Wednesday 28 October 2015

भूकंप - निसर्गाचा प्रकोप वा रौद्ररूपी तांडव ?

नुकत्याच सोमवारी दिनांक २६ ऑक्टोबर २०१५ रोजी ईशान्य अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतराजीत केंद्र असलेल्या , अमेरिकेच्या "जिऑलॉजिकल सर्व्हे" ने ७.५ रिश्टर क्षमतेची तीव्रता नोंदविलेल्या भूकंपाच्या जोरदार झटक्यांनी दुपारी पावणेतीनच्या सुमारास उत्तर भारतासह, अफगाणिस्तान , पाकिस्तान येथील जनजीवन विस्कळीत झाले असल्याची बातमी वाचनात आली, ज्यात सुमारे २४८ हून अधिक लोक मूत्युमुखी पडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याआधी २५ एप्रिल २०१५ मध्ये नेपाळ मध्ये ७.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप व लागोपाठ  त्याचा पडसाद म्हणून १२ मे २०१५ रोजी ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला ज्यात सुमारे ८००० हून अधिक लोकांचा बळी गेला असल्याची भीती व्यक्त केली जाते. म्हणजेच अवघ्या ६ महिन्यांमध्ये दक्षिण आशियाला भूकंपाचा मोठा धक्का बसण्याची ही दुसरी वेळ आहे. 

 नेपाळ भूकंप 
त्यामुळे सध्याच्या अफगाणिस्तान येथील भूकंपाच्या धक्क्याने पुन्हा एकदा भूकंप आणि त्याची कारणं हा विषय चर्चेत आला आहे. भूकंप होणं ही एक नैसर्गिक आपत्ती वा निसर्गाचा प्रकोप दर्शवणारी घटना असूनही आज सुध्दा भूकंपाचे धक्के बसले की, आपल्याकडे लोकांमध्ये भीती निर्माण होऊन गोंधळ उडतो वा भूकंप कसा होतो ह्याबाबतची शास्त्रीय कारणे माहीत नसल्यामुळे अज्ञानापोटी तो लोकांकडून केला जातो. मुळातच आपल्या भारतात आपत्ती व्यवस्थापन , आपती निवारण अर्थातच डिझास्टर मॅनेजमेंट ह्या विषयाबाबत म्हणावी तेवढी जनजागृती झालेली नाही. मुळातच जनजागृती नसल्यामुळे लोकांना भूकंपाविषयी आणि तो झाल्यानंतर काय काळजी घ्यावी, याची पुरेशी कल्पना नाही. त्यामुळे ते मृत्युमुखी पडतात.



तसे पाहिले तर अज्ञान म्हणजे अंध:कार वा अंधार. आपण पाहतो की बरीच माणसे अंधाराला खूप घाबरतात. प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधार , आणि प्रकाश म्हणजेच ज्ञान. त्यामुळेच जर आपल्याला एखाद्या गोष्टीची नीट माहिती असेल, पूर्ण ज्ञान असेल तर त्या गोष्टीपासून निर्माण होणार्‍या संभाव्य धोक्याची भीती वाटत नाही. हेमाडपंत विरचिते "श्रीसाईसच्चरित " ह्या अपौरुषेय ग्रंथात ह्याचा सुंदर उल्लेख आढळतो , अध्याय २२ मधील ओव्यांमध्ये -
अल्पांधारींचा जो साप । तोच प्रकाशी दोर आपाप । अल्पांधार प्रकाशस्वरूप । दोहींचा बाप तूं एक ।। ३ ।।
सर्पाकार वृत्तीचा जनिता । तिजलाच दोराचा आकार देता । तूंच भीतीतें उत्पन्नकर्ता । 
अंती निवारिताही तूंच ।। ४ ।।      
आधीं जेव्हां पूर्णांधार । नाहीं सर्प नाही दोर । वृत्ति उठाया नाहीं थार । तोही निराकार तूं होसी ।। ५ ।।
पुढें निराकाराचा आकार । तोही अल्प प्रकाशाचा अवसर । तेणें आभासूं लागला विखार । 
आभासा कारणही तूंच ।। ६ ।।  

साधे व्यवहारातले उदाहरण आहे की जेव्हा कमी अंधार (अर्थात अपुरा उजेड, प्रकाश) असतो तेव्हा जो साप वाटतो , तोच थोडासा नीट प्रकाश येताच साप नसून दोर आहे हे कळताच मनातील भीती दूर निघून जाते. अर्थातच परमेश्वर वा सदगुरु हा एकमेव प्रकाशाचा दाता आहे, जो स्वत:चा प्रकाश देतो म्हणजेच ज्ञान देऊन अज्ञान दूर करतो आणि तोच कर्ता, करविता आहे. तसेच भीती उत्पन्नकर्ताही तोच आहे.

भूकंप हे आपल्याला निसर्गाचे रौद्ररूपी तांडव वाटते किंवा निसर्गाचा प्रकोप वाटतो एवढा भीषण नरसंहार, वित्तहानी होत असते. रागाने जसा माणूस थरथरा कापतो तसेच भूमातेचे , धरणीचे , पृथ्वीचे कंपन म्हणजे थरथराट असतो. पण निसर्गाचा किमयागार असलेल्या ह्या निसर्ग-रचयित्या परमपित्याकडे आपण नीट पाहिले आणि त्याच्या रागाचे, उद्रेकाचे कारण जाणून दूर केले तर नक्कीच भूकंपाचा बागुलबुवा आम्हांला छळणार नाही असे मला तरी किमान पक्षी वाटते.  

भूकंपात होणारी हानी टाळायची असेल तर भूकंपप्रतिरोधक घरांची निर्मिती करायला हवी. त्याचप्रमाणे शालेय शिक्षणातही भूकंपाविषयीच्या अभ्यासाचा अंतर्भाव करायला हवा. या पार्श्वभूमीवर भूकंप होण्यामागची कारणं समजून घेणं गरजेचं आहे असे वाटते.

माझे सदगुरु डॉक्टर श्री अनिरुध्द्सिंह जोशी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केल्या गेलेल्या "अनिरुध्दाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट" ह्या संस्थेत मी "आपत्ती व्यवस्थापनाचा कोर्स (विनामूल्य) केल्यामुळे जी काही अमूल्य माहिती मला मिळाली त्याच्या आधारे ही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.  

भूकंप ही एक विध्वंसक नैसर्गिक आपत्ती (संकट) आहे. भूकंप म्हणजे धरणीला वा जमिनीला सुटणारा कंप. अगदी सोप्या भाषेत भूकंपाची व्याख्या करायची झाली तर -
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १० ते १२ मैल आंतील खडकाच्या  अनपेक्षित (अचानक) विस्थापनामुळे उद्भवलेली जमिनीची आकस्मिक , विध्वंसक हालचाल म्हणजे भूकंप होय. 
भूकंपामुळे जे काही वातावरणात बदल घडून येतात त्यावरून ढोबळमानाने आपल्याला आढळून येणारी लक्षणे व त्यांचे पर्यावरणात होणारे दुष्परिणाम पाहू या -

तैवान भूकंप 
नैसर्गिक आपत्ती लक्षणे                         परिणाम
भूकंप     १. कंपन (जमिनीचे कापणे)          इमारती व धरणांना नुकसान 
            २. जमिनीची घसरण                  इमारती मातीत खचणे वा जमिनीत गाडल्या जाणे
            ३.  भेगा पडणे                           भेगा पडलेल्या इमारतींचे गंभीर नुकसान होणे, पाण्याचे नळ                                                                           फुटणे, पूल कोसळणे
           ४. महाकाय लाटा ( त्सुनामी)       समुद्रकिनार्‍या जवळच्या भागात पूर आल्याने बांधकामांना व                                                                          पिकांना धोका, शेतजमिनी खार्‍या पाण्यामुळे नापीक होणे.  

मलेशिया भूकंप 
आपल्या भारताच्या उत्तर दिशेला असलेला हिमालय पर्वत हा संपूर्णपणे बर्फाने आच्छादलेला आहे खरा, पण पौराणिक, भौगोलिक व ऐतिहासिक दाखल्यांवरून हिमालयीन पर्वतरागांची निर्मीती ही सुध्दा अशाच नैसर्गिक उत्पातातून झाली आहे आणि आजच्या विज्ञानाने सुध्दा हे सिध्द केले आहे. ह्या पर्वताची उंची दरवर्षी ३ ते ५ सेंमीने वाढत आहे. याचाच अर्थ ह्या पर्वतरागांखालील जमिनीत (भूभागात) सतत अंतर्गत हालचाली होत असतात. म्हणून तज्ञांनी हिमालयीन प्रदेशात ६० टक्यांपेक्षा जास्त भागात ८ रिश्टर स्केल किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचा भूकंप होण्याची शक्यता वर्तविली आहे. ह्याचेच अगदी नजीकच्या काळात आलेले प्रत्यंतर म्हणजे २५ एप्रिल २०१५ला नेपाळला ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर माऊंट एव्हरेस्ट हा हिमालयातील अत्युंग पर्वत नैऋत्य दिशेला १.१८ इंचाने सरकलेला आढळला आहे.      

डॉक्टर अरूण बापट हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ भारतीय भूकंपतज्ञ ( a Prominent Seismologist ) असून ते पुण्याच्या वेधशाळेत  भूकंप विज्ञानाच्या उपशाखेत प्रमुख संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी आपती व्यवस्थापन ह्या विषयात विवीध संस्था व राज्य सरकार ह्यांना ४० वर्षाहून अधिक काळ मोलाचा सल्ला दिला आहे.  त्यांनी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम, जम्मू-काश्मीर, मिझोराम ह्यांच्या राज्य सरकारांचे सल्लागार म्हणून कार्यभार वाहताना आपत्ती व्यवस्थापन ह्या विषयावर त्यांचे बहूमूल्य मार्गदर्शन केले आहे. ते आपल्या एका लेखात लिहीतात की नेपाळमध्ये झालेला शक्तीशाली भूकंप हा अपेक्षित होता. भूकंप होण्यापूर्वी वातावरणातील आयनोस्फीयरमध्ये असलेल्या ऊर्जाभारित कणांची संख्या अचानक दुपटी-तिपटीने वाढते. ते भूकंपाचे निदर्शक असते. नेपाळमध्ये भूकंप होण्याच्या आधीच्या आठवडाभरात अशी स्थिती पहायला मिळाली होती. 

डॉक्टर बापट हे " शाप विनाशाचा,वरदान संशोधनाचे " त्यांच्या भूकंपावरील दुसर्‍या लेखात लिहीतात की धरणीकंपामुळे होणार्‍या विनाशाला रोखणे जगभरात कुणालाही शक्य झालेले नाही. आजही देश-विदेशांत भूकंप होतात व लाखो जण मरतात. २९ सप्टेंबर १९९३ साली भारतात किल्लारी येथे झालेल्या भूकंपाने हजारो बळी घेतले. ही परिस्थिती बदलण्यासाठी आधार आहे तो फक्त संशोधनाचाच! मध्यम शक्तीच्या भूकंपाने किती मोठ्य़ा प्रमाणात हानी होऊ शकते, हे आपण सप्टेंबर २०११ च्या ६.५ शक्तीच्या सिक्कीम भूकंपाच्या वेळी बघितले आहे. याउलट जपानमध्ये ११ मार्च २०११ रोजी मोठा भूकंप होऊन त्सुनामीही आली. पण, त्यामुळे तेथील एकही घर कोसळले नाही. तो भूकंप ९.३ रिश्टर स्केलचा होता. त्सुनामीमुळे माणसे मृत्युमुखी पडली. पण घरे कोसळली नाहीत. एवढी प्रगती आपण निश्चित करू शकतो. भूकंपप्रतिबंधक घर कसे बांधावे त्याचे तंत्रज्ञान आहे आणि जपानने त्याचा अवलंब केला. आपल्याकडेही अशा घरांची निर्मिती केली तर भूकंपामुळे होणारी जीवितहानी टळू शकेल.

भूकंप होणे ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. आपण भूकंप जरी थांबवू शकत नसलो तरी भूकंपामुळे होणारी हानी नक्कीच टाळू शकतो.भूकंपामुळे मनुष्यहानी होण्यास मानवनिर्मित घरे पडणे हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे भूकंपापासून होणा-या हानीपासून बचाव करायचा असेल तर घरांची रचना भूकंपप्रतिरोधक करणे आणि लोकांमध्ये जनजागृती करणे हे प्रमुख उपाय आहेत. आपल्याकडे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात आपत्तीनंतर काय करायचे, यावर भर देऊन सगळी आखणी केली जाते. आपत्तीच्या आधी विकास योजना आखताना आपत्ती होण्याची शक्यता विचारात घेऊन विकास आराखडा क्वचितच तयार केला जातो ही अत्यंत खेदाची व दुर्दैवी बाब आहे असे वाटते.  

भारत हा अत्यंत भूकंपप्रवण देश आहे. भारताचा ६० टक्क्यांपेक्षा अधिक भूभाग हा भूकंपाच्या धोक्यासाठी संवेदनशील आहे. गेल्या काही वर्षांत भारताने अनुभवलेले मोठे भूकंप म्हणजे बिहार (१९८८), उत्तरकाशी (१९९१), लातूर- किल्लारी (१९९३ ), जबलपूर (१९९७) , चमोली (१९९९), भुज (२००१), काश्मीर (२००६), सिक्कीम (२०११). 

भूकंप होतो म्हणजे निसर्गाचा प्रकोप होतो म्हणजे नक्की काय होते ते जाणून घेऊ या - जेव्हा भूगर्भातील म्हणजेच पृथ्वीच्या पोटातील दाब एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पोहचतो तेव्हा मोठेमोठे शिलाखंड (खडक) एकमेकांवर घासले जातात व एकमेकांना ढकलतात , त्यामुळे पृष्ठभागावर थरथर निर्माण होते व भूकंप घडतो. जेव्हा खडकांमध्ये त्यांच्या सहन करण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक ताण निर्माण होतो तेव्हा अतिरिक्त (जास्तीचा) ताण मुक्त करण्यासाठी ते खडक फुटतात व अशा हालचालीं मध्ये जेव्हा एखादा भूखंड विस्थापित होतो तेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाला मोठी भेग पडू शकते म्हणजेच त्या ठिकाणी भूकंप होतो.



साधे सोपे उदाहरण बघायचे झाले तर लहान मुले हवेचा फुगा फुगवतात आणि त्या फुग्यावर हाताने घासून आवाज करून खेळतात. एका ठराविक वेळेपर्य़ंत फुग्यावरचे हाताने घासणे आवाज निर्माण करते , पण ज्या क्षणी ह्या घासण्यातून जास्त दाब तयार होतो व फुग्याची दाब सहन करण्याची क्षमता कमी पडते तेव्हा फुगा फुटतो.     

आता भूखंड म्हणजेच प्लेट (Plate) म्हणजेच शिळांचे खूप मोठे भाग. पृथ्वीचे प्रावरण अनेक भूखंडानी मिळून बनलेले आहे. हे भूभाग हळूहळू हलतात व सीमारेषांवर घासले जातात. या सीमारेषांना भूखंड सीमा (Plate boundaries)किंवा विभंग रेषा(Fault Lines) म्हणतात. बहुतांश भूकंप या फॉल्ट लाईन्सवर होतात. भूजचा भूकंप हा ह्याच प्रकारातील होता. ७.५ रिश्टर स्केलचा ह्या भूजच्या भूकंपाची तीव्रता ३० मेगाटन अणुबॉम्बच्या स्फोटाएवढी होती.     
      
जगामध्ये जे भूकंप होतात त्याला बहुतांशी कारण भू-भ्रंशाचे (जिओलॉजीकल फॉल्ट) आहे. हे सरकल्यामुळे भूकंप होतात. आता ते किती सरकतात हे भूकंपाच्या शक्तीवर अवलंबून असते. यामध्ये जे खडक फुटतात ते खालच्या बाजूला फुटतात आणि त्याचा परिणाम म्हणून जमिनीच्या वरच्या बाजूला भेगा पडतात. साधारणपणे सहा ते साडे सहा रिश्टर स्केल शक्तीचा भूकंप असेल तर वरच्या बाजूला ३० ते ४० किलोमीटर जमीन फाटलेली आपल्याला दिसते. भूकंप सात रिश्टर स्केलचा असेल तर १०० किलोमीटरपर्यंत जमीन फाटलेली दिसते. तो आठ रिश्टर स्केलचा असेल तर १५० ते २०० किलोमीटरपर्यंत जमीन फाटते. 

२६ डिसेंबर २००४ रोजी सर्वांत मोठा इंडोनेशियामध्ये झालेला भूकंप ९ पेक्षा जास्त रिश्टर स्केलचा होता. त्यावेळी त्सुनामीही आली होती. अशा प्रचंड मोठ्या भूकंपामुळे ११०० किलोमीटरपर्यंत जमीन फाटली होती. जेवढी भूकंपाची ऊर्जा जास्त तेवढी जमीन फाटण्याची लांबीही जास्त असते. ह्या भूकंपाचे धक्के भारतातही जाणवले होते ते आपण खालील चित्रात पाहू शकता... 


जमिनीची घनता किंवा डेन्सिटी हे भूकंप होण्याचे कारण आहे. जमिनीची घनता सर्वत्र सारखी नाही. जमिनीवरकोठे वाळू आहे, कोठे डोंगर आहे, खडक आहे, कोठे डोंगर आहे, कोठे पाणी आहे. त्यामुळे तिची घनता सर्वत्र सारखी नाही. कोणतीही गोष्ट फिरते त्यावेळी त्याच्यामध्ये त्वरण (acceleration) निर्माण होते. ते प्रत्येक ठिकाणी वेगळे असते. त्यामुळे जे बळ (Force) निर्माण होते त्यामुळे खडक त्याच्या क्षमतेनुसार ताणला जातो. त्यामुळे भूकंप होतात. थोडक्यात पृथ्वीची घनता सर्वत्र सारखीच असती तर भूकंप झालेच नसते. 

भूकंपापासून होणा-या हानीपासून बचाव करायचा असेल तर घरांची रचना भूकंपप्रतिरोधक करणे हा महत्त्वाचा उपाय आहे. त्याचप्रमाणे लोकांमध्ये जनजागृती करणे हा दुसरा उपाय आहे. भूकंपाचे निदान(पूर्वकथन) करता येत नाही, असे काही लोक म्हणतात तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार ते करता येते. पण PREVENTION IS ALWAYS BETTER THAN CURE ह्या म्हणीनुसार सावधानता बाळगून प्रतिबंधात्मक उपाय आधीपासोनच योजले तर नुकसान पूर्णपणे टाळता आले नाही तरी त्याची तीव्रता नक्कीच कमी वा नगण्य करता येऊ शकते ह्यासाठी भूकंप होण्याआधी , भूकंप झालाच तर भूकंप होत असताना आणि भूकंप झाल्या नंतर काय खबरदारी घ्यायची , काय उपाययोजना करायची असते ते पुढच्या भागात जाणून घेऊ या....

संदर्भ:
           १. आपात्कालीन व्यवस्थापन - Aniruddha's Academy of Disaster  Management

1 comment:

  1. अंबज्ञ. अभ्यास पूर्ण लेख. आजच माझे AADM चे नैसर्गिक आपत्ती विषयावर लेक्चर आहे. मला आपल्या लेखाचा उपयोग होईल. ...अंबज्ञ.

    ReplyDelete

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog