Saturday 31 October 2015

आधुनिक भारताचे पोलादी पुरुष - "भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल"

आधुनिक भारताचे पोलादी पुरुष किंवा लोह पुरुष म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरदार वल्लभभाई पटेल ह्या खंबीर व्यक्तिमत्त्वाच्या कणखर नेतृत्त्वाची आज ३१ ऑक्टोबर रोजी १४० वी जयंती आहे त्या निमीत्ताने -    


धाडसी, कुशल, न्यायप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पोलादी पुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्त्व शब्दात मांडणे म्हणजे टिटवीने समुद्र उपसण्याचा अट्टाहास करण्यासारखेच आहे. अष्ट्पैलू असामान्य प्रतिभेचे वरदान लाभलेला हा भारतमातेचा सुपुत्र गुजरातमधील खेडा जिल्ह्यतील नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी लेवा पाटीदार ह्या समाजातील एका शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन भारतमातेची कूस खर्‍या अर्थाने उजविता झाला. लाडबा व झव्हेरीभाई पटेल ह्या माता-पित्यांच्या उदरी जन्मलेले हे चौथे अपत्य. वल्लभभाईंच्या वडिलांनी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला होता व या कुटुंबावर स्वातंत्र्य चळवळीचा प्रभाव होता. देशप्रेमाचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला व लहानपणी घरीच राजकीय संस्कारांचे बाळकडूही पाजले गेले होते. 



वल्लभभाई पटेल लहानपणी नडियादच्या इंग्रजी शाळेत शिकत होते. त्या शाळेत एक कडक वृत्तीचे शिक्षक होते. मुलांचे थोडे चुकले तरी छडीने मारत असत. परंतु एके दिवशी या शिक्षकाने एका गरीब विद्यार्थ्याला दंड केला. दंड म्हणून पैसे मागितले. तो गरीब मुलगा दंडाइतके पैसे आणू शकला नाही. त्यामुळे शिक्षकाने त्याला वर्गाबाहेर हाकलले. हे पाहून लहानग्या वल्लभलाही राग आला आणि तो त्या विद्यार्थ्यांबरोबर बाहेर गेला. तो बाहेर गेलेला पाहून शिक्षकांवर चिडलेले इतर विद्यार्थीही वर्गाबाहेर गेले. ही वार्ता सर्व शाळेत पसरताच शाळेतील सर्व विद्यार्थी बाहेर पडले. सारी शाळा ओस पडलेली पाहून मुख्याध्यापकांनी मध्यस्थी केली आणि यापुढे असे होणार नाही असे सांगितले. तेव्हा मुले परत वर्गात आली. अशाप्रकारे अन्यायाविरुध्द लढण्याची जबाबदारी त्यांनी लहानपणापासूनच उचलली होती. वल्लभभाईंची विचारसरणी ही लहानपणापासूनच किती उच्च प्रतीची होती ह्याची झलकच येथे आपल्याला पहावयास मिळते. जणू वल्लभभाई सांगू इच्छित होते की अन्याय करणारा कितीही मोठा असला तरी कदापिही अन्याय सहन करू नये कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो. त्यांच्यात दडलेली अन्यायाविरूध्द चीड व नेतृत्त्वाची बीजे ह्या छोट्याशा  कथेतून दृष्टीस पडतात. 

त्याकाळी वल्लभभाईंच्या लहानपणी हिंदुस्थानात प्लेगची लागण मोठ्या जोमाने फैलावली होती. वल्लभभाई लहान असतान त्यांच्या काखेतही प्लेगची लहान गांठ आली होती. त्याकाळी प्लेगवर प्रभावी औषधे नसल्यामुळे गाठ ही तापत्या लोखंडी सळीचा चटका देऊन जाळून काढत. वल्लभभाईंचे लहान वय पाहून  सळीने चटका देणारा माणूस हेलावला की ह्या लहान बालकाला कसे सहन होणार ही मरणप्राय वेदना? पण निधड्या छातीच्या वल्लभभाईंनी जराही न डगमगता ती सळी स्वत:च्या हातात घेऊन त्या गाठेवर लावली होती असे लहानपणी शाळेत इतिहासाच्या पुस्तकात वाचलेले आठवले. लहानपणापासूनच अंगी बाणलेले धाडसी निर्णयक्षमता, प्रामाणिकपणा, अन्यायाची प्रचंड चीड, कमलीची सहनशीलता, स्पष्टवक्तेपणा हे गुण पुढे त्यांच्या चांगलेच कामी आले. लंडनला जाऊन ते बॅरिस्टरची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आणि अहमदावादला त्यांनी वकिलीच्या व्यवसायामध्ये चांगलाच जम बसविला होता. ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीचा त्यांना प्रचंड तिटकारा होता. चंपारण्य येथील महात्मा गांधीजीच्या सत्याग्रहाच्या प्रभावाने प्रेरीत होऊन त्यांनी पुढे आपले जीवन स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी झोकून दिले. 

१९१६ मध्ये वल्लभभाईंनी लखनौ येथे राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रतिनीधीत्व केले आणि १९१७ मध्ये ते अहमदाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. अहमदाबाद्मध्ये १९१७ साली आलेल्या प्लेगच्या साथीच्या वेळेस अहमदाबाद नगरपालिकेच्या "सॅनिटरी कमिटीचे अध्यक्ष ह्या नात्याने वल्लभभाईंनी ह्या कठीण समस्येच्या आघाडीवर जाऊन जो असामान्य लढा दिला तो खरोखरी वाखाणण्याजोगाच आहे. वल्लभभाई त्या वेळेस आपल्या केबिनमध्ये बसून हुकूम सोडू शकले असते आपल्या पदाच्या अधिकारामुळे, परंतु तसे न करता त्यांनी पालिका कर्मचार्‍यांच्या खांद्याला खांदा लावून केलेला मुकाबला आम्ही भारतीय कधीच विसरू शकणार नाही.

पुढे १९१७ साली गुजरातमधील खेडा गावात भयंकर दुष्काळ पडला अस्तानाही ब्रिटीश सरकारने शेतकर्‍यांवर अवास्तव शेतसारा लादला होता. तेव्हा गांधीजीच्या मार्गदर्शनानुसार वल्लभभाईंनी खेडा जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे नेतृत्त्व केले जणू १९१७च्या खेडा सत्याग्रहात पटेल गांधींचे उपकप्तान होते. त्यांना शेतसारा न देण्याबद्दल प्रेरीत केले. अर्थातच शेवटी सरकारला झुकावेच लागले आणि शेतसार्‍यात सूट द्यावीच लागली - हा वल्लभभाईंचा यशस्वी लढा पुढील लढ्यांच्या यशाची नांदी ठरला होता. 

१९२० मध्ये गांधीजीनी असहकार चळवळ सुरु केल्यावर वल्लभभाईंनी हजारो रुपयांची मिळकत देणार्‍या वकिलीवर पाणी सोडले, न्यायलायावर बहिष्कार टाकला व आपले सर्वस्व स्वातंत्र्य-संग्रामासाठी पणाला लावले होते. 

तशीच जिकीरीची लढाई खेळून वल्लभभाईंनी शर्थीची चिवट झुंज दिली होती अहमदाबाद्मध्ये १९२७ साली आलेल्या पूरपरिस्थीतीमध्ये... ह्याही खेपेस अतिवृष्टीचे अस्मानी संकट कोसळले होते आणि तब्बल ४८ तास पावसाने अहमदाबादला झोडपून काढले होते, ७१ इंच पावसाच्या नोंदीला आणि पूराला तोंड देण्यासाठी नगरपालिकेचे अध्यक्ष असलेल्या वल्लभभाईंनी राबविलेली धडक मोहीम म्हणजे उपलब्ध असलेली साधनसामुग्री तुटपूंजी असतानाही जराही न कचरता ,डगमगता, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पीडीत लोकांपर्यंत कशी पोहचवायची ह्याचा जणू काही एक आदर्श परिपाठच होता म्हटले तर वावगे मुळीच ठरणार नाही असेच वाटते. 

येथे आवर्जून उल्लेख करवी वाटते ती एक बाब म्हणजे वल्लभ्भाईंनी व्यापार्‍यांना पूरपीडीतांना अन्नधान्य, वस्त्र , खाद्यपदार्थ ह्यांची मदत करण्याचे आव्हान करताच भरघोस प्रतिसाद मिळाला होता इतकी सामाजिक पत त्यांनी सर्वच स्तरांवर कमावली होती की " वल्लभभाई आहेत म्हणजे आपण दान केलेली मदत सत्पात्री पोहोचणारच "  ह्या सार्थ विश्वासाची कमाई त्यामागे दडली होती जी वल्लभभाईंनी कमावली होती - आपले स्वच्छ चारित्र्य, देशभक्ती, निष्काम सेवावृत्तीतून. गल्ल्या-मोहल्ल्यांमध्ये सामूहिक स्वंयपाकघर चालू करून लोकांना अन्नाची उणीवही भासू दिली नाही , एवढेच नव्हे तर पुढे ह्याच मदतनिढीतून बेघरांना घरेही उभारून देणात आली होती.  वल्ल्भभाईंच्या अथक परिश्रमांमुळेच शहराचे अधिक नुकसान होण्यापासून वाचले होते आणि जीवीतहानीही रोखली गेली होती.  

ह्या वेळेस सरकारी यंत्रणेपेक्षाही कार्यक्षम अशी वल्लभभाईंनी तयार केलेली निष्ठावान कार्यकर्त्यांची फौजच सरकारी मदत तळागाळापर्यंत पोहचविताना कामी आली होती. म्हणजेच खर्‍या अर्थाने सरकारी यंत्रणाऐवजी यशाचे मानकरी होते वल्लभभाईं आणि त्यांचे खंदे कार्यकर्ते! 

खरोखरीच वल्लभभाई पटेल म्हणजे एक प्रशासकीय अधिकारी कसा नि:स्वार्थ व जनताभिमुख असावा ह्याचे जणू सर्वोत्तम आदर्शच होते!  

१९२८ साली बारडोलीचा सत्याग्रह - वल्लभभाईंच्या नेतृत्त्वाखाली शेतकर्‍यांनी साराबंदीची चळवळ उभारली, सरकारला शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्याच लागल्या आणि वल्ल्भभाई शेतकर्‍यांचे "सरदार " झाले. पुढे "सरदार " ही प्रेमाची उपाधीच त्यांची ओळख बनली. १९२८च्या बारडोली सत्याग्रहातील त्यांचे नेतृत्वगुण पाहून ब्रिटिशांनी त्यांना लेनीनची उपमा दिली होती.

१९३०च्या मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी त्यांना गांधीजींचे ‘जॉन द बाप्टीस्ट’ अशी उपमा देण्यात आली होती. सन १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीतही सरदार पटेल यांनी भाग घेतला म्हणून त्यांना अटक करण्यात येऊन पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. १९३७च्या प्रांतिक निवडणुकांनंतर ते काँग्रेसला दिशा देणारे आणि तिच्या कार्यावर लक्ष ठेवणारे पक्षाचे सर्वोच्च नेते होते. 

पटेलांशिवाय गांधीजींच्या कल्पनांचा व्यावहारिक परिणाम दिसला नसता आणि नेहरूंच्या आदर्शानाही फारसा वाव मिळाला नसता असे मुत्सदी मत मांडतात असे वाचनात आले होते. सरदार पटेल हे केवळ स्वातंत्र्यलढय़ाचे संघटक नव्हते, तर स्वातंत्र्योत्तर नव्या भारताचे शिल्पकार होते. एकाच व्यक्तीने बंडखोर क्रांतिकारक आणि राजकीय मुत्सद्दी अशा दोन्ही पातळ्यांवर यश मिळवणं तसं दुर्मीळ असतं. पटेल याला अपवाद होते. सरदार वल्लभभाई पटेल हे गांधींचे आणि काँग्रेसचे शक्तिकेंद्रं व आशास्थान होते. 

विनोबा भावे वल्लभभाई पटेलांना गंमतीने गांधींच्या लढय़ातले धनुर्धारी म्हणत असत. ते गांधीजींचे शिष्य होते आणि त्यांचे सेनापतीही होते. त्यांना माघार घेणं ठाऊकच नव्हतं. युद्धकाळात ब्रिटनसाठी जसे चर्चिल होते, तसे सुमारे तीन दशकं भारतीयांसाठी पटेल होते. त्यामुळेच एम. एन. रॉय त्यांना ‘मास्टर बिल्डर’ म्हणत असत. ‘हा मास्टर बिल्डर नसेल तर भारताचं काय होईल,’ याची कल्पनाही त्यांना करवत नव्हती.

कॅबिनेट मिशनच्या काळात १९४६ मध्ये एका जैन मुनींनी पटेलांची भेट घेतली. सरदारांची मुक्त कंठानं प्रशंसा करून ते जैनमुनी म्हणाले, ‘‘सरदारसाहेब, तुम्ही भारताचा इतिहास लिहायला हवा.’’ त्यावर पटेल मनमोकळेपणे हसले. ते त्यांना म्हणाले, ‘‘आम्ही इतिहास लिहीत नाही, आम्ही इतिहास घडवतो,’’ आणि खरोखरच सरदार वल्ल्भभाई पटेलांनी इतिहास घडवला असेच किमान पक्षी मला तरी वाटते.

महात्मा गांधींच्या खांद्याला खांदा लावून सरदार पटेल यांनी सन १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भाग घेतला. इंग्रज सरकारने ९ ऑगस्ट १९४२ च्या पहाटेच गांधीजींसह सरदार वल्लभभाई पटेल, पं. नेहरू, आचार्य कृपलानी, मौलाना आझाद, गोविंद वल्लभपंत, असफअली या काँग्रेसच्या नेत्यांना अटक केली. या वेळी दुसरे महायुद्ध चालू होते. इंग्रज सरकार अडचणीत होते. अमेरिकेच्या मदतीमुळे दोस्त राष्ट्रांचा– इंग्लंड–फ्रान्सचा विजय झाला. तरीही या युद्धात इंग्लंडचे कंबरडे मोडले.

भारताचा राज्यकारभार पाहण्याकरिता काँग्रेस, मुस्लीम लीग या अन्य पक्षांशी चर्चा करून इंग्रज सरकारने हंगामी सरकार सप्टेंबर १९४६ साली नियुक्त केले. या सरकारमध्ये सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. गृहमंत्री या नात्याने त्यांनी भारत–पाक फाळणीच्या चर्चेमध्ये निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर हिंदू–मुस्लीम यांच्यात उसळलेल्या प्रचंड जातीय दंगलीमध्ये कणखर भूमिका घेऊन त्यांनी जातीय दंगली आटोक्यात आणण्याचे अथक प्रयत्न केले. पाकिस्तानच्या आगळिकीविरुद्ध जोरदार इशारा दिला. हिंदू आणि मुस्लीम यांच्याशी व्यवहारवादी भूमिकेतून संवाद साधून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पटेल यांच्या बोलण्यात आणि कृतीत धर्मनिरपेक्षता होती. दरम्यान, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
स्वतंत्र भारताचा राज्य कारभार पाहण्यासाठी पंतप्रधान पं. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ अधिकारावर आले. या मंत्रिमंडळात सरदार वल्लभभाई पटेल पहिले उपपंतप्रधान झाले. त्यांच्याकडे गृहखाते, माहिती व नभोवाणी खाते, संस्थानांचा प्रश्न व निर्वासितांचे पुनर्वसन इ. खात्यांची जबाबदारी होती. सरदार पटेल यांनी तत्कालीन ५६५ संस्थानांचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करून एकसंध भारत निर्माण केला. सरदार पटेल यांची ही मोठी ऐतिहासिक कामगिरी आहे. त्यांच्या या कामगिरीने सरदार पटेल खऱ्या अर्थाने पोलादी पुरुष आहेत हे इतिहास सिद्ध झाले.

स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय नागरी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये एक वाक्य नेहमीच बोललं जात असे- ‘सरदार पटेलांचा मृतदेह जतन करून ठेवला आणि तो खुर्चीवर बसवला तर तोदेखील उत्तम प्रकारे राज्यकारभार चालवेल.’ यावरून त्यांचा करारी स्वभाव दिसतो.

वल्लभभाई पटेल यांच्या चेहऱ्यातच तेवढी जरब होती. त्यांचा चेहराच तितका करारी होता. वल्लभभाई पटेलांविषयी आजही एवढा आदरभाव लोकांच्या मनात आहे. बडे बडे संस्थानिक, राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांना त्यांच्या नजरेतील जरबेची भीती वाटत असे. त्यांच्या तिखट जिभेचा धाक वाटत असे.

भारताचे त्या वेळचे हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल सर थॉमस एल्महिर्स यांना त्यांच्या डोळ्यांत कमाल अतातुर्क किंवा विन्स्टन चर्चिल यांची भेदक नजर दिसत असे. वल्लभभाईंची जरब त्या वेळचे लष्करप्रमुख सर रॉय बुचर यांनी एकदा अनुभवली होती. त्यांनी लिहिलंय, ‘‘देशातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवर त्यांचं पूर्ण नियंत्रण होतं आणि तिच्या रक्षणाचा त्यांचा निर्धार होता. पक्षावर त्यांची मजबूत पकड होती. पक्षाची संपूर्ण यंत्रणाच त्यांनी उभी केलेली असल्यामळे पक्षीय राजकारणावर त्यांचा कमालीचा प्रभाव होता. त्यांचे सहकारी त्यांच्या आज्ञेत किती आणि कसे होते ते मी स्वत: पाहिलेलं आहे.’’ पक्षावर पटेलांचं निर्विवाद प्रभुत्व होतं. त्यांना आव्हान देण्याची कुणाची क्षमता नव्हती आणि कुणी दिलंच तर त्याला त्याची किंमत मोजावी लागत होती. 

वल्लभभाईंच्या मृत्यूपूर्वी आठ महिने आधी लॉर्ड माऊंटबॅटन त्यांना म्हणाले होते, ‘‘तुमचा पाठिंबा असेल तर जवाहरलाल नेहरू अयशस्वी होणार नाहीत.’’

पटेलांना माणसांची उत्तम पारख होती. एखाद्याला त्याच्या चुकीबद्दल चार शब्द सुनावण्याची त्यांच्यात धमक होती. पण हे काम त्यांनी अत्यंत न्यायबुद्धीने केलं आणि ते करताना त्यांनी सर्वाना समान निकष लावले. याला फक्त दोन अपवाद होते – गांधीजी आणि नेहरू. त्या दोघांबाबत ते नेहमीच वेगळा विचार करत असत. गांधीजींना तर ते गुरुस्थानी मानत होते. गांधीजींबद्दल त्यांना अपार आदर होता. नेहरूंकडे ते देशाचे पंतप्रधान म्हणून पाहत होते. राष्ट्रीय प्रश्नांबाबत ते पोलादापेक्षाही कठीण होते; पण खासगी आणि व्यक्तिगत बाबतीत ते फुलापेक्षाही कोमल होते. शरण आलेल्या शत्रूवर त्यांनी कधीही हल्ला केला नाही. स्वातंत्र्योत्तर काळात स्वत:ची ‘लढाई’ हरल्यानंतर शरण आलेल्या संस्थानिकांच्या बाबतीत ही गोष्ट विशेषत्वानं दिसून आली. 

पटेलांच्या उमद्या मनाचा अनुभव वर्णन करताना लेखक कृष्णा लिहीतात की लाहोरमध्ये त्या वेळी दंगल भडकली होती. त्यांचा धाकटा भाऊ युवराज कृष्णा त्या वेळी आयएएसच्या परीक्षेला बसला होता. आयसीएस या ब्रिटिशकालीन प्रशासकीय सेवेचे आयएएसमध्ये रूपांतर झाल्यानंतर १९४७ जुलमध्ये प्रथमच ती परीक्षा होत होती. मे महिन्यात त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षांनी पत्र लिहून लाहोरमधील तणावपूर्ण स्थितीची कल्पना दिली. या परीक्षेचं केंद्र इस्लामिया कॉलेज असल्याचं त्यांना जूनमध्ये समजलं, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्या वेळी या कॉलेजच्या परिसरात ७२ तासांची संचारबंदी लागू करण्यात आली होती. अगदी ऐनवेळी हे समजल्यामुळे काय करावं, ते त्यांना सुचेना. सगळे नेते सत्तांतराच्या विविध कामांमध्ये गुंतले होते. या संदर्भात सरदार पटेलांशी संपर्क साधावा, असं त्यांना मनोमन वाटलं. पटेल काही मिनिटं तरी वेळ काढू शकतील किंवा नाही, याची त्यांना खात्री वाटत नव्हती. शेवटी त्यांनी भीतभीतच पटेलांना पत्र लिहिलं आणि सुखद आश्चर्य म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी अन्यत्र, सुरक्षित भागात परीक्षा केंद्र बदलून दिल्याची पटेलांच्या कार्यालयाची तार त्यांना मिळाली. एवढंच नव्हे, तर गृहखात्यातर्फे प्रत्येक विद्यार्थ्यांला तार करून तो परीक्षा लाहोरमध्ये देणार की सिमल्यामध्ये याविषयी विचारणाही करण्यात आली. 
पटेलांच्या या कृतीने ते अगदी भारावूनच गेले. कृष्णा म्हणतात की त्यांनी मनात म्हटलं की, हा खरा कृतिशील माणूस आहे. सर्वसामान्यांसाठीही तो तितक्याच तत्परतेने धावून जातो. ते सांगतात की पटेलांच्या या एका कृतीने त्यांच्या मनात त्यांच्याविषयी आदराचं स्थान निर्माण झालं. 

फाळणीनंतरच्या काळात पंजाब आणि सरहद्द प्रांतातील हजारो लोकांकडून त्यांना असंच प्रेम आणि आदर मिळाला. पश्चिम पाकिस्तानात अडकलेल्या लाखो लोकांना भारतात सुखरूप परत आणून त्यांचे प्राण वाचवणारा हा एकमेव नेता होता. स्वातंत्र्योत्तर काळात दोन ऐतिहासिक घटनांमुळे पटेलांना जागतिक कीर्ती मिळाली. देशातील संस्थानं विलीन करून त्यांनी एकसंध भारत उभा केला आणि आयसीएस ही ब्रिटिशकालीन प्रशासकीय परीक्षा बदलून त्यांनी आयएएस ही भारतीय परीक्षा-पद्धती लागू केली. या दोन्ही गोष्टी त्यांनी जणू लखलखत्या विजेच्या  अफाट  वेगानं केल्या. 

प्रसिद्ध सोरटी सोमनाथ मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी व व्यवस्थेसाठी सरदार पटेलांनी एक विश्वस्त निधी उभा केला. अस्पृश्यांना त्या देवळात प्रवेश व पूजा करण्याचा हक्क विश्वस्त पत्रकात वल्लभभाईंनी नमूद केला; तसेच सर्व धर्माच्या व्यक्तींना खुल्या प्रवेशाची तरतुदही त्यात नमूद केली. ही त्यांची इच्छा पुढे १९५१ मध्ये पुरी झाली. 

सरदार वल्लभभाई पटेल ह्यांना नागपूर, प्रयाग, उस्मानिया यांसारख्या अनेक विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेट पदवी दिली. भारत सरकारने १९९१ साली त्यांना मरणोपरांत " भारतरत्न" पुरस्कार देऊन गौरविले. अहमदाबादच्या विमानतळाचे "सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ" असे नामकरण करण्यात आले. गुजरात वल्ल्भनगर विद्यानगर येथे सरदार पटेल विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली. 

सरदार पटेल म्हणत - 
यह हर एक नागरिक की जिम्मेदारी है कि वह यह अनुभव करे की उसका देश स्वतंत्र है और उसकी स्वतंत्रता की रक्षा करना उसका कर्तव्य है। हर एक भारतीय को अब यह भूल जाना चाहिए कि वह एक राजपूत है, एक सिख या जाट है । उसे यह याद होना चाहिए कि वह एक भारतीय है और उसे इस देश में हर अधिकार है पर कुछ जिम्मेदारियां भी हैं ।
अर्थ- ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की त्याने हा अनुभव करावा की त्याचा देश स्वतंत्र आहे आणि त्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हे त्याचे कर्तव्य आहे.  प्रत्येक भारतीयाला आता हे विसरायला हवे की तो एक राजपूत आहे , तो एक शीख आहे की जाट आहे, त्याला फक्त हे माहीत असायला हवे की तो एक भारतीय आहे आणि त्याला ह्या देशात प्रत्येक अधिकार आहे परंतु काही जबाबदारी पण आहे.     

ह्यावरून सरदारांची धर्मनिरपेक्ष वृत्ती आणि मातृभूमीबाबतची कर्तव्य कठोरता स्पष्ट होते.  

सरदार पटेलांच्या असामान्य व्यक्तीमत्त्वाने माणसे भारावून नाही गेली तरच नवल, त्या काळातल्या कल्याणजी मेहता, उमाशंकर जोशी , हरिवंशराय बच्चन ह्या प्रथितयश कवींनी "सरदार पटेल " ह्यांच्या अफाट कर्तुत्त्वाला सलामी दिली होती आपल्या काव्यांतून, त्यातील एक झलक -

पटेल के प्रति  

यही प्रसिद्ध लोहपुरुष प्रबल,
यही प्रसिद्ध शक्ति की शिला अटल,
हिला इसे सका कभी न शत्रु दल,
पटेल पर स्वदेश को गुमान है ।
सुबुद्धि उच्च श्रृंग पर किये जगह,
हृदय गंभीर है समुद्र की तरह,
कदम छुए हुए ज़मीन की सतह,
पटेल देश का निगहबान है ।
हरेक पक्ष के पटेल तौलता,
हरेक भेद को पटेल खोलता,
दुराव या छिपाव से इसे गरज ?
कठोर नग्न सत्य बोलता ।
पटेल हिंद की नीडर जबान है ।
                 - हरिवंशराय बच्चन (1950)

या करारी, धाडसी, कणखर व्यक्तीमत्त्वाच्या भारतीय पोलादी पुरुषाची काया १५ डिसेंबर १९५० रोजी पंचत्त्वात विलीन झाली, 


अवघा देश एका सच्च्या थोर देशभक्ताला, मातृभूमीच्या महान सुपुत्राला, नि:स्वार्थी, पोलादी नेतृत्त्वाला पारखा झाला... खरेच अशा राष्ट्रप्रेमाच्या मुशीतून जन्मलेल्या भारतमातेच्या वीर सुपुत्राच्या चरणी सविनय अभिवंदन व लोटांगण व त्याची असीम देशभक्ती, जाज्वल्य सत्य निष्ठा, अन्यायाविरूध्द लढा देण्याची खंबीर , धाडसी वृत्ती ह्याचा अंश तरी आमच्यात उतरो हीच परमेश्वर चरणी आणि भारतमातेच्या चरणी प्रार्थना !!!

संदर्भ : १)  दैनिक प्रत्यक्ष -  " सरदार " लेखमाला 
          २)  SARDAR  VALLABHBHAI  PATEL  - BALRAJ KRISHNA 
           

No comments:

Post a Comment

प्रत्यक्ष मित्र - Pratyaksha Mitra

Samirsinh Dattopadhye 's Official Blog