Friday 5 June 2015

जागतिक पर्यावरण दिन - पर्यावरणाचा वसा !!!!

आज ५ जून म्हणजे जागतिक (विश्व ) पर्यावरण दिन ! 



संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंबलीने १९७२ च्या स्टॉकहोम येथील पर्यावरणविषयक परिषदेच्या निमित्ताने ‘५ जून’ हा ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून जाहीर केला. पर्यावरणविषयक जागतिक जनजागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याबाबत राजकीय सहाय्य व कृती वाढवण्यासाठी हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. 



UNEP म्हणजे United Nations Environment Programme द्वारे दरव्रषी ५ जून  रोजी जागतिक पर्यावरण दिन वेगवेगळ्या संकल्पना मांडून साजरा करण्याचे आव्हान केले जाते.‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा करण्यात सर्व लोकांच्या सहभागाला महत्त्व असून यातून शासन, सामाजिक गट, कारखानदार या सर्वांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृती करण्यासाठी प्रेरणा मिळते. जगभरातील १०० पेक्षा अधिक देशांमध्ये हा दिवस निरनिराळ्या पध्दतींनी साजरा केला जातो. यात पथयात्रा, हरित सोहळे, निबंध व पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम यासारखे उपक्रम राबविले जातात. हा दिवस साजरा करून आपण स्वत:ला व इतरांना पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी प्रेरित करत असतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे असा आहे.


दरवर्षी ५ जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणाच्या समस्या व पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून सुयोग्य अशा पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

पर्यावरण (Environment) हा शब्द मूळ फ्रेंच शब्द Environ या शब्दापासून तयार झाला आहे. Environ म्हणजे Surrounding. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून निर्माण  झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील अत्याचाराचे भयावह परिणाम शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे औद्योगिक क्रांतीच्या चांगल्या स्वरुपाबरोबरच त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला भेडसावू लागतील ह्याची प्रखर जाणीव झाली.  म्हणून इ. स. १९६० मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले.

तसे पाहिले तर मानव हा पर्यावरणाचाच एक अत्यंत बुध्दीमान सजीव भाग म्हणा वा सजीव घटक आहे. मात्र पर्यावरणाच्या इतर बहुतांशी सर्वच सजीव असो वा निर्जीव अशा प्रत्येक घटकात मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे. म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे.

घातक सवयी सोडा - पर्यावरण  वाचवा 
जॉर्ज पर्किन व मर्श यांनी त्यांच्या 'मॅन अँड नेचर' या पुस्तकात (१९०७) मानव व नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व त्याचे विपरीत परिणाम यावर चर्चा केली आहे. त्यांचे हे पुस्तक पर्यावरण शिक्षण देणारे पहिले पुस्तक ठरते. १८९९ मध्ये पॅट्रिक गेडेस यांनी 'द आऊटलूक टॉक' या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे कार्य 'पर्यावरण शिक्षण सुधारणा' असे होते. पर्यावरण शिक्षणातून जाणीव, जागृती करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे यासाठी १९६५ मध्ये पर्यावरण शिक्षण हा विषय शिक्षणशास्त्रात समाविष्ट करण्यात आला, तर १९७० मध्ये पॅरिस येथे भरलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत शालेय शिक्षणात पर्यावरण शिक्षणावर भर देण्यात आला. जून १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे भरलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण परिषदेत जागतिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी मानवाचीच असल्याचे म्हटले आहे आणि त्यानुसार आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अमलात आणला व त्याची उद्दिष्टे ऑक्टोबर १९७५ मध्ये बेलग्रेड येथील कृतिसत्रात ठरविण्यात आली. आज पर्यावरण शिक्षणातील जागरूकता, ज्ञान, दृष्टिकोन, कौशल्य आणि सहभाग ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार (१८ डिसेंबर २००३) पर्यावरण शिक्षणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर आराखडय़ात प्रत्येक शालेय स्तरावर पर्यावरण शिक्षणाची उद्दिष्टे व पाठय़क्रम ठरविण्यात आले आहेत.

सहज-सोपे उपाय -

ह्या सर्व गोष्टी पाहता, पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर आज सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. जनजागृती म्हणजे समाजातील लोकांना पर्यावरणाविषयी माहिती देऊन जागरूक करणे. त्यामध्ये आपण काय काय करू शकतो ? तर आपण वाचतो की दिवसेंदिवस कचर्‍याची विल्हेवाट लावणारे Dumping Ground कचर्‍याने ओसंडून वाहतात आणि जागेअभावी मग अशा ह्या रोजच साठणार्‍या घनकचर्‍याची विल्हेवाट लावणे एक कठीण काम होऊन बसते तर अशा ह्या घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट कशी लावायची, ओला व सुका कचरा वेगळा का व कसा करायचा आणि गांडूळ शेतीचा आधार घेत कसा कचरा best from waste म्हणून गांडूळ खत बनविण्यासाठी कसा वापरायचा ह्याची माहिती करून घेणे व प्रत्यक्षात कृती करणे हे सहजसाध्य आहे . 

गांडूळ शेती



भोपाळ येथील विषारी वायुगळती आणि त्यापासून झालेली अपरिमित हानी आजतागायत विसरता येत  नाही. त्यामुळे घातक रासायनिक (विषारी वा तत्सम) वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे 
किती अत्यावश्यक  आहे हे लक्षात आले.  

अत्यावश्यक  कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्‍या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे ह्या सारख्या गोष्टी पर्यावरणाशीच निगडीत आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे.

पर्यावरण - हेच जीवन 

पर्यावरणातील पाणी या  महत्त्वाच्या घटकाबाबत पाहता सरोवरांचे संरक्षण व संवर्धन तसेच सरोवरातील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देण्यासाठी चर्चासत्रे आयोजित करणे. फक्त गंगा नदीच नव्हे तर इतरही सर्वच नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. वनांद्वारे (जंगलाद्वारे) आपल्याला अनेक नैसर्गिक सुविधा पुरविल्या जातात जसे विवीध पशू -पक्षींचे संगोपन, शुद्ध हवा व पाण्याचा पुरवठा , नद्यांच्या पाणलोट क्षेत्रांचे संरक्षण इत्यादी आणि म्हणूनच पृथ्वीवरील सजीवांच्या हितासाठी वनांचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे.

बदलत्या काळात पर्यावरण वाढत चाललेला कार्बन डॉयऑक्साईड सध्या सर्वांचीच डोकेदुखी बनली आहे.. हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणार्‍या क्लोरे-फ्लुरो कार्बन (CFC) वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. यास्तव जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास कसा हातभार लावता येईल ह्याबाबत विचार करून वागले म्हणजे तसे रोजच्या जगण्यात बदल केले तर नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल. 

पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरुनच सुरुवात करु या का? तसे करता आले तर अती उत्तम! . पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्‍या वस्तू जसे पेपर, काचेच्या वस्तू, अल्युमिनियम, मोटरऑईल अशांची पुन्हा नव्याने निर्मिती करू  येऊ  शकते यावर विचार केला पाहिजे.  हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करायला शिकू या का? शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करुया या. प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्‍या कागदी किंवा कापडी  पिशव्या वापरु या. अन्न आणि भाजीपाला प्लॅ‍स्टीकमध्ये न ठेवता अल्युमिनियम पापुद्र्यात ठेवूया. पाण्याचा गैरवापर करणे थांबवूया. घरातील रुम हिटरचा खूप जास्त वापर न करता शाल, स्वेटर, मफलर इत्यादी गरम ऊबदार कपडे घालून इलेक्ट्रीक ऊर्जेचा वापर टाळूया. गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवूया, विशेषत:  कार्यालयातून बाहेर पडताना पंखा,AC , विजेचा दिवा बंद करुया. बाहेर गावी जाताना वा सहलीला जाताना जेव्हा आपले घर जास्त काळ बंद राहू शकते  तेव्हा घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पाण्याचे नळ , फ्रीज हे बंद करून जाऊ या , जेणे करून पाण्याची व विजेची बचतच आपण करू या.

याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जाऊन, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्‍या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी विविध मोहिमा राबवूया आणि या माध्यमातूनच जनजागृती करुया.

माणूस निसर्गावर अन्याय करतो आणि निसर्ग ही मग कसा रौद्र रूप धारण करून त्याचा उद्रेक करतो हे आपण २०११ मध्ये झालेले त्सुनामीचे जपानमधील तांडव, नरगिससारखी प्रलंयकारी   सागरी वादळे, नुकताच झालेला नेपाळ मधील भूकंप, उत्तराखंड मधील महापूर व ढग फुटी , दुष्काळ,  रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणले आहे. 

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी जनतेने जीवनशैली बदलताना आठवडय़ातून एकदा सायकल चालवावी, असे आव्हान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय युवकांना केले. मोदींच्या या आवाहनाला भारतीयांचा कितपत प्रतिसाद मिळेल कोणास ठाऊक ? पण भारतात  पुणे, नागपूर आसाम अशा काही ठिकाणी मात्र फार पूर्वीपासून सायकलचा जितका अधिक वापर करता येईल तितका करीत आहेत असे निरीक्षणांती आढळते.

बदलत्या आधुनिक जीवनशैलीने अनेक आजार माणसाने अंगावर ओढवून घेतले आहेत. पूर्वीच्या जमान्यात सायकल असणे, हे सुध्दा श्रीमंतीचे लक्षण होते आणि आता त्याच सायकल चालवणाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मात्र, श्रीमंत म्हणून गणल्या जात असलेल्या युरोपात सायकल चालवणारे मोठय़ा संख्येने आहेत. परगावी किंवा सहलीला जातानासुद्धा गाडीच्या डिकीत ते एक-दोन सायकली नेतात आणि त्याचा वापरही करतात. युरोपसह इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, इटलीसह अनेक देशात युवक-युवती सायकलनेच प्रवास करतात. युरोपात फुटपाथला समांतर सायकल ट्रॅक आहेत आणि पादचाऱ्यांना त्यावर येण्यास मनाई आहे. भारतातही हळूहळू का होईना सायकल पुन्हा परत येत आहे. आसाम मध्ये दळणवळणाची सर्व साधने सहज रीत्या मुबलक प्रमाणांत उपलब्ध नसल्याने अल्प खर्चाचे म्हणून सायकल हे वाहन जास्त लोकप्रिय आहे, तर नागपुरात गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यासाठी का होईना सायकल चालवणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे असे एका लोकप्रिय वृत्तपत्राने नमूद केले होते. 
   
मानवाच्या प्रमाणा बाहेरच्या पर्यावरणातील हस्तक्षेपामुळे आणखी बरीच संकटे येणार्‍या काळात आ वासून उभी ठाकली आहेत. वाढते काँक्रिटीकरण, रहदारी, एसी प्लांट यांचा वातावरणाला जोरदार फटका बसतो. त्यातूनच " उष्णतेची बेटे " हे नवीनच संकट आधुनिक शहरांमध्ये वाढीस लागले आहे. 

बेटे म्हटले की सर्वसामान्यत: आपल्य़ा नजरेपुढे येते ते अंदमान-निकोबारची बेटे. परंतु ही उष्णतेची बेटे निसर्ग निर्मीत नसून चक्क मानव निर्मीत आहेत. काय धक्का बसला असेल ना? वाचून की बाबा, माणूस कसा काय बेटे बनवणार ?  



अशी तयार होतात उष्णतेची बेटे... 

शहरातील वायूप्रदूषणामुळे लोकांना अनेक शारीरिक विकारांना (श्वसनाचे त्रास, धूळीची ऍलर्जी, त्वचेचे आजार)  सामोरे जावे लागतेच पण, हवामानावरही त्याचा परिणाम होतो. धूर ओकणारी वाहने आणि गरम हवा सोडणारे एसी प्लांट यांमुळेही एखाद्या भागात ग्रीन हाऊस ‌इफेक्ट साधला जातो व त्यामुळेच त्या भागातील तापमान इतर भागांपेक्षा जास्त जाणवते. हवामान खात्याच्या परिभाषेत याला शहरातील उष्णतेची बेटं ( Urban Heat Island  -अर्बन हीट आयलंड) म्हटले जाते. 

ह्याचे दृश्य स्वरूप म्हणजे पर्यावरणात कोणते परिणाम जाणवू शकतात ? 

मुंबईत धुके पडत नसतानाही हिवाळ्यात शहरातील दृश्यमानता कमालीची घटत असल्याचे हवामानखात्याचे निरीक्षण आहे. ‌समुद्रकिनारी वसल्याने मुंबईच्या हवेत बाष्प नेहमीच मुबलक प्रमाणात असते. त्यात प्रदूषणाची भर पडली की दृश्यमानता कमी होते. इतर ऋतूंच्या तुलनेत जानेवारी, फेब्रुवारीत मुंबईतील दृश्यमानता ७५ टक्के घटते आणि हवाई वाहतुकीला त्याचा सर्वाधिक प्रमाणात फटका बसतो. 

एखाद्या भागातील प्रदूषणामुळे, विशेषतः ग्रीन हाऊस गॅसेसमुळे सूर्याची उष्णता जमिनीवरून परावर्तित न होता रोखली जाते. त्यामुळे त्या भागातील तापमान वाढते. उदाहरणार्थ, बीकेसी हे उष्णतेचे बेट असेल तर सांताक्रूझला कमाल तापमान ३० अंश असताना बीकेसीमध्ये ते ३२ ते ३३ अंश इतके असू शकते.

वाढते प्रदूषण, काँक्रिटीकरण, घनदाट लोकवस्ती आण‌ि भौगोलिक रचनेमुळे मुंबईत अनेक ठिकाणी अशी 'उष्णतेची बेटे' तयार झाली असून, तेथील तापमान इतर भागांच्या तुलनेत २ ते ४ अंश चढेच असते. ही समस्या गंभीर रूप धारण करत असून, त्यावर उपाययोजना न केल्यास भविष्यात ती अधिकच उग्र होण्याची भीती आहे. मुंबईत अंधेरी, बीकेसी, शिवाजीनगर, धारावी, तर डोंबिवली, दिल्ली अशी उदाहरणे त्यासाठी देता येतील, अशी माहिती हवामानखात्याने दिली. प्रत्येक शहरात तेथील प्रदूषणाच्या पातळीनुसार कमी-अधिक प्रमाणात अशी 'उष्णतेची बेटे' असतातच. ती कमी करण्यासाठी सर्वांनीच एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे.

पर्यावरण व प्रदूषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खर्‍या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीचा दिशेने वाटचाल करु, यात शंका नाही.

पर्यावरण म्हटले की त्यात आपल्या पृथ्वीचा - वसुंधरेचा खूप मोठा सहभाग आलाच. ही आपली भूमाता आपल्या समस्त चराचराचा भार आज युगानुयुगे सदैव वाहत आहे आणि आपण त्याची कृतार्थता बाळगावी ह्यासाठी आपल्या पूर्वजांनी आपल्याला एका श्लोकातून प्रार्थनाही करायला शिकवली आहे - 
समुद्रवसने देवी पर्वतकरस्तनमंडले । विष्णू पत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम् क्षमस्व मे ।।   
   
आपल्याला थोरा-मोठ्यांचे बोल नेहमी कानी पडतात की -" उतू नका , मातू नका घेतला वसा टाकू नका." 

पर्यावरणाचा र्‍हास थांबविण्यासाठी आम्ही सारे वसुंधरापुत्र मानव कटीबध्द आहोत ह्याचे सदैव भान राखू आपापल्या परीने आम्ही अंशत: का होईना हातभार लावू असा पर्यावरणाचा वसा घेतल्यास नक्कीच आपण खर्‍या अर्थाने आजचा जागतिक पर्यावरणाचा दिवसासाठी संकल्प केला असे म्हणता येईल.

वर उल्लेखिलेल्या  " उष्णतेची बेटे " ह्या पर्यावरणावर ओढावलेल्या सुप्त आपत्तीची सविस्तर माहिती आणि तिचे व्यवस्थापन कसे करता येऊ शकते ह्या संबंधी पुढील भागाची वाट पाहू या.  



1 comment:

  1. सुनीता करंडे,

    आज जागतिक पर्यावरण दिन आहे हे आवर्जून लक्ष्यात ठेवावे असे कुठले कारण आज सामान्य मानवाकडे दिसत नाही.....कारण अगदी साधे आहे ......"गरज नाही"..."त्याच्या वाचून दैनंदिन जीवनात काही फरक पडत नाही". तुम्ही मात्र ह्या गोष्टीची आठवण करून दिलीत त्याबद्दल मन:पूर्वक आभार.

    वास्तविक पर्यावरण हा विषय दैनंदिन जीवनापासून वेगळा करतच येणार नाही तरी हि त्याचे महत्व जाणवत नाही. कदाचित आमचे खालावत चाललेले स्वास्थ्य, जगात वाढत चाललेली उष्णता, उजाडत चाललेली जंगले ह्या सगळ्यांचा पर्यावरणाशी असेलेला थेट संबंध आम्ही लक्षात घेत नाही. ह्या पार्श्वभूमीवर आपला खालील विचार सद्य परिस्थितीला धरून आहे

    "म्हणून पर्यावरणीय आपत्तीचे शास्त्रीय पद्धतीने अध्ययन व त्यावर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण बनले आहे."

    " उष्णतेची बेटे " ह्या नवीन किंबहुना कमी माहित असेलेल्या विषयावरील आपल्या प्रस्तावित लेखाचे स्वागत आहे.

    राजीव कदम, मुंबई

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog