितयश डॉक्टर अध्यात्मावर प्रवचन करतात आणि खूपदा साईबाबांच्या गोष्टी सांगतात. त्यांनी शिरडी येथे त्यांच्या भक्तांना रसयात्रा करून नेले होते आणि खूप वेगळी शिरडीची माहितीही दिली होती असे कानी आले. तोपर्य़ंत साईबाबा हेच सदगुरु बनले होते, रोजचा श्रीसाईसच्चरीताचा एक अध्याय वाचायचाच हा नियम माझ्या साईंनी लावून दिला आणि पाळवूनही तेच घेत होते आणि मग माझ्या साईंची ११ वचने प्रवचनातून सांगणार्‍या डॉक्टर अनिरुध्द जोशी म्हणजेच माझ्या बापूंनीच मला चिमणीच्या पिल्लाला पायाला दोर बांधून खेचावे तसे स्वत:कडे खेचून घेतले आणि जिवंतपणी साक्षात अनुभवले - फक्त आणि फक्त प्रेम , वात्सल्य, अपार माया ह्यांचा अफाट, न साहवणारा धबधब्यासारखा अंगावर येताक्षणी न पेलवता येणारा स्त्रोत!!!!! दिव्यत्त्वाची जेथ प्रचिती तेथ कर माझे जुळती......किती तथ्य आहे ह्यात ह्याची डोळा ह्याची देही अनुभवले आणि आजतागायत पदोपदी अनुभवतही आहे .....


१२वी नंतर काही कारणास्तव डॉक्टर होता आले नाही आणि इंजिनीअर व्हावे लागले तरी मुळात विज्ञानाची खूप आवड असल्यामुळे अध्यात्म आणि विज्ञान ह्यांची सांगड घालणारी बापूंची प्रवचने मनाला खूपच भावली. कोणतीही गोष्ट बापू खूपच सोप्या आणि सहज शब्दांत मांडत आणि त्यामागील विज्ञानाची बैठक ही स्पष्ट करून समजावीत. त्यामुळे अध्यात्म आणि विज्ञान हे वेगळे नसून त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे पटले. बापू नेहमी म्हणत की जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरु होते. विज्ञानाला मर्यादा असू शकते पण अध्यात्मात अशक्य असे काहीच नाही. त्यातूनच बापूंनी दिलेली ग्वाही " तू आणि मी मिळून अशक्य असे ह्या जगात काहीच नाही." हे पुरेपूर अनुभवास येत होते. मी शोधत असलेले सदगुरु आणि त्यांचे गुरुकूल मला गवसले होते म्हणणे कदाचित चुकीचे ठरेल कारण माझ्या "त्या" लाभेवीण प्रेम करणार्‍या, अचिंत्यदानी गुरुमाऊलीने माझ्यासारख्या अज्ञानी लेकराला त्यांच्या गोड गुरुच्या शाळेत कधीच प्रवेश देऊन मला भाग्यवान केले होते. श्रीसाईसच्चरितात हेमाड्पंत पहिल्या अध्यायात ५८व्या ओवीत गुरुंचे माहात्म्य वर्णन करतात की - गुरुनाम आणि गुरुसहवास गुरुकृपा आणि गुरुचरण पायसगुरुमंत्र आणि गुरुगृहवासमहत्प्रयास प्राप्ती ही ।। माझ्या बापूंनी खरोखरी हे सारे अमूल्य दान पदरी देऊन माझे जीवन कृतकृत्य केले.

देव-देवतांविषयी समाजात असलेल्या अनेक चुकीच्या रुढींचा खरा अर्थ बापूंनी समजाविला. "उपवास" करणे म्हणजे अन्न-पाणी न घेता शरीराला पीडा देणे कष्टवीणे हे देवाला कधीच आवडत नाही तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे बसणे किंवा सहवास , देवाच्या जवळ जास्तीत जास्त वेळ बसणे, त्याला प्रेमाने,आपलेपणाने न्याहाळणे, किती किती कष्ट घेतोस आमच्यासाठी , किती धावतोस आमच्यासाठी असे म्हणून त्याचे अत्यंत प्रेमाने नाव घेणे, त्याची प्रेमाने पूजा करणे , त्याने आपल्यावर केलेल्या वारेमाप प्रेमाचे स्मरण करणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे खरा उपवास आणि देवाला असा उपवासच खरा आवडतो. हे कळले आणि माझ्या साईबाबांनी १९व्या अध्यायांत देशमुखीण बाईंना केलेला उपदेश खर्‍या अर्थाने कळला. माझी माझ्या सदगुरुंशी जन्मोजन्मांपासून असलेली पण चुकीच्या कर्मस्वातंत्र्याने विस्मृतीत गेलेली नाळ पुनश्च नव्याने अधिकच घट्ट बांधली जाऊ लागली हळू हळू अतूट अशा रेशीम धाग्यांनी... 

आषाढी एकादशीचा, महाशिवरात्रीचा "उपवास" आता खर्‍या अर्थाने माझ्या सदगुरुंच्या शिकवणीप्रमाणे देवाला आवडेल असा घडावा म्हणून प्रयास सुरु झाले.. सदगुरु हा अंधार नाहीसा करत नाही तर अंधाराचेच रुपांतर प्रकाशात करतो ह्याची प्रचिती येत होती आणि त्यामुळे संकटे ही भगवंताने घेतलेली परीक्षा नसून येणार्‍या काळात आपल्या लेकरांना अधिक खंबीर्पणे, सक्षमपणे तोंड देता यावे ह्याची तयारी असते हे कळायला लागले आणि पटायलाही लागले त्याने भीतीचा बागुलबुवा कधी भुरकन पळून गेला , नव्हे नव्हे माझ्या सदगुरुंनी त्याला हद्दपार केला हे कळलेच नाही... माझी मी स्वत:तल्या एका नवीन "मी"ला घडताना नव्याने, नित्यत्वाने अनुभवत होते.... 


कठीण प्रसंगात डगमगून न जाता धीराने तोंड दिले तरच देव साथ देतो हे आजीने पाजलेले बाळकडू पुन्हा माझ्या गुरुमाऊलीने गिरवून घेतले वारंवार ..... " असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी" ही उक्ती फक्त अन्न-वस्त्रापुरतीच आहे हे सांगून त्यातील पळवाटा, सबबी देण्यापासून माझ्या बापूंनीच परावृत्त केले. परीस स्पर्शाने लोखंडाचे सोने होते हे कदाचित अशक्य असेल पण सदगुरुंच्या येण्याने संपूर्ण जीवनाचा विकास घडून नुसता कायापालटच होत नाही तर जणू पुनर्जन्मच लाधतो. जणू सदगुरु तुम्हालाच परीस बनवितो तेही कासवीच्या पिलांप्रमाणे नुसत्या कूर्म दृष्टीने , कृपादृष्टीनेच.... "त्या"च्या येण्याने सजीवांचाच नव्हे तर निर्जीवाचाही कायापालट होतोच होतो. माझ्या बापूंच्या हस्तस्पर्शाने निर्जीव पाषाणही पावन होतो हे प्रत्यक्षात पाहिले ते जुईनगरच्या पवित्र गुरुकूलाच्या वास्तुत - दगडातील अनावश्यक भाग काढून टाकला तर त्यातून सुबक, सुंदर शिल्प साकारते हे नुसते न सांगता माझ्या बापूंनी स्वत: हातात छिन्नी आणि हातोडा ही अस्त्रे घेऊन जुईनगर येथील हनुमंताची मूर्ती पाषाणातून कोरून प्रात्यक्षिक ही करून दाखवले. "बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" ही म्हण सत्यात अनुभवायची असेल तर माझ्या बापूंचे आचरण पहावे.


आरोग्य हेच खरी धनसंपदा हे नुसते प्रवचनांतून सांगितले नाही तर व्यवहारात बापूंनी सूर्यनमस्काराबरोबर भारतातील प्राचीन यशवंती विद्या, वज्रमुष्टी ह्या विद्यांचे पुनर्जीवन करून त्या स्वत:पुरत्या न राखता सर्वसामान्य माणसाला सोप्या पध्दतीने मुक्त करूनही दिल्या -चक्क स्वत: 
आचार्य बनून आणि आचार्य घडवून शिकविल्याही.... जशी एक मानवी माता आपल्या बाळाला प्रेमाने आंजारून-गोंजारून किंवा वेळ प्रसंगी पाठीत धपाटा घालून उचित तेच शिकवीते अगदी तसेच ..... अगदी मैदानी खेळाचे महत्त्व सुध्दा पटविले अनिरुद्धाज Bonsai Sports" मधून..Advance Technology च्या जमान्यात Smart Phone चा सुयोग्य वापर न करता केवळ games आणि chatting मध्येच स्वत:चा अमूल्य वेळ एका निर्जीव यंत्राच्या हाती सोपवून कसा वाया दवडता ह्याबद्दल कान उघाडणीही केली बापूरायाने - एका अत्यंत प्रेमळ पण तेवढ्याच कर्तव्यकठोर आणि दक्ष पित्याच्या भूमिकेतून.... आणि Harp Technology, Nano Technology , NWO (NEW WORLD ORDER) Illuminiti, Secret Society सारख्या विक्षिप्त परखड वास्तवाची जाणीव करून देऊन काळाच्या बरोबरीने पावले टाकण्यास प्रेरीत केले एका मित्राच्या भूमिकेतून सल्ला देऊन....


सदगुरु असूनही माय- बाप - सखा - मार्गदर्शक - सच्चा आप्त- एकमेव आधारवड अशा अनेक भूमिका तेवढ्याच समर्थपणे पेलणारा माझा सदगुरु म्हणजेच माझे बापू - माझे DAD .... माझे सर्वस्व..... अगदी कोणतीही उपाधी कमीच पडावी.....

अहो , असे कोणते म्हणून क्षेत्रच नसेल ज्यात माझ्या बापूंचा हातखंडा नाही, त्यांच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाकडे पाहता " अनिर्वचनीय , शब्दातीत " असे सारेच शब्दविश्वाचे भांडार असमर्थ ठरते.
प्रभू रामचंद्रानी " जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी " असे उद्गार कादून जन्मदाती माता आणि जन्मभूमीचे महत्त्व गायिले होते आणि माझ्या बापूंनी ते कसे व्यवहारात सद्यकालीन परिस्थितीत आचरायचे ह्याचा धडाच गिरवून घेतला म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Prevention is better than cure ह्याचे एक मूर्त प्रात्यक्षिक म्हणजे Disaster Management.
माझ्या सदगुरु बापूंनी आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच Disaster Management सारख्या अनभिज्ञ विषयाचे भूजच्या भूकंपानंतर महत्त्व विशद करून सर्वांसाठी नवीन दालन उघडले " Aniruddha's Academy of Disaster Management" ची स्थापना घडवून आणि पहिलेवहिले Disaster Management विषयावरील पाठ्यपुस्तक उपलब्ध करवून दिले,एवढेच नव्हे तर मातृभूमीची, समाजाची बांधीलकी जाणून सर्वांसाठी त्याचे शिक्षण विनामूल्य उपलब्ध करविले आणि आजतागायत अंदाजे ६१००० वर Disaster Management Volunteers प्रशिक्षीत करवून....

भक्ती आणि सेवेचा सुंदर मिलाप बापूंनी ह्याद्वारे करवून दिला हे मनावर बिंबवून की श्रीवासुदेवानंद स्वामी विरचिते "घोरकष्टोध्दरणस्तोत्र" हा सेवेमागचा भक्तीचा मूळ गाभा आहे. परमात्म्याने त्याच्या दीन-दुबळ्या, असहाय्य, गरजू पीडितांची सेवा करून माझे प्रारब्धाचे भोग संपविण्याची मला दिलेली एक मौल्यवान संधी आहे जी मी भक्तीमय निष्काम सेवा करून मिळवितो. 

बापूंनी "१३कलमी योजना" आणि "अनिरुध्दाज इंस्टीट्युट ओफ ग्रामविकास" ह्या संकल्पना राबवल्या आणि परसबाग-शेती, बटेरपालनासारख्या नवीन वाटा चोखाळायला लावल्या. रासायनिक खतांचा भरमसाट वापराने जे जमीनीचे आणि पिकाचेही नुकसान होते ते टाळण्यासाठी गांडूळखत, कम्पोस्ट खत ह्यासारखे सहज, सोपे, कमी खर्चाचे उपाय शेतकर्‍यांच्या हाती दिले. थोडक्यात ग्रामीण भागातला असो वा शहरातला असो ,समस्त मानवांना "उध्दरेतआत्मानां" ह्याची खर्‍या अर्थाने ओळख करून दिली आणि खर्‍या पुरुषार्थाची नाते जुळवून दिले - प्रयत्न करणे माझे काम यशदाता तो मंगलधाम अंती तोची देईल आराम चिंतेचा उपशम होईल ।। --- अर्थातच  "त्या" भगवंतावर अढळ विश्वास देऊन....  
माझा सदगुरु- माझे बापू हे केवळ अध्यात्मावर प्रवचन करणारे प्रवचनकार नसून ते एक योध्दा आहेत. हातावरच्या रेषा वा नशीबाला दोष देऊन रडत बसण्यापेक्षा संकटांना धैर्याने तोंड कसे द्यायचे ही युध्द्कला शिकविणे हा जणू त्यांचा छंदच आहे आणि म्हणूनच "श्रीमद्पुरुषार्थ: प्रथम खण्ड-सत्यप्रवेश, द्वितीय खण्ड - प्रेमप्रवास , तृतीय खण्ड - आनंद साधना, रामरसायन, मातरैश्र्वर्यवेद: आणि मातृवात्सल्य-उपनिषद ह्या आध्यात्मिक ग्रंथसंपदेसोबतच बापूंनी स्वत: आंतरराष्ट्रीय जागतिक घडामोडींचा अभ्यास करून परखड वास्तवाचे भान देणारे "तिसरे महायुध्द" हे पुस्तकही श्रध्दावानांच्या हाती सुपुर्द केले. तसेच सत्य आणि परखड वास्तव ह्यात जमीन अस्मानाचे अंतर असते म्हणून दैनंदिन जीवनातही सदैव सभान, जागृत राहण्यासाठी दैनिक "प्रत्यक्ष" ह्या वृत्तपत्राद्वारे ते सतत गेली ९ वर्षे अव्याहतपणे कार्य करीत आहेत. " मी तुला कधीच टाकणार नाही" ही त्यांनी त्यांच्या लेकरांना दिलेली ग्वाही ते निरंतर पाळतातच मग त्यांना प्रेमाने आणि विश्वासाने साद घालणारा त्यांचा श्रध्दावान मित्र साता-समुद्रापलीकडे असो, रणरणत्या वाळंवटात असो वा भूकंप, त्सुनामी अशा कराल नैसर्गिक आपत्तीच्या दाढेत अडकलेला असो वा मृत्युच्या उंबरठ्यावर असो... "स्मर्तुगामी स्वभक्तांना उध्दरता भवसंकटात " हे सदगुरुंचे आश्वासक बोल अनुभवले नाही असा माझ्या सदगुरुंचा श्रध्दावान मित्र  विरळाच !!!!

"पावित्र्य हेच प्रमाण " आधारीत मानून आणि अध्यात्म, आधार , दिलासा आणि मैत्री ह्या चार सुत्रांवर जणू काही माझ्या बापूंचे हिमालयासम उत्तुंग भव्य-दिव्य असामान्य , एक्मेवाद्वितीय,विलक्षण व्यक्तिमत्त्व काळाच्याही छातीवर पाय रोवून समर्थपणे उभे ठाकले आहे
समस्त मानवजातीचा उध्दार करण्यासाठीच..... धर्माचा र्‍हास टाळण्या ही भारतभूमी कुरुक्षेत्र होऊ नये म्हणून - अखिल भारतवर्षात त्या राम-कृष्णाच्याच भूमीवर पुन्हा एकवार मानवाने रामराज्य अनुभवावे, चाखावे म्हणून..... मानवाला भगवंताने दिलेल्या नरजन्माची इतिकर्तव्यता झाल्याची शांती, तृप्ती, समाधान अनुभवता यावी म्हणूनच!!!!

हे माझ्या मायबापगुरु, बा सदगुरुराया - जीवनाचा श्वास चालतो तो तू दिलेल्या प्रेम, चैतन्य, विश्वास ह्यांच्या अधिष्ठानावर .....ह्या माझ्या सर्वस्वाचा जीवनयज्ञ तुझ्या चरणीच समर्पित व्हावा अशी "सदगुरुंच्या चरणी" नेऊ घालणार्‍या "श्रीसाईसच्चरितातील" प्रार्थना तुझ्या चरणी -
मी तो केवळ पायांचा दास  नका करू मजला उदास
जोवरी ह्या देही श्वास निजकार्यासी साधूनी घ्या ।।
I Love You My DAD ALWAYAS AND FOREVER!!!!

श्रीराम. अंबज्ञ
सुनीतावीरा करंडे    

2 comments:

  1. Smranirantar Sai Sai Soduniya lakh chaturai Bedaparhoel .Sandehkahi nasava .

    ReplyDelete
  2. Ambadnya khup chan pravas aahe, hya pravasat Bapuna Anubhavale.
    Ambadnya Ambadnya

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog