Saturday 6 June 2015

शिवराज्याभिषेक - भारतीय जनमनातील, इतिहासातील अविस्मरणीय सुवर्ण क्षण !!!

शिवराज्याभिषेक - भारतीय जनमनातील, इतिहासातील अविस्मरणीय सुवर्ण क्षण !!!



निश्चयाचा महामेरु | बहुत जनांसी आधारु | 
अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंत योगी |
यशवंत, कीर्तिवंत | सामर्थ्यवंत वरदवंत |
पुण्यवंत, नीतिवंत | जाणता राजा || 

सदगुरु श्रीरामदासस्वामी ह्यांनी आपल्या ह्या स्वशिष्याचे (शिवरायांचे) कौतुक करावे (तेही शिवरायांची सुपुत्र धर्मवीर संभाजी राजे ह्यांना लिहीलेल्या पत्रात ) आणि ते यथार्थ उद्गार संपूर्णत: जेथे जिवंत प्रचिती देत उभे ठाकावेत असे ते  आमुचे लाडके छत्रपती शिवाजी महाराज !

छत्रपती शिवाजी महाराज, शिवबा, शिवछत्रपती अशा अनेक नावांनी ज्यांनी प्रत्येक भारतीयाच्याच नव्हे तर अनेक परदेशीय़ांच्या ही मनाला भुरळ पाडली असे हे रणधुरंधर, परम प्रतापी, न्यायप्रिय, कर्तव्यदक्ष भव्य दिव्य, धीरोदात्त, परम तेजस्वी असे महान व्यक्तीमत्त्व! "दिव्यत्त्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती " ह्याचा जिवंत साक्षात्कार , आविष्कार म्हणजे आमचे शिवराय! आणि अर्थातच अशा आमच्या शिवरायांचा राज्याभिषेक - शिवराज्याभिषेक ही प्रत्येक भारतीयास अत्यंत आवडती , अविस्मरणीय घटनाच म्हटले तर वावगे ठरणार नाही असे वाटते.


भारताच्या विशेषत: महाराष्ट्राच्या २५०० वर्षाच्या इतिहासातील एक अनन्यसाधारण अशी घटना म्हणजेच शिवराज्याभिषेक होय. या शिवराज्याभिषेकानंतरच 'स्वराज्यास' एक ता‌त्त्विक बैठक मिळून शिवरायांचे हे एक केवळ 'मराठ्यांचे बंड' नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे सिध्द झाले. या राज्याभिषेकाने अवघ्या हिंदुस्थानास आणि त्यावर आक्रमण करून कब्जा मिळवावयास द्बा धरून बसलेल्या यवनी, पोर्तुगीज, फ्रेंच, मुघल अशा सर्वांनाच वचक बसला आणि त्यांना पटवून दिले गेले. कितीही बिकट परिस्थिती सामोरी उभी ठाकली तरी संकटाची पर्वा न करता, स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता , काळाच्या छातीवर पाय रोवून हा मर्द- मराठ्यांचा यशाचा वारू  कसा दाही दिशांनी चौखुर उधळू शकतो ह्याची ही नांदीच होती जणू काही. तुळजापूरची भवानी माता ही शिवरायांची कुलस्वामिनी , आपल्या ह्या आराध्यदैवताची प्रचंड भक्ती आणि सदगुरु श्रीरामदास स्वामी ह्यांच्या चरणी पराकोटीची निष्ठा ह्यांच्या बळावर कोठलाही पुरुषार्थ करायला ते कधीही किंचीतही कचरले नाहीत.   

मध्ययुगाच्या आरंभापासून संपूर्ण भारतवर्ष परकीय इस्लामी, जुलमी शासकांच्या प्रचंड अत्याचाराखाली भरडला जात होता. दक्षिण भारतात अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीनंतर सुमारे पुढील ३०० वर्षात महाराष्ट्राला मोगल, आदिलशहा, निजाम शहा, सिद्ध‌ी या परकीयांनी गुलाम केले. दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीनपुत्र मुबारक खिलजी याने देवगिरीच्या यादवांचे मराठी राज्य कायमचे नष्ट केल्यानंतर महाराष्ट्रावरती जवळपास साडेतीनशे वर्ष पारतंत्र्याचे सावट पसरले होते आणि गुलामी , पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करायला महाराष्ट्राच्या क्षितीजावर तळपता सूर्य उगवणे अत्यंत गरजेचे होते.

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दर्‍याखोर्‍यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश ....
किती यथार्थ आहे सुधीर मोघेंची लेखणी....भले  हे काव्य रचले त्यामागची त्यांची मनोभूमिका वेगळी असेल ही कदाचित... पण येथे प्रकर्षाने नजरेसमोर आमचा शिवबाच स्मरतो.

संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड निराशा, पारतंत्र्य, गुलामी, अवहेलना, दु:ख आणि संकटांच्या पराकाष्ठेने  भीषण काळोखाचे साम्राज्यच जणू उभे केले होते .या भीषण काळोखाला छेद देणारी पहिली मशाल सह्याद्रीच्या कुशीत राजमाता जिजाबाई आणि शहाजीराजे भोसले यांचे सुपुत्र शिवाजी महाराज यांनी पेटविली. आणि सह्याद्री पर्वतरांगात असलेल्या अजिंक्य, अभेद्य, बुलंद किल्ल्याच्या आधाराने ! गनिमी काव्याच्या युद्ध तं‌त्राने महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरा पगड जातीच्या मावळ्याच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्तांविरुद्ध स्वातंत्र्याचा लढा आरंभिला होता आणि दारूण, केविलवाण्या, जीवाच्या-शीलाच्या आकांताने  भेदरलेल्या , गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मने आणि मनगटे स्वतंत्र, स्वराज्याच्या प्रेरणेने जागृत केली. त्यावेळच्या सर्व जाती-जमातीच्या तरूणांना त्यांनी एकत्र केले. आणि अगदी कोवळ्या वयात अवघ्या पंधराव्या वर्षी म्हणजेच १५ एप्रिल १६४५ रोजी शिवाजी महाराजानी रोहिडेश्वरापाशी हिन्दवी स्वराज्याची शपथ घेतली. शिवपिंडीवर हाथ ठेवित महाराज म्हणाले," शंभो! हर हर महादेव! आज तुझ्या प्रेरणेने आम्ही हिन्दवी स्वराज्याची शपथ घेणार आहोत. संकल्प तडीला न्यायला तू सिध्द आहेस. जोवर स्वराज्याची उभारणी होत नाही, तोवर मैत्रीसाठी धरलेला हाथ आम्ही सोडणार नाही. दिल्या वचनाला अंतर देणार नाही." ..... आणि याच शपथेची संपूर्ण पणाने पूर्तता खूप मोठ्या कालावधीनंतर म्हणजे चक्क २९ वर्षानी ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी, म्हणजेच ६ जून १६७४ ला झाली; म्हणजेच शिवाजी महाराज छत्रपति झाले. महाराजांचा 'राज्याभिषेक झाला'.

शिवरायांसोबत जसे तरूण होते तसे वर्षानुवर्षे परकीयांच्या सेवेत असलेले नामांकॆत सरदारही होते. मात्र या सर्वांसमोर त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांनी आपलेसे केले, वचक बसवला, प्रसंगी क्ठोर शिक्षा दिल्या आणि मातृ-पितृवत प्रेमही दिले. स्वराज्य स्थापनेच्या उदात्त ध्येयपूर्तीमध्ये अनेक प्रचंड बलाढ्य शत्रुंना शिवाजी महाराजांनी  नामोहरम केले होते. त्यांचे शत्रुही त्यांच्यापेक्षा कित्येक पट बलशाली होते. त्यात केवळ हिदुस्थानातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील क्रमांक एकचे विशाल आकारमानाचे मोगल सत्ताधीश, दक्षिणेतील भक्कम आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांच्या जोडीलाच गोव्यातील पोर्तुगीज, सुरतेचे इंग्रज, फ्रेंच, जंजिऱ्याचे सिद्धी, कोकणातील छोटी छोटी राज्ये आणि यांच्या जोडीलाच स्वकीयांचेही (जावळीचे मोरे, पासले, कृष्णाजी कुलकर्णी आदी) शिवरायांच्या कार्यात प्रचंड अडथळे होते. पण शिवाजींनी आपल्या प्रत्येक शत्रुचा संपूर्ण अभ्यास करुन त्याच्या बलस्थानाबरोबरच दुर्बल स्थानांचाही विचार करुन आपल्या उत्कृष्ट सेनापतीच्या नेतृत्वाखाली सर्व शत्रुंना धूळ चारली व स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्या या कार्यात त्यांच्या जीवाभावाचे सखेसोबती, हजारो मावळ्याच्या, सर्वसामान्यांच्या बलिदानातून महाराष्ट्रभूमी पावन झालीच व स्वराज्याचेही स्वप्न साकार झाले.

स्वराज्याच्या या स्वतंत्र, सार्वभौम राज्याला बळकटी देण्याच्या उद्देशाने व राजमाता जिजाऊंच्या दूरदर्शी , मुत्सद्दीपणामुळे त्यांच्या आणि इतर स्वकीयांच्या प्रचंड आग्रहामुळे किल्ले रायगडावरती प्राचीन 'राज्याभिषेका'च्या प्रथेचे पुनरुज्जीवन करून व बलाढ्य शत्रूंनाही यथाकाल यथोचित वचक बसविण्यासाठी त्यांनी ६ जून १९७४ रोजी स्वत:स मोठ्या दिमाखात , डोळे दिपतील अशा वैभवात राज्याभिषेक करुन घेऊन एक सार्वभौम राज्य निर्माण झाल्याची द्वाही फिरवली. स्वराज्य निर्माण करुन त्यांनी जर राज्याभिषेकच केला नसता तर ते एक मराठ्यांचे यशस्वी बंड ठरले असते असे इतिहासकारांचे मत खरोखरीच पटते जेव्हा आपण १८५७ चे स्वातंत्र्याचे चिरडले गेलेले अमानुष बंड अभ्यासतो. 

शिवराज्याभिषेकासाठी काशी येथील 'वेदोनारायण' गागा भट्ट यांना पाचारण करण्यात आले होते. राज्यभिषेकापुर्वी महारांचा मौजिबंधानाचा विधि, सोयराबाईशी राजांचा समंत्रक विवाह, सुवर्णर्तुला असे अनेक विधी पार पाडले गेले. या विधिनंतर प्रमुख सोहळ्याला सुरवात झाली. राजे  सिंहासना वर होण्याचा समय आला, राजसदरेवर उंच जागी सुवर्ण सिंहासन ठेवले होते. राजसदरेची व्यवस्था अशी होती की, कुठल्याही कोपर्‍यातून ते सिंहासन दृष्टीला यावे. नगराखान्यापासून सिंहासनाचे अंतर एवढे असुनही बोललेला साधा शब्दही दोन्ही टोकाना स्पष्टपणे टिपला जात होता.

सूर्योदय समयी महाराज सिंहासनारूढ झाले. आणि मंत्रघोष करीत असतानाच गागा भट्ट यानी महाराजांच्या मस्तकावर छत्र धरले "क्षत्रियकुलवंत सिंहासनाधिश्वर गोब्राह्मण प्रतिपालक हिन्दू पतSपातशहा श्रीमंत श्री छत्रपति शिवाजी महाराज की जयSSSS"

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. स्वतंत्र राज्याची 'राज्याभिषेक शक' ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली. पूर्वीची मुसलमानी पद्धतीची लेखनपद्धती बदलून हिंदू पद्धतीची लेखनपद्धती विकसित करून लेखनप्रशस्ती, राज्यव्यवहारकोष हे मराठीतील ग्रंथ निर्माण करून घेतले. परकियाच्या तावडीतून सोडविलेल्या गडकोट किल्ल्यांना पूर्वीची मराठी नावे दिली व आपल्या लोककल्याणकारी स्वतंत्र राज्याचा विचार महाराष्ट्रापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण भारत-जगभरात पोहोचविण्यासाठी राज्याभिषेकानंतर परकीय सत्ताधिशांविरुद्ध आक्रमणे, आक्रमक मोहिमांचा धडाका आरंभ केला. हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्व सर्वत्र पोहोचावे, शिवछत्रपतीच्या उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन उत्तुंगपणे मार्गक्रमण करावे. या उद्देशाने शिवराज्याभिषेक दिन, विविध उपक्रमाने साजरा केला जातो.

इतक्या वर्षानंतरही तरूण पिढीला हा राजा आपला वाटतो. आता ‌गरज आहे ती खऱ्या अर्थाने विचार समजून घेण्याची. शिवरायांनी केवळ रण- मैदानावरच्या लढाया जिंकल्या नाहीत तर आपल्या लेखणीने आणि वाणीने अनेक लढाया जिंकल्या हे समजून घेण्याची वेळ आली आहे. "शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ" हे सुध्दा शिवाजी महाराजांनी वेळ प्रसंगी प्रतापगडावरील अफजल खानाचा हल्ला, आग्रा येथील कैदेतून सहीसलामत सुटका अशा जीवावर बेतलेल्या संकटातून सिध्द केले आपल्या आचरणांतून.

आपल्या देशात अन् जगात अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या. त्यांच्या जीवनाचा विचार केला, तर ते कायम दुसर्‍यांसाठीच जगत होते, असे दिसून येते. शिवरायांचे अवघे आयुष्य परकीयांची आक्रमणे परतविण्यात आणि स्वकीयांशी लढा देण्यात गेले. "ही तो श्रींची इच्छा " ह्या एका ध्यासाने स्वराज्याचे स्वप्न त्यांनी ध्यानी-मनी आजीवन अंगीकारले, कोठेही स्वत:च्या स्वार्थाची अपेक्षा न बाळगता, वा स्वप्राणांची आहुती देण्याची तत्परता सदैव बाळगूनच ते प्रतिकूल परिस्थितीत ही हार न मानता पुरुषार्थाची कास धरून अविरत यशस्वी घोडदौड करीतच राहिले. अन् अशीच माणसं ‘‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’’ ही ओवी खरी करत असतात. आपले शिवाजी महाराज हे त्यातीलच एक !  

शिवाजी राज्यांच्या गनिमी काव्याचा यवनी सेनेने एवढा धसका घेतला होता की त्यांचे घोडे पाणी पिताना बुजले की त्यांना उरात धडकी भरे असे वाचनात आले की यवनांना वार्‍याप्रमाणे येणारे शिवरायांचे संताजी व धनाजी पाण्यातही दिसत.

कविराज भूषण शिवरायांचे यशोगान गाताना म्हणतो-
जंभासुरला जसा इंद्र , समुद्राला जसा वाडवाग्नी,गर्विष्ठ रावणाला ज्याप्रमाणे प्रभुराम, मेघाला ज्याप्रमाणे वादळ,मदनाला जसे शिव शंकर, सहस्रार्जुनाला ज्याप्रमाणे परशुराम,वृक्षाना ज्याप्रमाणे वणवा, हरिणांना जसा चित्ता,अंधाराला जसा प्रकाश, कंसाला ज्याप्रमाणे श्रीकृष्ण,त्याचप्रमाणे नरसिंह असणारे शिवराय म्लेंच्छांचा नाश करतात.

शिवाजी महाराजांचे "सरनौबत" नेताजी पालकर हे "प्रतिशिवाजी" म्हणून ओळखले जात. आग्र्याहून शिवाजी महाराज सहीसलामत सुटले तेव्हा चिडलेल्या औरंगजेबाने शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेतोजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान दि.१९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले.  दि.२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेतोजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेतोजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ रोजी नेतोजी मुस्लिम झाले व त्यांचे 'महम्मद कुलिखान' असे नामकरण करण्यात आले.जून १६६७. औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेतोजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले.लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते. पुढे शिवराज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी आक्रमक सत्र सुरु केले तेव्हा शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. मग त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले.मे १६७६. रोजी पच्छाताप झालेले नेतोजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले.१९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.

येथे जाणवते की शिवाजी महाराज हे किती आधुनिक विचारसरणीचे होते. अगदी काही चुकीच्या, बुरसटलेल्या पुरोगामी विचारांच्या मंडळींच्या प्रखर विरोधाला न जुमानता त्यांनी "महंमद कुलीखाना"स म्हणजेच नेताजींना परत हिंदू धर्मात घेतले. मला वाटते की शिवाजी महाराज नक्कीच जाणत होते की खाण्या-पिण्याच्या , स्पर्श-अस्पर्शाच्या व चालीरीतींच्या मूर्ख रूढी कल्पनांमुळेच खरा धर्म बाजूला राहून फक्त दुराग्रह माजतो. खरा मानवतेचा धर्म हा काही मानवाच्या हातून नकळत घडलेल्या किंवा जबरदस्तीमुळे झालेल्या, घडविल्या गेलेल्या चुकांमुळे भ्रष्टही होत नाही आणि बदललाही जाऊ शकत नाही.

दुसरे उदाहरण म्हणजे आपले पिता शहाजीराजे ह्यांच्या निधनानंतरही राजेंनी आपल्या मातेस जिजाऊ (राजमाता जिजाबाई) ह्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले होते. येथेही शिवाजी राजे कदाचित् ह्याच मताचे पुरस्कर्ते असावेत असे वाटते की - रूढी म्हणजे धर्म नव्हे. रूढी ह्या मानवनिर्मीत असतात, त्यांमुळे त्या अनुचित असल्यास कालपरत्वे त्यात यथोचित बदल घडविणे हेच श्रेयस्कर असावे. सच्या धर्माच्या वाटेतील ह्या आपदा म्हणा वा  आपत्ती  म्हणा , शिवाजी राजांनी किती सहजतेने निवारील्या नाही बरे? चुकीच्या प्रथांचे अंधानुकरण न करता  खरा  धर्म  कसा आचरणात आणायचा  ह्याचे सुंदर आदर्शच  जणू काही स्थापिले आणि धर्माच्या वाटेवर येऊ घातलेल्या अनिष्ट आपत्तीचे निवारण सुध्दा केले . 
   
शिवराज्याभिषेक आपण आनंदाने मोठ्या जल्लोषात साजरा करू याच , पण त्याच वेळी आपल्या आदर्श असणार्‍या लाडक्या शिवाजी महाराजांचे हे चुकीच्या कालबाह्य रूढींना नाकारून खर्‍या धर्माचे पालन करण्याच्या वृत्तीचा, त्यांच्या ह्या अत्यंत पवित्र , पावन ध्येयालाही आपण सदैव स्मरणात  ठेवू .एवढेच नव्हे  तर आपल्या आचरणात ती तत्वे आणण्याचा यथाशक्ती प्रयत्न करण्याचा संकल्प जरी आपण केला तरी खर्‍या अर्थाने शिवरायांना ही भाव-सुमनांजली ठरेल असे वाटते.

संदर्भ सूची: 
१. विकीपीडीया - मुक्त ज्ञानकोश

No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog