Tuesday 2 June 2015

वटवृक्षाची पूजा - भूमातेची अंबज्ञता

वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा ! हिंदू कालगणनेनुसार मराठी वर्षातील ज्येष्ठ महिना हा नावाप्रमाणेच ज्येष्ठ वैशिष्ट्ये धारण करणारा म्हणावा लागेल. संपूर्ण वर्षभरातील सर्वांत मोठा दिवस याच महिन्यात असतो.( २१ जून - ह्या वर्षी अधिंक महिन्यामुळे तो आषाढ शुध्द पंचमीला येतो - अपवाद  अधिक महिना कालगणनेनुसार) उन्हाळ्याची दाहकता सोसून सर्व चराचर आर्ततेने पावसाची कधी चाहूल लागेल म्हणून आसुसलेले असते आणि अशावेळी आभाळ काळ्या मेघांनी  भरून आलेले, त्यामुळे वातावरणात उष्मा वाढलेला, कधी पाउस येईल वाटते आणि मध्येच पावसाची हलकी सर येणार्‍या पावसाळ्याची आठवण करून देते. परतीच्या वाटेवर पाऊल ठेवत निरोप घेणारा उन्हाळा नि सुरू होऊ पाहणारा पावसाळा यांची जणूकाही गळाभेट या महिन्यात पाहता येते. ज्येष्ठात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. या पौर्णिमेला अध्यात्मिक  व धार्मिक महत्त्व तर आहेच, पण त्यामागचे वैज्ञानिक महत्त्वही समजून घेतल्याने खर्‍या अर्थाने आजच्या वैज्ञानिक युगाशी मिळते जुळते घेण्यासारखे होईल. 

भारतीय संस्कृती, शास्त्र, परंपरा या महान ऋषी-मुनींच्या वैज्ञानिक, अध्यात्मिक चिंतनातून निर्माण झाल्या आहेत ज्यात त्यांनी चराचरातील प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अभ्यासिले, जाणले आणि समाजात रुजवले, बिंबवले ते अनेक सण, उत्सवांच्या आधारे. त्यात त्यांनी निसर्गाचा समतोल सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या वृक्षांचे अनन्यसारधारण महत्त्व आहे हे जाणूनच वृक्ष, वेली झाडांचे मानवी जीवनाशी पूर्वापार नांत जुळवून दिले. 

माणसाला निरोगी, निरामय जीवन जगण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची खूप मदत होते. याशिवाय झाडांची पाने, फुले फळे अगदी वाळलेले लाकडे देखील मानवाला उपयोगीच असतात. या अनमोल देण्याचे जपणूक करावी, संवर्धन करावे हा संदेश पूर्वजांनी पूर्वापार काळापासून समस्त  मानवजातीला दिला. म्हणूनच विविध व्रते, उत्सव, सण तसेच विविध देवी देवतांच्या पूजेत झाडांना, त्यांच्या पाना-फुलांना फळांना मानाचे महत्त्वाचे स्थान आहे. वृक्षांचा महिमा वाढून वृक्ष जतन करण्यास माणूस प्रवृत्त व्हावा, म्हणूनच आपल्याकडे वटपौर्णिमेसारखी व्रतं, परंपरा पाळली जातात. गरज आहे ती आपण ती व्रते सुजाण पणे पाळण्याचा. वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची महिमा आपण जर समजून घेतला तर खरे वृक्षपूजन करण्याचा प्रयत्न आपण केला असे आपण म्हणू शकतो. 




पर्यावरण सरंक्षण आणि संवर्धन यांचा असा उदात्त वारसा असलेल्या भारत देशात आधुनिक काळात सण-उत्सवांना हिडीस स्वरूप येत गेले आहे. त्यांमागील संस्कारांचा मूळ हेतू हरवला आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे वटपौर्णिमा. पतिव्रता सावित्रीचे देणे असलेले ते व्रत हा मंगल संस्कार न राहता यांत्रिक सोपस्कार झाला आहे असे म्हणावे वाटते .   

वास्तविक अनेक सण, उत्सवांची रचना त्यातील वैज्ञानिक संदर्भ लक्षात घेऊन केली असावी, असे वाटण्याइतपत या सणांमागे विज्ञान आहे. दुर्देवाने ते जाणून न घेता, केवळ परंपरा म्हणून ते करण्याचा अट्टाहास धरला तर मग शास्रार्थ जाऊन त्याला कर्मकांडाचे स्वरूप येते. मला वाटते बहुधा वटपौर्णिमेचेही तसेच झाले आहे.

आयुर्वेद सांगते की ‘नास्ति मूलं अन्नौषिधम’ -  कोणतीही वनस्पती ही औषधी नाही असे असूच शकत नाही . अर्थात प्रत्येक वनस्पतीत काही ना काही औषधी गुण असतोच, हे आमच्या पूर्वजांनी संशोधन करून जाणले होते. म्हणूनच वटवृक्षासारख्या महान गुणकारी वृक्षाचा गौरव करण्यासाठी ह्या व्रताची वटवृक्षाशी सांगड घातली असावी. सामान्यजनांच्या समजुतीसाठी सावित्री-सत्यवान ह्या पौराणिक कथेचा आधार घेऊन त्याचे एका व्रतात रुपांतर करण्यात आले, परंतु त्या अनुषंगाने तत्कालीन भारतीय स्त्रीचे महान व्यक्तिमत्त्वही दिसते हे निश्चितच! सावित्रीची कथा तर सर्वांना माहीत आहेच, म्हणून आज आपण "दिव्यत्त्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती" ह्या नुसार वटवृक्ष पूजनाचा महिमा जाणून घेऊ या. 

आयुर्वेद शास्त्रात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याची मूळे, पाने, फुले, फळे, साल, पारंब्या, चिक ह्या सगळ्यांचा औषधी उपयोग होतो व त्यामधून असंख्य आजारांवर उपचार करता येतो. भारतीय वैद्यकशास्त्राने सृष्टीचक्र अखंड गतिशील राहण्यासाठी झाडाचे काय महत्त्व आहे ते ओळखले होते. वीर्य वाढवण्यासाठी व गर्भाशयाच्या शुद्धीसाठी वडापासून रामबाण औषध मिळते. म्हणूनच ह्याला संसारवृक्ष असेही म्हटले गेले आहे.



वटवृक्षाच्‍या मुळाचे लाकूड लवचिक व अधिक बळकट असते. तंबूंचे खांब, बैलगाड्यांचे जू व दांडे इत्यादींच्‍या निर्मितीसाठी ते उपयोगी आहे. खोडाचे लाकूड करडे व साधारण कठीण असते. त्याचा उपयोग अनेक किरकोळ वस्तू तयार करण्यासाठी व सर्वसाधारण सजावटी सामानासाठी होतो. वडाच्या लाकडापासून कागदाचा लगदा तयार करता येतो. सालीच्या धाग्यांपासून दोर तयार करतात. पारंब्यांचाही दोरी म्हणून वापर करता येतो. चिकापासून अतिशय चिकट गोंद बनवतात. त्याचा उपयोग पाखरे पकडण्यासाठी केला जातो. पानांपासून पत्रावळी व द्रोण तयार करतात. कोवळ्या फांद्या व पानांचा शेळ्या, मेंढ्या व इतर गुरांना चारा म्हणून उपयोग होतो. हा चारा हत्तींना मोठ्या प्रमाणात लागतो. 

झाडाचा चीक दातदुखी, संधिवात, कटिशूल इ. व्याधींवर उपयोगी आहे. तळपायांच्या भेगांवर याचा लेप देतात. वडाच्या सालीत ११% टॅनीन असते. तिचा रस स्तंभक (आकुंचन करणारा) व पौष्टिक असतो. आमांश व अतिसारात तो उपयोगी आहे. वृक्षाच्‍या सालीचा काढा मधुमेहावर गुणकारी आहे. मुळांची साल परम्यावर उपयुक्त आहे. पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. वडाचे बी पौष्टिक व शीतकर (थंडावा देणारे) असते.  पारंब्याची टोके मळमळ, उलटीसाठी घासून थेंब देतात. उंदिर तसेच विंचवाच्या दंशावर वडाचा चिक लावावा असेही वृध्द जाणकार सांगतात जेव्हा तहान फार लागते, अशा वेळी वडाची पाने सूज व ठणकेवर गरम करून तेल लावून बांधल्याने आराम पडतो. अशा प्रारे वडाच्या साल, पाने, पारंब्यामुळे यांच्या औषधी गुणधर्मामुळे हा वृक्ष मानवाचा मि‍त्रच आहे. त्यामुळे या वृक्षाला मोठे महत्त्व आहे.वडाच्या मुळांपासून (पारंब्यांपासून) निघणारे तेल केशवर्धक तर आहेच पण वीर्यवर्धक म्हणूनही त्याचा उपयोग होतो. पुरूषांच्या पुष्कळशा व्याधींवर आयुर्वेदात या मुळ्यांचा उपयोग केलेला आढळतो पावसाळ्याच्या सुरुवातीला वटवृक्षाच्या पानांमधून थॉरिअस नावाचा एक द्रव पाझरतो. त्यामुळे स्त्रियांचे विविध प्रकारचे गर्भाशयासंबंधीचे विकार दूर होतात. वडाच्या मुळीचा गर्भवर्ती स्त्रियांत पुसवन विधीत पूर्वी उपयोग केल्या जात असे.  त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी त्याला पूजेचा मान देऊन त्याचा गौरव केला आहे. बहुधा त्यामुळे हे व्रत ज्येष्ठ महिन्यात करण्याचे आपल्या वैज्ञानिक दूरदृष्टी लाभलेल्या पूर्वजांनी ठरवले असावे.

वटवृक्षाला संस्कृतमध्ये ‘अक्षयवृक्ष’ असे म्हटले जाते. ‘अ’ म्हणजे नाही आणि ‘क्षय’ म्हणजे विनाश! ज्याचा कधीही विनाश होत नाही अर्थात जो पुन्हा जिवंत होतो, वाढत जातो तो अक्षय वृक्ष म्हणजेच वटवृक्ष! वाचनात असे आढळले की प्रलय झाला तरी वटवृक्ष असतोच. तो युगान्ताचा साथीदार आहे. 




बाल मुकुंदाने प्रलयकाळी वटपत्रावर शयन केले होते - वटपत्रशयनी परमात्म्याचे म्हणजेच मूळ पुरुषाचे चित्र ह्याचीच साक्ष पटविते. अगदी प्रलयातच नव्हे तर महाप्रलयातही केवळ वटवृक्ष एकमेव वृक्ष तग धरून राहतो. 
अगदी गुरुचरित्रातील दुसर्‍या अध्यायातील ओवी हेच सांगतात असे मला वाटते - 
ब्रह्मदेवे कलियुगासी । सांगितले केवी कार्यासी । आद्यंत विस्तारेसी । निरोपिजे स्वामिया ॥३९॥
ऐक शिष्या एकचित्ता । जधी प्रळय झाला होता । आदिमूर्ती निश्चिता । होते वटपत्रशयनी ॥४०॥
अव्यक्तमूर्ति नारायण । होते वटपत्री शयन । बुद्धि संभवे चेतन । आणिक सृष्टि रचावया ॥४१॥

अधिक माहिती जाणून घेऊ या पुढील भागात -


1 comment:

  1. Ambadnya Sunitaveera khupach apratim lekh. Yat vadachya zadache upyogach nahi tar Aaushadi gundharm suddha tumhi khup sundar pane cover kele
    Ahet. Mi ek Dr. aslyane sangu shakte. Agdi medical side madhil nastil tari tyanahi khup yogya ritine vadache aaudhadi gundharm ya lekhatun sahaj samajtil. Pudhcya lekhachi vat pahat ahe. Ambadnya

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog